घर… मनातलं स्थान in Marathi Spiritual Stories by Sudhanshu Baraskar books and stories PDF | घर… मनातलं स्थान

Featured Books
Categories
Share

घर… मनातलं स्थान

"घर" या शब्दाची जादू वेगळीच… नशा वेगळीच… घर म्हणजे केवळ चार भिंतींचं नाही, तर एका सुरक्षिततेच्या भावनेनं बांधलेलं नात्यांचं गोकुळ असतं. हेच ते ठिकाण, जिथे माणूस अगदी बिनधास्त राहू शकतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात मन:शांती मिळवण्यासाठी हक्काची जागा असते ती म्हणजे आपलं घर. जिथे माणूस स्वतःच्या सुख-दुःखांना मोकळेपणाने सामोरे जाऊ शकतो, कुठलाही आव न आणता स्वतःला व्यक्त करू शकतो.
घरात आनंद तेव्हाच येतो जेव्हा घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असतं. प्रसन्न वातावरणामुळे घराला घरपण मिळतं आणि म्हणूनच सुखी-समाधानी परिवारामुळे घराला खरं घरपण मिळतं. घरातलं प्रत्येक नातं हे फक्त नावापुरतं नसतं, तर ते एक बांधीलकीचं आणि प्रेमाचं प्रतीक असतं. आई-वडिलांचं प्रेम, भावंडांची मस्ती, आजी-आजोबांचे संस्कार—या सगळ्या गोष्टींमुळे घरात एक वेगळाच ऊबदारपणा येतो. आपण कितीही मोठे झालो तरी आईच्या हातचा गरम भात किंवा वडिलांचा आधार आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा असतो.
 आजच्या स्पर्धात्मक युगात तरुण पिढी शिक्षण किंवा नोकरीसाठी घरापासून दूर असते. काळाची गरज म्हणून यात काही चुकीचं नाही. पण दिवसभराच्या धकाधकीनंतर मनाला खरं समाधान हवं असतं ते परिवाराच्या सहवासातून. घरापासून लांब असताना संवादासाठी फोन हा एकमेव आधार राहतो, पण तो कधीच समोर बसून बोलण्याची जागा घेऊ शकत नाही. मित्र कितीही असले तरी कुटुंबासोबत घालवलेला वेळ वेगळीच ऊर्जा देतो, त्याचा आनंद वेगळाच असतो. काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त मी घरापासून खूप दूर होतो. सुरुवातीला नवीन ठिकाणी जुळवून घेणं कठीण होतं. हळूहळू नवीन मित्रमंडळी मिळाली, जी त्या क्षणी कुटुंबासारखीच भासली. पण कितीही लोक असले तरी आई-वडील आणि बहिणीसारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही.
कामाच्या तणावात असताना फक्त घरी एक फोन केला की मन किती हलकं होतं हे शब्दांत सांगणं कठीण आहे. आईचा आवाज ऐकला, की अगदी एका क्षणात मन शांत होतं. पण काही वेळानंतर पुन्हा त्याच धकाधकीत अडकायचं… "पहिले पाढे पंचावन्न" सुरूच राहायचं. कित्येक वेळा असं वाटायचं की आपल्याला घरीच असायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं! पण वास्तव वेगळं असतं. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घरापासून दूर राहावं लागतं, संघर्ष करावा लागतो.
      नंतर विचार करून मी असं ठिकाण निवडलं जिथून कधीही घर गाठता येईल. घरापासून खूप दूर जाण्यापेक्षा घराशी जोडलेलं राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं. भविष्यात अजून दूर जावं लागेल, पण कुटुंबाचा आधार असेल तर तेही सहज सांभाळता येईल. या प्रवासात कुटुंबासोबतच काही माणसं अशी भेटतात, जी कधी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात हे कळतही नाही.
घरापासून दूर असताना जसं कुटुंबाचा आधार असतो, तसाच काही जिवलग मित्रांचा पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा असतो. मी जेव्हा या ठिकाणी पुन्हा परत आलो, तेव्हा एका खास व्यक्तीने मला केवळ आधार दिला नाही, तर त्याच्या उपस्थितीने त्या जागेला पुन्हा घरासारखं वाटू लागलं. अशा माणसांना शब्दांत धन्यवाद देणं अवघड असतं, कारण त्यांच्यासाठी कधीच काही बोलावं लागत नाही—ते आपसूक समजून घेतात. या अशा माणसांमुळे घराची आठवण जरी सतत येत असली तरी ती सहन करायला थोडं सोपं वाटतं.
आज अनेक तरुण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जातात. तिथे जाऊन स्वप्नं पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. पण घरापासून लांब असताना मनात कुठेतरी "घरची आठवण" असतेच. मोठमोठ्या गगनचुंबी इमारती असोत किंवा परदेशातील आलिशान जीवनशैली, तरीही मन कधीतरी आपल्या घराच्या साधेपणात हरवून जातं. कोणीही कितीही जग फिरलं तरी खरा आनंद आपल्या घरातच असतो. घर म्हणजे फक्त वास्तू नसते, तर आपल्याला जपणारं आणि उब देणारं सुरक्षित स्थान असतं. प्रवास कितीही लांब असो, ध्येय कितीही मोठं असो, दिवसाच्या शेवटी आपण हक्काने परतू शकतो ते आपलं घरच!
घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, तर आपल्या आठवणींचं एक विश्व आहे. जिथे आपण पहिले पाऊल टाकलं, जिथे आपली स्वप्नं आकार घेतात, आणि जिथे आपण स्वतःला सर्वात जास्त सुरक्षित समजतो. म्हणूनच घरात असताना त्याची किंमत फारशी कळत नाही, पण एकदा का घरापासून दूर गेलो की त्याचं महत्त्व खऱ्या अर्थाने उमजतं. म्हणूनच कोणी तरी खरंच म्हटलं आहे—
"सुबह का भूला अगर शाम को घर लौटता है तो उसे भूला नहीं कहते."