Miya Bibi raji - 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | मियाँ बिबि राजी - भाग 4

Featured Books
Categories
Share

मियाँ बिबि राजी - भाग 4

       बादशाचे भेसूर रडणे ऐकुन मंगेशची आई-बहिण दोघी बाहेर आल्या. मंगेशच्या बहिणीने आजुबाजुला नजर टाकली. तिला काहीच अर्थबोध होईना. मग तिने बादशहाला साखळीने बांधले अन् ती पुन्हा कामाला घरात गेली. दहा पंधरा मिनिटे बादशा भीषण रडत राहीला तेव्हा मात्र काहीतरी अघटीत घडल्याची चाहुल मंगेशच्या बहिणीला लागली. घरात पुरूष मनुष्य कोणीच नव्हते. तिने मागीलदारी जाऊन शेजारच्या भाईला हाक मारली. भाई आला. भाई समोर दिसताच बादशा दोन पायांवर उभा रहात भुंकायला लागला. भाईने बादशाची साखळी हातात पकडून त्याला मोकळं केल मात्र... साखळीला ओढ देत बादशा बागेकडे निघाला. 

             बागेच्या गेट बाहेर सुऱ्याची बजाज सुपर भाईने ओळखली. सुऱ्या ईमलीला भेटायला आला असेल असा तर्क त्याने केला. बादशा भाईला त्या जागेपर्यंत घेऊन गेला. तिथे गेल्यावर वडारांच्या पालाच्या दिशेने मोहरा वळवीत भुंकायला लागला. भाईने बारकाईने निरिक्षण केले. पाला बाहेर नेहमीप्रमाणे वडारांची पाले खेळताना दिसली... एक दोन बाया चुली फुंकीत असलेल्या दिसल्या. बाकी सगळीकडे सामसुम. बहुदा सुऱ्या ईमलीला भेटायला वडारांच्या पालात गेलेला असेल – तो तासाभरात येईल. असा अंदाज करीत भाई बादशाला ओढीत घराकडे निघाला. बादशहा पाय नेटाने रोवीत परत फिरायला विरोध करीत राहीला.           

         दीड दोन घंटे उलटले तरी सुऱ्या आला नाही की बादशाचे भुंकणे, रडणे सुध्दा थांबले नाही. मग मंगेशाच्या बहिणीने पुन्हा आईला हाक मारली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून भाईने वठारातले आठ-दहा पोरगे जमा केले. बादशाची साखळी धरून भाई अन् त्याच्या पाठी वठारातले पोरगे असे लटांबर वडारांच्या पालाकडे निघाले. सुऱ्या गेला त्या वाटेने माग काढीत जोरदार भुंकत बादशा निघाला. आता वडारांची पालं दिसायला लागली. दहा बारा माणसांचा जमाव पालांच्या दिशेने येताना बघितल्यावर पाच सहा वडार पाला बाहेर पडले आणि सगळया मंडळींना त्यांनी अर्ध्यावर गाठले.

             भाईने सुऱ्याची चौकशी केली त्यावर समोरच्या वडारानी गळ्याची चामडी चिमटीत पकडून शपथ खात म्हटले “नाय् बा तुमचा कर्ता मानुस हिकडं यायला न्हाई... ईमलीचा बा तकड रत्नागिरीला ऱ्हातोय की... हिकडल्या मान्सांशी त्येचा काय संबंध न्हाई" बादशा तर गुरगुराट करीत साखळीला ओढ द्यायला लागलेला. वडार लपवा छपवी करतायत् याचा भाईला अंदाज आला. जरबेच्या सुरात तो म्हणाला, "तुम्ही आम्हांला फसवशीला पन बादशा काय फसायचा नाय. बादशा माग काढील त्या पालाची आमी झडती घेणार काय व्हायचं असेल ते होऊन जाऊदे" भाईने अशी दटावती केल्यावर मात्र वडार संतापले. पाच दहा मिनिट हमरातुमरी झाली. त्यांचा गलका वाढल्यावर पाला कडून आणखी १०/१२ वडार पुढे आले.

            वडारांचा जोर वाढला. “आमी काय कोणाची चोरी केल्याली न्हाई- तुमच पोरगं आमच्या पोरीचं प्वॉट वाढवाय लागलं आनी आमी काय गप बसाव काय ? आता गुमान परत जावा न्हायतर येकेकाला पालातच जित्त गाडतु की आमी... आमी काय मेल्याल्या आयच दुद न्हाई पेलो ! आमी सांगतु तेच्यावर ईस्वास ठेवा. काय झालं तरी पालाची झडती घियाला देणार न्हाई!” वडारांची गुर्मीची भाषा ऐकल्यावर मात्र साळवी मंडळी चवताळली. भाईच्या बरोबर आलेल्यापैकी एक पोरगा छाती पुढे काढीत म्हणाला, “बऱ्या बोलानी आमचा पोरगा आमच्या ताब्यात द्या. नायतर तुमची पालं उभी पेटवून देऊ..." झालं काडी पडली... अन् वडारांनी हाणामारीला सुरवात केली भाईच्या हाताला हिसडा देऊन बादशा मोकळा झाला अन् हाणामारीला करणा-या एका वडाराच्या पोटरीचा लचका त्याने तोडला. 

              मंडळीची हाणामारी जुंपलेली बघताच वडारांच्या पालांमधून घण पहारी घेऊन बापये पोरगे धावतच पुढे यायला निघाले. प्रसंगाच गांभीर्य ओळखून भाईने सोबतच्या पोराना माघारी फिरायला सांगितलं. साळवी मंडळी आरडा ओरडा करीत, कुकारे घालीत वाडीच्या दिशेने माघारी धावायला लागली. त्यांच्या मागे दगड धोंड्याचा मारा करीत वडारांचे बापये बाया यानी साळवी मंडळीना पिटाळून लावले. बादशाने मात्र त्या धुमश्चक्रीत आणखी दोन तीन वडारांच्या पायाचे लचके तोडले अन् त्यांचा जोर वाढलेला बघून पळणाऱ्या मंडळी सोबत त्यानेही माघार घेतली.

              माणसांची आरडा ओरड ऐकून साळवी वठारातली बायका माणसे/पुरूष हातातले काम टाकुन धावतच निघाली. मंगेशाच्या बागेपर्यंत पळणाऱ्या मंडळींचा ताणपट्टा काढून वडार माघारी फिरले. पळणारी मंडळी मंगेशाच्या घरासमोर अंगणात पोहोचली. जाणत्यानी विचार विनिमय करून झाली गोष्ट सुऱ्याच्या वडिलांना बाबा भुत्यांना सांगायची असा बेत ठरत असतानाच मंगेश साळवी आला. मंगेशला झालेल्या प्रकाराची कल्पना आल्यावर तो आणि भाई साळवी दोघेही सायकल घेऊन रत्नागिरीकडे रवाना झाले. दोघेही परटवण्यापर्यंत पोहोचले अन् जकात नाक्या समोरच बाबा भुते उभे असलेले दिसले.

             बाबा भुत्यांबरोबर मंगेश अन् भाई शिवरे वठरात पोहोचले. शिवरे वठारातले भाऊ शिवरे रिटायर्ड पी. एस. आय. हे जाणते माणुस, शिवरे वठरात त्यांच्या घराला मोठा मान. झाली गोष्ट ऐकल्यावर भाऊ शिवऱ्यामधला पोलिस जागा झाला. “वडारानी सुऱ्याला पालात डांबुन ठेवलेले असणार हे नक्की... ही जात भलती इब्लिस चेहऱ्यावरची सुरकती सुध्दा न हलवता थंड काळजाने समोरच्या माणसाचा गळा चिरणारी क्रूर औलाद ती. पोर जीवंत हाताला लागला तरी पुरे... गोष्ट बरीच पुढे गेली, पार हाताबाहेर गेली!” असे म्हणत त्यांनी भिंतीवरच्या शोकेसमधली डबल बॅरल बाहेर काढली. काडतुसाचा पट्टा कमरेला बांधीत शिवरे वठारातल्या तरण्याताठ्या पोरांना चौकात जमायचा हुकुम दिला. खन्ना कॉन्ट्रक्टर कडून दोन डंपर आले. उत्साही पोरे धडा धडा उड्या मारून हौदात चढली. आधी समजुतीने सांगुन बघा. दम देऊन बघा... मी येईपर्यंत हातघाई करू नका. अजुन दोन ट्रक मधुन मी येतो... मंगेशाच्या घराजवळ दम धरून रहा... उत्साहाच्या भरात कोणी आगाऊपणा करायचा नाही असा खास पोलिसी आवाजात भाऊ शिवऱ्यानी दम भरला नी डंपर सुटले.   (क्रमश:)