Paavsanchya Sari - 1 in Marathi Love Stories by Arjun Sutar books and stories PDF | पावसांच्या सरी - भाग 1

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

पावसांच्या सरी - भाग 1

आकाशात सर्वत्र ढग दाटून आलेले होते. कधीही वाऱ्याची थंड झुळूक येईल आणि त्या ढगांतून पाण्याच्या धारा गडगडत खाली पडतील, असं एकदम आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं. मी मात्र, पावसाचं पाणी गाडीच्या आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद करून घरी जात होतो. पण आज, ज्या पावसाला मी एवढं टाळत होतो,त्याच पावसात, कधीकाळी मी शरीराने आणि मनाने पूर्णपणे चिंब भिजून गेलो होतो. जरी मी शरीराने गाडीच्या आत बसलो होतो, तरी मनाने भूतकाळातील त्या आठवणींमध्ये डोकावायला सुरुवात केली होती.आठवणी म्हणजे जणू काही मुंग्यांच्या वारुळासारख्या असतात; एकदा त्या सुरू झाल्या की थांबायचं नावच घेत नाहीत. मी कधी माझ्या विचारांत हरवत महाविद्यालयात पोहोचलो, हे मलाच कळलं नाही.महाविद्यालय म्हणजे स्वप्नांची दुनिया! एक असं जग, जे प्रत्येकाला हवाहवसं वाटतं. तिथे मला नवीन मित्र भेटणार होते, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याचे आणि आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करण्याचे दिवस होते. शाळा संपल्यानंतर, एकीकडे माझ्या जवळच्या मित्रांच्या दुराव्याचं दुःख होतं, पण ते फार वेळ टिकलं नाही. कारण, माझी शाळा आणि महाविद्यालय एकाच इमारतीत होती, फक्त एका मजल्याचा फरक होता. माझ्यासाठी मात्र खरा बदल असा होता की, मुलांच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, आता पहिल्यांदाच मी कॉलेजच्या स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करणार होतो.ऐन तारुण्याच्या आणि उमेदीच्या काळात, मनात एक वेगळीच खळबळ आणि चलबिचल सुरू असायची. हे वयच तसं असतं—जिथे कितीही समजावलं तरी सौंदर्याच्या डोहात नाहून जाण्याची स्वाभाविक इच्छा निर्माण होते. पण ती इच्छा पूर्ण झाली नाही, तर मनात अस्वस्थतेची एक लाट दाटून येत असे. त्याच्याविषयी माझ्या मनात नेहमीच एक अतूट आकर्षण वाटत असे. हा माझ्या वयाचा दोष होता की मनाचा ?  असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असत.कधी कधी असं वाटायचं की आपल्यात प्रचंड सामर्थ्य आहे—जणू काही हवे ते मिळवण्याची ताकद आपल्या हातातच आहे आणि या जगावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता आहे. मला स्वतःला जपायला हवं आणि ही अमर्याद शक्ती कुठेतरी चांगल्या आणि सकारात्मक कामासाठी खर्च केली पाहिजेत्या कॉलेजच्या दिवसांत असेच सौंदर्य माझ्या चहूबाजूंनी पसरलेलं होतं. पण घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि जबाबदारीच्या बंधनाखाली ते सौंदर्य समोर असूनही मला दिसत नव्हतं. एका बाजूला हा संघर्षाचा आणि स्वतःला घडवण्याचा काळ होता, तर दुसऱ्या बाजूला मनाला उभारी देण्याचा, जीवनाच्या विविध रंगांना आणि प्रेमाला समजून घेण्याचा तो काळ होता. घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठीची जी धडपड सुरू होती, ती डोळ्यांवरची पट्टी बनली होती. ती पट्टी किती काळ टिकेल, याची मला खात्री नव्हती. कधी कधी ती पट्टी निघून जाईल का, अशी भीतीही वाटायची. पण मी मात्र स्वतःचा तोल सावरत, मनामध्ये चौफेर उधळलेल्या विचारांना आवर घालत, संयमाने महाविद्यालयात वावरत होतो.एके दिवशी, दोन्ही वर्गांसाठी गणिताचा तास सुरू होता. तोही रविवारी! आमचे सर नेहमीच जादा तास घेत असायचे. वर्गात मी उशिरा पोहोचलो, आणि शेवटच्या रांगेतील मागच्या बाकावर कसाबसा बसलो. विद्यार्थ्यांची संख्या इतकी होती की जागा मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागे  गणिताचा तास म्हणजे नेहमीच गंभीर वातावरण! ना कसली चर्चा, ना हसणं-खेळणं. ते  पावसाळ्याचे  दिवस होते, आणि खिडकीतून बाहेर पाहिलं, तर पावसाच्या बारीक सरी शांतपणे जमिनीवर पडत होत्या, जणू काही कानाला सुरेल संगीताचे मधुर सूर ऐकू यावेत, असा त्यांच्या आवाजाचा भास होत होता.त्या सरींच्या शांत आघातांनी माझ्या मनात एक वेगळं विचारमंथन सुरू झालं होतंतास सुरू असतानाच वर्गात काही मुलीनी  प्रवेश केला , ज्यामुळे सगळ्यांच्या नजरा क्षणभर त्यांच्याकडे वळल्या. कदाचित त्यांची गाडी उशिरा अली असावी म्हणून त्या एवढ्या उशिरा आल्या असतील. मीही डोके वर करून एकदा नजर फिरवली, आणि क्षणातच कळून चुकले की त्यांचा हा प्रवेश साधा-सुधा नाही. छे छे! जणू काही इंद्राच्या दरबारात मेनका आणि उर्वशी याव्या, अगदी तशाच रुबाबात ती वर्गात अली होती. माझी नजर त्या  तरुणीकडे गेली. ती मेनका किंवा उर्वशी यांच्यापैकी कोणीतरी असावी, असाच भास मला होऊ लागला होता . ती ज्या प्रकारे पावसात भिजली होती कदाचित त्या पावसालाही तिला भेटण्याचा मोह आवरता आला नसावा. रविवार असल्यामुळे, कधी नव्हे ते ती वेगळ्या रंगाचा पोशाख परिधान करून अली होती. सुंदर असा पंधरा शुभ्र असा तिचा तो ड्रेस आणि ओलेचिंब भिजलेले रूप पाहून मला तर पारिजातकाचे फुल असावे असे वाटू लागले. अशीच ती मेनकेसमान अप्सरा चालत आल्यामुळे तिच्या पैंजणांचा मंजुळ आवाज वर्गभर पसरत होता. ती मुलींच्या बाजूला, शेवटच्या बाकावर जाऊन बसली. त्या क्षणी मला वाटलं – मला जे काही भास होत आहेत. ही माझी कल्पना तर नाही ना? म्हणून स्वतःला गणिताच्या समीकरणांच्या मदतीने चिमटा काढून पाहिलं. पुन्हा अभ्यासात लक्ष लागते का, असा प्रयत्न केला, पण तोही विफल ठरला.माझ्या नजरा परत तिच्याकडे वळल्या, कारण यावेळी मनाने माझ्या पूर्ण शरीरावर आणि मेंदूवर नियंत्रण घेतलं होतं. ती तिच्या केसांची बट सावरत, कानाभोवती नीट करत होती. तिचं मनमोहक रूप पाहून मला वाटलं की, चंद्र जसजसा कलेने वाढत जातो, तसतसे तिचं सौंदर्यदेखील वाढत असावं. अगदी  समुद्राला भरती यावी तशीच तिच्या येण्याने वर्गात सौंदर्याची लहर उसळली होती. तिच्या आगमनाने वातावरणात प्राजक्ताच्या सुवासाचा भास होत होता. प्राजक्त फुलांसारखी ती सुंदर होती, आणि तिचं सौंदर्य जणू सर्वत्र पसरलं होतं.  अमृतमंथनानंतर जसा देव आणि दानवांना अमृताची ओढ लागली होती, तसंच मला तिच्याविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली होती. कोण असेल ही तरुणी? काय असेल तिचं नाव?“तिच्या एका स्मितहास्याने मनात हर्षवायूची लहर उसळली आहे. तिला 'हर्षदा' म्हणावं का?”"माझ्या धमन्यांमध्ये अश्वमेधाच्या वेगाने रक्त प्रवाहित करणारी ही 'अश्विनी' असेल का?"“माझ्या कवी मनाला जागृत करणारी... तिला 'कविता' या नावाने हाक मारावी का?”तिच्या सौंदर्याच्या मोहपाशात अडकून, मला विचारमंथन करायला लावणारी. या युवतीला 'लावण्या' म्हणावं का?"तिच्या आगमनाने मला पारिजातकाच्या सुगंधाचा सहवास मिळाला, अशी ती 'प्राजक्ता' असेल का?"नक्कीच, ती स्वर्गातील अप्सरा यांच्यापेक्षा अधिक सुंदर असेल असं मला त्या दिवशी भास झाला होता... का, ही फक्त माझी कल्पना आहे? कोण आहेस तू, देवी?"तिचा आवाज ऐकण्याची एक ओढ लागली होती, आणि असे विचार मनात चालू असतानाच, गणिताच्या तासाची घंटा कानावर पडली. तास संपल्यानंतर मात्र मनात फक्त एकच विचार आला: एखाद्याला बोलता येत असेल, पण बोलायला भेटू नये आणि त्यावर बंधने असतील, तर त्याच्या काय भावना असतील?माझं कवी मन स्वतःला सांगत होतं, "जा,आणि त्या तरुणीला तिच्या माहिती नसलेल्या , मनमोहक अशा सौंदर्याची जाणीव करून दे."पण त्याच क्षणी माझ्या बुद्धीने मनावर ताबा घेतला आणि म्हणू लागली, 'पुरुषाचा जन्म हा कीर्ती आणि पराक्रम मिळवण्यासाठी झालेला असतो. त्यामुळे अशा मोहाच्या क्षणी स्वतःला सावर.' तिच्यामुळे अश्विनीच्या गतीने धमन्यांमधून रक्त सळसळत आहे, हे खरे आहे, पण हे आयुष्य अशा क्षुल्लक गोष्टींवर वाया घालवण्यासाठी नाही. तरुणांनी अशा बाह्य आकर्षणांना भुलू नये; त्यांनी कर्तृत्वाचे झेंडे फडकवावे. आणि कर्तृत्वाच्या कीर्तीनेच अशा तरुणींच्या मनावर राज्य करावं.'कदाचित, हा माझा अहंकार होता, किंवा अपेक्षांच्या ओझ्यामुळे मी असा विचार करत होतो, हे मला माहिती नाही. पण हे नक्कीच यामुळेच, मनाचं आणि माझ्या बुद्धीचं एक युद्ध सुरू झालं होतं. अशा गोंधळलेल्या मनःस्थितीत, मी वर्गातून निघून गेलो.त्या क्षणानंतर, ती कितीतरी वेळा माझ्या नजरेसमोर आली, पण तिच्याशी बोलायचं धाडस मी कधीच केलं नाही. कारण अपेक्षांच्या ओझ्याने, कर्तृत्वाच्या आकांक्षेने, आणि पुष्कळसा अहंकाराने मला तशी संधीच दिली नाही. पण सत्य हेच होतं—ती जशी त्या दिवशी पावसात भिजली होती, तसंच मीही तिच्या सौंदर्यात अखंड भिजलो होतो.देवाने दिलेल्या तिच्या सौंदर्याचा मी कदाचित अनादरच केला असेल.तिच्या सौंदर्याची जाणीव तिला करून देणं, हे एक महाकाव्य लिहिण्याइतकं कठीण काम होतं. कारण "तू खूपच सुंदर दिसतेस" हे फक्त एक साधं वाक्य नव्हतं. ते बोलल्यावर, कदाचित तिचा आणि सर्वांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असता.आजही असं वाटतं, अपेक्षांचं ओझं दूर फेकून, समाजाच्या चौकटींचं बंधन न जुमानता, मनाचं ऐकायला हवं होतं. तिच्या त्या अद्वितीय सौंदर्याची जाणीव तिला करून द्यायला हवी होती. कदाचित, त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणि आनंद गगनाला भिडला असता. शेवटी, तिला हेसुद्धा कोणाकडून तरी ऐकण्याची आस असू शकेल.असे विचार करत-करत, कधी माझी गाडी घराजवळ पोहोचली, हे मला समजलंच नाही. पाऊस कधीच थांबला होता, आणि समोर फक्त वास्तविक सूर्यप्रकाशाने सर्व वातावरण आणि ढग मोकळे केले होते