पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भाग १
सकाळचे साधारण दोन वाजत आले होते.
विलासराव मोकादम आणि अलका मोकादम जरा घाबरलेले दिसत होते कारण पोलीस स्टेशनचं तोंड आयुष्यात कधी न बघितल्याने दोघांच्याही अंगाला थरथर सुटली होती. नकळत अलका मोकादमनी आपल्या नव-याचा म्हणजे विलासरावांचा हात पकडला. तेही थरथरतच होते पण आपली बायको अजून घाबरू नये म्हणून तिच्याकडे बघून विलासरावांनी तिला डोळ्याने धीर दिला.
अजूनही हे दोघे पोलिस स्टेशनच्या गेटमध्येच उभे होते. त्याच वेळी काॅन्स्टेबल कदम आपल्या बाईकने आत शिरले. शिरतांना त्यांचं सहज या दांपत्याकडे लक्ष गेलं. हे दोघंही म्हातारे असून घाबरलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.
" काका काय झालं? कंप्लेंट लिहायची आहे?"
" हो."
चाचरत विलासराव म्हणाले. अलका घाबरून काॅन्स्टेबल कदम कडे बघत होत्या.
" चला आत."
" हो पण आम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचंय."
विलासराव जरा दबकत बोलले. न जाणो हा शिपाई भडकला तर!
" आधी कंप्लेंट लिहा मग मोठ्या साहेबांना भेटा."
" चालेल नं असं? "
" हो चालेल.चला"
कदम या दोघांना आत घेऊन गेले. दोघही दबक्या पावलानेच आत शिरले.
" पांडे यांची कंप्लेंट लिहून घ्या."
कदमने पांडेला सांगितलं आणि कदम साहेबांच्या केबिनमध्ये शिरला. कदम गेला त्या दिशेने विलासराव आणि अलका बघायला लागले. तेव्हा टेबलावर हाताने थापटत पांडेने विचारलं,
" ओ काका कंप्लेंट लिहायची आहे नं?"
" अं… हो."
" सांगा काय कंप्लेंट आहे?"
विलासराव आपली कंप्लेंट सांगू लागले. त्यांच्या एकेक वाक्याने पांडेच्या चेह-यावरचे भाव बदलत होते. पांडेला कंप्लेंट लिहिणं अशक्य होतंय हे त्याच्या चेह-याकडे बघून कळत होतं.
कंप्लेंट लिहून झाल्यावर कंप्लेंट लिहून घेतली असं लिहून खाली स्वतःची सही केल्यावर पांडे सुन्न मनाने विलासराव आणि अलका कडे बघायला लागला. त्याला या म्हाता-या जोडप्याचं कसं सांत्वन करावं हे कळत नव्हतं.
" पांडे लिहून घेतली का यांची कंप्लेंट?"
केबीनबाहेर आलेल्या कदमांचा आवाज ऐकून पांडे भानावर आला.
" हो साहेब लिहू घेतली."
कदम विलासरावांकडे वळून म्हणाले,
" चला तुम्हांला साहेबांना भेटायच आहे नं?"
" हो."
विलासराव खुर्चीवरून हळूच उठत म्हणाले.
कदमांच्या पाठोपाठ विलासराव आणि अलका केबिनच्या दिशेने निघाले. केबीनमध्ये जाताना कदमांच्या हातात विलासरावांनी लिहीलेल्या कंप्लेंटचा कागद होता.
पोलिस स्टेशनच्या हद्दीत न आलेल्या सामान्य माणसाचे पाय मणामणाची बेडी घातल्या नंतर जशी चाल असेल तशी चाल विलासराव आणि अलकाची होती. विलासराव आणि अलका हे तर साठीच्या वर असलेलं वृद्ध जोडपं त्यांचे पाय लटपटणारच.
कदम आत केबीनमध्ये शिरले आणि काही न समजून विलासराव आणि अलका केबीनबाहेरच थबकले.
आता शिरताच कदमांनी इन्स्पेक्टर देशपांडे यांना सॅल्यूट केला आणि म्हणाले,
" सर बाहेर एक वृद्ध जोडपं आलं आहे. त्यांनी कंप्लेंट लिहीली आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे."
असं म्हणून कदमांनी हातातला कंप्लेंटचा कागद इन्स्पेक्टर देशपांडे समोर ठेवला.
देशपांडे कंप्लेंट वाचू लागले. वाचता वाचता त्यांचाही चेहरा ताठरला. पूर्ण कंप्लेंट वाचल्यावर ते स्वतःशीच बडबडले,
" किती निष्ठूर आहेत या मुली .ज्यांनी जन्म दिला, वाढवलं त्यांच्याशी इतक्या कृरपणे वागावं"
" सर.बोलावू का आत त्यांना?"
कदमांच्या प्रश्नाने देशपांडेंच्या डोक्यात चाललेली विचार साखळी खुंटली.
" अं. हो. बोलवा "
कदम केबीनबाहेर आले.
" चला आत."
कदम केबीनबाहेर येत विलासरावांना म्हणाले.
विलासराव आणि अलका हळूहळू केबीनमध्ये गेले. देशपांडेंनी समोरच्या खूर्चीकडे बोट दाखवून त्या दोघांना बसायला सांगितलं.
जरावेळ विलासराव आणि अलका काहीच न बोलता देशपांडेंकडे बघत बसले. त्यांच्या मनाचा उडालेला गोंधळ देशपांडेंनी ओळखला. दोघांच्या चेहऱ्यावरची वेदना त्यांनी जाणली. शेवटी त्यांनीच बोलायला सुरुवात केली.
"मिस्टर मोकादम तुमची कंप्लेंट मी वाचली. जे घडलं ते वाचून मलाही धक्का बसला. मला सांगा हे घडलं तेव्हा तुम्ही घरात नव्हते?"
" नाही."
हे बोलताना विलासरावांचा आवाज थरथरला.
" तुम्ही कुठे गेला होता?"
" मी बॅंकेत गेलो होतो. बॅंकेत खूप गर्दी असल्याने माझा नंबर यायला वेळ लागला. "
" तुम्ही किती वाजेपर्यंत घरी आलात?"
" मला दुपारचा एक वाजला. "
" तुम्ही घरून सकाळी बॅंकेत जायला निघालात तेव्हा पासून आत्ता पर्यंत काय काय घडलं ते आठवून सांगा. छोटीशी गोष्ट सुद्धा आमच्या कामाची असते. तुम्ही घाबरू नका. सावकाश सगळं सांगा."
बोलता बोलताच देशपांडे यांनी त्यांच्या टेबलवर झाकलेला पाण्याचा ग्लासवरचं झाकण काढून विलासरावांसमोर केला.
विलासराव लगेच घटघट पाणी प्यायले. त्यांनी ज्या घाईघाईने पाणी प्यायले त्या वरून देशपांडेंना त्यांच्या मनाची अस्वस्थता कळली. अलकाची मन: स्थिती काही फार वेगळी नव्हती.
देशपांडे आणि केबीनमध्ये असलेले कदम दोघेही विलासराव आणि अलकाचं निरीक्षण करत होते.
पाणी संपवून ग्लास टेबलवर ठेवत विलासरावांनी बोलायला सुरुवात केली.
***
“ साहेब मी सकाळी नाश्ता करून बरोबर नऊ वाजता बॅंकेत जायला घराबाहेर पडलो. बॅंकेत आज गर्दी असणार होती कारण पुढील दोन तीन दिवस बॅंकेला सुट्टी असणार होती.
मी घराजवळ असलेल्या आटोस्टॅंड जवळून रिक्षा घेतली आणि बरोबर दहा वाजून चाळीस मिनिटात बॅंकेत पोचलो. माझ्या आधीच बॅंकेत गर्दी झालेली होती. मी रांगेत उभा राहिलो. पैसे काढण्याची स्लीप भरून टोकन घेऊन बाजूला उभा राहिलो तेव्हा घड्याळात अकरा वाजले होते.
अर्धा पाऊण तास असाच गेला मी उगीचच इकडे तिकडे बघत बसलो होतो. जवळपास पावणे बाराला माझा नंबर लागला मी टोकन देऊन पैसे घेतले तेव्हा बारा वाजले होते. मी बॅंकेबाहेर येऊन रिक्षा केली. जवळपास एक वाजण्याच्या वेळेस मी घरी आलो तर अलका ने रडतच दार उघडलं.
मला काही कळेना. ही का रडते? मी काही विचारण्या आधीच हिने मला घडलेली सगळी घटना सांगितली.”
एवढं एकदमात बोलून विलासराव गप्प बसले.
“ मि. मोकादम तुम्ही घटना सांगताना प्रत्येक वेळी घड्याळात किती वाजले होते हे कसं सांगीतलं? “
देशपांडेंनी विचारलं.
“साहेब बॅंकेत किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं की किती वेळात आपलं काम झालं हे बघण्याची मला जुनी सवय आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून मी शिकलो की कोणत्याही ऑफिसमध्ये किंवा दवाखान्यात सुद्धा शांत राहायचं जेवढा वेळ इथे द्यावा लागणार आहे तो लागणारच आहे. तेव्हा ओरडून उपयोग नाही.”
“ अरे व्वा! हा तुमचा अनुभव मोलाचा आहे. तुम्ही कुठे काम करत होता?”
“ मी शासकीय महाविद्यालयात लेक्चरर होतो.”
“ मि.मोकादम आम्ही तुमची एफ.आय आर लिहून घेतली आहे. आधी तुमच्या मिसेसची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.”
“ इतक्या लवकर एड्स होईल माझ्या बायकोला?”
विलासरावांनी घाबरून विचारलं.
“ तुम्ही घाबरू नका. ही आमची प्रोसीजर आहे. कदम हवालदार दाबकेंना यांच्या बरोबर दवाखान्यात पाठवा.”
देशपांडे म्हणाले.
“ हो सर. मि.मुकादम चला.”
कदम विलासरावांना म्हणाले.
विलासराव आणि अलका खुर्चीवरून उठून केबीन बाहेर जाऊ लागली. दोघांची चाल फारच हळू होती. देशपांडेंचं मन दोघांची चाल बघून गलबलून आलं. शेवटी तेही माणूसच. होते. पोलीसी पेशा मुळे साधारण माणसापेक्षा टणक होते एवढंच.
____________________________
क्रमशः
पुढे काय झालं? वाचा उद्या च्या भागात.
©® मीनाक्षी वैद्य.