खाजगीकरण कादंबरीविषयी
खाजगीकरण नावाची कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अतिशय आनंद होत आहे. अलिकडील काळातच नाही तर आधीपासूनच खाजगीकरण असलेल्या संस्था. त्या संस्थेच्या खाजगीकरणातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, प्रगल्भतेची, उज्ज्वल भविष्याची नेहमीच हत्या होत असते. त्याचं कारण असतं पैसा. तो पैसा तेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्याच्या जवळ नसल्यानं असे विद्यार्थी उच्चतम शिक्षण घेवू शकत नाहीत. आजच्या शाळा महाविद्यालय ह्या बहुतःश खाजगी असून त्यात आपल्या पाल्यांना शिकवायचे असेल तर पैसा लागतोच. आज डॉक्टर, इंजीनियर बनायचं शुल्क अर्धा कोटी रुपये आहे. जर एखाद्या गरीब विद्यार्थ्यानं विचार केला की मलाही डॉक्टर, इंजीनियर बनायचं आहे तर तो बनूच शकत नाही. जरी तो गुणवान असला तरी. तेवढे पैसे गरीब विद्यार्थ्यांजवळ नसतात. ज्यातून गुणवत्ता मार खाते. खाजगीकरणाबद्दल सांगायचं झाल्यास खाजगीकरणातूनच बाजारीकरण निर्माण झालेलं असून देशाला गुणवान शिकलेले व्यक्तीमत्व हवे आहे की श्रीमंत घरचे शिकलेले मुडदे. तेच कळत नाही. आज जणू अशा खाजगी संस्था बाजार मांडल्यागत शिक्षण देण्यासाठी एवढा पैसा घेतात की ज्यावर विचारही करता येत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास डॉक्टरकीचं देता येईल. साधं एम बी बी एस डॉक्टर बनायचं शुल्क पंच्चावन लाखाच्या जवळपास आहे. त्यानुसार असा मुलगा शिकलाच तर तो आपल्या शिक्षणाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी करेल की गरीब रुग्णांची सेवा करायला करेल ? हा एक चिंतेचा प्रश्नच आहे. की तो त्याच खाजगीकरणातून रुग्णांना लुटायचा बाजार मांडेल. तेच करेल इंजीनियरही. ही शोकांतिकाच आहे. खाजगीकरण...... खाजगी संस्थेला कोणीही सल्ले देणं, आवडत नाही. जरी त्या संस्था सरकारचे अनुदान घेत असतील तरी. अशा संस्थांना त्या संस्थेत शिकविणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तेची काही किंमत नसते. त्यांना किती आणि कसं शिकवता येतं? हेही अशा खाजगी संस्था पाहात नाहीत. त्यांना नातेवाईक प्रिय असतात. पैसाही प्रिय असतो. तशीच त्यांना विद्यार्थी गुणवत्ता प्रिय नसते. माझी कादंबरी ही अशाच खाजगीकरणाचा शिकार झालेल्या पात्रावर आधारीत आहे. ज्यात मी दोन पात्र शिकार झालेली दाखविलेली आहेत. त्यात खाजगी असलेल्या संस्थेचा पात्रांना कसा कसा त्रास होतो. हेच दाखवलं आहे मी या कादंबरीत. आपण एक वाचक म्हणून ही कादंबरी वाचावी व विचार करावा. विचार करावा की अशा खाजगीकरणातून पुढं देशाचं भविष्य काय होईल. आपल्याच बिरादरीतील लोकांना शिक्षण घेता येणार काय? जे आपल्यापेक्षा थोडे गरीब असतील. विचार करावा की जर आपल्याच मुलाला आपल्याला डॉक्टर, इंजीनियर बनवायचे असेल वा आपल्या मुलाला डॉक्टर, इंजीनियर बनायचे असेल तर आपण बनवू शकू काय? यावर विचार करणारी कादंबरी आहे. आपण वाचावी व आवडल्यास एक फोन अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे
खाजगीकरण (कादंबरी)
(१)
नारायण सर आज जीवंत नव्हते. परंतु त्यांनी शिकविलेले ज्ञानामृत त्यांनी शिकविलेल्या वर्गाला आठवत होतं. ज्यातून ती मुलं घडली होती. नारायण सरांच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांनी शिकविलेल्या मुलांचं मन अगदी सुन्न झालं होतं. त्यातील एक होती त्रिशा. ती शाळा व त्या शाळेत नित्यनेमानं होत असलेला त्रास. त्या त्रासावर मात करुन नारायण सरांनी वर्ग घडवला होता. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना संस्कार देण्यासाठी ते झटले होते. त्यांनाही शाळेच्या खाजगीकरणाचा फटका पडला होता. कारण ज्या शाळेत नारायण सर काम करीत होते. ती एक खाजगी शाळा होती व शिक्षकानं काय करावं, काय करु नये ही बंधनं होती. त्यातच कोणत्याही शिक्षकाला देण म्हणून त्या शाळेच्या मालकाला पैसा द्यावा लागत असे. जो तशी देण देणार नाही. त्या शिक्षकांना त्रास दिला जात असे. तोही महाभयंकर. नारायण सर त्याचीच शिकार झाले होते. ते आपल्या शाळेतील संस्थाचालकाला देण म्हणून पैसे देत नव्हते. ज्यातून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावून संस्थाचालकानं त्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया राबवली होती. त्रिशा ही त्यांनी शिकविलेल्या शाळेतील एक मुलगी होती. जेव्हा ती नारायण सरांना तिच्या मोठेपणी भेटली. तेव्हापासून त्यांचं बोलणं व्हायचं. त्रिशालाही डॉक्टर बनायची पुष्कळ इच्छा होती. तिला गुणही चांगलेच होते. परंतु डॉक्टरीच्या संपुर्ण अभ्यासक्रमाला लागणारा पैसा तिच्याजवळ नसल्यानं ती नाईलाजास्तव शिक्षकी पेशात गेली. ज्यात तिच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेची कत्तल झाली होती. त्यातच त्रिशानं सरांना जो जो त्रास झाला तो वदवून घेतला होता. शिवाय नारायण सरांना झालेला त्रासच नाही तर ते जेव्हा त्रिशा आणि तिच्या वर्गाला शिकवीत असत. तेव्हाचे प्रसंग आज नारायण सरांच्या मृत्यूनंतर त्रिशाच्या मनपटलावर उमटल्यासारखे तिला आठवत होते. ते प्रसंग कधी तिला बेचैन करवून टाकत असत . त्रिशा आज मोठी झाली होती. तिला आजच्या शिक्षणपद्धतीचा विचार येत होता. कारण आजची शिक्षणपद्धती बाजारु असल्यागत वाटत होती. त्रिशा लहान होती, तेव्हा ती एका खाजगी शाळेत जात होती. जिला सरकारचं अनुदान होतं. ज्या शाळेत शुल्क नव्हतं. परिक्षाशुल्कही नव्हतंच. ना कॉन्व्हेंटच्या शाळा होत्या, ना एका वर्गावर शिकवायला कन्डक्टर ड्रायव्हर होते अर्थात दोन शिक्षक होते. त्रिशा जेव्हा लहान होती, तेव्हा त्यावेळचे शिक्षक हे अगदी सोज्वळ होते. त्यांना वेतनही भरपूर मिळायचं. बदल्यात ते आपल्या विद्यार्थ्यांना आपली लेकरंच समजायचे. मात्र त्यातही काही तांदळाचे खडेही असायचे. त्रिशा लहाणपणी जेव्हा शाळेत जात होती. तेव्हा तिला शिकवायला एक शिक्षक होता. तो शिक्षक खादीची बंगाली वापरायचा. त्याचा सदरा जुनाटच असायचा. तो सदरा घातला की वाटायचं. ते शिक्षक नसावेत. कोणीतरी शेतात काम करणारे शेतमजूर असेल. असा त्यांचा पेहराव असायचा. त्रिशाला आठवू लागला होता, तो लहानपणचा काळ. त्रिशा जेव्हा लहान होती, तेव्हा ती सोज्वळ होती. तशीच ती शांत होती. तिचं शांतपण पाहून तिच्या वर्गात शांतता पसरत असे. कारण ती वर्गाची प्रमुख होती व तिला कोणीही दंगामस्ती केलेल्या आवडत नसत. ती बारीक होती, तशीच स्वभावानंही बारीकच होती. तो वर्ग तिच्या शिक्षकांसाठी नवीनच होता. तसे शिक्षक ठरल्याप्रमाणे जेव्हा वर्गात गेले असतांना शिक्षकांना सांगण्यात आलं होतं की त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं. ते दरवर्षी विद्यार्थ्यांच्या वर्गात जेव्हा जायचे. तेव्हा ते विद्यार्थ्यांचं स्वागत करायचे. कधी फुल देवून तर कधी बोलण्यातून तर कधी टाळ्या वाजवून. परंतु झालं उलटच. शिक्षक जेव्हा वर्गात गेले, तेव्हा या वर्गातील विद्यार्थ्यांनी आधीच त्रिशाच्या नेतृत्वात शिक्षकांचंच स्वागत केलं होतं. आज दोन तीन दिवस झाले होते. एका मुलीला त्रिशानं शिक्षकाकडे पाठवलं. जिचं नाव विशाखा होतं. ती म्हणाली, "सर, आपला वाढदिवस कवा येते?" ते त्या विद्यार्थीनीचं बोबडं बोलणं. त्यावर दुजोरा देत एक अनुष्का नावाची मुलगी म्हणाली, "सर बोलो नं, आपका बर्थडे कब आता है?" शिक्षकासमोर प्रश्न पडला. ही मुलं का बरं वाढदिवस विचारत असावीत. त्यांनी सांगायचं टाळलं व म्हटलं, "चूप बसा, मुकाट्यानं जागेवर बसा." मुलं मुकाट्यानं खाली बसली. त्यांना वाईट वाटलं. तो अपमान वाटला क्षणभराचा. परंतु ती लहानशी मुलं. त्यांना शिक्षक कितीही रागावत असले तरी राग वाटत नाही. तसंच घडलं. तो वर्ग व त्या वर्गाला शिकविणारे नारायण सर. त्या सरांचा इतिहास विद्यार्थ्यांनी ऐकला होता की काय कुणास ठाऊक. दोन तीन दिवस झाले होते व त्या विद्यार्थ्यांनी त्रिशाच्या नेतृत्वात आपल्या शिक्षकांना विचारुन टाकलं की सर आपला वाढदिवस केव्हा आहे. त्यावर उत्तर देणारे नारायण सर. मुलं थोडावेळ गप्प राहिली. त्यानंतर कुजबुज सुरु झाली. त्यातच नारायण सरानं आपलं शिकविणं सुरु केलं. अशातच दुपार झाली व दुसरी एक अम्बिका नावाची मुलगी सरांकडे आली व तिनंही तोच प्रश्न विचारला, 'सर आपला वाढदिवस केव्हा आहे. सर सांगा न सर?' सरांनी विचारलं, "कशाला हवा तुम्हाला माझा वाढदिवस?" "सर असाच हवा." ते तिचं बोलणं. त्यावर सेजल नावाची एक मुलगी म्हणाली, "सर, आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचाय." "वाढदिवस! कशाला? अन् शिक्षकांचा काय वाढदिवस साजरा करावा लागतो. अन् हे वाढदिवस साजरं करणं वेड्या माणसांचं काम असतं. तुम्ही वेडे झाला आहात काय? माझा वाढदिवसच नसतो. कारण जो जन्म घेतो, त्याचा वाढदिवस असतो. मी तर जन्मच घेतला नाही." नारायण सरांनी गंमत केली. तो पाचवीचा वर्ग होता. परंतु हुशार वर्ग होता. आजपर्यंत चवथीपर्यंत त्यांच्या मनोवृत्तीला व त्यांच्यातील विचारांना कोणीच स्थान दिलं नव्हतं. याहीवर्षी तसंच होणार काय? असंही कदाचीत कारण त्यांच्यासमोर होतं की काय कुणास ठाऊक. दुसरा दिवस उजळला. सरानं आपला वाढदिवस सांगण्याचं टाळलं होतं. परंतु त्या दिवशी सरांना माहीत न होवू देता त्यांना जणू आनंदाचा सुखद अनुभव देण्यासाठी त्या विद्याथ्यांनी पैसे गोळा केले. त्यानंतर एक लहानसा केक आणला. तशी मेणबत्ती आणली. तो केक सरांच्या समोर ठेवला व म्हटलं, "सर, आता आपण काही बोलू नका. आम्ही आपला वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार." त्या मुलांनी सरांचा वाढदिवस आहे असं गृहीत धरुन केक आणला होता. तो केक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकासमोर ठेवला व त्यात मेणबत्ती लावून तिच्यावर फुंकर घालायला लावली. तो केक कापायलाही लावला व त्या दिवशी त्यांचा मुलांनी वाढदिवस साजरा केला. नारायण सर. फारच कडक व्यक्तिमत्व. राहणी साधी. परंतु विचार उच्च होते. ते विद्यार्थ्यांचा लाड करायचे. परंतु मारकुंडेही तेवढेच होते. त्यांच्याबद्दलचं मुलांनी बरंच काही ऐकलं होतं. त्रिशाला आज सगळं आठवत होतं. कदाचीत त्यांच्यातील मृदू स्वभाव पाहून त्रिशानं व तिच्या वर्गातील मुलांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं असेल. वर्षभर सरांनी असंच मृदू राहावं. आम्हाला मारु नये व रागवू नये म्हणून. वाढदिवस साजरा झाला होता. तो दिवस फारच आनंदात गेला व सरांनी ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. आपला इतिहास जाणून न घेता. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी अतीव मेहनत घेतली. खास करुन आपल्या घरी पैसेही मागितले असतील. पैसे मागण्यासाठी खोटेही बोलले असतील. परंतु वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे आणले. तेव्हा आपण आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना कदाचीत मारलेही असेल, रागावलेही असेल, परंतु यावर्षी त्यांना वर्षभर मारायचे नाही. रागवायचेही नाही. रागवायचे नाही. बरोबर आहे. कारण रागावण्यानं मानसिकता खराब होत असते. हे जरी बरोबर असलं तरी शिक्षक जर विद्यार्थ्यांना रागवत नसतील तर मुलं जास्त दंगामस्ती करीत असतात. तो नारायण सरांचा निर्धार. विद्यार्थ्यांना न रागवण्याचा निर्धार. नारायण सर आता आपल्या विद्यार्थ्यांवर रागवत नसत. तरीही मुलं शांत बसत असत. असेच पंधरा दिवस निघून गेले. पंधरा दिवसानंतर सरांनी विचारलं, "आपल्याला कॅप्टन बनवायचा आहे. बोला, कोणाकोणाला कॅप्टन बनायचं आहे. जरा उभे व्हा." कॅप्टन....... सर जेव्हा लहान होते व ते शालेय शिक्षण शिकत होते. तेव्हा जसे त्यांना शिकविणारे सर म्हणायचे. तेच सर नियमीतपणे दरवर्षी म्हणत असत. तेच सरांनी याहीवेळेस म्हटलं. परंतु कोणीच त्यावर प्रतिसाद दिला नाही. तोच तो प्रश्न नारायण सरांनी पुन्हा विचारला. तेव्हा एक मुलगी म्हणाली, "सर, ऐसा मत बोलो की किसकिसको कप्तान बनाना है।" "तो फिर क्या बोलना?" "सर, किसको कप्तान बनाना है, ऐसा बोलो." सरांनी तसाच प्रश्न केला. ज्यातून त्रिशाचं नाव एकमुखानं पुढं आलं व नारायण सरांना तिचं नाव आनंदानं स्विकारावं लागलं. जे सार्थकही ठरलं होतं. कॅप्टन...... ज्याप्रमाणे जहाजात कॅप्टन हवा असतो. तसा वर्गातही कॅप्टन हवा असतो. जर कॅप्टन चांगला असेल तर जहाज बुडत नाही. तीच अवस्था वर्गातही असते. वर्गाचा कॅप्टन जर चांगला असेल तर तो वर्गही शांत असू शकतो. त्रिशात स्टेजडेरींग नव्हतं. जसं स्टेजडेरींग कॅप्टनमध्ये असायला हवं. परंतु हुशार होती. तिला सर्व गोष्टी यायच्या व ती इमानदारीनं सर्व काही लिहायची. शाळेतील अभ्यासही नित्यनेमानं करायची. ती कधीच समोरासमोर करीत नव्हती. नारायण सरांना कप्तान दुसर्याच मुलीला करायचं होतं. ती त्रिशा त्यांच्या ध्यानात व मनातही नव्हती. त्यांच्या निशाण्यावर कॅप्टन पदासाठी दोन दुसर्याच मुली होत्या. परंतु सर्वांनी त्रिशाचं नाव घेताच त्यांना नाईलाजानं चूप बसावं लागलं. तसंच उपकॅप्टन म्हणूनही दुसरीच मुलं सरांच्या मनात होती. परंतु सरांना त्या पदाबाबत आपल्या मनातील गुपीत मागे घ्यावं लागलं. सुरुवातीचा काळ बरा गेला. ती नियमित अभ्यास करायची. नियमित शाळेत यायची. परंतु नंतरच्या काळात त्रिशाची प्रकृती बरोबर नसायची व ती शाळेला बुट्टी मारायची. त्यातच वर्ग सांभाळण्याची चिंता पडायची. कारण बाकीच्या मुलांना मुलं सांभाळणं कठीण जायचं. त्रिशाला मात्र मुलं ऐकायची. तो वर्ग....... त्या वर्गात तब्बल तेवीस मुलं होती. बरीच मुलं ही बुद्धू होती. ज्यात इशा, आस्था, तृप्ती, अम्बिका, विधांत, प्रिन्स, अनुष्का, कुसूम, सोनम यांचा समावेश होता. नारायण सरानं सांगीतलं की बालवाचन घ्या व त्यावरुन वाचन शिका. लवकर वाचन शिका. तशी सर्वांनी बालवाचन विकत घेतली व वर्षाअंती मुलं वाचायला शिकली होती. एक मुलगी होती की जी वाचन शिकली नाही. कारण ती शाळेत नियमितपणे येतच नव्हती. त्रिशा लहान होती. परंतु तिच्यात महत्वाकांक्षा कुटकूट भरली होती. ते नेतृत्वही तिच्यात कुटकूट भरलं होतं. त्या तिच्या मैत्रीणी प्रसंगी त्या वर्गातील शिक्षकांना ऐकत नसत. परंतु तिला ऐकत असत. ती वर्गात कधी जास्त अभ्यास करीत असल्याचे जाणवत नव्हते. तसंच तिच्या घरीही ती जास्त अभ्यास करीत नाही असंच सारखं म्हटलं जात असे. तशी ती अभ्यास करतांना दिसतही नव्हती व ती स्वतः अभ्यास करीत असल्याचे दाखवतही नव्हती. तो वर्ग मुळात शांतच वर्ग होता. तसा तो वर्ग वर्षभर शांत राहिला. कधी एखाद्यावेळेस नारायण सर सुट्टीवर असायचे. तेव्हा त्रिशा वर्गाला एवढं उत्कृष्टपणे सांभाळायची की कोणाला सहजच वाटेल की सर वर्गात असतील. असा वर्ग सतत गुंग आणि अभ्यासात व्यस्त दिसायचा.
(२)
तो वर्ग व त्या वर्गातील मुलं, खासकरुन मुली. फारच क्रियाशील होत्या. दोनचार मुलं जर सोडली तर बाकी मुलं हुशारच होते. काही मुलं ही नेतृत्व गुणानं बरेच पुढे होते. कधीकधी नारायण सर त्यांना शिकवितांना पाठ्यक्रमाच्या बाहेरीलही गोष्टी सांगत असत. ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना आवडत असत. असाच एकदाचा प्रसंग. नारायण सर सांगत होते की एक रेशमा नावाची मुलगी. पाच बहिणी. त्यातच रेशमा मोठी. मुलगा मुलगी समान न मानणारे काही आईवडील. ज्यात त्या घरी मुलं जन्मास घालतांना भेदभाव झाला होता. मुलगा हाच घरचा वारस असतो. असे मानणारे त्या मुलीचे आईवडील. तिला भरपूर शिकायचे होते. रेशमाचे वडील हे अशिक्षीत होते व अशावेळेस रेशमाचा वर्ग शिकवायला नारायण सराकडे आला. त्यातच रेशमा आज्ञावंत व थोडीशी हुशार होती. तसं पाहिल्यास जी मुलं अभ्यासात हुशार असतात. ती मुलं शिक्षकांनाही आवडतातच. रेशमाचंही तसंच झालं होतं. रेशमाची हुशारी पाहून तिच्या शिक्षकांना ती शिकावी असं वाटत होतं. परंतु तिच्या घरची परिस्थिती व तिच्या घरी असलेल्या तिच्या इतर बहिणी. यामुळं ती शिकावी असं घरच्यांना वाटत नव्हतं. रेशमाला शिकायचं होतं. भरपूर शिकायचं होतं. तसं पाहिल्यास नारायण सर हे चवथीपर्यंतच शिकवायचे. रेशमाला पकडून घरात पाच मुली. एक भाऊ, शेवटचा. त्याचा घरात फार लाड होता. असा लाड की घरची सर्व मंडळी त्याला शिकवायला तयार होती. घरात मुलगा मुलगी असाच भेदभाव होता. अशातच रेशमा सातवी झाली व तिच्या वडीलानं तिला शिकवायचं नाकारलं. रेशमाला तिच्या वडीलानं शिकवायचं नाकारताच एक दिवस ती नारायण सराकडे आली. म्हणाली, "सर, माझे वडील शिकवायला तयार नाहीत. ते म्हणतात की शिकू नकोस." ते तिचं बोलणं. त्यावर नारायण सरानं विचारलं, "का बरं?" "सर, माझ्या भावाला शिकवायचंय. अन् मला ते तरी का बरं शिकविणार! माझ्या घरी आम्ही पाच बहिणी आहोत. मुलगा मुलगा करता आम्हाला भाऊ झाला. सर, तो नवसाचा आहे. परंतु मला शिकायचं आहे सर. तुमच्यासारखं शिकायचं आहे. आपण माझ्या वडीलांना समजावून सांगा ना सर." नारायण सरानं रेशमाचं बोलणं ऐकलं. त्यांना तिच्या बोलण्यावर काय बोलावं व तिला चूप करावं हे समजत नव्हतं. ते विचार करीत होते. अशातच रेशमा म्हणाली, "मी येते सर. प्लीज या सर घरी." रेशमा निघून गेली. तसा तो दिवस नारायण सरांसाठी अतिशय वेदनेत गेला होता. ते दिवसभर विचार करीत होते. तसा गतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरुन तरळू लागला. ते विचार करु लागले. विचार करु लागले होते की लोकं मुलगा मुलगी का बरं भेदभाव करीत असावेत? ती रेशमा व तिच्या घरी खाणारी तोंड जास्तच. घरची कमाई त्या मुलांच्या जेवनालाच पुरत नाही. मग त्यांचे कपडेलत्ते वेगळेच. शिवाय घरी कोणाकोणाला शिकविणार. नारायण सरांना तिच्या बोलण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. तरीही एक प्रयत्न म्हणून ते रेशमाच्या घरी गेले. त्यावेळेस त्यांचं रेशमाच्या घरी स्वागतच झालं. आधी चहापान झाला व चहापानानंतर रेशमाच्या वडीलांना नारायण सरांनी म्हटलं, "एक विचारायचं होतं आपल्याला. विचारु का?" "बोला ना सर. काय बोलायचं आहे ते?" "रेशमाला शिकायचंय. परंतु आपण शिकवाल तर." नारायण सरांचं उत्तर. नारायण सरांनी बोललेले शब्द. त्यावर रेशमाचे वडील चूप बसले. तोच काही वेळ जाताच नारायण सर म्हणाले, "खर्च अजिबात लागणार नाही. निदान दहावी तरी शिकू द्या. अन् लागलाच तर पाहून घेवू." तो नारायण सराचा प्रयत्न. त्यावर रेशमाच्या वडीलांनी होकार दर्शवला व रेशमा आठवीपासून पुढे शिकती झाली. दिवसामागून दिवस जावू लागले. पुढं रेशमा दहावीत गेली. त्यावेळेसही तोच प्रश्न. रेशमा चांगल्या गुणानं दहावी पास झाली. इतरांपेक्षा तिला चांगलेच गुण होते. अकरावीला प्रवेश घ्यायचा होता. परंतु वडील तिला पुन्हा शिकवायला तयार नव्हते. ती परत नारायण सरांकडे आली. तिचा तोच प्रश्न. शेवटी नारायण सर पैसा जरी तिच्या शिक्षणाला देतील. परंतु शिकविणारे तिचे वडील. ते तर तयार हवेत ना. घरी जन्मास आलेल्या मुलांची संख्या जास्त. त्यातच पुन्हा रेशमा नारायण सराकडे. शेवटी नारायण सरांना विचार आला. जर तिच्या वडीलांनी मला वेगळाच प्रश्न विचारला तर..... तर काय करायचं. शेवटी तसा विचार करुन नारायण सर परत पुन्हा तिच्या वडीलांचे घरी गेले. त्यानंतर त्यांनी तिच्या वडीलांना आनंदाची बातमी सांगीतली. म्हटलं, "आपली मुलगी दहावी झालीय." "होय." "आता काय करणार आहात?" "म्हणजे?" "म्हणजे शिकविणार आहात की नाही शिकविणार आहात म्हटलं." तो नारायण सरांचा प्रश्न. त्यावर उत्तर देत रेशमाचे वडील म्हणाले, "सर, शिकवलंही असतं. परंतु तुम्हाला तर माहीत आहे, आमच्या घरची परिस्थिती. आमच्या घरी खाणारी तोंड जास्त आहेत. परत त्यांचं शिक्षण. कसं शिकविणार?" "एक उपाय सुचवू का? कराल का? थोडासाच खर्च लागेल." "सुचवा ना." "आपण तिला शिकू द्या. जेवढी शिकते तेवढी. तुमचा काहीच पैसा लागणार नाही. ती शिकवणी घेईल व त्यातून जो पैसा येणार. त्या पैशात ती शिकेल. तुम्हाला तिच्या शिकविण्याला एक छदामही लागणार नाही. तशी ती हुशार आहे. मी युक्ती सांगेल तिला. शिवाय तिच्या शिकवणी घेण्यानं तुम्हालाही उरलेल्या पैशाचा फायदा होईल. शिवाय तिची ही भावंडं, तिच्याच शिकवणी वर्गातून आपलं करीअरही घडवू शकतील." "पण हे शक्य होईल का?" "हो. शक्य होईल. तुम्ही फक्त हो म्हणा. वाटल्यास मी तिच्या कॉलेजचं शुल्क भरतो." "नाही सर. आपण म्हटलं तेवढंच भरपूर झालं. मीच तिच्या कॉलेजची फी भरतो. तुम्ही त्रास घ्यायची गरज नाही. मात्र तिनं चांगलं शिकावं म्हणजे झालं." नारायण सर रेशमाच्या घरुन घरी आले. त्यानंतर जवळपास एका महिन्यानं रेशमा सरांना भेटायला आली. त्यावेळेस नारायण सरांनं तिला खुशियाली विचारली. तेव्हा तिनं तिचं नाव महाविद्यालयात टाकल्याचं सांगीतलं. त्यानंतर सरांनी तिला उपाय सांगीतला. शिकवणी घ्यायचा. त्यानंतर रेशमानं शिकवणी वर्ग सुरु केला होता व ती आता जास्तीतजास्त शिकवणी शिकवून पैसा कमवीत होती. त्यातील काही रक्कम स्वतःच्या शिकण्यावर खर्च करीत होती तर उरलेली रक्कम वडीलांनाही देत होती. ज्यातून तिला उच्च शिक्षण घेता आलं होतं. आज रेशमा घराचा आधार बनली होती. त्यानंतर तिचा विवाहही झाला होता. आज ती प्राध्यापक या पदावर कार्यरत होती. मध्यंतरी ती नारायण सरांना भेटली नाही व तिचा संपर्कही झाला नाही. ती कुठे होती. कोणत्या अवस्थेत होती हेही काही नारायण सरांना समजले नाही. तसा तो एक प्रसंग आला. जेव्हा नारायण सर एका देवळात गेले होते. एकदा नारायण सर एका देवळात गेले व उभे होते. तोच एक महिला घुंगट घातलेली त्यांच्याकडे आली. तिच्या कडेवर मुल होतं. ती येताच त्यांच्या पायावर नतमस्तक झाली व उभी होताच तिनं म्हटलं, "सर, आपण मला ओळखलं नाही का?" नारायण सरानं तिच्याकडं पाहिलं. त्यांनी डोक्याला ताण दिला. त्या चेहर्यावर थोडा बदल झाला होता. तसं सरानं तिला ओळखलं नसल्यानं त्यांनी तिला म्हटलं, "मला ओळख सांगा. मी ओळखलं नाही." "मी रेशमा. आपण मला शिकवलं. वर्ग चवथीत शिकवलं सर. आपल्याला आठवलं का आता." रेशमा नाव....... रेशमा नाव तिनं सांगताच नारायण सरांच्या डोक्यात ट्यूबलाईट लागला. तसं त्यांनी कडेवरचं मुल पाहून विचारलं. "हे कोण?" "माझं मूल. माझं लग्न झालं सर." "मग तुझे मिस्टर कुठाय?" तुझे मिस्टर कुठाय असं म्हणताच तिनं दूर उभ्या असलेल्या आपल्या पतीला बोलावलं. तसा तो जवळ येताच ती म्हणाली, "हे माझे नारायण सर. यांच्यामुळेच मी एवढ्या समोर गेली. आज एवढी शिकू शकली. ते यांच्यामुळेच झाले." ते तिचं म्हणणं. त्या बोलण्यावर नारायण सरांना अगदी हायसं वाटलं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. सरांनी तिला घरी ये म्हटलं. तिनंही सरांना घरी या म्हटलं आणि ती निघून गेली. आज बरेच वर्ष झाले होते. रेशमा आज त्यांचे घरी आली नव्हती, ना तेही तिच्या घरी गेले होते. ती आता कुठे होती, कुठे नाही हे मात्र त्यालाही माहीत नव्हते. ते कधीकधी तिची आठवण करायचे. परंतु ज्याप्रमाणे पशुपक्षात आईच्या गर्भातून निघालेली पाखरं जशी आकाशात उत्तूंग भरारी घेत निघून जातात. ती पुन्हा घरी परतत नाहीत. तसंच तिचंही झालं होतं.
(३)
तो वर्ग व त्या वर्गातील एक प्रसंग. नारायण सरानं आपल्या आयुष्यात घडलेली व रेशमा नावाची मुलगी कशी आपल्यासमोर आली याचं वर्णन सांगीतलं होतं. आज नारायण सर आपल्या वर्गाला मारत नव्हते. याचं दृश्य त्रिशाला आठवू होतं. त्रिशा विचार करीत होती व तिला आठवत होता तो एक प्रसंग. ज्या दिवशी नारायण सर वर्गात नव्हते. काहीतरी कारणावरुन ते शाळेत आले नव्हते. ज्यात तो वर्ग शांत होता. वाटत होतं की सर वर्गातच असावे. त्यावेळेस एक शिक्षिका म्हणाली होती की वर्ग असावा तर असा. दुसर्या दिवशी सर आल्याबरोबर त्यांना जेव्हा हे कळलं. तेव्हा अतिशय सुंदर वाटलं होतं. संस्कार....... शालेय जीवनात शिकत असतांना विद्यार्थ्यांना कधीही संस्कार द्यायचा असतो असं नारायण सरांना वाटत होतं. ते विद्यार्थ्यात महत्वाकांक्षा भरत होते. वर्गात काही मुलं होते की त्यांना असे संस्कार आवडत नव्हते. ते नेहमी व नित्यनेमानं दंगामस्तीच करीत असत. नारायण सरांना संस्कार आवडायचे. मात्र देव धर्म जातीपाती त्यांना जास्त करुन आवडायचे नाहीत. परंतु गोष्ट होती संस्काराची. ते संस्कार कसे फुलवता येतील विद्यार्थ्यात. नारायण सरांना चिंता पडली होती. तसे ते दरवर्षीच संस्काराच्या गोष्टी सांगायचे. परंतु वास्तविक संस्कार नावाची गोष्ट फुलवीत असतांना ती आतापर्यंत कशी फुलवायची हे नारायण सरांना बरोबर शिकवता येत नव्हतं. तसं पाहिल्यास सरांनी ऐकलं होतं की संस्कार ही गोष्ट फुलवायची असेल तर धर्म व देवादिकांची मदत घेणं गरजेचं. कधीकधी त्यात अंधश्रद्धा आणि चमत्कारही आणावे लागतात. तरंच संस्कार फुलवता येवू शकतात. नारायण सरांना याची कल्पना होती परंतु ते काही शाळेत देव, धर्म वा अंधश्रद्धा व चमत्कार आणू शकत नव्हते. कारण शाळा हे विद्येचं माहेरघर होतं. त्याठिकाणी अंधश्रद्धा वा चमत्काराला थारा नव्हता. अशातच दरवर्षी नारायण सरांना विचार पडायचा की संस्कार फुलवायचा कसा? अशातच एक मुलगी सरांकडे आली. जिला त्रिशानंच पाठवलं होतं. म्हटलं होतं की सरांना काही पैसे मागा. बाकीचे आपण टाकू. आपण एक सरस्वतीची फोटो आणू. जिची आपण दर शुक्रवारी पुजा करु. नारायण सरांना मुलांनी पैसे मागीतलेले चालत होते. परंतु ते पैसे वह्या, पेन, पेन्सिल साठी मागीतलेले आवडत होते. सरस्वतीच्या फोटोला पैसे मागणं तेवढं आवडत नव्हतं. अशातच एक मुलगी सरांकडे आली. म्हणाली, "सर, पन्नास रुपये हवेत." "कशाला?" "सरस्वतीचा फोटो घ्यायचाय. " "कशाला घेता?" "पुजा करण्यासाठी." "एवढे पैसे लागतात का?" "होय सर. काचेची घ्यायची आहे. दोनशे रुपयाची आहे." "मग बाकी पैसे?" "आम्ही टाकणार." नारायण सरानं ते ऐकलं. ते पैसे वह्या, पुस्तका साठी जरी वापरायचे नव्हते. तरी त्यांनी ते दिले. कारण होतं, त्यात असलेला विद्यार्थ्यांचा आनंद. तसं पाहिल्यास ते पुर्णच पैसे देवू शकले असते. परंतु त्यांनी ते देण्याचं टाळलं. कारण नारायण सरांना माहीत होतं की जेव्हापर्यंत काही ना काही पैसे विद्यार्थ्यांचे जाणार नाहीत. तोपर्यंत त्यांना त्या फोटोचं मोल वाटणार नाही. त्या फोटोची ते जपणूक करणार नाहीत. ते नारायण सरांनी दिलेले पन्नास रुपये. त्यात बाकीचे रुपये टाकून त्या विद्यार्थ्यांनी ते पैसे सत्कार्यात लावले. एक फोटो, तिही रुपेरी त्यांनी विकत आणली. ज्यातून ते दर शुक्रवारी पुजा करु लागले होते. पैसे गेले होते. परंतु नारायण सरांना जे अपेक्षित होतं. ते करता येत होतं. संस्कार फुलवता येवू शकत होतं. एकदा एका मुलीनं सांगीतलं की अमूक मुलगी आपल्या आईचं ऐकत नाही. तेव्हा सर म्हणाले, "ही सरस्वती आणली ना तुम्ही. हीच रागावेल. जेव्हा तुम्ही आईचं ऐकणार नाहीत. आपल्या आईवडीलांचं नेहमी ऐकत जा. जो आपल्या आईवडीलांचं जास्त ऐकेल. तो अभ्यासात नक्कीच पुढं जाईल. सरस्वती माता त्याला जास्त बुद्धी देईल. त्याच गोष्टीचा परिणाम की मुलं आपल्या घरी नेहमीपेक्षा जास्त कामं करु लागली होती. एकदाचा असाच प्रसंग. सरांनी एक प्रश्न केला होता. ''कोणाकोणाचे बाबा दारु पितात?" दारु वाईट व दारुपासून असंख्य आजार होत असतात. मुत्राशय व किडणीचे आजारही होतात. तसा एक पाठ वर्गात होताच. पाठ शिकवीत असतांना नारायण सर म्हणाले, "जर तुमचे बाबा दारु पीत असतील तर त्यांना समजावून सांगायचं. दारु पिवू नये. वाईट असते. दारुनं आजार होतात. कुटूंब उध्वस्त होतं. सरस्वती रागावते. त्याचबरोबर लक्ष्मीही रागावते. आपण गरीब आहोत. कारण तुम्ही दारु पिता. म्हणूनच लक्ष्मी व सरस्वती रागावलेली आहे. कदाचीत असं सांगीतल्यानं वडील सुधारतील. दारु पिणार नाहीत." विद्यार्थ्यांना नारायण सरांनी तसं म्हणताच मुलांच्या चेहऱ्यावर आठ्या दिसल्या. वाटलं की त्यांना त्यांच्या ह्रृदयाशी जीवलग असणारा किती मोठा प्रश्न विचारला. तशी मुलं बोलकी झाली. म्हणाली, "सर, आमचे वडील आमचं काहीच ऐकत नाहीत. ते दररोज दारु पितात." "तुमचंही ऐकत नाही." "होय. आमचंही ऐकत नाही. एवढ्यात नारायण सरांना एक गोष्ट समजली की एका मुलीच्या आईनं आपल्या पतीच्या दारुपायी स्वतः कितीतरी गोळ्या एकाचवेळेस खाल्ल्या होत्या. ज्यातून ती मरता मरता वाचली होती. संस्कार...... नारायण सरांना आता वाटत होतं की विद्यार्थ्यांना संस्कार लावता येतील. परंतु विद्यार्थ्यांच्या वडीलांना. त्यांना संस्कारी कसं बनवता येईल. जो एक चिंतेचा विषय होता. तसे ते विद्यार्थ्यांना म्हणाले, "हे बघा, तुम्ही मोठे झाल्यावर दारु प्यायची नाही. कोणते व्यसनं बाळगायचे नाही. खुप शिकायचं, रेशमासारखं. नाही तर ही सरस्वती माता रागवेल. तुम्हाला माफ करणार नाही." मुलांनी त्यावर होकार दिला व संस्कार पालन करण्याचं आश्वासन दिलं. ते ऐकताच नारायण सरांना अतिशय आनंद झाला होता. पुढं विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नारायण सरांचे बोल सांगीतल्यानं वडीलांचीही दारु सुटली होती हेही ऐकायला मिळालं होतं. त्याचा नारायण सरांनाच अतीशय आनंद झाला होता.
(४)
शिवजयंती येणार होती. मुलांनी काही पैसे गोळा केले होते. त्यांनी सरांना पन्नास रुपये मागीतले. तसं सरांना मागील वेळच्या पन्नास रुपयाची आठवण आली. त्यावेळेस त्या मुलांनी सरस्वती मातेची फोटो विकत आणली होती. आता नेमकं पन्नास रुपयाचं काय करणार? शिक्षक असलेल्या नारायणाच्या मनात विचार आला. तसं त्यांनी विचारलं, "मलाही कळू द्या तुम्ही पन्नास रुपयाचं काय करणार ते?" "काहीतरी गुपीत आहे सर." "गुपीत! नेमकं काय गुपीत आहे?" सरांचा बाळबोध प्रश्न. तशी अनुष्का आपल्या बोबड्या वाणीत म्हणाली, "सर हमने आपकी फोटोफ्रेम बनाई है।" "लेकीन आपने मेरी फोटो कहॉ से लाई?" "यु ट्युब से।" तिनं उत्तर दिलं. "लेकीन यह बनाई ही क्यो?" "सर, आपको गिफ्ट देना है।" "अभी क्या मेरा बर्थडे है?" "सर, आनेवाला है।" "धुपकाल मे है मेरा बर्थडे।" 'सर, हम जानते है, आपका बर्थडे कब है?" "कब है बर्थडे? बताओ तो सही?" "उनतीस तारीख को?" "कैसे पता चला?" "सर, हमने खोज निकाली है।" सरांनी त्यावर जास्तच जोर देत विचारलं की त्यांनी त्यांची जन्मतारीख कुठून आणली. त्यावर विद्यार्थ्यांनी स्वतः काढून दाखवली जन्मतारीख. तेव्हा वाटलं की विद्यार्थी हे स्वतःच अतिशय मोठ्या प्रमाणात हुशार असतात. काही गोष्टी ज्या सरांना सांगावं लागत नाही. त्या त्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असतात. नारायण सरांनी ते पाहिलं व त्यांनी न अडखळता त्यांना पन्नास रुपये देवून टाकले. थोड्याच वेळाचा अवकाश. विद्यार्थ्यांनी एक फारच मोठी फ्रेम. जिला चांगलं सुशोभित वेष्टन होतं. ती आणली. तिच्या आत काय होतं, ते उघडल्यावरच कळणार होतं. त्यानंतर अनुष्का म्हणाली, "सर, आपको इसी फ्रेम का कव्हर लगाने के लिए ही पचास रुपये मंगे है। अब सर इस फ्रेम को खोलो। यह आपकी बर्थडे गिफ्ट है।" "देखो, यह गिफ्ट मेरे बर्थडे के लिए है ना। फिर यह उसी दिन देना। जिस दिन मेरा बर्थडे रहेगा।" विद्यार्थ्यांनी ते मान्य केलं व ते घरी नेलं. ते गिफ्ट बर्थडेच्या दिवशीच सरांना बक्षीस दिलं होतं. ते बक्षीस, बक्षीस नव्हतं तर ती विद्यार्थी आणि शिक्षकात निर्माण झालेल्या नात्याची विण होती. जी विचित्र अशा नाजूक धाग्यांनी विणलेली होती. अलिकडील काळात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात जवळीकतेचं नातंच निर्माण होत नाही. कधीकधी शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना मारतात किंवा आपलं वागणं मायाळू ठेवत नाहीत. तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांचा राग येत असतो. मग बक्षीस तर दुरच. साधे ते विद्यार्थी ते शिक्षक दिसताच त्यांच्या जवळपास येत नाहीत. मुलाखत घेणं वा बोलणं तर दुरच. तोही दिवस त्रिशाला आठवू लागला होता. जेव्हा ती विचार करु लागली होती. आज मात्र ते बक्षीस दिसत नव्हतं. ना आज विद्यार्थ्यात त्या स्वरुपाची आत्मीयता दिसत होती. ना आता विद्यार्थी तशा स्वरुपाचे गिफ्ट देत होते. गिफ्ट..... गिफ्टवरुन आठवत होती तिला अनुष्का नावाची मुलगी. ती अनुष्का, जिचा एक दिवस वाढदिवस होता. वाढदिवस अशा दिवशी की जी फेब्रुवारीची अठ्ठावीस तारीख होती. त्या दिवशी तिनं चॉकलेट आणलं होतं व ती पुर्णतः इंग्रजी पोशाख घालून आली होती आणि चॉकलेटही इंग्लंड लिहिलेलं आणलं होतं तिनं. तिनं चॉकलेट वाटलं व ती म्हणाली, "सर मला वाढदिवसाचं बक्षीस द्या ना. परंतु नारायण सरांनी तिला ते बक्षीस दिलं नाही. तशी ती शेवटी जातांना म्हणाली की जर सरानं तिला एक पेन जरी बक्षीस म्हणून दिला असता तर बरे वाटले असते. अनुष्कानं म्हटलेले ते शब्द. ते पाहून नारायण सरांनी तिला दुसर्याच दिवशी बक्षीस दिलं. कारण तिनं म्हटलेल्या शब्दाचं त्यांना वाईट वाटलं होतं. ते बक्षीस...... त्या बक्षीसावरुन आज त्रिशाला आणखी एका बक्षीसाची गोष्ट आठवत होती. ती म्हणजे त्यांच्या वाढदिवशी मिळाली असलेली गिफ्ट. नारायण सरानं एक पुस्तक लिहिली होती. तिच्यात गतकाळातील एका भारती नावाच्या मुलीचं पात्र लिहिलं होतं. ज्या मुलीनं स्वतःचं कथानक स्वतः वाचलं. त्याच मुलीनं सरांच्या वाढदिवसाला एक बक्षीस म्हणून एक दैनंदिनी व पेन दिला होता. आज तो क्षण जेव्हा नारायण सरांनी वर्गात सांगीतला. त्याच क्षणाचा किस्सा तिला आता आठवायला लागला होता. आज तोच विचार तिच्या मनात होता. तो विचार तिच्या मनात घोळत होता. नारायण सरांची आठवण येत होती तिला. वाटत होतं की सरांना भेटावं. परंतु सर नेमके कुठं राहतात? हे अद्यापही तिला माहीत नव्हतं. तशी त्या सरांची आठवण येताच तिला कासावीस व्हायचं. वाटायचं की काश! नारायण सर जीवंत आहेत की नाही.
(५)
अनुष्का हिंदी भाषा बोलणारी होती. ती बिहार वरुन आलेली होती. तिला मराठी बरोबर जमत नव्हती. परंतु तुटकीफुटकी मराठी बोलत होती. तशी मराठी तिला पुर्णतः समजत होती. तसं पाहिल्यास वर्गात असे हिंदी भाषा बोलणारे भरपूर विद्यार्थी होते. परंतु त्यांना मराठी देखील बोलता येत होती. मराठी चांगल्या प्रकारे समजतही होती. काही मुली छत्तीसगडच्या होत्या, त्यांना मराठी चांगलीच येत होती. बोलताही येत होती आणि लिहिताही. लिहितांना थोडी अडचण जाणवत होती. काही मुली या गोंड समाजाच्याही होत्या. त्या आपापसात बोलतांना गोंडी बोलत. त्यातील एक छत्तीसगडची होती. या तीनपैकी एकीला छत्तीसगडी, हिंदी व गोंडी अशा तीनही भाषा येत होत्या. तशीच आता ती मराठी देखील शिकणार होती. एकीला गोंडी, मराठी व हिंदी येत होती तर दुसरीला फक्त मराठीच येत होती. काही मुली घरातील लाडाच्या होत्या. ज्या एकुलत्या एक होत्या. तसंच सर्वात लहान होत्या. मात्र काही मुली घरात लाडाच्या नव्हत्या. त्यांच्या घरी त्यांना त्यांचे आईवडील जास्त प्रमाणात कामाला लावत असत. तो वर्ग व त्या वर्गात गोंडी भाषा बोलणाऱ्या त्या विद्यार्थीनी. त्या जेव्हा गोंडी बोलायच्या. तेव्हा मात्र आश्चर्य वाटायचं व सर म्हणायचे की मला सुद्धा तुमची भाषा बोलता यायला हवी. मला सुद्धा शिकवा ही भाषा. त्या सांगायच्याही मराठी व गोंडी शब्द. परंतु ते लक्षात राहात नव्हते आणि हे भाषा शिकण्याचं वय नाही असं नारायण सरांना वाटायचं. नारायण सरांनी छत्तीसगडचीही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांना जमलं नाही. उलट नवीनच शाळेत आलेल्या एका मुलीला मराठी भाषा आता समजत होती. रुषाली हुशार होती. ती गोंड समाजाचीच होती. तिला गोंडी भाषा येत होती की काय कुणास ठाऊक. परंतु तिला ती भाषा येत नाही असंच म्हणायची. तशी ती जास्त हुशार होती व आपल्या हुशारीचाच वापर करुन एकदा तिनं शाळेला बुट्टी मारली होती. ती शाळेतच आली नव्हती. रुषाली शाळेत न आलेली. तसा ती शाळेत आली की नाही हे विचारणारा तिच्या वडीलाचा फोन शाळेत एक वाजता खणखणला. नारायण सरानं सांगीतलं की ती शाळेतच आली नाही. तेव्हा तिच्या आईवडीलांना फारच धडकी भरली. त्यानंतर त्यांनी विचारलं की कोण कोण विद्यार्थी शाळेत आले नाहीत. त्यावर नारायण सरांनी सांगीतलं. तिच्या आईनं त्या विद्यार्थीनीकडं जावून रुषालीची चौकशी केली असता रुषाली मिळाली असल्यानं त्यांना बरंच हायसं वाटलं. अलिकडील काळात मायबापासमोर विद्यार्थी शाळेला जायचं नाटक करतात आणि ते तसा शाळेचा गणवेश घालून व दप्तर घेवून शाळेत निघतात. परंतु ते शाळेत जात नाहीत व आईवडीलही ती मुलं शाळेत गेली की नाही गेली? त्यांची साधी चौकशी करीत नाहीत. असाच हा काळ. मग सवय लागते, शाळेला बुट्टी मारायची. काही काळानंतर त्यांचंच आयुष्य नष्ट होत असतं काही करण्याचं. अन् जेव्हा करावसं वाटतं. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. रुषालीचंही तेच झालं असतं. वेळीच ते प्रकरण लक्षात नसतं आलं तर....... परंतु ते प्रकरण वेळीच लक्षात आल्यानंतर नारायण सरांनी तिला दाटलं व रुषाली सुधारली होती. रुषाली गरीब होती. परंतु हुशार होती. तिला भरपूर शिकायचे होते रेशमासारखेच. परंतु भविष्यात तिचे वडील शिकविणार का? याची चिंता सरांना होती. कदाचीत रुषालीच्या हुशारीची तिच्या घरची परिस्थितीच जणू जीव घेईल काय? ही देखील चिंता नारायण सरांना आजतरी लागली होती. मात्र रुषाली खुप शिकली व ती पोलीस अधिकारी झाली होती.
(६)
त्रिशाच्या वर्गात रुषालीसारख्याच इतरही मुलीही होत्या. त्याच वर्गातील अम्बिका एक. अम्बिका त्याच वर्गातील एक मुलगी. जिला आईवडील होते. परंतु वडील दुसरीकडे राहात होते तर आई दुसरीकडे राहात होती. ती नेहमी सांगत असे की तिची आई एकटीच राहाते. त्यांच्यात काय समस्या होती कुणास ठाऊक. अम्बिका ही अभ्यासात हुशार नव्हतीच. त्याचं कारण काय होतं हे माहीत नाही. तसं पाहिल्यास नारायण सरांनी आजपर्यंत शिकविलेल्या विद्यार्थ्यात अनुभवलं होतं की ज्या मायबापाचं एकमेकांशी पटत नाही. त्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मनच लागत नसे. त्याचं कारण होतं आईवडीलांचं भांडण. बहुतेक अम्बिकाच्या आईवडीलांचं एकमेकांशी पटत नसल्यानं ते वेगळे राहात असावेत. असं वाटत होतं. नारायण सरांना वाटत होतं की आपल्या पाल्याचं भविष्य घडवायचं असेल तर पालकांनी भांडणं करु नये. कारण भांडणं हे आपल्याला नुकसानदायक ठरत असतात. भांडणातून दोन्ही पक्षाचे अपरिमित नुकसान होत असते. जर ते आईवडील असतील तर त्यांचंही नुकसान होतं. व्यतिरीक्त त्यांच्या मुलांचंही नुकसान होत असतं. अलिकडील काळात भांडण हे एकमेव मुलाच्या विकासात अडसर ठरणारं साधन आहे. भांडणं जर कुटूंबात होत असतील तर कुटूंब विघटीत होतं. आज अशी बरीच घटस्फोटाची उदाहरणे आहेत. ज्या कुटूंबात आईवडील भांडतात. अशांना जर मुलं असतील तर त्या मुलांवर वाईट संस्कार पडत असतात. आईवडीलांचं भांडणं होत असतांना पाहून त्यांचा परिणाम हा त्या घरातील लहान मुलांवरही होत असतो. त्या मुलांचं अभ्यासात मन लागत नाही. त्याचं कारण असतं त्यांच्याकडे आईवडीलांचं होणारं दुर्लक्ष. मात्र अशांची मुलं ही व्यवहारीक ज्ञानात अगदी समोर जातात. भांडण्याची दारुचं व्यसन, पतीपत्नीचं इतरांवर प्रेम. आपल्या पतीवर प्रेम नसणं. कमी मिळकत. एकमेकांना लहान समजण्याची वृत्ती. सासू सुनेचा वाद. संशयी भावना. अशी बरीच कारणं आहेत. त्यातील दारु हे एक महत्वाचे कारण आहे. नारायण सरांना आठवत होती ती एक मुलगी. ती मुलगी अतिशय हुशार होती व ती चवथीत शिकत होती. परंतु तिच्या वडीलाला दारुचं व्यसन होतं. शेवटी तिच्या आईनं त्याला ऐनवेळेस सोडायचं ठरवलं. तिनं मुलीच्या हुशारीची व मुलीच्या अभ्यासाची चिंता केली नाही. ती आपल्या मुलांना घेवून चक्कं माहेरी गेली व तिथं शेतात जावू लागली. ज्यातून तिचं कामाकडे लक्ष वळलं व ती शेतात कामाला जावू लागली. मुलीचंही अभ्यासातून लक्ष उडलं व तिही आज बुद्धू झाली होती. दुसरी अशीच मुलगी. जिचे वडील दारु पीत होते. ते दारु पिवू नये म्हणून तिच्या आईला राग यायचा व त्याच्याच दारु पिण्याच्या रागावरुन तिनं काही तारीख बाह्य झालेल्या गोळ्या खाल्ल्या होत्या. ती मरता मरता वाचली. परंतु तिच्या पतीनं दारु सोडली नाही. ज्यातून तिची मुलं आजही अभ्यासात कमजोरच होती. ज्याप्रमाणे मुलांचं भविष्य घडवितांना दारु हा कळीचा मुद्दा ठरतो. त्याचबरोबर अडसर ठरतो घटस्फोट वा एकमेकांपासून वेगळे राहणे. नारायण सरांना आणखी एक प्रकरण आठवू लागलं होतं. एक असंच कुटूंब. त्या कुटूंबात पतीपत्नीचं पटत नव्हतंच. त्यातूनच ते दोघंही वेगवेगळे राहायला लागले होते. ती मुलगी आपल्या लेकराला घेवून घरी आली होती व तिनं आपल्या मुलाला शाळेत दाखल केलं होतं. मुलगा तिसरीत शाळेत शिकायला आला, तेव्हा तो हुशार होता. परंतु कालांतरानं त्या मुलात त्याची आई वेगळी राहण्याचा परिणाम झाला व त्याच्या सवयी बिघडायला लागल्या होत्या. ज्यावेळेस तो मुलगा सातवीत गेला होता. त्यावेळेस तो मुलगा खर्रा व तंबाखू हमखासपणे खात होता. जरी शाळेनं शिक्षकांच्याच तंबाखू खाण्यावर बंदी घातली असली तरी. त्यावर उपाय म्हणून त्या मुलाला धाक दाखवून पाहिले. समुपदेशन करुन पाहिले. शाळेतून नाव काढून टाकू अशीही धमकी देवून पाहिली. परंतु त्याचा त्यावर काहीच परिणाम झाला नाही. ते मुल खर्रा व तंबाखू खातच राहिलं. मात्र शिक्षक रागावतात म्हणून तो मुलगा खर्रा व तंबाखू दूर अशा ठिकाणी लपवून ठेवायचा. जिथून दिसणार नाही. तसाच तो सुट्टीदरम्यान तंबाखू खावूनच यायचा. तो तीन तीन दिवसाचा शिळा व खराब झालेलाही खर्रा खायचा. त्याला तो खाण्याची सवय पडली होती. हे असं का घडलं? त्याला कारण होतं त्याचे आईवडील. मुलगा वडीलाला जेवढा घाबरतो. तेवढा आईला घाबरत नाही. ज्यातून अशा वाईट सवयी लागतात. एक आणखी असाच मुलगा. हा मुलगा आईवडील सोबत होते, तेव्हापर्यंत ठीक होता. परंतु जेव्हा त्याचे वडील त्याच्या आईला सोडून वेगळे राहू लागले. तेव्हापासून तो मुलगाही बिघडला. पुर्वी फार हुशार असलेला तो मुलगा आता चक्कं शाळेला बुट्ट्या मारु लागला होता. त्याला शिक्षकांनी बरंच समजावलं होतं. परंतु त्या मुलानं काही ऐकलं नाही. शेवटी तो सहावीत असतांना त्यानं पुर्णपणे शाळा सोडली होती. काही काही आईवडीलांचं एकमेकांशी पटत नाही. त्याची बरीच कारणे आहेत. त्यातील महत्वाचं कारण असतं दारु पिणं. वडील जर दारु पीत असतील तर आई घरी सारखी भांडत असते. परंतु असं भांडणं वेगळं. त्यांची मुलं तेवढी बुद्धू नसतात. परंतु जेव्हा फारकत होते, तेव्हा मात्र मुलांत फरक पडत चाललेला दिसतो. यात अपवाद म्हणून काही उदाहरणं नक्कीच आहेत. बाळाला आईवडील असणं हे दोन्ही घटक महत्वाचं आहेत की ज्यातून बाळाचा विकास होत असतो. यापैकी एखादा घटक नसेल तर विपरीत फरक पडतो आणि त्यापैकी दोघेही फारकत घेवून वेगवेगळे राहात असतील तर जास्त फरक पडतो. त्याच्या आईनं केलेला दुसरा पती हा त्या मुलांना आवडत नाही. तेच ते विचार विद्यार्थ्यात घोळत असतात. त्याच्या आईच्या मनातही तेच ते विचार असतात. तिही बाळाकडे लक्ष देत नाही. कधीकधी एखाद्याचे वडील मरण पावतात किंवा आई मरण पावते. मग त्या दोहोंपैकी एखादा जीवंत राहिलेला घटक आपला विवाह करुन मोकळा होतो. असा विवाह झाल्यानंतर साहजीकच मुलांकडे दुर्लक्ष होतं व मुलं बिघडतात. याबाबतीत एक उदाहरण आहे. एका मुलांच्या घरी त्याचे वडील मरण पावले होते. ते जेव्हापर्यंत जीवंत होते. तेव्हापर्यंत तो मुलगा व्यवस्थित होता. परंतु वडील मरण पावताच मुलांमध्ये परीवर्तन झालं. मुलगा वात्रट वागू लागला. कारणांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा कळलं की त्या मुलाच्या आईनंही त्याला सोडून दुसरं लग्न केलेलं आहे. ती कुठे गेली हे माहीत नाही. त्या मुलाचा सांभाळ आजी आजोबा करीत असून मामी अतिशय वाईट वागणूक देत आहे. ज्यातून त्या मुलावर वाईट परिणाम झालेला आहे. दारुच्या व्यसनानंही मुलांचे आयुष्य उध्वस्त होवू शकते. वडील जर जास्त दारु पीत असतील तर...... म्हणतात की ज्या घरी दारु जास्त प्रमाणात प्राशन केली जाते. त्या घरी मुलांना अभ्यासाची साधनं बरोबर मिळत नाहीत. शिवाय अंधश्रद्धा अशी निर्माण केली आहे की ज्या घरी दारु प्राशन केली जाते. त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. मग सरस्वती कुठून टिकणार! महत्वाचं म्हणजे मुलांचा जिथं विकास अपेक्षित आहे. तिथं मुलांच्या वडीलांनी दारु पिणं सोडावं. कारण परिस्थिती वाईट येते. ना त्यांची मुलं अभ्यासात तग धरु शकतात. ना ती मुलं पुढचं शिक्षण शिकू शकतात. हं, एक गोष्ट नक्कीच अनुभवली की दारु पिणाऱ्या पालकांची मुलं ही हुशार असतात. फरक एवढाच की त्यांना पुढे उच्च शिक्षण शिकता येत नाही. अपेक्षा असली तरी. विशेष म्हणजे मुलांचा जर विकास हवा आहे तर घरात कुणीही दारु पिवू नये. खर्रा वा गुटखा खावू नये. निर्व्यसनी असावे. पती पत्नीनं भांडणं अवश्य करावी. करु नये असं नाही. परंतु ते आपल्या मुलांच्या पुढे करु नये. फारकत तर अजिबातच घेवू नये की ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्य घडविण्यावर होईल.
(७)
नारायण सरही आज म्हातारे झाले होते. आयुष्याचा दिर्घ काळ हा त्यांनी शिक्षण व्यवस्थेत घालवला होता. त्यांना बराच शिकविण्याचा अनुभव होता. त्याबद्दल त्यांनी बरेच वर्तमानपत्रात लेखही प्रसिद्ध केले होते व बऱ्याच गोष्टींना वाचाही फोडली होती. नारायण सरांनी जे जे विद्यार्थी घडवले. त्यातील त्रिशाची बॅच त्यांना आठवत होती. कारण तशा स्वरुपाचा वर्ग आजपर्यंत तरी नारायण सरांनी शिकवला नव्हता. सरांचा नियमच होता कडक शिस्त. कडक शिस्तीसाठी ते विद्यार्थ्यांना प्रसंगी मारतही असत. त्यांना वाटत असे की विद्यार्थ्यात सुधारणा व्हायलाच हवी. त्यांनी वाईट व्यसनाच्या आहारी जावू नये. त्यांच्यात संस्कार फुलावेत. तेही कुणाचे तरी मुलं आहेत. आपल्या मुलांसारखं त्यांचंही आयुष्य आहे. ते मायबापाहून कितीतरी जास्त प्रमाणात गुरुंचा आदर करतात. प्रसंगी जे मायबाप लहानाचं मोठं करतात, त्यांचं एकवेळी ऐकणार नाहीत. परंतु गुरुंचं ऐकतात आणि जी मुलं गुरुंचं ऐकतात. ती नक्कीच पुढे जात असतात. नारायण सरांचा स्वभाव हा परोपकारी होता. आपल्याला वेतन मिळतं ना. मग वर्गातील मुलं ही शिकायलाच हवी असं त्यांचं मत होतं. मुलांना शिकवितांना ते कोणत्याही प्रकारचं कसब वापरत. त्यांचं शिकवणं हे अजबगजबच असायचं. त्यामुळंच की काय, नारायण सर अल्पावधीत शाळेत प्रसिद्ध झाले होते. अशातच शाळेतील एकंदरीत वातावरण द्वेषाचं झालं होतं. नारायण सरांचा शाळेतील काही लोकं द्वेष करायचे. ती शाळा नारायण सरांना साजेशी नव्हतीच. त्या शाळेत सरांचे नित्याचे भांडण चालत. भांडणं तत्वावरुन होते. परंतु ती भांडणं जरी होत असली तरी नारायण सर ती भांडणं एका बाजूला ठेवत असत आणि विद्यार्थी शिकविणं एका बाजूला. ज्यातून विद्यार्थ्यांचा विकास होत असे. नारायण सरांना एक असंच भांडण आठवू लागलं होतं. ज्यावेळेस त्यांचं वेतन बंद होतं. तब्बल दोन वर्ष वेतन बंद होतं. त्याच काळात नारायण सरांना बराच त्रास झाला. तरीही त्यांनी आपलं शिकविणं बंद केलं नव्हतं. मात्र त्याच काळात त्यांना विद्यार्थी चांगले मिळाले होते. अंकिता, इशा आणि अनुष्का यांची जोडी त्या वर्गात फारच आवडायची सरांना. कारण इशा व अंकिता हुशार होती. त्याच वर्गात असलेल्या रोहिणी रुक्मिणी या दोन जुळ्या बहिणींची जोडी प्रसिद्ध होती. त्यानंतर दुसरी बॅच सरांच्या शिकविण्यात आली. ती म्हणजे मेघा, आरुषी व खुशबूची. तिही बॅच सरांना आवडायची. त्रिशाची बॅच सरांना आवडू लागली होती. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा वाढदिवस साजरा होणं. आजपर्यंत फक्त सरांना भारती, श्रुती व दिक्षाच्या बॅचनं एक दैनंदिनी दिली होती, बक्षीस म्हणून. परंतु त्रिशाच्या बॅचनं सरांचा वाढदिवस, तोही केक आणून साजरा करण्याची केलेली कृती. ही सरांना विलोभनीय कृती वाटली होती. जी कृती आजपर्यंत तरी कोणी केली नव्हती. त्याच कृतीनं सर कृतार्थ झाले होते. वर्गात इतरही मुली होत्या. ज्यातील सेजल एक. सरांनी एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, "तुम्हाला कोण बनायचं आहे अर्थात काय व्हावंसं वाटतं?" त्यावर सर्वांनी उत्तर दिले होते की कुणी डॉक्टर बनणार. कुणी इंजीनियर. परंतु सेजल एकमेव अशी मुलगी होती की जी परिचारीका बनेल, असं एकमेव उत्तर दिलं होतं. ती हुशार होती. परंतु ती जास्त बोलत नव्हती. ती त्रिशाच्या शेजारीच बसायची. ती त्रिशापेक्षा हुशार नव्हती. मात्र ती त्रिशावरुन हुशार वाटायची. त्यावेळेस त्रिशानं डॉक्टर होणार, असं उत्तर दिलं होतं. वर्गात एक मुलगी अशीही होती की जिला वाचन येत नव्हतं. मात्र मिडीयाच्या काळात ती मुलगी व्हिडीओ बनवायची व तेच व्हिडीओ इंन्टाग्रामवर पोष्ट करीत होती. तिला कोण बनायचं आहे हे विचारलं असता ती म्हणाली होती की तिला फिल्म डायरेक्टर बनायचं आहे. तेव्हा पुर्णच वर्गात हशा पिकला होता. दिवाळीपर्यंतचा काळ बरा गेला. परंतु दिवाळीनंतर त्रिशा आजारी पडली. ज्याचा तिला बराच त्रास झाला. आता ती कधीकधी सतत आजारी राहात असे. कधी शाळेत येत असे तर कधी घरीच राहात असे आणि जेव्हा अशी शाळेत आली. तेव्हा ती सुट्टी मागून घरी जात असे आणि जातांना तिच्या चेहर्यावर अशा भावना असत की जणू तिला सुट्टी द्यावीच लागायची. सरांना मुलांनी केलेलं शाळेतील नृत्य आठवत होतं. ती मुलं सतत लेझीमसाठी मागं लागली होती. ज्यात त्रिशालाच चांगलं नृत्य करता येत आहे असं वाटत होतं. त्रिशा सर्व गोष्टीत हुशार होती. परंतु दिवाळीनंतर तिचं शाळेला बुट्टी मारणं हा सरांसाठी चिंतेचा विषय झाला होता. कदाचीत असंच जर सुरु राहिलं तर उद्याच्या स्पर्धेच्या कारकिर्दीत त्रिशा स्पर्धेत टिकेल काय? ही भीती सरांना वाटत होती. मात्र आज त्रिशा बरीच पुढं गेल्यानं सरांच्या मनात त्यावेळेस निर्माण झालेला भीतीचा प्रश्न सुटला होता.
(८)
'वर्ग चांगला नाही. वात्रटच आहे. तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा जास्त लाड कराल नको. नाहीतर ते डोक्यावर बसतील.' एका शिक्षीकेनं नारायण सरांना दिलेला सल्ला. सरांनी ते ऐकलं. परंतु तो सल्ला पाळला नाही. लहान मुलंच ती. ती जास्त लाड केल्यास डोक्यावर नक्कीच बसतात. त्यांचा जास्त लाड केल्यास सर त्यांना आपल्यातीलच वाटतात व आपलेसेही वाटतातच. शिवाय शिक्षक आणि विद्यार्थी यातील नातं समाप्त होवून जात असतं. म्हणूनच त्या शिक्षिकेची ती सुचना रास्त होती व तेवढीच महत्वाचीही होती. नारायण सरांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यात असलेलं नातं तोडलं व ते विद्यार्थ्यांशी खेळीमेळीने राहू लागले. हे पहिलं वर्ष होतं की त्यांना स्वतःमध्ये बदलाव करायला वेळ मिळाला होता. परंतु त्याचा गंभीर परिणाम हा झाला की मुलांना सर हे सरांसारखे वाटत नव्हते. ते आपल्यातीलच कोणीतरी वाटत होते. सर जेव्हा त्यांची गंमत करायचे. ती गंमत मात्र एका मुलीला पटायची नाही. तिला वाटायचं की ते सर आहेत. जरी त्यांचा मायाळू स्वभाव असला तरी आणि ते जरी मारत नसले तरी. आज तीच परिस्थिती निर्माण झाली होती. मुलं जास्त लाडानं कधीकधी जास्त दंगामस्ती करीत. तेव्हा तीच मुलगी त्यांना रागावत असे व सरांना त्रिशाच्या अनुपस्थितीमुळे तिलाच वर्गाची कॅप्टन बनवावसं वाटायचं. तसं पाहिल्यास तिच्यातच नेतृत्व गुण होते व तिनंच त्रिशाला कॅप्टन बनवावं हे सुचवलं होतं. ती मुलगीही हुशारच होती. त्यातच तिच्यात संस्कारी गुण होते. ती नित्यनेमानं सरस्वतीपुजनासाठी आरतीचं ताट आणायची. तिला पुजा करणं आवडायचं. तिचं नाव विशाखा होतं. विशाखाचा करारीपणा. तिच्या बोलण्यातून जाणवायचा की ती पुढे जावून एखादी पोलीस अधिकारी होवू शकते किंवा वैमानीकमध्ये जावू शकते. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. विशाखावरुन तेच जाणवत होतं. तिचं बोलणं. तिचं वागणं हे एक वर्गनायक म्हणून साजेसं होतं. नेतृत्व गुणही तिच्यामध्ये कुटकूट भरले होते. परंतु तिला समोरासमोर करायची सवय नव्हती व ती कमी बोलत असे. तो वर्ग नेहमी कमी बोलणारा होता. त्यात दोनचारच मुलं अशी होती की जी जास्त बोलत. त्यात इशिका व कुसूम अग्रस्थानी होत्या. सतत बोलणं ही त्या दोघींचीच सवय होती. शिवाय त्यात अम्बिका नावाची मुलगी आपल्या बोलण्यातून आणखी भर घालायची. या तिघींशिवाय वर्गात इतर जी मुलं होती. ती कमीच बोलायची. वर्गात ज्याप्रमाणे मुली होत्या. त्याचप्रमाणे सात मुलंही होती. शाळेतील कोणताही कारभार मुलीच करायच्या. मुलं कमी असल्यानं त्यांना भाव नव्हताच व तेही वर्गकार्यात जास्त लुडबूड करीत नसायचे. एखाद्यावेळेस जेव्हा ते बोलत. तेव्हा त्यांना बाकीच्या मुली काहीबाही बोलून शांत करीत असत. बिचारे अल्पसंख्य असल्यानं त्यांना जास्त प्रमाणात बोलताही येत नसे. मुलांचं आचरण व वागणं विशाखाला आवडायचं. कारण ते कधीकधी जेव्हा बोलत. तेव्हा ते रास्तच बोलत असत. तो पाचवा वर्ग व नारायण सरांनी त्या पाचव्या वर्गात काही नियम बनवले होते. इंग्रजी शुद्धलेखन मुलांकडे व मराठी शुद्धलेखन मुलींकडे तपासण्याचं काम सरांनी सोपवलं होतं. दररोज पाच पाच ओळी लिहिण्याची पद्धत होती. ज्यातून वर्षभरात विद्यार्थ्यांची अक्षरे सुंदर झाली होती. बालवाचन वाचण्याच्या सवयीनं बऱ्याचशा मुलांना वाचता येवू लागलं होतं. इंग्रजीचेही अक्षरं नाजूक मुलांनाही तुटकशी वाचता येवू लागली होती. विशाखा शब्दार्थ लेखन तपासत असे. सर नसतांना शिकविण्याचे काम त्रिशाच करीत असे. तसं पाहिल्यास अनुष्काला उपकॅप्टन बनवलं होतं. परंतु तिच्या उपकॅप्टन पणाचा काहीच फायदा होत नव्हता. कारण तिचं कोणीच ऐकत नव्हतं. तरीही सरांनी तिला उपकॅप्टन पदावरुन हटवलं नाही. कारण ती कृती सरांना तिचा अपमान करणारी कृती वाटत होती. आज सरांच्या अशा प्रकरणाच्या विभागणीतून व कृतीशिलतेतूनच मुलांच्या दृष्टीने प्रगतीचं पाऊल पडलं व मुलांमध्ये आत्मीक बदल होवू लागला होता.
(९)
तो वर्ग व त्या वर्गातील मुलं पाहिजे तेवढी हुशार नव्हतीच. परंतु सहकार्य करणारी होती. त्यांच्यात हुशारकीचे गुणं नव्हते. परंतु कोणालाही मदत करण्याचे व सहकार्याचे गुण होते. एकदा त्यांनी वर्गात वर्गसजावट केली होती. तेही वाखाणण्याजोगंच होतं. वर्गसजावट करण्यासाठी सर्व मुलांनी सहकार्य केलं होतं. त्यापुर्वी नारायण सरांनी म्हटलं होतं की ज्या घरी आपण राहतो. ते घर जर व्यवस्थीत नसेल, सजवलं नसेल, आजूबाजूला कचरा पडलेला असेल तर आपल्याला करमतं का? त्यावर मुलांनी नकारात्मक उत्तर दिलं होतं. परंतु दुसर्याच दिवशी त्यांचं वर्ग भरण्यापुर्वी सजावटीचं कामकाज सुरु झालं होतं. नारायण सरही त्या कामी मदत करीत असत. मोबाईलचा काळ होता. मोबाईलला जास्त महत्व आलं होतं. त्यातच स्मार्टफोनचा वापर सुरु झाला होता. तसा तो एकदाचा प्रसंग. एक मुलगी नारायण सराकडे आली. म्हणाली, "सर मोबाईल द्याल का थोडासा." "कशासाठी हवाय?" "माहिती पाहायचीय." नारायण सरानं त्या मुलीला मोबाईल दिला. त्यानंतर ती मुलगी म्हणाली, "सर, आमच्या घरी आम्हाला आमचे आईवडील मोबाईल देत नाहीत. म्हणतात की मोबाईल बिघडेल." ते त्यांचं बोलणं. त्यावर सर म्हणाले, "मोबाईल लागलाच तर घेत जा. मागायला व माहिती पाहायला काही वावगं नाही. फक्त चांगल्या गोष्टी पाहायच्या." सर मोबाईलचं महत्व जाणून होते. त्यांना माहीत होतं की मोबाईल आजची गरज असून त्यातून शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या बऱ्याच गोष्टी शिकवता येवू शकेल आणि मुलं जर मोबाईलवर शिकत असतील तर आपणही तो मोबाईल मुलांना दिला तरी काहीच समस्या उद्भवणार नाही. याचं भान ठेवून नारायण सर विद्यार्थ्यांना न चुकता मोबाईल देवू लागले. ज्यातून विद्यार्थ्यांचा अभ्यास होत होता. आज गणिताचा तास होता. सरांनी ठरवलं की गणित विद्यार्थ्यांना कितपत येते ते पाहावं. असाच उद्देश लक्षात घेवून सरांनी फळ्यावर उदाहरणं दिली व क्रमवार ते एकाएकाला उदाहरण सोडविण्यासाठी बोलावू लागले. जेव्हा त्रिशाचा नंबर आला. तेव्हा ती म्हणाली, "मी नाही जात सर उदाहरण सोडवायला." सरांना थोडंफार वाईट वाटलं. त्यांना वाटलं की ती मुलगी जर उदाहरण सोडवणार नाही तर ती मागे राहिल. कदाचीत तिला उदाहरण येत नसावं. तसे सर म्हणाले, "जर उदाहरण सोडवायचं नसेल तर घरी जा." सरानं तसं म्हणताच नकार देणारी त्रिशा उठली व ताबडतोब फळ्याजवळ जावून तिनं उदाहरण सोडवलं. तसं सरांना हायसं वाटलं. त्यानंतर बऱ्याच मुलांनी उदाहरणं सोडवलीत. त्यातच सरांनी सरावही करुन घेतला. गतकाळात अशीच एक इशा. तिही हुशारच होती. ही त्रिशा तर ती इशा होती. सरांना तिचंच नाव तोंडात बसलं होतं. त्यामुळंच ते हिलाही कधीकधी त्रिशा ऐवजी इशा म्हणूनच हाक मारायचे. कधीकधी ती म्हणायचीही की तिचं नाव इशा नाही, त्रिशा आहे. पावसाची एक सर येवून गेली होती. नारायण सर माजघरात बसले होते. सरांना आज अस्वस्थ वाटत होतं. थोडा थकवा जाणवत होता. त्यांच्या डोळ्यासमोरुन गतकाळ तरळत होता. विद्यार्थी....... ते विद्यार्थी असतात व त्या विद्यार्थ्यांवर संस्कार करा अगर नका करु. काही विद्यार्थी हे शिक्षकांना मानत असतात तर काही असे स्वार्थी असतात की ते पुढे जावून व्यवहार करतात. अशीच एक विद्यार्थीनी. जी शिकून गेली होती. तिचं लग्न झालं होतं व त्यातच त्यांचा संसारही फुलला होता. मुख्य म्हणजे जी मुलं चांगली असतात. त्यांचं मुलांशी चांगलं पटतं व ती मुलं त्या शिक्षकांच्या संपर्कात असतात व ते शिक्षकही त्या सरांच्या संपर्कात असतात. त्या मुलीला नारायण सरांनी मदतही केली होती. काळ उलटला व मुलगी संपर्कातच होती. एक दिवस त्या मुलीचा फोन आला. तिनं म्हटलं की सर, मला काही पैसे हवेत. सरांनी त्यावर किती पैसे हवेत असं विचारलं. त्यावर तिनं दोन लाखाचा आकडा सांगीतला. त्यातच ती एवढी मोठी रक्कम. सरांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर तिनं सरांशी बोलणंच बंद केलं होतं. सर आता फोन लावत होते. परंतु ती बोलत नव्हती. व्हाट्सअपवर मेसेजही टाकत होते. परंतु तिचा काहीच समाचार कळत नव्हता. काही काही विद्यार्थी असेही स्वार्थी असतात. त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं. त्रिशाच्या वर्गातील जी मुलं होती. त्यातील काही मुलं, ती पुढील जीवनात कशी निघतील याची कल्पना येत नव्हती. परंतु सर त्यांचं वागणं पाहून त्यातून अंदाज बांधत होते की ती मुलं चांगलीच निघणार. तो वर्ग व त्या वर्गातील ती गरीबांची मुलं. ती मुलं जेव्हा आपल्या घरची परिस्थिती सांगत, तेव्हा नारायण सरांना विचार यायचा. त्या मुलांच्या सानिध्यात आयुष्याची एवढी वर्ष काढतांना त्यांचं आयुष्य आनंदात जात होतं. अनेक बॅचेस आल्या होत्या नारायण सरांसमोर. परंतु त्रिशाची बॅच लक्षात राहिली होती. तिही त्रिशाच्याच स्वभावगुणांमुळं. कधीकधी वाटायचं की ही बॅचही आपल्याला विसरुन जाईल कायमची. परंतु तीच बॅच त्रिशाच्या रुपानं नारायण सरांच्या जीवनात नातं टिकवीत होती. ती गरिबांची मुलं. ती हुशार होती. ते सगळं ठीक होतं. नारायण सरही त्यांना हिरीरीनं शिकवीत होते. परंतु सरांना त्या लेकरांबद्दल चिंता होती. चिंता होती की उद्याच्या स्पर्धेत ही मुलं टिकतील काय? आजचं शिक्षण खाजगी होतं. आज बऱ्याच प्रमाणात खाजगी शाळा उघडल्या होत्या. ज्यातील काही शाळांना सरकार अनुदान देत होतं. काही शाळांना अनुदान नव्हतं. त्याच शाळा, त्यांच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी स्वरुपात पैसा उकळत होत्या. आज शिक्षणाचं बाजारीकरण झालं होतं. शिकविणारा शिक्षक हा गुलामागत बाजारात विकल्या जात होता. प्रत्येक शिक्षकांचे मुल्य ठरलेले होतं. शाळा हा अलिकडील काळात कारखाना झालेला होता आणि शिक्षक हा त्या कारखान्यातील एक कामगार. तो कामगार की त्या कामगाराला कारखान्यात कोणत्याही बाबींवर बोलायची उजागीरी नव्हती. ही देखील खंत नारायण सरांना वाटत होती. बाजारीकरण...... बाजारात तरी वस्तूंची किंमत ठरलेली असते. परंतु आजच्या शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांना किंमत नव्हती. उलट किंमत होती संस्थेतील पदांना. त्या पदांचा दर हा चाळीस ते पन्नास लाख ठरलेला होता. ती पदं शिक्षक नावाचा व्यक्ती विकत घेत होता. याचाच अर्थ शिक्षण प्रक्रियेत शिक्षक हा मालक होता. तरीही शिक्षकाला बोलण्याची उजागीरी नव्हती. त्याला नोकरासारखंच राबावं लागत असे. कारण हाच शिक्षण प्रक्रियेचा मालक असलेला घटक हा घाबरणारा होता. त्याच्यात थोडासा स्वार्थ असल्यानं तो घाबरत होता आणि त्या मालकाला मुर्ख बनविणारे संस्थाचालकाचे चमचे हे त्या शिक्षकाला घाबरविण्याचे काम करीत असत. (१०) शिक्षणाचं बाजारीकरण म्हणजे नेमकं काय? असा जनसामान्यांचा प्रश्न होता. त्यांना बाजारीकरण हे काही समजत नव्हतं. म्हणूनच ते खाजगीकरणालाही विरोध करीत नव्हते. अलिकडील काळात शिक्षण शिकविलं जात आहे. जे शिक्षण निःशुल्क आहे व निःशुल्क असायलाही हवं. तेच शिक्षण निःशुल्क असल्यानं गरीबांची मुलं शिकतात. त्यांना शिकविण्याचं शुल्कही सरकार देत असतं. सरकार अशा शाळेतील शिक्षकांना वेतन हे आपल्याकडून देत असतं. देशात तीन प्रकारच्या शाळा आहेत व सरकारनं तीन प्रकारच्या शाळांना सध्याच्या काळात मंजूरी प्रदान केलेली आहे. एक म्हणजे सरकारी शाळा की ज्या शाळा संपुर्णतः सरकारच्याच मालकीच्या आहेत. त्या शाळा सरकार चालवतं. दुसर्या शाळा म्हणजे अशा शाळा की ज्या सरकारी आहेत. परंतु त्यांना सरकार चालवीत नाही, मालक चालवतो. तिसऱ्या प्रकारच्या शाळा या पुर्णतः मालकशाहीच्याच आहेत. मालक म्हणेल तसं. त्या शाळा सरकार चालवत नाही. आज शाळेचा विचार केल्यास असं आढळून येतं की ज्या शाळा सरकार चालवीत नाहीत. त्या शाळेत कायदे व नियम हे सरकारचे लागू होत नाहीत. ते सर्व नियम त्या शाळा काढणाऱ्या मालकाचे लागू होतात. मग वेतन वा भत्ते का असेना. ज्याप्रकारे नियम कारखान्यात असतात. तसेच नियम शाळेतही लागू होतात व त्याच नियमानं सामान्य लोकांच्या मुलांच्या शिक्षण घेण्याच्या आवडीनिवडीचा जीव घेतला जातो. आज असं चित्र दिसतं की शाळा या शाळा राहिलेल्या नाहीत तर त्यांचा कारखाना बनलेला आहे. ज्याप्रमाणे कारखान्यातून पक्का माल निघतो. ज्या मालाला किंमत असते. तसाच माल आज शाळेतूनही निघतो. फरक एवढाच आहे की कारखान्यातून मालाच्या रुपात वस्तू वा पदार्थ उत्पादीत होतो आणि शाळेतून मालाच्या रुपात माणसं. त्यातच कारखान्यातून निघणाऱ्या मालाला जशी किमंत असते. तशीच शाळेतून निघणाऱ्या मालाला किंमत नसते. शाळेतील मालाला भावच मिळत नाही. उलट त्याचेकडूनच नोकरीसाठी पैसा उकळला जातो. शिक्षण शिकणारा घटक हा बेभाव असतो. प्रत्येकाचे भाव ठरलेले असतात. हं, काम करायचं असेल तर करा. नाहीतर पळा अशी अवस्था शाळेतून निघणाऱ्या मालाची असते. शाळेतून नेमका कोणता माल निघतो? शाळेतून नेमका कोणता माल निघतो. याचा विचार केल्यास त्या मालात डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक, वकील, अधिकारी याचा समावेश होतो. अमूक अमूक एवढे पैसे भरा. त्यानंतर आपल्या मुलाला या कारखान्यात टाका. पाच वर्ष वळून पाहू नका. आपल्याला डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक किंवा तत्सम गुणवत्ताधारक व्यक्ती तयार होवून मिळणार म्हणजे मिळणारच. याची खात्री शाळा देते. त्यासाठी त्या मुलांना येवो अगर न येवो. अशी मुलं अशा खात्रीशीर शाळेतून तयार होतात. अशी मुलं उद्या उच्चशिक्षित झालीही. तरी ती देशाची सेवा करीत नाहीत. ती सामान्य लोकांच्या परिस्थितीकडं ढुंकूनही पाहात नाहीत. त्यांना पैसा हवा असतो. ते पैशाच्या मागे धावत असतात. कारण ते जेही शिक्षण शिकतात. त्यांना पैसा लागलेला असतो. एवढा पैसा की त्याची आपण कल्पनाही करु शकत नाहीत. उदाहरण द्यायचं झाल्यास एका डॉक्टराचं देवू. एका डॉक्टराला डॉक्टर बनायला म्हणजे डॉक्टरकी शिकायला कमीतकमी पन्नास लाखाच्या वर पैसे लागतात. जे पैसे त्याच्या वडीलाला काबाडकष्ट करुन आणावे लागतात. कधी एवढा पैसा कमविण्यासाठी भ्रष्टाचारात हात लिप्त करावे लागतात. हेच मुलाला ते मुल शिकत असतांना माहीत असतं. तद्नंतर ज्यावेळेस मुलगा एखादा डॉक्टर बनतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्या वडीलांना एवढा पैसा भरावा लागला, आपल्या शिक्षणासाठी. हा पैसा काढायचा कुठून? हा पैसा जनतेच्याच खिशातून काढावा लागेल. शेवटी तसा विचार करुन तो एखाद्या खाजगी रुग्णालयात नोकरीला लागतो वा एखादं आपलंच रुग्णालय उघडतो. दोनचार तासासाठी डॉक्टर नियुक्त करतो. त्यांना दोनतीन तासासाठी का असेना येण्याचे शुल्क देतो व आपल्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडील पैशाची एवढी चिरफाड करतो की बिचारे रुग्ण आजाराला पाहून कंटाळतात. काही तर एखादा आजार झाल्यास घरीच तडफडत मरण पावतात. परंतु उपचार करीत नाहीत. कारण तेवढे पैसेच नसतातच त्यांचेजवळ. डॉक्टर.......त्या रुग्णालयात काम करणारा डॉक्टर तरी काय करणार? त्याला त्या डॉक्टरकीचं शिक्षण शिकायलाच एवढा पैसा लागलेला असतो की ज्यानं निःशुल्क सेवा करतो वा कमी पैशात सेवा करतो जरी म्हटलं तरी जमत नाही. कारण तसं त्यानं आयुष्यभर केलं तरी त्याच्या शिक्षणाला लागलेला पैसा निघू शकत नाही. म्हणून त्याची जरी मनात सेवा करण्याची इच्छा असेल तरी तो मनातल्या मनात मारतो व तो प्रसंगी रुग्णांच्या भावनांशी नाही तर पैशाशी खेळतो. कारण त्याला रुग्णांच्या आजाराशी काही घेणंदेणं नसतं. फक्त पैशाशीच घेणंदेणं असतं. तीच स्थिती असते शिक्षण क्षेत्रातही. शिक्षण क्षेत्रातही शिक्षण घेत असतांना व नोकरीवर लागत असतांना जवळपास पन्नास लाखाच्याही वर पैसे मोजावे लागतात. प्रथम पैसे तो ज्या महाविद्यालयातून शिकतो. त्या महाविद्यालयात भरावे लागतात. त्यानंतर तो ज्याठिकाणी नोकरीला लागतो. तिथंही भरावे लागतात. तरच त्याला नोकरी लागते. असा लागलेला पैसा त्या शिक्षकाला काढायचा असतो. मग तो कुठून काढणार? त्यासाठी तो खाजगी शिकवण्या घेतो. त्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग उभे करतो. कधीकधी अशा खाजगी शिकवणी वर्गात लपूनछपून काम करतो. मग असे करीत असतांना तो थकतो किंवा थकला नसेल तरी तो जेव्हा शाळेत जातो. तेव्हा शाळेत शिकवीतच नाही. कारण त्याला फक्त पैशाशी देणंघेणं असतं. विद्यार्थ्यांशी वा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी काहीच घेणंदेणं नसतं. त्यातही त्याची चूक नसते. वकीलच्या क्षेत्रातही असेच आहे. त्यांनाही शिक्षण शिकायला बराच पैसा लागतो. जो पैसा काढण्यासाठी त्यांना न्यायालयात सेवा करणे परवडत नाही. तिही मंडळी जेव्हा न्यायालयात सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. तेव्हा तेही बक्कळ पैसे मागतातच. एव्हाना सरकारी वकीलही असा शिक्षणाला लागणारा पैसा काढण्यासाठी संबंधीत खटल्यात जुळवाजुळव करतात व पैसा कमवतात. मग न्याय, तोही सामान्य, गरीब लोकांना कसा मिळेल? आज असं सर्वच प्रकारचं शिक्षण वा सर्वच प्रकारच्या नोकऱ्या मिळविण्यासाठी पै पै पैसा खर्च करावा लागतो. नोकऱ्याचं सोडा, साधं शिक्षण घेण्यासाठी लोकांना पै पै पैसा मोजावा लागतो. ज्यातून डॉक्टर, पोलीस, इंजीनियर, शिक्षक व इतर तत्सम पदं सुटलेली नाहीत. एव्हाना जे न्याय प्रदान करतात. ते न्यायाधीशही सुटलेले नाहीत. मग त्यांनी जर आपला पैसा काढण्यासाठी आपल्या सेवाकार्यात दगलबाजी केली तर गैर काय? परंतु सामान्य माणसं त्यावर ओरडतात व सरकारही त्यावर ओरडतं. म्हणतं की हा भ्रष्टाचार आहे. त्यांना भावभावनाच नाही. आणखी काही काही बोलतात. प्रसंगी आंदोलन करतात. हे खाजगी क्षेत्र व या खाजगी क्षेत्राची सामान्य लोकांना लुटीची भावना. ज्यातून सरकारचं चुकत असलं तरी सरकार आपली चूक कबूल करीत नाही. त्यावर उपचारही करीत नाही. शैक्षणिक सुधारणा कायदा अर्थात शैक्षणिक धोरण आणतं. म्हणतं की आम्हाला चांगले तंत्रज्ञ बनवायचे आहेत. विद्यार्थ्यात जन्मतःच सुप्त गुण असतात. त्यांचा विकास करायचा आहे. त्यांच्यातील सुप्त गुण वाढवायचे आहेत. त्यांच्या नोंदी घ्यायच्या आहेत. त्या जतन करुन ठेवायच्या आहेत. जेणेकरुन त्यांचं भविष्य घडवितांना त्या जतन केलेल्या नोंदी कामात येतील. परंतु हे शक्य आहे काय? खरंच हे सुप्त गुण वाढविण्याच्या गोष्टी विद्यार्थ्यांचं भविष्य बनविण्यासाठी कामात येतील का? समजा एखाद्या गरीबाच्या मुलात डॉक्टर बनायचे सुप्तगुण असतील आणि त्याच्या बालपणात तो शिकत असतांना सुप्त गुणांच्या नोंदी घेतल्याही तर तो पुढील काळात पैशाअभावी डॉक्टर बनू शकेल काय? एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षक बनायचे असेल व त्याच्या सुप्त गुणात त्याच्याजवळ शिक्षक बनायचे जरी गुण असतील वा तशा नोंदी असतील तरीही ते विद्यार्थी शिक्षक बनू शकतील काय? याचं उत्तर नाही असंच येईल. कारण पुढं शिक्षक बनायला लागणारा पैसा वा ती व्यवसायीक पात्रता शिकण्यासाठी लागणारा पैसा हा साहजीकच त्याचेजवळ नसेल. प्रसंगी त्याला शिक्षक बनताच येणार नाही. मग त्याच्याजवळ असलेल्या गुणवत्तेचा व सुप्त गुणांचा कोणता उपयोग? हे खाजगीकरण व त्यात विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीची हत्या. त्याच्या मनात शिक्षण शिकायची इच्छा असूनही त्याला आपलं मन मारावं लागतं. कारण शिक्षण शिकायला पैसा नसतो. हं, काही महाविद्यालयं असतात की जे सरकारी असतात. ज्यात कमीतकमी पैशात आपलं शिक्षण होतं. परंतु त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी गुणवत्तायादीत यावं लागतं. त्यातही स्पर्धा असते. गरीबांची मुलं ही कितीही अभ्यास करीत असतील तरी ती गुणवत्ता यादीत येवू शकत नाहीत. एखादा अपवाद सोडला तर.... त्याचं कारण आहे आजच्या काळात अस्तित्वात असलेली व आलेली खाजगी शिकवणी. शाळेतील पैसा खर्च करुन नोकरीला लागलेले शिक्षक हे बरोबर शिकवीत नसल्यानं त्या विद्यार्थ्यांना अभिप्रेत असं शिक्षण मिळत नाही. ज्यातून गुणवत्तायादी ही सामान्य गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनापासून कोसो दूर असते. सरकार यावर तोडगा काढू शकतं. सरकारच अशी खाजगी स्वरुपाची पैसे घेवून शिक्षण देत असलेली महाविद्यालये बंद करु शकते. ज्यांनी शाळा महाविद्यालयाला कारखान्याचे स्वरुप दिले. जर त्यांनी सरकारमध्ये कायदा करुन खाजगी महाविद्यालय वा शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आणला आणि सर्व महाविद्यालय सरकारी केली. तेथील शिक्षण व्यवस्था सरकारी केली अर्थात निःशुल्क केली तर कदाचीत गरीबांची मुलंही उच्च शिक्षण घेवू शकतील. त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकासही होवू शकेल. त्यांच्यातील सुप्त गुणांच्या वाढीला वाव मिळू शकेल. त्यांना स्वतःला व्यवसायीक पात्रता शिकायची संधी मिळू शकेल. त्यातच जे नवीन. स्वरुपाचं २०२० चं शैक्षणिक धोरण आलं. त्या धोरणानुसार त्यातील उद्दीष्टही साकार करता येवू शकतील. परंतु सरकार हे करीत नाही. करणारही नाही. कारण शाळा व महाविद्यालय हे सरकारमध्ये असलेल्या लोकांच्याच आहेत. त्यांच्याच मालकीच्या आहेत. तीच मंडळी अशा शाळेच्या माध्यमातून होतकरु नसलेल्या मुलांनाही पैशाच्या भरवशावर प्रवेश देवून व पैसे कमवून आपली निवडणूक लढवीत असतात. सरकार त्यावर पांघरुन घालतं व ते पांघरुण घातलं आहे असं दिसू नये म्हणून सरकारी रुग्णालयाची निर्मीती करतं. आयुष्यमान कार्ड काढतं. काही प्राथमिक शाळेत शिक्षण निःशुल्क ठेवतं. खिचडी देतं, पोशाख देतं. लोकांना राशन सुविधा देतं व दाखवतं की आम्ही किती जागरुक आहोत. जनतेच्या प्रति आम्हाला किती सहानुभूती आहे. अन् जनताही तीच सहानुभूती विचारात घेवून सरकार थोडेसे का होईना करीत असलेल्या उपकाराची व त्याच गोष्टीची पट्टी गांधारीसारखी आपल्या डोळ्यावर बांधतात. म्हणतात की आम्हाला सरकार किती मदत करीत आहे. काही लोकं म्हणतात की आम्हाला काहीच दिसत नाही. आम्ही असहाय्य आहोत. सरकारची ही सरकारी मदत. ती सरकारी मदत तुटपुंजी जरी असली तरी सहानुभूतीची वाटते. ते लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारी रुग्णालय काढतं. ज्यात गरीब लोकांना थोडीशी मदत होते. ते लोकांना सहानुभूती म्हणून प्राथमिक शाळेला खिचडी पुरवते. पोशाख देते. शिक्षणाचे पैसे घेत नाही. खरं तर सरकार हे अशा मोकाट सुटलेल्या व महाविद्यालयाला कारखाना समजणाऱ्या शिक्षण सम्राटांना धडा शिकवू शकते. त्यांना शाळा, महाविद्यालय बंद करायला लावू शकते. देशातील प्रत्येक मुलांसाठी निःशुल्क शिक्षण देणारी शाळा महाविद्यालये उघडू शकते. परंतु सरकार तसे न करता कॉन्व्हेंट शाळेला परवानग्या देते. त्यांची जाहीरात होवू देते. त्या जाहीरातींना थांबवत नाही. त्यांच्या शुल्कवाढीवरही बंधनं लावत नाही. उलट गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यावर अंकुश लावते. देशात अशाच स्वरुपाचं खाजगीकरण सुरु आहे. याचं कारण आहे, सरकार जरी दुटप्पीधोरण धोरणानं वागत नसली तरी त्यांचं वागत असल्यासारखं दिसणारं दुटप्पीधोरण. सरकारनं गांधारीसारखी डोळ्याला बांधलेली पट्टी. सरकार दाखवत असलेलं स्वतःचं लाचारीपण. जणू ते आजच्या शिक्षणसम्राटांसमोर लाचार असल्यागत वाटतं. त्यातच आजच्या शिक्षणसम्राटांचा वाढता प्रभाव. विशेष म्हणजे ते सरकारच स्वतः प्रबळ असुनही जर दुर्बल असल्यागत वागतांना दिसत असेल. तेव्हा सामान्य माणसांची स्थिती काय असू शकेल! यावर विचार करण्याची आजतरी गरज आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास सरकार काही दुर्बल नाही आणि सरकारला कोणीही दुर्बल समजू नये. तसंच सरकारनंही दुटप्पी स्वरुपाचं वागू नये. खाजगीकरणाला प्रोत्साहन देवू नये. ज्याप्रमाणे दोनचार शाळेतील शिक्षण हे जसं निःशुल्क आहे. तशाच संपूर्ण शाळेतील शिक्षण हे निःशुल्क करावे. केवळ शाळेतीलच शिक्षण निःशुल्क करावे असं नाही तर महाविद्यालयातीलही शिक्षण निःशुल्क करावे. जेणेकरुन गरीब जनतेच्या मुलांनाही उच्च शिक्षण घेता येवू शकेल. त्यांनाही डॉक्टर, इंजीनियर, वकील, शिक्षक वा तत्सम प्रकारचं शिक्षण घेता येवू शकेल. ज्यांना असं निःशुल्क शिक्षण मिळालं तर ते देशातील जनतेची अतिशय अल्प मोबदल्यात सेवा करु शकतील. मग शिक्षण शिकवणं असो वा रुग्णालयात रुग्णावर उपचार करणं असो, वा न्यायालयात न्याय मिळणं असो वा देशातील इतर कोणत्याही गोष्टी असो. असं जर झालंच तरच आजच्या नवीन शिक्षण धोरणाच्या शैक्षणिक उद्दीष्टांची परिपुर्ती होईल. नाहीतर त्या नवीन शिक्षण धोरणाचा काहीही उपयोग होणार नाही हे तेवढंच खरं.
(११)
नारायण सराच्या वर्गात बरेच विद्यार्थी हुशार होते व वाटत होतं की ते विद्यार्थी बरेच पुढे जातील. परंतु काही विद्यार्थी नक्कीच गरीब होते. त्यातही त्या विद्यार्थ्यांचे पालक हे मद्यप्राशन करणारेही होते. काही मुलीही हुशारच होत्या. परंतु काही पालक हे मुला मुलीत भेदभावही करणारे होते. शिवाय खाजगीकरणाचाही धोका होता. नारायण सरांना खाजगीकरणाचा प्रश्न भेडसावत होता. वाटत होतं की हे खाजगीकरण पुढं जावून विद्यार्थ्यांचं नक्कीच नुकसान करेल. कारण आज उच्च पदापर्यंत जात असतांना जो पैसा लागतो. तो पैसा लोकांकडे नसेल. ज्यातून त्यांची गुणवत्ता ही मारली जाईल. आज तीच स्थिती होती शिक्षणाची. डॉक्टरकीला कमीतकमी पन्नास लाख लागतच होते. शाळा या कॉन्व्हेंटपासून तर उच्च श्रेणीच्या महाविद्यालयापर्यंत पुर्णतः खाजगी स्वरुपाच्या होत्या. ज्यात शिक्षणातही 'पैसा फेक तमाशा देख' अशी स्थिती होती. काय करावं सुचेनासं होत असे लोकांना. त्यातच लोकांमध्ये संदेश जात होता की गरीबांच्या लेकरानं कामापुरतं शिकावं. उच्च शिक्षणाला पैसा लागतो. त्यामुळंच उच्च शिक्षणाची आसच धरु नये. नारायण सरांनी एकदा वर्गात विचारलेला प्रश्न आठवत होता. प्रत्येकांनी डॉक्टर, इंजीनियर तर कोणी संशोधक बनायचं असल्याचं सांगीतलं होतं. तशी देशात शिक्षणाची अवस्था ही पैसे लावू होती. वाटत होतं की अशा युगात या मुलांची जरी डॉक्टर, इंजीनियर बनायची इच्छा जरी असली तरी हे यांचं बालवय आहे. यांना काय माहीत की आता डॉक्टर, इंजीनियर व तत्सम अभ्यासक्रम शिकायला अतोनात पैसा लागतो. पुढील काळात तोच अभ्यासक्रम शिकायला अतोनात पैसा लागेल. आज जेवढा पैसा डॉक्टर, इंजीनियरच्या शिक्षणाला लागतो. तो पैसा, ही मुलं जरी हुशार असली तरी यांचे मायबाप लावतील का? तशाच ज्या मुली हुशार आहेत. त्या मुलींना शिकवीत असतांना जे मायबाप मुला मुलीत भेदभाव करतात. मुलाला वंशाचा वारस समजतात. त्यांचे मायबाप त्यांना तरी शिकवतील का? ही चिंता आजमितीस मुलांच्या मायबापांना नाही तर नारायण सरांना सतावत होती. नारायण सर हे निर्भीड होते. ते शाळेत शिक्षण देत असतांना कुणाला घाबरायचे नाहीत. ते आपल्या संस्थाचालकांनाही घाबरत नसत. ते स्वतंत्र्यपणे शिकवीत असत. इतिहास तर त्यांना एवढा चांगला शिकवायला जमायचा की ते स्वतः त्या स्वरुपाचा प्रसंग व पात्र व्यक्तीशः उभे करीत असत. परंतु हे जरी खरं असलं तरी विद्यार्थी शिकवीत असतांना त्यांची जणू हुशारी मारली जाणार की काय? असं नारायण सरांना वाटत होतं. त्रिशाचा तो वर्ग. तो वर्ग नारायण सरांकडेच होता. त्यानंतर त्रिशा सहावीत गेली व सहावीत असतांना तोच वर्ग माध्यमिक विभागाशी समाविष्ट झाला. त्यानंतर सर तिला शिकवायला नव्हते. तशी ती नारायण सरांची शाळा सोडून दुसर्या शाळेत गेली होती. त्याही शाळेत तिला वेगवेगळे शिक्षक लाभले होते. त्यातील काही शिकविणारे होते तर काही शिकविणारेही नव्हते. परंतु त्रिशानं हिंमत हारली नाही. कारण नारायण सरांचं आत्मविश्वासाचं आणि महत्वाकांक्षेचं बाळकडू तिच्यासोबत होतं. ज्यातून ती सावरली जात होती. नारायण सरांना आठवत होता तो काळ. ज्यावेळेस ते त्रिशाला शिकवीत होते. तिला त्यांनी विचारलं होतं की काय बनणार. तेव्हा ती म्हणाली होती की सर मला डॉक्टर बनायचं आहे. परंतु काळ जसजसा पुढे सरकत गेला. तसतशी त्रिशाला शिक्षणाची परिस्थिती माहीत होत गेली. त्यानंतर मनात इच्छा असुनही त्रिशाला डॉक्टरकीकडं जाता आलं नाही. कारण तेवढे पैसे त्रिशाच्या वडीलांकडे नव्हते. त्रिशा आज दहावी पास झाली होती व तिला चांगलेच गुण मिळाले होते. थोडे कमी गुण पडले नव्हते. जरी तिनं इतर मुलांसारखी शिकवणी लावली नव्हती तरीही. त्रिशाला आलेल्या गुणानं त्रिशाला एका मोठ्या नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. परंतु ते महाविद्यालय म्हटलं तर नाव मोठं व दर्शन खोटंच होतं. त्रिशा नित्यनेमानं महाविद्यालयात जात असे. परंतु महाविद्यालयात जी तासिका व्यवस्था होती. ती तिच्या अध्ययनास अनुकूल नव्हती. कारण महाविद्यालयात मुलं तासिका शिकतच नव्हते तर ते जवळच्याच चायटपरीवर तासन्तास बसून राहात. ज्यात त्रिशाच्या शिक्षणाची आबाळ होत असे. महाविद्यालयात बरीचशी मुलं अजिबात शिकायला येत नसत. त्यावर कोणी म्हणत असत की हे महाविद्यालय टायप आहे. मुलं शिकवणी वर्गात जातात. परंतु महाविद्यालयात येत नाही. त्रिशा हुशार होती. परंतु तिच्या घरची परिस्थिती थोडी हलाखीची असल्यानं तिला शिकवणी वर्ग लावणं वा टायप कॉलेज करणं जमत नव्हतं. तरीही ती शिकत होती. त्रिशाच्या महाविद्यालयात न होणाऱ्या तासिका. त्यामुळं चिंताग्रस्त झालेली त्रिशा. तिला त्यावर उपाय सापडत नव्हता. अशातच तिला आठवला तो नारायण सरांनी शिकविलेला पाचवा वर्ग. त्या वर्गात असतांना तिचे वडील ती लहान असल्यानं तिला मोबाईल देत नसत. परंतु तिला नारायण सर मोबाईल द्यायचे व त्यात ती कधीकधी शाळेतील अभ्यास उघडून पाहायची. आज तिला तेच आठवलं होतं. आता तिनं ठरवलं होतं की घरी असलेल्या मोबाईलवरुन ती आता अभ्यास करणार. लागलीच विचार करताच तिनं मोबाईलवरुन अभ्यास करणं सुरु केलं. अशातच परिक्षा झाली व त्या परीक्षेत त्रिशाला चांगलेच गुण मिळाले होते. ज्यातून ती गुणवत्तायादीत आली होती. ती गुणवत्ता यादी. तिचा क्रमांक डॉक्टरकीतही लागला होता. परंतु त्याचं शुल्क हे भरपूर होतं. ते शुल्क पाहून त्रिशानं डॉक्टरकीकडे जाणं टाळलं व तिनं दुसरीकडे प्रवेश घेतला. ज्या व्यवसायीक शिक्षणात कमीत कमी पैसे लागत होते. जो अभ्यासक्रम शिक्षकी पेशाचा होता. त्रिशानं शिक्षकी पेशाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला व ती आता पुर्ण रुपात शिक्षिका बनू लागली होती. खाजगीकरणाची झळ त्रिशालाही पोहोचली होती. कारण तिचं बालपणापासूनच डॉक्टर बनायचं स्वप्न होतं. परंतु खाजगी महाविद्यालयानं आखून दिलेली फी तिच्याजवळ नव्हती. डॉक्टरकीचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी सरकारी महाविद्यालयंही तेवढी नव्हती. शिवाय ती जरी हुशार असली तरी तिला अभ्यास करायला पुरेसं वातावरण नव्हतं. शिकवणी लावायलाही पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळं तिला तेवढे गुण मिळाले नव्हते की तिला सरकारी महाविद्यालयात नंबर लागेल. अन् सरकारी महाविद्यालयात जरी तिचा नंबर लागला असता तरी त्या अभ्यासक्रमासाठीही तिला खर्च येणारच होता. खाजगीकरणातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची कंबर तुटली होती. त्यात तिशाही समावेश होता. शेवटी काय करावं. म्हणून नाईलाजानं ती मनात इच्छा नसूनही शिक्षिका पेशाकडे गेली होती.
(१२)
सरांना वाढदिवसाचा प्रसंग आठवत होता. तो दिवस. त्या दिवशी दहावीची परिक्षा होती. शाळा हे केंद्र होतं. त्यातच सरांची वर्गखोलीही परिक्षेसाठी होती. विद्यार्थ्यांनी ठरवलं. सरांचा वाढदिवस साजरा करायचा. त्यानंतर फुगे लावण्यात आले. वर्ग सजावट करण्यात आली. चांगला मुलांनी केक आणला होता. एक गिफ्टही आणलं होतं. त्यातच सरांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी केक कापायला लावला. परंतु अशातच माशी शिंकली व शाळेच्या शिपायानं म्हटलं, "सर, दहावीचा पेपर आहे. वेळेवर कचरा होईल वर्गात. झाडावं लागेल. तेव्हा आपण केक खाली कापावा व वाढदिवस खाली साजरा करावा." तो शिपाई व त्या शिपायानं तसं म्हणताच केलेल्या सर्व तयारीवर पाणी फेरलं. त्यानंतर सर्व विद्यार्थी सराच्या सुचनेनुसार खाली आहे. दहावीचा पेपर. त्यातच आज शाळेला लवकर सुट्टी देण्यात आली होती. इतर वर्गातील पुर्ण मुलं घरी गेले होते. दोनचार होते. त्यांनाही वाटत होतं की सरांचा वाढदिवस आहे. आपणही साजरा करावा. म्हणूनच तेही उपस्थित होते. अम्बिकानं सरांना गिफ्ट दिलं. त्याचे फोटो आस्था नावाच्या मुलीनं काढले. त्यानंतर व्हिडीओ काढले गेले. फोटो दरम्यानच सरांना केक कापायला लावला. सरांनी केक कापला. त्यानंतर केक वाटण्यात आला. केक सर्वांनाच देण्यात आला. परंतु तो केक वाटण्यात एक चुकी झाली. तो केक ज्यांनी आणला होता. ज्यांनी तो केक आणण्यासाठी पैसे गोळा केले होते. ज्यांनी तो वाढदिवस साजरा करण्यासाठी मेहनत केली होती. त्यांनाच केक मिळाला नाही. त्यामुळंच सरांच्या वर्गातील मुलं नाराज झाले व ते नाराजीपण स्पष्टपणे त्यांच्या चेहर्यावर दिसत होतं. सरांनी ते पाहिलं. सरांना चांगलं वाटत नव्हतं. अशातच एक मुलगी आली. सरांनाच म्हणाली, "सर, केक तर संपला. आम्ही काय खाणार?" ती लहान मुलं. त्या लहान मुलांना कोण सांगणार की आपली वस्तू इतरांना जर मिळत असेल तर त्यात जास्त प्रमाणात आनंद असतो. वाढदिवस साजरा झाला होता. त्याचे व्हिडीओ व फोटोही काढण्यात आले होते. परंतु त्यातही आयोजन करणारी मुलं नव्हतीच. सर जेव्हा घरी आले. तेव्हा त्यांनी काढलेले व्हिडीओ फोटो पाहिले. तेव्हा त्यांना कळलं की आयोजनकर्त्या मुलांचे फोटोही व्हिडीओ व फोटोत आले नाही. तेव्हा त्यांनी त्याच विद्यार्थ्यांची समजूत घालत म्हटलं की आज आपल्या वर्गाला केक मिळाला नाही व फोटोतही आपल्या वर्गाची मुलं दिसली नाहीत. त्यामुळं उद्याला आणखी एक केक आणू. तो केक वर्गातच कापू. तसेच ग्रुप फोटोही काढू. सरांनी मोबाईलच्या मेसेजद्वारे विद्यार्थ्यांचं समाधान तर केलं. परंतु त्यांना समाधान वाटलं नाही. त्या प्रसंगावर काय करावं व काय नाही याची चिंता सरांना लागून राहिली होती. दुसरा दिवस उजळला होता. सर वर्गात गेले होते. सरांना मुलं रागात दिसत होती. कुणीच बोलायला खाली नव्हतं. आता त्यांना कसं खुश करावं हे काही कळत नव्हतं. वाढदिवसाचं आयोजन हे त्रिशाचं होतं. मात्र त्रिशा काही आली नव्हती. तिच्याही मनात रागच धुमसत होता. तसा थोड्या वेळाचा अवकाश. थोड्या वेळानं त्रिशा आली. तिनं सरांना आत येवू काय? असंही विचारलं नाही. त्यावरुन कळत होतं की तिच्या मनात किती राग आहे. तसा विचार करुन त्रिशाशी सर बोलते झाले. म्हणाले, "त्रिशा, आज का बरं वेळ झाला?" तो सरांचा प्रश्न. तशी ती एखाद्या मोठ्या झालेल्या व महाविद्यालय शिकणाऱ्या मुलीसारखी म्हणाली, "सर, तुम्ही बोलू नका." सरांनी ते ऐकलं. तसे सर म्हणाले, "काय झालं असं? का बरं सरांशी बोलणार नाही?" ते सरांचं बोलणं. त्यावर इतर मुलींपैकी अम्बिका एकसुरानं म्हणाली, "काल सर, आमचा संपुर्ण केक तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना वाटून टाकला. आम्हाला ठेवला नाही." "हो काय? ठीक आहे. आज आणखी आणू दुसरा केक." असं म्हणत सरांनी बाजू सावरुन नेली. तोच बाकीच्या मुली एकसुरानं बोलत्या झाल्या. त्यानंतर त्रिशा म्हणाली, "आम्हाला नकोय तुमचा केक. आता केक तुमचा तुम्हीच खा." ते विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांचं ते बोलणं. ते विद्यार्थी अतिशय निर्भीडपणे बोलून गेले. मात्र सरांना तेच अपेक्षित होतं. आज खरं तर या निर्भीड झालेल्या मुली. आज त्या मुली बोलायलाही लागल्या होत्या. त्यांच्यात तेवढं डेरींग आलं होतं. सरांना आठवलं त्याचवेळेस. ते सात आठ महिन्यापुर्वीचे दिवस. ज्यावेळेस ते या वर्गात शिकवायला आले होते. मुलं अजिबात बोलत नव्हती. फक्त एक वाढदिवस सोडला तर आज तारखेपर्यंत वर्षभर ती मुलं शांत होती आणि आता एक साधारण खायचा त्यांचा केक त्यांना न मिळाल्यानं ती मुलं बोलायला लागली होती. बोलली होती आपल्या हक्कासाठी. त्यांचा हक्कं कुठंतरी सररुपी शासनानं हिरावून घेतला होता. तसं वाटत होतं की ही आज बोलकी झालेली मुलं, भविष्यातही यांच्या हक्कावर गदा आल्यास ती चूप बसणार नाहीत. विद्यार्थ्यांचं ठीक होतं की त्यांनी सरांचा वाढदिवस साजरा केला होता व आनंद मिळवला होता. ती निष्पाप मुलं व त्यांची निरागसता ही आनंद मिळविण्यासाठी होती. त्यांना काय माहीत होते की ती त्यांची आनंद मिळविण्याची निरागसता कुठंतरी त्यांच्या सरांचाच बळी घेईल. पुढं तेच घडलं होतं. त्यानंतर त्याच सरांना खाजगीकरणानं चक्रव्यूहात ओढलं होतं. ज्यातून बाहेर निघण्याला मार्गच नव्हता अभिमन्यूसारखा. नारायण सर चक्रव्यूहात फसले गेले होते.