सिनेमा आणि गाणी-
हिंदी मराठी सिनेमाचा १९७० ते १९९० हा काळ वेगळाच होता.
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत पद्मा, शाहू, राजाराम, रॉयल, प्रभात ही पाच, तर व्हिनस , लिबर्टी व उषा ही तीन व्हिनस कॉर्नरला, बसंत , बहार कलेक्टर ऑफीसजवळ तर उमा , पार्वती एका सरळ रस्त्यावर,
महाद्वार रोड वर सरस्वती , लक्ष्मी व कावळा नाक्याकडे संगम अशी सर्व भागात १५ टॉकीज त्यावेळी होती आणि सर्व टॉकीज भरपूर सिनेमासक्त लोकांमुळे तेजीत होती.
आता महिनाभर पण एक सिनेमा चालत नाही तेव्हा गोल्डन ज्युबिलीचा बोर्ड सर्रास लागत असे.
सकाळी ११ ते रा. १पर्यंत या भागात प्रचंड वर्दळ असायची. अभिनेते, अभिनेत्री यांचे फॅन्स अगदी अंधभक्त हे एकच सिनेमा सात वेळा बघितला असे सांगत असत.
फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे खरे रसीक आणि त्यात कहर म्हणजे मिळेल त्या ब्लॅकच्या दरात तिकीट घेऊन सिनेमा बघणारे पण काही कमी नव्हते. ब्लॅकचा एक वेगळाच फंडा होता कारण जसे चौपट दर देणारे पण असत तसेच सिनेमा चालू होइपर्यंत थांबून आहे त्या दरात किंवा अर्धा तास थांबून निम्म्या दरात तिकीटे मिळवणारे पण असत. सिनेमा बघायला येणारा जो सिनेमा बघायला आला असेल त्याचे तिकीट नाही मिळाले तरी जवळच पर्याय उपलब्ध असलेने दुसरा सिनेमा बघू शकत असत. काही महाभाग तिकीट काढून सिनेमाच्या सुरवातीपासून झोप काढत असत. फर्स्ट, स्टॉल, बाल्कनी व बॉक्स असे क्लास असत.बुकींग ऑफीसवर रांगा लागायच्या. फर्स्ट आणि स्टॉलसाठी तिकीट मिळवणे म्हणजे टास्क असायचा. एका अरुंद बोळातून धक्काबुक्की करणारे, भिंतीवर चढणारे प्रेक्षक हे सगळीकडे दिसणारे दृश्य असे.
तिकीट मिळालेले तिकीट हातात घेउन नाचत यायचे.
त्या काळातील पिक्चर्स तीन तासाचे असायचे. मेरा नाम जोकर चार तास ४ मिनीटांचा होता. मला तीन वेळा बघितल्यावर समजलेला ग्रेट शोमॅनचा सिनेमा.
थिएटरमध्ये पिक्चर सुरु झाल्यावर येणारे हमखास शिव्या खात असत कारण डोअरकिपरने बॅटरी मारल्याने उजेड व्हायचाच पण येणारा पायावर पाय द्यायचा.
ट्रेलर्स झाल्यावर सिनेमा दाखवत असत.
सिनेमा च्या संवादाना ओरडून तर गाण्याना नाणी फेकून प्रतिसाद दिला जात असे. हिरोला हाण मार असे सल्ले पण दिले जात असत.
त्यावेळी पत्रलेखन हा छंद होता व त्यात
सिनेमा ,गाणे, पुस्तक, बिंदू चौकातील सभा हे विषय प्रमुख होते.
मी त्यावेळी किनारा या सिनेमातील मांडू येथे चित्रित झालेल्या गाणे पहाताना पूर्ण गुंतलो होतो व काय वाटले होते ते लिहीले होते पण ती वही एका माणसाने वाचतो म्हणून घेतली आणि नंतर हरवली असे सांगितलेने उपलब्ध नाही व स्मरणात नाही.
किनारा हा एक भारी दिग्दर्शक, कसलेले कलावंत , मधुर संगीतकार लाभलेला पाहीलाचं पाहिजे असा चित्रपट होता.
त्यातील सर्वच गाणी श्रवणीय, अर्थपूर्ण होती. पण लतादीदींच्या निधनानंतर सर्वात जास्त लावले गेलेले *नाम गुम जाएगा* हे भावनांचे उत्कट प्रगटीकरण करणारे होते.
१९७७ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित व हेमामालिनी, धर्मेंद्र , जितेंद्र अभिनीत किनारा ला आर डी बर्मन यांचे संगीत लाभले होते.
हेमामालिनी -वसुंधरा धर्मेंद्र -अच्यूत जितेंद्र इंद्रजित.
वसुंधरा ही क्लासिकल डान्सर असते.
अच्युत या कवीवर तिचे प्रेम असते अच्यूतच्या अपघाती निधनामुळे वसुंधरा तणावाखाली असते ल त्याच्या आठवणीत गुरफटलेली असल्याने इंद्रजित मध्ये अंतर राखते. इंद्रजित भावुक व समजुतदार व्यक्ती आहे. पण क्लायमॅक्स आहे की तोच अपघाताला जबाबदार आहे.
नाम गुम जाएगा हे गाणे अशावेळी आहे की वसुंधरा आपल्या भुतकाळातील आठवणीत गुंतली आहे व इंद्रजित तिथे तीच्या भावना समजून घेत वावरत असतो. या गाण्यात जितेंद्रनी चेहऱ्यावरील हलक्या बदलातून पण भावना प्रकट केल्या आहेत. जितेंद्रवर कॅमेरा थोडा वेळ असला तरी त्याला वाटणारी सहानुभुती दाखवण्यात यशस्वी झाला आहे. हेमामालिनी व त्याच्या नजरेतील संवाद गुलजार चा कॅमेरा सहजपणे प्रगट करतो. धर्मेंद्र या गाण्यात नसला तरी ॲक्शन हिरो या त्याच्या प्रतिमेपेक्षा अभिनयप्रधान भुमिका होती.
हेमामालीनीची भावमुद्रा हा या गाण्याचा आत्मा होता. या गाण्यात नृत्य नव्हे तर अभिनयाला प्राधान्य होते . प्रसिद्धी, नाव ,सौंदर्य हे नश्वर आहे हे तिला उमगले आहे हे तीच्या चेहऱ्यावरील भाव प्रगट करतात.
मांडूतील किल्ला-
तेथील मोकळी जागा ,कमानी, दुरवरची टेकडी खुले आकाश व एकाकी वाट याचा गाण्यातील भावना दाखवण्यासाठी चांगला वापर केला आहे.
मानवी अस्तित्वाची नश्वरता पण स्मृतींची अमरता हा गहन विचार मांडणारे हे लतादीदींच्या प्रभावी आवाजामुळे श्रवणीय तर आहेच पण विचार करायला लावणारे आहे. हे गाणे व चित्रपट एकदा पहाच.