Grandma living at the east - 3 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | उगवतची आज्जी - 3 (अंतिम भाग)

Featured Books
Categories
Share

उगवतची आज्जी - 3 (अंतिम भाग)


        

        सुधाआत्तेचे लग्न होण्याआधीच उगवतचे आजोबा निवर्तले. मृत्युच्या आदल्या दिवशी  बापुनी त्याना मघई पान नी  सुपारीचा चुरा तळहातावर चांगला मळून दोन तंबाखुची पानं टाकून ते भरवलं. पानाचा रस गळ्यातून उतरल्यावर त्यानी  “कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ” हा पूर्ण श्लोक म्हटला नी श्रीकृष्ण  गोविंद हर मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हा जप  सुरू केला. दुसरे दिवशी पहाटे सुधा आत्तेच्या हाका ऐकून बापू नी आई  उगवतच्या घरी गेले. तेंव्हा आजोबांचं प्राणोत्क्रमण झालेलं होतं. ते गेल्यावर सहा महिन्याने सुधा आत्तेचं लग्न झालं नी आज्जी एकटीच राहिली. मग आम्ही भावंडं रोज रात्री तिच्या सोबतीला नी झोपायलाच उगवतच्या घरी जात असू. मग गाणी गोष्टी यांचा जणु खुराकच  सुरू झाला. 

      भाऊ परदेशी गेल्यावर अवघड कामे सांगून  लहानग्या सोनसाखळीचा छळ करणारी दुष्ट भावजय, राणीला तलम वस्त्रे विणून देवून त्या बदल्यात तिचा बाळ हिरावू पाहणारा अगडम बगडम आणि नवरा पुराण ऐकायला देवळात गेल्यावर त्याला फसवून गोड धोड करून खाणारी त्याची लबाड बायको ही पात्रे अजूनही माझ्या भावविश्वात शाबूत आहेत. भिकंभट अर्थार्जन करायला शेजारच्या नगरात गेल्यावर वेशीवरचा ब्रह्म समंध भिकंभट बनून त्याच्या घरात ठाण मांडून बसतो.पुढे काही दिवसानी खरा भिकंभट आल्यावर बायको मुले त्याला ओळखीत नाहीत. तो निराश होवून रडत बसला असता गुराख्यांच्या खेळात राजा बनलेला रामा गोवारी त्याचे गाऱ्हाणे ऐकून घेतो. मग राजाच्या दरबारात न्यायाधिशाच्या  सिंहासनावर बसून चतुर रामा गोवारी एक अट घालतो. खरा भिकंभट असेल त्याने या बाटलीत शिरून दाखवावे. ब्रह्मसमंध फसतो नी बाटलीत शिरतो. त्याबरोबर रामा गोवारी बाटलीचे बूच लावून घेतो नी भिकंभटाला न्याय मिळतो. 

    शंभर रेशमी शेले विणण्याचे काम मुदतीत पूर्ण होत नाही म्हणून रडणाऱ्या विणकराला मदत करायच्या मिषाने मुलींचे रूप घेतलेली पिशाच्चे विणकराच्या घरात शिरतात. त्याना खाणे घेवून येण्यासाठी विणकर घरात गेल्यावर पिशाचिनी सगळे माग उलटे करून क्षणार्धात विणकाम पुरे करतात . विणकर खाणे घेवून आल्यावर पहातो तर सगळे माग उलटे केलेले. ही विपरित करणी करणाऱ्या मुली म्हणजे पिशाच्चे आहेत. हे ओळखून तो त्यानी निघून जायला सांगतो पण पिशाच्चे ऐकत नाहीत. आम्ही उजाडेपर्यंत इथेच राहणार . पहिला कोंबडा आरवला की मग आम्ही डोंगरावरच्या राईत परत जाऊ.  मग ती घरातली एकेक वस्तू उलटी करून ठेवायला लागतात. विणकराची हुषार मुलगी एक युक्ती करते. ती मागिलदाराने बाहेर पडून थोड्या अंतरावर जावून जोराने बोंबा मारू लागते. “डोंगराला लागली आग.... धावाहो धावा.....” ही बोंब ऐकल्यावर घाबरलेली पिशाच्चे सैरावैरा धावत सुटतात. 

       पावसाळ्यात कवडे ओरडू लागतात. ते म्हणत असतात" सीतेचे पोहे गोड गोड गोड, कवडा मी पोर पोर पोर......" त्यांच्या आळपण्यावरून आजीने आम्हाला कवड्याची गोष्ट सांगितली. कवड्याने पोहे करण्यासाठी रान भात आणले. त्याच्या आईने आपली सून म्हणजे कवड्याची बायको नी आपली मुलगी सीता दोघीनाही निम्मे निम्मे भात वाटून दिले. दुसरे दिवशी ती मुलाबरोबर  रानात गेल्यावर  नणंद  भावजयीने पोहे कांडायचे काम सुरू केले. कवड्याची बायको आळशी असते. तीने घाई गडबडीत कसे तरी कांडप केले. रान भाताला तूस फार असते.कांडप झाल्यावर नीट आसडणी पाखडणी न करता तूसा सकटच पोहे भरून ठेवले. कवड्याच्या बहिणीने, सीतेने मात्र आपल्या वाटणीचे भात कांडून झाल्यावर ते पुन्हा पुन्हा आसडून पाखडून आतली तुसे फोलपटे काळजीपूर्वक काढून टाकली. 

        संध्याकाळी कवडा रानातून आल्यावर त्याने दोघीनी केलेल्या कामाची पाहणी केली.त्याच्या बायकोने नीट आसडणी पाखडणी न केल्यामूळे तिचे पोहे जादा भरले. उलट सीतेने फोलपटे तूसे पाखडून टाकल्यामुळे तिचे पोहे कमी भरले. कवड्याला या गोष्टीचा राग आला नी त्याने रागाच्या भरात कोपऱ्यातली काठी उचलून बहिणीच्या डोक्यावर मारली. फटका वर्मी बसल्यामूळे बहीण बिचारी मरून पडली. दुसरे दिवशी त्याच्या आईने न्याहरीसाठी सूनेने कांडलेल्या पोह्यांना फोडणी घालून ते खायला दिले. त्या पोह्यांमध्ये फोलपटं नी तूस असल्यामूळे पोहे खाताना हिरड्याना, टाळूला टोचायला लागली. कवड्याने तोंडातला घास थुंकून टाकला. आईने नीट बघितलं तर सूनेने पोह्यातली फोलपटं नी तूस नीट पाखडले नसल्याचं दिसून आलं. मग तिने सीतेने कांडलेल्या पोह्याना फोडणी घातली. हे पोहे खुपच चवीष्ट होते.आता कवड्याला आपली चूक कळून आली. बहिणीचे पोहे कां कमी भरले याचं कारण आता उलगडलं नी कवड्याला पश्चात्ताप झाला.तेंव्हा पासून पाऊस काळात कवडे सीतेची आठवण काढून पश्चात्तापाने आळपत राहतात.            

    जवळ जवळ दोन अडिच वर्षे आम्ही आज्जीच्या सोबतीला जात असू. त्या मुदतीत रामायण, महाभारत, पंचतंत्र आणि असंख्य लोककथा आजीने आम्हाला रंगवून रंगवून सांगितल्या. इतकी प्रदीर्घ काळात तिचा खजिना कसा काय संपला नाही याचे मला आजही आश्चर्य वाटते. तिने शिकवलेलं..... 

                  मला कल्याणला जायचं तिकीट काढून कां हो द्याना  

आला लोणव्याचा पूल तिथे रडत होते मूल 

त्याच्या कानात होते डूल आणि हातात होते फुल 

                आला खंडाळ्याचा घाट तिथे गाडी झाली थाट  

                बोगद्यातून गाडी कशी जाई ना ? 

    हे गाणं आणि त्या काळी गाजलेली ‘ रंगात रंगल छंदा मधी दंगल गुंगूनि  मन हे आनंदलं’ , ‘मन सुद्द तुजं गोस्ट हाई प्रुथीवी मोलाची’ , ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा’, अशी असंख्य गाणी आज्जीला तोंड पाठ होती. त्या शिवाय लग्नात म्हणायची विहिणीची गाणी, हरितालिका, मंग़ळा गौरीच्या आरती आणि असंख़्य देवदेवतांच्या त्यावेळच्या आरतीच्या पुस्तकातही नसलेल्या आरत्या म्हणून दाखवून  आज्जी आम्हाला थक्क करून सोडीत असे. पुढे ती आपल्या माहेरी भावांच्या आश्रयाला गेली. मात्र माहेरघरी न राहता गावातल्या महाजनांच्या वाड्यात भाड्याने खोली घेवून ती रहायची. मग शनिवार रविवार धरून मी तिच्या गावी जात असे. पुढे महाविद्यालायीन शिक्षणानिमित्त  मी रत्नागिरीला रहात असे. मात्र सुटीत गावी आल्यानंतर महिना भराच्या मुक्कामात आज्जीच्या गावी दोन तीन तरी खेपा व्हायच्या. वार्षिक महापुरुषाची समाराधना आणि चतुर्थीला ती आपल्या मूळ घरी यायची. चतुर्थीच्या दिवशी सायंकाळीच गणेशाचे विसर्जन करून ती माहेर गावी जायची. ती कायम बालगणेशाची मुर्ती आणायची. सायंकाळी मुर्तीचे विसर्जन करताना करताना तिच्या गणेश मूर्तीच्या चेहेऱ्यावर मला  नेहेमी अवकळा आलेली  भासायची आणि  रडवी छटा दिसायची.  (समाप्त )