Maticha Sanshodhak - 2 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | मातीचा संशोधक - भाग 2

Featured Books
  • चंद्रवंशी - अध्याय 7

    माही अपने कमरे में बैठी है। उसके पास सायना आई है। माही के घर...

  • You Are My Choice - 61

    Happy Reading ----------------- If you want to read it in en...

  • खतरनाक जुआरी - भाग 7

    "लाहौल वाला कुवा!" सफ़दर ने मुँह बनाते हुए बुदबुदाया जब उसने...

  • Super Villain Series - Part 13

    अब आगे क्या?अगला भाग होगा:Part 13 – “त्रैत्य की पहली चाल” जह...

  • Haunted Forest

    आरंभ — "वो आखिरी चिट्ठी""अगर तुम ये चिट्ठी पढ़ रहे हो, तो सम...

Categories
Share

मातीचा संशोधक - भाग 2

भाग २

कचरु शेतीवरुन घरी आला होता. कचरु जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला ती न दिसल्यानं तो परेशान झाला. त्यानंतर त्यानं इकडेतिकडे फोन लावून पाहिलं. तिचा पत्ताच नव्हता. त्यानंतर त्यानं तिच्या मायबापाला व नातेवाईकालाही फोन लावून विचारलं. त्यांनीही कचरुला रागवत नकार दिला. त्यानंतर त्यानं तिची तक्रार पोलिस स्टेशनला केली होती. तसे काही दिवस गेले.
रंजना आपल्या त्या फेसबुकच्या मित्रासोबत राहू लागली होती. जो ऐतखाऊ होता तिचा मित्र. त्या मित्राशी तिनं सुरुवातीलाच विवाह केला होता. तिला वाटत होतं की तो नोकरीवर आहे. म्हणूनच ती भाळली होती त्याचेवर. त्यातच तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं विवाह केला खरा. परंतु वास्तविकता माहीत होताच तिनं त्याला सोडून देण्याचा विचार केला व एक दिवस ती त्याला सोडून कचरुजवळ आली. म्हणाली,
"मला माफ कर. माझी चूक झाली."
तिनं तशी हिंमत दर्शवली. तेच कचरुला भावलं व कचरुनंही काही आढेवेढे न घेता सढळ मनानं माफ केलं. मात्र मनात त्याच्या किंतु परंतु होताच.
चूक कबूल करतांना हिंमत लागते. चुका होतच असतात. ज्यांच्या चुका होणार नाहीत, तो मानव कसला? परंतु प्राणीमात्रांकडं पाहता त्यांच्या कोणत्याच चुका होतांना दिसत नाहीत. ते जेवनासाठी टाळाटाळ करीत नाहीत. कोणतंही काम मालक म्हणेल, त्यापद्धतीनं करतात. जेव्हा त्यांना वखर, नांगर वा बैलगाडीला जुंपलं, तेव्हा ते तयार असतात. परंतु मनुष्यप्राण्यांचं तसं नाही. म्हणूनच मनुष्यप्राण्यांच्या नेहमी चुका होत असतात.
चुका या नेहमीच होतात. नाही होत असं नाही. तसं पाहता चूक करणारा महान असतो. जर त्याच्यात चूक कबूल करायची क्षमता असेल तर........जो चूक करतो. परंतु झालेली चूक जो कबूलच करीत नाही. तो कधीच महान ठरु शकत नाही हे निर्विवाद सत्य गोष्ट आहे.
चूक होते, परंतु ती कबूल करतांना हिंमत लागते. चूक झाल्यावर आपल्याला असं वाटतं की पुढील व्यक्ती आपल्याला काय म्हणेल? तो रागवेल तर नाही ना? मारणार तर नाही ना? शिक्षा तर नाही ना करणार? याच भीतीपोटी कोणताच व्यक्ती चूक सढळ मतानं कबूल करीत नाही, तर चक्कं खोटं बोलतो. तसं पाहता चूक कबूल करणं हा गुन्हाच वाटतो प्रत्येकांना. कारण चूक कबूल केल्यास न्यायालयात शिक्षा होवू शकते. जसे. एखाद्यानं एखाद्याचा खुन केला असेल तर तो गुन्हा तो व्यक्ती सरासरी कबूल करीत नाही. आढेवेढे घेतो. कारण त्याला माहीत आहे की त्यानं सरासरी गुन्हा कबूल केल्यास त्याला शिक्षाच होते. मात्र त्यानं तो गुन्हा कबूल केल्यास त्याची शिक्षा माफ होत नाही वा त्यानं तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत केला हे विचारात घेतले जात नाही. जसे एखाद्या माणसानं एखाद्या स्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडून जर त्याचा खुन झाला. त्यात तिनं गुन्हा जरी कबूल केला आणि विस्तृत वर्णन केलं तरीही तिला शिक्षा होत असते. तसेच एखाद्यानं आपली सुरक्षा वा आपल्या परिवाराची सुरक्षा करतांना चोराचा केलेला खुन हा खुनच ठरतो. जरी तो चोर त्याच्या घरी चोरी करायला आला असला तरी.
चूक......चूक कोणी कबूल केल्यास त्याचं स्वागत करायला हवं. कारण चूक कबूल करायला हिंमत लागते. परंतु शिक्षा होते व शिक्षेच्या धाकानं कोणी चूक कबूल करीत नाहीत. तसं जर झालं असतं, तर आज ना न्यायालयात खटले असते. ना खटल्याचे प्रमाण वाढले असते. प्रत्येकाने चूक झाल्यास माफी मागीतली असती व मोकळे झाले असते. आज चुका होतात व त्याच चुका कबूल करवून घेण्यासाठी न्यायालयात खटले दाखल होतात. बरेच दिवस ते खटले चालतात. परंतु आरोपी त्याच्या हातून झालेल्या चुका कबूल करीत नाहीत. शेवटी त्या चुका कशा झाल्या, यासाठी पक्षकार वकील पुराव्यासह न्यायालयात न्यायाधीश महोदयांना समजावून सांगतो. मग सिद्ध होतं की संबंधीत चुकांचा मालक अमुक अमुक व्यक्ती आहे व तोच गुन्हेगार आहे. मग तसं सिद्ध झाल्यावर शिक्षा केली जाते. तोपर्यंत वेळ व पैसा खर्च करत, वाया घालवत खटला सुरु असतो. त्या प्रक्रियेला बराच अवधी लागतो. अशा अवधीत कधीकधी साक्षीदार व पुरावे नष्ट होतात व आरोपी सुटत असतो. म्हणूनच सहजासहजी कोणी चुका कबूल करीत नाहीत.
अलिकडील काळात तर मोठमोठी माणसं चुका करतात. त्याही मोठमोठ्या चुका करीत असतांना आढळतात. तशी लहान मुलं तर जास्त चुका करतात. परंतु त्या क्षम्य असतात.
चुका बऱ्याच जणांकडून होत असतात. काही गंभीर असतात तर काही किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्याचे परिणामही त्या त्या चुकांच्या पद्धतीनुसार वा स्वरूपानुसार प्रत्येकाला भोगावेच लागते. उदाहरणार्थ चौसरचा खेळ खेळल्यावर द्रौपदीचे अपहरण करण्याची जी चूक कौरवांनी केली होती. त्याचे गंभीर परिणाम म्हणून कौरवांचा पुर्ण वंशच नष्ट झाला होता. आजही तेच घडते. आजच्या काळात आपल्याही हातून जी चूक होते, त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. जर या मानवरुपी देशानं जर त्या चुकांवर न्यायालयात खटले दाखल केले नाही तरी नियती सोडत नाही. नियती त्या चुकांवर आपल्याला कधी नेस्तनाबूत करेल ते सांगता येत नाही. म्हणूनच चुका शक्यतोवर टाळलेल्या बऱ्या.
रंजनानं केलेली चूक ही घोडचूकच होती. तसं तिनं विचारताच तो म्हणाला,
"मी माफ करतो. परंतु एका अटीवर. तू आता यापुढे माझ्यासोबत शेतावर चालावं. माझ्याबरोबर काम करावं. तसं जर तुला मंजूर असेल तर मी तुला माफ करायला तयार आहे."
कचरुचं ते बोलणं. त्यावर तिनं होकार देताच त्यानं तिच्या पुर्ण चुका माफ करुन टाकल्या होत्या.

*****************************************

कचरु एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर काही काळ कचरुचा असाच गेला होता. शिक्षणात दरवर्षी होणारे बदल त्यानं अगदी लहानपणापासूनच अनुभवले होते. तसं सरकार दरवर्षीच शिक्षकांचं प्रशिक्षण आयोजीत करीत होतं. अशाच एका प्रशिक्षणात कचरुचा नंबर लागला व तो त्या प्रशिक्षणाला रुजू झाला.
कचरु लहानपणापासूनच शिकला होता आव्हानात्मक शिक्षण. प्रेरीत होणं, जिज्ञासा वृत्ती वाढवणं, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं इत्यादी. तसा तो लहानपणी प्रयोगही करीत होता अगदी छोटेछोटे. परंतु त्याच्या जीवनात मध्यंतरीचा काळ त्रासदायक उगविल्यानं त्याची प्रयोग वृत्ती बाजूला पडली होती. तिला कुठंतरी चालना देणं आवश्यक होतं. परंतु तशी वेळ आतापर्यंत त्याच्या जीवनात कधीच उगवली नव्हती.
कचरु जसा एका शाळेत प्रशिक्षणासाठी गेला. त्यावेळेस प्रशिक्षणादरम्यान त्याला लहानपणचं आव्हानात्मक प्रशिक्षण देण्यात आलं. तेव्हा आपोआपच त्याची जिज्ञासावृत्ती जागृत झाली. त्याला लहानपणचं सगळं आठवायला लागलं होतं. त्याचबरोबर आठवत होते ते प्रयोग. जे त्यानं लहानपणी केले होतं. आता सर्व आठवलं होतं हनुमानासारखं. हनुमान आपली उडण्याची शक्ती बालपणात जसा विसरुन गेला होता व समुद्र पार कोण करेल? असा प्रश्न पडताच त्याला जांबवंतानं त्याची बालपणात असलेली शक्ती त्याच्या लक्षात आणून दिली होती. तशी कचरुला त्याच्या मनातील ते प्रयोग कळले व ती प्रयोगी वृत्ती बाहेर आली. ते जांबवंताचं काम त्या प्रशिक्षणानं केलं. तसंच त्या प्रशिक्षणातून शिकविणाऱ्या शिक्षकांनी. आता त्याला थांबविणारी कोणतीच यंत्रणा नव्हती. ना त्याला कोणी थांबवू शकणार होता. कारण त्याची लहानपणाची सुप्त शक्ती जागृत झाली होती. ज्याप्रमाणे हनुमानाची सुप्त शक्ती जागृत झाल्यावर तो समुद्र पार करुन गेला होता. तसाच तोही त्याची सुप्त शक्ती जागृत होताच आता नवनवे प्रयोग करीत होता.
शिक्षणाचा उपयोग करण्याचा ध्यास त्याच्या मनात होता. तो शिकला होता ते आव्हानात्मक शिक्षण. त्यानंतर त्यानं प्रशिक्षण केलं होतं शिक्षक असतांना. त्या प्रशिक्षणातून तो प्रेरीत झाला होता व त्यानं मुलांना शिकविण्याचं आव्हान स्विकारलं नव्हतं तर वेगळंच आव्हान स्विकारलं होतं. ते आव्हान होतं शेती करण्याचं. परंतु ते कार्य करीत असतांना त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानं त्या कार्यात थोडा व्यत्यय आला होता. आता ती आली होती आणि तिनं आपली चूकही कबूल केली होती. तसं पाहता त्यानं तिला माफही करुन टाकलं होतं. परंतु त्याला तो काळ आठवत होता. त्या गोष्टीही आठवत होत्या. तसंच आठवत होतं त्यावेळचं शिक्षण. तसंच आठवत होतं अलीकडील शिक्षण. तसंच आठवत होतं अलीकडील काळात शिक्षणाला फारच आलेलं महत्त्व. त्यावेळेच्या गोष्टी त्याला जशाच्या तशा आठवत होत्या.
अलीकडील काळात शिक्षणाला फारच महत्त्व प्राप्त झालं आहे व त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. याचा अर्थ असा की विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न व्हायला हवा. मग पुर्वी काय शिकवीत नव्हते काय? पुर्वीही शिकवीत होतेच व पुर्वीही विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनत होतेच. मात्र बव्हंशी पुर्वीच्या शिक्षणात आणि आताच्या शिक्षणात बराच फरक आहे.
आजपर्यंत आपण पाहिलं की शिक्षण शिकवितांना ते शिक्षण कसं शिकवायचं हेच आपल्याला कळत नव्हतं. सगळं माहीत होतं. कधीकधी त्याचा वापरही करीत होतो आपण. परंतु त्या पद्धतीचा वापर सातत्यानं करीत नव्हतो. त्या पद्धती कोणत्या? असा विचार नक्कीच आपल्या मनात येईल.
आपण शिकवीत होतो त्या पद्धती होत्या. भीती, बक्षीस, प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा. या चार पद्धतीत पहिली जी पद्धत आहे भीती. तीच जास्त वापरत आलो आजपर्यंत शिकवीत असतांना. कधीकधी आपण आदरयुक्त भीती दाखवली तर कधी आपण भीतीयुक्त आदर दाखवला. यातूनच आपण जेव्हा जेव्हा वस्तीत जायचो. तेव्हा आपली मुलं आपल्यासमोर यायची नाहीत. ती जर कंचे वा इतर खेळ खेळत असतील तर पळून लपून जायचे. आज तसं नाही. आज जर आपण वस्तीत गेलोच. तर मुलं जवळ येतात. नमन करतात व बोलून संवाद साधतात. तसं पाहता अलीकडील काळ तर डिजीटल काळ आला आहे.
भीती, बक्षीस, प्रेरणा व स्वयंप्रेरणा या अलीकडील काळातील शिकविण्याच्या पायऱ्या आहेत. काल भीती ही पायरी प्रत्येकजण वापरत होता. कधी कधी बक्षीस ही देखील पायरी वापरत होतो आपण. परंतु प्रेरणा वा स्वयंप्रेरणा ह्या गोष्टी आपण वापरत नव्हतो.
अलीकडील काळात शिकवितांना भीती हा पर्याय कालबाह्य झाला आहे नव्हे तर करायचा आहे. कारण भीतीनं राग मनात कुटकूट भरला जातो. तसंच बक्षीस हा पर्यायही एखाद्याच वेळेस वापरायचा आहे. कारण बक्षीस हा पर्याय वापरल्यानं विद्यार्थ्यांच्या मनात लोभ निर्माण होतो. शिवाय राग व लोभ या गोष्टी षडरिपुतील घटक आहेत. त्यानंतर येणारा घटक आहे प्रेरणा. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकवेळा कोण प्रेरीत करेल ही संभावना नाकारता येत नाही. तशीच ती त्यावेळेस प्रेरणा देतांना ती कशी द्यावी हेही आठवायला हवं. ती प्रेरणा ऐनवेळेस आठवत नाही. हं, एखाद्या वेळेस या तिन्ही पर्यायाचा वापर करता येईल. मग शिकवायचा आणखी एक पर्याय आहे स्वयंप्रेरणा. होय, स्वयंप्रेरणाच. विद्यार्थ्यांना शिक्षकानं असं मार्गदर्शन करायचं आहे की तो स्वतःच एखाद्या गोष्टीवर प्रेरीत होईल व तो स्वतःच शिकेल.
आजचं शिक्षण हे डिजीटल आहे. या काळात निराशा लवकर पदरी येते. साधा व्हिडीओ बनवला. तो फेसबुकवर टाकला आणि त्याला लाईक आल्या नाहीत तर मुलं आत्महत्या करतात असा हा काळ आहे. त्यामुळंच या काळात मुलं निराशच होणार नाही तर त्यांना निर्माण झालेल्या शंकेवर ते स्वतःच तोडगा काढू शकतील असं शिक्षण त्यांना द्यायचं आहे.
महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा जर खऱ्या अर्थानं विकास साधायचा असेल तर त्यांना आता जास्त शिकवायची गरज नाही. जास्त बोलायचीही गरज नाही. थोडंसच शिकवायची व बोलायची गरज आहे तर विद्यार्थ्यांना असं सांगायची गरज आहे की ते स्वतःच शिकतील. स्वतःच प्रश्न निर्माण करतील व स्वतःच त्याची उत्तरं शोधतील. आता त्यांच्या मनातील पुर्ण स्वरुपात भीती नष्ट करायची आहे. तशाच त्यांच्या शिकण्याच्या वेळाही. शिवाय त्यासोबतच त्यांच्या बैठक व्यवस्थाही. त्यांनी बाकावरच बसायला हवं. शांतच बसायला हवं. खालीच बसायला हवं असंही बंधन नको. ते कुठेही बसू शकतात. खाली चटईवर वा बेंचवर वा उभेही राहून शिकू शकतात. वर्गात कुठंही फिरु शकतात. अर्थात मुक्त विहार करु शकतात. हा बदलाव आला आहे नवीन शिक्षणात. कारण आपला भारत सर्व गोष्टीत निपुण करायचा आहे.
विशेष म्हणजे देशाला निपुण करण्यासाठीच हा शिक्षणातील बदलाव. तो बदल कोण करतो तर शिक्षक. कारण जसा विद्यार्थी हा देशाचा कणा आहे तसाच शिक्षकही कणाच आहे देशाचा. जर शिक्षक नसेल तर देशाला चालविण्यासाठी कोणीच मिळणार नाही. म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांवर भर दिला जात आहे. त्यानुसार शिक्षकानंही स्वतःच तसा बदलाव करुन त्यांना आलेली पठारावस्था झटकायची आहे व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणे हे आपले आव्हान समजून ते आव्हान त्यांना पुर्ण करायचे आहे यात शंका नाही.
अलिकडील काळात वास्तविकता पाहिली जात नाही. तसं पाहिल्यास वास्तविक गोष्टी केल्या जात नाही आणि अपेक्षा भरपूर बाळगल्या जातात. शिवाय स्वतः कोणतीच गोष्ट न करता दुसऱ्यावर अवलंबून राहिलं जातं. याबाबतीत एक प्रसंग असा आहे. यू ट्युबवर एका अधिकारी साहेबानं शेअर केला आहे.
वाबडेवाडीची शाळा. त्या शाळेत शिक्षकाची सहल गेली. ते शिक्षक बऱ्याच लांबून त्या ठिकाणी तीन चार हजार रुपये लावून गेले. तशी त्यांनी शाळा पाहिली. तशी ती शाळा चांगलीच आहे आणि लोकांचे डोळे दिपवणारी व त्यांना हेवा सोडणारी आहे. ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असून आज तो आपल्या महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा करण्याचा पहिला प्रयोग आहे. शिवाय तशा प्रकारच्या शाळा असतीलही बऱ्याच. परंतु काही लोकं असे असतात की जे दाखवत नाहीत, करतात. फरक एवढाच की ते प्रकाशझोतात येत नाहीत. येवू पाहात नाहीत. अन् इथं तर खाजगी शाळेचा संस्थाचालक त्यांना वर येवूही देत नाही. असे बरेच शिक्षक आहेत की ज्यांच्या चवथीच्या वर्गात काही मुलांना अस्खलितपणे इंग्रजी वाचता येतं व आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना अस्खलितपणे बोलता येतं. तशा शहरी भागातही नावाजलेल्या शाळा आहेतच आणि ग्रामीण भागातही आहेत. परंतु त्या शाळांची कदर होत नाही.
ती वाबडेवाडीची शाळा. ती पाहताच भारावलेला एक शिक्षक. तो शिक्षक त्या शाळेतून भारावून गेला व त्यानं ठरवलं की आपणही आपली शाळा तशाच धर्तीवर तशाच स्वरुपाची बनवावी. त्या शाळेनं अंगणवाडी शाळेला जोडली तशी आपणही अंगणवाडी शाळेला जोडावी. असा विचार करुन तो गावच्या शाळेत गेल्यावर अंगणवाडी सेविकेकडे गेला. त्यानंतर तिनं बोलतांना आढेवेढे घेत नकार दिला. त्यानंतर तो गावातील प्रशासनाकडे गेला. त्यांनीही आढेवेढे घेत नकार दिला. तसं पाहता एखादा चांगलं काम करीत असेल तर त्याला लोकं पुर्वी वेडेच समजतात. जसं थॉमस अल्वा एडीसन वा त्या काळातील तत्सम शास्रज्ञ. त्यांना वेडंच समजलं जायचं त्यावेळेस. आज त्यांची इज्जतच नाही तर त्यांनी केलेल्या संशोधनानं लोकांनी त्यांना डोक्यावर उचललं आहे.
तो ध्येयवेडा शिक्षक निराश झाला व शेवटचा पर्याय म्हणून तालुक्याला गेला. तेथील अधिकाऱ्याला भेटला. त्यांनी सांगीतलं की सदर शिक्षकानं आपला नाद सोडून द्यावा. मग काय, सदर शिक्षक एवढा निराश झाला की त्यानं आपला विचार त्यागला. त्याला ज्या गोष्टी करायच्या होत्या. त्या गोष्टीबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. त्यातच त्या गोष्टीचं नाव जरी कोणी काढलं तरी त्याला महाभयंकर राग आला.
समाजाचं असंच रुप आज पाहायला मिळतं. जो करतो, त्याला कोणीच कोणते कार्य करु देत नाहीत. अडवतात. तसं पाहिल्यास कोणी सहकार्यही करीत नाहीत. तरीही त्यावर कोणी मात करुन ते कार्य केल्यास त्याचा द्वेष करतात व त्याचे पाय ओढतात. याचाच अर्थ असा की आपणही कोणतंच कार्य करीत नाहीत व कोणी करीत असल्यास त्यालाही करु देत नाहीत. असंज जगाचं स्वरुप आहे आज.
कोणतेही कार्य, ते कार्य प्रभावी घडावं म्हणून चार पायऱ्या आहेत. पहिली पायरी स्व पातळी, स्वपातळी म्हणजे स्वतः कोणाकडून अपेक्षा न करता कार्य करीत राहणे. जेणेकरुन ते कार्य पाहून दुसरा प्रेरीत होईल व दुसरा ते कार्य करु शकेल. दुसरी पायरी समाजपातळी, आपण केलेले कार्य समाजाला आपोआपच दिसेल व त्या कार्यासाठी लागणारं सहकार्य समाजाकडून मिळवता येईल. तिसरी पातळी भौतिक पातळी, की जी समाज सहकार्यातून साकार करता येईल व चवथी पायरी आहे प्रशासन पातळी. ज्याची आपोआपच सरकार दखल घेईल किंवा सरकारकडून मदत मिळवता येईल.
वरील बाबींचं उदाहरण बाबा आमटे वा सिंधूताई सपकाळचं देता येईल. तसंच काल ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचंही देता येईल. त्यांनी सुरुवातीला स्वतःपासून सुरुवात केली. मगच समाजानं त्यांना सहकार्य केलं. त्यानंतर भौतिकता आली व प्रशासनाचं सहकार्यही. एडीसनचं उदाहरण दिल्यास तो स्वतः प्रयोग करायचा. कोणाचंच सहकार्य घ्यायचा नाही. जशी प्रयोग करतांना आपल्याच शेतातील धानाची गंजी पेटवणे. त्यानंतर घरुन वडीलांनी त्यांना हाकलून देणे. पुढे छंद जोपासत आगगाडीवर पोट भरण्यासाठी वस्तू विकल्या. त्यानंतर आगगाडीच्या डब्यात प्रयोग करीत असतांना पिवळा फॉस्फरस सांडला व आगगाडीला आग लागली. ह्या सर्व गोष्टी त्यानं स्वतः केल्या. सर्व त्रास सहन करुन. आज त्याचं संशोधन समाजानं स्विकारलं. आज आपण एक सेकंदही विना लाईटनं राहू शकत नाही. हा लाईट शोधला त्यानं. आज त्याला समाज चाहतो. त्या लाईटच्या उत्पादनासाठी भौतिक साधनात मोठमोठे कारखाने उभारले गेले आहेत. तसंच आज प्रशासनही या लाईट उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास कोणतेही कार्य करतांना ते कार्य स्वतःपासून सुरु करावं. त्यासाठी ज्या गोष्टीवर प्रयोग करायचा आहे, त्या गोष्टीला समजून घ्यावं. त्याचे होणारे विपरीत परिणाम लक्षात घ्यावे. त्यातच ते परिणाम लक्षात घेवून कार्य करावे. तेव्हाच समाजाचं सहकार्य प्राप्त करता येईल. तसं पाहता समाज सहकार्य करेल. परंतु त्यासाठी आपलंही कार्य तेवढंच तोलामोलाचं असायला हवं. सिंधूताईनं स्वतः सुरुवात केली आपल्या कार्याची. मगच समाजानं सहकार्य केलं. त्यानंतर प्रशासन व इतर गोष्टी आल्या. डॉ बाबा आमटेनं स्वतः सुरुवात केली. मग त्यांची दखल घेवून त्यांना रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. त्यानंतर समाजही सोबतीला आला व देशानं त्यांची दखल घेतली. मग प्रशासनानं.
विशेष म्हणजे कोणतेही कार्य करीत असतांना आपण कोणी मदत करेल, कोणी आपली दखल घेईल यावर विसंबून राहू नये. कारण हे जग स्वार्थी जग आहे. ते स्वार्थीपणानं वागणारच. म्हणून आपण तेच लक्षात घेवून त्याप्रमाणेच वागावं. म्हणजेच तुम्हाला चांगलं कार्य करता येईल व तेच तुमच्या हातून चांगले झालेले कार्य उद्या समाजालाही पसंत पडेल. तेच कार्य पुढं प्रशासनालाही. परंतु त्यासाठी तुमचं केलेलं कोणतंही कार्य हे चांगलं कार्य असायला हवं. तरंच समाज स्विकारतो. यात दुमत नाही.
निपुण भारत योजना....... शासनाची ही आदर्शमय योजना. शासनाला या योजनेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे. हाच सरकारचा उद्देश. सरकारचं म्हणणं आहे की मुलं आपोआपच शिकतात. त्यांना शिकविण्याची गरज नाही. तसंच त्यांनी एक टार्गेटही ठेवलं की मुलांना तिसऱ्याच इयत्तेत वाचता यायला हवं. याबाबतीत सांगायचं झाल्यास एकीकडं सरकार म्हणतं की मुलांना अजिबात शिक्षकानं शिकवू नये तर फक्त मार्गदर्शन करावं तर दुसरीकडे सरकार म्हणतं की तिसरी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन यावं. परंतु ते कसं शक्य आहे? ते कळत नाही. यावरुन ती सरकारची कृती संभ्रमात टाकणारी आहे. कारण वर्ग तिसरीच्या वर्गात वाचता येईल. परंतु पुर्णच मुलांना वाचता येणार नाही. एक ना एक विद्यार्थी राहीलच राहील. जसा तांदळात खडा असतो तसा. ते मात्र सरकारला मान्यच नाही.
सरकार निपुण भारत योजना साकार करीत असतांना म्हणतं की शिक्षकांनी आता यापुढे वर्गात अजिबात शिकवू नये तर त्यांनी फक्त विद्यार्थ्यांना प्रेरीत करावं. त्यासाठी आव्हानं द्यावी. तसंच म्हटलं आहे की जर ती मुलं आठवीत जात असतील आणि त्या आठवीत गेल्यावर त्या मुलांना वाचता येत नसेल तर तो दोष मुलांचा नाही, शिक्षकांचा असतो.
सरकारचंही बरोबरच आहे. तसा सर्व गोष्टीत दोष शिक्षकाचाच. अशैक्षणिक कामे शिक्षकांनाच असून जर मुलं शिकली नाही तर त्यात दोष सरकारचाच. म्हणूनच सरकारनं निपुण भारत या योजनेंतर्गत शिक्षक कुठंही असोत. मुलं शिकतात व त्यांच्यासाठी शिक्षक कुठंही राहो, त्याला मार्गदर्शनाची भुमिका पार पाडायची आहे असं सांगीतलं. त्यात विद्यार्थी किती असावेत हे बंधन सांगीतलेलं नाही. ते एकाच वर्गातील की अनेक वर्गातील? तेही सांगितलेले नाही. यावरुन आगामी काळात एका शिक्षकाला त्या वर्गात कितीही मुलं असली तरी शिकवावेच लागेल. शिवाय ती मुलं कोणत्याही वर्गातील असोत, त्या मुलांना शिकवावेच लागेल. तेही कुठेही असतांना. म्हणजेच बी एल ओचं काम असो की तो निवडणुकीच्या कामात व्यस्त असो, तो कॉपी मुक्त अभियानात असो की कोणत्याही कामात वा प्रशिक्षणात. त्याला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कुठेही राहून मार्गदर्शन करावेच लागेल. त्यासाठी त्याला विषयमित्र बनवावे लागतील वा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. हे सरकारला सांगायचे आहे. शिवाय सरकार यातूनच हाही संदेश देत आहे की आता यापुढे कोणत्याही शिक्षकांची नियुक्ती होणार नाही. जे शिक्षक आता नियुक्त स्वरुपात आहेत. त्यांनी शिकवावं. ते जर चांगले शिकवतील, तरच त्यांना टिकता येईल नव्हे तर त्यांना टिकवता येईल. अन् जे चांगले शिकवणार नाहीत वा कुठूनही मार्गदर्शन करु शकणार नाहीत. त्यांना सरकार काढून फेकेल.
महत्वाचं सांगायचं झाल्यास सरकार पुर्वीपासूनच दोष शिक्षकांनाच देत आले आहे. आजही ते शिक्षकांनाच दोष देत आहेत. मग विद्यार्थी शिको वा न शिको. शिवाय एकीकडे त्यांनी मोबाईल वापरण्यावर परवानगी दिली आहे तर दुसरीकडं शाळा संस्थाचालक मोबाईल वापरण्यावर बंदी घालत आहेत. संस्थाचालकाचं म्हणणं आहे की मुलं हे मोबाईल वापरुन मुलींना वायफळ मेसेज करु शकतात.
विशेष सांगायचं म्हणजे सरकारचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी शाळेतील संस्थाचालकाचं म्हणणंही तेवढंच खरं आहे. मुलं हे वायफळ मेसेज पाहणार नाहीत कशावरुन? त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा शाळेत तरी सध्या अस्तित्वात आहे काय? याचं उत्तर नाही जर आहे तर मग मोबाईल विद्यार्थ्यांना वापरायला कसा द्यावा? हाही एक प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय सरकारजवळ आहे की नाही ते कळत नाही.
अलिकडील काळात सरकार पाठ्यपुस्तक मोफत देत आहेत. काही ठिकाणी पोशाखही देत आहेत. ते देण्यापेक्षा सरकारनं सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब द्यावे. त्यात व्हॉयफॉयची व्यवस्था सरकारनं शाळेत देत असणाऱ्या अनुदानातून करावी. त्यात अशी व्यवस्था करायला हवी की त्या टॅबबाबत सरकारनं आदेश द्यावा की ते टॅब शाळेत शाळा सुटल्यावर गोळा करु नयेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना चोवीस तास कुठेही असतांना वा केव्हाही शिकता येईल. तसंच त्या विद्यार्थ्यांना शिकवतांना शिक्षकांनी जास्तीत जास्त कृतीयुक्त उपक्रमावर भर द्यावा. प्रयोग द्यावे. तसेच खेळ द्यावे. काही वस्तू सुद्धा बनवायला देता येतील. कारण वरील सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना आवडतात आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेवून शिकविल्यास शिक्षकांचं शिकवणंही चांगलं होतं. त्याची मार्गदर्शनाची भुमिका चांगली पार पडू शकते. विशेष म्हणजे निपुण भारत योजनेत साचेबंद पाठ्यपुस्तक अडसर ठरु नये, यासाठी टॅब दिल्यास सरकारला अभिप्रेत असलेलं टार्गेट पुर्ण करता येवू शकते व खऱ्या अर्थानं देश निपुण नसला तरी आज तशी योजना वापरल्यानं देश निपुण बनू शकतो यात शंका नाही.
नवीन अभ्यासक्रम. सरकार राबविण्याचाच विचार करीत आहे. त्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करुन प्रशिक्षण लावत आहे. प्रशिक्षण करुन घेत आहे आणि सांगत आहे की सर्वांनी काशीलाच जावं. इतर कुठेही जावू नये. यावरुन लक्षात येतं की सगळेजण जाणार की काय?
सरकार प्रत्येक वेळेस निवडून येतं व निवडून आलं की काही ना काही उपद्व्याप करीत असतं. त्याचं कारण असतं आमच्या सरकारचं काही ना काही वेगळं काम दिसायला हवं. तसं पाहिल्यास कोणतंही सरकार का असेना जेव्हा बसतं. तेव्हा ते काही नवीनच पिल्लू आणत असतं.
सरकार नवीन पिल्लू जन्मास घालत असतांना शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यासाठीही नवीनच पिल्लू जन्मास आणत असतं. असंच नवीन पिल्लू योजना रुपात प्रत्येक सरकारनं जन्माला घातलं. जसं इंग्रजी हा विषय पहिलीपासून सुरु करणे, क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम राबवणे. नवीन आकृतीबंध तयार करणे. तो अंमलात आणणे. नवीन शैक्षणिक धोरण तयार करणे. यात काही चांगल्या गोष्टी असतात तर काही वाईट. काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्यांना आपण वाईट गोष्टी समजतो. जसे. आठवीपर्यंतच्या परीक्षेचे गुण टाकणे. नापास न करता पासच करणे. काही गोष्टी नक्कीच वाईट असतात. जशी पेन्शन बंद करणे. असाच बदल करीत करीत नवीन सरकार बसलं व त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध तयार केला. त्यानुसार त्यांनी निपुण भारत योजना मांडली. निपुण भारत याचा अर्थ भारताला सर्वच क्षेत्रात परीपुर्ण बनवणे. हे परीपुर्ण बनवीत असतांना सरकारनं त्याचं मुळ शोधलं. ते मुळ सापडलं ते शाळेत. कारण सरकारलाच नाही तर जगातील सर्वांनाच माहीत आहे की देशाच्या भवितव्याचं मुळ हे शाळेतच दडलेलं आहे. त्या शाळेतील वर्गखोल्यातून देशाचं भविष्य तयार होत असतं. यातूनच सरकारनं भविष्यवेधी शिक्षणाची योजना मांडली व त्यानुसार भविष्यवेधी शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला.
भविष्यवेधी शिक्षण? काय आहे भविष्यवेधी शिक्षण? भविष्यवेधी शिक्षणाचा सारासर अर्थ म्हणजे भविष्यात उपयोगी पडणारं शिक्षण. मग हे शिक्षण कसं भविष्यवेधी शिक्षण ठरु शकणार? खरंच मुलांना आजच्या तारखेला भविष्यात उपयोगी पडणारं शिक्षण शिकवता येवू शकते काय? तर याचं उत्तर होय असंच आहे. कारण आजच्या शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणातून असं शिक्षण शिकवलं जाणार आहे की ज्यातून मुलांना प्रेरणा मिळेल. याचाच अर्थ असा की ते स्वतःच स्वतः प्रेरीत होतील व स्वतःच शिकू शकतील. इतरांची मदत घेणार नाहीत. तसेच ती जिज्ञासेनं शिकतील. तंत्रज्ञानाचा वापर करीत करीत शिकतील. यात त्यांना शिक्षक शिकवणार नाही. फक्त मार्गदर्शन करतील. मूल्यांकन करतील. परीक्षा घेतील. आव्हान देतील. निरीक्षण करतील. यात एकाच वेळेस अनेक वर्ग शिकतील. अनेक विषय शिकतील. अनेक विद्यार्थी शिकतील.
एकाच वेळेस एक शिक्षक अनेक विद्यार्थी शिकतील. अनेक विषय शिकतील. अनेक वर्ग शिकतील. नवीन शैक्षणिक धोरण व भविष्यवेधी शिक्षण हेच सांगतं. परंतु महत्वाची बाब ही की हे कसं शक्य आहे. कोणी म्हणेल की बोलणारा वा सांगणारा व्यक्ती वेडा झाला की काय? त्यातच आता कोणी म्हणेल की शिक्षक काहीच शिकवणार नाही. मग एकाच वेळेस अनेक विद्यार्थी, अनेक विषय, अनेक वर्ग कसे शिकतील? ही आश्चर्याची बाब आहे. परंतु यात खरं सांगायचं म्हणजे ही गोष्ट तसुभरही खोटी नाही. नवीन शैक्षणिक धोरण यावरच तयार केलं गेलं आहे. आता शिक्षक शिकवणार नाहीत. पण विद्यार्थी शिकणार आहेत.
विद्यार्थी...... विद्यार्थी कसे शिकणार आहेत? नवीन शिक्षण धोरणानुसार व भविष्यवेधी शिक्षणानुसार शिक्षक आता शिकवणार नाहीत तर ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरीत करतील. त्यांना प्रवृत्त करतील. तसं प्रवृत्त करीत असतांना ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आव्हान देतील. तसे आव्हान पुर्ण करीत असतांना ते विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करतील. त्यासाठी ते विद्यार्थी शिक्षकांनी शाळेत वा वर्गात पाडलेल्या विद्यार्थ्यांच्या जोड्यांची मदत घेतील. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं आव्हान पुर्ण झालं की शिक्षक ते आव्हान पुर्ण करणाऱ्यांची सेल्फी घेतील. निरीक्षण करतील. मुल्यमापन करतील व निकाल जाहीर करतील. त्यानंतर त्यातील उणीवा दिसल्या की त्या उणीवा विद्यार्थ्यांना न रागवता सांगतील. मग त्या उणीवा दिसल्या की विद्यार्थी त्यानंतर त्या उणीवा स्वतःच दूर करण्याचा प्रयत्न करतील. परंतु यात एक असंही होवू शकते. ते म्हणजे उणीवा सांगील्यानं न्यूनगंड निर्माण होवू शकतो. यावर उपाय एकच. तो म्हणजे विद्यार्थ्यांना निकाल न सांगता व उणीव न दाखवता असलेल्या उणीवा दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यात कोणत्याही स्वरुपाचा न्युनगंड निर्माण होणार नाही. या विषयांशानुसार सरकारनं शिक्षक विरहीत शिक्षणाची योजना मांडली. जी स्वागतार्ह आहे. परंतु खऱ्या अर्थानं विचार केल्यास ही योजना का बरं मांडली असेल? असा विचार केल्यास सरकारचा यात हेतू दिसून येतो. तो म्हणजे सरकारला आता शाळेतील या शिक्षकाला देशातील इतर कामात व्यस्त करायचे आहे. मग बी एल ओची नोकरी असो वा निवडणुकीत तो व्यस्त असो. तो कोरोनासारख्या साथीत व्यस्त असो, वा तो प्रशिक्षणात. तो सतत शिकवीत राहायला हवा आपल्या विद्यार्थ्यांना. तसेच आता कमी पटसंख्येच्या शाळेत विद्यार्थी कमी असतात. त्यातच जी अनेक वर्गाची मुलं असतात. त्यावर उपाय म्हणूनही ही नवीन संकल्पना सरकारच्या कामी येणार आहे.
एकाच वेळेस अनेक विद्यार्थी, अनेक वर्ग व अनेक विषय कसे शिकवता येतील? असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. त्यावर उपाय म्हणून शिक्षक स्वतः आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवणार. त्या ग्रुपवर ते जर बाहेर असले तरी आव्हानं टाकत जाणार. तसं पाहता त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्या आव्हानात्मक शिक्षणासाठी आधीच तयार केलेलं असणार. विद्यार्थी ते आव्हान पाहतील. त्या आव्हानाचं उत्तर ते गुगलवरुन शोधतील. कधी यु ट्युबवर शोधतील. त्यात आपल्या ज्ञानाची भर टाकतील व ते आव्हान पुर्ण करतील. असा हा एकंदरीत अभ्यासक्रम आहे. याचाच अर्थ असा की शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि देशासाठीही सरकारनं हा अभ्यासक्रम सोपा करुन दिला आहे. आता पाहूया यातून फलीत काय निघते ते? खरंच हा भविष्यवेधी अभ्यासक्रम देशाच्या भवितव्यासाठी साधक ठरतो की बाधक ठरतो. तो काळ सांगणार आहे. परंतु तो तुर्तास तरी राबवणे गरजेचे आहे यात शंका नाही. कारण सरकारला सर्वांना काशीलाच न्यायचे आहे. इतर ठिकाणी नाही. त्याचंही एक कारण म्हणजे देशाला महासत्ता बनवायचे आहे.
रंजना कचरुच्या घरी पुन्हा राहू लागली होती. आता ती कचरुसोबत शेतातही जावू लागली होती. लवकरच तिला शेजाऱ्यांकडून कळलं होतं की कचरुला सरकारी नोकरी होती. ती सोडून तो शेतीकडं वळला होता. त्यातच आता तिला तो आवडू लागला होता. कारण तिनं पळून जाण्यासारखा व दुसरा विवाह करण्यासारखा गुन्हा करुनही त्यानं तिला माफ केलं होतं. त्यामुळंच तसं कुतूहल तिच्या मनात निर्माण झालं होतं. सरकारी नोकरी एकतर मिळत नाही अन् मिळाली तर ती कोणी सोडत नाहीत. शिवाय सरकारी नोकरी मिळवायला लोकं आपली शेती विकून टाकतात आणि आपल्या पतीनं शेतीसाठी नोकरी सोडली, तिही सरकारी. नक्कीच काही ना काही कारण असेल. ही बाब आश्चर्यच करणारी होती. त्याच गोष्टीचं कुतूहल तिच्या मनात जागं झालं होतं व तिनं ठरवलं होतं की एखाद्या वेळेस संधी मिळाल्यास तसं कचरुला विचारुनच टाकू.
ती संधी पाहात होती. तशी एकदा तिला संधी चालून आली व ती त्याला विचारु लागली.
"तुम्ही एवढी चांगली सुखाची नोकरी का सोडली."
तो तिचा प्रश्न. त्यावर तो सांगू लागला.
"मिही एक शिक्षक होतो. सरकारी नोकरी करीत होतो. माझंही प्रशिक्षण झालं. तसं पाहिल्यास मी जेव्हा लहान होतो. तेव्हाच या नवीन प्रकारच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला होता. परंतु तेव्हा मला ते शिक्षण कोणत्या कामाचं असतं ते माहीत नव्हतं. परंतु मी शिक्षक असतांना जे आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं. ते विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जरी असलं तरी त्यानं मी भारावून गेलो व नोकरी सोडली. वाटलं की आपण शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकविण्याचं आव्हान पुर्ण करण्यापेक्षा जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्या वाचवाव्यात. ज्या शेतीत आज धनधान्य बरोबर पीकत नाही. त्या शेतीत प्रयोग करायचा. चांगलं धनधान्य पिकावं म्हणून. शेती कशी चांगली पीकवता येईल याचा शोध घ्यायचा. जेणेकरुन येथील शेतकरी वर्गाला सुखी करता येईल. तसं पाहता शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं मी. त्यात आम्हाला वाबडेवाडीची शाळा दाखवली होती. ते एक मॉडेल आहे लोकांना प्रेरणा देण्यासाठी खरं तर ते मॉडेल पाहून आणि तसं प्रशिक्षण घेवून केवळ शिक्षक आणि विद्यार्थीच प्रेरणा घेतात असं नाही तर एक शिक्षक शेतकरीही बनू शकतो, उत्तम शेतकरी. हेच मला जगाला दाखवायचे आहे.
आज शेतकरी जे आत्महत्या करीत आहेत. शेती पीकत नाही म्हणून. मी शेतकरी बनून असं संशोधन करीत आहे की ज्याचं अनुकरण करुन आपल्या देशातील शेतकरी चांगली शेती पिकवू शकतील व सुखी होवू शकतील. त्यांना कधीच आत्महत्या करावी लागणार नाही. हेच माझं स्वप्न आहे. परंतु त्या स्वप्नांना तुझ्यासारखी पत्नी पुर्ण करण्यासाठी मदत करेल तर ती पत्नी. अन् पळून जात असेल आणि त्रास देत असेल, ती पत्नी तरी कसली? बरं झालं की तू पळून गेल्यावरही मी ध्रुवासारखा निश्चयाशी अढळ राहलो. माझ्याजागी जर दुसरा असता तर तो खरंच वेडा झाला असता." तो आपले मनातले भाव बोलला. मात्र रंजना त्याच्या त्या बोलण्यावर खजील झाली. त्यानंतर ती बराच वेळ चूप बसली व नंतर म्हणाली,
"मला माफ करा. मी पुन्हा आपली माफी मागते. आता अशी चूक पुन्हा भविष्यात कधीच करणार नाही."
तसं त्यानं तिला आधीच माफ केलं होतं. त्या दिवशीपासून ती सुधरली होती व ती आता आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करु लागली होती.
नवीन शिक्षण चांगलं होतं. त्याचं प्रशिक्षणंही चांगलंच होतं. ते ज्याला कळलं. तो तर आपल्या छंदात वेडाच झाल्यासारखा वागत होता. सतत गुंतून राहात होता तो. त्यातच शिक्षकही त्या विद्यार्थ्यांना गुंतून ठेवत होते एखाद्या छंदात. त्यात विद्यार्थ्यांची व्यवस्थीत झोप होत नव्हती. तसं पाहता त्याच प्रशिक्षणातून तयार झालेला कचरुही......तो आता शेतकरी बनला असला तरी रात्रीला उशिरापर्यंत झोपत नव्हता. तो बराच वेळपर्यंत जागत असे. मनात विचार असे की शेतकऱ्यांचं अवकाळी पावसापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल?

************************************************

तो नात्यातील व्यक्ती. ज्यानं कचरुच्या घरची बैलाची जोडी कसायाला विकली होती. त्याच्याकडे शेती भरमसाठ होती. मोठं घरंही होतं. परंतु ज्यावेळेस त्यानं बैलाची जोडी कसायाला विकली. तेव्हापासूनच त्याच्या आयुष्यात उतरती कळा सुरु झाली होती. आज त्याचं शेतही गेलं होतं आणि घरही गेलं होतं व तो आज दारु प्यायला लागला होता. शिवाय घर बांधायची ऐपत नसल्यानं एका सरकारी जागेवर तो एक लहानसं झोपडं टाकून राहू लागला होता. जणू त्यानं ती जोडी कसायाला विकल्यानं त्या जोडीचा शाप लागल्याचा परिणाम होता. मात्र कचरुची हालत थोडी बरी होती. परंतु आता त्याच्याकडे जोडी नव्हती. जोडी तो घेवू शकत होता. परंतु तो घेत नव्हता. कारण त्यालाही जणू त्या बैलजोडीचा शापच लागला होता. तो आता आपली शेती भाड्यानं व ट्रॅक्टरनं करु लागला होता.
दिवसामागून दिवस जावू लागले होते. प्रयोगावर प्रयोग कचरु करु लागला होता. कारण त्याला अवकाळी पाऊस व गारांपासून होणारं नुकसान थांबवायचं होतं. त्यानं छतही टाकून पाहिलं. परंतु त्याचा त्याला काहीच उपयोग झाला नव्हता. शेवटी त्यानं ठरवलं होतं की आपण स्वतःच सुर्य त्या झाडांकडे पोहचवावा. तसा प्रयत्न करीत असतांना त्यानं एक प्रयोग असाही केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता. त्या प्रयोगात त्यानं झाडाच्या वरुन टिनपत्र्याचं छत तयार केलं होतं. त्यानंतर त्यानं काही मोठे अपारदर्शक आरसे सुर्याच्या दिशेनं थोडे तिरपे लावले होते. ते आरशे त्या टिनाच्या शेडच्या दोन्ही बाजूला लावले होते. आता सुर्यकिरण त्या आरशावर पडायचं व ते सुर्यकिरण त्या आरशावर पडताच त्या किरणाचं परावर्तन होवून तो सुर्यप्रकाश त्या टिनपत्र्याच्या शेडमध्ये जायचा. शिवाय त्या टिनाच्या शेडमध्ये हवा जायला पुरेशे झरोके ठेवले होते.
हा प्रयोग यशस्वी ठरला होता. कारण आरशातून परावर्तीत होणारे सुर्याचे किरण शेडमध्ये जात होते. त्यातच आता पीक अवकाळी पावसातही तग धरुन राहात होतं. तसंच त्या पिकांवर गारांचाही परिणाम होत नव्हता. परंतु यात एक नुकसान होत होतं. ते म्हणजे ज्या भागावर सुर्यप्रकाश पोहोचायचा. तेवढ्याच भागात पीक दिसायचं. बाकीच्या भागातून पीक करपून जात असे. त्यामुळं हा प्रयोग फसल्याचसारखा वाटत होता व ही गोष्ट गरीब लोकांना परवडण्यासारखी नव्हती.
शेती करणं ही जरी कठीण गोष्ट असली तरी ती त्याला आवडत होती. त्यानं पाण्याची व्यवस्था शेतीला कशी करता येईल असा विचार केला होता. तशीच पाण्याची व्यवस्था करणं हे मानवाच्या हातीच असतं असं त्याचं म्हणणं व मानणं होतं. नदीजोड प्रकल्प राबवून वा विहीर खोदून वा बोरवेल करुन पाणी उपलब्ध करता येवू शकतं. असं तो सांगत होता. परंतु अवकाळी पाऊस आणि गारांपासून कसं वाचवता येईल हाच एक प्रश्न त्याच्यासमोर होता. तसा एक प्रयोग फसताच तो दुसरा प्रयोग करीत होता. त्यासाठी तो थोड्याशाच जमीनीचा वापर करीत असे.
घर व प्रयोग हे त्याचं कार्यक्षेत्र होतं. प्रयोग करता करता तो आपलं घरही सांभाळत होता. त्यातच त्याचं कधीकधी घराकडे दुर्लक्ष होत होतं.
रंजना त्याचा प्रयोग नित्यनेमानं पाहात असे. तशी ती त्याला मदतही करीत असे. परंतु ती मदत करीत असली तरी त्याचे प्रयोग हे त्याचेच प्रयोग होते. त्यातील बऱ्याचशा गोष्टी तिला समजत नव्हत्या. त्यामुळंच आता तिनं ठरवलं होतं. आपण त्याला निव्वळ प्रयोग करण्यासाठी सोडावं. आपण स्वतः शेती करावी.
रंजनानं आपल्या मनात स्वतः शेती करण्याचा विचार केला. तसा विचार केल्यानंतर ती आता संपुर्णतः शेतीकडं लक्ष देवू लागली होती. तो मात्र स्वतः प्रयोगातच गुंतून राहात होता.
काही दिवस धावपळीत गेले होते. अशाच धावपळीत त्याची आई देवाघरी निघून गेली होती. त्यानंतर त्याला दोन पुत्र झाली होती. तो आता आपल्या मुलांमध्ये खुश होता. परंतु तो जरी आपल्या मुलांमध्ये खुश असला तरी त्यानं आपले प्रयोग बंद केले नव्हते. तो त्यावर विचार करायचाच.
कचरु विचार करायचा की शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? असाच एकदा विचार करीत असतांना अचानक तो ओरडला. 'सापडला, उपाय सापडला.'
कचरुचं जोरात ओरडणं. तसं ते ओरडणं रंजनानं ऐकलं होतं. तशी ती म्हणाली,
"काय सापडलं?"
"मला उपाय सापडला."
"कोणता?"
"मला उपायात सापडलं की जर आपण झाडावर पारदर्शक वस्तूचं शेड बनवलं तर येणारा पाऊसही रोपांवर पडणार नाही आणि पारदर्शक वस्तूवर गारांचाही परिणाम होणार नाही."
"पावसाचा परिणाम ठीक आहे. परंतु गारांचा परिणाम होणार नाही हे म्हणणं बरोबर नाही. कारण गारा पडणारच व त्या गारानं पारदर्शक असलेली वस्तू फुटणारच."
रंजनानं म्हटलेले शब्द. ते शब्द ऐकताच त्याची पुन्हा धुंदी उतरली. तसे ते पुन्हा विचार करु लागले. तशी तीच म्हणाली,
"जर आपण पारदर्शक काच हा प्लास्टीकपासून तयार केलेला वापरला तर.........परंतु विचार करा. विचार करा की लावायचा की नाही ते?"
"प्रयोग करायला काय हरकत आहे." तो म्हणाला व चूप बसला.
ती रात्र. ती रात्र तशी व्यस्ततेत गेली होती. तशी सकाळ केव्हा होते व आपण प्रयोग केव्हा सुरु करतो. याचा विचार तो करीत होता. अशातच रात्र संपली व सकाळ उगवली.
आजचा सुर्यही नवचैतन्य घेवून आला होता त्यांच्या जीवनात. त्या दिवशी त्यानं प्लॉस्टीक काचेचे पत्रे आणले होते. त्यानंतर त्यानं एक झोपडी तयार केली. त्या झोपडीच्या वर त्यानं प्लॉस्टीकचे तुकडे टाकले. आजुबाजूला भिंतीसारखा जो भाग होता. त्याला उघडं ठेवलं होतं. त्यानंतर त्यानं त्या शेडच्या आत पीक लावून पाहिली. तशी त्या प्रकल्पाची चार महिने वाट पाहिली. अशातच त्यावर्षी अवकाळी पाऊस टपकलाच. परंतु त्या पावसाचा त्या पिकांवर कोणताच परिणाम झाला नव्हता. ना गारांचा परिणाम झाला होता.
प्रयोग यशस्वी झाला होता. परंतु ती पद्धती खर्चीक पद्धती होती. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ती पद्धत परवडणारी नव्हती. परंतु त्याचं म्हणणं होतं की असे पारदर्शक काचं लावण्याचा खर्च एकदाच करावा लागेल. वारंवार नाही. अन् त्यापासून निघणारं उत्पादन हे अनेक वर्ष निघेल व नुकसान सहजपणानं टाळता येईल.
कचरुनं नवीन संशोधन केलं होतं शेती क्षेत्रात. ते संशोधन फारच गाजत होतं. त्या तंत्रज्ञानाचा वापर श्रीमंत लोकं करीत होते. शेतीची संख्या कमी होत होती. कारण गरीब लोकं शेती परवडत नसल्यानं शेती विकत होते तर श्रीमंत लोकं शेती घेवून त्यावर प्लॉस्टीक काचेचे शेड उभारुन शेती करीत होते किंवा जागेवर प्लॉट टाकून जागा विकत होते नव्हे तर शेतीला बंजर करुन शेतजमीन कमी करीत होते.
आता श्रीमंत लोकं शेती करु लागले होते. त्यातच शेतीलाही भाव आला होता. तशीच ती श्रीमंत माणसं त्या शेतीत उच्चशिक्षीत लोकांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत होते. उच्चशिक्षीतांच्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे उच्च शिक्षणालाही जास्त महत्व आलं होतं.
कचरुच्या संशोधनानुसार त्याच्या तंत्रज्ञानाचा फायदा श्रीमंतांना होत होता. त्यातच ते संशोधन वाखाणण्याजोगं होतं. तसं पाहता आता प्रत्येकजण म्हणत होतं की हे तंत्रज्ञान तर आम्हालाही माहीत होतं. परंतु आम्ही त्याचा प्रयोग केला नाही.
कचरु फक्त एवढ्यावरच थांबली नव्हता तर तो आणखी काहीतरी शोधत होता, ते त्याचं शोधणं आता गरिबांसाठी होतं. अवकाळी पावसापासून व गारांपासून शेतीला वाचविण्यासाठी. त्याला वाटत होते की त्या दोन्ही गोष्टीचा परिणाम होवू नये. तसं पाहता शेतीवर परिणाम होवू पाहणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्याही नवनवीन गोष्टी येत होत्या. ऐन हंगामात वेळ व माणसांची बचत व्हावी म्हणून ट्रॅक्टरसारख्या गोष्टी आल्या आहेत. हार्वेस्टर आलं होतं तसंच तंत्रज्ञान आणायचा विचार कचरुचा होता की जेणेकरुन अवकाळी पाऊस व गारांच्या पावसावर तो विजय मिळवू शकेल. त्याला माहीत होतं तुषार आणि ठिंबक सिंचन.

*****************************

तुषार व ठिंबक सिंचन. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन अवकाळी पावसावर विजय मिळवता येवू शकेल. एकदाचा त्याचा विचार. त्यातच त्यानं आधी ठिंबक व तुषार सिंचनाचा वापर करण्याचा विचार केला. त्यासाठी त्यानं अवकाळी पाऊस येताच वा गारांचा पाऊस येताच जमीनीतील पाणी शोषून घेणारं केमीकल तयार केलं. तसा तो अवकाळी पाऊस वा गारांचा पाऊस येताच तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाद्वारे ते केमीकल जमीनीत पसरवलं. परंतु त्याचा परिणाम नुकसानदायकच ठरला. अख्खं पीक त्यानं जळून गेले होते. त्या केमीकलनं जमीनीतील पाणी शोषलं होतं. परंतु जरा जास्तच शोषल्यानं काही ठिकाणी पीक करपलं होतं. आता त्यानं त्या मात्रेचे प्रमाण ठरवले व प्रत्येक अवकाळी पावसाच्या व गारांच्या क्षमतेनुसार किती केमीकल वापरायचं ते ठरवून दिल्या गेलं. हे केमीकल बनविण्यात त्यानं अग्नीशमन यंत्रातील तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस थांबविण्याच्या पद्धतीचा त्यानं शोध लागला होता. परंतु हे केमीकलही महागडंच पडत होतं. कचरुला सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं होतं. काही लोकं ह्या केमीकलचा वापर करीत असत. ज्यांच्याकडे प्लॉस्टीक काचेचं छत नव्हतं. परंतु त्यातही मात्रा श्रीमंतांचीच होती. तसं पाहता अवकाळी पाऊस केव्हा येईल व त्याची क्षमता कशी मोजावी? हाही प्रश्न होता. कारण अवकाळी पाऊस हा कमीजास्त प्रमाणात यायचा व गाराही. त्या गारा पडल्या वा वारा आलाच तर पीकही कोलमडून जायचं. त्यातही नुकसान ते व्हायचंच. जे झोपलेले झाड असायचे. ते जगायचे नाही. अवकाळी पावसाच्या व गाराच्या तडाख्यानं मरुन जायचे. त्या केमीकलनं केवळ जमीनीतील पाणी शोषून घेतल्यानं भागायचं नाही.
ते केमीकल असं कचरुनं तयार केलं होतं की जमीनीवर पाऊस जरी झाला तरी पाऊस झाल्यासारखा वाटायचा नाही. कारण त्या केमीकलमध्ये जागा सुकविण्याची क्षमता होती. त्या केमीकलमध्ये अशी वस्तू वापरली होती कचरुनं की पाण्याची क्षणातच वाफ होत असे व ती वाफ वर आकाशात जात असे. या प्रक्रियेला कमीतकमी एक ते दीड तासाचा अवधी लागत असे. मात्र हा प्रयोग काही ठिकाणी फसला होता. कारण गारांमुळं मार पडलेलं झाड पुर्णतः कोमेजून जात होतं. त्यानंही पिकांचं नुकसानच होत होतं.
कचरुचे वरचेवर प्रयोग सुरु होते. त्याला यश येत नव्हतं. अपयशच येत होतं. तशी त्याची बुद्धी थकून गेली होती. परंतु त्यानं हार मानली नव्हती. आता मात्र त्याची चाहूल वार्धक्याकडं लागली होती.
कचरुनं सांगितलेली प्लॉस्टीक काच छत म्हणून बसविण्याची कल्पना व त्याखाली पिकांचं संवर्धीकरण पुष्कळ प्रसिद्ध होवू लागलं होतं. लोकं तो उपाय वापरु लागले होते. शिवाय मोठमोठ्या झाडांची फळं किटकानं खावू नये म्हणून त्यांना फुल येताच त्या फुलांनाच वेष्टन घालण्याची पद्धत कचरुनं सुरु केली होती. काही लोकं आता आवर्जून त्याच्या शेतावर वाबडेवाडीच्या शाळेसारखी भेट देवू लागले होते. काहीजण त्याचा सत्कारही करु लागले होते. त्यालाही आता बरं वाटत होतं.
कचरुचं संशोधन जसं रंजनाला चांगलं वाटत होतं. तसंच त्याच्या बाळांनाही चांगलं वाटत होतं. ते शिकत होते त्याच्या वडीलांनी शिकलेलं आव्हानात्मक शिक्षण. त्यांनाही वाटत होतं की आपण आपल्या वडीलांसारखंच बनावं. परंतु कचरुची इच्छा तशी नव्हती. त्याची इच्छा होती की त्यांनी त्याच्यासारखं न बनता माणूस बनावं. माणूस याचा अर्थ सांसरीक वा व्यवहारीक गोष्टीत त्यांनी लक्ष घालावं. त्याचं कारण तसंच होतं. तो एक संसोधक म्हणून कार्य करीत असतांना एखाद्या जनावरागत तो त्याच तंत्रज्ञानात गुरफटून राहायचा. त्यावेळेस त्याला ना जेवनाची आठवण राहायची ना शेतीतील मशागतीची. त्यात त्याचं अतोनात नुकसान व्हायचं. हे होत असलेलं नुकसान जेव्हा रंजनाला दिसलं. तेव्हा तिनं त्या नुकसानाची दोरी हातात घेतली. त्यानंतर शेतीचं होणारं नुकसान त्याला वाचवता आलं होतं. त्याला वाटत होतं की जशी रंजना त्याला मदत करीत होती. तशीच मदत करणारी पत्नी मुलांना मिळाली नाही तर.......तर ते आपला संसार तरी कसा चालवतील? हा प्रश्न होता त्याचे मनात. याच प्रश्नाच्या अनुषंगाने तो विचार करीत होता. परंतु मुलं त्याचं ऐकतील तेव्हा ना. तिही संशोधनातच आपलं लक्ष घालत होती.
कचरुनं आपली हार मानली नव्हती, जरी ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून केमीकल फवारल्यानं त्याचं नुकसान झालं असलं तरी. त्याचं संशोधन सुरुच होतं. त्याला एडीसन आठवत होता. ज्यानं संशोधन करण्यासाठी आपल्याच शेतातील धानाची चळत उभी पेटवून दिली होती. त्यातच प्रयोग करता करता आगगाडीला आग लावली होती. आज त्यानं शोधलेला विजेचा बल्ब जो तो वापरत होता. आपणही काहीतरी बनवावं असं त्याला वाटत होतं. शेवटी त्यानं निश्चय केलाच होता, सर्वसामान्य शेतकऱ्याला सुखी करण्याचा. त्याच विचारातून आता त्याला तसं तंत्रज्ञान शोधणं भाग होतं. अशातच कचरुला एक उपाय गवसला.
कचरुनं रॉकेट पाहिला होता. जो अवकाशातून जात होता. जो चुन्याची निवळी वातावरणात टाकत असे व ज्यानं वातावरण शुद्ध होई. त्यानं तोच उपाय करण्याचं ठरवलं होतं. त्यानं असं पावडर बनविण्याचं ठरवलं की जे वातावरणात फवारलं जाईल. जे पावडर वातावरणात अवकाळी पावसाची स्थितीच निर्माण होवू देणार नाही. अन् झालीच तर ताबडतोब थांबवता येईल. तसंच गारांचंही पावसात रुपांतर करुन येणाऱ्या पावसाचा प्रभाव नष्ट करता येईल. तसं वातावरण दिसताच ताबडतोब तशी फवारणी करता येईल व होणारं नुकसान थांबवता येईल.
काही दिवस असेच गेले. काही दिवसानंतर कचरुनं प्रयोगांती दोन अशा प्रकारचे पावडर बनवले की जे पावडर हवेचा दाब कमी जास्त करीत होते. जर वातावरणातील हवेचा जास्त दाबाचा पट्टा तयार झाला तर ते पावडर त्याचा दाब कमी करीत असे व वातावरणातील हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर ते पावडर त्याचा दाब वाढवत असे. यामुळंच वातावरणातील दाब हा समपातळीत राहात असे व अवकाळी पावसाची तसेच गारांची स्थिती निर्माण होवू देत नसे. हेच वातावरणात आल्हाददायक असायचं. परंतु या वातावरणानंही शेतकऱ्यांचं नुकसानच होत होतं की जे शेतकरी कोरडवाहू शेती करीत होते. तशीच ज्यांच्याकडे पाण्याची सोय नव्हती.
कचरुनं निर्माण केलेल्या सर्व गोष्टी या श्रीमंतांसाठीच उपयोगी ठरल्या होत्या. त्यानं अशा प्रकारची पावडर बनवली होती की ज्या पावडरची फवारणी करुन एकाच वेळेस कितीतरी किमीचा पट्टा अवकाळी पाऊस पडण्यानं व गारांचा पाऊस पडण्यानं थांबवता येवू शकत होता. परंतु त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याचं काम असायचं, त्याच्या शेताला पाणी मिळत नसल्यानं त्यांची पीकं कोमेजून जात असत.
कचरु आज म्हातारा झाला होता. त्याची बुद्धी आता तेवढ्या प्रमाणात चालत नव्हती. परंतु जशीही चालायची. तशी त्याला चिंता पडायची की त्याचं संशोधन गरीब शेतकऱ्यांसाठी झालेलं नाही. ते संशोधन श्रीमंतांसाठीच झालं.
कचरुला वाटत असलेली चिंता हे त्याच्या अधोगतीचं कारण होतं. तसं पाहता त्याला भरपूर पुरस्कार मिळाले होते आणि आताही देशानं त्यांना सर्वोच्च सन्मान दिला होता. तो त्याच्या आदर्श शेतकरीपणाचा सन्मान होता. परंतु सामान्य लोकं त्याच्या संशोधनाला हिनवीत होते. त्याची उपेक्षा करीत होते.
कचरुला खंत होती. कारण तो सामान्य शेतकरी लोकांसाठी काम करु शकत नव्हता. त्यानं शेतकऱ्यांचं अवकाळी पावसापासून व गारांच्या पावसापासून होणारं नुकसान टाळलं होतं. ज्या शेतकऱ्यांकडे कुत्रीम पाण्याची व्यवस्था होती. परंतु ज्यांच्याकडे कुत्रीम पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यांना पावसाच्या पाण्याची व्यवस्था हवी होती. मग तो अवकाळी पाऊस का असेना वा गारांचा पाऊस का असेना. त्यामुळं त्यांच्यासाठी काहीही केलं गेलं तरी ते नुकसानदायकच ठरत होतं.

************************************************

कचरु आज जगाची शान झाला होता. तो जगाचा विचार करीत होता. जग कसे सुखी होईल याचीच काळजी लागली होती त्याला. त्यामुळंच की काय, त्यानं सरकारी नोकरीला तिलांजली दिली होती व तो शेती करु लागला होता.
आज शेतीला महत्व आलं होतं नव्हे तर प्राप्त झालं होतं. तशी शेती चांगली पीकत होती. कोणत्याच शेतकऱ्यांचं कोणत्याही स्वरुपाचं नुकसान होत नव्हतं. हे सगळं घडलं होतं शेतीशास्रानं. ज्या शेतीशास्राचा अभ्यास कचरुनं केला होता, तोही अगदी लहानपणापासूनच. त्याचं मत होतं, कोणत्याही जीवाची हत्या करु नये. कुणालाही अपशब्द बोलू नये. त्यांचा सन्मान करावा. आपण जर कुणाला काहीही बोललो नाही. कुणाचा अपमान केला नाही वा कोणत्याही प्राण्यांची हत्या केली नाही तर त्या प्राण्यांचा आपल्याला आशिर्वादच लागेल. शिवाय त्या माणसांचाही आपल्याला आशिर्वादच लागेल. तसंच त्याच आशिर्वादच्या भरवशावर आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या संकटांवर मात करु शकतो. कचरुच्याही वडीलाचे दिवस वाईट होते. जेव्हा त्यानं आपला बैल कसायाला विकला होता. परंतु कचरुचे नशीब पालटले होते. कारण कचरुनं तेच पाप फेडत आपल्या घरी मरण पावलेला बैल घरच्याच जमीनीत पुरला होता. तो आशिर्वादच होता त्या बैलाचा की त्या दिवसापासून कचरुची परिस्थिती बदलली व तो पुढील काळात महान संशोधक बनला होता व त्यानं संशोधन केलं होतं.
मनुष्यप्राणी........म्हणतात की माणसाला भावभावना असतात. त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही दुःख होतंच. तसंच दुःख होतं मुक्या जनावरांना. मुकं जनावर का असेना, त्यांनाही भावभावना असतात. त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही दुःख होतंच. हे तेव्हा कळतं. जेव्हा तेही रडत असतात. डोळ्यातून अश्रू ढाळत असतात. फरक एवढाच असतो की माणसाला रडतांना मोठा आवाज काढण्याची सवय असते. जनावरांना ती नसते.
काही लोकं असे असतात की त्यांना मुक्या प्राण्यांच्या भावभावना कळतात. ते मग सहानुभूतीपूर्वक व्यवहार करतात मुक्या प्राण्यांसोबत. जणू सहानुभूतीच बाळगतात मुक्या प्राण्यांबद्दल. परंतु असेही काही लोकं जगात आहेत की जे अशा मुक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगत नाहीत. तसं पाहिल्यास सहानुभूतीपूर्वक व्यवहारही करीत नाहीत. ते तर कापून टाकतात प्राण्यांना. भयंकर त्रास देत असतात. काही माणसं माणूसकीच्याही पलीकडं जात असतात त्यांच्याशी वागणूक करतांना.
प्राणी....... मग ते कोणतेही का असेना, आपल्या कामातच येत असते. जशी गाय. गाय आपल्याला दूध देत असते. कुत्रा घराची राखण करीत असतो. बकरी लेंडीखत व दूध देत असते. कोंबड्या, बदके आपल्याला अंडे देत असतात. मेंढी लोकर देत असते. साप आपल्या शेतातील धान्य फस्त करणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त लावत असतो. साधी मधमाशी आपल्याला शहद देत असते. लहानसा काजवा देखील अंधारात वाट दाखवत असतो. तसं पाहिल्यास बरेचसे प्राणी असे आहेत की ते आपल्याला त्रास देत नाहीत. उलट आपले आधार बनत असतात. परंतु आपण त्यांना बदल्यात काय देतो? क्लेश, दुःख, वेदना. त्यातच त्या प्राण्यांना ते आपले गुलाम असल्यागत वागवत असतो.
प्राण्यांनाही आपल्या वागण्याचा त्रास होतोच. परंतु ते आपले दुःख कोणाला सांगतील बरे. ते फक्त अश्रू काढू शकतात डोळ्यातून. रडूही शकतात डोळ्यातून. परंतु ते आवाज करु शकत नसल्यानं त्यांचं रडणं आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तसं पाहता मानवजात ही स्वार्थी आहे. ती मानवजात मुक्या प्राण्यांबाबतही वागतांना स्वार्थीपणानंच वागते. समजा एखाद्या प्राण्यांचा आपल्याला जेव्हापर्यंत उपयोग असेल, तेव्हापर्यंत माणूस त्याचा चांगलाच वापर करून घेतो. ज्या दिवशी मानवाला वाटलं की अमुक अमुक प्राणी आपल्या काही कामाचा नाही. तेव्हा त्याची वागणूक बदलते. त्यानंतर तो त्या प्राण्याचं फुकटचं टेन्शन पालवत नाही. या प्राण्यांच्या क्षेणीत गाय किंवा बैल असेल तर तो त्यांना चक्कं कसायाला विकून टाकतो. इथं तर माणूस असा प्राणी आहे की ज्याला बुद्धी असल्यामुळं तो बुद्धीच्या जोरावर काहीही करु शकतो. जसं त्यानं आज वाघासारख्या प्राण्यांवरही नियंत्रण मिळवलं आहे. इथला मानव तर असा आहे की ज्याला म्हशीचं दुध चालतं. मात्र तिचं पिल्लू चालत नाही. त्या म्हशीनं पिल्लाला जन्म दिला आणि ते पिल्लू जर नर निघालं तर हा माणूस त्याला विषारी इंजेक्शन देवून मारुन टाकतो किंवा ते पिल्लू थोडं मोठं झाल्यावर त्याला कसायाला विकून टाकतो. तेच पुढे म्हशीबाबत आणि गाईबैलाबाबतही करतो. गाय, म्हैस वा बैल भाकड झालं अर्थात ती दूध देत नसली वा बैलाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तो बैल शेतीत काम देणारा नसेल तर त्याला चक्कं कसायास विकतो. मग हा कसाई अशा जनावरास कापून त्याचं मांस विकतो व चामड्याला परिपक्वं करुन त्याच्या वस्तू बनवतो वा चप्पल बनवतो.
गाय, म्हैस व बैलच नाही तर, निसर्गाच्या या लेकराची मानवासमोर काही किंमत नाही. बकरी वा मेंढ्यांचा काही उपयोग नाही म्हणून मानव त्यांना चक्कं कापून टाकण्याचं काम करतो. तसाच तो कोंबड्यांचा जन्म केवळ कापण्यासाठीच झाला आहे असं मानून कापतो. परंतु मुक्या प्राण्यांची तो दया घेत नाही. ही हिंसाच आहे.
हिंसेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हिंसा मानवानं करुच नये. कारण जिथं आपला एक बोट कापताच आपल्याला अशक्यप्राय वेदना होतात. तिथं त्या प्राण्यांची चक्कं मानच कापली जाते. तेव्हा त्याला कसं वाटत असेल? याची कल्पना न केलेली बरी. जिथं आपलं एक बोट कटतांना आपल्याला अशक्यप्राय त्रास होतो, तिथंच जर आपली मान कापली तर......तर आपल्याला कसं वाटेल? ही कल्पनाही आपल्याला सहन होत नाही. तेव्हा महत्वपुर्ण गोष्ट ही की आपले मुके प्राणी हे मित्र आहेत. कोणत्या ना कोणत्या कामात येणारे. असे समजून आपण कोणत्याच प्राण्यांची हिंसा करु नये वा कोणालाही करु देवू नये हे तेवढंच खरं. खरं तर त्यांचीही आपण दया घ्यावी. कारण ते आपल्या उपयोगाचे आहेत. तसेच त्यांना आपले आधारस्तंभ देखील म्हणता येईल यात शंका नाही.
कचरु शेतीबाबत संशोधन करीत असतांना त्यानं शेतीवर आधारीत सर्व समस्येवर तोडगा काढला होता. परंतु त्यानं जे यंत्र बनवलं होतं. ते यंत्र कितीतरी किमीच्या लोकांसाठी फायदेशीर होतं. ज्यात काही कोरडवाहू शेतकऱ्यांचे नुकसान होत होतं. ते यंत्र त्याला बनवता आलं, कारण त्यानं आपल्या हयातीत मुक्या प्राण्यांची सेवा केली होती. त्यांचा आशिर्वाद घेतला होता.
कचरु जेव्हा म्हातारा झाला. तेव्हा त्याला संशोधन करता येणं शक्य नव्हतं. कारण त्याची बुद्धी तेवढ्या प्रमाणात चालत नव्हती. त्यामुळंच संशोधनाला व्यत्यय निर्माण झाला. काही दिवसानंतर तो मरण पावला आणि जगणारही तो किती दिवस होता. परंतु त्याची जी मुलं होती. ती मुलं पुढं जावून संशोधकच बनली होती व त्यांनी संशोधन करुन आपल्या वडीलांच्या यंत्रात सुधारणा केली होती. त्या यंत्रात त्यांनी सुविधा केली होती. त्या सुविधेनुसार त्या यंत्रात बदल करता येवू शकत होता. तो बदल म्हणजे त्या यंत्राला जेवढ्या जागेवर अवकाळी पाऊस वा गारांचा पाऊस येवू द्यायचा नसेल, तेवढ्यात भागात अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस येत नव्हता. तसंच ते यंत्र अतिशय कमी पैशाचं होतं. शिवाय त्यात टाकता येणारं पावडरही अतिशय कमी पैशाचं होतं. त्यामुळंच की काय, आज सामान्य शेतकरीही त्या यंत्राचा वापर करु लागले होते. तसंच ते यंत्र सामान्य गरीब माणसांना परवडू लागलं होतं.
आज त्या यंत्राचा वापर सामान्य गरीब शेतकरीही करु लागला होता. जेव्हा अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस जास्त यायचा वा त्याच्या येण्याची संभावना असायची व त्यामुळं संभाव्य नुकसान होण्याचा धोका असायचा.
त्या मुलांनी शोधलेलं ते तंत्रज्ञान. त्यातच त्यांनी बनवलेलं अवकाळी आणि गारांच्या पावसावर मात करणारं यंत्र. ते जणू स्वप्न होतं कचरुचं. त्यामुळंच की काय, त्या यंत्राचा शोध लागताच त्याच्या मुलांना अतिशय आनंद झाला होता. मात्र तो आनंद पाहायला आणि अनुभवायला कचरु आज जीवंत नव्हता. तो तर केव्हाच या जगाच्या पाठीवरुन हवालदील झाला होता.
कचरुच्या मुलांनी बनवलेलं ते यंत्र आता जास्त प्रमाणात बाजारपेठेत चालू लागलं होतं. त्यातच हळूहळूच त्या यंत्राची प्रसिद्धी जागतिक बाजारपेठेत होवू लागली होती. कारण इतरही देशांना त्या यंत्राची आवश्यकता होती. त्यांनी ते पेटंट विकत घेतलं होतं. ज्याचा शोध देशातच लागला होता.
आज ते यंत्र एवढं कामाचं ठरलं होतं की त्या यंत्रानुसार शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत होता. ते पाहून कचरुचं नाव जगात वाढलं होतं. कारण कचरुच्या मुलांनी ते यंत्र आपल्या नावावर खपवलं नव्हतं तर ते आपल्याच वडीलांच्या नावानं बाजारपेठेत आणलं होतं. त्यामुळंच आज कचरुला एक मोठ्या सन्मानाचा मरणोपरांत मोठा पुरस्कार मिळाला होता.
कचरुला मरणोपरांत जागतिक दर्जाचा एक मोठा पुरस्कार मिळाला होता. ज्याचं श्रेय जात होतं त्याच्या लेकरांना. तसंच त्याच्या लेकरांनीही त्या लहान स्वरुपात बाजारपेठेत आणलेल्या यंत्रावर आपला दावा केला नाही. ते यंत्र त्यांनी आपल्या वडीलांनाच समर्पीत केलं होतं नव्हे तर आपल्या वडीलाच्या नावानं खपवलं होतं. जणू त्यांनी आपल्या वडीलांच्या स्वप्नाचीच प्रतिपुर्ती केली होती.
आज कचरु जगात नव्हता. परंतु त्यानं केलेलं संशोधन हे त्याच्या मरणोपरांत आलेल्या संशोधक पिढीच्या कामात येत होतं. त्या यंत्रानं कित्येक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या वाचवल्या होत्या. आज कित्येक शेतकरी सुखी झाले होते. तसंच ते तंत्रज्ञान वापरुन भावी पिढी आणखी जास्त आविष्कार करु लागली होती. ते संशोधन भावी पिढींसाठी प्रेरणा ठरलं होतं.
कचरुच्या मुलांनी आपल्या आयुष्यात भरपूर संशोधन केलं. अनेक यंत्र बनवलीत. जी यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली होती. ज्या यंत्रानं शेतकरी अतिशय सुखी झाला होता, एवढेच नाही तर इतरही क्षेत्रासाठी कचरुच्या मुलांनी यंत्र बनवून सोई सुविधा निर्माण केल्या होत्या. हे सर्व घडून आलं होतं एकविसाव्या शतकात आखण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमानं. तो शासनानं बनवलेला अभ्यासक्रम म्हणजे देशात संशोधकच निर्माण करणारा अभ्यासक्रम होता. आज त्याच अभ्यासक्रमानं असे कचरुच नाही तर कचरुच्या मुलांसारखे कित्येक संशोधक देशाला दिले होते. ज्यांच्या ज्ञानाच्या भरवशावर देश जागतिक महासत्ता स्पर्धेत यशस्वी ठरला होता नव्हे तर जगात त्याचं विकासाच्या क्षेत्रात मोठं नाव झालं होतं.
कचरु आज जगात नव्हता. मात्र त्याचं संशोधन जगात होतं. ते जगाच्या फारच उपयोगी पडत होतं. तसं पाहता कचरु आज जगात नसला तरी त्याचं नाव जगात त्याच्या संशोधनानं अजरामर झालं होतं नव्हे त्याच्या संशोधनानं आज देशाचंही नाव जगात अजरामर झालं होतं यात शंका नाही. आज त्याचे पेटंट जागतिक बाजारपेठेत वापरले जात होते नव्हे तर शेतातील पिकांना दिशा देण्यासाठी कचरुचं संशोधन लाभदायकच ठरलं होतं. कारण देश जागतिक पातळीवर महासत्ता बनला होता.

*******************************************************************************समाप्त ***********