तेवढ्यात हवेतून शब्द आले, “महाराज, या रोपांच्या सभोवती खोदून आम्हाला बाहेर काढा.” कामगारानी सावधपणे खोदकाम करून लहुतटू नी मधुराणी दोघानाही अलगद बाहेर काढलं. कोषाध्यक्षांकडून सुवर्णमुद्रा घेतल्याचं दुष्ट राणीचं बिंग फुटलं. तिला नी दासीना सुळावर चडवण्यात आलं. गोष्ट संपली नी आम्ही झोपी गेलो. त्यानंतर रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर कुणीतरी म्हणायचा,“ लहुतटू लहुतटू गोष्ट कोण सांगतय्?” त्यावर सगळे एकसुरात म्हणायचे. “आजी सांगतेय्....” उगवतची आजी ही आमची चुलत चुलत आजी. तिचं घर आमच्या वाड्याच्या पलिकडच्या पडणात, पूर्व दिशेला. म्हणून ती उगवतची आज्जी. तसं गावात सुद्धा आम्हाला वडाखालचे साने नी विठू आजोबाना उगवतचे साने म्हणत. विठू आजोबा नी रुक्मिणी आज्जी दोघंही अतिशय प्रेमळ. उगवत नी मावळत सान्यांमध्ये खरंतर इष्टेटी वरून तीन पिढ्यांची भाऊबंदकी नी वैर. पण आमची सख्खी आज्जी सांगायची,“ रुक्मीण आली नी उगवत मावळत सान्यांची गोडी झाली! ” (हो.... आमची आज्जी मोठी म्हणून ती धाकट्या जावेला नाव घेवून रुक्मीण म्हणायची).तिचे वडिल विष्णुपंत उकिडवे आमच्या पणजोबांचे स्नेही. ते मुलगी सांगायला आले तेव्हा आमच्याकडेच दाखवण्याचा कार्यक्रम झालेला. आमची भाउबंदकी असली तरी आमच्या पणजोबानी विठू आजोबांच्या लग्नात खोडा घातला नाही. उलट “ विठूची नी आमची वाकडीक असली तरी मुलग़ा कष्टाळू नी कर्तबगार आहे. खातं पितं घर आहे खुशाल मुलगी द्या.....” अस सल्ला दिला. त्या कार्यात आमची गोडी झाली नी एकामेकांकडे उठणं बसणं सुरू झालं.
उगवतच्या आज्जीला पाच मुली नी तीन मुलगे झाले. मोठा मुलगा जन्मत: देवाघरी गेला. त्या नंतर चार मुलींच्या पाठीवर उगवतच्या आज्जीला मुलगा झाला. पण तो पाच वर्षाचा असतानाच प्लेगची साथ आली त्यात तो दगावला. धाकट्या सुधा आत्तेच्या पाठीवर आज्जीला मुलगा मुलगा झाला होता. पण तो ही पाऊण महिन्याच्या भरीला दगावला. त्याच्या मृत्युच्या धसक्याने विठू आजोबाना श्वासावरोध व्हायची व्याधी जडली. अमावास्येच्या सम्याला दोन तीन दिवस आजोबाना हावशी लागे. पेटीच्या भात्यासारख़ा त्यांच्या श्वासोच्छवासाचा आवाज यायचा. दोन तीन दिवस उगवतची आज्जी नी तिच्या मुली आळी पाळीने आजोबांजवळ पहारा देत थांबत. त्यांच्या छातीला तेल- बाम लावीत. उकळत्या पाण्यात पंचाचा पिळा बुडवून शेक देत. मध नी एरंडेल तेला मिसळून ते चाटण चाटवीत. दोन तीन दिवसानी मग जरा उतार पडे.
उगवतच्या आज्जी आजोबाना मुला बाळांचं भारी कौतुक. माझा जन्म गोकुळाष्टमीला झाला. तेव्हा आईचं बाळंतपण आज्जीनेच केलेलं. आजोबा सुद्धा महिम्न म्हणत आमच्या झोपाळ्यावर बसून राहिलेले. माझं रडणं ऐकल्यावर ते आमच्या बापूना म्हणाले, “बव्हतेक बोढयो (मुलग़ा) से , खणखणीत रड्यावरठी आपलो माझो अंदाजसे......” त्यांचा अंदाज खरा ठरला. थोड्यावेळात आजी बाहेर जावून म्हणाली, “बोढयो से हो...... हो बाळकृष्ण आयलोसे.” बारश्याच्या दिवशी विठू आजोबांनी कान टोचताना मला आपल्या मांडीवर घेतलेनी होता. कान टोचल्यावर बाळं ठो ऽऽ ठो रडतात. मी मात्र एकदाच ट्यॅ हां केल होतं म्हणे..... आजोबा लाडाने म्हणाले,“ पोर मोठो चांबट नी बाजिंदो से..... ”
आजी आजोबाना माझा भारीच लळा होता. मी दिवसभर उगवतच्या घरातच असे. उगवतची आज्जी निरक्षर होती. पण तिला असंख्य गीतं मुखोद्गत होती. तिचा आवाजही भारी गोड. तिच्या माहेरी रामनवमीचा उत्सव व्हायचा. तिच्या मामांच हनुमंताचं देवूळ होतं. हनुमंत जन्मोत्सवाचा चार पाच दिवस उत्सव असे. त्या काळी कुणीतरी अल्पशिक्षित स्त्रीने जन्मोत्सवावर एक गीत रचलेलं होतं.
वाडे या गावामध्ये मैदान नाक्यावरी
देवूळ हनुमंताचे बांधियेले उंच जागी........
उत्सवाचं वर्णन करणारं दहाबारा कडव्यांचं ते गाणं मला त्यावेळी तोंडपाठ झालेलं होतं. त्यात काही ओळी अशा होत्या.
मथी नायकीण गायन करी कृष्णा वाजवी सारंगी
पेटीवाले बाबुराव जोशी बंडू गुरव ठेका धरी
आज्जी हे गाणं म्हणायला लाग़ली की, माझंही नाव कृष्णा असल्यामुळे हे कडवं मी जोर जोराने म्हणत असे. आज्जी द्रौपदी वस्त्रहरणावर रचलेलं एक सुंदर गीत म्हणे. त्यात त्या काळच्या प्रसिद्ध लुगड्याच्या वाणांची नावं असत. त्या गीताच्या काही ओळी माझ्या अद्याप स्मरणात आहेत.
नाशिकची ती मग्ममुराणी कोल्हापुरची पदर फुटाणी
येवल्याची ती लाल पैठणी इंदूरीचे हिरवेगार
अहमदाबादी बहू सुकुमार काळु काजळी काश्मिरीचे
बुट्टेदारही जरी पदराचे बहु अमोलिक बेळगावीचे
टोप पदरी ते धनवडीचे जाडे दणगट मालेगावचे
वस्त्रावरती वस्त्रे लेई सोडिता मग झाली घाई
कृष्णाची ती बहु चतुराई
पितांबर पिवळा की दिसतो भगवान सगळ्याना
भक्तासाठी तो जगजेठी माधव अवतरला
सभेसी येवोनी वस्त्र पुरविले सोडवी भगिनीला
कोकिळा व्रताच्या वर्णनाचंही एक गीत ती म्हणे त्यातल्या फक्त चार दोन ओळी माझ्या स्मरणात आहेत. पार्वतीचा पिता दक्ष प्रजापती यज्ञाला शंकराला बोलावण्या ऐवजी “म्हणे मी पाहीन ना मुख दिगंबर जोग़डा” अशा शब्दात शिवाची निर्घत्सना करतो. पार्वतीने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केल्यावर शंकर त्याचा शिरच्छेद करतात. पुढे त्याला अजाचे मुंडके जोडून जिवंत केल्यावर तो शिवाची क्षमा याचना कशी करतो त्याची ‘ब्लँ ब्लँ ब्लँ’ करून खुमासदार नक्कल आजी करून दाखवायची. (क्रमश:)