पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भाग २
मागील भागावरून पुढे..
अलकाची चाल थकली होती पण मनात मात्र सकाळी झालेलं दोघांमधलं संभाषण आठवलं. ते तिच्यासाठी संजीवनी घुटीसारखं होतं म्हणून ती चालत होती.
हळूहळू चालत अलका विलासरावांच्या मागोमाग पोलीस जीपमध्ये बसली. जीपमध्ये हवालदार दाबके पण होते. दाबके या दोघांना अलकाच्या वैद्यकीय तपासणी साठी घेऊन चालले होते.
जीप चालू झाली तसं अलकाच्या मनात मनात सकाळचा प्रसंग झरझर एखाद्या चलचित्राप्रमाणे उमटू लागला.
****
सकाळची वेळ होती. अलकाताई आपल्या वयानुसार हळूहळू कामं आटोपत होत्या. बॅंकेतील काम करण्यासाठी विलासराव नाश्ता करून मघाशीच घरातून बाहेर पडले. विलासरावांना अलकाताई शक्यतो उपाशीपोटी बाहेर जाऊ देत नसत.
मागचं थोडं काम आवरताना अलकाला मघाशी घडलेला प्रसंग आठवला आणि ती स्वतःशीच लाजली.
" अलका अगं मी नाक्यावर पोहे खाईन. कशाला तडतड करतेस. आधीच गुडघेदुखी मुळे तू त्रासली आहेस. तू आराम कर."
" प्रत्येक वेळी का वाद घालता हो? करू दे मला पोहे. तेवढीच हळूहळू का होईना शरीराची हालचाल होते."
" अगं इतकी वर्षे केलंस.आता कर आराम. आपल्या दोघांचं जेवण म्हणजे भातुकली असते. ती करतानाही दमतेस म्हणून म्हटलं "
" आता मी स्मिताला पूर्ण स्वयंपाकासाठी लावणार आहे."
" मी तुला कधीचं म्हणतोय. बस्स कर आता ही तुझी स्वतःच्या शरीराशी चाललेली झटापट. आयुष्यभर केली तडतड तेव्हा तुझं वय लहान होतं आता नको हा भलताच अट्टाहास करु."
विलासरावांचा आवाज काळजीने भरला होता.
पोह्यांची प्लेट टेबलवर ठेवत अलका म्हणाली,
"आता पोहे गरम आहेत तोवर खाऊन घ्या मग मला लेक्चर द्या."
" अलका नको असं दुर्लक्ष करू माझ्या बोलण्याकडे. थांब संध्याकाळी स्मिताला येऊदे मीच तिच्याशी बोलतो."
खुर्चीवर बसत विलासराव म्हणाले.
"अगं तूही घे ना गरम पोहे. चल एक प्लेट घे आणि ये माझ्या बरोबर खायला बसं. माझं खाणं संपेपर्यंत माझी काळजी करतेस. तुझं काय? चल ये."
विलासरावांनी हात धरून अलकाला खूर्चीत बसवू लागले.
" थांबा हो.प्लेट घेऊ द्या." विलासरावांच्या
हातातून हात सोडवत अलका म्हणाली.
अलकाला आपल्या बरोबर पोहे खाण्यासाठी
विलास रावांनी अलकाला जबरदस्तीने बसवलं.
अलका जशी खुर्चीवर बसली तसं विलासरावांनी चमच्यात पोहे घेऊन तो चमचा अलकासमोर धरला.
" भाजीत भाजी मेथीची,अलका माझ्या प्रितीची" एवढं बोलून मोठ्ठ्याने हसले.
" इश्श्य काहीतरीच तुमचं"
एवढं बोलून अलका लाजली.
" अगं घास घे उखाणा घेतला आहे मी."
विलासरावांनी असं म्हणताच अलकाने चमच्यातील पोहे खाल्ले.
दारावरची बेल वाजली तशी अलका भानावर आली.
तिच्या मुली ऋतुजा आणि अक्षताला बघून अलकाला पूर्वीसारखा आनंद झाला नाही.कारण त्या आल्या की इस्टेटीवरून अलका आणि विलासराव यांच्याशी भांडायच्या. अलका काही बोलणार तोच…
“अक्षता पकड हिला घट्ट “
अंकाची मोठी मुलगी ऋतुजा म्हणाली. अक्षताने अलकाला घट्ट पकडलं.
“काय करताय तुम्ही?”
अलका ने घाबरून विचारलं. अक्षताने अलकाला एवढ्या घट्ट पकडून ठेवलं होतं की अलकाला ते सहन होत नव्हतं.
“तुझा माज जिरवतो आहे.”
ऋतुजाने अलकचा चेहरा हातात धरून तिच्या चार पाच मुस्काटीत मारल्या.
“ अगं ऋतुजा हे काय करतेय? मला मारतेय? आईला?”
“ हे केव्हाच करायला पाहिजे होतं. तुला आमची काळजी नाही. तुम्ही दोघं म्हातारे काय आपल्या उरावर इस्टेट घेऊन जाणार आहे का?”
ऋतुजा ने बोलता बोलता बॅग मधून सिरीज काढली.
“ हे कसलं इंजेक्शन देतेस?”
अलका ने घाबरून विचारलं.
“ महाभयंकर इंजेक्शन आहे. या सिरींजमधे एड्स झालेल्या माणसाचं रक्त आहे. तुमचा माज उतरविण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.”
असं म्हणून ऋतुजा आणि अक्षता भयंकर विकट हसू लागल्या. हसता हसता ऋतुजाने ती रक्ताने भरलेली सिरीज अलकाच्या दंडात टोचली. त्यांचं ते हसणं आणि भयंकर कृर चेहरा बघून अलकाच्या मनाचा भितीने थरकाप उडाला.
“ म्हतारे आता कशी तुमची इस्टेट आम्हाला देत नाही ते बघतेच.”
अक्षता अलकाचा चेहरा आपल्या हाताने जोरात आवळत म्हणाली.
“ अ..अगं… सोड ग खूप दुखतंय.”
“ दुखतं नं ! मग कशाला तुम्ही दोघं आम्हाला राग येईल असं वागता? का तुमची इस्टेट आमच्या नावावर करून देत नाही? “
ऋतुजा म्हणाली.
“ किती दिवस जगणार आहे तुम्ही आता?”
अक्षता ने हे म्हणताच अलकाचा चेहरा आपल्या हाताने अजून आवळला. तशी अलका कळवळली.
“ नका ग असं वागू.”
“ हे असं वागायला तुम्हीच भाग पाडलय. शहाण्यासारखं वागला असता तर हे आम्हाला करावच लागलं नसतं.”
ऋतुजा ओरडून बोलली.
“ आमच्या नंतर तुमचंच आहे सगळं.”
“ नंतर काय उपयोग? आम्हाला आत्ता गरज आहे. “
अक्षता ने जाता जाता पुन्हा अलकाचा चेहरा आवळला आणि म्हणाली,
“ बाबा घरी नाही म्हणून सुटले. त्यांना पण हे भयंकर इंजेक्शन देणार होतों.”
विकट हास्य करत अक्षराने आपल्या हातातील दुसरी रक्ताने भरलेली सिरीज अलकाच्या डोळ्यासमोर नेउन नाचवली.
त्या दोघी गेल्यावर अलका धडपडत उठली आणि तिने घराचं दार लावलं. हताशपणे ती पलंगावर बसली. विलासरावांची वाट बघत रडत होती.
थोड्यावेळाने दार वाजलं. तो आवाज ऐकल्यावर अलका भीतीने शहारली तिला वाटलं पुन्हा आपल्या मुली आल्या.अलकाने दार उघडलं नाही तेव्हा पुन्हा दार वाजवून बाहेरून विलासरावांनी हाक मारली.
“ अल्के अगं दार उघडं. झोपलीस का?”
विलासरावांचा आवाज ऐकताच अलका धडपडून उठली आणि तिने दार उघडलं.दारात विलासराव दिसताच त्यांना मिठी मारून अलका ओक्साबोक्शी रडू लागली. विलासरावांना काही कळेना.
त्यांनी हळूच तिला बाजूला करून पलंगावर बसवलं आणि विचारलं,
“ अलका कायग काय झालं? कशाला रडतेस?”
अलकाचा रडण्याचा उमाळा शांत व्हायची विलासरावांनी वाट बघीतली.
जरा वेळाने अलका ने विलासराव बॅंकेत गेल्यावर काय घडलं ते सविस्तर सांगीतलं. ते ऐकताच विलासराव मनोमन हादरले.
क्षणभराने मनाशी काही तरी ठरवून विलासराव अलकाला म्हणाले,
“ चल. जशी असशील तशी चल.”
“ कुठे जायचं?”
“ पोलिस ठाण्यात.”
“ का?”
“ आपल्या मुलींनी गुन्हा केला आहे त्याची फिर्याद करायला. उठ.वेळ घालवू नको.”
विलासराव अलकाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघाले.
“ अलका दवाखाना आला .चल उतर.”
विलासरावांच्या आवाजाने अलका भानावर आली. पोलीस जीप दवाखान्या समोर उभी होती. अलका थकलेल्या पावलांनी जीपमधून खाली उतरली. विलासराव आणि अलका हळूहळू चालत दवाखान्यात शिरले.
___________________________
क्रमशः