Sumantanchya Vaadyaat - 7 in Marathi Detective stories by Dilip Bhide books and stories PDF | सुमंतांच्या वाड्यात - भाग ७

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

सुमंतांच्या वाड्यात - भाग ७

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची  बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

प्रभावतीबाई                  विदिशाची आई.

राधास्वामी                   मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.

निशांत                      शोधकर्ता (डिटेक्टिव)

भाग  ७   

भाग ६  वरुन  पुढे  वाचा .......

“तुम्हाला फूल सपोर्ट आहे आमचा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझा शब्द. मग तर झालं?” – दिनेश.

“धन्यवाद, आता तुम्ही निश्चिंत मनाने ऑफिसला जा. मी आहे.” – निशांत.

दिवसभर निशांत सर्व खोल्यांची बारकाईने पाहणी करत होता. घराच्या चारी बाजूने फिरतांना त्याला एक गोष्ट आढळली. मागच्या बाजूला दिनेश आणि विशालच्या बेडरूम थोड्या म्हणजे तीन फुट समोर आल्या होत्या, आणि दोन्ही खोल्यांच्या मधे जवळ जवळ ५ फूटयांची जागा होती. या पांच फुटांच्या जागेत बसण्या साठी एक ओटा बांधला होता.  ओट्याची खालची बाजू मोकळी नव्हती. भिंत बांधून बंद केली होती. मागच्या बाजूला छोटासा बगीचा, आणि झोपाळा  लावलेला होता. निशांत बगीचा ओलांडून कुंपणा पर्यन्त गेला. समोर पण एक घर होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अगदी तंतोतंत दिनेशच्या घरा सारखाच होतं. तसाच ओटा पण होता. निशांतची उत्सुकता चाळवली. तो घराच्या बाहेर पडला. ती गल्ली पार करून मागच्या गल्लीत गेला. समोरून सुद्धा ते घर अगदी दिनेशच्या घरासारखेच होते. बहधा त्या घरात कोणी राहत नसावे. आंगणात पाला पाचोळा साचला  होता. त्याने शेजारच्या घराकडे मोर्चा वळवला. एका वयस्कर माणसाने दार उघडलं.

“नमस्कार मी नुकताच इथे बदलून आलो आहे. घराच्या शोधात आहे. हे तुमच्या शेजारचं घर रिकामं दिसतंय. भाड्याने द्यायचं आहे का?” – निशांत.

“घर रिकामंच आहे, पण ज्याचं घर आहे, त्यांना भाड्याने द्यायचं नाहीये. तमच्या अगोदर सुद्धा बरेच लोकं विचारून गेले. पण कोणी राहायला आलं नाही.”- गृहस्थ.

“काय आहे, घराची काळजी घेतलेली दिसत नाहीये, पण मला चालेल, घराची रचना सुंदर आहे.” – निशांत.

“अहो तुम्हाला चालून उपयोग काय? मालकाला चाललं पाहिजे ना?” – गृहस्थ.

“कोण आहेत हो मालक? पत्ता देता का? म्हणजे मी स्वत: जाऊन बोलेन.” – निशांत. “विक्रांत शेठ मालक आहेत. मोठी आसामी आहे. कदाचित त्यांना इथे टोलेजंग बिल्डिंग बांधायची असेल, म्हणून देत नसतील भाड्याने.” – गृहस्थ.

“असं आहे होय, मग बरोबर आहे. त्यांना जरूर नसेल भाड्याच्या पैशांची.”- निशांत.

“अहो करोडपती आसामी आहे ती. भाड्याच्या पैशांचं, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना कोतूक. त्यांना नाही.” – गृहस्थ.

“काय करतात हे विक्रांत शेठ? मी नवीन असल्याने माहीत नाही” – निशांत.

“मोठे बिल्डर आहेत. मोठमोठ्या टोलेजंग इमारती बांधतात. तुम्हाला भेटायचं असेल, तर  भेटा. पण उपयोग नाही होणार.” – गृहस्थ.

निशांत मग माघारी फिरला. घर आतून बघणं शक्य दिसत नव्हतं. तो विचार करत होता की, दोन्ही घरांच्या बांधणी वरून असं वाटत होतं की दोन भावांची घरं आहेत. मग जर दोन भावांची घरं असतील तर शेजारी शेजारी असायला हवी होती. एकाचं तोंड या गल्ली मधे तर दुसऱ्याचं मागच्या गल्ली मधे, असं का? खूप विचार करूनही त्याला उत्तर मिळेना, दिनेश आणि विशाल संध्याकाळी येतील तेंव्हा विचारू, असा विचार करून त्याने तो प्रयत्न सोडून दिला. आल्यावर त्याने पुन्हा एकदा घराभोवती चक्कर मारली. आणि झोपाळ्यावर बसला. बगीचा छानच होता. संध्याकाळ होत आली होती. सूर्य मावळतीला आला होता. शलाका आणि विदिशा मुलांसह बागेत आल्या. मुलांनी लगेच पाइप घेऊन झाडांना पाणी घालायला सुरवात केली. पाणी घालता घालता त्यांची मस्ती पण चालू होती.

“बाग तर छानच ठेवली आहे तुम्ही लोकांनी. कोण करतं हे बागकाम? की माळी  लावला आहे?” – निशांत.

“माळी नाही, आम्ही सर्वच बागेत काम करतो. त्या पलीकडे थोडी भाजी पण लावली आहे.” - विदिशा.

“हो बघितलं मी. चांगली बाग असली की मन प्रसन्न होतं.” – निशांत.

“दिनेश आणि विशालराव केंव्हा येतात?” – निशांत.

आता येतीलच. हे झाडांना पाणी  घालणं झालं की चहाच ठेवते. तुम्ही पण या पांच मिनिटांनी.” शलाका म्हणाली आणि थोड्या वेळाने दोघी घरात गेल्या. निशांत मुलांशी गप्पा मारत होता. त्यांना गमतीदार गोष्टी सांगत होता. आता दिनेश आला होता. तो बागेत आला आणि म्हणाला “चला निशांत, आत चला चहा घेऊया.”

“दिनेशराव,” निशांत म्हणाला. “चहा घेऊ. पण विशालराव  आल्यावर आपण तिघंही किंवा सर्वच थोडावेळ इथे बागेत येऊन बोललं तर  चालेल का?”

“हो, न चालायला काय झालं? पण का? काही विशेष?” – दिनेश.

“हो, म्हणजे विशेषच, पण मी ते कारण तुम्हाला नंतर सांगेन.” – निशांत.

“ओके. पण शलाका आणि विदिशा जेवणं झाल्यावरच मोकळ्या होतील.” – दिनेश.

“हरकत नाही आपण त्या नंतर बसू. पण तुम्ही जेवणं  झाल्यावर सर्वांना चला अंगणात बसू थोड्यावेळ, असंच सांगा. मी म्हणालो असं सांगू नका.” – निशांत.

“एवढी गुप्तता का ? मला कळलं नाही, पण ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसं.”- दिनेश.

मग ते दोघं घरात गेले. विशाल पण आला होता. हसत खेळत जेवणं झाल्यावर सगळी आवारा आवर झाल्यावर दिनेश म्हणाला “चला जरा बाहेर थोडा फेरफटका मारून येऊ.” आणि मग ठरल्या प्रमाणे, ते लोकं मागच्या बाजूला बागेत आले. विशाल दोन खुर्च्या घेऊन आला. सगळे बसल्यावर विशाल म्हणाला, “आपण बाहेर का बसलो आहोत, दिनेश म्हणाला की तुम्हीच तसं सांगीतलं म्हणून. काही प्रगती झाली का?” विशालने निशांतला विचारले.

“विशालराव, अहो असं एका दिवसांत कसं सांगता येईल. हा रिसर्च आहे. काही पॉईंट्स मी नोट केले आहेत. पण काय असतं की प्रथम दर्शनी ते तुम्हाला हास्यास्पद वाटतील, पण शोधकार्य असंच असतं.” – निशांत.

“म्हणजे आज काहीच प्रगती झाली नाही एवढंच.” – विशाल.

“नाही, असं नाहीये,” निशांत बोलला. “मला प्रथम तुम्ही हे सांगा की तुमचं घर आणि हे मागचं घर अगदी सारखं कसं?”

“त्या घराचा काय संबंध? तुम्हाला काही समजलंय का?” – विशाल.

“प्लीज मला सहकार्य करा. त्या घरा बद्दल मला माहिती द्या.” – निशांत.

“ओके, आम्ही सहकार्य करूच, पण आधी हे सांगा की इथे बाहेर का बोलावलं? आपण हॉल मधे बसून पण बोलू शकलो असतो की.” – विशालने  जरा त्रासिक स्वरात विचारलं.

“सांगतो. जेंव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेंव्हाच या घटना होतात. दुसरं म्हणजे जेंव्हा गोविंदराव आले होते तेंव्हा ८-१० दिवस काहीच घडलं नाही. म्हणजे जेंव्हा हॉल मधे कोणी असतं तेंव्हा काहीच घडत नाही. आता मला सांगा त्या लोकांना हे कसं कळतं की हॉल मधे कोणी आहे म्हणून? तर हॉल मधे जे काही बोललं जातं, ते त्यांच्या पर्यन्त पोचत असावं असा माझा निष्कर्ष आहे. म्हणून मी तुम्हाला इथे बाहेर बोलावलं. आपलं कुठलंही प्लॅनिंग त्यांच्या पर्यन्त न पोचण्याची खबरदारी म्हणून.” – निशांत. यावर विशाल काही बोलला नाही.   

“घरा बद्दल मी सांगतो.” दिनेश म्हणाला. “आमचे आजोबा आणि त्यांचे भाऊ, या दोघांनी हे घर साधारण १९४० -४५ च्या दरम्यान ही घरं बांधली. आमचा जन्मच या घरात झाला आहे.”

“हे बरोबर, पण भाऊ भाऊ होते, तर शेजारी शेजारी बांधायला हवी होती, एक या गल्लीत आणि दुसरं मागच्या गल्लीत असं का?” – निशांत.

“माहीत नाही. हा १०० X १०० चा प्लॉट होता. अर्ध्या प्लॉट वर काकांनी घर बांधलं आणि अर्ध्यावर आमच्या आजोबांनी. बांधणारा बहुधा एकच ठेकेदार असावा, म्हणून त्यांनी दोन्ही घरं सारखी बांधली.” – दिनेश.

“किंवा असंही असू शकतं की दोघा भावांनी सारखीच घरं बांधा असं सांगीतलं असेल. आता त्या मागचं कारण त्यांनाच माहीत.” – विशाल.

“तुम्ही दोघांनी जर घरं बांधली, तर सारखीच बांधा असं सांगाल का?” – निशांत.

“नाही, कदाचित. पण निशांत या सारखेपणाचा आणि आमच्यावर जे अरिष्ट आलं आहे, त्याचा संबंधच काय? तुम्ही वडाची साल पिंपळाला लावता आहात. असं नाही का तुम्हाला वाटत?” – विशाल.

“नाही, शोधकार्या मधे वेगळी दिसणारी प्रत्येक गोष्ट तपासून पूर्ण खात्री झाल्या शिवाय, सोडायची नसते. कदाचित यातून काही निष्पन्न निघणारही नाही, पण बऱ्याच वेळी अश्या चिकाटीने केलेले शोधच दिशा देवून जातात. विश्वास ठेवा माझ्यावर.” – निशांत  

“ठीक आहे. मग याबद्दल जास्त माहिती आमचे काकाच तुम्हाला देऊ शकतील. पण ते पुण्याला असतात.” – दिनेश.

“दुसरी गोष्ट, हे इथे तुमच्या दोन खोल्यांच्या मधे बसण्यासाठी सीमेंटचा बेंच केला आहे. तसाच तो त्या घरात पण आहे. असं का?” – निशांत.

“आता दोन्ही घरं सारखी आहेत म्हंटल्यांवर हे पण सारखंच. पण खरं म्हणजे जे प्रश्न तुम्हाला पडले आहेत, ते आम्हाला कधीच पडले नाहीत.” – दिनेश.

“मला हा बेंच जरा विचित्र वाटतो आहे. तुमच्या लक्षात आलं नाही का कधी?”-निशांत

“आता बसण्या साठी केला आहे तो, विचित्र काय असणार त्यात?” विशाल.

“आपल्याला खुर्चीवर बसल्यावर पाय मागे पुढे घ्यायचे असतात. तुमचेच पाय बघा. या बाकावर असं करता येत नाही. हा खालच्या बाजूने बंद आहे. का केलं असेल असं? आणि ते ही दोन्ही घरात? बसण्या साठीच करायचा असता, तर फक्त वरची स्लॅब घालून किंवा कडप्पाची लादी टाकून करता आला असता” – निशांत.

“मला वाटतं की घरं जरी दोघा भावांची होती, तरी बांधकामाच्या वेळी एकच भाऊ काम बघत असेल, म्हणून दोन्ही सारखी झाली. अजून काय?” दिनेश.

“हे बघा जरी दोन्ही भावांनी घरं एकाच वेळी बांधली असतील, तरीही दोन्ही घरं कधीच सारखी नसतात. प्रत्येक जण आपल्या विचारा प्रमाणे घर बांधतो. इथे तर इंच नि इंच सारखा आहे. यांच्या मागे नक्कीच काही कारण असलं पाहिजे.”– निशांत.

“असेल, कदाचित तुम्ही म्हणता तसंही असेल. पण याचं उत्तर तुम्हाला काका सुद्धा देऊ शकतील का यांची शंका आहे.” – दिनेश.

“दिनेश, आपण उद्या पहाटे जर निघालो, तर काकांना भेटून रात्री पर्यन्त आपण बार्शीला वापस येऊ शकतो. जायचं का उद्या? – निशांत.

दिनेश थोडा विचार करत होता. म्हणाला “उद्या माझ्या खूप महत्वाच्या मीटिंग आहेत, विशाल तुला जमेल का?” – दिनेश.

“खरंच इतकं तातडीने जाण्याची आवश्यकता आहे का? रविवारी गेलं तर चालणार नाही का?” – विशाल. आता यावर निशांत काही बोलणार त्यांच्या अगोदर विदिशाच बोलली. ”विशाल अरे असं काय करतो? जितक्या लवकर याचा निकाल लागेल तितकं बरं नाही का? काही नाही, उद्याच निघा तुम्ही. पण रात्री तुम्ही इथे पाहिजे. मुक्काम करायचा  नाही.”

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.