Sudharak - 2 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | सुधारक - भाग 2

Featured Books
Categories
Share

सुधारक - भाग 2

********८******************

           शिलाचा संसार व्यवस्थित चालला होता. कारण होतं, तिच्यावर झालेले संस्कार. तिच्यावर तिचे आईवडील गरीब असूनही चांगले संस्कार केले होते. ज्यातून तिचे आईवडील जरी बौद्ध बनले तरी त्यांनी तिच्यावर चांगलेच संस्कार केले होते. 
          डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा शिलाला तोंडपाठ होत्या. ज्यात मी देव मानणार नाही व चमत्काराला स्थान देणार नाही, अशी गृहितके लिहिली होती. ज्यातून शिलाच्या विचाराला दिशा मिळाली होती. ज्यातून इतरही लोकांनी दिशा घेतली होती. परंतु काही लोकं त्या गृहितकानुसार व संविधानानुसार चालत नव्हते.
          बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा नक्कीच घेतल्या होत्या. परंतु सोडचिठ्ठी वा घटस्फोटाला प्राधान्य दिलं नव्हतं. मंगलसुत्र हे कुचकामी आहे व ते वापरु नका, असंही सांगीतलं नव्हतं. संस्कार हे वाईट असतात. असंही कोणत्या पुस्तकात लिहिलं नव्हतं. तरीही आज लोकं घटस्फोटाला जास्त प्राधान्य देवू लागले होते. विटाळ संपला होता. परंतु आता घटस्फोटाचे प्रमाण वाढले होते. जो तो करारानुसार विवाह करीत होता. असं चित्र दिसत होतं. त्यातच त्या लोकांवर चित्रपटाचा आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा बराच प्रभाव पडत चालला होता.
          शिला आणि मंगेशसमोर सुधारक म्हणून हीच बाब चिंतेची वाटत होती. वाटत होतं की लोकांचे घटस्फोट होवू नये. लोकांचा संसार चांगला चालावा. परंतु बाबासाहेबांनी सांगीतल्यानुसार आजच्या काळात चमत्कार नाही व आपला बौद्ध धम्म चमत्काराला स्थान देत नाही. पुर्वी बरं होतं की लोकं चमत्कार मानायचे. लोकं रुढीवादी होते व लोकं रुढी, परंपरा मानायचे. ज्यातून घटस्फोटाचे प्रमाण जास्त नव्हते. लोकांना वाटायचं की आपण फारकत घेतल्यास आपलं देव अहित करतो. पतीला देव मानायचे व त्याचा कोप होवू नये म्हणून पत्नी त्याचेजवळच आयुष्यभर राहायची. परंतु आजचा काळ पाहता त्या गोष्टी आज घडत नाही. बाबासाहेबांनी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञेनुसार देव नाही व देवाचं अस्तित्व बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेत नाकारल्यानं काही लोक देव मानत नव्हते. त्यातच पतीला आजच्या काळात परमेश्वर मानत नव्हते. त्याचा परिणाम समाजावर झाला होता व समाजानं विवाहातही कराराचं स्वरूप आणलं होतं. ज्याची पुष्टी चित्रपट निर्माते करु लागले होते. चित्रपट निर्मात्यांचं ठीक होतं. कारण त्यांना पैसा मिळत होता. 
            ते विचार व त्याच विचारातून घडून येणारी फारकत. हा चिंतेचा विचार होता शिला आणि मंगेशच्या जोडीसमोर. बिचाऱ्यांनी मंगळसुत्राच्या एक तुटणाऱ्या धाग्याला पवित्र मानून एकमेकांशी मनं जुळवली होती. आजही ते घटस्फोटाच्या विरोधात होतेच. कधीकाळी त्यांचीही भांडणं होत. परंतु त्या भांडणात ज्याची ताकद वाढली, तो बोलत असे. दुसरा घटक चूप राहात असे. जेव्हा राग निवळत असे. तेव्हा मात्र ते बोलत असत.
           शिला व मंगेशला वाटणारी लोकांच्या घटस्फोटाची चिंता. आज तीच चिंता त्यांच्या मनाची लेखणी बनली होती. ते दोघंही जण फारकतीच्याच विषयावर लोकांना समजावीत असत. म्हणत असत की मंगळसुत्र जपा. मंगळसुत्रात ताकद आहे. परंतु ते त्यांचं ऐकणारी मंडळी बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेनं उदंड झाली होती. त्यांना ना मंगलसुत्रातील ताकद समजत होती. ना मंगलसुत्राचा मान समजत होता. त्यांना वाटत होतं की मंगलसुत्रात ताकद आहे म्हणणं एक प्रकारचा चमत्कार आहे. जो चमत्कार मानू नये असं बाबासाहेबांनीच सांगीतलंय.
        घटस्फोट? मंगळसुत्र कमजोर पडत आहे की काय? शिला व मंगेशला वाटणारी चिंता. ती चिंतेचीच बाब होती. कारण विवाह तुटल्यावर जी लहान मुलांची आबाळ व्हायची. ती आबाळ पाहण्यासारखी असायची. मुलांना आईवडील दोघंही लागायचे. तसंच दोघांचही प्रेम त्यांना हवंहवसं वाटायचं. 
           ती मुलांची होत असलेली आबाळ. त्यातच त्यांना मिळत नसलेलं प्रेम. मात्र त्या मुलांना आपल्या आईवडिलांच्या फारकतीच्या सुखापुढं त्यांचं वय लहान असल्यानं भावना दडपून राहावं लागायचं. त्याच गोष्टी शिला व मंगेशला आवडत नव्हत्या. वाटायचं की बाबासाहेबांनी जरी बावीस प्रतिज्ञा सांगीतल्या असतील लोकांना. सांगीतलं असेल की चमत्कार नाही. याचा अर्थ असा नाही की कशाही करुन फारकती करायचं सांगीतलं. विवाह केल्यानंतर तो विवाह टिकायलाच हवा आणि प्रत्येक नवयुगलानं तो विवाह टिकवायलाच हवा. त्याला कराराचं रुपडं देवू नये कोणी. जर त्याला कराराचं रुपडं कोणाला आणावसं वाटत असेल तर विवाहच करु नये. फारकत करणं चांगली गोष्ट आहे, जर एकमेकांचं विवाहानंतर पटत नसेल तर. परंतु त्यात मुलांचा कोणता दोष असतो.
           मंगेश आणि शिला कधीकधी तोच विचार करत असत. त्यांनाही समजत नसे की ह्या फारकती कशा थांबवता येतील. परंतु त्यावर त्यांना कोणताच उपाय सुचत नव्हता. 
            एक दिवस मंगेश व शिला पेपर वाचन करत बसले होते. अशातच एक बातमी शिलाच्या नजरेखालून गेली. फारकत झाल्यानं पतीनं आत्महत्या केली होती. त्याला फारकतीचं दुःख सहन झालं नव्हतं. अशातच ती मंगेशला म्हणाली,
           "मंगेश, फारकतीचं दुःख सहन न झाल्यानं एका पतीनं बघ कशी आत्महत्या केलीय ते. बिचाऱ्याला पत्नी फार आवडत असेल."
            "होय न गं. परंतु ते सांगणार कसं तिला?"
            "अन् मुलंही घेवून गेली होती ती. असंही लिहून आलंय."
            "होय ना. दोष पतीचा नसेलच त्यात. शिवाय मुलं तर ती घेवून गेलीच असेल, परंतु त्या मुलांचा आणि तिच्या उदरनिर्वाहाचा खर्चही तिनं मागितला असेल. बिचारा पती."
             "होय, तेही लिहिलेलं आहेच. परंतु मला कळत नाही की हे तुला कसं माहीत?"
             "अगं मला सगळंच माहीत आहे त्यातील. समाजात असंच घडत असतं वारंवार. अशा कितीतरी आत्महत्या घडल्यात. तरीही लोकांना अक्कल आलेली नाही. आजही घडत आहेत याच गोष्टीवरुन आत्महत्या. माहीत नाही लोकांना केव्हा अक्कल येते तर. केवळ आत्महत्याच करीत सुटले."
             "आजचा काळ पाहिल्यास लवकरात लवकर फारकती होतात. आजकालचे विवाह टिकत नाहीत. म्हणतात की मंगळसुत्रात ताकद असते. परंतु मंगळसुत्र कमजोर पडत चालले आहे. जे प्राचीन काळापासून सशक्त स्वरुपाचं होतं. कालच्या प्राचीन काळातील स्रियांनी मंगळसुत्राच्या ताकदीच्या भरवशावर प्रसंगी पती चित्तेवर सतीपण भोगलं. परंतु मंगळसुत्राची अब्रू जावू दिली नाही. ती ताकद आहे मंगळसुत्रात. ती ताकद मंगळसुत्र वापरलेल्या महिलाच जाणू शकतात. आजही ती ताकद आहे. परंतु ज्याला समजतं त्याचं महत्वपण. त्यालाच मंगलसुत्राची ताकद कळत असते. इतरांना नाही. कारण विवाहाचे उलट फेरे मारायचे झाल्यास मारताच येत नाही."
            "हो ते बरोबर आहे. परंतु बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा घेतल्या, त्यानुसार मंगळसुत्रात ताकद दिसत नाही ना. मग कसे टिकतील विवाह?"
            "अहो, मंगेशराव, काही चित्रपटं ही विरगुळा व्हावा, म्हणून निर्माण होतात. ज्यात विनोद असतो. काही चित्रपटं ही बोधात्मकच असतात. असा काही बोध देवून जातात की तो चित्रपट पाहिल्यानंतर चिरकाल स्मरणात राहतो तो चित्रपट. एक चित्रपट असाच आला होता. घटस्फोटाबाबतच होता. ज्यात मुलानं मुलीला घटस्फोट म्हणताच तिला राग आला व ती न रागवता त्याला म्हणाली की ज्याप्रमाणे आपण विवाह केला व गाजावाजा केला की आमचा विवाह होतोय. फेरेही मारले की आम्ही विवाह करुन जन्मोजन्मीचे साथीदार बनतो. तीच विधी आता फारकत घेतांना करावी. पत्रिका छापाव्यात. सर्वांना वाटाव्यात व ज्याप्रमाणे विवाह होतो वा केल्या जातो. तसंच घडवावं. मात्र विवाहाचे फेरे उलटे मारावेत आणि घेतलेली वचनं एक एक करत तोडावीत. म्हणजे फारकतही माहीत होईल लोकांना. तिनं तसंच केलं. ज्यातून त्या पती असलेल्या पुरुषांची नाचक्की चित्रपटाच्या माध्यमातून जगाला दिसली. परंतु तो चित्रपट होता. खऱ्या जीवनात तसं घडत नाही. कारण भीती असते बदनामीची."
          "होय, तेही बरोबर आहे आणि तसंच व्हावं. परंतु तरीही आपली पिढी कधीच सुधारणार नाही. राहिली बदनामी. फारकतीनं बदनामीही होते. परंतु लोकं निर्लज्जच बनलेले. लोकं बेशरमासारखे वागतात. त्याकडे लक्ष देत नाहीतच."
           "शिला, प्राचीन काळात मंगलसुत्रात ताकद होती. तशी ताकद आजच्या काळात मंगळसुत्रात राहिलेली नाही. कारण महिला या मंगळसुत्र बांधून घेतांना त्याच्याकडे गंमतीनं पाहतात. एक चित्रपट असतो तसा. शिवाय विवाह झाल्यानंतरही पतीवर प्रेम न करता व त्याला पती न मानता केवळ व्याभिचार करीत फिरत असतात. ते विवाहाला गंमतच समजतात. ज्यातून विवाह तुटतात. आजचे विवाह हे गंमत, मनोरंजन म्हणून होत असतात, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. केवळ विवाहानंतर मनोरंजन आणि विरंगुळा यालाच जास्त प्राधान्य दिलं जातं आज. संसाराला वा संसार करण्याला महत्व दिलं जात नाही."
          "खरंच आजचेही विवाह हे मनोरंजन व विरंगुळेच करण्यासाठी असावेत काय? खरंच आजच्या मंगळसुत्रात पुर्वीसारखी ताकद नाही काय? खरंच मंगळसुत्राचा धागा पुर्वी जसा चमत्कार करीत होता. तसा चमत्कार आज करीत नाही काय? पुर्वीची मंडळी एवढी अज्ञानी होती काय की ते मंगळसुत्राचा मान राखत होती? अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत व न्यायालयात फारकतीच्या वाढत्या प्रमाणातील खटल्यानुसार ही बाब एक चिंतेची बाब ठरत चाललेली आहे. त्यातच खरंच विवाह तुटावे काय? विवाह करतांना बांधण्यात येणारा धागा हा कुचकामी ठरावा काय? भारतात राहणाऱ्या मुलीनं मंगलसुत्राच्या धाग्याकडे गंमत म्हणूनच पाहावे काय? ती आपली परंपरा नाही काय? याचं उत्तर आजच्या काळानुसार नाही असंच येईल. विशेष म्हणजे आपण भारत देशात राहतो व आपली संस्कृती पवित्र आहे. ही संस्कृती आपल्याला कधीच वात्रट वागणं शिकवीत नाही. जरी ती रुढीवादी असली तरी. ही संस्कृती आपल्याला व्याभिचार शिकवीत नाही. जरी आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृतीनं प्रवेश केला असला तरी. परंतु असं सारखं घडत असतांना मन तुटतं. कारण काहीच उपाय निघत नाही आहे यावर."
         "हो ना. इंग्रज भारतात आले. तशी पाश्चिमात्य संस्कृती भारतात आली. त्या पाश्चिमात्य संस्कृतीनं आपल्याला स्वतंत्रता शिकवली. माणसाला माणूसपण दाखवलं. स्री ही पुरुषांची अर्धागिनी जरी असली तरी ती गुलाम नाही असंच शिकवलं. त्यातच पुरुषांनी व स्रियांनी अनेक पती केले तरी चालेल हेही शिकवलं. परंतु ज्या भारतात आपण राहतो. त्या भारतानं आपल्याला अनेक पत्नी बनविण्याची बाब शिकवली नाही. आता प्रश्न पडतो की अनेक पत्नी करणं भारतीय संस्कृतीनं शिकवलं नाही तर पुर्वीची मंडळी अनेक पत्नी का करायच्या? त्याचं उत्तर आहे युद्ध. युद्धात अनेक स्रियांचे पती मरण पावत. काही स्रिया स्वखुशीनं सती जात तर काही सती न जाता विधवेचं जीवन पत्करत. अशातच त्याही स्रिला विधवेचं आयुष्य जगावं लागू नये म्हणून तिच्याशी विवाह करुन तिला आधार देण्याची पद्धती अवलंबली गेली. याचा अर्थ स्री ही गुलाम होती, असा होत नाही."
         "होय. ते बरोबरच. तशी भारताची संस्कृती ही महान आहे. तशी पाश्चिमात्य संस्कृती नाही. तेथील वातावरण उष्ण वा दमट असल्यानं त्यांना अंगावर कपडे सहन होत नाही. शिवाय काम उत्तेजक भावना जास्त असल्यानं तेथील स्री पुरुष अनेक पती वा पत्नी करीत असतात. कारण त्यांची संस्कृतीच तशी आहे. तशा स्वरुपाची आपल्या भारत देशाची संस्कृती नाही. राहिला प्रश्न मंगळसुत्र नावाच्या धाग्याचा. जो धागा गळ्यात सहन न होताही स्रिया त्याची मर्यादा पाळून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू मंगळसुत्र वापरत असतात. कारण तो धागा जरी असला तरी त्याची गरिमा खुप मोठी आहे."
         "शिला, आपण ज्या भारत देशात राहतो व या देशात पुर्वीपासूनच वचनाला अतिशय महत्व आहे. आपल्या प्राचीन काळातील महापुरुषांनी प्रसंगी जीवं दिलीत, परंतु आपली वचनं मोडली नाहीत. म्हणूनच ही संस्कृती महान झालेली आहे व ठरली आहे. आपल्या भारतात विवाह हा करार नाही. कारण विवाह करतांना आपल्या भारतात शक्यतोवर मोडले जात नाही. एक सृजाण स्री विवाह हा मोडत नाही. तिला मोडताच येत नाही. जी त्या विवाहाचं पावित्र्य जाणते. भारतातील विवाहाला एका मंगळसुत्रासारख्या काळ्या धाग्यानं बांधलेलं आहे व तसं केलं असल्यानं शरीराला व मनाला एक अलौकिक शक्ती येते. ती शक्ती कधीच उध्वस्त होत नाही. खुद्द तो धागा ज्यानं बांधला. तोही त्या धाग्याला नष्ट करु शकत नाही. तो धागा जर गळ्यात असेल तर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करता येतं. शक्यतोवर विवाहीत स्रिच्यांच्या कोणीच सहजासहजी वाट्याला जात नाहीत. बराच विचार करतात नव्हे तर करावा लागतो. कारण एक विवाहित स्री दुर्गा व कालीचं रुप असते. मग असं असतांना आजच्या काळातील विवाह का तुटतात? हा प्रश्न पडतो मला."
          "हो ना मंगेश. मलाही तसाच प्रश्न पडतो. आजच्या काळातील विवाह त्यांचेच तुटतात. ज्यांना मंगळसुत्राचं पावित्र माहीत नाही. असे विवाह त्यांचेच तुटतात. ज्या स्रिया विवाहानंतर आपलं मंगळसुत्र कुठेही काढून ठेवतात. त्यातच त्या धाग्याला गंमत समजतात. परंतु हा धागा म्हणजे गंमत नाही. आज न्यायालयात घटस्फोटाचे खटले उभे राहात आहेत. विवाह करतांना वचन घेणारे व शपथा घालणारे विवाह पटकन मोडत आहेत. मात्र पुर्वी असं नव्हतं. पुर्वी मंगळसुत्र तेव्हाच तुटत होतं, जेव्हा पती मरत असे. एवढंच नाही तर एक दंतकथाही प्रचलीत आहे. सावित्रीनं आपल्या पतीनिधनानंतर आपलं मंगळसुत्र न तोडता आपल्या पतीला स्वर्गातून परत आणलं होतं. एवढी ताकद मंगलसुत्रात आहे. तरीही आजच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे? तसेच न्यायालयात घटस्फोटाचे खटले मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत? ही खरं तर चिंतेची बाबच आहे."
          "खरं तर मंगळसुत्रात ताकद असावीच की त्या मंगळसुत्रानं कोणत्याही स्रिच्या मनात असुया निर्माण होवू नये. मंगळसुत्रात अशी ताकद असावी की त्या मंगळसुत्रानं कधीच पती व पत्नीच्या वादाची प्रकरणं न्यायालयात जावू देवू नयेत. शिवाय अशा प्रकारचा संशय निर्माण झाल्यास त्या वादावर विरजण घालावं. थोडं शांत राहावं. विचार करावा. मगच पावलं उचलावीत. रागारागात उचललेलं पाऊल कधीही वाकडच पडत असतं. प्रत्येकच मुलामुलीनं विवाह झाल्यानंतर कधीच न्यायालयाचा दरवाजाही ठोकू नये. अन् असं वाटलं कधी वा तशी शंका मनात उत्पन्न झालीच तर त्या प्रत्येक जोडप्यानं वह सात दिन नावाचा १९८३ ला लागलेला अनिलकपूर व पद्मिनी कोल्हापूरेचा चित्रपट नक्कीच पाहावा. केवळ पाहावा असे नाही तर त्याचा भावार्थ समजून घ्यावा. म्हणजे नक्कीच घटस्फोट होणार नाही." 
           "मंगेशराव, असे बरेच प्रश्न व वाद निर्माण झालेत की काही चित्रपटांनी आपल्याच नादाला लावून घटस्फोट वाढवले. परंतु काही चित्रपट असेही बनलेत की त्या चित्रपटांनी लोकांना जगणं शिकवलं. त्यांनी घटस्फोटाला आवर घातला. आजच्या चित्रपट निर्मात्यांना जगाचं काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त कमवायचा असतो पैसा. मग पैशासाठी काहीही. ज्यात चित्रपट चालावा म्हणून मसाला भरला जातो अधिकचा. विवाह झाल्यानंतर कधीच फारकत न होता प्रेमीसोबत विवाह होवू नये. चित्रपटात तेही दाखवलं जातं. मग काय, लोकं वास्तविक जीवनातही तसंच करुन पाहात नाहीत. कधीकधी चित्रपटात प्रेमीसोबतच विवाह झालेला दाखवला जातो. पती खुद्द असे विवाह लावून देतो. मग लोकंही तसंच करु पाहतात." 
          "पुर्वी चित्रपटात कोणीच कामं करायला तयार नसायचे. चित्रपटात काम करणाऱ्या मंडळींना नावं ठेवायचे. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेत्यांना बाजारु महिला व बाजारु पुरुष समजायचे. ज्यातून लोकांनी चित्रपटात काम करतांना आपली खरी ओळख लपवली. आपलं नाव बदलवलं. लोकांनी नाव ठेवू नये म्हणून. आज मात्र ती फॅशन झाली व आजच्या काळात कोणीही चांगल्या सुसंस्कृत घरचा का असेना, चित्रपटात काम करायला धडपड करतो. तसं पाहिल्यास घटस्फोट न होणं ही आजची गरज आहे, ज्यांना विवाहानंतर मुलं आहेत त्यांच्यासाठी. अन् ज्यांना नाही, त्यांनी आपल्या आईवडीलांकडं पाहावं. आपण तर घटस्फोट घेवून घरी बसू. परंतु जेवढे दिवस आपण घरी राहू. तेवढे दिवस आपली चिंता आपल्या मायबापांना होईल. तसं पाहिल्यास आजच्या काळात तेवढ्या वाईट प्रकारानं कोणत्याही स्रिला घरात वागवलं जात नाही. जेवढा त्रास स्रियांना पुर्वी दिला जायचा." 
           "शिला, घटस्फोट घेवू नये असं माझं म्हणणं. त्यावर लोकं म्हणतील की साहेब, मुलगा शराबी निघाला तरी. तरी घटस्फोट घेवू नये काय? म्हणतील की मुलगा निकम्मा निघाला तरी घटस्फोट घेवू नये काय? म्हणतील की मुलगा नपुंसक आहे. म्हणतील की मुलगा मारपीट करतो. हे झालं मुलीकडील लोकांचं म्हणणं. मुलांकडील लोकांचं म्हणणं याऊलट असतं. म्हणतात की मुलगी वात्रट वागते. बोलणं बरोबर नाही. आळशी आहे. कामे करीत नाही. माझ्या आईवडीलांना सांभाळत नाही. लैंगीकता बरोबर नाही." 
         "मंगेश, घटस्फोटाची अनेक कारणे आहेत. जेवढे व्यक्ती, तेवढीच कारणे. कधी हुंडा मागणीचं कारण पुढं केलं जातं तर कधी कधी त्याचा, तिचा बाहेर चक्कर आहे हे कारण सांगीतलं जातं. असं का होतं? असं होतं आपलं प्रेम एकमेकांवर निर्माण न झाल्यानं. विवाह होण्यापुर्वीच सासरमध्ये कसं वागावं व कसं वागू नये हा कुणीतरी बोध दिल्यानं. मीच वरचढ असावी ही भावना. त्यातच मुलांनाही बोध देणारे भरपूर आहेत आजच्या काळात. त्यालाही वाटतं की मी पुरुष आहे. मी का खालची भुमिका स्विकारावी. मात्र आजच्या काळात विवाहानंतर चांगलं वागाल. असं सांगणारं कुणीच मिळत नाही. कुणीच समजावीत नाही. फक्त त्यांच्या संसारात लुडबुड करुन आग लावण्याचंच काम करीत असतात."
         "विवाह हा समजुतीचा खेळ आहे. जो समजून घेईल. त्याचाच विवाह टिकेल. तसं पाहिल्यास सृष्टीविधात्यानंच विवाहाचं माध्यम आणलं. सृष्टी टिकून राहावी व एका विशिष्ट वयात पुरुष व स्री एकत्र यावे म्हणून त्यात माध्यम आणलं विवाहाचं. विवाहाच्या माध्यमातून पुरुष आणि स्री एकत्र येवून त्यांनी सृष्टी जशी आहे, तशी ठेवावी यासाठी विवाह. हाच सृष्टीचा नियम आहे व मंगळसुत्राचा धागा हा या सृष्टी नियमात दोघांचं सुत्र जोडणारा धागा. मात्र आपली फारकत ही त्या सृष्टी नियमात अडथडा टाकणारा घटक."
          "विवाह टिकावेत. शक्यतोवर विवाह तुटू नयेत. घटस्फोट होवू नये व त्याचे प्रमाण वाढू नये. तशी प्रत्येक स्री पुरुषानं विवाह करतांना विवाह तोडण्याबद्दल शपथच खायला हवी की मी विवाह करेल. परंतु विवाह तोडणार नाही. विवाह करीत आहे तर. अन् जर विवाह तोडायचा असेल तर त्या मुलामुलींनी विवाहच जोडू नये. हं, विवाह केल्यानंतर जर आपल्याला आपल्या नशिबानं सुखकारक गोष्टी मिळाल्या नाहीत, तर तो आपल्या नशिबाचा भाग. प्रत्येकाचं नशीब काही सारखं नसतंच. हे एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत होतं. वारंवार घडत नाही. तेव्हा प्रत्येक जोडप्यांनी विवाह हा शुल्लक कारणासाठी तोडू नये. कारण फारकतीत मजा नाहीच. जी मजा एकमेकांसोबत विवाह करुन राहण्यात आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास घटस्फोट हा मन तोडण्याचा पर्याय नाही. विवाहगाठी हा सृष्टी रक्षणकर्ताच बांधून पाठवतो. त्यामुळंच ती तोडण्याचा आपल्याला हक्कं नाही व हक्कंही नसावाच. हो, घटस्फोटानं आपण सृष्टीचा नियम तोडतो. हे जरी खरं असलं तरी आपलं मन हे घटस्फोटानं तुटत नाही. आपण वरवर जगाला सांगत फिरतो की अमूक अमूक असा होता. अमूक अमूक तसा होता. पुरुषही तेच सांगतो जगाला. परंतु अंतर्मनात विवाहाचे ते क्षण आणि तो त्यांचा अंतर्गत सहवास नेहमीच आठवत असतो क्षणोक्षणी. जे दिवस एकमेकांसोबत जोडीनं काढलेले असतात. एक प्रकारचं कोणावर झालेलं कौमार्यपणातील प्रेम विसरता येतं. परंतु विवाहानंतर जुळलेली मनं व प्रेम विसरता येत नाही, आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत. हे तेवढंच खरं. म्हणूनच विवाह केल्यानंतर घटस्फोट घेवून एकमेकांची मनं तोडू नये म्हणजे झालं. ती आपली संस्कृतीही नाही आणि तो आपल्या संस्कृतीचा नियमही नाही. आपली संस्कृती यामुळंच महान आहे व आपला देशही यामुळंच महान आहे, यात शंका नाहीच. तेव्हा विवाह करावा. परंतु तो तोडण्यासाठी नाही तर एकमेकांची मनं जोडण्यासाठी करावा. तद्वतच विवाह झाल्यानंतर कितीही संकट आलं तरी त्यावर तोडगा काढावा. फारकतीनं विवाह तोडू नये म्हणजे झालं. फारकत हा विवाह तोडण्याचा पर्याय होवूच शकत नाही. शिवाय विवाहात वापरलेलं मंगळसुत्र हा त्याच क्षणाची आठवण जीवनभर देत असतो. जे काही अनमोल क्षण आपण विवाहानंतर काही दिवस अनुभवलेले असतात. कारण मंगळसुत्रात कालही ताकद होती आणि आजही तेवढीच ताकद आहे, यात दुमत नाही."
           मंगेश आणि शिलाचं ते संभाषण. त्यांच्या मनात असलेली फारकतीविषयीची आतूरता. त्यातच मंगेशला वाटणारी फारकतीची चिंता व शिलालाही वाटणारी फारकतची खंत. त्या संभाषणातून बोलून दाखवली होती. तसं त्यांचं संभाषण संपलं नव्हतंच. त्यानंतर मंगेश म्हणाला,
           "विवाह झाला की प्रत्येक मुलामुलींच्या आयुष्याची दिवाळीच असते. परंतु जर फारकत झाली की दिवाळा निघतो. त्यातच एकमेकांवर आगपाखड होते. एकमेकांचे गुणदोष काढले जातात. मग ही दिवाळी की दिवाळा हे समजायला जागाच नसते."
          "मंगेश, हा प्रत्येक घटस्फोटीत मुलांमुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण घटस्फोटानं प्रत्येकाच्या घरची दिवाळी साजरी होत नाही तर संसाराचा दिवाळाच निघत असतो. ज्या घटस्फोटात खुद्द आईवडील वा उमेदवाराचे नातेवाईक हस्तक्षेप करुन खतपाणी घालत असतात. अन् वकील तेल, तिखटमीठ लावत असतात. त्यांचा घटस्फोट होणारच."
         शिलानं खंत व्यक्त केली. तिला आता राहावलं जात नव्हतं. ती बोलत होती. राग व्यक्त करीत होती. तसा मंगेश बोलला,
           "शिला, पती हा आपल्या पत्नीवर निरतिशय प्रेम करीत असतो. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होत नाही. तो तिचंच ऐकतो आणि तिच्याच मनानं चालत असतो. त्याच प्रेमाचा फायदा घेवून प्रसंगी ती त्याच्या आईला वृद्धाश्रमात टाकत असते तर कधी त्याची भाऊ बहिण तोडत असते. नातेवाईकांचा प्रश्न तर वेगळाच राहिला. तरीही तो सगळं सहन करीत असतो. तरीही वृद्धाश्रमात जो पती आपल्या आईवडीलांना टाकतो. तरीही तिला तो पती आवडत नाही. त्या पतीचं आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकणं आवडतं. कारण तिला ती कोणतेही कृत्य करेना, तिला टोकणारा कुणी गृहस्थ घरात असायला नको वा कोणाची कोणतीच वटवट घरात ऐकू यायला नको. दुसरा प्रश्न असतो. तो म्हणजे तिच्या आईवडील भावाचा हस्तक्षेप घरात होणं. जर तिच्या पतीचे आईवडील घरात असतील तर तिला आपले आईवडील घरात आणताच येत नाही वा भाऊबहिण आणि नातेवाईकांना घरात प्रवेश देताच येणार नाही. अशी तिची भावना असते." 
           "हो, ना. अन् ती हेही समजत नाही की वृद्ध असलेले त्याचे आईवडील ही तिच्याही घराची शानच असतात. चोरांनाही दारी प्रवेश नसतोच ते असतांना. पत्नी आणि पतीतील किरकोळ ही भांडणं. ज्यात पतीला पत्नी ही एक आपला गुलाम समजते. पतीनं थोडासा जरी आवाज चढवला की बस, सारंच त्याचं चुकलं असा कावा ती करते. ज्यातून पतीला बोलायची उजागीरीच नसते."
         "होय, तुझंही अगदी बरोबरच. पती पत्नीच्या स्वभावाचं वर्णन केल्यास असं जाणवतं की एखादी गोष्ट करायची असल्यास पत्नी रोजच पतीच्यामागं तकादा लावते. अर्थात ती मागणी पुर्ण होईपर्यंत लावून धरते. जर ती मागणी पुर्ण झाली की ती फारच आनंदीत होते. तशीच ती मागणी बरेचवेळेस तकादा लावूनही पुर्ण होत नसेल वा जर पुर्ण झाली नाही तर ती निराश होते. तिला पती हा कर्दनकाळच वाटतो. अशावेळेस तिच्या मनात संभ्रमच निर्माण होतो व त्याची परियंती तिची सोडून जाण्यात होते."
         मंगेश बोलून गेला. तसा त्यानं दिर्घ श्वास घेतला व तो पुन्हा बोलता झाला.
          "शिला, संसार टिकवणंही तारेवरची कसरतच आहे. संसार त्याचाच टिकतो. ज्याची पत्नी संयमी व समजदार असते. ती आपला संयम सोडत नाही. वाट पाहात असते क्षणाची. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. काही पत्नीवर्ग मात्र उतावीळ असतो. त्यांना पुरेशी वाट पाहण्याची उसंतच नसते. त्यांना वाटत असते की कोणतीही गोष्ट ही आताच व्हायला हवी. जर ती होत नसेल तर ती निराश होते."
          शिला मंगेशचं ऐकत होती. तिही तशी हुशारच होती. तशी ती म्हणाली,
          "अरे, पत्नी संयमी असल्यानं भागत नाही तर पत्नी ही व्याभिचारीही नसावीच. अलिकडच्या मुली या व्याभिचारी असतात. काहींना विवाह केल्यानंतरही बाहेर लपडी कराविशी वाटतात. पतीला त्या कचराच समजतात आणि विवाहाला एक करार. ज्यातून फक्त लोकांनी नावबोटं वा दुषणं देवू नये. म्हणून त्या विवाह करतात. काही पत्नी ह्या कष्ट न करता ऐषआरामात एकटंच जीवन जगता यावं म्हणून विवाह करतात व विवाह झाल्यानंतर आपल्या पतीला सोडून जातात. शारिरीक भूक ही एखादा बॉयफ्रेंड ठेवून भागवतात. पतीकडून खावटी रुपानं पैसा वसूल करतात व एकट्याच राहून ऐषआरामाचं जीवन व्यथीत करीत असतात. असं बरेचदा घडतं."
         "होय, मुली विवाह केल्यानंतर जेव्हा आपल्या पतीला सोडून जातात. तेव्हा आपल्या मुलाबाळांचाही विचार करीत नाहीत. मुलांना काय हवं असेल, काय हवं नसेल? याचा विचार नसतोच. त्यांना आईचं प्रेम मिळालं नाही तर काय होईल? वडिलांचं प्रेम मिळालं नाही तर काय होईल? याचाही विचारच नसतो. अन् तसा विचार न करता अशा मुली सोडून जातात आपल्या पतीला. ज्यात मुलांना कधी आईचं तर कधी वडीलांचं प्रेम मिळत नाही. नुकसानच होतं मुलांच्या भावनांचं."
          "मंगेश, खरं सांगायचं म्हणजे मुलं फार प्रेम करीत असतात आपल्या पत्नीवर. तिच्यावर जीव ओवाळून टाकत असतात. तिच्यासाठी शपथा घेणारी ही मुलं प्रसंगी आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमातही टाकत असतात. त्यांनाही वाटत असते की ती असली तर घरी दिवाळी असते आणि ती नसली तर घराचा दिवाळा निघतो. तिच्या प्रेमासाठी ते सगळं सहन करतात. ज्या आईवडीलांनी त्याला जन्म दिला, त्या आईवडीलांचं वृद्धाश्रमात जाणंही पसंत करतात. बहिण, भाऊ, नातेवाईक सारेच तोडतात ते. परंतु ते शेवटी हरतात. मग आठवतात त्यांना भाऊबहिण आणि त्याचे आईवडील. बिचाऱ्यांनी त्यांचा संसार चालावा म्हणून त्याच्या संसारात दखलंदाजी केलेली नसते. कुरकूर नसतेच त्यांची."
           "होय न गं शिला. आता समाजाचं काय होईल तेच कळेनासं झालंय मला. वाटायला लागलंय की ज्या विवाहाला लोकं लाखो रुपये खर्च करुन एका मंगळसुत्राच्या धाग्यानं बांधतात. ते विवाह आता यापुढे टिकत नसल्यानं संस्कृती तरी टिकून राहील का भारतात? हाच प्रश्न पडलाय मला. महत्वाचं सांगायचं म्हणजे मुलींनी विवाह करुन सासरी नांदायला जातांना विवाहापुर्वीच विचार करावा की मला नांदायचं आहे की नाही. मग कितीही संकटं का येणार असेना. मी आपल्या पतीला सोडून जाणार नाही. परंतु आजच्या मुली तशा विचारच करीत नाहीत. विचार करतात, ऐषआरामाचा. माझं आयुष्य शेवटपर्यंत कसं ऐषआरामात जाईल. याचाच त्या विचार करीत असतात. त्यांना सासू सासरे, ननंद, मुलं आणि पतीही हवा नसतो. एकटंच जगावसं वाटतं आजच्या मुलींना. पाहा पाश्चिमात्यांच्या पाश्र्वभूमीवर कसा बदललाय समाज. असं जर झालं तर सृष्टीचं रक्षण कसं होणार. सृष्टीचा समतोल कसा राखणार आपण? हाच विचारणीय प्रश्न आहे. अरे, मुलं मुली पती पत्नी म्हणून एकत्रच राहायला तयार नाहीत. मग मुलंही जन्माला येणार नाही. असेच जर सगळे वागत गेले तर विनाशच होईल. सृष्टीचा आणि आपलाही. पृथ्वीवर अशानं मानवजातच उरणार नाही तर. शिवाय फारकतीच्या झंझावातात लोकं विवाह तरी करायला पुढं येतील काय? ही शंकाच वाटते मला."
         "मंगेश, तुला तसं वाटणं साहजीकच आहे. कारण समाजात तसंच घडत आहे आणि त्याचे प्रमाणही वाढतच चाललेले आहे. पुर्वी मुलगी विवाह करायची. तिचा बालवयातच विवाह व्हायचा. ते बालवय की ज्या बालवयात तिला समजदारी नसायची. ती आपल्या पतीला सोडून जायची नाही. मग तिच्यावर कितीही अत्याचार होत असले तरी. कारण ती आत्मनिर्भर नसायची व स्वतःच्या पायावर उभीही नसायची की ज्यातून ती आपलं स्वतःचं पोट भरु शकेल. तसं पाहिल्यास त्या काळात खुद्द तिचे आईवडीलही विवाह करतांनाच म्हणायचे की बाई परत येवू नकोस. दिल्या घरी सुखी राहा. तू जर घरी परत आली तर तुझ्या या लहान लहान भावाबहिणींचे विवाह होणार नाहीत. हं, जर पतीनं तुला टाकलंच तर मरुन जायचं एखाद्या विहिरीत उडी मारुन. परंतु या घरी परतीचा मार्ग पत्करायचा नाही. काही मुली कोणाच्या घरच्या रखेल म्हणून जिंदगी कापायच्या. परंतु घरी परत यायच्या नाहीत. तेव्हा जास्त करुन मुली परत आपल्या मायबापाच्या घरी यायच्या नाहीत व तसं घडत असल्यानं फारकतीही जास्त करुन व्हायच्या नाहीत."
         शिला बोलत होती. तोच तिलाही त्या प्रकारचं वाईटच वाटत होतं. तशी ती बोलता बोलता थांबली. तसा तो म्हणाला,
          "परंतु तो अत्याचारच असायचा तिच्याच आईवडीलांकडून झालेला. एकतर बालविवाह करायचे मायबाप. तिला विवाहाची समजदारी येण्यापूर्वीच. अन् दुसरं म्हणजे तिच्यावर सासरकडील अत्याचार झाल्यास परत यायला मार्ग नसायचा. ज्यातून घटस्फोटाचे प्रमाणच कमी होते. परंतु आत्महत्या व रखेलचे प्रमाण जास्त होते. ज्याकडे आजच्या काळानुसार लक्ष दिलं जायचं नाही. जणू नोंदच घेतली गायची नाही. कारण घरात मुलांची संख्या जास्त असायची. प्रत्येक मायबाप जास्तीत जास्त अपत्य जन्माला घालत असत. परंतु हे गरी खरं असलं तरी घटस्फोट जास्त करुन होतच नसतील, असं मला वाटतेय." 
          "मला तर वाटते मंगेश की तेच बरोबर होतं. बालविवाह होत होता. त्या बालविवाहानं मुली लवकर आपल्या सासरी यायच्या. त्यांना सासूरवास कळायचाच नाही त्या बालवयात. ज्यातून त्यांच्या घटस्फोट घ्यावा लागतो, तेही कळत नव्हतंच. ज्यातून त्या मुली रागानं आपल्या माहेरी आईवडीलांकडे जावूच शकत नव्हत्या. जरी तिच्या पतीनं अनेक पत्नी केल्या तरी."
          "अगं, ते बालवय होतं की ज्या बालवयात तिला आईवडील समजायचे. परंतु सासूसासरे म्हणजे काय? हे तिला समजायचं नाही. अशा वयात घरी पत्नी म्हणून आलेली मुलगी कधी माहेरची आस धरत नसे. तशीच त्या काळात जास्त मुलं मुली असल्यानं आईवडीलही मुलींची आस करीत नसत. अशातच एखाद्या मुलानं दुसरी, तिसरी पत्नी आणली तरी सवत म्हणून तिचा आनंदाने स्विकार करीत असे ती. मात्र आज काळ बदलला व बदलत्या काळानुसार त्या गोष्टीला अत्याचार समजू लागले लोकं व तशा पद्धतीची पुरुषांची कृती ही अन्यायकारक वाटू लागली. ही गोष्ट एवढ्यापुरती ठीक आहे. परंतु त्याहीपुढे जावून आजच्या मुली मुलांना आपल्या खेळण्यातील कळसुत्री बाहुला समजत त्याच्याशी बाहुल्यासारख्याच वागत असतात काही मुली. हवं तसं आपल्या जिद्दीनं वाकवतात आणि नाही वाकला तर घटस्फोट घेवून त्यांच्याचकडून खावटी वसूल करुन ऐषआरामात जीवन जगतात. कारण आजचे विवाह हे वयात आल्यावर होतात की ज्या काळात समजदारी आलेली असते. ज्या काळात त्या आत्मनिर्भर झालेल्या असतात. अशा काळात काय वाईट काय चांगलं. ते त्यांना चांगलं कळतं. तसंच आजच्या काळात काही महिलांना आपल्या मुलाबाळांचंही काही घेणंदेणं नसतं. कारण आजच्या मुली या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आहेत व त्यांना आजच्या काळात कोणाच्याच पोषण्याची गरज उरलेली वाटत नाही. शिवाय जे पती असलेली मुलं जर पत्नी असलेल्या मुलींचं थोडंफार ऐकत नसतील तर पटकन फारकत घेवून त्या मोकळ्या होतात. अन् त्याला खतपाणी घालतात, त्या मुलामुलींचे आईवडील, काही नातेवाईक व इष्टमित्र. विवाहात लाखो रुपये खर्च होणाऱ्या प्रकाराला अशा पद्धतीनं चुना लावला जातो. शिवाय त्याला तिखटमीठ लावत असतात वकील. कारण त्यांना पोटासाठी फीच्या रुपात पैसा हवा असतो. मात्र कधी कधी दोष पुरुषांचा नसतोच. तरीही त्यालाच दोषी धरत खावटीसह सर्व पैसा हा पुरुषांकडूनच वसूल केला जातो, स्वतःचं जीवन ऐषआरामात जगण्यासाठी. तसं पाहिल्यास आजच्या विवाहाला कराराचेच स्वरुप आलेले आहे. विवाह हा एक संस्कार. ही प्रक्रियाच आता कालबाह्य होत चाललेली आहे."
            "मंगेश, खरं सांगायचं झाल्यास आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललेले असून विवाहाला कराराचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. ज्या घरात मुली संसार करतांना संसार हा संयम राखून करतात. ज्या व्याभिचारी नसतात. त्यांचा संसार टिकतो. अन् ज्या घरात असं नसतं. त्यांचा संसार तुटतो."
           "शिला, महत्वपुर्ण बाब ही प्रत्येक जोडप्यांनी लक्षात घ्यायला हवी की मुलामुलींनी विवाह करावेत. परंतु विवाह करण्यापुर्वी स्पष्ट नकार द्यावा जर विवाह करतांना त्याला ते करार समजत असतील तर. असा करार समजल्यानं आपलंच जीवन, आपलंच आयुष्य उध्वस्त होत असते. अन् विवाहाला संस्कार समजत असतील तर आपलंच भविष्यातील आयुष्य सुखकारक व मंगलमय बनू शकते हे तेवढंच खरं." 
            "विशेष म्हणजे आपल्या कृतीनं कुणाचं जीवन उध्वस्त करु नये. कारण एक संसार जेव्हा तुटतो ना. त्यात बऱ्याच स्वरुपाचं नुकसान होत असतं. आपले आईवडील, नातेवाईक, आपली मुलं, आपले मित्र आपण स्वतः असे सारे हळहळत असतात. ज्यांचा शाप आपल्यालाच लागतो व आपलं जीवन भविष्यात कधीच सुखी बनू शकत नाही व जर विवाहाला आपण संस्कार समजत असल्यास आपलंच जीवन सुखी होतं. त्यातच प्रत्येक दिवस आपल्याला दिवाळी आणि प्रत्येकच क्षण आपल्याला विजयादशमी वाटत असते. असाच आपला संसार असावा व आपलं वागणंही तसंच असावं. जेणेकरुन आपली मुलंच नाही तर आपले आईवडील, आपले नातेवाईक व आपला परीवार सुखी होईल व प्रत्येकजण म्हणेल, संसार करावा तर त्यांनीच, ज्यांची दिवाळी चांगली उजळेल. जर संसार चांगला झाला नाही तर आपली दिवाळी साजरी होणार नाही. त्यातच आपलाच संसार आपला दिवाळा काढल्याशिवाय राहणार नाही."
           "अगं, आज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. काही घटस्फोटातून आहेत व वाटायला लागलं आहे की घटस्फोट हा गुन्हा आहे की यल्गार? खरं तर घटस्फोट व्हायला हवेत. पती पत्नीचं जर एकमेकांशी पटत नसेल तर..... परंतु कधीकधी घटस्फोट हे वेगळ्याच कारणानं होतात. जेव्हा कधीकधी विवाहाचा वापर हा खावटी म्हणून पैसा कमवून ऐषआरामात जीवन जगण्यासाठी केल्या जातो. काही वेळेस विवाह हे खावटी मिळवून ऐषआरामाचं आयुष्य जगण्यासाठी केले जात असल्याचं निदर्शनास येतं. अशाच कारणातून कधीकधी आत्महत्या वा खुनासारखे कृत्य घडून येतात. ज्यातून स्वतः जन्मास घातलेली मुलंही सुटत नाहीत."
            "होय, आज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. कधी शेती पिकली नाही म्हणून. कधी परीक्षेत नापास झाले म्हणून. कधी प्रेमभंग झाला म्हणून तर कधी कोणी कोणाला छळलं म्हणून. परंतु पती पत्नी वितुष्टातून आत्महत्या झालेल्या जास्त करुन कोणी ऐकलेल्या नाहीत. ज्या बऱ्याच प्रमाणात होतात. परंतु त्याचा गाजावाजा होत नाही नव्हे तर केल्या जात नाही. मग काय यात कोणी डिप्रेशन मध्ये जावून अधिक दारु पिणं सुरु करतात. ज्यातून दारु पिवून मरण येत असतं व लोकं त्या मृत्यूला आत्महत्या न समजता दारु पिवून मेला. असं समजतात."
          "अगं, घटस्फोट होतात. तशी त्याची बरीच कारणं आहेत. परंतु सर्वात महत्वपुर्ण कारण असतं संबंधीत पती असलेल्या व्यक्तीचं दारु पिणं. पती दारु पितो, हेच त्याचं चुकतं आणि त्यांचा पत्नीवर्ग त्यांना सोडून जातो. म्हटलं जातं की पती जर दारु पितो, तर पत्नी दारु का पिवू शकत नाही. परंतु पत्नीनं दारु पिल्यास तिला नावबोटं ठेवली जातात. आता तर नवीन पाश्चिमात्य संस्कृतीच्या विचाराचा स्पर्श झाल्यानं स्रीवर्गही मदिराप्राशन करु लागलेला आहे. याला काय म्हणावे?"
           "मंगेश, तशी मदिराप्राशन करण्याची प्रथा ही आपल्या संस्कृतीत आधीपासूनच आहे. आधीही काही काही समाजात उत्सव साजरा करतांना थोडी थोडी मदिरा प्रसाद म्हणून देण्याची प्रथा होतीच की नाही."
           "होय गं, परंतु मदिराप्राशनालाच हा घटस्फोटात कारणीभूत धरले जाते. घटस्फोट घेणं हा कायदेशीर मार्ग. जर पती पत्नी दोघांचं पटत नसेल तर..... कधी पतीचं चुकतं तर कधी पत्नीचं चुकतं. कधी पतीचं नव्वद प्रतिशत चुकतं तर कधी पत्नीचं नव्वद प्रतिशत चुकतं. परंतु नेहमीच्या सवयीप्रमाणे दोष हा दुसऱ्यांवरच लावला जातो. खासकरुन पती हा पुरुष असल्यानं त्याचेवरच जास्त करुन दोष लावला जातो." 
            "मंगेश, दोघांच्या स्वभावाचं वर्णन करतांना असं म्हणावं लागेल की दोघांचाही स्वभाव ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखा आहे. जशी सशाला टुणकन उड्या मारायची सवय असते. तशीच सवय पतीलाही असते. जो टुणकन सशासारखी उडी मारल्यागत बोलतो. त्या बोलण्यावर विचारच करीत नाही की पुढे काय घडणार आहे? त्याचा विचार न करता तो बोलतो. तसं त्याच्या मनात काहीही नसतं. तो पत्नीवर निरतिशय प्रेम करीत असतो. ज्याचा परिणाम पत्नीवर होतो. परंतु पतीच्या मनात त्याबद्दल काही राग नसतोच. हे मलाही माहीत आहेच. तो फक्त बोलतो व विसरुन जातो. पत्नी मात्र कासवासारखी असते. ती बोलत नाही. असं वाटते सर्वांना. परंतु तिची कुरकूर सतत सुरु असते हळूहळू कासवाच्या चालीसारखी. ज्याचा राग धुमसतो व त्या रागाचे रुपांतर मोठ्या वादळात अर्थात स्फोटात होते. ज्याला घटस्फोट असं म्हणता येईल. त्यानंतर त्या दोघांचीही अवस्था कुत्रा व गाढवाच्या कथेसारखी होते. कुत्रा आणि गाढव जेव्हा जिंकायची शर्यत लावतात. तेव्हा गाढव जिंकतं. कारण त्याला त्याच्या बिरादरीतील लोकं अडवीत नाहीत. परंतु कुत्रा शर्यतीत धावायला लागला की त्याचेवर एवढी गल्लीतील कुत्री भूंकत असतात की त्याचा सामना करता करता कुत्रा शर्यतीत मागे पडतो. ज्याला गाढवापेक्षा जास्त जोराने धावता येतं. तसा घटस्फोट झाला किंवा वाद वाढलाच तर त्या पुरुषांच्याच बिरादरीतील लोकंच त्याचेवर कुत्र्याच्या कथेतील कुत्र्यासारखे ओरडत असतात. ते त्यालाच नावबोटं ठेवत असतात. मग ते दोष कोणाचा आहे, याचाही विचार करीत नाही. ज्यातून गाढवाच्या रुपकासारखे मुर्ख विचार अग्रगण्य ठरतात. ज्यातून पत्नीवर्गाला कोणीही दोष देत नाही. दोष तिचा जरी असला तरी तिचं भागत असतं."  
           "शिला, हे एक उदाहरण आहे. ज्यात गाढव व कुत्रा वा ससा व कासव. याशी काही एक संबंध नाही. अन् ही वास्तविकताही नाही. वास्तविकतेनुसार ससा व कुत्र्याला दोषी समजलं जातं. अन् त्यांना न्यायापासून वंचीत केलं जातं. न्याय मिळतो कासव वा गर्दभाला. तेच राज करतात. कारण दोघंही स्वतःचा दोष नाही हेच दाखवतात. ते दैवयोगानं व परिस्थितीनं घडतं की दोघंही शर्यंत जिंकतात व विजयी ठरतात, तेवढे हुशार नसूनही. तसंच घटस्फोटाच्याही बाबतीत घडतं. घटस्फोटात पती पत्नी दोघंही भांडणातून घटस्फोट घेत असली तरी संसारचक्रात व्यत्यय आणत पत्नी कासव व गर्दभासारखी घटस्फोटाची शर्यंत जिंकते. तिला मानधन म्हणून बरेचसे पैसेही खावटी स्वरुपात मिळतात. तसं पाहिल्यास ती सायलेंट किलर असते. पतीरुपाला तीळ तीळ मारण्यासाठी. ज्या घटस्फोटातून पतीच्या मनावर परिणाम होतो हळूहळू व पती नावाचा पुरुष त्या धक्क्यानं हळूहळू नेस्तनाबूत होत असतो. त्याचं सुंदर व्यक्तीमत्वही त्याच घटस्फोटाच्या डागानं डागाळलं जातं. दोष त्याचा तेवढ्या प्रमाणात नसतांना. तिचा मात्र गुन्हा हा दिसूनच येत नाही. कारण संसाररुपी घटस्फोटाची शर्यंत जिंकत असतांना ती स्रीवर्ग असल्यानं तिच्या वाट्याला कोणीही जात नाही. उलट पती असलेले पुरुष. त्यांना त्यांचीच बिरादरी बोलून मोकळी होते."
           "मंगेश, सृष्टीचा नियमच आहे की जो झिजतो. तो तेवढ्याच लवकर समाप्त होतो. चंदन ही वनस्पती घासली तर तिचा सुगंध परिसरात दरवळतो. परंतु त्याचक्षणी तिची झीज होत असते. तसंच पतीचंही आहे नव्हे तर संपुर्ण पुरुषजातीचं. पती हा पत्नीसाठी झीज झीज झिजतो. परंतु त्याला तेवढं करुनही काहीच मिळत नाही. उलट शुल्लकशा कारणावरुन जेव्हा घटस्फोट होतो. तेव्हा त्याला सारंच संपल्यासारखं वाटतं. महत्वपुर्ण बाब ही की जर पत्नी चांगली लाभली तर घराचं नंदनवनच होतं. ज्याला स्वर्गसुख म्हणता येईल आणि पत्नी जर चांगली लाभली नाही तर घरादारात नरकयातना सुरु होतात. ज्याला नरकवास असं म्हणता येईल." 
          "शिला, विशेष सांगायचं झाल्यास घटस्फोट होवूच नये. कारण त्यातून पुरुषजात खचते. स्रीवर्ग तेवढा खचत नाही. पुरुष स्वतः दुसरा विवाहही करु शकत नाही. सतरा वेळा विचार करतो. त्याला ती सतत आठवत असते. स्री मात्र सर्व विसरते. तिला कोण पती व कोणता पुरुष आपल्या जीवनात होता. तेही आठवत नाही. तशीच दुसरी बाब सांगायची झाल्यास हुंडा घेणे देणे हा आज न्यायीक प्रक्रियेनुसार गुन्हा मानला जातो. मग ज्यावेळेस खावटी न्यायालयीन प्रक्रियेनुसार मंजूर केली जाते. तेव्हा तिही रक्कम ही हुंडा म्हणून ग्राह्य धरली जायलाच हवी. अन् ती रक्कम वधूपक्षाला देणं म्हणजे गुन्हाच. परंतु तसं घडत नाही. खुद्द न्यायालयच वधूपक्षाला खावटी म्हणून रक्कम मंजूर करते. ज्या रकमेची राशी ही एवढी विशाल असते की ती राशी सर्वसाधारण माणसाच्या देय कर्तृत्वाच्या कितीतरी दूरची असते. परंतु अडकून असलेला व्यक्ती, धड तिही नांदायला न येत असल्यानं न्यायालयातील प्रक्रियेनुसार ती राशी न्यायालयांच्या माध्यमातून तिला मिळावी व आपला खटला तुटावा. यासाठी भरते. ज्यातून खटला तुटतो. परंतु तीच राशी कर्ज घेवून काढल्यानं व त्याच राशीचे व्याजावर व्याज चढत गेल्यानं प्रसंगी त्या व्यक्तीला टेंशन येतं व एक दिवस तो आत्महत्या करुन मोकळा होतो."
         मंगेशनं आवंढा गिळला. तसा तो काही वेळ चूप राहिला. तशी त्याला घटस्फोटाबाबत फारच खंत वाटत होती. वाईट वाटत होतं. तसा तो काही वेळानं पुन्हा म्हणाला, 
         "शिला, अशी आत्महत्येची बरीच प्रकरणं घडलेली आहेत. कधीकधी पत्नी जेव्हा पतीच्या रागावरुन बाहेर अर्थात माहेरी जाते व सासरी परत येत नाही. तेव्हाही बऱ्याच आत्महत्या होतात. परंतु त्या आत्महत्या पत्नी निघून गेल्यानं केल्या गेली. याची नोंद पुरुष करीत नाहीत. कारण कोणताच पुरुष महिलांना फसवायचं पाहात नाही. तिच्यावर निरतिशय प्रेम करतो. मात्र पत्नी असलेली महिला ही नेहमी पुरुष असलेल्या पतीला फसवायचाच विचार करीत असते. ती प्रसंगी मुलंही हिसकावून घेते पतीपासून. त्यांना भेटूही देत नाही. त्यांचं तोंडही पाहू देत नाही. उलट त्याचेकडून त्याच मुलांचे पालनपोषण व्हावे यासाठी खावटी म्हणून पैसा घेत असते आणि तो देत असतो. कारण तो आपल्या पत्नीवर व मुलाबाळावर प्रेम करीत असतो निरतिशय. ते त्याचं खरं प्रेम असते. परंतु ती समजून घेत नाही. मुलाबाळांनाही समजून घ्यायला लावत नाही. ती मुलंही आणि तीही खावटी घेत त्याच्याच पैशावर जगतात आणि तो दुरुन दिसताच त्याची हेळसांड करतात. अशातच त्याला कधी राग येतो व तो आपलं जीवन समाप्त करतो. परंतु आपलं जीवन समाप्त करण्यापुर्वी विचार करतो कधीकधी की आपलं जीवन संपविण्यापुर्वी जर पत्नी आणि मुलांनाच संपवलं तर. असाच विचार करीत तो संधी शोधत असतो व ज्यावेळेस त्याला संधी चालून येते. त्या दिवशी तो आपली पत्नी व कधीकधी आपल्या पोटच्या मुलामुलींचाही खुन करतो व स्वतःही आत्महत्या करुन मोकळा होतो. हेही मला माहीत आहेच."
          शिलालाही घटस्फोटाबाबत चिंताच वाटत होती. ती मन लावून मंगेशचं ऐकत होती. तिला मंगेशचे विचार पटू लागले होते. त्यातच त्यात पुष्टी जोडत ती म्हणाली, 
          "मंगेश, महाराष्ट्राच्या कुशीत घडलेली दोन जुळ्या मुलीची आत्महत्या तुला माहीत असेलच. ज्यात त्या बापाने आपल्या दोन जुळ्या मुलींना जंगलात नेलं व मारुन टाकलं. ही क्रूर घटना होती. ज्याचा सर्वस्तरावरुन निषेधच व्हायला पाहिजे होता. या घटनेत काय घडलं नेमकं ते माहीत नाही. परंतु काही प्रकरणं निश्चीतच वर सांगीतलेल्या प्रकारानं घडत असतात. काही ठिकाणी स्वतः पती मरतो तर काही ठिकाणी मुलं तर काही ठिकाणी पत्नीवर्गाला मारलं जातं. तसं आज कलियुग आहे. कोण कोणाचा जीव घेऊन मोकळा होईल, ते सांगता येणं कठीण आहे. परंतु घटस्फोटाच्या माध्यमातून असे प्रकार घडणे वा होणे ही चिंतेची बाबच आहे. असं जर घडत असेल वा घडवायचं असेल तर त्यापेक्षा विवाह न करणे तेवढेच गरजेचे आहे आणि विवाह जर केल्या गेला तर घटस्फोट न घेणे हे तेवढेच महत्वाचे आहे. कारण असा घटस्फोट नसावा की ज्यातून कुणाचा जीव जाईल व तो पृथ्वीवरील परमेश्वराच्या जन्म देण्याच्या कृतीला बाधक ठरेल व परमेश्वरालाही स्वतःची लाज वाटेल व तो म्हणेल की काश! मी त्यांना जन्म दिला नसता तर बरे झाले असते."
         "अगं, परमेश्वरही त्यात काही करु शकत नाही. अगं परमेश्वर असता ना. तर आपल्या बिरादरीतील लोकांनी जेव्हा वेशीबाहेर राहून अनंत यातना भोगल्या. त्या भोगू नयेत, म्हणून धावत आला असता. अन् परमेश्वर असता तर अशा प्रकारच्या फारकतीच होवू दिल्या नसत्या."
          "होय मंगेश, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी म्हणतात की परमेश्वर मागील वाईट कर्माचं फळ देतोय सर्वांना. तेच फळ असेल की मुलं जन्मास आल्यानंतर पती पत्नींची फारकत होते व घटस्फोट झाल्यावर मुलांना अनंत यातना भोगाव्या लागतात. ते मुलांच्या व पती पत्नींच्या वाईट कर्माचीच फळं असतात. तसं पाहिल्यास कोण ऐकतोय तुझं आणि माझं. म्हणतील की आपलं ज्ञान आपल्याजवळच ठेवा. इथं पाजळवू नका. मंगेश, ती मंडळी आपलाच अपमान करतील."
           "होय, बरोबरच म्हणणं आहे तुझं म्हणणं शिला. म्हणून काय, आपण समाजाला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का? आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी तसा विचार केला असता तर खरंच विटाळ मिटला असता का आज? कल्पना कर की ज्या काळात विटाळ हा चरणसीमेवर होता. ज्या काळात माणसाला गुलामच समजलं जात होतं. ज्यावेळेस विटाळ हा कधी संपण्याची धाव घेत नव्हता. जे कार्य करणं कठीण होतं. ज्या काळात आपलीच माणसं बाबासाहेबांना साथ देत नव्हती. त्याच काळात बाबासाहेबांनी पाऊल टाकलं विटाळ संपविण्यासाठी आणि संपवून दाखवला की नाही विटाळ? आज जो काही अंतर्मनात होता, थोडासा. तोही आपण संपवलाच की नाही. आता हाही प्रश्न आहे, नव्हे तर पती आणि पत्नी बनणाऱ्या मुलीमुलांना असलेला त्रास. ज्यातून केवळ पती पत्नी असणाऱ्या दोघांनाच त्रास होतो असे नाही तर आयुष्यभर त्यांच्या घरच्याही लोकांना त्रास होतच असतो. ताणे ऐकावेच लागतात, एका पती पत्नींच्या मुर्खपणाचे तुणतुणे वाजवीत असतो समाज. ज्यातून पती पत्नी बनलेल्या फारकत घेणाऱ्या मुलामुलींच्या नातेवाईकांना त्रासच होत असतो त्या गोष्टींचा. आपण तेच समजावून सांगायचं आहे, फारकत घेत असलेल्या पती पत्नींना. ज्यातून फारकत होणार नाही. असं काहीतरी करायचं."
          "काय करता येईल आपल्याला?"
           "शिला, आपण एखादी संस्था स्थापन करायची व त्या माध्यमातून निःशुल्क मार्गदर्शन करायचं अशा लोकांना."
         "खरंच ते आपलं बोलणं ऐकतील का? खरंच आपलं बोलणं ऐकून त्यावर अंमलबजावणी करतील का? मला नाही वाटत."
          "प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न करुन पाहू. जर यश आलं तर ठीकच अन् नाही आलं तरी ठीकच."
          "ठीक आहे तर. जशी तुझी इच्छा. तुला जे जे वाटते ते ते कर. मी आहेच पाठीशी अर्धांगीणी बनून. माझी साथ आहेच तुला आणि जीवनभर राहिलच. तसाही आपला विवाह दिवाळी अंकाच्या माध्यमातून झाला. आपण आपली दिवाळी साजरी केली होती, दिवाळी अंकाच्या माध्यमातून. आठवते का तुला?"
          "होय नक्कीच आठवते."
          "आपण तशी लोकांचीही दिवाळी साजरी करु."
           "होय." 
           ती व तो बोलून गेला. तसे बोलता बोलता दहा वाजले होते सकाळचे. त्याची कार्यालयात जाण्याची वेळ झाली होती. तसा तो उठला. म्हणाला,
           "अगं शिला, वेळ बराच झालाय. मला कार्यालयात जायचं आहे. जरा लवकर डबा तयार करुन दे."
           ते त्याचं बोलणं. तशी हळूच हो म्हणत ती डबा तयार करायला स्वयंपाक घरात गेली व तिनं लवकरच डबा तयार केला होता.
           मंगेश जेवनाचा डबा घेवून कार्यालयात गेला. आज जरा वेळच झाला होता त्यांना. तसं सकाळच्या वार्तालापानं त्याचं मन लागत नव्हतं कार्यालयात. तसा तो विचारच करीत होता त्या गोष्टीला काय करावं लागेल.
            दिवसभर चिंतेत असलेला मंगेश सायंकाळी घरी आला. त्यानं लगबगीनं हातपाय धुतले व विचार करु लागला. विचार करु लागला की काय करता येईल घटस्फोट थांबवायचे असतील तर. लागलीच त्याला समजलं. आपण असं होम स्थापन करायचं की जिथं घटस्फोट घेणाऱ्या लोकांना मार्गदर्शन मिळेल. आपण गावागावात जावून उद्बोधन करायचं. दिवाळी अंकाच्या माध्यमातून जाहिरात करायची. जेणेकरुन घटस्फोट सारख्या प्रक्रियेवर अंकुश लावता येईल.
            मंगेश विचार करु लागला होता. त्याचा तो विचार. लागलीच तो विचार त्यानं आपल्या पत्नीलाही बोलून दाखवला. तशी तिही तयार झाली व लागलीच दुसर्‍याच दिवशीपासून ते कामाला लागले. ज्यातून त्यांनी घटस्फोट थांबविण्यासाठी मार्गदर्शन देणं सुरु केलं होतं. वाटल्यास राग निवळण्यासाठी काही दिवस संबंधीत गृहस्थांना राहण्याचीही सुविधा उपलब्ध करुन दिली होती.
         मंगेशनं लोकांना उद्बोधन करणं सुरु केलं होतं. त्यातच त्यानं लवकरच एका इमारतीचं बांधकाम केलं. त्या इमारतीला नाव दिलं घटस्फोट निवारण केंद्र. ते घटस्फोट निवारण केंद्र, त्या लोकांसाठी होतं, ज्या मंडळींची भांडणं होत असत व भांडणं विकोपाला पोहोचत असत. त्या केंद्रात पती पत्नींसाठी वेगवेगळे कमरे होते व प्रत्येक कमऱ्यात वैयक्तिक रित्या एकएकाची बाजू ऐकून घेवून त्याच अनुषंगानं त्यांना मार्गदर्शन केलं जात असे. जेणेकरुन त्यातून एकमेकांचा राग निवळल्या जात असे. त्या केंद्राची जाहिरात त्यांनी वर्तमानपत्रातून व दिवाळी अंकातून केली होती. पुढं शिला व मंगेशनं त्याच आपल्या केंद्रामार्फत दिवाळी अंक काढणे सुरु केले होते. ज्यातून ती मंडळी विवाहयोग्य लोकांचे छायाचित्र छापत आणि विवाह जोडून आणत असत. शिवाय त्या अंकातून आपला विवाहासाठी परीचय छापणारी मंडळी मंगेश व शिलाच्याच मार्फत विवाहही करीत असत. कारण त्यांना हमखास शाश्वती असे की त्यांच्या सहकार्यानं होणारे विवाह हमखास टिकतातच. 
          मंगेश आता आपल्या कार्यालयाच्या कामातून निवृत्त झाला होता. तो आता घटस्फोटासंबंधीच्या कार्याला बराच वेळ देवू शकत होता, नव्हे तर त्यानं आपलं संपुर्ण आयुष्य घटस्फोटासाठी वाहून टाकलं होतं. 
            आज बरेचसे मुलं मुली नाही तर पती पत्नी बनणारे गृहस्थ चांगले गृहस्थी जीवन जगत होते. ती मंगेश व शिलाचीच कृपा होती. आज बरेचसे घटस्फोटाचे खटले कमी झाले होते, ते त्यांच्याच प्रयत्नाने. लोकं त्यांचे नाव घेत होते, त्या बाबतीत तरी. परंतु शर्तेशेवटी ते हारले होते. कारण त्यांनी कितीही प्रयत्नातून फारकती नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी आज समाजातील फारकती कोणत्याच दृष्टीकोनातून फारकती कमी वा बंद झाल्या नव्हत्या. 
          ती बाबासाहेबांचीच प्रेरणा होती की मंगेश व शिला फारकती होवू नये म्हणून फारकती संबंधीत प्रकरणांशी लढत होते. परंतु त्यांना त्यात यश येत नव्हतं. ते दोघंही बाबासाहेबाचं नाव घेत होते. कारण बाबासाहेब हीच त्यांची प्रेरणा होती व तेच त्यांचा मार्गदाताही होते. ज्यातून त्यांनी लोकांच्या अंतर्मनातून विटाळ बाहेर काढला होता. पण लोकांच्या अंतर्मनातून फारकतीच्या बाबतीतील विचार ते काढू शकले नव्हते.
           आज फारकतीबाबत कार्य करता करता त्यांची उभी हयात गेली होती. परंतु त्यात त्यांना यश आलं नव्हतं. शेवटी मरण आलं. परंतु फारकती जशाच्या तशाच राहिल्या. त्यात उलट वाढच झाली होती. कारण समाजातील वकील मंडळी फारकत घेणाऱ्या लोकांना, त्यांचे गंभीर, संभाव्य परिणाम समजावून न सांगता व त्यातून त्यांना परावृत्त न करता फारकतीबद्दलचे फायदेच सांगत असत. ज्यातून त्यांना पैसाच मिळत असे. तोच पैसा कमविण्यासाठी आजही फारकती बा इज्जत सुरु होत्या समाजात. त्या फारकती बा इज्जत बंद व्हायचं पाऊलच टाकत नव्हत्या.
         
*****************************************************************समाप्त *************

*परीचय*
*अंकुश रा.शिंगाडे*
*जन्मतारीख: ०३/०३/१९७७
*शिक्षण: एम ए, डी एड
*मो नं : ९३७३३५९४५०
*प्रकाशित साहित्य:
       *कवितासंग्रह* १)स्वातंत्र्याची गाणी २)आजादी के गीत(हिन्दी) ३)अश्रूंची गाणी ४)राजवाडा ५)मातीतल्या कविता 
          *कादंबरी*
१)वेदना २)कंस ३)संघर्ष ४)चर्मयोगी ५)अत्त दीप भवं ६)कामगार ७)माळीण ते गोसेखुर्द ८)भ्रृणहत्या ९)घटस्फोट १०)श्रेष्ठ कोण ११)विभाजन १२)लेखक १३)बोलती समाधी १४)शिक्षण १५)चंदूबाबा १६)भुताटकी १७)कोरोना १८)गोविंदा गोपाळ गायकवाड १९)राजा दाहिर २०)कोरोना रिटर्न २१)संयोगीता २२)मार्ग २३) बाप्पा रावल २४)व्यवस्थेचा बळी २५) उर्मीला २६) शांता २७) तारीख २८) प्रकाश २९) ते मुख्याध्यापक पाऊल ३०) सुजाता ३१) वासना ३२) प्रेमविवाह/परिणाम ३३) अशीही एक शाळा ३४) यात्रा ३५) एक होती अनिता ३६) मृत्यूदंड ३७) भुताटकी गाव ३८) भानुमती एक यल्गार ३९) जखम ४०) भुताटकी गाव ४१) तरुणपणातील चूक ४२) वारांगणा ४३) तृतीयपंथी ४४) आय ए एस अधिकारी ४५) पुरस्कार ४६) संत रविदास ४७) संस्कार ४८) संजय ४९) शापीत नदी सरस्वती ५०) गादिचा वारस ५१) तिची व्यथा ५२) तिरुपतीचा प्रवास ५३) चांद्रयान ५४) मालमत्ता ५५) शाळा बंद ५६) परीवर्तनाची शिल्पकार ५७) वल्डकप फायनल ५८) संशोधक ५९) बालवीर ६०) धर्मांतरण ६१) आरक्षण ६२) आयुष्य ६३) आधार ६४) नागपूरचे ते पवित्र आत्म्ये ६५) निवडणूक ६६) अवकाशयात्रा ६७) स्मशानी किल्ला ६८) बंदिवास ६९) धर्मयोगी ७०) पश्चाताप ७१) बलात्कार ७२) आम्रपाली ७३) स्वातंत्र्य ७४) राजकारण ७५) जात ७६) खाजगीकरण ७७) दंगा ७८) ऑपरेशन सिंदूर ७९) विवाह ८०) बोलका वृद्धाश्रम ८१) आयुष्यातील सांज ८२) मंदोदरी ८३) सुधारक
           *कथासंग्रह*
१)मजेदार कथा २)चित्तथरारक ३)फोनच्या करामती ४)हरवलेलं बालपण ५)स्मशानाची राख ६)निकाल ७)अजून किती ८)निराशा ९)भटकंती १०) माहेरचा गोडवा ११)आत्महत्या १२) छोट्या कथा
         *लेखसंग्रह*
१)माझे शिकविण्याचे प्रयोग २)गतकाळातील शास्रज्ञ आणि शोध ३)अस्तित्व ४)अस्तित्वाची पाऊलवाट शोधतांना ५) भूक ६) ते आगळेवेगळे व्यक्तीमत्व ७) शिवशाहीचे आधारस्तंभ ८ देश सुधारायचा असेल तर....
         *चारोळीसंग्रह*
१)आक्रमण
           *प्रवासवर्णन*
१)प्रवास २)प्रवासातील गमतीजमती
              *महाराष्ट्रात वेगवेगळ्या वृत्तपत्रातून साहित्य लेखन*
               *पुरस्कार*
१) स्व कमलताई एडकी वैचारीक लेखन पुरस्कार २) स्व कमलताई एडकी निबंध लेखन पुरस्कार ३) दै वार्तादीपतर्फे राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार बार्शी शाखा मुंबई ४) उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नेर ५) बसव सन्मान ६) शिक्षकांची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा चतुर्थ पुरस्कार २०१४ व प्रोत्साहन पुरस्कार २०१६ ७) स्व. राजीव दिक्षीत स्वदेशी दिन निबंध स्पर्धा तृतीय पुरस्कार आसगाव बारामती ८) राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार २००५. ९) महाराष्ट्र भूषण वल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे २०२४ कोल्हापूर इथे. १०) ग्लोबल लिटरेचर एक्सलंट अवार्ड २०२५ नागपूर इथे
          सदस्य
         १) साहित्य कला सेवा मंडळ सचीव, सहसचिव, माजी संघटन सचिव व माजी दोनवेळा सक्रीय सदस्य २) रसिकराज ब. सस्था आजीव सदस्य ३) विदर्भ साहित्य संस्था आजीव सदस्य ४) भारतीय जनता पार्टी माजी प्रभाग अध्यक्ष (अ. जा.) ५)ग्रामीण कामधेनू शेळी मेंढी पालन या संस्थेचा माजी सदस्य ६) निर्मल हेल्थ असोसीएशन माजी सदस्य ७) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूरचा माजी कार्यालयीन प्रमुख ८) महाराष्ट्र शिक्षक परीषद नागपूर आजीव सदस्य ९) लोकहित ब. संस्थेचा सचिव १०) जयविजय उच्च प्रा. शाळेचा माजी प्र मुख्याध्यापक
            *महाराष्ट्रातील ब-याच वृत्तपत्रात लेखन*
             एस सी इ आर टी पुणे तर्फे स्नेहसंमेलनातील नाटूकल्या नावाची पुस्तक प्रकाशित. 
            *सन्मानपत्र*
            जवळपास शंभरच्यावर
              *सहभाग*
               ब-याच कार्यक्रमात
              *सन्मानचिन्ह*
              जवळपास पंचवीस