फेरा तो साधे पण स्वछ कपडे घालून मतदान करण्यासाठी जात होता.तेवड्यात एक कार भरधाव वेगाने आली व त्याला धुळीने रंगवून गेली.तो मतदार वैतागला.त्याने वळून पाहिले तर गाडीवर पाठिमागे ठळकपणे लिहिले होते...' नगरसेवक'त्या मतदाराला वाटले माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली हा नगरसेवक आहे.त्याने वैतागून देवाकडे विनवणी केली.." देवा मला नगरसेवक कर.तो नगरसेवक माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे."प्रत्यक्ष देव त्याच्या समोर प्रकट झाला." मतदारा ,बोल काय इच्छा आहे तूझी?"" मला नगरसेवक बनव."" बघ, विचार कर.हा तुझा अंतिम निर्णय आहे?"" हो.मला अधिक शक्तिशाली बनायचे आहे."झाले लवकरच नगरपालिका निवडणूक लागली.त्या मतदाराने अपक्ष म्हणून अर्ज भरला.आता तो उमेद्वार झालास्वच्छ प्रतिमा...तरूण ... तडफदार असल्याने व देवाचा आशीर्वाद असल्याने तो नगरसेवक झाला.त्याच्या वार्डमध्ये होणाऱ्या कामात भ्रष्टाचार होतोय असं वाटल्याने त्याने विरोध केला.पण त्याच दिवशी त्याच्या घरी एक पाकीट आलं.त्याच मन क्षणभर घाबरले.पण त्यानंतर त्याने ते पाकिट गुपचूप उचललं.आता तो गाडीतून फिरू लागला. त्याने त्याच्या गाडीच्या पाठिमागे....' नगरसेवक ' लिहिले .त्याला वाटले तो आता शक्तिशाली झाला.पण एके दिवशी एका सभेत त्याचा विरोध डावलून नगराध्यक्षांनी त्यांना पाहिजे तोच निर्णय घेतला. नगरसेवक वैतागून म्हणाला..." देवा तू कुठे आहेस?"" काय झालं वत्सा?"" मला नगराध्यक्ष बनव. माझ्यापेक्षा तो जास्त बलवान आहे."" जशी तूझी इच्छा." देव हलकेच हसला.पुढे गंमत झाली.सत्ताधारी पक्षात फूट पडली. तत्कालीन नगराध्यक्ष पायउतार झाले.दोन्ही गटांकडे समान नगरसेवक होते आणि एकटाच तो अपक्ष नगरसेवक ऊरला होता.तो म्हणाला " मला जो नगराध्यक्ष करेल त्यांच्या गटात मी येईन."झाले एका गटाने त्याची अट मान्य केली.आता त्याच्या सहीविना कुठची काम होईना. सही पाहिजे तर सही सही काही द्यावे लागे.आता त्याने दोन फ्लॅट खरेदी केले.बायकोच्या नावावर रोकड जमा झाली.तो शहराचा प्रथम नागरिक झाला.गाडीवर ठळकपणे " नगराध्यक्ष" लिहून तो मिरवू लागला. पण एकदा स्थानिक आमदाराने नगरपालिकेला भेट दिली व भर सभेत नगराध्यक्ष कुचकामी असल्याचा ठपका ठेवला.नगराध्यक्ष वैतागले." देवा हा अन्याय आहे." त्याने देवाला हाक दिली." बोल,काय करू तुझ्यासाठी?"" मला आमदार बनव.?"" तथास्तु."लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागल्या.हवा बघून तो एका पक्षात सामील झाला.त्याने लाख खटपटी करून तिकिट मिळवलं.भरपूर पैसा ओतला. सगळे अंदाज चुकवून तो निवडून आला.तो आता इतरांना झापू लागला. अनेक जमिनी त्याने खरेदी केल्या.पण एकदा विधानसभेत एका मंत्र्याने त्याला खूप सुनावले.आमदार व्यथित झाले." देवा धाव.." तो म्हणाला.देव प्रकट झाले." सांग .आता काय पाहिजे?"" मला मंत्री कर.तो माझ्यापेक्षा ताकदवान आहे."" तू तर थांबतच नाही.पण तूझी इच्छा पूर्ण होईल."त्याने पैसा ओतला.देवही पावला तो मंत्री झाला. आता त्याच्या हाती सत्ता आली. पैसा दोन्ही हातांनी ओढू लागला.प्रत्येक प्रकरणात कमिशन ... टक्केवारी ठरली.दुप्पट चे चौपट झाले.लक्ष्मी वाढू लागली.तो मुख्यमंत्र्यांनाही ऐकेना पण एक दिवस मुख्यमंत्र्यांनी संधी साधली. त्या मंत्र्याच्या खात्याशी संबंधित एका प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी त्याला अडकवले.मंत्री अडचणीत आला.त्याने देवाला साद दिली.देव समोर उभा ठाकला." अरेच्या आता काय शिल्लक राहिले.?"" देवा सर्वात शक्तिशाली तर मुख्यमंत्री ते काहीही करू शकतात.मला मुख्यमंत्री कर."देव मुक्तपणे हसले. " होईल तुझ्या मनासारखं."बस्स. आता मंत्री संधीच्या शोधात होता.त्याने अनेक आमदार आपल्या बाजूने वळवले. मुख्यमंत्र्याच एक प्रकरण पुराव्यानिशी विरोधी पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहचवले.प्रचंड गदारोळ झाला.मुख्यमंत्र्याना राजीनामा द्यावा लागला.सर्व आमदारांनी त्या मंत्र्याच्या नावाला नवा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला.पक्षश्रेष्ठींचा नाईलाज झाला. आता तो सामान्य मतदार मुख्यमंत्री झाला.अमर्याद सत्ता...संपत्ती त्यांच्या हाती आली.तो सत्ताधुंद झाला.चारही दिशांनी तो पैसे ओढू लागला . अनेकांना त्याने बरबाद केले.लायक नसलेल्या माणसांना त्याने पैसे घेऊन वर काढले.गणना करणारेही थकतील अशी संपत्ती त्याने जमवली.लोक कुजबुज करू लागले.सगळी सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात होती.पण....पण लवकरच नव्या विधानसभेसाठी निवडणूक लागली.त्याने अपार पैसा ओतला. घराघरात... प्रत्येक मतदारांपर्यंत पैसे पोहचले.निवडणूक अटितटीची झाली.त्याला वाटले आपण सहज जिंकू.पण अखेर पर्यंत कळत नव्हते कोण जिंकेल ते! शेवटी मुख्यमंत्री एका मताने पराभूत झाले.एका मताचे महत्त्व त्यांना कळलं.कोणी एक मतदार जो कुणालाच विकला गेला नव्हता त्याच मत निर्णयक ठरले.मुख्यमंत्री उदास झाले.माझ्यापेक्षा नव्हे सर्वांपेक्षा शक्तिशाली...बलवंत...म्हणजे मतदार. त्याने देवाची आळवणी केली.देव आपल्या दिव्य रुपासह प्रकट झाला." वत्सा बोल. काय म्हणतोयस?"" देवा मला क्षमा कर.या लोकशाहीत सर्वशक्तिमान फक्त मतदार आहे.एक मत सगळा बदल करू शकते .मला मतदार कर." माजी मुख्यमंत्री म्हणाले." आज तूला सत्याच खरं ज्ञान झाले.उतर ती खोटी वस्त्रे.... तो दांभिकपणा ....हो सूज्ञ मतदार."तो आता सामान्य मतदार झाला.पण स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झालेला.
( पंचतंत्र.... इसापनीती व हितोपदेश यात उंदीर,डोंगर अशी कथा येते.ती पाठ्यपुस्तकातही होती. अश्या कथेला साखळी कथा म्हणतात.तशीच लिहिलेली ही विडंबनात्मक नव्हे तर विटंबनात्मक कथा वाचा व विचार करा.)बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026