Bhramanti Sindhudurgachi - 3 in Marathi Travel stories by Balkrishna Rane books and stories PDF | भ्रमंती सिंधुदुर्गाची - 3

Featured Books
Categories
Share

भ्रमंती सिंधुदुर्गाची - 3

भ्रमंती सिंधुदुर्गाची ३आंबोली  आंबोलीला कधी जावे असा प्रश्न बरेचजण विचारतात. मी त्यांना सांगतो कधीही जा ,आंबोली सतत नितांत सुंदर असते.पण प्रत्येक मौसमात तिचे रंग ढंग वेगळे असतात.आंबोलीचे हे बदलते रुप बघण्यासाठी आपल्याला तिन्ही ॠतूत जावं लागतं.पावसाळ्यात आंबोली ओलेत्या सुंदर स्त्री सारखी दिसते.हिवाळ्यात ती शरदाच्या शितल चांदण्या सारखी भासते.उन्हाळ्यात ती सुखद गारवा देणार्या चैत्रपालवी सारखी सामोरी येते. आंबोलीत बघण्यासारखं काय आहे? तर अख्खी आंबोली डोळ्यात किती साठवली तरी पाऱ्या सारखी निसटून जाते.नावच घ्यायची झाली तर कावळेसाद ,महादेव गड दर्शन पॉईंट, हिरण्यकेशी नदीचा उगम, नांगरतास धबधबा, फॉरेस्ट गार्डन व तिथली फुलपाखरांची बाग,पूर्वीचा वस, मोठा धबधबा,बाबा धबधबा (खासगी जागा).मी आंबोली अनेकवेळा पाहिली आहे.पण प्रत्येक वेळी ती नव्याने कळली...जाणवली. इथला निसर्ग..इथली हवा..इथले धबधबे...हिरवाई तुमच्याशी कुजबुजते.शेकडो वर्षांच्या काल प्रवासाची जाणीव करून देते.सावंतवाडी तालुक्याचा सोनपिवळा मुकूट म्हणजे आंबोली होय.     दाणोलीच्या झरबाजाराकडूनच  आंबोलीचा  परिसर सुरू होतो.वळणा वळणाचा रस्ता ... डाव्या बाजूला दरी उजव्या बाजूला उत्तुंग शिखरे .प्रत्येक टप्प्यावर दृश्य बदलत जाते. कधी हिरवीगार आंबोली पिवळट उन्हात चमकताना दिसते. कधी धुक्याच्या चादरीआड लपलेली शिखरे...तर मध्येच ढगाने भरलेली दरी...कधी आपण स्वतः या ढगातून जात असतो. कधी कधी चार ते पाच फुटांवरच दिसत नाही एवढं दाट धुके असत.  कधीतरी वाटतं कालिदासाने मेघदूत आंबोली तून तर लिहिलं नसेल? ( एक वेडी कल्पना)धुक नसेल तर तुम्हाला उजव्या बाजुला मधेमधे झेपावणारे धबधबे....काळ्या कातळावर लोंबकळणार्या वेली...त्यावर डोलणारी इवलाली फुले पाण्याच्या संतत धारेने चिंब भिजून शहारताना दिसतात. उजव्या बाजूला खोल दर्या टेकड्या..त्यातून डोकवणारी छोटी घर...नजरेत भरतात. आंबोलीच्या पायथ्याची गावे...पारपोली कलंबिस्त..वेत्ये नजरेस पडतात.  मी पहिल्यांदा सरळ  चौकुळ गाठलं. निसर्गरम्य ...स्वच्छ व प्रसन्न  चौकुळ पार करत मी बाबा धबधब्याच्या दिशेने निघालो .चौकुळ पासुन चौदा एक किलोमिटरवर उजव्या बाजूला वळल की बाबा धबधब्याकडे जाता येत.रस्ता तीव्र वळणाचा..व ओघवत्या उताराचा आहे. पुन्हा एक उजव वळण घेतल्यावर कच्चा रस्ता  लागतो. इथे आगमन फी द्यावी लागते.बाबासाहेब कुपेकरांच्या खाजगी जागेत ओळीने चार धबधबे आहेत.( यावरूनच बाबा नाव पडल असाव?)पण रस्ता अवघड आहे. उंच दगडी कडे ...त्याखाली गुहेसारखा वक्राकार भाग...त्यात शंभरएक माणस सहज मावतील एवडा मोठा!कड्यावरून अनाम ओढीने झेपावणार पाणी...दगडांवर आपटूनही शुभ्र फुले उधळत होत.इथे कांटा(जळू) आपला प्रसाद काही जणांना देतात.पण या अस्पर्श...गर्दीरहित..घनदाट ठिकाणी एकांत व शांतता याचा दिव्य अनुभव येतो हे मात्र खरे. परतीच्या वाटेत मी पुन्हा आंबोली गाठली.दोन वाजले होते....भूक जाणवत होती. माश्यांची कढी..तांदूळाची लुसलुशीत भाकरी ..भात..तृप्त होत मी काही क्षण विसावलो. नंतर मोर्चा कावळेसाद ठिकाणाकडे वळवला. खोल दरी ..धोंगावणारा वारा...गर्द झाडे डोईवर मिरवत उभ्या ठाकलेल्या टेकड्या....धुक्यात बुडलेली त्यांची शिखरे...समोर दिसणारे...दोन धबधबे..माहौल जबरदस्त  होता.भावसमाधी लावून इथ बसाव अस वाटत होत.समोरच दृश्य बघताना निसर्गाच्या समोर आपण किती खुजे आहोत हे जाणवत होत.इथून हलूच नये अस वाटत होत.पण वेळच बंधन होत.तिथून वळतो न वळतो तो शिखरांवरच धुकं माझ्यापर्यंत पोहचल.साडे- तिनलाच अंधारल..थोड पुढे आलो तो पुन्हां स्वच्छ ऊन पडल.निसर्ग क्षणा क्षणाला रंग बदलत होता.मी बेळगाव रस्त्याने नांगरतास धबधबा गाठला. हा धबधबा जमिनीवरून जमिनीच्या गर्भात शिरतो.शतकांच्या जोरदार झोतीने जमिनीत विवर तयार झाले आहे.त्यात पाणी रोरावत पडते.हा धबधबा पाहताना थोडी भीती वाटते. आता रेलिंग केलीयत. सकाळी व संध्याकाळी इथे विलक्षण देखावा दिसतो.झेपावत उड्या मारणाऱ्या पाण्याचे जे तुषार उडतात त्यातून पलीकडे  हवेत इंद्रधनुष्य दिसतो.फक्त ऊन असलं पाहिजे .मी पुन्हा मागे येत हिरण्यकेशीच्या दिशेला वळलो.पुन्हा  गर्द धुकं व हलका पाऊस सुरू झाला. पुढे जाव की नको याचा विचार करत होतो तोच धुकं ओसरल पाऊस  थांबला. हिरण्यकेशीचे चढ पार करत मी  हिरण्यकेशी  गाठली. सोनेरी केसांसारखा प्रवाह धारण करणार्या हिरण्यकेशीचा उगम इथे गाय मूखातून होतो.पवित्र अश्या या स्थळी अस्थी विसर्जन करतात.गायमुखातून पडणार्या पाण्याने भरलेल्या तळ्यात..हिरण्यकेशी हा दुर्मिळ मासा सापडतो. सोनेरी रंग पिवळे -लाल पंख व सुंदर रचना असलेल्या माश्याचे संशोधन व नामकरण  तेजस ठाकरेने केलय. या परीसरात हवा गार असल्याचे जाणवते.इथे शिवरात्रीला मोठी जत्रा भरते.सध्या इथ येता जाताना नाना रंगाची व ढंगांची फुल दिसतात.   उतरून आंबोलीत येतो तर पुन्हा  पाऊस!..अशी ओलेती आंबोली पाहणे एक आगळा अनुभव असतो.पण थोड अंतर पार केल तोवर पाऊस थांबला. खुश होत मी महादेवगड पॉईंट गाठला . उन्हाळ्यात इथून सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य दिसते .इथे उतरणार एवड्यात रिमझीम पाऊसधारा सुरू झाल्या. झाड पाण्याने निथळत होती..हवा कुंद व धुंद झाली होती.या गहिर्या वातावरणात  आंबोली काहीतरी कुजबुजतेय अस वाटल.जोरदार पाऊस होता.इथून खालचा परीसर हिरवा गालीचा घालण्यासारखा दिसत होता. पाऊस थांबेना त्यामुळे मागे वळलो. वाटेत तांबूस तपकिरी रंगाची लांडग्यांनी जोडी दिसली.माझी चाहूल लागताच चपळाईने झाडीत नाहिशी झालीत.ते एवढे देखणे व तरतरीत होते की  नजरेच  समाधान झाले.खरतर हे दृश्य विरळ पण मी भाग्यवंत म्हणून मला ते दिसले. मूळ रस्त्यावर येऊन फॉरेस्ट गार्डन मध्ये गेलो.आता मस्त उजाडलं होत . सूर्य डोकावत होता. आज गार्डन मध्ये कोणच नव्हतं. मी फुलपाखरांच्या बागेत गेलो.दरवाजा फुलपाखराच्या आकाराचा व रंगवलेला होता.आत छान पायवाटा होत्या पण त्यांची देखभाल नव्हती.लाकडी फळ्या एकतर तुटल्या होत्या किंवा तुटायला आल्या होत्या.सुरुवातीला एखादं दुसर फुलपाखरु दिसत होतं. पण नंतर तुतीच्या पिवळ्या व घाणेरीच्या लाल - पिवळ्या व जांभळ्या तुर्यासारखी फुले असलेल्या रोपांच्या फुलांवर असंख्य फुलपाखरं बागडताना दिसली.लहान मोठी वेगवेगळ्या रंगांची इवलाली फुलपाखरं बघून मन फुलपाखरु झाले होते.ब्रम्हदेवाच प्रतिक असलेली ही फुलपाखरे फक्त पंधरा दिवस जगतात.पण सतत आनंदाने नाचत बागडत असतात.प्रत्येक क्षण जगण्यातला आनंद टिपत मस्त जगावं असं ती शिकवतात.आंबोली ही सावंतवाडी संस्थांची उन्हाळी राजधानी.महात्मा गांधी सावंतवाडीत आले होते तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था आंबोलीत केली होती. आंबोलीत हे घनदाट जंगल जैवविविधतेचे भांडार आहे.इथे आपण अजून न बघितले प्राणी व वनस्पती कितीएक असतील सांगता येत नाही.  पुन्हा पूर्वीचा वस मंदिराकडे येईस्तोवर दाट घुकं पसरल..पुन्हा चार पाच मिनीटातच रस्ता मोकळा  झाला. मुख्य धबधब्याकडे येईस्तोवर पुन् विरळ धुकं पसरल.आज निसर्ग गंमत करत पाठशिवणीचा खेळ  खेळत होता.त्या विरळ धुक्यात उत्तुंग कड्यावरून सहस्र धारांनी कोसळणारा तो पाण्याचा पांढरा प्रपात ...मती गुंग करत होता. त्या धारांसमवेत मन थुईथुई नाचायला लागल.मी पहिल्यांदाच एवड्या वर्षांत पायर्या चढून वर गेलो.धबधब्याच्या थंडगार पाण्यात पाय बुडवले.खाली उतरून कुरकुरीत भजी व गरम चहाचा आस्वाद  घेतला.यावेळी बाहेर संथ पाऊस  सुरू झाला होता. मी प्रत्येक वळणाला सामोरं जात सावंतवाडीच्या दिशेने निघालो.काळोख होत आला होता.घाटात वाहनांच्या दिव्यांची एक सरकती रांग दिसत होती.खाली खोर्यात घरातले असंख्य दिवे लुकलुकत होते.जणू आकाशातल्या तारका खालच्या दरीत उतरल्या होत्या व फेर धरून नाचत होत्या.बाळकृष्ण सखाराम राणे सावंतवाडी 8605678026