भाग ४ : रणसंग्रामाच्या उंबरठ्यावर
तुरुंगाच्या भिंती आता पूर्वीसारख्या शांत नव्हत्या. अंधारातही जाणवणाऱ्या हलक्या हालचालींनी हवेत एक वेगळीच सळसळ निर्माण केली होती. जणू एखाद वादळ येण्याआधीचा क्षण.सगळं स्थिर, पण त्यामागे काहीतरी भयंकर घडणार याची चाहूल देणारं.
राजवीर एका कोपऱ्यात उभा होता. डोळे मिटलेले, पण मनात प्रचंड हालचाल होती. त्याने पुन्हा एकदा मनातली योजना उलगडली, तपासली... आणि पक्की केली. वेळ खूप कमी होता.
त्या देशद्रोह्यांनी, जे स्वतःला क्रांतीकारक म्हणवतात, देशावर हल्ला केला होता. त्याच्या सहकाऱ्यांना ठार मारलं, पर्यटकांना बंदी बनवलं... आणि देशाच्या सन्मानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.
पण आता वेळ होती उत्तर देण्याची. एकट्यानं नाही.पण त्या धूसर अंधारात ज्या डोळ्यांत अजूनही आशेचा झरा होता, जे हात अजून लढण्यासाठी तयार होते, त्या प्रत्येकासाठी.
राजवीर तयार होता. रणसंग्राम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर तो उभा होता... आणि यावेळी माघार शक्य नव्हती.
तळघराच्या एका कोपऱ्यात सरिता आणि आदित्य एकमेकांपासून दूर बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावर थकवा, भीती आणि अनिश्चिततेचं सावट होतं. पण भावनांचं प्रकटीकरण मात्र दोघांमध्ये फार वेगळं होतं.
आदित्य आतून पूर्णपणे कोसळलेला होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत उर्जेने भरलेला, सरिताला धीर देणारा, आशावादी आदित्य आता खचलेला, उदास आणि निराशेच्या गर्तेत गुरफटलेला दिसत होता. त्याचे डोळे वारंवार जमिनीकडे, तळघराच्या कोरड्या भिंतींकडे जात होते. श्वासही जणू खोचलेला, तो स्वतःशीच पुटपुटला, “आपण यामधून वाचणारच नाही…” त्याच्या शब्दांत फारसा आवाज नव्हता, पण त्या काळ्या वातावरणात त्याचा तो हलका स्वरही स्पष्ट ऐकू गेला.
सरिता त्याच्या बोलण्यावर काहीच म्हणाली नाही. तिचा चेहरा थकलेला असला, तरी तिच्या नजरेत अजूनही एक प्रकारची जागरूकता होती. तिचं लक्ष वारंवार राजवीरकडे जात होतं. तो समोरच्या अंधुक प्रकाशात शांतपणे उभा होता, जणू संपूर्ण परिस्थितीचं निरीक्षण करत होता. त्या नजरेत घाई नव्हती, घबराट नव्हती… पण एकाग्रता होती. आणि हेच सरिताला अस्वस्थ करत होतं.
'तो नक्की कोण आहे?'ही विचारांची धार तिच्या मनात खोलवर शिरत होती.जेव्हा दहशतवाद्यांनी काही कैद्यांना एकटं नेऊन त्यांना मानसिकदृष्ट्या तोडायचं तंत्र वापरायला सुरुवात केली, तेव्हाही राजवीरने कुठलाही गोंधळ न करता सर्व परिस्थिती शांतपणे हाताळली. तो त्या वर्मी जाणाऱ्या धडपडीच्या वेळेसही स्थिर होता.
आता सरिताला खात्री वाटत होती –तो एक सामान्य पर्यटक नव्हताच.त्या शांत चेहऱ्याआड एक अजस्र निर्धार होता… एक मिशन.तो कोण आहे, हे अजून माहीत नव्हतं, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती.राजवीर या कहाणीचा शेवट करणार होता.
एका रात्रीच्या काळोख्या पडद्याआड दूर कुठेतरी अचानक एक जबरदस्त स्फोट घडला. त्याच्या गर्जनेनं संपूर्ण आसमंत थरारला. क्षणार्धात त्या तुरुंगाच्या जुनाट भिंती थोड्या थरथरल्या. धूळकणं खाली पडू लागली. लोखंडी सलाख्यांचा किरकिराट वातावरणात घुसमट निर्माण करू लागला. कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सगळे धास्तावले होते. एकमेकांकडे घाबरलेली नजर टाकत, ‘हे काय झालं?’ असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होता.
पण त्या गोंधळाच्या आणि भीतीच्या क्षणी एक व्यक्ती शांतपणे पुढे सरकला. राजवीर.
त्याचं डोकं ताठ, डोळ्यांत एक विचलित न होणारी दृढता होती. चेहऱ्यावर हलकीशी आठी, पण चालीत कमालीचा आत्मविश्वास. त्यानं आपल्या आसपासच्या सर्व बंदिवानांकडे नजर फिरवली. मग खोलवर ठाम आवाजात तो म्हणाला,“माझं ऐका. आपल्या हाती आता फारसा वेळ नाही. उद्या पहाटे, आपण सगळे इथून बाहेर पडणार आहोत.”
त्याचे शब्द तितकेच ठाम होते जितके त्या भिंती घनदाट होत्या. कैद्यांमध्ये एकदम कुजबुज सुरू झाली. काहींच्या नजरेत आशेचा झरा उसळला, काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं उमटली.
सचिन, जो नेहमीच उत्स्फूर्त होता, थोडा पुढे सरकला आणि थोड्याशा चिडूनच विचारलं, “पण कसं? आणि तू आहेस तरी कोण? असं काय जादू करणार आहेस का तू?”
राजवीर काही क्षण शांत राहिला. हॉलमध्ये फक्त त्याच्या श्वासांची लय आणि कुणाच्यातरी हळुवार हुंदक्याचा आवाज ऐकू येत होता. मग त्याने पुढे पाऊल टाकलं. त्या क्षणाला, एक रहस्य दाटल. आणि त्याच्या तोंडून त्या क्षणांची सर्वात मोठी आणि धक्का देणारी गोष्ट बाहेर आली —
"मी... राजवीर प्रतापसिंह राठोड. भारतीय लष्कराचा विशेष कमांडो.मी इथे कैद्याच्या वेषात आलोय –तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी."
हॉलमधल्या हवेत जणू काही क्षणासाठी स्फोट झाला.त्या शब्दांनी काळीज हादरवलं.
सगळे स्तब्ध झाले. कुणाचंच काही बोलायचं धाडस होत नव्हतं.एका क्षणात नजरांमध्ये आदर उमटला.अविश्वास, आश्चर्य, अभिमान… हे सर्व भावना एकत्र आल्या.
सरिता, जी तेव्हापर्यंत भिंतीच्या एका कोपऱ्यात स्वस्थ बसलेली होती, आता हळूहळू उठली. तिच्या डोळ्यांत काहीतरी लखलखत होतं – कृतज्ञता? शौर्याची थक्कता? की एक मूक समर्पण?
ती एक पाऊल पुढे आली, पण तिच्या ओठांवर कोणतेच शब्द नव्हते. डोळे मात्र खूप काही बोलत होते. ते डोळे पाणावले होते…
राजवीरचं खरं रूप उलगडलं होतं.
राजवीरने आपल्या शिस्तबद्ध लष्करी शैलीत सगळ्यांना एका रेषेत उभं केलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता, थोडी भीती आणि थोडी आशा दाटून आली होती. त्याच्या हातात एक साधा पानाचा तुकडा होता, आणि त्यावर त्यानं अगदी बारकाईने हातानं आखलेला एक छोटासा नकाशा होता.
तो नकाशा म्हणजे त्या तुरुंगाच्या आतल्या प्रत्येक कोपऱ्याचं सूक्ष्म निरीक्षण करून तयार केलेली एक आखणी होती. स्फोट कुठे होणार, त्यानंतर कुठून बाहेर पडायचं, कोणी कुठे थांबायचं, कोणी कुठे नजर ठेवायची, हे सगळं त्या नकाशात होतं.
राजवीर शांत आवाजात बोलू लागला, “ही भिंत – तुमच्यामागची – तिच्या पलीकडे एक झाकलेला बोगदा आहे. तो आधीपासूनच अस्तित्वात आहे, पण अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलं नव्हतं. उद्या रात्री बरोबर तीन वाजता या भिंतीवर स्फोट घडवून आणला जाणार आहे.”
सर्वजण एकदम स्तब्ध झाले. काहींच्या चेहऱ्यावर भय तर काहींच्या डोळ्यात प्रश्न चमकू लागले. पण राजवीरचं धाडस त्यांच्या मनात थोडंसं स्थैर्य घेऊन आलं होतं.
"त्या स्फोटानंतर आपल्याला अवघ्या चार मिनिटांत बाहेर पडायचं आहे. स्फोटाच्या आवाजानं पहारेकरी आणि बाहेरचे गस्तीदल लगेच जागं होईल. पण तोपर्यंत आपण या बोगद्यातून बाहेर पडलो, तर माझे चार सहकारी – भारतीय लष्कराचे गुप्त कमांडो. जे आधीच सीमा ओलांडून अगदी याच परिसरात थांबले आहेत, ते आपल्याला उचलतील आणि सुरक्षित स्थळी घेऊन जातील," असं म्हणत त्यानं नकाशावर बोट ठेवून प्रत्येक टप्पा दाखवला.
प्रत्येकजण आता त्याच्याकडे आशेने पाहू लागला. खरं तर, एवढ्या काळाने त्यांच्या मनात खराखुरा उधारलेला श्वास परत मिळतोय असं त्यांना वाटत होतं.कोणत्याच कैद्याने प्रश्न विचारला नाही. कुणीही विरोध केला नाही.फक्त एक भावना सगळ्यांच्या मनात ठसठसत होती — ही वेळ आपल्याला मिळाली आहे… कारण कोणीतरी जीवाचं रान करून आपल्यासाठी हे सगळं उभं केलंय.
सगळा परिसर काळोखात बुडालेला होता. दूर कुठेतरी पहाऱ्याची शिट्टी एकवारक होत होती. स्फोटासाठी ठरलेली वेळ अजून काही तास दूर होती, आणि तेवढ्यात – शांततेचा भंग करत. सरिताचे पावलांचे सावध, थरथरते आवाज ऐकू आले. ती हळूच राजवीरच्या दिशेनं आली.
राजवीर एका कोपऱ्यात, कडेला टेकून बसला होता. त्याचे डोळे बंद होते, पण तो झोपलेला नव्हता. त्याच्या मनात उद्याच्या सुटकेची आखणी चालू होती… आणि तुटलेल्या भूतकाळाचीही.
सरिता त्याच्यासमोर थांबली. काही क्षण दोघंही शांत होते. शब्द नसलेला संवाद त्यांच्या डोळ्यांतून वाहत होता.
"राजवीर..." तिचा स्वर इतका हलका होता की काळोखालाही त्याचं वजन जाणवलं असतं.
त्याने डोळे उघडले, तिच्याकडे पाहिलं. काही बोललं नाही.
"माफ करशील का?" ती म्हणाली, तिचा स्वर थरथरत होता. तिच्या डोळ्यांत दाटलेलं पश्चात्तापाचं गूढ दाटून आलं होतं.
राजवीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्या नजरेत शून्यता नव्हती. होती एक सखोल समज. पण त्यात हळुवार कटुता देखील मिसळलेली होती.
"तुझं प्रेम... खरं होतं सरिता," तो शांतपणे म्हणाला, त्याच्या स्वरात ताठ कडवटपणा नव्हता, पण वेदनेचं एक अजब सौंदर्य होतं,"पण माझ्यासाठी ते संपलं तेव्हाच… जेव्हा तू दुसऱ्याकडे गेलीस."
सरिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने त्याचं हात अलगद पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ते थोडक्याच शिष्टाचाराने मागे घेतलं.
"माझं आयुष्य चुकलं राजवीर..." ती म्हणाली, अश्रूंच्या धारेत तिचा चेहरा विरघळत चालला होता. "प्रेम... समजून घ्यायच्या आधीच मी त्याला हरवून बसले. तू ज्यासाठी उभा होतास... त्याची कदाचित किंमतच मला कधी कळली नाही."
राजवीर डोळे मिटून गडद श्वास घेत म्हणाला –
"माझं नाही चुकलं, सरिता.
मी प्रेमात हरलो. हो.पण प्रेम हरल्यावर मी बाटलो नाही...नशेत बुडलो नाही... कोलडलो नाही.मी निर्णय घेतला – देशासाठी लढायचा.प्रेम गमावलं… पण मातृभूमी जिंकली."
त्याचे शब्द खणखणीत नव्हते, पण ठाम होते – तलवारीच्या एका धारदार घावासारखे.
सरिताचा हात हळूच खाली सरकला. तिचे डोळे पाणावलेले, ओठ थरथरत होते. ती काही बोलू पाहत होती, पण शब्द हरवले होते.
राजवीर मात्र उठला. त्याने मागे वळून बघितलं नाही.कदाचित त्याला माहीत होतं – मागे वळून पाहिलं, की मन पुन्हा मागे खेचू लागेल. आणि त्याला आता फक्त पुढं जायचं होतं.
त्या रात्री... फक्त एकजण झोपला नाही.सरिता – तिच्या मनात तो संवाद पुन्हा पुन्हा घुमत राहिला…आणि राजवीर – जो प्रेमातून हरलेला, पण मातृभूमीसाठी विजेता होता.
आता युद्ध अक्षरशः जवळ येऊन ठेपलं होतं.
तुरुंगाच्या शांत भिंतींना आतून उसळणाऱ्या श्वासांची, धडधडणाऱ्या काळजांची आणि अदृश्य असलेल्या भीतीची चाहूल लागली होती. अवघ्या काही तासांत जे काही घडणार होतं, ते त्यांचं आयुष्य बदलणार होतं… कदाचित, ते आयुष्यच संपवणार होतं.
राजवीर एका कोपऱ्यात टेकून शांत डोळ्यांनी वेळेचा अंदाज घेत होता. त्याचे हात गुपचूप बंदूकसदृश नकाशा दुरुस्त करत होते. पण मनात युद्ध उभं राहिलं होतं. स्फोट होण्याचा क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला होता. कोणीतरी हळूच कुजबुजला, "किती वेळ उरला?"
राजवीरने फक्त घड्याळाकडे पाहिलं, काही न बोलता. पण त्या नजरेतून सगळ्यांना समजून गेलं – आता मागे वळण्याचा प्रश्नच नव्हता. वेळ जवळ आली होती.
सर्वजण एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे होते. हे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात कठीण क्षण होतं. कारण ही पळवाट नव्हती, हा धावणारा पलायन नव्हता… हे युद्ध होतं. स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वातंत्र्यासाठी, आणि स्वाभिमानासाठी.
सरिता एका कोपऱ्यात शांत बसली होती, डोळे मिटून. तिच्या मनात एकाच विचारांचा कोलाहल – ‘उद्या सकाळी सूर्य उगवेल… पण मी आणि राजवीर त्याला पुन्हा पाहू शकू का?’ तिच्या तळहातात काही वेळापूर्वी राजवीरने अलगद ठेवलेला एक चिठ्ठीचा तुकडा होता – त्यावर फक्त एक ओळ होती:
“शत्रूच्या भिंतीपेक्षा मजबूत असतो तो प्रेमाचा निर्णय.”
तुरुंगातील प्रत्येक श्वास आता एक लढा होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत भिती होती… पण त्यापेक्षाही जास्त होती – आशा. कारण काही तासांत सर्वांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार होते –
किंवा…
कायमचे बंद होणार होते. याची जाणीव कोणालाच नव्हती.
(पुढील भाग ५: अंतिम संघर्ष आणि बलिदान)