"आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद!" - असं म्हणून आपले निरोपाचे भाषण संपवून श्रीपाद जमादार आपल्या जागेवर बसले.
गेले ४० वर्ष आपलं काम इमानदारीन करून अनेकवेळा आपल्या कामाबद्दल आणि इतर गुणांबद्दल बक्षीस, प्रशंसा मिळवणारे. ४० वर्षांपूर्वी ह्या कचेरीत आले पहिल्यांदा तो दिवस अजूनही त्यांना आठवत होता. सगळ्यांच्या ह्यांच्यावर नजरा रोखलेल्या. आणि हे सुद्धा एका बाजूला गुपचूप बसून सगळं न्याहाळत होते. साहेबानी बोलवलं तस आत जाऊन आपलं काम समजून घेतल आणि नेमून दिलेल्या जागी बसले.. कचेरीत लागल्यापासून त्यांनी ऑफिस मध्ये बराच नाव लौकिक कमावला आणि तो सुद्धा काही वर्षातच.. पुढच्या दोन वर्षातच आपल्या चोख कामामुळे बढती मिळून श्रीपादचे श्रीपादसाहेब झाले होते. तस आम्ही घरी भेटायचो तेव्हाही हा एकदम लाख माणूस आहे हे जाणवायचं त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याची नम्रता, मनमिळाऊ स्वभाव सगळं दिसून यायचं. श्रीपाद म्हणजे एकदम दिलदार माणूस.. कुठल्याही अडल्या नडल्याला कसलीही मदत करणारा.. पैशांपासून सगळी..असले तर सगळे मित्रच, शत्रु म्हणून नाहीच. घरी एक नव्वदीला पोहोचलेली आई, बायको, मुलगा इंजिनियरिंगला आणि मुलगी १२ वी. माझ्याघरी आला तरी मनापासून सगळ्यांची चौकशी करणारा.
समारंभ संपल्यावर घरी जाणार तेव्हड्यात पोलिसांची व्हॅन येऊन थांबली.. "श्रीपाद जमादार ..!! " राकट आवाजात इन्स्पेक्टर ने दारावर असलेल्या वॉचमन ला विचारलं, पोलीसपुढ्यात बघून तोसुद्धा थोडा बावरला "हो! साहेब आत मध्ये आहेत" - वॉचमन उत्तरला. दोन कॉन्स्टेबल घेऊन इन्स्पेक्टर समारंभ चालू होता तिथे पोहोचला.. दारात पोलिसांना बघून बोलत असलेल्या मान्यवरांनी आपलं भाषण थांबवलं तस सगळ्यांच्या नजारा दरवाजावर खिळल्या.. इन्स्पेक्टर ने समारंभ चालू असलेला बघून कॉन्स्टेबल करवी निरोप पाठवला.. तसे श्रीपाद त्याच्या पाठोपाठ बाहेर आले.. ते गेलेले पाहून सगळं स्टाफ त्यांच्या मागोमाग बाहेर आला, काय चाललंय कोणालाच काही कळत नव्हतं. सगळे एकमेकांकडे बघत होते.. कुजबुज वाढत होती.. केबिन मध्ये फक्त इन्स्पेक्टर, श्रीपादचे मोठे साहेब, श्रीपाद, दोन कॉन्स्टेबल एवढेच. सगळा स्टाफ केबिनच्या दरवाज्याकडे डोळे लावून बघत होता.. १ तास झाला तरी आतून काही हालचाल नाही, फक्त बोलण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. अखेर दीड तासाने दरवाजा उघडला.. इन्स्पेक्टर बाहेर आला त्याच्या पाठोपाठ मोठे साहेब आणि त्यांच्या पाठून श्रीपाद..पण यावेळी हातात बेड्या होत्या. आणि बाजूने दोन कॉन्स्टेबल त्यांना धरून चालत होते.. काय चाललंय कोणालाच काही कळत नव्हतं.
आता सगळ्यांचे आवाज त्यांच्या गळ्यातच गोठले होते आणि फक्त नजरा हालत होत्या.. पोलीस व्हॅन मध्ये त्यांना घेऊन गेले तस कळलं कि त्यांच्यावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप होता आणि खुद्द हेडऑफीस मधून पोलीस कम्प्लेंट नोंदवण्यात आली होती.. श्रीपाद आणि अफरातफर शक्यच नाही!!..असं होऊच शकत नाही!!.. छे! काहीतरीच असेच सगळे म्हणत होते. अरे देवमाणूस आहे तो!!.. सगळ्यांच्या मनात हेडऑफिसच्या साहेबांविषयी राग भरला होता.. आणि त्या रागाचा कधीही स्फोट होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.. मोठ्या साहेबानी कसबस करून सगळ्यांना शांत केलं.. पण कोणाचाच मन स्वस्थ बसत नव्हतं.. ह्या एवढ्या चांगल्या माणसालाच का हा त्रास..? कधीही कोणाला साधं चिडलेले नाही, कुणावर रागावलेले नाही आणि तरी सुद्धा ह्याच माणसाच्या नशिबी असं का यावं?. सगळेच हळहळत होते.. श्रीपादच्या आईची तब्येत जरा नाजूक असल्याने तिला काही कल्पना दिली नव्हती पण श्रीपादला जरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर पाठवलय एवढंच सांगितलं.. मोठा मुलगा चेतन, छोटी मुलगी सखी आणि बायको मंगल ह्यांना मात्र परिस्थितीची कल्पना दिली होती. घरीही वातावरण एकदम गढूळ झालं होत.. घरावर आलेलं मळभ दूर व्हावं म्हणून त्यांच्या घरच्यासकट ऑफिसमधले सगळेच प्रयत्न करत होते.. श्रीपादच वय लक्षात घेता पोलिससुद्धा त्यांच्याशी जरा नरमाईंनचं वागत होते..
श्रीपाद निर्दोष होते हे खर पण खरा आरोपी सापडल्याशिवाय ह्यांना सोडवता येणार नाही.. हे लक्षात घेऊन ऑफिस स्टाफ आणि श्रीपादचा मुलगा आणि मुलगी असे सगळे मिळून धावपळ करू लागले.. पंधरा दिवस झाले तरी कोणालाच काही सुचत नव्हतं.. कमिशनरची भेट घेऊन सुद्धा काही मदत होईल अशी चिन्ह दिसत नव्हती. सगळेच पुरावे श्रीपादच्या विरुद्ध होते पण "तो" सर्व जाणणारा त्यांच्या सोबत होता आणि श्रीपादची त्याच्यावर प्रचंड श्रद्धा होती.. श्रीपादला त्रास कसलाच होत नव्हता.. जे होतंय ते त्याच्या इच्छेने होतंय मग तोच ह्यातून बाहेरही काढणारच हा त्याचा ठाम विश्वास होता..आणि खरोखरच जादूची कांडी फिरावी तस सगळं घडत गेलं.. हेडऑफिसमधल्या श्रीपादशी जुजबी वैर असलेल्या व्यक्तीने आपणहून येऊन हा गुन्हा केल्याची कबुली दिली.. दोन वर्षांपूर्वी एक टेंडर त्या व्यक्तीच्या वेंडरला मिळवून न दिल्याचा राग दोघांच्याही मनात होता आणि तेव्हा पासून श्रीपादला अडकवण्याचा कट सुरु झाला होता आणि एकदिवस श्रीपादची खोटी सही करून त्यांनी त्याला अडकवल होत आणि त्या व्हेंडरनेच आता ह्या व्यक्तीविरुद्ध कारस्थान करायला सुरुवात केली होती आणि आपण श्रीपादसारख्या देवमाणसासोबत आपण असं करून खूप मोठी चूक केल्याचा त्याला आता पश्चात्ताप झाला होता.. इकडे श्रीपाद बाहेर आला तसा त्याच्या नेहमीच्या दत्तबाप्पाच्या देवळात गेला .. लोटांगण घालून उठला आणि तडक ऑफिसमध्ये गेला सगळ्यांचे आभार मानायला ...
परवा घरी आला भेटायला सहजच तेव्हाही म्हणाला काही त्रास नाही झाला रे! माझ्या दत्तबाप्पाने सगळं सांभाळू घेतल आणि मी देवाला मानत नव्हतो पण त्यादिवशी मात्र माझ्याही नकळत हात जोडले होते. .. श्रीपादच्या श्रद्धेला आणि त्या दत्ताला...
-केतन सावंत