Heart... worldliness and boundaries in Marathi Women Focused by Balkrishna Rane books and stories PDF | दिल... दुनियादारी अन् सीमारेषा

Featured Books
Categories
Share

दिल... दुनियादारी अन् सीमारेषा

दिल... दुनियादारी व सीमारेषा दिवानखान्यात नानासाहेब  व सुलक्षणाबाई बसल्या होत्या.नानासाहेब पेपर वाचत होते.सुलक्षणाबाई पायमोजे विणीत बसल्या होत्या. "बाबा.कॉफी.." सविता टिपाॅयवर कॉफी ठेवत म्हणाली.  "अग,हे काय? रंजना आली नाही काय?" सुलक्षणाबाईनी विचारले.  " आलीय पण मी तिला बागेत झाडांना पाणी द्यायला पाठवलंय." "अग, या दिवसात अशी धावपळ करायची नसते."सुलक्षणाबाई म्हणाल्या. " आई ,मी काळजी घेईन. माझ्या अभयची निशाणी मी जीवापाड जपेन." पाणवलेल्या डोळ्यानी सविता  पुन्हा स्वयंपाकघरात गेली.    सुलक्षणाबाई आपल्या सुनेकडे  पाहत ... सुन्नपणे बसून राहिल्या. सविता तिची सून लग्नानंतर काही काळातच विधवा झाली होती. लग्नानंतर ती किती आनंदात व सुखात होती.पण या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली होती. खरं तर सविता सामान्य कुटुंबातील होती.नानासाहेबांच्या मित्राची मुलगी कोकणातल्या त्यांच्या मूळ गावातली सावंतवाडीतील कलंबिस्त गावाची. पूर्वी जेव्हा  ते गावी जायचे तेव्हा ते आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवायचे.रामचंद्र त्यांचा मित्र साधा शेतकरी पण दोघांची दोस्ती मात्र अफलातून होती. पण नानासाहेब पुण्यात स्थायिक झाल्यानंतर गावी जाणं येणं कमी होत गेलं.पण गावातल्या आठवणी...मित्र ...माणसं .. उत्सव सगळत्यांना आठवायचे.ते स्वतः सैन्यात कर्नल पदापर्यंत पोहोचले होते. त्यांनी अभयला सुध्दा  सैनिक स्कूल मध्ये शिक्षण दिले.तिथे त्यांने उत्तम प्रगती केली.एकोणीसाव्या वर्षी तो एक अधिकारी म्हणून सैन्यात दाखल झाला.आपला व गावाचा वारसा  पुढे चालू राहणार म्हणून नानासाहेबांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी अभयला कलंबिस्तला  देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवीले.खर तर अभय दहा एक वर्षांनी गावी आला होता.त्याला इथं फारसं कुणी ओळखत नव्हत.देवीच दर्शन घेऊन तो त्याच्या काकांकडे जाणार होता. नानासाहेबांनी त्याला रामचंद्रांच्या घरी जाऊन यायला सांगितले होते. काही भेटवस्तू त्यांनी आपल्या मित्रासाठी पाठविल्या होत्या. अभय स्वतःची कार घेऊन गावी आला होता.       पुण्यावरून सावंतवाडी गाठेपर्यंत पहाट झाली होती.सावंतवाडी एका लॉजवर त्याने थोडी विश्रांती घेतली.आंघोळ वैगेरे आटोपून तो तिथून बाहेर पडला.खरतर त्याला पुन्हा सायंकाळी बाहेर पडायचं होतं.त्यामुळे त्याने सरळ प्रथम देऊळ गाठलं. गाडी पार्क करून त्यानें नारळ.. पेढे..आईने दिलेली ओटी...असलेली पिशवी घेतली.तो घाईघाईने तो प्रवेशद्वारातून आत शिरला ...लक्ष नसल्याने तो कुणाला तरी धडकला." देवळासमोर सुध्दा तुम्ही मुलींना मुद्दाम धक्का देतात." अभयने बाजूला बघितले.एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूलाच उभी होती.संतापल्याने तिचा गोरापान चेहरा लाल झाला होता." क्षमा करा माझं लक्ष नव्हते."" हे बहाणे आहेत बरं का? गावातली मुलगी म्हणून मला मूर्ख समजू नका."" खरच सांगतो...हे चूकून झालं." अभय ओशाळत म्हणाला.पण ती काही न बोलता तरातरा चालत देवळात शिरली. अभय स्वतःवरच चिडत देवळात शिरला.त्याने पुजार्याला आपण का आलो ते सांगितले.देवीसमोर नारळ व पेढे ठेवले.ओटी पुजार्याजवळ दिली. मघाची ती तरुणी देवीला प्रदक्षिणा घालत होती.तिचा साधेपणा... त्याला आवडला.सगळं आटोपल्यावर त्याने पुजाऱ्यांना विचारलं..." काका, रामचंद्र राऊळ  यांच्या घरी कसं जायच?बर्याच वर्षांनी आल्यामुळे लक्षात नाही येत."खरं तर अभय हे बोलत असताना त्या तरूणीने त्यांच्याकडे चमकून पाहिलं होतं." रामाकडे जावचा हा? त्याचा चेढू हयच असा.गो सविता ह्यांका तूझ्या घराकडे जावचा हा.घेऊन जा त्येंका."" मी यांना ओळखत नाही. का हो कोण तुम्ही? तुम्ही मुद्दामहुन तर हे विचारत नाही ना?" तिने तिरसटून विचारले.अभयला राग आला नाही पण तो मनातल्या मनात हसला.आपल्या वडिलांच्या मित्राची मुलगी आपल्यासमोर उभी आहे.देवळाच्या आवारात प्रवेश करताना तो तिला धडकल होता.या योगायोगाचे त्याला नवल वाटलं." हे बघा ,मला फक्त तिथे कसं जायचं ते सांगा .मी जाईन तिथे."" पण का? तुम्ही बाबांना कसं ओळखता?"" मी पुण्याहून आलोय.त्यांच्या बालपणीच्या मित्राने त्यांना काही भेट पाठवलीय ती द्यायची आहे.एवडच!"सविताने त्याला रस्ता सांगितला.त्याला विचारायचं होतं तू का येत नाहित माझ्या सोबत?पण त्याने ते टाळले.तिचा गैरसमज झाला असता शिवाय एक तिखट उत्तरही त्याला मिळाले असते. तो रामचंद्रांच्या घरी पोहचला.त्याने आपली ओळख सांगितली.रामचंद्र खूष झाले.आपला मित्र अजूनही आपल्याला विसरला नाही हे पाहून ते गहिवरले.चहा -पाणी चालू होत तेवढ्यात अंगणात सविता आली.त्याला चहा पिताना बघून तिने नाक मुरडल." सविता, हा आपल्या नानांचा पोरगा . लहानपणी तुम्ही दोघं एकत्र खेळत होता. मिलीटरीत अधिकारी आहे."" मी यांना देवळात भेटलोय. यांनीच रस्ता सांगितला मला."अभय मिस्किल हसत म्हणाला." मग चालत का आलीस? यांच्या बरोबरच यायचं ना!"रामचंद्र म्हणाले.सविता लाजतच घरात पळाली.त्या दिवशी पुण्याला परतताना अभय स्वतःला हरवून गेला होता.राहून - राहून त्याला त्याचा गाव व सविताचा चेहरा आठवत होता. एक अनामिक हुरहुर त्याला लागली होती.तो सहा महिन्यांनी पुन्हा गावी गेला.आता सविता त्याच्याशी सहजपणे वागत होती बोलत होती.त्यांच्या गुजगोष्टी सुरु झाल्या.अखेर अभयने नानासाहेबांना सरळ सांगितलं की त्याला सविता पत्नी म्हणून आवडेल.तो जणू नानासाहेबांच्या मनातलं बोललात होता.त्यांनी लगेच होकार दिला.आणि दुसर्याच महिन्यांत त्यांचं लग्न झालं.सविता त्याची पत्नी बनून पुण्यात आली.आपल्या वागण्याने तिने सर्वांना आपलसं केलं.पण दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर तो पुन्हा सैन्यात रजू झाला. सविता गर्भवती झाली होती.सगळेच आनंदले.तिने अभयला कळवले. तो तर आनंदाने वेडापिसा झाला. पण आठ दिवसांत बातमी आली अतिरेक्यांशी लढताना अभय व त्यांचे दोन साथीदार शहीद झाले.सविताचा सारं आयुष्य उजाड झाल.स्वप्नांची राख रांगोळी झाली. तिनं स्वतःला संपवलं असतं.पण तिच्या उदरी अभयच वंश वाढत होता. अभयच पार्थिव शरीर आलं तेव्हा ती कोरड्या डोळयानी फक्त पाहत राहिली.जणू तिचे अश्रू थिजले होते.ती रडावी म्हणून सारे प्रयत्न करत होते .पण ती अबोल झाली.आज नऊ महिने ती त्याच अवस्थेत जगत होती.        आज सुलक्षणाबाईंना सविताकडे पाहून हे सारे आठवले." बाई, कोणीतरी बाहेर आलय.आपण अभय असल्याचे सांगतोय." त्यांच्याकडं काम करणारी रखमा घाईघाईने येत म्हणाली.ती घाबरली होती व थरथरत होती." काय?" एकाच वेळी नानासाहेब व सुलक्षणाबाई ओरडल्या." बाहेर थांबलेत ते."नानासाहेब व त्या पाठोपाठ सुलक्षणाबाई  बाहेर आल्या.समोर एक व्यक्ती उभी होती.त्याचा चेहरा अतिशय विद्रूप व जखमांच्या खुणांनी भरलेला होता.शरीर कृश होते.पण डोळ्यात विलक्षण चमक होती." आई ,बाबा..." तो पायांना स्पर्श करण्यासाठी वाकला." थांब.. तू ..तू कोण आहेस? तू अभय नक्कीच नाहीस."नाना कठोरपणे म्हणाले. त्याचा आवाजही वेगळा व कष्टाने बोलल्यासारखा वाटत होता." मी...मीच अभय आहे. सविता कुठे आहे?"तेवढ्यात सविता गडबड ऐकून बाहेर आली.समोरच्या व्यक्तीला बघून ती संतापली." हे बघा, तुम्ही जे कोण आहात ते निघून जा.आमच्या भावनांशी खेळु नका....जा म्हणते ना..जा.."ती व्यक्ती डोळ्यातले अश्रू पुसत गुपचुप माघारी वळली.पण त्यानंतर घरातलं सगळं वातावरणच बिघडलं.जणू जखमेवरची खपली कुणीतरी काढली होती व रक्त भळाभळा वाहव तसं. संध्याकाळपर्यंत कुणीच बोलत नव्हते.सायंकाळी रखमा परत संबंधितांकडे आली. तिच्या मुठीत एक कागद होता.तिने तो कागद संबंधितांकडे दिला." वहिनी, सकाळच्या माणसाने ही चिठ्ठी दिलीय.म्हणाला एकदा वाचा ,असायची शप्पथ आहे."इच्छा नसताना सविताने चिठ्ठी उलगडली.समोरच अक्षर तिला ओळखीचं वाटलं.ते...ते अक्षर...अभयच होत.प्रत्येक अक्षराच वळण थेट असायच्या अक्षरासारख होत. तिने धडधडत्या हृदयाने वाचायला सुरुवात केली. प्रिय सावी,सावी...सावी...या नावाने तिला फक्त अभय हाक मारायचा. तिने पुढे वाचायला सुरुवात केली.............तुझ्या मधुर आठवणी घेऊनच मी पुन्हा बॉर्डरवर रूजू झालो.देहाने मी तिथे होतो. डोळ्यात तेल घालून सीमेच रक्षण करत होतो.पण...पण..मन तुझ्या भोवती घुटमळत होत. घरातून निघण्याच्या आदल्या रात्री तू जे गाणं म्हणाली होतीस ते माझ मन परत परत म्हणत होतं." या डोळ्यांची दोन पाखरे...फिरतील तुमच्या भोवतीपाठलागही सदैव करतील असा कुठंही जगती."मी तूझ्या आठवणीत तूझ्या प्रेमात आकंठ बुडालो होतो.ज्या दिवशी तू मला ती बाबा होण्याची गोड बातमी दिलीस त्यावेळी मी तूला वचन दिले होते...की त्यांच्या जन्माच्या वेळी मी तूझ्या जवळ असेन...आठवतेय ना तूला? पण त्याच दिवशी सायंकाळी मी व माझा साथीदार सीमेवर गस्त घालत असताना कुणाची तरी चाहूल आम्हाला लागली.यावेळी आम्ही दोघं चौकी पासून थोडे दूर होतो.आम्ही पोझीशन घेतली....तिघे पाक अतिरेकी दबकत दबकत आपल्या हद्दीत घुसत होते.मी व माझ्या साथिदारानेअचूक नेम साधत त्यातल्या दोघाअतिरेक्यांना कंठस्नान घातलं पण तिसरा पळाला त्याचा पाठलाग करण्यासाठी आम्ही धाव घेतली.पण पळणार्याचा  आणखी एक साथीदार घात लावून  लपून बसला होता.जो आम्हाला  दिसला नव्हता.अचानक  त्याने हातबॉम्ब फेकला.माझा सहकारी व दोन्ही अतिरेक्यांच्या  शरीराच्या चिंधड्या  उडाल्या.मी प्रसंगावधान राखत बाजूला झेप घेतली. पण बाॅम्बचे छोटे-छोटे तुकडे माझ्या चेहर्यात....गळ्यात व छातित घुसले.रक्तबंबाळ झालेला मी भान विसरून...हरहर महादेव...शिवाजी महाराज  की जय अस ओरडत  मी त्या पळणार्या अतिरेक्यांचा पाठलाग करत सुमारे  अर्धा किलोमीटर पाकिस्तानच्या हद्दीत  घुसलो.पळणार्या दोघांचा मी अचूक वेध घेतला.ते दोघे अतिरेकी खाली कोसळले. त्या क्षणी माझ्या हातातली रायफल खाली पडली.असंख्य इंगळ्या डसल्यासारख्या वेदना चेहर्यावर होत होत्या. गळ्यातून....छातीतून रक्ताचे ओघळ वाहत होते.एका क्षणी शरीराने जाणिवेची साथ सोडली .मी खाली कोसळलो.          खर सांगतो सावी...बेशुध्द पडण्याअगोदर...फक्त  तूझा चेहरा डोळ्यात होता.शुद्धीवर आलो तेव्हा मी एका अंधार्या ठिकाणी होतो.डोळे उघडून मी समोर बघितल.एक पंधरा- सोळा वर्षांची मुलगी काहीतरी विणीत बसली होतीबोलण्यासाठी मी तोंड उघडले पण आवाज बाहेर पडेना. खुणा करण्यासाठी हात उचलण्याचा प्रयत्न केला पण हातही हलेना."अब्बाजान....भैय्या को होश आया..." ती आनंदात ओरडली.आवाजावरून मला एवढंच कळल की ती मुलगी पाकिस्तानी होती.म्हणजे मी सीमेलगतच्या कुठल्यातरी पाकिस्तानच्या गावात होतो." नौजवान कस वाटतय...?होईल आवाजही ठिक होईल. " एक प्रौढ इसम माझ्याजवळ उभा राहून मला विचारत होता." तू खराखुरा सैनिक  आहेस. तूझ्या जागी दुसरा असता तर रिकव्हर झालाच नसता..चक्क पाच महिने तू कोमात होतास..."" तू इथे कसा आलास हा प्रश्न तूला सतावत असणार नाही?तू आला नाहीस...तूला आम्ही  इथे आणलं."त्याने मला सारी हकीकत सांगितली. तो इसम म्हणजे डॉ. उमर अली होता.पूर्वी तो लाहोरच्या हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून  कार्यरत होता.पण तिथल्या दबावाला कंटाळून त्याने नोकरी सोडली व गाव गाठला.कारगील पासून थोड्या अंतरावर पहाडात त्याचा गाव होता.पहाडातल्या औषधी वनस्पतीवर तो संशोधन करत होता.त्या दिवशी तो व त्याची मुलगी साना औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी पहाडावर आले होते.स्फोटाचा...गोळ्यांच्या आवाज ऐकून ते पुढे आले. मला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघून त्यानी मला उचललं व आपल्या घरी आणलं.हे सगळ त्यांच्यासाठी धोकादायक  होत.कुणाला जराही शंका आली असती की एक हिंदूस्थानी सैनिक त्यांच्या घरात आहे..तर त्यांच्या घरावर त्वरीत वरवंटा फिरला असता. त्याना देशद्रोही ठरवून गोळ्या घातल्या असत्या." अरे तूझ्या शरिरात बाॅम्बचे असंख्य तुकडे घुसले होते.ते त्वरीत काढणे गरजेचे होते....नाहीतर  विष शरीरभर पसरलं असत...मी ते तुकडे काढले ...सर्जरी केली.पण तूझ्या शरीरातून प्रचंड रक्त गेल होत ..रक्त देणं गरजेचं होत .मी बाहेर कुठे ते शोधू शकत नव्हतो. नशिब बलवत्तर होत...मेरी बेटी साना आणि  तूझा ब्लडग्रुप एकच निघाला...गेल्या पाच महिन्यात तिने तीन वेळा तूला रक्त दिलंय.. तिच्याच मेहनतीच हे फळ आहे की तू कोमातून बाहेर आलास....तूला फूसून  काढणं...कपडे बदलणे...मसाज करणे हे सार तिनेच केल बर का? और हां... तूझा चेहराही प्लास्टीकसर्जरीने ठिक होईल.. आवाजही व्यवस्थित होईल.तुमच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये हे करता येईल."  मी कृतज्ञतेने सानाकडे बघितल. एक पाकिस्तानी डॉक्टर  व त्याची मुलगी  माझ्या काळजी एक माणूस म्हणून...एक पेशंट म्हणून  घेत होते की त्याही पलिकडे काही अनामिक नात आमच्यामध्ये तयार झाल होत? कुणाच्या लक्षात येवू  नये म्हणून त्यांनी मला अंधार्या ..अरूंद माळ्यावर ठेवलं होत.एका हिंदुस्थानी सैनिकांला पनाह देण्याचे परीणाम काय होतील हे ते जाणून होते.पुढच्या पंधरा दिवसांत दोघांनी माझ्यासाठी खूप कष्ट  घेतले.चांगले अन्न पोटात गेल्याने अशक्तपणा कमी झाला..आवाज परत आला. ...पण स्वरयंत्राला धक्का बसल्याने माझा मूळ आवाज गेला होता..पण मी बोलू लागलो होतो. ..चालू लागलो होतो.असच एकदा बोलता-बोलता डॉ.अली म्हणाले.." माझे वडील मला आपल्या हिदुस्थानमधल्या आठवणी सांगायचे.ते म्हणायचे फाळणीनंतर एक सीमारेषेने...दोन मुल्क वेगळे केले नाहीत तर दिलही वेगळी केली...नफरत का जहर दिलमे घौल दिया...त्याना हिंदूस्तानतल आपल घर ..मोहल्ला..गाव आठवायच.. कधी कधी दोस्तांच्या आठवणींनी गहिवरायचे....रडायचे.ते म्हणायचे बेटा, ...कधी संधी मिळाली तर हे जहर कमी करण्याचा प्रयत्न कर. पण  इथे तर तरूणांना भडकावल जातंय.. धर्माच्या नावावर त्यांचा ब्रेनवॉश केला जातोय..असाच एक कॅम्प...याच पहाडात  चालवला जातोय...धर्म के नामपर गोळ्या चालवताहेत  हे लोक."  हे सांगताना ते भावनाविवश झाले होते.मी जेव्हा हिंदुस्तानात परतण्याची ईच्छा व्यक्त केली तेव्हा  ते म्हणाले..." हे खूपच कठीण काम आहे. तूला सीमापार करण्यात खूप तयारी  करावी लागेल. जराही चूक झाली तर आपण सगळेच मारले  जावू. पण तूला इथेही ठेवू शकत नाही. तूझा शिवाजीराजा म्हणायचा की योग्य नियोजन केल तर सगळं शक्य आहे. ते तर आग्र्याहून कितनी आसानीसे निसटले होते."मी थक्क  झालो.डॉ.अलींनी आपली बुध्दी ...आपली प्रतिष्ठा ..पैसा पणाला लावला.त्यांच्या घरातून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा सानाने स्वतः विणलेल्या दोन काश्मिरी शाली व लाखे पासून तयार केलेल्या  सुंदर लाल व हिरव्या रंगाच्या बांगड्या असलेली पिशवी माझ्या  हाती दिली. " अग हे काय? आधिच तू  माझ्यासाठी बरंच काही केलंस.. आणि  आता..."" ये भाभी के लिये और ये छोटी शाॅल आनेवाले ....बच्चे  के लिये.."मला काय बोलावे ते कळेना.मी एकदा बोलताना तिला तूझ्याबद्दल व आपल्या बाळाबद्दल बोललो होतो आणि तिन माझ्या नकळत ही तयारी केली होती." बोल देना सानाने दिये है...."मी तिच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणालो.."कुठच्या जन्मीच आपल नात आहे कुणास ठाऊक..तूझ रक्त माझ्या धमन्यांमधे वाहतय. बहिणी तूझं पुढचे आयुष्य सुखाचे जावो....तू सतत आनंदी राहाविस...दुःखाचा एक क्षणही तूझ्या आयुष्यात  न येवो. "  मी कसाबसा बोललो.माझ अंतकरण भरून आल होत.तिही रडत होती.त्या रात्री मी तिथून बाहेर पडलो.डॉक्टरही सोबत होते. त्यांनी मला अलगद पंजाबच्या हद्दीत  घुसवल. सार ठरवल्याप्रमाणे पार पडल होत.आणि आज मी तूमच्यासमोर हजर झालो होतो.खर म्हणजे मला प्रथम आर्मीत रिपोर्ट करणे गरजेचे होते.पण मी तूझ्या काळजीने घरी आलो. मला तूम्ही ओळखू शकला नाही. तुम्ही   मला स्विकारल असत तरी लोक संशयाने पाहणार होते. सावि...तूझ्या मनाचं पावित्र्य अबाधित राहव असच मला वाटत.वाईट एवढंच वाटत नवरा जीवंत असूनही तूला विधवेचे जीवन जगाव लागतय. तू सुखी अन्  हसतमुख राहाविस हिच माझी इच्छा आहे.आज तूला डोळे भरून पाहिलं अन् मला सार मिळाल.    तूझा अभय.हे पत्र वाचताच सविताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले.ती पत्र घेऊनच नानासाहेबांच्या खोलीत गेली." बाबा...गाडी काढा....तो अभयच होता....त्याला शोधायचय  ..चला...."नानासाहेबांनी कार बाहेर काढली.सारेच बाहेर पडले.वाटेत रडतच सविता ने सारी कहाणी सर्वांना ऐकवली." खरच त्या पाकिस्तानी डॉक्टरचे व त्याच्या मुलीचे आपल्यावर अन॔त उपकार आहेत. पण हा कुठे सापडेल.?"नानासाहेब म्हणाले."बाबा तो कदाचित रेल्वे स्टेशनवर असेल. तो आपल्या यूनिटला रिपोर्ट करायला जाणार अस वाटत."  सारे स्टेशनवर पोहचले.सविताची नजर सर्वत्र भिरभिरू लागली. अखेर तिला अभय दिसला.एका बेंचवर डोळे  मिटून तो बसला होता. सविता गर्भार अवस्थेत असूनही जवळ- जवळ धावतच  तिथे पोहचली.अभयला गच्च पकडत स्फुंदत रडू लागली.अभय दचकून उठला. "सावि..हे काय?"" मी स्वतःला  तूझी पत्नी...प्रेयसी समजते पण मी तूला ओळखू शकले नाही..चेहरा बदलला...आवाज बदलला तरी अंतरीचा खूण पटली पाहिजे  होती ना?"" अग मी  त्याची आई त्याला ओळखू  शकले नाही .... तर तूझा  काय दोष?" सुलक्षणाबाई म्हणाल्या." चला सगळं  मळभ दूर झाल घरी जावूया." नानासाहेब म्हणाले. " बाबा.. मला पहिल्यांदा आर्मीत रिपोर्ट करावा लागेल.ते माझ्या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.शिवाय ही माहिती सध्या गुप्त ठेवावी लागेल."" अभय तू मला वचन दिल होतस...बाळाच्या जन्मावेळी मी तिथे असेन म्हणून...डॉक्टरनी परवाची तारीख  दिलीय.. तूला आता यावच लागेल....चल..."  सविता त्याला उठवत म्हणाली.अभयने तिच्याकडे पाहिले.साविच्या कपाळावर ठसठसीत कुंकु होत...सानाने दिलेली शाल तिने पांघरली होती...व त्या लाल हिरव्या रंगाच्या लाखेच्या बांगड्या तिने हातात घातल्या होत्या. खरच सवि.. अतिशय सुंदर व प्रसन्न दिसत होती.-------------------समाप्त----------------------कथा काल्पनिक आहेबाळकृष्ण सखाराम राणे. सावंतवाडी. 8605678026.