No time.... in Marathi Motivational Stories by Sudhanshu Baraskar books and stories PDF | वेळ नाही....

Featured Books
Categories
Share

वेळ नाही....

“वेळ नाही…” हे वाक्य आपण आजकाल फार सहज वापरतो. कधी खरंच वेळ नसतो, पण बऱ्याचदा एखाद्याला उत्तर द्यायचं नसतं किंवा बोलणं टाळायचं असतं, तेव्हा आपण सहज म्हणतो — “सध्या वेळ नाहीये, नंतर बोलू…” हळूहळू हे वाक्य केवळ एक कारण न राहता सवय बनते. आपण स्वतःलाच समजावतो की आता नाही, नंतर नक्की बोलू. पण तो “नंतर” कधीच येत नाही, आणि जेव्हा येतो, तेव्हा विषय आणि वेळ निघून गेलेली असते. खरं तर वेळ हा विषय खूप संवेदनशील आहे, कारण वेळेच्या नावाखाली आपण नकळत आपल्या जवळच्या माणसांपासून दूर जात असतो. आजच्या वेगवान आयुष्यात प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला आहे. नोकरी, शिक्षण, करिअर, व्यवसाय, स्पर्धा — सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. पण या सगळ्या “urgent” गोष्टींमध्ये आपण “important” माणसांना मागे टाकतो. मोबाइल सतत हातात असतो, सोशल मीडियावर तासन्‌तास वेळ जातो, पण घरच्यांशी दोन शब्द बोलायला वेळ नसतो. इथे वेळेची कमतरता नसून, प्राधान्यांची चूक असते. ही चूक नकळत होते, पण तिचे परिणाम खोलवर जाणवतात.
    अनेकजण नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी परदेशात गेलेले आहेत. परदेशात गेल्यावर वेळेचा खरा अर्थ कळतो. भारतीय वेळ आणि इतर देशांमधील वेळ यामधील फरक, वेगळी दिनचर्या आणि वेगळं आयुष्य यामुळे आपल्या माणसांशी मनसोक्त बोलणं शक्य होत नाही. मी स्वतः परदेशात शिक्षणासाठी आलो आहे, आणि इथे आल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं की आपण कामात इतके गुंतून जातो की घरच्यांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर करता येत नाहीत, भावना मनातच साठून राहतात. परदेशात राहिल्यावर सण-समारंभ, वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम हे सगळे फक्त व्हिडिओ कॉलपुरते मर्यादित राहतात. आजूबाजूला माणसं असतात, पण आपली माणसं नसतात. अशा वेळी घरून आलेला एक साधा फोन, “जेवण झालं का?” असा प्रश्न, किंवा “काळजी घे” हा शब्दसुद्धा मनाला आधार देतो. पण जेव्हा संवाद कमी होतो, तेव्हा मनात एक पोकळी निर्माण होते — जी कोणत्याही यशाने, गुणांनी किंवा पदवीने भरून निघत नाही.
कधी कधी दिवस संपल्यावर फक्त आठवणी आठवतात. आई-वडिलांनी केलेल्या लहानसहान गोष्टी, मित्र-मैत्रिणींशी घालवलेला वेळ, हास्य-गमतीशीर प्रसंग — आणि तेव्हा लक्षात येतं की वेळ किती मौल्यवान आहे. आठवणी म्हणजे फक्त भूतकाळ नाही; त्या आपल्याला वर्तमानात स्थिर ठेवतात. आयुष्य कठीण वाटत असताना या आठवणीच आपल्याला सांगतात की आपण एकटे नाही. त्या आपल्याला माणूस म्हणून जपतात, संवेदनशील ठेवतात आणि भावनांशी जोडून ठेवतात. परिवारापासून दूर असल्यामुळे कधी कधी आपण इतके एकटे पडतो की आजूबाजूला काय चाललंय याचंही भान राहत नाही. अशा वेळी मित्र-परिवाराची आठवण येते. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, हसणं-खेळणं, साध्या गप्पा — या सगळ्या आठवणी मनात साठवून ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर असे दिवस पुन्हा येणार नाहीत, आणि म्हणूनच त्या आठवणी अधिक मौल्यवान वाटतात. पण वेळेच्या ताणामुळे आपण अनेकदा महत्त्वाच्या क्षणांना दुर्लक्ष करतो, आणि नंतर फक्त आठवणीतच ते अनुभवणं शक्य होतं.
    हीच गोष्ट क्रिकेटच्या उदाहरणातूनही स्पष्ट होते. समजा एखाद्या स्पर्धेचा अंतिम सामना आहे. शेवटची ओव्हर सुरू आहे, सहा चेंडूंमध्ये दहा धावा हव्या आहेत. संपूर्ण मैदान ताणतणावात आहे. गोलंदाजाने जोरात चेंडू टाकला, चेंडू हवेत उडाला… आणि फील्डरकडून कॅच सुटला. पुढच्या चेंडूवर सामना जिंकला जातो. हा एक क्षण संपूर्ण खेळाचं चित्र बदलतो. यातून कळतं की छोटा विलंब, छोटा निर्णय किती महत्त्वाचा ठरू शकतो. आयुष्यही असंच आहे. कधी वेळेवर दिलेला फोन नातं वाचवतो, तर कधी उशीर झालेला संवाद कायमची दरी निर्माण करतो. कधी ऐकणं गरजेचं असतं, कधी बोलणं, तर कधी फक्त समोरच्याला वेळ देणं. प्रत्येक क्षणाची किंमत आपल्याला तो निघून गेल्यावरच कळते.
    आजच्या स्पर्धेच्या युगात “वेळ नाही” म्हणणं जणू सवयच बनली आहे. पण २४ तासांपैकी किमान थोडा वेळ तरी आपण आपल्या स्वकीयांसाठी काढू शकतो. वेळ मोठा असण्याची गरज नाही; तो मनापासून दिलेला असावा लागतो. पाच मिनिटांचा प्रामाणिक संवादही नातं टिकवून ठेवू शकतो.
    शेवटी या लेखाच्या माध्यमातून एवढंच सांगावंसं वाटतं की — व्यस्त आयुष्यात संवाद जपणं हीसुद्धा एक शांत पण अत्यंत महत्त्वाची गरज आहे. दूर असताना आठवणी आणि संवादच आपल्या नात्यांना जिवंत ठेवतात. वेळ आपल्यासाठी शिक्षक ठरतो — तो शिकवतो, कधी गमावून, कधी आठवणी देऊन. आणि कदाचित, हाच वेळेचा सर्वात मोठा धडा आहे.

– सुधांशू संजय बारस्कर