Miya Bibi raji - 2 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | मियाँ बिबि राजी - भाग 2

Featured Books
Categories
Share

मियाँ बिबि राजी - भाग 2

      फकीरला कळताच गाडी घेऊन तो शिवरे वठारात आला. वठारातल्या लोकांनी त्याच्यासकट गाडीतल्या सगळ्यांना बेदम चोप दिलाच पण पोलिस आणुन ट्रक जप्त करायला लावले. असा वठार पाठीशी असताना सुऱ्या कशाला गडबडेल ? ईमलीचा विश्वास पटेल अशा शब्दात त्याने तिची समजुत काढली. चांगले मध्यस्त घालून कलाप्पाकडूनच परवानगी घेईन. वेळ आल्यावर तु मात्र कच खाऊन मला तोंडघशी पाडू नको. माझे मी बघून घेईन. मी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. सुऱ्याने शपथ घेतली.

            ही गोष्ट सुऱ्याने मित्र मंडळीच्या कानावर घातली. सगळयांनी त्याला मदत करायचे वचन दिले. आधी कलाप्पाला समजूतीने सांगून बघायचे. तरीही तो ऐकला नाही तर सरळ पोरगी काढायची नी रजिस्टर लग्न करायचे असे ठरले. सुऱ्याच्या मित्रांचे टोळके कलाप्पाचा क्रशर खडीचा डेपो असायचा तिथे जाऊन त्याला भेटले. त्यांचे सांगणे ऐकल्यावर कलाप्पा गरम झाला पण शिवरे वठाराशी वैर त्याला पत्करणारे नव्हते. शिवाय घडी बसलेला धंदाही विस्कळीत होऊ द्यायचा नव्हता. कलाप्पाने पोरांच्या पायाला हात लावला. हात जोडून अजीजी केली. माझी जात पंचायत मला जिवंत ठेवणार नाही, आमच्या जातीत हे निर्बंध कडक आहेत असे विनवले. भेटायला गेलेल्या पोरानी कलाप्पाचे ऐकुन घेतले. मग विचार करून एकजण म्हणाला, “आम्ही समजुतीने तुला सांगितले एकतर पोरीला इथून बाहेर काढ. नाहीतर काय होईल ते तुझे तू सहन कर. मात्र कोणत्याही परिस्थितीत सुऱ्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राख. क्रशर सकट वडाऱ्यांची सगळी पाले आम्ही पेटवून देऊ." 

       त्या रात्री कलाप्पाच्या पालावर पुन्हा शिमगा झाला. ईमलीला मार बसला. कलाप्पाचे भाऊ मधे पडले. त्यानी तोडगा काढला. त्याचा भाऊ नामु ह्याने चवेडच्या अलिकडे कोतवड्यात कामगारांची पाले पडली होती तिथे पाल टाकायचे नी ईमलीला रत्नागिरीतुन हलवून तिथे कायम ठेवायचे असा बेत ठरला. दुसऱ्या दिवशी प्रेस उघडण्यापूर्वीच नामुचे पाल उठले अन् ईमलीसह तो कोतवड्यात रवाना झाला.

       आठ दिवस उलटले तरी ईमलीचा पत्ता लागत नाही म्हणताना सुऱ्याचा जीव कासावीस झाला. त्याला काहीच तर्क करता येईना. विचार करून करून त्याचे डोके फिरायची वेळ आली. चार दिवस गेले आणि ईमलीची भावंडे पुन्हा प्रेसच्या व्हारांडयात बसायला लागली. सुऱ्याने त्यांना भजी खायला घातली नी ईमलीची चौकशी केली. “त्ये रोजाला बानी लई हानलं बगा त्येला मंग नामुकाका संगट त्येला आमच्या लोकाच्या वस्तीवर धाडली की बाऽनं” मग सुऱ्याने खोदून खोदून चौकशी केली. पोराना ठिकाण नेमके सांगता येईना पण “रस्त्याच्या कामावरच्या लोकांची पाले आहेत त्या ठिकाणी” हा धागा पकडून सुऱ्याचे मित्र शोध काढायला लागले.

         कोतवड्यात पऱ्ह्या जवळच्या मैदानात वडारांची पाले पडलेली होती. ईमलीचा शोध घ्यायला गेलेल्या मित्राला तिथे इमली दिसली. मग पुढचा मार्ग सोपा होता. कोतवड्यातला मंगेश साळवी रत्नागिरीच्या व्यायामशाळेत यायचा. त्याची नी सुऱ्याची चांगली ओळख. सुऱ्या मंगेशच्या घरी गेला. मंगेशच्या घराजवळ त्यांची माडाची बाग, उन्हाळी भाजी करायचे मळे, त्यालगतच वडारांची पाले पडलेली. मंगेश सोबत बागेत फिरताना सुऱ्याला बघितल्यावर ईमली लगबगीने पुढे आली. खुप दिवसानी दोघांच्या मनमुराद गप्पा रंगल्या. मंगेश जरा दूर जाऊन थांबला. सुऱ्या नी ईमली गप्पा मारीत असताना अचानक मंगेशचा अल्सेशियन कुत्रा बादशहा धावत आला. मळ्याची राखण करण्यासाठी तो सोडलेला असायचा. कुत्रा भुंकत आल्यावर दोघांची पाचावर धारण बसली. मंगेश धावत आला आणि त्याने बादशाला आवरले म्हणून ठीक नाहीतर कुत्र्याने दोघांना फाडून खाल्ले असते. 

         ईमलीचा ठिकाणा कळला आणि सुऱ्याच्या कोतवड्याच्या चकरा व्हायला लागल्या. पालावर दिवसभर कुणीच नसायचे त्यामुळे अडचण नव्हती... फक्त मंगेशचा कुत्रा असायचा. सुऱ्या दरवेळी न चुकता कुत्र्यासाठी पाव बटर घेऊन जायचा. सवय झाली तसा कुत्राही दोघांना ओळखायला लागला. उलट त्याचा पहारा असल्यामुळे दोघांना निर्वेधपणे गाठी भेटी घेणे सुलभ व्हायचे. काहीही झाले तरी एकमेकांची साथ सोडायची नाही अशा आणाभाका झाल्या. मित्रांशी सल्ला मसलत करून कल्लाप्पाला बरोबर कात्रीत पकडायची नामी युक्ती सुऱ्याने शोधुन काढली. ईमलीनेही होकार दिला. युक्ती एवढी नंबरबाज की, कल्लाप्पाने आपल्या हाताने ईमलीचे सुऱ्याशी लग्न लावुन दिले असते.

         सुऱ्याच्या मित्रांनी सांगितलेली हिकमत दोघनी लढवली आणि कल्लाप्पा कधी येतो या गोष्टीची सुऱ्या वाट पाहु लागला. त्या दिवशी हप्त्याची सुट्टी होती. कामगार मंडळी, बाप्ये बायका पालावरच थांबलेली, सगळी दारू पिऊन तर्रर्र... चुलीवर बोकडाचे कोंबडयाचे मटण रटमटत ! मटण शिजले की जेवायला बसायचे. इतक्यात पालात वाकळीवर लोळणारी ईमली उठून बसली. सावरून उठण्यापूर्वी बसल्या जागीच तिला कोरडया वांत्या व्हायला लागल्या. पाण्याचा तांब्या घेऊन चुलती धावली... असेल काहीतरी असे आधी वाटले. पण अर्ध्या तासाने पुन्हा तोच प्रकार. चुलता चुलती घाबरली. नामुची दारू खाड्ङ्कन उतरली. त्याने जोशी डॉक्टरांना बोलवायला कामगार पिटाळला.

         घंटाभराने जोशी डॉक्टर आले. ईमलीला त्यांनी तपासले. चौकशी करता खरा प्रकार ईमलीने हळूच सांगितला. आपण विधवा असुन खरा प्रकार आईबापाला सांगितला तर ते मला जीती गाडतील, तेव्हा दोन दिवस तरी या प्रकाराची वाच्यता करू नका मग काय सांगायचे कसे सांगायचे ते बघता येईल... तुम्ही मला आई वडिलांकडे पाठवायचायचा सल्ला द्या... अशी डॉक्टरांना गळ घातली. डॉक्टरांनी मान डोलावली. डॉक्टरांनी बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन टोचून दोन तीन टॉनिक वजा गोळ्या, सिरप प्रिस्क्राईब केले. दरम्याने बीलाचे १०० रूपये खिशात टाकताना “तुम्ही हिला रत्नागिरीतल्या चांगल्या डॉक्टरला दाखवा, काळजी करायचे कारण नाही मी इंजेक्शन गोळ्या दिल्या आहेत. एकदोन दिवस काही काळजी करायला नको.” असे मोघमात बोलून डॉक्टर निघून गेले.

           दुसऱ्या दिवशी सकाळीच चुलतीने ईमलीला गाठली. “काल हप्त्याची सुट्टी म्हंताना बोकड रांदीत हुतो न्हाई ते ईमलीला भडाडा वकाऱ्या व्हाय लागल्या की कुठ काय बादलं का पोटात काय ग्येलं हयाचं भ्येव वाटायं लागलं की आमास्नं, त्ये बामनाचं डागतर हाय न्हवं त्येला बलिवलं की दादल्यानं... टचाचा दोन सुया मारल्यान.. शंबर रूप्पय घेतलं की डागतरानं... पर कसली भावना काय सांगाय यीना त्याला आनी म्हनालं का मोटया डागतराला दावाय फाजे.... फाटंला पुन्यांदा योक वक्कारी झाली की ईमलीला ----- तरी राच्च्याला मटान न्हाई खाल्लं गां ईमलीनं वाईच रस्स्यात कुसकरून दोन कोर भाकर तवडी खाल्ली-" 

         सुंद्री ईमलीची आय हे ऐकून गडबडलीच. “आस्सं ऽऽ कां—तरीच म्या म्हनलं की इतक्या सकाळच्या पारी तुमी आनि ईमलीला घ्येऊन कस्काय आल्यात ? तु घाबरू नगं इमला.. हत मोठ्ठ डागतर हाईत त्यास्न दावूया की... चुलती निघुन गेली. ईमलीला झोपाय सांगुन सुंद्री झाल्या गोष्टीची कलाप्पाला खबर द्यायला क्रशरकडे निघाली. माय बाहेर पडली आणि ईमलीने तडक प्रेस गाठली. तिला गेटात बघितल्या बघितल्या सुऱ्या बाहेर आला. ईमलीने सांगितलेली वार्ता ऐकून सुऱ्या जाम खुलला. कल्लाप्पाला पध्दतशीर कचाट्यात धरण्यासाठी त्याने ईमलीला सगळा बेत नीट समजावुन सांगितला. (क्रमश:)