भ्रमंती सिंधुदुर्गाची२ कविलगाव ते वालावल खाडी दुपार टळून गेली होती.सव्वा तीनला घरातून बाहेर पडलो.कुठे जायचे ठरले ते नव्हते.मनाला ओढ होती भटकण्याची.सरळ कुडाळच्या रस्ता पकडला.कविलगावच्या साईबाबांच्या मंदिराबद्दल ऐकले होते पण जायचा योग आला नव्हता. भारतातलेच नव्हे तर संपूर्ण जगातले पहिले साई मंदिर आपल्या सिंधुदुर्गात असूनही आपण ते बघितलं नाही ही थोडी लाजीरवाणी गोष्ट होती.कुडाळ रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे कुठेतरी ते आहे एवडच माहित होते. गाडी वळवली रेल्वे स्टेशन गाठले. डावीकडून एक रस्ता जातो तिथून उजवीकडे वळलो.रेल्वेब्रीज ओलांडले.तिथेच एक आडवा रस्ता जात होता. नेमकं डावा रस्ता पकडायचा की उजवीकडचा या संभ्रमात होतो तेवढ्यात एक गुराखी दिसला." कविलगाव ?"" उजव्या बाजूनं वळा...थोडा अंतर गेलास काय मग डाव्या बाजूस वळा...सामके कविलगावात पोचतालात."मी त्यांचे आभार मानले. दहा मिनिटात मी साई मंदिराकडे पोहोचलो.प्रवेशद्वार नव्याने बांधत होते.समोर जुन्या काळातील घर असतं तशी इमारत दिसली.तेच साईमंदिर,ज्य होते.जगातल पहिलं साई मंदिर होते ते! मी थोडा उत्तेजीत झालो.समोरच्या बाजूला पंचकोनी उतरते मंगलोरी कौले असलेले छप्पर.त्या खाली पाच खांब आहेत.आत प्रवेश केल्यावर समोरच साईबाबांची भव्य मूर्ती.मूर्ती समोर नतमस्तक झालो." मागणे न काही दर्शनास आलो."असं म्हणून नमस्कार केला. १९१९साली साईबाबांची पहिली पुण्यतिथी इथे साजरी झाली.ती फक्त एका रूपयात ! दत्तभक्त माडयेबुवा यांना खुद्द साईबाबांनी हा एक रूपया दिला होता.हा कार्यक्रम एका झोपडीत झाला होता.त्यानंतर चार वर्षांत त्या ठिकाणी मंदिर उभारले गेले.मंदिराचा आकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात विविध देवतांच्या मूर्त्यां,देखावे...व साईंनी वापरलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत.बाजूलाच दत्तमंदिर आहे.इथे आध्यात्मिक शांती अनुभवता येते. मी इथून पुन्हा मूळ रस्त्यावर आलो.मी सरसोलीधाम( सरंबळ)रस्ता पकडला. साधारण दहा मिनिटातच मी सरसोलीधाम येथे पोहचलो.गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या वहीत नोंद करून मी वळलो. समोरच दृश्य बघून मी स्तब्ध झालो. लाल - पिवळा व हिरव्या रंगाची उधळण समोर दिसत होती.लाल व पिवळ्या रंगात सजलेले भव्य व देखणे मंदिर....सभोवार हिरवा बगीचा.... व्यवस्थित रचनाबध्द रितीने लावलेली विविध झाडे...समोर बांधलेले सुंदर तळे...मधले पादचारी मार्ग सुध्दा लाल पिवळ्या फरशींचे ! थोडक्यात डोळ्यांचे पारणे फिटेल असा देखावा.मी मंदिरात प्रवेश केला.समोर भली मोठी घंटा...आत मधल्या भागात पारदर्शक घुमट (dome) त्या खाली उभे राहिल्यावर एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाच्या गाभाऱ्यात शिरते. अगदी आत प्रवेश केला तेव्हा समोर राम , लक्ष्मण व सीता आणि खाली बसून नमस्कार करणारा मारुती दिसतात.मुर्त्या विलक्षण सुबक ...जिवंत...मनात शांतता निर्माण करणाऱ्या आहेत. त्याच्या उजवीकडे शिव पार्वती व मुरलीधर व रुक्मिणी (राधा?)या देवता आहेत.डाव्या बाजूलासंत झुलेलाल, संत लालजी व गुरु नानक दिसतात.सरसोलीधाम हा सिंधी समाजाचा सिंधुदुर्गातील पहिला मठ इथे सर्व धर्मीय देवतांच्या मुर्त्या आहेत.दुपारी इथे मोफत अन्नदान केले जाते. देवळाच्या डाव्या बाजूला पाठीमागे रस्त्यालगत शिवमंदिर आहे. काळ्या पाषाणातील पिंड व भिंतीत बसवलेला गणपती अतिशय देखणा आहे.त्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यातच आनंद आहे. मी पुन्हा मागे येऊन उजवीकडे नेरूर रस्त्याला वळलो.नागदा मारुतीकडून पुढे नेरूर जकातीवरून वालावल कडे वळलो. उन्ह कलायला सुरुवात झाली होती.दुतर्फा हिरवी शेते...मस्त रस्ता .. आजूबाजूला हिरव्या चारीत छोटी रंगीत फुले... मी गाणी गुगुणतच चाललो होतो. गर्द वनराई... वळणा वळणाचा चढ उताराचा रस्ता...पार करत मी लवकरच वालावलचे इतिहास प्रसिद्धलक्ष्मी नारायण मंदिर गाठले. वालावल व सावंतवाडी संस्थान चे एक अतूट नाते आहे.इथे अनेक लढाया झाल्या.संकटकाळी किंवा विश्रांती साठी सावंतवाडीकर इथे येत.मंदिर व समोरचे तळे देखणे व सुबक आहे.या मंदिराला काही शतकांचा इतिहास आहे. स्पीकरवर अभंग ऐकू येत होते.इथे थोडा वेळ बसलो.तळ्याचे तरंग बघता बघता मन भाव भक्तीने फुलून आले. तिथून उताराचा रस्ता व बाजार पार करत मी वालावलच्या खाडीपाशी पोहचली.सोनेरी सूर्यकिरणात सारा परीसर उजळून गेला होता.दोन्ही किनाऱ्यावर गर्द झाडी त्यात माड पोफळी , झाड व वेली होत्या .निळेशार पाणी...वर नारिंगी आकाश ...सभोवतालची हिरवाई .. पाण्यावर झुकलेले माड....देवळातल्या अभंगाचा आवाज.... तंद्री लागायला एवढे पुरेशी होते. इथे पलीकडे जायला व फिरण्यासाठी होड्या आहेत.याच निसर्गरम्य खाडीत ' श्र्वास ' या मराठी राष्ट्रपती विजेत्या सिनेमाच शूटिंग झाले होते.मी तिथे गेली तेव्हा सुद्धा चित्रीकरण चालू होत.मी तिथला गार वारा अंगावर झेलत काही काळ उभा राहिलो.आता आकाश निळ सावळ होऊ लागलं होत.मी ते सगळ दृढ डोळ्यात साठवत परतीचा प्रवास सुरू केला.येताना नेरूर कलेश्वर मंदिराला भेट दिली.तिथला रथ पहिला.पूर्वी शिवरात्रीला आम्ही मित्र सतीश वालावलकर यांच्याकडे नेरूरला यायचो ती आठवण झाली.मी पुन्हा सावंतवाडी गाठेपर्यंत काळोख झाला होता.अंगावर शिरशिरी आणणारी थंडीही जाणवत होती.तीन साडेतीन तासाची ही भ्रमंती लक्षात ठेवण्याजोगी झाली होती. बाळकृष्ण सखाराम राणे सावंतवाडी.