धर्मनाना बागेतून कोवळ्या नारळाची ( आडसर) एक पेंढी घेऊन आले.खळ्यात तुळशीच्या बाजूला त्यांनी ती पेंड ठेवली.कमरेचा पाळ त्यांनी ओसरीवर कोपर्यात ठेवला.क्षणभर ते ओसरीवर टेकून बसले.एवड्यात शेजारच्या नाईकांचा कोंबडा कुकुच... कू...कुकुच..कू करत आपला ऐटदार तुरा हलवत स्वच्छ सारवलेला खळ्यात शीट टाकून इकडे तिकडे धावू लागला." हड्...हड्...शिरा पडो व्हरान.त्या नायकाक हजारदा सांगलय तुझो कोंबडो पांजीखाली झाकून ठेय म्हणान पण ऐकात तर शप्पथ."नाना झाडू घेऊन कोंबड्यांच्या मागे धावले. कोंबडा पुढे व नाना मागे ही शर्यत काही काळ चालली.अखेर कोंबडा कुंपणावरून उडी मारून पळाला." परत हातीक गावलो तर सागोती करून खातलय. घाण करून ठेवता मेलो."नाना करवादले.तेवढ्यात घरातून त्यांची मोठी सून निर्मला चहाचा कप व पाण्याचा तांब्या घेऊन आली." नाना चहा."" फाटकी पडो व्हरान तुझ्या अकलेर. हात पाय धुल्याशिवायमीया कायच तोंडात घालणय नाय... ह्या तुका म्हायत नाय?मुंबईत रवान सगळाच इसारल्यात मगो." निर्मला काही न बोलता गुपचुप आत निघून गेली. घरा समोर असलेल्या माडाच्या मुळात ठेवलेल्या बादलीतील पाण्याने त्यांनी हातपाय धुतले.अंगणात येवून त्यांनी तुळशीसमोर उभे राहत त्यांनी दोन्ही हात जोडले ." देव बरे करो." असं पुटपुटत ते परतले.मग कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसून त्यांनी चहा घेतला." नाना... ओ...नाना, संध्याकाळी देवळात मीटिंग आसा तुमका बोलयलासा."रस्त्यावरुन जाताना भालचंद्राने नानांना ओरडून सांगितले." मेल्या भालग्या...तुझे पाय मोडले काय .आत येऊन सांगूक येना नाय." भालचंद्र तिथून जवळ जवळ पळूनच गेलात्याला माहित होतं एकदा काय नानांच्या हाती सापडलो तर मग काही खरं नाही. नानांचा गावात तसा दराराच होता. त्यांना जराही चूक झालेली आवडत नसे. रूढी परंपरा... चालीरीती मोडलेल्या त्यांना अजिबात चालत नसे. नाना मुंबईत एका कपड्याच्या मिलमध्ये चांगल्या नोकरीवर होते.गिरगावात ते राहत. त्यांची पत्नी सुमित्राची त्यांना छान साथ लाभली होती .सुखाचा संसार चालला होता. त्यांची तिन्ही मुलांचा जन्म मुंबईतच झाला होता. गावात घरी आई -वडील... काका- काकी असं एकत्र कुटुंब होत.नाना दरवर्षी गणपती व दिवाळीला रजा काढून घरी यायचे. वाड्यातल्या भजन मंडळी बरोबर भजन करत फिरायचे.काकांना मुलबाळ नव्हते.पण ते कधी दु:की असल्याचे त्यांना कधी जाणवलं नाही.नाना व त्यांची बहीण पुष्पा यांनाच ते मुलांसारखे वागवत. त्यांचं गाव सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगाव हे होत. सुमारे एक हजार वस्ती असलेल्या या गावात पूर्ण प्राथमिक शाळा.... तिच्यापासून थोड्या अंतरावर एक महादेवाचे छोट पण सुंदर देऊळ..गावाला वेढा देत गेलेली नदी व तिच्या काठावर असलेली माड पोफळीच्या बागायती असं सुंदर गाव होतं.गावी आले की ते न विसरता नदीवर पोहायला जात.ते पट्टीचे पोहणारे होते. गावात राहून ताजेतवाने होऊन ते पुन्हा मुंबईला परतत. आणि मग तो प्रसिद्ध मिल कामगारांचा संप झाला.त्यावेळी नानांच वय अवघं पस्तीस वर्षे होते. तो संप खूप लांबला.नानानी मिळेल ते काम करून कुटुंबाचे पालन पोषण केले. पंधरा वर्षे ते परीस्थितीशी झगडले.मोठा मुलगा सुरेश बी.कॉम. होऊन बॅंकेत नोकरीला लागला त्यावेळी नानांनी आपल्या पत्नी व दोन्ही मुलांना घेऊन गाव गाठले.मुंबई सोडताना त्यांना खूप वाईट वाटले होते.ऐन उमेदीची वर्षे त्यांनी मुंबईत काढली होती. मुंबईने त्यांना सुख दुःखात कसं वागायचं ते शिकवले होते.पण गावी जाणं भाग होतं.दरम्यानच्या काळात त्यांचे आई- वडील व काकी वारली होती.एकटे काका शेती व बागायती सांभाळून घरचे सगळे सणवार करत होते.ते पण आता थकले होते.नाना घरी आलेले बघून ते खूष झाले." आता परबांचो वारसो तूच संभाळ रे बाबा.आज पर्यंत परबांका गावात कोणी बोल लावक नाय .नाव ठेवक नाय ह्या असाच चालू रवांदे." काका म्हणाले.वर्षभरात काका पण गेले.नाना परब वाडीचे जाणते झाले.सणवार....रिती रीवाज ..सोवळे सगळं कडकपणे पाळू लागले.त्यांची पत्नी त्यांना छान साथ देत होती.दोन वर्षांपूर्वी मुलीच लग्न झाले.जावई पोलीसात होता.लहान मुलगा रमेश देवगडच्या सरकारी दवाखान्यात टेक्निशियन म्हणून नोकरीला लागला.पण या सुखाला ग्रहण लागले.रुक्मिणीला स्तनांचा कर्करोग झाला.जमवलेले पैसे...राखून ठेवलेले दागिने मोडून सुमित्रावर उपचार सुरू केले.पण अखेर अत्यंत वेदनादायक परिस्थितीत तिचा अंत झाला. अखेरच्या क्षणी नानांनी तिची खूप सेवा केली.तिच्या वेदना पाहून ते मूकपणे रडत पण तिच्या समोर त्यांनी कधी निराशा ...दुःख दाखवले नाही. दोन्ही मुलगे नोकरीला असल्यानं कधीतरी एखादा दिवस आईची देखभाल करायला येत... कधीतरी मुलगी यायची पण नानांनीकुणावरही जबरदस्ती केली नाही. सुमित्रा गेल्यावर आज सहा महिने उलटून गेले होते. दोनच दिवसांपूर्वी सुरेश आपल्या पत्नीसह गावी आला होता.मे महिन्यात दरवर्षी तो आपल्या मुला व पत्नीला गावी सोडून जायचा. नानांचाही वेळ मजेत जायचा नाही तरी घरी ते एकटेच असायचे. नाना असे सगळं आठवत बसलेले असताना.सुरेश कुणाची तरी मोटरसायकल घेऊन आला." अरे खय चललय? बाळग्याची गाडी दिसता!"" होय. हायवेवर बिबवण्याक जातंय.?"" कश्याक?"" ना...ना...नाना... रमेश..."" काय झाला रमेशाक?" नाना घाबरले." नाना रमेशने लग्न केलंय. त्याच्याच हॉस्पिटलमधल्या नर्स बरोबर .तो घरी येतोय."नाना बराच वेळ गप्प राहिले.ते नेमका कसला विचार करताहेत ते कळत नव्हते.थोड्या वेळाने ते म्हणाले..." कधी केल्यानं लग्न? मी काय लग्नं लावून दिला नसता काय?"" कालच लग्न केल. कोर्ट मॅरेज केलय.आज तुमच्या आणि देवाच्या पाया पडायला येतोय."" ठिक आसा. पण तिघाजणा एकाच गाडयेवरसून येतालास? सावकाश रे बाबा." सुरेश निघून गेला.नानांनी झाडू घेऊन खळ पुन्हा झाडून घेतल." निर्मला.. रांगोळी घेऊन ये.रांगोळी घाल.ओवाळणी तयार कर घरात नवी सूनबाई येतासा."नाना शांतपणे म्हणाले. मनातून ते नाराज होते.मुलाच लग्न त्यांना वाजत गाजत करायचं होतं.पण नवा जमाना आहे... आताच्या मुलांना सारासार विचार नाही...असं म्हणत त्यांनी गप्प राहणे पसंत केले.सगळ्या गावाला परवा जेवण द्यायचं असं त्यांनी ठरवले.त्यांनी देवघरात जाऊन दिवा लावला.हात जोडत ते म्हणाले.." देवा, मुलान चूक केल्यानं...क्षमा कर अज्ञानी बालक असा...पुढचा सगळा व्यवस्थित करीन.' ते पुन्हा बाहेर येऊन बसले. तेवढ्यात अंगणात मोटरसायकल येऊन थांबली.जसा मोटरसायकलचा आवाज आला तशी नाईकांची खिडकी उघडली. खिडकीतून नाईकांची बायको सत्यभामा डोकावली.नानांच्या ते लक्षातही आले.दुसर्याच्या भानगडीत नाक खुपसण्याची तिची जुनी सवय. मोटरसायकलवरून नवं जोडपं उतरलं ." अगो बाये,परबांची नवी सूनबाई इली वाटता."नाईक वहिनी बोलली." हिच्या डोळ्याखालसून काय सुटना नाय." नाना पुटपुटले.निर्मलाने नव्या सूनबाईलला ओवाळले.नानांनी नव्या सूनबाईलला न्याहाळले.सावळा वर्ण...गोल चेहरा....नाकी डोळी निट..उंची पुरेशी होती.दिसायला छान वाटत होती.नव्या सूनबाईने खाली वाकून नानांना नमस्कार केला." देव बरे करो." नानांनी आशिर्वाद दिला." नाव काय गो तूझ्या."" शाल्मली."" नवी नावा ती...! पण रमेश्यान काय नाव ठेयल्यान?"" तेच...नाव आहे.बदललं नाही.शाल्मली." ती म्हणाली. नव्या सूनने माप ओलांडून गृहप्रवेश केला. घरात नव्याने पुन्हा आनंदाचे क्षण आले होते.तेवढ्यात नाईककाकी आल्या. शाल्मलीला वरून खाली न्याहाळत त्या म्हणाल्या..." नाना...नवी सून वाटता...!"" होय."" रमेशा, आमका तरी बोलवायचा.आम्ही येतोलो असतो.गुपचुप केलंय मरे लगीन.शेजार्याका इसारलय."नाईक काकीनीं रमेशला विचारले.तो हसला व गप्प राहिला.हो ,नाईक काकींचा स्वभाव त्याला माहित होता." खयसला गो तू?"सगळे गप्प होते तरी काकूंनी विचारलं." देवबागची. ... ?"" अगो मी तारकर्लीचा, देवबागेक नेमका खय माहेर तूझा..?"" मधली वाडी... डाव्या बाजूला जे हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच. आता तिथे माझा भाऊ निलेश असतो."" म्हणजे तू बेबीची मुलगी...!"" बेबी...! कोण बेबी?" नानांनी विचारले." नाना, बेबी.....भावीण...तुमची सून भावीणीचा चेडू असा. तुमका चलतला मा? बाकी सगळ्या जगाक मोठे गजाली सांगतास."काकींनी ठिणगी टाकली आणि त्या गुपचुप बाहेर निघून गेल्या. घरात स्मशानवत शांतता पसरली. 'भावीणीचा चेडू' हे हा शब्द ऐकल्यावर नानांना कानात उकळते तेल ओतल्यासारखे वाटले.आपण गावातले मानकरी आपली सून भावीणीची मुलगी आहे हे ऐकून सगळे आपल्या तोंडात शेण घालतील. ते स्तब्ध झाले. खूप थकल्यागत त्यांना वाटू लागले." बाबा,भाविनीची मुलगी एक स्त्री नसते ?तिला मन नसतं.ती प्रेम करू शकत नाही?" शाल्मलीने नानांना विचारले.यावर नाना काहीच बोलले नाहीत. त्यांच्याकडे या प्रश्नांवर उत्तरे नव्हती. पण गावाच्या परंपरेत पोसलेल्या त्यांच्या मनाला काही गोष्टी पटत नव्हत्या." नाना, गावाला कळण्याअगोदर आम्ही पुन्हा निघून जातो."रमेश म्हणाला." नको,गावाला आतापर्यंत समजलं असणार काकूंनी सगळीकडे बातमी पोचवली असणार. तू आजचा दिवस रहा."सुरेश म्हणाला.घरात वातावरण तणावाचे होते.फारसे कोणीच बोलत नव्हते.नाना त्या संध्याकाळी देवळात गेलेच नाही. रात्रीचे जेवण झाले.नाना आपल्या खोलीत या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत पडले होते. बारा वाजले असणार.तेवढ्यात दरवाजा जोरजोराने कोणीतरी वाजवला." नाना....सुरेश... अरे कोणीतरी दार उघडा..लवकर."आवाज नाईक काकूंचा होता.नानांनी दरवाजा उघडला. सगळेच बाहेर आले होते." काय झाला? कित्याक आरडतंय. सवयच लागलीस... तुका." नाना वैतागले." कोणीतरी गाडी आणा.हे बेशुद्ध पडलेत... कुडाळक नेवक होया." त्या खूप घाबरल्या होत्या....रडत होत्या.सुरेश धावतच वाड्यात गाडी आणायला गेला.तेवढ्यात शाल्मली बाहेर आली.ती त्वरित नाईकांच्या घरी गेली.खोलीत नाईक काका अस्ताव्यस्त पडले होते.त्यांचा श्र्वास जवळ जवळ बंद झाला होता.शाल्मलीने काकांची नाडी बघितली." यांना ॲटक आलाय.तिने काकाच्या छातीवर दोन्ही हातांचे तळवे ठेवले व ती दाब देऊ लागली.काही वेळातच तिला थोडी हालचाल वाटली.तिने खाली वाकून त्यांना तोंडाने कृत्रिम श्र्वासोच्छास द्यायला सुरूवात केली.काकू तोंडात साडीचा बोळा कोंबून हुंदके देत हे सारे पाहत होती. शाल्मलीच्या प्रयत्नांना यश आले.काकांचा श्वास पूर्ववत सुरु झाला." आता यांना लवकर दवाखान्यात हलवावे लागेल.तसा धोका आता कमी झालाय."तेवढ्यात सुरेश व वाड्यातली माणसे गाडी घेऊन आली." मी पण येते.वाटेत गरज लागली तर पुन्हा सी.पी.आर.द्यावा लागेल." शाल्मली म्हणाली.अचानक काकू पुढे आल्या.शाल्मलीला घट्ट मिठी मारून म्हणाल्या.." मी...मी ..तुका त्रास दिलाय पण तूच मदतीक धावलय. माणूस खयसल्या कुळात जन्माला इलो त्यापेक्षा तो कसो असा ह्याच खरा असता." काकू म्हणाल्या. काकांना घेऊन गाडी कुडाळच्या दिशेने गेली.नाना जाणाऱ्या गाडीकडे बघत राहिले." पोरा, तू कोण, यापेक्षा तू नर्सधर्म निभायलस.तुझ्यासारखी गुणी सून आणखी खय मिळतली?" जिने पहिल्याच दिवशी तिच्या संसारात विष कालवले त्या स्रीचे कुंकू शाल्मलीने वाचवलं होतं. नानांच्या मनातले सगळे प्रश्न मिटले होते.कुणालातरी क्षमा करून आपलं कर्तव्य निभावणे हे खूप मोठे काम होते.सगळ्या धर्मापेक्षा मानवता हाच मोठा धर्म आहे हे त्यांना कळलं.' आज माझ्या डोळ्यात तू अंजन घातलय.उद्या सगळ्या गावाक सांगान तू माझी सून असतं म्हणान'नाना पुटपुटले.-----********------- समाप्त -------******--------***बाळकृष्ण सखाराम राणेन्युखासकिलवाडा गरड ता. सावंतवाडी