Ti Mavshi in Marathi Short Stories by Trupti Deo books and stories PDF | ती मावशी

Featured Books
Categories
Share

ती मावशी


"ती… मावशी!"
"कधी कधी आपली श्रद्धा ढासळते… माणसांवरचा विश्वास हलतो"माणूसपण शिल्लक आहे का, असा प्रश्न पडतो…"
… आणि वाटतं, 'देव असेल तर कुठं आहे?' पण मग अचानक आयुष्यात एखादा अनुभव येतो, आणि समजतं — देव ना कुठं बाहेर आहे, ना आत… तो आहे माणसात, त्या माणुसकीच्या स्पर्शात."

   
"धकाधकीचं आयुष्य… इथे प्रत्येक दिवस वेगळा असतो — कधी गोड, कधी कडवट. अनुभव चांगलेही येतात… आणि काही जखमा देणारेही.
पण माणूस खऱ्या अर्थाने ओळखला जातो तेव्हा, जेव्हा त्याच्या आयुष्यात संकटं येतात. अशा वेळी त्याला फक्त एक हवे असतं — 'कोणीतरी हात द्यावा… कोणीतरी न बोलता समजून घ्यावं.' आणि तेव्हाच आपण 
नकळत म्हणतो..."

"कुठं भेटतो देव?
मंदिरात? मशिदीत? की ग्रंथांत?
या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना, एका अनोळखी व्यक्तीच्या माणुसकीनं माझं संपूर्ण विचारविश्व बदलून टाकलं. तो माणूस देव नव्हता, पण त्याच्या कृतीत देव होताच!"असाच एक अनुभव माझ्या आयुष्यात घडलाय, ज्याने मला या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवायला भाग पाडलं.


"मध्यमवर्गीय कुटुंबातला जन्म माझा – संकेत. दोन खांद्यांवर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या… आणि तरीही चेहऱ्यावर कायमचं हसू.
रोजचं ठरलेलं रुटीन – सकाळी उठणं, ऑफिस, ट्रॅफिक, आणि संध्याकाळी घर. ना फार तक्रारी, ना फार अपेक्षा… पण आत कुठेतरी थोडासा थकवा मात्र सतत सोबत असलेला."

आज ऑफिस मधून घरी आलो तर सगळं ठीक व्यवस्थित होतं . दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला तयार होऊन जायला निघालो तर?
त्या दिवशी सकाळी वाऱ्यात एक थोडासा थरथरता गारवा होता. पण मनात मात्र विचित्र उकड.

अचानक पप्पांनी छातीत दुखतंय म्हटल्यावर सगळं जग ढवळून निघालं. एरव्ही खंबीर वाटणाऱ्या या माणसाच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदाच थकवा आणि वेदना पाहत होतो.
धडपडत आम्ही हॉस्पिटलकडे निघालो.गाडी बाहेर काढली. पप्पांना कसबस धरून गाडी मधे बसवलो. सोबत. बायको होतीच. आणि आईला घरी ठेवलं.




त्यांना क्लिनिकला घेऊन गेलो होतो. तपासणं झालं, पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची चिंता काही वेगळीच होती. त्यांनी अचानकच मोठ्या रुग्णालयात रेफर केलं… आणि त्या क्षणी काळजात एक हलकासा धस्स झाला.
मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला — इतकं गंभीर आहे का? काय होणार पुढं?

एका हातात गाडीचं स्टिअरिंग… पण दुसऱ्या हाताने सतत मोबाईल चेक करत होतो. आजींचा एकामागोमाग एक कॉल — "कसं आहे रे त्यांचं? डॉक्टर काय म्हणाले?"
पप्पांचं चेहरं पाहिलं की वाटायचं, मला खंबीर राहायलाच हवं. त्यांच्यासाठी, आजींसाठी… आणि स्वतःसाठी.

अशा प्रसंगी शरीर चालवतं तेव्हा मेंदू नव्हे, तर फक्त प्रेम आणि काळजी.
हृदय एकाच वेळी चिंता करत असतं आणि धीर देत असतं.



रस्त्यावर गर्दी होती… वाहतुकीचा आवाज, हॉर्न, गोंगाट.
पण प्रत्येक चेहरा निर्लेप. कुणाला काही देणं-घेणं नाही.
माणसं होती, पण माणुसकी नाही.
मी थकलेल्या नजरेनं लोकांकडे बघत होतो — कुणीही विचारलं नाही, "साहेब, काही मदतीची गरज आहे का?"

तेव्हा जाणवलं —
आजच्या काळात "माणुसकी" म्हणजे क्रांती.
लोक सोशल मीडियावर 'Be kind' लिहितात, पण प्रत्यक्षात रस्त्यावर कुणी पडलेलं दिसलं, की नजर वळवतात.


पण आत प्रवेश म्हणजे साक्षात देवदर्शनासाठी चढणाऱ्या पायऱ्या वाटत होत्या.
सांत्वना कोण देणार? इथे प्रत्येकाचं लक्ष फक्त रिपोर्टवर, चार्जवर, आणि पुढच्या पेशंटवर.

आम्ही तर अजून शॉकमध्ये होतो…
पप्पांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजनची नळी होती आणि आमच्या चेहऱ्यावर चिंता.
'पैसे किती लागतील?' या प्रश्नाचा अजूनच श्वास घोटणारा ताण.
कोणत्या टेस्ट लागणार, कुठल्या स्पेशालिस्टला बोलावायचं,
हे सगळं फारसं कळत नव्हतं… फक्त स्वाक्षऱ्या करत होतो —
एक कागद, दोन सही, आणि चार आकडे.
बायकोनी माझा हात घट्ट धरलेला होता… तिचे हात थरथरत होते…
डोळे पाणावलेले… पण रडायलाही परवानगी नव्हती.
'तुमचं रक्त कोणतं?'
'डोनर आहे का?'
'अर्जंट काही लागलं तर काय करायचं?'
हे प्रश्न विचारणारे सिस्टरचे शब्द घुसणाऱ्या सुईंसारखे टोचत होते…

शेवटी एकाच विचाराने मनात घुमणारा आवाज
पप्पा बरे होतील ना.

हे सगळ शब्दां पलीकडच,पप्पांना ICU मध्ये नेण्यात आलं.आई ला फोन केला आई लगेच निघाली. आई ला सोडायला शेजाऱ्याचा मुलगा आला होता. आईचा चेहरा बघत नव्हता. खूप काळजी मध्ये होती. आजपर्यंत पप्पांना त्यांनी कधी एकट सोडलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर ती खूप काळजी वाटत होती.

 इकडे"माझं मन अस्वस्थ होतं… इतकं, की श्वास घेणंसुद्धा जड वाटत होतं. त्या हॉस्पिटलच्या गर्दीत मी एकटाच होतो, माणसं हजार होती पण आधार देणारं एकही नव्हतं.
पप्पांना मी कधीच एवढं गंभीर पाहिलं नव्हतं. आजवर कितीतरी वेळा थोडं ताप, कधी खोकला, कधी थकवा — पण काही वेळात सावरायचे.
पण आज त्यांचं न बोलणं, डोळ्यांखालचं काळवटलेपण, आणि डॉक्टरांचा चेहरा… या सगळ्यांनी मनाला खोल आतून हादरवलं होतं.
‘काही तरी मोठं बिनसलंय’ – ही भावना जीव पोखरत होती."


"पण त्या गर्दीत अचानक एक अनोळखी चेहरा ओळखीचा वाटायला लागला… आणि ती सरळ माझ्यापर्यंत आली.
साधीशी साडी, शांत चेहरा, पण डोळ्यांत एक न सांगता येणारं सामर्थ्य होतं — जणू त्या नजरेत आश्वासन होतं.
'मी मदत करते,' एवढंच म्हणाली ती, आणि पुढच्या क्षणाला माझ्या शेजारी उभी राहिली.

ती ‘सुधा मावशी’.
माझं तिच्याशी काहीच नातं नव्हतं. ओळख तर दूरच… पण तरीही, ती माझ्या दुःखाशी जोडली गेली.
वडिलांच्या आजाराचं जे ओझं मनावर आलं होतं, ते जणू अर्धं तिने उचलून घेतलं.

ती न बोलता समजत होती…
पाण्याचा ग्लास पुढे करत होती, आजीला समजावून सांगत होती, आणि माझ्या डोक्यावर हलकासा हात ठेवत होती.
तो स्पर्श… तो स्पर्श म्हणजेच माणुसकी होता."

ती सुधा मावशी पुढचे तीन-चार तास माझ्या सावलीसारखी होती.
फॉर्म भरायला मदत केली, औषधं आणायला गेली, डॉक्टरांशी संवाद साधला.
माझी अवस्था अशी होती की मी काहीच करू शकत नव्हतो.

ती म्हणाली, "मीही अनुभवलेलं आहे हे सगळं… एकटी होते, तेव्हा एक अनोळखी आजी मला आधार देऊन गेली होती.
म्हणाली होती — ‘माणसांत देव असतो’. त्या दिवसापासून मी ठरवलं — कुणाचं तरी सावली होईन."

हे ऐकून माझे डोळे भरून आले. तिचेही आले.
एका क्षणात दोन अनोळखी जीवांची भावनिक नाळ जोडली गेली होती.
थोडा धीर मिळाला.

पप्पांचा चेहरा ICU च्या बाहेरच्या काचेच्या खिडकीतून पाहत होतो.
माझ्या डोळ्यांसमोर ते होते — शांत, हालचाल नसलेले.
चेहऱ्यावर थकवा, तरीही एक परिचयाची ओळख.
वेगवेगळ्या उपकरणांनी त्यांना वेढलं होतं…
ऑक्सिजन मास्क, मॉनिटर, सलाईनचे ड्रिप, आणि अधूनमधून येणारा "बीप" आवाज.

त्या खिडकीपलिकडून डॉक्टर मॉनिटरकडे बघत होते,
पण माझ्याकडे कोणीच पाहत नव्हतं…
माझ्या डोळ्यांत असहायतेची ओल, माझ्या मुठीत ताठारलेली चिंता,
या सगळ्यांना कदाचित तिथं स्थानच नव्हतं.

डॉक्टर काहीच बोलत नव्हते,
एक वाक्यही नाही — की ‘सांभाळून घ्या’, की ‘आशा आहे’.
कुठलाच संवाद नव्हता.
फक्त एक वाट पाहणं… आणि ती घड्याळाची काटा…
प्रत्येक सेकंदाला काळजाचा ठोका चुकवणारा.

तिथं उभं राहून मी देवाकडे नाही,
तर माणसांकडे बघत होतो —
कोणी एक तरी हाक मारेल का, काही सांगेन का,
कोणीतरी एक ‘मी आहे तुझ्यासोबत’ म्हणेल का?

आई मीं बायको सगळे ICU च्या बाहेर आणि सोबत होती मावशी.
ICU च्या दारात उभा होतो, पण माझ्या मनात प्रश्नांची गर्दी होती.
"हे असं अचानक का झालं?"
"आता पुढचं काय?"
"हे सगळं एकट्यानं झेपेल का?"

...पण त्या सर्व प्रश्नांच्या मधोमध, माझ्यासोबत उभी होती एक स्त्री —
नाही कोणतं नातं, नाही जुनी ओळख… पण तिच्या शांत चेहऱ्यावरची ती करुणा,
डोळ्यांतली समजूतदार ओल, आणि कृतीतील नि:स्वार्थपणा…
सगळं काही इतकं देवासारखं वाटलं.पप्पांना ICU मध्ये शिफ्ट केलं जात असताना माझा हात घट्ट पकडून म्हणाली,
"साहस ठेव. बाबा बरे होतील. देव आहेच ना सोबत!"

ती होती — माझ्यासाठी देवाच्या रूपात.

कुठेही मंदिर नव्हतं, नाही घंटानाद, नाही पुजा, नाही गाभारा…
 संध्याकाळची आठ वाजले होते . डॉक्टरने सांगितला आता काळजी करायची गरज नाही. तेव्हा कुठे जीवात जीव आला. शांतपणे. बाजूला बसलो होतो.आणि मग 


संध्याकाळी सगळं स्थिर झाल्यावर मी तिला विचारलं,
"तुम्ही का करता हे सगळं? कोणतं नातं आहे आमच्याशी?"

ती शांत हसली. म्हणाली,
"माझ्या नवऱ्याचं असंच एका अपघातात निधन झालं. तेव्हा मी एकटी होते. हॉस्पिटलमध्ये तीन दिवस मी कुणाशिवाय धडपडत होते.
पण एक अनोळखी वृद्ध बाई तिन्ही दिवस माझ्यासोबत बसली. त्यांनी सांगितलं होतं –
'देव सगळीकडे नसतो, म्हणून त्याने माणसं निर्माण केली.'
त्याचं फळ परत देणं हेच माझं ध्येय झालं आहे."

त्या दिवशी मला देव भेटला…

हो. मला देव भेटला.
ना मूर्तीमध्ये, ना आरतीमध्ये, ना मंदिरात…
तो त्या सुधा नावाच्या बाईच्या रूपात भेटला.

तीची नजर निरपेक्ष होती. तिची कृती नि:स्वार्थ होती.
कोणताही मोबदला, अपेक्षा, ओळख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने तिने माझ्या वडिलांना वाचवण्याच्या धावपळीत साथ दिली.


माणुसकी म्हणजे श्रद्धेचा सर्वोच्च टप्पा

त्या अनुभवामुळे माझ्या श्रद्धेचं रूपांतर 'भक्तीत' झालं — पण ती केवळ देवासमोर नव्हती, ती माणसांपुढे होती.
सध्या श्रद्धा मंदिरात, मशिदीत, विठोबा-पंढरी, मक्का-मदीना यात सापडते.
पण त्या दिवशी मला जाणवलं –
"देव शोधायचा असेल तर संकटात सापडलेल्या माणसाजवळ उभं राहा.
त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या हाकेतून, त्याच्या अश्रूंतून – देव तुमच्याशी बोलेल."


"त्या दिवसानंतर मी बदललो…
जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली.
आता देवासाठी मी मंदीरात नाही जात,
मी देव शोधतो —
रेल्वेत जागा देणाऱ्या तरुणाच्या हास्यात,
दवाखान्यात अपत्याला पाणी देणाऱ्या अनोळखी हातात,
रोजचा रस्ता झाडणाऱ्या सफाई कामगाराच्या मूक समर्पणात.

त्या एका मावशीमुळे आज माझ्या श्रद्धेचा देव
आभाळात नाही,
तर माणसांत भेटतो —
माणुसकीच्या गारव्याच्या रूपानं.



"कधी वाटतं… देव कुठे दूरवर नसतोच मुळी.
तो आपल्या दररोजच्या जगण्यात लपलेला असतो.
सकाळी वेळेवर येणाऱ्या दूधवाल्याच्या जबाबदारीत,
हातातल्या टोपलीतून ओझं उचलणाऱ्या भाजीवाल्याच्या घामात,
तो असतो आजीच्या कुशीतल्या गोष्टीत,
आणि आईच्या न बोलता समजणाऱ्या स्पर्शात…
पण आपण मात्र त्याला शोधत राहतो देवळात, ग्रंथात
किंवा मोबाईलच्या गॅलरीत जपलेल्या देवाच्या फोटोत!"



शेवटी एकच सांगावसं वाटतं…

"देव शोधायचा असेल, तर ओळखीत नव्हे, अनोळखीत शोधा.
तो तुमच्याशी बोलतोय… एखाद्या सुधा मावशीच्या रुपात,
फक्त ऐकण्याची आणि पाहण्याची नजर हवी!"

 एका दिवसाच्या अनुभवाने माझ्या मनात काहीतरी खोल हललं.

आज पप्पा बरे आहेत, पुन्हा पूर्वीप्रमाणे हसतात, बोलतात, पण…

जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलच्या त्या वेळेचा विचार करतो,
तेव्हा पप्पांच्या शेजारी उभं असलेली एक निस्वार्थ सावली आठवते — ‘ती मावशी’.

ती आली, मदत केली, आणि कुठे कुठे हरवूनही गेली.
तीच नाव नाही, मोबाईल नंबर नाही, ओळख नाही…
पण एक नातं राहिलं — माणुसकीचं नातं.

म्हणूच मीं आजही जेव्हा देव शोधतो,
तो मंदिरात नाही,
तर अशा अनोळखी चेहऱ्यांमध्ये शोधतो…
कारण आता मला ठाम माहिती आहे —

देव प्रत्येक ठिकाणी नसतो…
पण जेव्हा कोणी निस्वार्थपणे तुमच्यासोबत उभं राहतं
तेव्हा तो तिथंच असतो… त्या माणसाच्या रुपात.





ती ‘एक दिवसासाठीचा गारवा’ होती… पण त्या गारव्यात माणुसकीचं तप्त ऊब होती,
जी आयुष्यभर उराशी राहील.
 आजही मला ती मावशी आठवते.
कसलंही नातं नाही, ना पूर्वीची ओळख… पण संकटाच्या वेळी ती अनोळखी 'मावशी' माझ्यासाठी धावून आली.
साधा पोशाख, शांत चेहरा आणि डोळ्यांत आपुलकीचं सामर्थ्य.


"मी मदत करते," एवढंच म्हणत ती पप्पांसोबत हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारी उभी राहिली.
औषधं आणणं, जेवणाचा डबा आणणं, डॉक्टर्सशी बोलणं — सगळं ती न विचारता करत राहिली.

आजही जेव्हा आयुष्यात एखादं कठीण वळण येतं,
तेव्हा मी तिची आठवण काढतो –
फक्त तिला नव्हे, तिच्या डोळ्यांतल्या त्या निःस्वार्थ झळाळीला…
ज्यात मला ‘देव’ दिसला होता.


कुणी विचारलं तर म्हणायची, "एकेकाला धरून माणूस उभा रहायला हवा."

तिचं नाव विचारलं तेवढं लक्षात आहे — 'सुधा मावशी'.
ती माझ्यासाठी त्या दिवशीचा गारवा होती… नि:स्वार्थ माणुसकीचा स्पर्श होती.

तिची स्वतःचीही एखादी वेदना असेल, पण ती बाजूला ठेवून ती दुसऱ्यासाठी उभी राहिली.
म्हणून आजही मी देव शोधतो, तेव्हा मंदिरात नव्हे — तिच्यासारख्या माणसांत शोधतो.

मावशी मात्र न बोलता निघून गेली.
तिचा नंबर नव्हता, पत्ता नव्हता…
केवळ रिसेप्शनवर एक चिठ्ठी ठेवून गेली होती – 'कधी ना कधी, कुणालातरी आपल्यासारखा हात द्यावा लागतो... आज माझी वेळ होती.'"

‘ती मावशी’ मात्र एका वळणावर मागे राहिली.

तिचा नंबर नव्हता, तिचा पत्ता नव्हता. फक्त मनात खोलवर रुतून बसलेली ती एक शांत ओळख.

एक दिवस, एका समाजसेवा शिबिरात ती परत भेटली. डोक्यावर पांढरं पदर, हातात औषधांचे पाकीटं. तिच्या मागे तीन-चार पोरी म्हणाल्या —
"ही सुधा मावशी? ही आमच्यासाठी आईसारखी आहे."

आणि त्या क्षणी मला कळलं... ज्याला आपण एक दिवसाचा 'गारवा' म्हणतो,
काही जणांसाठी तोच आयुष्यभराचं ऊबदार छत असतो...

ती फक्त एक मदतीचा हात नव्हती — ती एक संवेदनशील परंपरा होती,
माणुसकीची, ज्याच्यात देव आहे!




आता एकच इच्छा आहे —
कधी मीसुद्धा कोणासाठी असाच गारवा ठरू शकेन का?
कुणाला आधार देता आला, कुणाला थोडंसं हलकं करता आलं…
तर तीच असेल — 'माणुसकीची खरी आरती

रस्त्यावर थांबून कुणाचं सामान उचलणं,
रेल्वेच्या डब्यात कुणाला बसायला जागा देणं,
हॉटेलमध्ये उरलेलं अन्न भुकेल्याला देणं……दवाखान्यात घाबरलेल्या धीर देणं,
एखाद्या आजीच्या हातात आधाराचा हात देणं,
कुणाचं मन गहिवरलेलं असेल तेव्हा फक्त त्याच्या शेजारी शांत बसणं…

या सगळ्या कृती ‘मोठ्या’ नसतात, पण त्या माणूस म्हणून मोठं करून जातात.

"गारवा" म्हणजे दरवेळी काहीतरी भव्य करून दाखवणं नाही,
कधी एखाद्याच्या डोळ्यांत पाणी न येऊ देणंही 'गारवा' ठरतो…

कारण देव शोधायचा असेल, तर तो कुठेतरी ‘दिव्यात’ नाही —
तो असतो एखाद्याच्या ‘हातातल्या उबेत’, आणि आपल्या ‘मनातल्या संवेदनांमध्ये!’


यात देव नाही सापडत, तर गारवा मात्र नक्की सापडतो!"माणुसकीचा आपुलकीचा" गारवा सापडतो.

तुम्ही?
तुमच्यासाठी अशी एखादी मावशी आली आहे का कधी?
की तुम्हीच कुणासाठी ती ‘मावशी’ झाला आहात?"
 माणुसकीचा गारवा. कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा!

सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगढ़








.