Jay Shivray mitra Mandal - 2 in Marathi Classic Stories by Amol books and stories PDF | Jay Shivray mitra Mandal - 2

The Author
Featured Books
Categories
Share

Jay Shivray mitra Mandal - 2

*पहिला दिवस – प्राणप्रतिष्ठा* 

आज दिवस पहिला... माझ्या बाप्पाचा... माझ्या घरातला आनंदाचा.
काय म्हणालात "आनंदाचा कसा?"... अहो, आनंदी वातावरण का नसणार...? कारण माझ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आज होणार होती. या आलौकिक सोहळ्यासाठी प्राणप्रतिष्ठेसाठी सायंकाळचा मुहूर्त ठेवण्यात आला होता.
पण जेव्हा समजलं की मुहूर्त उशिरा आहे, तेव्हा थोडं मन अस्वस्थ झालं. कारण बाप्पा घरी आले होते, पण प्राणप्रतिष्ठा सायंकाळी होणार होती. आता मी दिवसभर काय करू...? बाप्पा माझ्याशी बोलणार नव्हते... मनात विचार आला आणि बेचैनी वाढली.
एकीकडे माझ्या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीचा आनंद मनात उसळून वाहत होता, तर दुसरीकडे बाप्पा घरात असूनही गप्प बसले आहेत, असं वाटत होतं.

जन्मलेलं बाळ आईच्या मांडीवर झोपलेलं असतं... आई त्याला हाक मारते, कुरवाळते, डिवचतेही, पण ते बाळ आपल्या नादात असतं, काहीच प्रतिसाद देत नाही. तसंच माझ्या बाप्पाचं झालं होतं. मी त्यांना बोलवत होतो, पण ते शांतच होते. ही शांतता मला दिवसभर खात होती.
पण जशी आई, बाळ काही प्रतिक्रिया देईपर्यंत हार मानत नाही, तशीच माझी अवस्था होती. मीही प्रयत्न करतच होतो.
शेवटी, जणू माझ्या मनातील प्रश्न ओळखून, बाप्पांचा सहाय्यक उंदीर मामा म्हणाला –
"मंडळ दादा, गणपती बाप्पा आलेत. आपल्या घराच्या बाहेर थांबलेत. आत्ताच थोड्या वेळात प्राणप्रतिष्ठा सुरू होईल आणि मग ते प्रत्यक्षात वास करतील. थोडं धीर धर दादा... धीर धर..."
इतकं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. आता मी निवांत झालो. मग पुढील वेळ उंदीर मामांशी गप्पा मारण्यात गेला. ते मला त्यांचे अनुभव सांगत होते आणि मी त्यांना माझे.
घड्याळात सहा वाजले. प्राणप्रतिष्ठेची वेळ झाली.
मंडळाचे कार्यकर्ते दारात जमू लागले. या सुवर्णक्षणाचा कारभार श्री बुरांडे स्वामींना सोपवण्यात आला होता. तेच आज माझ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार होते. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून ठेवली होती. कुठलाही कसूर उरला नव्हता.
मी पाहत होतो, श्री बुरांडे स्वामींच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा एक दिव्य प्रकाश होता. त्यांच्या डोळ्यांत आत्मविश्वास झळकत होता. कारण त्यांना आज कोडोलीच्या २१ फुटी महागणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा पहिला मान लाभणार होता.
ते दरवर्षी येतात, पण यंदा त्यांच्या मंत्रोच्चारांत वेगळाच जादुई प्रभाव जाणवत होता. त्यांच्या आवाजातली लय, तो गाभ्यापर्यंत भिडणारा मंत्रगर्जना – जणू माझ्या बाप्पाचं प्रतिबिंब त्यांच्यात उतरलं होतं.
...आणि मग मंत्रोच्चार सुरू झाले.
क्षणोक्षणी वातावरण भारावून जात होतं. मंत्र संपल्यानंतर माझ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली.
आणि जो बाप्पा आतापर्यंत मंडळाबाहेर उभा होता, तो आत आला आणि प्रत्यक्ष विराजमान झाला.
त्याचा तो तेजोमय ओरा... ते दिव्य रूप... माझ्या डोळ्यांना झेपेना. क्षणभर मला जबाबदारीचं ओझं जाणवलं, जणू मी डगमगतोय असं वाटलं.
तेवढ्यात उंदीर मामा माझ्या कानात अलगद म्हणाले –
"गणपती बाप्पा आहेत – तुझं, माझं, जगाचं पोशिंदे, रक्षणकर्ते. का अस्वस्थ होताय मंडळ दादा?"
त्यांच्या शब्दांनी माझं मन शांत झालं. आता मला बरं वाटू लागलं.

 मान्यवर आगमन* 

प्राणप्रतिष्ठा झाली होती. आता राहिलं होतं ते म्हणजे माझं स्वतःचं उद्घाटन.
आता बाप्पा प्रत्यक्ष माझ्याशी बोलत होते.
"आता मी आलोय तुझ्या या सोनेरी रथात, मंडळात... आता आहे तुझी पाळी. तुझं उद्घाटन झाल्यावर मी सर्वांचा होईन. माझे भक्त येथे येऊन मला भेटतील."
मी बाप्पांना म्हणालो – "बाप्पा, या वेळचे माझे उद्घाटन भव्य थोर लोकांच्या हस्ते होणार आहे."
बाप्पांनी विचारलं – "कोण आहेत त्या थोर व्यक्ती?"
मी नम्रपणे उत्तर दिलं –
"बाप्पा, वारणेचा ढाण्या वाघ म्हणजेच माननीय श्री विनय विलासराव कोरे सावकर, तसेच माननीय श्री अमरसिंह यशवंत पाटील भाऊ आणि त्यांचे चिरंजीव माननीय नंदन अमर पाटील दादा हे आहेत."

हे ऐकून बाप्पा हसून म्हणाले –
"पोरांनी कार्यकर्त्यांनी खरंच करून दाखवलं."
मी व बाप्पा बाहेर बघत होतो. घड्याळात सात वाजले होते, पण अजून कोणी आलेलं नव्हतं.
कार्यकर्त्यांना मात्र आतुरता लागली होती –
"कधी येणार साहेब? कधी येणार दादा? कधी येणार भाऊ?"
प्रत्येकजण त्यांच्या येण्याची वाट बघत होता. कुणी फोन करून माहिती काढत होतं – "कुठपर्यंत आले असतील? अजून किती वेळ लागेल?"
सगळ्यांच्या डोळ्यांत त्यांच्या आगमनाचा ओढा दिसत होता.
मान्यवर येण्याआधी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आधीच करून ठेवली होती. अध्यक्ष महोदयांनी प्रत्येकाची जबाबदारी ठरवून दिली होती, म्हणून कसलीही गडबड होणार नव्हती. पण तरीही प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर थोडासा ताण दिसत होता. कारण आज मला – माझ्या बाप्पाला – भेटायला येणार होते वारणेचा धान्या वाघ, अमरसिंह पाटील भाऊ व नंदन पाटील दादा शिवरायांचा वारसा जपणारे इतर थोर मान्यवर व भक्तजन. .

सव्वा सात वाजले...
अचानक पोरं बाहेर पळू लागली. 
क्षणभर मला काहीच समजलं नाही.
पाहतो तर काय –
माननीय श्री अमरसिंह पाटील भाऊ व नंदन पाटील दादा यांचे आगमन झालेले!
ते गाडीतून उतरले आणि गर्दीत जल्लोष उसळला. प्रत्येकाला त्यांना भेटायचं होतं. 
कार्यकर्त्यांनी त्यांना सन्मानाने पुढे आणलं आणि खुर्चीत बसवलं. इकडच्या-तिकडच्या गप्पा रंगत असतानाच, माननीय श्री सावकर साहेबांची गाडीही येऊन थांबली.
पुन्हा तीच लगबग...
पुन्हा तोच जल्लोष...
सावकर साहेबांना भेटण्यासाठी प्रत्येकजण आतुर होता. कार्यकर्त्यांनी त्यांना सन्मानाने पुढे आणलं आणि खुर्चीत बसवलं.
मंडळापुढे मुंगीलाही जागा मिळणार नाही इतकी अफाट गर्दी जमली होती. 

मी पाहत होतो… मंडळाच्या उजव्या बाजूस पुरुष कार्यकर्ते उभे होते, तर डाव्या बाजूस महिला कार्यकर्त्या आपापली जबाबदारी निभावत होत्या. त्यांच्यासोबत काही महिलांची लहान मुलं इकडे-तिकडे खेळत, काकत बसत होती. आईचा कान ओढ, कुठेतरी केस ओढ – असं त्यांच्या प्रेमळ खोडकरपणाचं वातावरण होतं.
छोटा विहान – म्हणजेच श्री प्रमोद भोसले यांचा मुलगा – आपल्या बाबांचा हात ओढत होता; कदाचित त्याला खांद्यावर बसायचं होतं. तर दुसरीकडे अध्यक्ष महोदय श्री अमेय पाटील यांची कन्या ईशा, प्रेमाने तिच्या आजोबांचे गाल ओढत होती. 
श्री विनायक माने यांची मुलगी वेदुला माझ्या लाडक्या बाप्पाकडे एकटक पाहत होती. जणूकाही माझा बाप्पा तिलाच स्वतःकडे बोलावतो आहे, असा भास होत होता. छोटी ईश्वरी आईला घट्ट मिठी मारून बसली होती . 
त्याचवेळी छोटा कृष्णराज – सौ. कोमल गायकवाड यांचा मुलगा – गर्दीतून कोणालातरी शोधत होता; बहुदा त्याचे पृथ्वीराज बाबा नजरेतून सुटले असावेत. आणि खजिनदार श्री रणजीत मोहिते यांचा मुलगा शिवांश, बाबांचा हात सोडायलाच तयार नव्हता. त्याला मंडळाची ओढ होती आणि त्याचा आनंद बाबांनीच पूर्ण करून दिला होता.
त्यांचा हा खोडकरपणा, त्यांच्या बालपणाची ती निरागस झलक पाहून मलाही माझे सुरुवातीचे दिवस आठवले. त्यावेळी माझे कार्यकर्ते म्हणजेच माझे आई-वडील होते.

आता वेळ आली होती मान्यवर यांचा मानाचा सत्कार करण्याची.

तेवढ्यात माझं लक्ष विचलित झालं – महिला आपापसात काहीतरी कुजबुजत होत्या. मंडळातील महिला कार्यकर्त्या सत्कारासाठी ताट सजवत होत्या, आरतीसाठी तयारी करत होत्या. छोट्या मुली सिद्धी, आराध्या, अबोली, रेहा,आन्वी, प्रणाली, प्रांजळ, व वीरा फुलं घेऊन मान्यवरांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.

अचानक कोणीतरी मोठ्याने आवाज दिला, “आता येताय का पुढे ?”
आणि लगेचच माझ्या निवडक महिला कार्यकर्त्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पुढे आल्या –
सौ. अश्विनी तेली, सौ. कल्पना झुरे आणि सौ. जयश्री कीबिले.

त्यांनी सर्वांचे आरती-ओवाळून स्वागत केलं. त्या क्षणी वातावरणात एक वेगळाच पवित्रपणा आणि आनंद दरवळला होता.

प्रत्येकाला फेटा बांधून श्रीफळ देऊन सन्मानित केलं जात होतं.
तेवढ्यात बाप्पा माझ्याशी बोलले –
"मी प्रत्यक्ष वरून देव राजालाही बोलावलं या उद्घाटनाला."
...आणि खरंच!
क्षणात वरूनदेव आला. 
त्याची हजेरी इतकी नाजूक होती की कोणालाही फारसा त्रास झाला नाही. मलाही छान वाटलं – "आज माझ्या उद्घाटनाला प्रत्यक्ष वरून देवही उपस्थित आहे."

फेटा बांधून सत्कार सुरू झाला...
आता वातावरण अधिकच उत्साहाने उजळून निघालं होतं.


 *उद्घाटन व आरती* 


दरम्यान, मी ऐकत होतो – सावकर साहेब आणि अमर भाऊ एकमेकांत बोलत होते.
सावकर साहेब म्हणाले –
"कोडोलीतला पहिलाच २१ फुटी गणपती पोरांनी करून दाखवला..."
यावर श्री अमर भाऊंनी होकार देत त्यांना साथ दिली.
क्षण आला...
नारळ फोडून, फित कापून माझं उद्घाटन झालं!
आणि मग –
माझा बाप्पा सर्वांसाठी दर्शनासाठी सज्ज झाला.
बाप्पाचं ते तेजस्वी रूप पाहून सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिटत होतं.
त्याची ऊर्जा प्रत्येकाच्या अंगात नवी उमेद निर्माण करत होती.
सर्वांच्याच चेहऱ्यावर वेगळाच उत्साह झळकत होता.
श्री बुरांडे स्वामींनी आरतीची तयारी केली. क्षणात आरती सुरू झाली.
सर्व कार्यकर्ते, भक्तगण एकदिलाने आरती म्हणत होते.
आणि त्याचवेळी वरून देव अजूनही हजेरी लावत होता.
आरती झाली. प्रसाद घेतला.
प्रत्येकाने माझ्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
मुख्य पाहुणे पुढील कामासाठी रवाना झाले, पण त्यांच्या मनातही बाप्पाचा दिव्य अनुभव कायमचा कोरला गेला होता.


 *भक्तांचे दर्शन व कार्यकर्त्यांचा उत्साह* 


आता प्रत्येक जण माझ्या या बाप्पाचं दर्शन माझ्या घरी येऊन घेऊ शकत होता. लोकांची चांगलीच रांग लागलेली दिसत होती. प्रत्येक जण प्रत्यक्ष बाप्पांना जवळून पाहण्यासाठी, त्याचं मोटं देखणं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी उत्सुक होता.
कधी कधी माझ्या कार्यकर्त्यांना लोकांना सांभाळण्याची वेळ आलेली दिसून येत होती. काहीजण फक्त डोळ्यांनी मला टिपत होते, तर काहीजण त्यांच्या मोबाईलमध्ये मला कैद करत होते. हे सर्व मी पहिल्यांदाच अनुभवत होतो – हा माझ्या बाप्पाचा परिणाम होता.
लोकांची एवढी गर्दी मला थोडी अस्वस्थ करत होती. पण माझ्या सोबतीला उंदीर मामा होता. तो मला समजावत होता,
“घाबरू नकोस, माझा सर्वांचा लाडका बाप्पा सर्व काही सांभाळून घेईल.”
थोड्याच वेळात झालेली गर्दी हळूहळू कमी होत गेली. लोक पुढील प्रवासाला निघून गेले. मंडळात राहिले ते फक्त माझे प्रामाणिक कार्यकर्ते.
माझे कार्यकर्ते चर्चा करत होते – आता आपण सर्वांसाठी काहीतरी करायला हवं. पोरांनी पाण्याचं कारंजं केलं होतं, पण काही तांत्रिक कारणांमुळे ते पुढे चालू ठेवणं शक्य नव्हतं. म्हणून ते काढण्याची घाई काहीजण करत होते.
मी पाहत होतो – इकडे माननीय अध्यक्ष महोदय श्री अमेय पाटील यांच्या पुढील नियोजनांच्या गप्पा रंगल्या होत्या. ते काहीतरी नवीन आणि हटके करण्याच्या तयारीत होते. त्यांचे ते नियोजन माझ्या कानावर येत होते, आणि मनाला बरं वाटत होतं.
“प्रत्येकाला त्यांच्या कामाचा योग्य तो मान-सन्मान मिळायलाच पाहिजे” – असं श्री अमेय यांचं मत होतं, आणि ते बरोबरच होतं.
तर दुसरीकडे माझे ज्येष्ठ कार्यकर्ते – श्री मधुकर लोखंडे, श्री शिवाजी लोखंडे आणि श्री संतोष माने – हे माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. त्या आठवणी श्री अमेय पाटील आणि श्री अमोल लोखंडे कान देऊन ऐकत होते.
तिकडे श्री अमर लोखंडे, श्री रवी भोसले, श्री प्रीतम उबारे, श्री रणजीत मोहिते, श्री अमर माने, श्री उदय केकरे आणि इतर काही कार्यकर्ते करंज्या हलवण्याचं तसेच कुंड्या हलवण्याचं काम घाईगडबडीत करत होते. कारण त्यांना महिला कार्यकर्त्यांना खेळण्यासाठी योग्य ती जागा करून द्यायची जबाबदारी पार पाडायची होती.
तात्पुरतं केलेलं पाण्याचं कारंजं पोरांना काढायला नको होतं, कारण त्यामागे त्यांचे खूप कष्ट लागले होते. म्हणूनच “या पाण्याच्या साठ्यातून अजून काहीतरी हटके करता येईल का?” याचा शोध श्री अमर लोखंडे, श्री संतोष माने, श्री रवी भोसले आणि श्री अमोल लोखंडे घेत होते.
दरम्यान, श्री प्रीतम उबारे काहीतरी जोक करून सगळ्यांना हसवत होते. त्यामुळे कामाचा कंटाळा येत नव्हता. 

अशात बराच वेळ निघून गेला. सर्व कार्यकर्ते माझ्या घरामध्ये येऊन बसले, आणि गप्पा-गोष्टींना सुरुवात झाली. काहीजण जुन्या गोष्टींना उजाळा देत होते – जसे की श्री अमर माने व श्री महेश पाटील. तर काहीजण त्या आठवणी मनामध्ये कोरत होते, अनुभवत होते.
काहीजणांच्या मिरवणुकीच्या चर्चा चालू होत्या, तर काहीजण पुढील आर्थिक बाबींचं नियोजन करत होते.
एक बाजूला किशोरावस्थेतील माझे रांगडे तरुण कार्यकर्ते माझे मावळे– विघ्नेश, अण्णा , शिवा, रोहन अथर्व , रंजीत, सत्यजित रुद्र, वरद, अभय,आयुष, राजवीर व प्रतीक – हे इतर मंडळांच्या डॉल्बीच्या आवाजाच्या चर्चेत रंगले होते. 
कोणी म्हणत होतं, “अरे याचा टोका मोठा!” तर लगेच दुसऱ्या बाजूने कोणी म्हणत होतं, “हे काहीच नाही, त्याचा ठोका मोठा!” 
तर कोण आणा शिवा सारखी पोर लाईट शो चा बावा करत होते .. मुलांच्या मनात गणपतीची उंची बद्दल एक वेगळाच अभिमान होता. 
हे त्यांचं नेहमीच चालायचं. त्यांची डोकी मोबाईलमध्ये खुपसलेली होती, गावातल्या , शेजारच्या गावातल्या मंडळांचे विडिओ बघण्यात ते मग्न झाले होते . 

रात्रीचे दहा-साडेदहा वाजले असतील, पण माझ्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेणारे लोक अजूनही येत होते. काहीजण लांबूनच दर्शन घेत होते, तर काहीजण प्रत्यक्ष घरामध्ये येऊन दर्शन घेत होते. प्रत्येकाच्या मनात “मला माझा बाप्पा भेटला” याचा आनंद दिसत होता.
हळूहळू वेळ पुढे सरकत होती. पण कार्यकर्त्यांच्या गप्पा संपायचं नाव घेत नव्हत्या. घड्याळात साडेअकरा वाजले.
मी हळूच माझ्या बाप्पांकडे पाहिलं – ते झोपलेले होते. कदाचित माझ्या बाप्पांनी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वतःमधली ऊर्जा देऊन ते थकले असावेत.
आता मीही ठरवलं – आपणही झोपूया. उद्या सकाळी पुन्हा नव्या तयारीने आपण सर्व भक्तांचं स्वागत करायचं आहे, त्यांना योग्य तो आशीर्वाद द्यायचा आहे.
बाप्पाला त्रास न देता मी त्यांच्या सहाय्यक उंदीर मामाला शुभरात्र म्हणण्याऐवजी “जय शिवराय…!” म्हणत झोपी गेलो.

माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला संकल्प मी आत्तापासूनच माझ्या अंगी बाणवला होता….


 *... जय शिवराय !*


क्रमशः.