Blackmail in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 6

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 6

प्रकरण ६
एकादषम अर्वाचिन कंपनीचे ऑफिसपाशी पाणिनी आला तेव्हा १०.२० झाले होते. तो अशा जागी उभा होता की आत येणारे कंपनीचे लोक त्याला बरोब्बर दिसत होते.ठीक १०.३० ला प्रचिती पारसनीस दारातून आत येतांना दिसली.
“तू कुठे होतीस काल?” पुढे होत पाणिनी ने विचारलं.
तिने पाणिनीचा हात असा काही पकडला की त्या स्पर्शावरून पाणिनीला जाणवलं की तिला त्याच्या शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज होती.
“ आज पहाटे ३.२५ ला प्रयंक गेला ! ” ती मुसमुसत म्हणाली.
“ ओह ! प्रचिती, माफ कर मला.तुमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. पण प्रचिती, आपल्याला थोडं भावनिक न होता काही महत्वाची काम पार पडायची आहेत.”
“ मी तुम्हाला वाचन दिलं होतं म्हणून आज आल्ये इथे.नाहीतर मी साहेबांना सांगून रजाच घेणार होते.”
“ मान्य आहे मला पण तू अत्ता या क्षणी कुठल्या परिस्थितीत आहेस याचा विचार कर. तू जरी मला पाच लाखाचा अपहार झाला असं सांगितलंस तरी कंपनीचा दावा आहे की वीस लाखाचा झालाय.” पाणिनी म्हणाला
“ वीस लाख ! ”
“ हो. तू रोज कामावर कशी येतेस? गाडी आणतेस?”
“ बस ने येते.” प्रचिती म्हणाली.
“ भावाचे पुढचे विधी....?..”
“ मी सकाळीच सर्व पूर्ण केले पटवर्धन.मनावर मोठा दगड ठेऊन मी आले इथे.”
“ तू काल ठरलेल्या विमानात का नव्हतीस?” पाणिनीने विचारलं.
“ हॉटेल मधून निघाल्यापासून एक जण माझा बस स्टँड पर्यंत पाठलाग करत होता.मी स्टँडवर आल्यावर गर्दीत मिसळून त्याला हुलकावणी द्यायचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. मी मुद्दामच लेडीज रूम मधे बराच वेळ जाऊन बसले. आणि टॅक्सी करून विमान तळावर गेले.पण आपले विमान मला गाठता आलं नाही.ते निघून गेलं होतं. दहा मिनिटापूर्वीच.म्हणून मग मी रात्री जेवण केलं आणि नंतरचे देवनार चे विमान घेतलं आणि इथे आले. मी तुम्हाला कळवायला हवं होतं पण मनात विचार केला की सकाळी आपण ऑफिसात भेटणारच आहोत.शिवाय त्या पाठलाग चुकवण्याच्या नादात तुम्हाला किंवा कनक ओजस ला फोन करायचा राहिला. पहाटे मी इथे आल्यावर हॉस्पिटल ला फोन केला तेव्हा भावाची बातमी समजली.मला माफ करा. ”
“ ठीक आहे.तू आता आली आहेस तशीच पुन्हा बस ने घरी जा.थोडी झोप काढ.ही घे तुझी सुटकेस मी आणल्ये. तू बँकेचा ड्राफ्ट आणलास का? मला दे तो.शक्यतोवर मी त्याचा वापर करणार नाही.पण देऊन ठेव.” पाणिनीने विचारलं.
“ पुढे काय करणार आहात तुम्ही?” पाणिनीकडे ड्राफ्ट देत ती म्हणाली. पाणिनीने ड्राफ्ट आपल्या खिशात ठेवला आणि म्हणाला, “ मी तुमच्या कंपनीवर जरा दबाव टाकणारे.पण तू त्याचा विचार करू नको.मी बघेन ते.तू आता बस ने घरी जा पुन्हा.कथे स्टॉप आहे बसचा? ”
“ खालीच आहे. पटवर्धन, मी तुम्हाला विमानाच्या तिकिटाचे पैसे देणार आहे.पण अत्ता नाहीयेत माझ्याकडे ...पण...”-प्रचिती
“ तो काहीही विचार करू नको.” पाणिनी म्हणाला आणि तिला घरी जायची सूचना देऊन एकादषम अर्वाचिन कंपनी मधे जायला निघाला.
“ मला शाल्व धारवाडकर ना भेटायचं आहे.” पाणिनी रिसेप्शानिस्ट ला म्हणाला.
“ ते परगावी गेलेत.”
“ मग शुक्लेंदू ना भेटेन.” पाणिनी म्हणाला
“ आपलं नाव?” – रिसेप्शानिस्ट
“ पाणिनी पटवर्धन.”
“ कुठल्या फर्म तर्फे आलाय तुम्ही? आणि काय खरेदी करायचं आहे?”
“ माझं काम वैयक्तिक आणि खाजगी आहे.मी कुठल्याही फर्म चा विक्रेता किंवा खरेदीदार म्हणून आलो नाहीये.मी अॅडव्होकेट आहे आणि तुमच्याकडे कामाला असणाऱ्या प्रचिती पारसनीस संबंधी बोलायला आलोय मी.” पाणिनी म्हणाला
क्षणात तिचा नूर पालटला. तिने घाई घाईत इंटरकॉममधून कुणाशीतरी हळू आवाजात बोलणं केलं.पाणिनीला शब्द कळत नव्हते पण ते बोलणं झाल्या झाल्या एक रिसेप्शानिस्ट च्या मागच्या बाजूचं दार उघडलं गेलं आणि एक जाडजूड देहाचा,गोबऱ्या गालाचा आणि उद्धट चेहेऱ्याचा तिशीतला माणूस बाहेर आला. “ मिस्टर पटवर्धन?”
“ हो,बरोबर.”
“ मी शुक्लेंदू धारवाडकर. काय काम आहे माझ्याकडे?”-
“ प्रचिती पारसनीस बद्दल ” पाणिनी म्हणाला
“ तिच्या बद्दल काय?”
“ ती तुमच्याकडे नोकरी करते?” पाणिनीने विचारलं.
“ हो.पण आज ती आली नाहीये.”
“ का?”
“ तुम्हाला काय करायचंय आमच्या कंपनीतल्या स्टाफ च्या खाजगी बाबी बद्दल?” शुक्लेंदूने वैतागून विचारलं.
“तुमच्याच फायद्याची गोष्ट करणारे मी.” पाणिनी म्हणाला.
“तिच्या भावाला मोठा अपघात झालाय.”- शुक्लेंदू धारवाडकर
“ त्या बद्दल नाही.मला तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचंय,तिच्याशीच संबंधित.”
“ बोला.”
“ इथेच?” पाणिनीने विचारलं.
“ काय हरकत आहे?”- शुक्लेंदू धारवाडकर
“ ठीक आहे मी थेट विषयालाच हात घालतो. मी तिचं वकीलपत्र घेतलंय.तुमच्या कंपनीत तिने वीस लाखाचा अपहार केलाय ही गोष्ट रीवाच्या पोलिसांना कळवण्यामागे तुमचा काय हेतू आहे? ”
“ पुढे काहीही बोलू नका पटवर्धन.आम्ही असं काहीही बोललेलो नाही.” धारवाडकर जोरात म्हणाला.
“ बोलला नसाल तरी तसं भासवलंत?” पाणिनीने विचारलं.
“ हे बघा,या गोष्टी अशा इथे आणि अत्ता या वेळी बोलण्यासारख्या नाहीत.”- शुक्लेंदू धारवाडकर म्हणाला.
“ का? काय हरकत आहे अत्ता बोलायला? ” पाणिनीने विचारलं.
“ मी अपेक्षित केलं नव्हत तुम्ही अचानक याल म्हणून.तुम्ही फोन ही केला नाहीत किंवा मला तशी सूचनाही दिली नाहीत.”
“ तुम्हाला ते अपेक्षित होतं? म्हणजे गरज होती आधी सूचना देण्याची?” पाणिनीने विचारलं.
“ आम्ही बाहेरच्या कुणालाही आधी ठरवल्याशिवाय भेटत नाही. ”
“ बर मग या ठिकाणी बोलण्यात काय गैर आहे?”
“ हो. पब्लिक प्लेस आहे पटवर्धन.” शुक्लेंदू धारवाडकर म्हणाला.
“ तुम्हीच थोड्या वेळापूर्वी म्हणालात की इथेच बोलू.”
त्याचा चेहेरा रागाने लालीलाल झाला,पण नाईलाज झाल्यासारखा शुक्लेंदू धारवाडकर म्हणाला, “ आपण माझ्या केबिन मधे बसून बोलूया का?”
ते दोघ त्याच्या केबिन मधे आले. त्याने पाणिनीला बसायला सांगितलं. “ पटवर्धन, ऑडीटने आमच्या लक्षात आणून दिलंय की रोख रकमेत फार मोठी तूट आल्ये.आणि अर्थात जे कर्मचारी रजेवर आहेत किंवा होते त्यांची चौकशी करणे गरजेचं ठरलंय.” शुक्लेंदू धारवाडकर म्हणाला.
“ प्रचिती पारसनीस ही एक आहे?”
“ अगदी बरोबर.”
“ तुमचे काका शाल्व धारवाडकर ही दुसरी व्यक्ती आहे? ” पाणिनीने विचारलं.
“ नीट बोला तुम्ही. काका हे नोकर नाहीयेत.ते मालक आहे कंपनीचे.” शुक्लेंदू धारवाडकर
“ प्रयंक पारसनीस ही आणखी तिसरी व्यक्ती आहे?”
“ हो.त्याची कवटी अपघातात फुटली आहे.तो बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमधे आहे. त्याची स्थिती चांगली नाहीये पटवर्धन.”
“ त्याच्याकडे सुद्धा तुम्ही या अपहाराबाबत चौकशी केलीत?” पाणिनीने विचारलं.
“ अहो तो बेशुद्ध आहे.त्याला कसं आणि काय विचारणार?”- शुक्लेंदू धारवाडकर
“ म्हणून प्रचिती ही एकमेव व्यक्ती अशी होती जिच्या बद्दल चौकशी करायच्या सूचना तुम्ही पोलिसांना दिल्यात?” पाणिनीने विचारलं.
“ अहो,ती रजेवर होती त्या काळात, अर्थात तिच्या भावाच्या आजारपणामुळे तिला हॉस्पिटल मधे राहावे लागेल असं आम्ही समजलो होतो पण चौकशी केली तेव्हा कळल की ती अचानक रीवाला गेल्ये. ”
“ म्हणून तुम्ही रीवा पोलिसांना तिच्या मागावर पाठवलंत?” पाणिनीने विचारलं.
“ तिच्या कडून माहिती मिळवण्यासाठी.” शुक्लेंदू म्हणाला.
“ तुम्ही असं मनात भरवलंत किंवा सुचवलंत पोलिसांना की तिनेच हा अपहार केलेला असावा?”
“ तुमचे शब्द माझ्या तोंडी घालू नका पटवर्धन.”
“ ती रीवामधे नेमकी कुठे रहात होती हे तुम्हाला कसं कळल?” पाणिनीने विचारलं.
“ ही गोष्ट मी नाही सांगू शकत.” शुक्लेंदू म्हणाला.
“ ठीक आहे, मिस्टर धारवाडकर.मी एवढंच सांगू इच्छितो की मी प्रचितीचं वकीलपत्र घेतलंय. तिच्यावर रोख रकमेचा अपहार केल्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष आरोप तुम्ही केल्यामुळे, तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोचलाय.हे माझं कार्ड घ्या.तिच्याशी तुमचं काही काम असेल किंवा बोलायचं असेल तर ते फक्त माझ्या मार्फत होवू शकेल.” पाणिनी म्हणाला
“ याचा अर्थ असा घ्यायचा का मी, की, ती आता इथे काम करणार नाही?”
“ त्याची चर्चा मी अत्ता नाही करू शकत. मी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा लावण्याचा ती विचार करू शकते.” पाणिनी म्हणाला.
(प्रकरण ६ समाप्त)