To the shepherd in Marathi Cooking Recipe by Trupti Deo books and stories PDF | गोपालकाला

Featured Books
Categories
Share

गोपालकाला



गोपालकाला – विस्मृतीत गेलेला पारंपरिक स्वाद 

आमच्या लहानपणी आजी जेव्हा देवळात जायची, आणि येताना तिच्या हातातल्या द्रोणाकडे आमचं लक्ष लागलेलं असायचं. आजीनं किती द्रोण आणले – एक की दोन? हे पाहणं म्हणजे आमच्यासाठी मोठी उत्सुकता असायची.कारण येताना..

 तिनं आणलेला गोपालकाला.

फक्त प्रसाद नव्हता, तो एक स्वाद आणि संस्कृतीची आठवण होती. अमृताहूनही अधिक चविष्ट आणि मन तृप्त करणारा हा पदार्थ आजही जिभेवर रेंगाळतो. मात्र, आजच्या पिढीसाठी तो नवीनच आहे – कुठेही ऑनलाईन रेसिपी न मिळणारा, विस्मृतीत गेलेला एक अनमोल ठेवा!

गोपालकाला – केवळ प्रसाद नव्हे, तर पौष्टिक आणि आनंददायक पदार्थ

गोपालकाला हा केवळ दहिकाला किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी केला जाणारा प्रसाद नाही, तर तो लो-कॅलोरी, हेल्दी आणि सगळ्यांना खाण्यास योग्य पदार्थ आहे. झटपट तयार होणारा, सात्त्विक मनाने बनवलेला आणि संस्कृतीची आठवण करून देणारा गोपालकाला आपण वर्षभर खाऊ शकतो.

सगळे मिळून एकत्र बसून खाण्यात जी मजा आहे, तीच तर आपल्या संस्कृतीचं सौंदर्य!
साहित्य:

१ वाटी ज्वारीच्या लाह्या

१ वाटी पातळ पोहे

१/२ वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ

१ लहान काकडी (बारीक चिरून)

१ सफरचंद (साल काढून, तुकडे करून)

१/२ वाटी डाळिंबदाणे

१/२ वाटी ओल्या नारळाचे काप

१ चमचा कैरीचे लोणचं (ऐच्छिक)

१ चमचा लिंबाचा रस

१ वाटी गोडसर दही

चवीनुसार मीठ आणि साखर

१ हिरवी मिरची (बारीक चिरून, ऐच्छिक)
अजून आवडीनुस्वार बदल करू शकता.

 कृती:

 एका मोठ्या परातीत लाह्या, भिजलेले पोहे आणि हरभऱ्याची डाळ एकत्र करून घ्या.
 त्यात काकडी, सफरचंद, डाळिंब, नारळाचे काप घाला.
 चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून हलकेच मिक्स करा.
शेवटी गोडसर दही घालून मिश्रण एकजीव करा.
कृष्णाला नैवेद्य दाखवा, आणि नंतर प्रसादाची चव अधिक गोड होईल याचा आनंद घ्या!

 गोपालकाल्याचे आरोग्यदायी फायदे:

 ज्वारीच्या लाह्या – फायबर आणि ऊर्जा वाढवणाऱ्या
हरभऱ्याची डाळ – प्रथिनांनी समृद्ध
डाळिंब आणि सफरचंद – अँटिऑक्सिडंट्सने भरलेले गोडसर दही – पचन सुधारते आणि शरीर थंड ठेवते

हा पदार्थ केवळ आरोग्यदायीच नाही, तर आपल्या परंपरेचं प्रतिबिंब आहे!आणि खरं सांगायचं तर… गोपालकाला हा पदार्थ नाहीच, तो एक अनुभव आहे — आठवणींच्या मऊ गाठींमध्ये गुंडाळलेला.
आज आपण कितीही पुढे गेलो, तरी मनाला समाधान देणारे क्षण हे असेच साधे, निरागस असतात. एका द्रोणात सगळ्यांनी मिळून खाल्लेला गोपालकाला म्हणजे फक्त पोट भरणं नव्हे, तर मन भरून येणं असतं. त्या प्रत्येक घासात “आपलेपणा” असतो, जो कुठल्याही महागड्या पदार्थात सापडत नाही.
कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा… स्वयंपाकघरात उभं राहून हा गोपालकाला बनवा… आणि पहिला घास घेताना डोळे मिटा — कदाचित तुम्हालाही तुमची आजी, तुमचं लहानपण आणि ते हरवलेले दिवस पुन्हा भेटतील.
कारण काही चवी या जिभेवर नाही, तर आठवणींच्या खोल कप्प्यात जपलेल्या असतात… आणि गोपालकाला ही त्यातलीच एक — साधी, पण मनाला कायमची जोडून ठेवणारी!

गोपालकाला – परंपरा, स्वाद आणि एकत्र येण्याचा आनंद!

या पदार्थाची खरी गंमत म्हणजे कोणतंही ठराविक प्रमाण नसतं, मनमोकळं, सहज आणि आनंदानं बनवलं की त्याची चव आणखी वाढते. सगळे मिळून, एकत्र बसून, हसत-खेळत गोपालकाला खाण्यात वेगळीच मजा आहे!
आणि अजून एक गोष्ट…
गोपालकाला बनवताना मोजमाप लागत नाही, पण मन मात्र भरभरून लागतं. कुणी जास्त दही घालतं, कुणी थोडी साखर वाढवतो, तर कुणी मिरची टाकून त्याला हलकासा तिखटपणा देतो… पण शेवटी चव एकच — आपलेपणाची!

आजच्या काळात आपण सगळं “परफेक्ट” बनवायला धडपडतो, पण गोपालकाला आपल्याला शिकवतो — अपूर्णतेतही किती सुंदर पूर्णत्व दडलंय. थोडं जास्त-थोडं कमी झालं तरी चालतं, फक्त त्यात प्रेमाची चव असली की तो प्रसाद बनतो.

कधीकधी वाटतं, आपल्यालाही आयुष्याचा गोपालकाला बनवायला शिकायला हवं — गोड-तिखट-आंबट सगळे अनुभव एकत्र करून, कुठलीही तक्रार न करता, आनंदानं स्वीकारत…

मग कदाचित आयुष्यही तितकंच चविष्ट होईल!





तर आजच घरी हा विस्मृतीत गेलेला पदार्थ करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा!



सौ तृप्ती देव 
 भिलाई छत्तीसगड