(संध्याकाळ: जुना गिरगाव परिसर. एका लहान रिहर्सल नंतर, सुरभी एकटी घरी निघालेली.)
रात्र ओसरलेली नाही, पण आकाशात पिवळसर धुक्याची किनार दिसतेय. रस्त्यावर पावसाची अर्धवट ओली वासाची छाया.
सुरभीने आपला शालू घट्ट लपेटला आहे. नाटक संपलंय, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही त्या संवादाचं तापलेपण आहे.
हातात एक छोटी कापडी पिशवी. त्यात घुंगरं, काही कागद, आणि एक छोटी चांदीची साखळी जी ती नेहमी नशिबासाठी ठेवते.
रस्त्यावर फारशी गर्दी नाही. पिवळ्या वीजबत्त्यांच्या रांगेतल्या अर्ध्या बत्त्या बंद पडलेल्या.
दूर कुठेतरी एक चहावाला गॅसवर पाणी चढवतोय. धूर आणि सुगंध एकत्र मिसळून हवेत पसरलेला.
सुरभीच्या मनात विचारांची गर्दी आहे.
गुरुजींचं वाक्य अजून कानात घुमतंय: “तू अंगार आहेस, पण मला गंगा हवी होती.”
ती थोडा श्वास घेते, शालू नीट करते आणि पायवाट धरते. तो रस्ता जो स्टुडिओमागच्या गल्लीने बाहेरच्या मुख्य रस्त्याकडे जातो.
ती जुनी गल्ली. एका बाजूला तुटकी इमारती, दुसऱ्या बाजूला बांधकाम सुरू असलेलं एक नाट्यगृह.
गेटबाहेर एक मोठा फलक: “रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी प्रवेश बंद.”
त्या खाली एक छोटी, तात्पुरती लाकडी वाट. बांबूच्या पट्ट्यांनी आणि ताडपत्र्यांनी बनवलेली. ज्यातून लोक वळसा घेऊन जातात.
सुरभी थांबते.
थोडं अंधार आहे आत. प्रकाशाच्या फुलक्या मधूनच कधी कधी ताडपत्र्यांवर लावलेले बल्ब झुळकतात, आणि नंतर पुन्हा अंधार पसरतो.
ती क्षणभर विचार करते. दुसऱ्या रस्त्याने वळू का? पण तो फार मोठा फेरफटका होईल.
ती एक खोल श्वास घेते. पावसाच्या ओलसर हवेत तिच्या साडीचा किनारा हलतो.
“चालेल... हीच वाट बरी.” ती स्वतःशीच म्हणते.
ती त्या बंद पायवाटेत शिरते.
अंदर ओलसर वास.
बांबूंच्या चौकटीतून पावसाचं पाणी थेंबथेंब गळतंय.
फुटकळ पिवळसर बल्ब. काही हलके झगमगतात, काही पूर्ण बंद.
आवाज.. फक्त तिच्या चप्पलांचा आणि ओल्या जमिनीवर घुंगरूच्या धाग्यांचा.
ती वेगाने चालते, हाताने पिशवी घट्ट धरून.
अचानक तिला मागून हलकीशी पावलं ऐकू येतात.
ती थांबते.
आवाज थांबतो.
ती परत चालायला लागते.
आवाज पुन्हा सुरू होतो.
तिचं मन जरा घाबरतं. ती थोडी पावलं वेगानं टाकते.
त्या पावलांचा आवाजही तसाच वाढतो. तिच्या तालात, तिच्याच पाठोपाठ.
ती वळून बघते.
फिक्कट प्रकाशात बांबूंच्या सावल्यांच्या आडून एक आकृती दिसते.
स्त्रीची. साडी नेसलेली, शरीर सडपातळ. केस मोकळे. चेहरा अंधारात अर्धवट लपलेला.
ती स्त्री जणू काही तिच्याच पावलांच्या लयीला अनुसरते आहे.
सुरभीच्या छातीत श्वास जरा वाढतो.
ती पाय थोडे हळू करते.
ती दुसरी स्त्रीही थांबते.
आता त्या दोघींमध्ये फक्त काहीच पावलं अंतर आहे.
सुरभी हळूच मागे वळते आणि बल्बच्या फिक्कट प्रकाशात तिची नजर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पडते.
आणि ती थबकते.
ती स्त्री... अगदी तिच्यासारखी दिसते.
तोच चेहरा.
तोच डोळ्यांचा आकार.
तीच ओठांची नाजूक वळण.
जणू आरशातच स्वतःकडे पाहतेय ती.
क्षणभर तिला स्वतःचं श्वास ऐकू येणं थांबतं.
ती हलकेच डोळे मिचकावते आणि पाहते, ती स्त्री हळूहळू तिच्या बाजूनं पुढं निघून जाते.
फक्त शालूचा हलका स्पर्श तिच्या हातावर होतो आणि ती दुसरी सुरभी पुढे चालत निघून जाते.
सुरभी मागे वळते, पाहते पण ताडपत्र्यांमधून झगमगणाऱ्या प्रकाशात ती आकृती हरवलेली.
फक्त थेंबथेंब गळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि ओल्या जमिनीवर पडणारे पावसाचे हलके ठिपके उरतात.
ती काही क्षण तशीच उभी राहते.
तिच्या कपाळावर घामाचा ओलसर थेंब.
“काय होतं हे...?” ती स्वतःशीच पुटपुटते.
तिच्या डोळ्यांत असं काहीतरी दिसतं भीतीपेक्षा वेगळं. जणू स्वतःला भेटल्याची हुरहूर..
ती बाहेर पडते. गल्ली संपते आणि पुन्हा मोकळा रस्ता समोर येतो.
हवेचा स्पर्श थंड.. पण तिच्या मनात एक विचित्र तापलेपण.
रस्त्याच्या कोपऱ्यावर एक छोटा पोस्ट ऑफिस आहे. तिथे एक म्हातारा दरवाजा बंद करतोय.
सुरभी (हळूच आवाज देते)“
काका, एखादा तार-फॉर्म आहे का?”
तो थांबतो. आश्चर्याने बघतो.
“तार? अरे वा, आता कुणी विचारत नाही ते... आहे गं एक जुना.”
तो तिला एक कागद देतो आणि शाईचं पेन.
सुरभी त्या कागदावर हळूहळू लिहते.
"मी ठीक आहे. लवकरच घरी येईन."
ती नुसता संदेश नाही पाठवत. ती स्वतःलाच सांगतेय की ती ठीक आहे, की अजून पूर्ण तुटलेली नाही.
माणूस तार घ्यायला जातो. पण सुरभी त्याला तार ना देता फक्तं पेन परत करते.
थोडं वर बघते. आकाश अंधुक झालंय, पण त्यात एक तारक चमकते.
तीच तिला स्वतःसारखी वाटते. एकटी, पण उजळ.
---
ती रस्त्यावर चालू लागते.
समोरून एक गाडी जाते. तिच्या हेडलाईटच्या उजेडात क्षणभर तिला परत त्या स्त्रीची झलक दिसते.
जणू ती पुढं चालतेय. तिच्याच पावलांवरून, तिच्या दिशेने.
सुरभी थांबते.
हळूच स्मित करत म्हणते..
“कदाचित... तीच मी आहे. माझ्या आतली शांत सुरभी, जी अजूनही चालतेय, जी अजून थांबलेली नाही.”
ती एक खोल श्वास घेते.
घुंगरूचा नाजूक आवाज तिच्या पिशवीतून होतो जणू काही तिच्या पावलांना साथ देतो.
---
रात्र अधिक दाट होते.
रस्त्याच्या शेवटी तिचं जुनं घर तिथल्या खिडकीतून मंद दिव्याचा प्रकाश.
आई नक्कीच वाट पाहत असेल.
ती गेट उघडते, आत येते, शालू काढते.
आरशात स्वतःकडे पाहते.
थोडा वेळ शांतपणे पाहत राहते आणि मग हसते.
“मी हरवलेली नाही,” ती म्हणते.
“मी फक्त माझ्या आरशाला भेटून आलेय.”
---
त्या रात्री तिच्या टेबलावर जुनी डायरी उघडलेली राहते.
पानावर लिहिलेलं —
“कस्तुरी — गंध माझा आहे, पण शोध त्याचा नाही.
मेथी — चव माझी आहे, पण स्वीकार माझाच.”
ती दिवा बंद करते.
बाहेर पाऊस सुरू होतो.
आणि त्या पावसात तिच्या खोलीतून घुंगरूंचा मंद निनाद ऐकू येतो.
जणू ती दुसरी सुरभी अजूनही नाचतेय... तिच्यात, तिच्या आतल्या शांततेत.