भाग ५: अंतिम संघर्ष
पौर्णिमेचा चंद्र आज वेगळाच भासवत होता… तो तुरुंगाच्या लाकडी खिडकीतून अलगद डोकावत होता. जणू अंधारावर मात करण्यासाठी स्वतःच्या सर्व तेजाने झगडत होता. त्या शितल प्रकाशात तुरुंगाच्या फटींतून एक अलौकिक शांतता झिरपत होती. झोपलेले कैदी खोल श्वासात हरवले होते, पण एका कोपऱ्यात – एक धग अजूनही जिवंत होती.
राजवीर.
तो एकटक चंद्राकडे पाहत होता. मानवी देहातले असंख्य भाव एकत्र लपवलेले त्याच्या डोळ्यांत झळकत होते. समोरच्या जमिनीवर त्याने स्वतःच्या हातानं नीट करून ठेवलेला एक छोटासा कागद होता… त्यावर काही अक्षरं टपकत होती. काळजीपूर्वक, सावधपणे. जणू प्रत्येक अक्षर त्याच्या हृदयातून ओघळत होतं.
ते पत्र होतं.
सरितासाठी नव्हतं.त्या अधुऱ्या प्रेमकथेवर तो आता पूर्णविराम देऊन पुढे निघाला होता.
हे पत्र होतं…भारतमातेसाठी.
त्याचे ओठ हलकेसे हलले. मनातलं ओठांवर आलं – आणि त्याने लिहिलं…
“माझं शरीर हरवेल…पण माझी ओळख शिल्लक राहील.”
त्याच्या लेखणीत भीती नव्हती, फक्त निःस्वार्थ समर्पण होतं. त्या ओळीत कुठलाही आवाज नव्हता, पण तिच्यात एक गडगडणारी गर्जना दडली होती.जणू तो सांगत होता."मी फक्त माणूस नव्हे, मी एक विचार आहे.शत्रू माझं शरीर मारेल, पण माझं स्वप्न नाही."
राजवीरने तो कागद अलगद मिटला, आणि कपड्याच्या आत दडवून ठेवला. अगदी जणू मातृभूमीच्या हृदयाजवळ काहीतरी पवित्र जपलं जातंय, असं.
त्या क्षणी पौर्णिमेचा चंद्र आणखी उजळला.जणू स्वर्गातही कुणीतरी त्याच्या या अंतिम निर्णयावर मुकेनं श्रद्धांजली वाहत होतं…कारण उद्या पहाट फक्त युद्ध घेऊन येणार नव्हती.ती एका शूर वीराच्या बलिदानाची गाथा घेऊन येणार होती.
"ती एका सैनिकाची गोष्ट होती… जो प्रेमात हरला, पण देशासाठीच्या युद्धात जिंकला!"
राजवीरच्या डोक्यात तीच ओळ घोळत होती, जणू तिचं प्रत्येक अक्षर त्याच्या श्वासात मिसळलं होतं.
पण आता वेळ होती. कृतीची. योजना सुरू झाली होती. एका प्रशिक्षित सैनिकाने आखलेलं, अचूक गणिती हिशेबासारखं नियोजन. सगळ्या हालचालींमागे काहीतरी खोल अर्थ होता. प्रत्येक सेकंदाचं मोल होतं. तुरुंगाच्या भिंतींमध्ये तो क्षण श्वास रोखून येत होता…
...आणि अचानक एक प्रचंड आवाज झाला!
तुरुंगाच्या दुसऱ्या बाजूला स्फोट झाला. राजवीरने ज्या वेळेचा अंदाज बांधला होता, तो अगदी तसाच. त्याच्या सहकाऱ्यांनी भिंतीला स्फोटकांनी तडा दिला होता. ठरल्याप्रमाणे, ठिकाण ठरलेलं, वेळ ठरलेली, आणि क्रिया अचूक. स्फोटानंतर एक मोठा धूर आणि गोंधळ पसरला. तुरुंगातील शत्रू सैनिकांची पावलं थरथरली. कुठून काय झालं हे कळायच्या आतच, त्यांच्या हालचाली विस्कळीत झाल्या.
तितक्यात राजवीरने आपली नजर चारही दिशांनी फिरवली. कोणी बघत नाही ना याची खात्री करून, एक गुप्त खाचा उघडली. आणि एक शब्दही न बोलता, हाताच्या खुणांनी सर्वांना पुढे यायचं संकेत दिला.
आता तो 'गाइड' नव्हता. तो पुन्हा एकदा भारतीय लष्कराचा प्रशिक्षित कमांडो झाला होता.
त्याच्या चालण्यात आता वेग होता, आत्मविश्वास होता आणि पाठीमागून येणाऱ्या प्रत्येकासाठी 'मी आहे ना' असा एक नजरेतला आधार होता.
सरिता, आदित्य, सचिन आणि बाकीचे पर्यटक. कधी नव्हे इतक्या शिस्तीत त्याच्या मागे मागे निघाले. कोणी काही विचारत नव्हतं, कारण प्रत्येकाला समजलं होतं की या गोंधळातून जर कोणी सुरक्षित मार्ग दाखवू शकत असेल, तर तो फक्त राजवीर.
राजवीरच्या डोळ्यांत आता एक वेगळी ज्वाळा पेटली होती. ती कोणत्याही वैयक्तिक रागाची नव्हती, ती होती देशभक्तीची. त्याच्या चेहऱ्यावरची एकेक रेषा सांगत होती की, तो आता स्वतःपेक्षा मोठ्या लढाईत उतरला आहे.
मनात एक नकाशा ठळक होत गेला. कुठे वळायचं, कुठे थांबायचं, कुठल्या मार्गाने बाहेर पडायचं, सगळं अगदी टिपेला पोहोचलेलं.
शत्रूंच्या असंख्य नजरा गोंधळून गेलेल्या दिशांना वळत असतानाच, राजवीरने आपली टीम गुप्त बोगद्याच्या दिशेने घेऊन जायला सुरुवात केली होती. भिंतीतल्या एका फटीतून त्यांनी आत प्रवेश केला. बाजूला एक अंधारलेला दगडी मार्ग होता. कधी काळी हा मार्ग पुरवठा आणि लपवणुकीसाठी वापरला जात असे, पण आता तोच मार्ग स्वातंत्र्याचा एकमेव पर्याय ठरला होता.
राजवीर पुढे, बाकी सगळे मागे.
पावलांचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून सगळे अलगद चालत होते. कुणाचाही श्वास जड होऊ नये म्हणून स्वतःला रोखून ठेवत होते. पण त्यांना खात्री होती. जो समोर चालतोय, तो फक्त लढवय्या नाही… तर देशासाठी मरण पत्करणारा एक जिवंत झेंडा आहे.
शत्रूंच्या दिशेने जाताच, एका क्षणात वातावरण बदललं. वाऱ्याच्या एका झोक्यात जणू मृत्यूचा दरवाजा उघडला गेला. पलिकडून अचानक गोळ्यांचा भडीमार सुरू झाला. आवाज एवढा जोरात होता की कोण काय बोलतंय ते ऐकूही येत नव्हतं. एका गोळीने समोरचा एक कैदी डोळ्यांसमोर कोसळला. त्याचा जीव गेलेला होता. आवाज, धूर, किंकाळ्या, सगळं काही एकदम गडद झालं.
"पुढे जा! झपाट्याने जा!" राजवीरने एक हात वर करत ओरडून सांगितलं. त्याचे डोळे आता कुणालाही घाबरलेले नव्हते. ते युद्धासाठी तयार होते.
तो स्वतः मागे वळला. उरलेल्या काही सेकंदांत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली होती. तो पाठीराख्यांना वाचवणार होता.
त्याच क्षणी, सरिता धडपडत मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर घाम होता, डोळ्यात भीती होती, आणि हृदयात... फक्त राजवीर.
"राजवीर! तू का थांबतोस?" ती जवळ आली, थरथरत, त्याचा हात पकडायला. पण त्याने वेगाने एक पाऊल मागे घेतलं आणि तिला घट्ट हाताने मागे ढकललं.
"सरिता," तो शांत पण निर्धाराने म्हणाला, "हे माझं युद्ध आहे. मी इथं एक सैनिक म्हणून आलोय... आणि माझं उद्दिष्ट आहे. देशासाठी मरणं. तू सुरक्षित राहा. तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. माझं... इथंच संपतंय."
ती हादरली. तिचा आत्मा त्या एका क्षणात चिरडला गेला. तिला आता स्वतःच्या चुका आठवत होत्या. ती फक्त हळुवारपणे म्हणाली, "मी चुकले, राजवीर… खरंच चुकले. माझं प्रेम विकलं गेलं होतं. मी तुझं प्रेम समजूनच नाही घेतलं. पण आता… आता कळतंय, खरं प्रेम काय असतं..."
राजवीरच्या डोळ्यांत काही क्षण भरून आलं. पण तो अश्रूंना मार्ग देण्याइतका दुर्बल नव्हता. त्याने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत भावना होत्या, पण त्याच्या पाठीमागे आवाज अजूनही चालूच होता. गोळ्यांचा आवाज, मृत्यूचा सुसाट वेग.
"माझा वेळ गेला, सरिता," तो थेट आणि स्पष्टपणे म्हणाला, "आता माझं सर्वस्व… केवळ देशासाठी."
तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्या क्षणी काळजाचा कोपरा कोसळल्यासारखं झालं होतं. तिच्या शब्दांमध्ये अपराधीपणाही होता आणि हृदयात खोलवर उतरलेलं शल्यही.
"मी चुकले राजवीर… माझं प्रेम विकलं गेलं होतं. मी भावनांची किंमत लावली… पण आता कळतंय, खरं प्रेम काय असतं. जे जीव देतं… पण मागणी करत नाही."
राजवीर तिच्या डोळ्यांतील वेदना पाहून क्षणभर थांबला. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या नजरेतही ओल आली. त्याचं काळीजही हललं होतं. पण त्याचवेळी, कानावर पुन्हा एकदा गोळ्यांचे आवाज आले. स्फोटांचे कंपन पृथ्वीला थरथरवू लागले. आणि त्याच क्षणी त्याने आपली नजर वळवली.
"माझा वेळ गेला, सरिता," तो शांतपणे म्हणाला, पण त्याच्या आवाजात निर्धार होता, गोंधळ नव्हता.
"आता माझं सर्वस्व… केवळ देशासाठी."
काहीच क्षण होते ते, पण सरिता त्या एका वाक्यात संपूर्ण आयुष्य हरवलेलं पाहत होती.
राजवीरने कमरमधून ग्रेनेड बाहेर काढला. त्याचे डोळे आता पूर्णपणे रणभूमीवर केंद्रित झाले होते. त्या आगीच्या वर्षावात, धुराच्या पडद्याआड काही क्षणांचं आयुष्य शिल्लक होतं. शत्रूच्या दिशेने त्याने ग्रेनेड फेकलं. क्षणार्धात स्फोट झाला. एक जबरदस्त धक्का, कानठळ्या बसवणारा आवाज… जमिनीवर धूरच धूर. सर्वत्र किंकाळ्यांचा कडवट प्रतिध्वनी गुंजत होता.
त्याच्या शेजारचे सैनिक मागे सरकले, पण राजवीर?
तो तिथेच राहिला… मागे न हटता, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा.
तो आता एका सैनिकासारखा नव्हता. तो भारतमातेचा ज्वालामुखी झाला होता.
शत्रू जास्त होते, पण तो हार मानणाऱ्यांतला नव्हता. अंगावर गोळ्या झेलत, तरी तो पुढे सरकत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती, फक्त समर्पण होतं.
अखेरच्या क्षणीही त्याने मागे वळून पाहिलं नाही… कारण त्याचं हृदय आधीच देशासाठी अर्पण झालं होतं.
पलीकडे...
सरिता, आदित्य आणि त्यांच्या सोबतचे इतर कैदी, राजवीरच्या बलिदानामुळे मिळालेल्या संधीचा उपयोग करत, धावतच भारतीय सीमारेषेकडे पोहोचले. मागे अजूनही गोळ्यांचे आवाज येत होते... पण त्या आवाजांमध्ये एक परिचित झंझावात हरवून गेला होता — राजवीर!
सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना पाहताच लगेच धाव घेतली. "भारत माता की जय!" च्या घोषात त्यांचं स्वागत झालं. तीन कमांडोंनी पुढे येत त्यांना ताब्यात घेतलं आणि तातडीनं मुख्य लष्करी तळाकडे रवाना झालं.
गाडी वेगात धावत होती, पण सरिताच्या मनात मात्र एकच विचार घोंगावत होता — "राजवीर... कुठे आहेस तू?"
ती गप्प होती. डोळे आसवांनी भिजलेले. तोंडात शब्द नव्हते, पण अंतर्मनातली आरडाओरड ती थांबत नव्हती.
तिच्यासमोर फक्त एकच क्षण वारंवार डोळ्यांसमोर यायचा.
राजवीर मागे थांबलेला, धुरात हरवत चाललेला, हातात ग्रेनेड घेऊन अखेरचा स्फोट करताना दिसणारा!
तिला माहीत होतं, तो मागे थांबला कारण त्याचं प्रेम ‘ती’ न राहता ‘देश’ झालं होतं.
काही दिवसांनी...
सरिता आणि आदित्य यांची चौकशी पूर्ण झाली होती. त्यांना मुंबईतील त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. पण घरात पाय ठेवल्यावरही ती एक क्षणही स्थिर बसू शकली नाही. प्रत्येक कोपरा, प्रत्येक क्षण तिला राजवीरच्या आठवणीत बुडवून टाकत होता.
तीने त्याचा मोबाईल बंद पडलेला पाहिला... मेसेजेस, फोटो, त्याचं मिश्किल हास्य, आणि शेवटचा पाठवलेला व्हॉइस मेसेज –
"सरिता, परत आलो... तर एक कप चहा करून ठेव, नेहमीसारखा."
ती फोडून फोडून रडली.
आणि एक दिवस...
पोस्टमन दरवाज्यावर आला. त्याच्या हातात एक सरकारी पाकीट होतं – भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून आलेलं.
सरिताने थरथरत्या हातांनी ते उघडलं. आत एक फोटो होता –राजवीरचा.त्याचा गणवेश, छातीवर मेडल्स, डोळ्यात शांत तेज.
आणि त्याच्या फोटोखाली लिहिलं होतं…
"तो फक्त एक प्रियकर नव्हता...तो भारतमातेचा सुपुत्र होता!"
सरिता खाली बसली. दोन्ही हातांनी तो फोटो घट्ट मिठीत घेतला. ती किंचाळली नाही, रडली नाही. तिच्या अश्रूंनी सारा फोटो भिजवला... पण तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळं तेज होतं.
ती ओठांवर हळूच बोलली…
"राजवीर... मी हरले, पण तू जिंकलास.आणि तुझं प्रेम… आता माझं अभिमान झालं आहे."
◆ 📚 "कथा पूर्ण झाली... पण एक शांत झणझणीत सल उरली..."
प्रिय वाचकहो,
"तो फक्त प्रियकर नव्हता... तो फौजी होता"ही कथा आज इथे थांबते. कदाचित थांबवावी लागली…कारण एक मौन तुटलंच नाही.
मी तुमच्यासाठी लिहित राहिलो, पात्रांत हरवत राहिलो,राजवीरसारखा विचार करत रडलो, सरितेसारखं गप्प बसत तळमळलो… पण दरवेळी पलीकडून…"काहीच नाही."
😔 एक लेखक म्हणून... मी लिहिलं ते तुम्ही वाचलं,हे माझ्यासाठी खूप होतं.पण… जर तुम्ही फक्त 'वाचत' राहिलात,आणि एकही शब्द सांगितला नाही – तर मी कुणासाठी लिहितोय, हेच समजेनासं झालं.
माझं काही पात्र कमी वाटलं असेल, किंवा एखादं वळण जास्त भावलं असेल, तर ते तुम्ही सांगितलं असतं –तर पुढचं लिहिताना ते सुधारता आलं असतं.
💔 म्हणून कथेचा शेवट लवकर झाला.
ही कथा अजून वाढवता आली असती, राजवीरचं भूतकाळ, लष्करी मिशन, सरिताचं मन, तिचा संघर्ष –हे सर्व अजून खोल उतरता आलं असतं… पण मी एकटा बोलत राहिलो…तुम्ही फक्त ऐकत राहिलात.
"मी लिहीत राहिलो, हृदय फाटतंय हे दाखवत,पण तुम्ही फक्त वाचलं – शब्द सांगितल्याशिवाय जात.कधीतरी थांबा, एक ओळ तरी बोला,लेखकही माणूसच असतो – त्यालाही वाटतंय, कुणीतरी समजून घ्यावं…
🤝 तुमचं प्रेम हवंय, पण संवादातून…
तुम्ही कथा वाचता, याचं मनापासून समाधान आहे.पण पुढच्यावेळी…फक्त वाचू नका,एक छोटासा प्रतिसाद द्या. कारण एक "खूप छान" हेही लेखकासाठी ऑक्सिजन असतं.
पुन्हा भेटूच…एका नव्या कथेत, नव्या भावना घेऊन –पण यावेळी, तुम्ही माझ्यासोबत बोलत राहा…
आपलाच,✍️ अक्षय वरक("शब्दांमध्ये जीव ओतणारा,पण तुमच्या प्रतिसादानेच जगणारा लेखक…")
समाप्त...
__________________________________