सुरेश दरमहा संकष्टीचा उपास करी. त्याचे बघून बारस्कर पती पत्नी मग त्यांची मुलंहीवसंकष्टीचा उपास धरायला लागले. शेजारपाजारी घरात मासे मटण केलेलं असलं की सवगवीच्या कुटूंबात द्यायची पद्धत पाळीत असत . मसुऱ्याची सावतीण माशाची आमटी घेवून बारस्करणीकडे द्यायला आली. तीने आणलेलं भगुलं उघडून बघितल्यावर मामी म्हणाली, “ अग्ये बाय माज्ये, म्हावऱ्याचा कालाण? तसाच ढाकून वापीस घेवन् जा ग्ये बाय . आमचो भाचो इल्या पास्नां आमी घरात माशे, मटान , म्हावरां रांदूचा बंद केलेला हा. आम्ही खावचाच झाला तर भायर हाटेलात जावन खातंव. तो भट हाना ..... तेका चलाचा नाय.....” त्यावर अजाब करीत सावतीण म्हणाली “ पन तुमी भंडाऱ्या ना गो ? नी भाचो भटह्यां कसा काय? ” त्यावर बारस्करीण म्हणाली, “ तेचा कायहा, सुरेशची आवस ही भटीन , ती माज्या घोवाची मानलेली भयण..... आमी गावाक ग्येलाव काय सवताच्या घरासारी सुरेसाच्या घरां जावन् ऱ्हवतंव. शिकाच्या निमतान भाचो हय आसा. उद्या नोकरी धंद्याक लागलो नी लगीन न्हाय पावत हय ऱ्ह्वणार. तंवसर येवडा बिदन पाळायचा आमी ठरवलंव. आताआमच्ये बापये म्हणशी तर घरी आसले काय कायम घेणारे, पण भाचोइल्या पास्ना ह्येनी घरात घेवची दुकू बंद केल्यानी कदी तलफ़ इलीच तर डुटी सपल्यार भायरच्या भायर पियोन दोस्त मंडळीकडे ढकालतात नी सकाळी घरां येतत.... भाचो आमच्याकडे असा पावत आसलाकाय मटान म्हावरां माका हानून द्येव नुको. ”
दोन वर्षे कधी मागे पडली समजलेसुद्धा नाही. परीक्षा झालीआणि अर्ज मुलाखती प्रयत्न सुरू झाले. त्याने प्रायव्हेट कंपनीत इंटर्नल ऑडिटर म्हणून जॉब पत्करला. रिझल्ट लागला, सुरेशने एम. कॉम. ला फर्स्ट क्लास मिळवला. चारपाच महिन्यानी सचिवालयात सिनीयर अकौंटंट च्या पोस्टसाठी त्याचा इंटरव्ह्यू झाला. रामभाऊंचे जोरदार प्रयत्न होते नी सुरेशही व्यवस्थित तयारी करूनगेलेला होता. अपेक्षेप्रमाणे सुरेशची निवड झाली. सुरेशने आपल्या ऑफिसमधल्या गुजराती मुलीशी सूतजमवलं. मुलग़ी घरंदाज आणि कमावती होती. रामभाऊ आणि मामी यानी भाऊंच मन वळवलं . भाऊनी जनापवाद टाळण्यासाठी रजिस्टर लग्न करायचा सल्ला दिला. रामभाऊंच्या बिऱ्हाडा पासून जवळचनवीन बांधकाम झालेलं होतं त्या बिल्डिंगमध्ये सुरेशसाठी दोन रूमची जागा भाड्याने घेतली. पागडीची रक्कममोठी होती. पण भाऊ ही आता चार पैसे बाळगून होते. सुरेश मुंबईला गेला त्यावर्षा पासून कलमांचं चांगलं उत्पन्न सुरू झालं होतं . सुरेशला खोलीची पागडी भरायला चार हजार रुपये लागले . दोनहाजार भाऊनी दिले. रामभाऊंनी निम्मी रक्कम भरली. रूम ताब्यात आल्यावर सुरेशचं रजिस्टर लग्न लागलं. आणि रामभाऊ नव्या जोड्याला आपल्या गाडीतून गावी घेवून गेले. भाऊनी नवीन जोडप्याच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करून गावाला जिलबीचं जेवण घातलं.
नवराबायको दोघं नोकरी करीत असल्यामुळे चार पाच वर्षात सुरेश वधारला. भाऊनी सड्यावरच्या कलमाच्या प्लॉटला दगडी बंधारा घातला. त्यावेळी प्लॉट पासून बेतवार चालीच्या अंतरावर रस्त्याच्यावेळी फोडलेल्या दगड धोंड्यांचे तीन डेपो मारलेले होते ते शाबूत होते. भाऊनी ते राजरोसपणे आणून बंधारा घालायला वापरले. धाकू थकला होता पण बाबल्या अजून दगडाची कामं करीत होता. त्याने बेताबाताच्या मजूरीत सात एकर प्लॉटचा बंधारा पुरा करून दिला. सुरेशला लग्नानंतर जरा उशीराने मुलगा झाला नी मूल बाळगायचा प्रश्न निर्माण झाला. भाऊनी तत्काळ गंगा वहिनीला मुंबईला पाठवून दिली. पुढे वर्षभरातच बागेची व्यवस्था धाकूच्या हाती सोपवून घर बंदकरून तेही मुंबईला मुलाकडे रहायला गेले. वर्षं मागे पडत राहिली. भाऊ निवर्तले त्या वर्षी राजापूर मतदार संघातून हातणकर वकिल निवडूनआले. त्यांच्याशी सुरेशचे चांगले संबंध जुळले. ते मंत्री झाल्यावर एकदा सहज बोलता बोलता नावळे दस्तुरी नाका ते गुरव वाडी व्हाळापर्यंत रस्ता होवूनही गाविक राजकारणामुळे गुरव वाडी, येरम वाडी, मुळमवाडी नी कुंभार वाडी या भागातल्या लोकाना गाडीसाठी पाऊण तास तंगडतोड करून चिवारी चवाठ्या पर्यंत जावे लागत असे. चवाठा ते गुरव वाडी हा पॅच त्यांच्या निधीतून पुरा करायचा विषय सुरेशने त्यांच्या कानी घातला.
नावळे दस्तुरीनाका ते गुरववाडी रस्ता झालेला असूनही गेली चाळीस वर्षं पड आहे ही गोष्ट हातणकराना माहिती नव्हती. त्यानी राजापूरच्या ओव्हरसियरला घेवून स्वत: पहाणीकेली. रस्ता उत्तम स्थितीत होता. शोध चौकशी केल्यावर कागदोपत्री माहिती मिळाली. हरी नळेकराच्या जमिनीऐवजी जरा वळसा मारून पुढे व्हाळावर मोरी बांधून जुन्या सर्व्हे प्रमाणे मंजूर असलेल्या रस्त्याने मांडा पर्यंत साडे तीन किलोमीटर जोड रस्त्याचे काम मंत्री कोट्यातूनकरायचे होते . जुन्या जाणत्याना त्या रस्त्यापायी भाऊंची बरबादी झाली ही गोष्ट माहिती होती. हातणकर साहेबाना हा सर्व इतिहास कळल्यावर त्यानी काहीहीकरून हा रस्ता पुरा करून त्याला भाऊ घाट्यांचे नाव द्यायचे असा निर्धारच केला. त्यानी मुंबईला गेल्यावर सुरेशची भेट घेऊन भाऊंची चौकशी केली . पण भाऊ हयात नव्हते. मंत्री महोदयानी स्वत: लक्ष घालून स्वत:च्या निधीतूनच खर्च करून गुरव वाडी ते चिवारी चवाठा हासाडेतीन किलो मीटरचा जोड रस्ता पुरा केला. रस्त्याचं उदघाटन झालं नी रस्त्याला अनंत उर्फ़ भाऊ घाटे स्मृती पथ असं नाव देण्यात आलं. आता राजापूर ते शिरसे सागवे जाणाऱ्या आणि त्या गावांमधून राजापुरला परतणाऱ्या एस्टी गाड्या नावळे दस्तुरी ते चिवारी चवाठा भाऊ घाटे मार्गे ये जा करतात. प्रदीर्घकाळाने भाऊंच्या माघारी कां होईना त्यांच्या त्यागाची दखल घेतली जावून त्यांचे चिरंतन स्मारक उभे राहिले. (समाप्त)
*******"