Like whose karma - 5 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | जैसे ज्याचे कर्म - 5

Featured Books
  • Operation Mirror - 5

    जहां एक तरफ raw के लिए एक समस्या जन्म ले चुकी थी । वहीं दूसर...

  • मुर्दा दिल

    कहानी : दीपक शर्मा            ...

  • अनजाना साया

    अनजाना साया लेखक: विजय शर्मा एरी(लगभग १५०० शब्द)गाँव का नाम...

  • नेहरू फाइल्स - भूल-83-84

    भूल-83 मुफ्तखोर वामपंथी—‘फिबरल’ (फर्जी उदारवादी) वर्ग का उदय...

  • The Professor

    अध्याय 1: मैकियावेली और एक ठंडी चायस्थान: दिल्ली यूनिवर्सिटी...

Categories
Share

जैसे ज्याचे कर्म - 5

जैसे ज्याचे कर्म! (भाग ५)
पंचवीस वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील पदवी घेवून आलेल्या अजय गुंडे नावाच्या तरुण डॉक्टरने त्या शहरात एका छोट्या खोलीमध्ये स्वतःचा दवाखाना सुरु केला. एका नव्या जाणिवेने आणि समाजसेवेचे व्रत घेवून वेगळ्याच स्फूर्तीने तो युवक काम करू लागला. हळूहळू व्यवसायात त्याचा जम बसत होता. हातगुण चांगला यासोबत एक सकारात्मक दृष्टीकोन असलेला, आर्थिकतेपेक्षा माणुसकी जपणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होत होती. दूरवरचे पेशंट त्यांच्या दवाखान्यात येत होते. असे सारे सुरळीत चालू असताना एका रात्री सोबतचा कर्मचारी निघून गेलेला असताना अचानक एक जीप डॉ. गुंडे यांच्या दवाखान्यासमोर थांबली. दोन तीन युवकांनी एका युवतीस उचलून आणले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,
"डॉक्टरसाहेब, मी...मी जिवलावे. येडगावचा सरपंच आहे. ही... ही... शोभा आमच्या गावचीच असून गर्भार आहे..."
"म..... मग हिला एखाद्या महिला डॉक्टरकडे न्या. मी नाही तपासू शकत. महत्त्वाचे म्हणजे आता दवाखाना बंद झाला आहे. मला मदत करणारा कर्मचारीही नाही." डॉ. गुंडे त्या युवतीची शारीरिक स्थिती पाहून म्हणाले.
"दुसरीकडे कसे नेणार? शहरात शिरल्याबरोबर पहिला दवाखाना तुमचाच दिसला. दुसरीकडे न्यायला वेळ तरी आहे का? ही बेशुध्द आहे. हिच्यावर..."
"बेशुद्ध आहे पण असे घडले काय की ही बेशुद्ध झाली?" डॉ. अजयने वेगळ्याच शंकेने विचारले.
"ह... ह... हिने स्वतः स्वतःचा गर्भ पाडण्याचा प्रयत्न केलाय..."
"काय? ही.. ही... मग तर मी मुळीच हात लावणार नाही. ही गर्भपात का करीत होती? शिवाय तिच्या पोटात गर्भ राहिला कसा? कुणामुळे? सारे अवघड आहे. ही पोलीस केस आहे. "
"ती नंतर करूया. पण सध्या हिचा जीव वाचविणे आणि अर्धवट आत राहिलेला गर्भ काढणे गरजेचे आहे. नाही तर हिच्या जिवाला धोका आहे."
"म्हणजे? अर्धा गर्भपात झालाय? मग तर अजून अवघड आहे कारण उर्वरित गर्भपात करताना हिचे काही बरे-वाईट झाले तर?"
"काही होणार नाही. मी आहे ना. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे मी. तुम्ही घाबरू नका. वाटल्यास साहेबांना फोन लावू का?"
"नको. पण मला यात ओढू नका. मी असा गैरकारभार... असे धंदे करत नाही."
"डॉक्टर, हा दवाखाना कुणाचा आहे?"
"म... म... माझा आहे. दुसरा कुणाचा असणार?"
"ही बेशुद्ध मुलगी सध्या कुठे आहे?"
"म..म.. माझ्याच दवाखान्यात आहे..." डॉ. गुंडे त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येताच घाबरून म्हणाले.
"याचा अर्थ असा होत नाही का, की या मुलीचा तुम्ही तुमच्या दवाखान्यात गर्भपात करीत असताना..."
"न... नाही हो. भलतेच काही बोलू नका."
"का नाही? यातून हेही सिद्ध होते की, तुमच्या दवाखान्यात तुम्ही नेहमीच अशा गर्भपाताच्या शस्त्रक्रिया करतात. हा प्रकार बाहेर कुठे समजू द्यायचा नसेल तर मग सरळ सरळ हिची सुटका करा. नाही तर तुमच्याच फोनवरून मी डायरेक्ट पालकमंत्र्यांशीच बोलतो. नाही तर मग सरळ पोलीस ठाण्यात कळवतो आणि मग तुमच्या दवाखान्यावर धाड पडली तर?"
"न..... नको हो. असे करु नका. मी अतिशय प्रामाणिकपणे काम करीत असतो. हा माझा व्यवसाय नाही, धंदा तर मुळीच नाही. एकप्रकारचे व्रत म्हणून मी..."
"म्हणून म्हणतो ऐका. तुमच्या प्रामाणिकपणावर कोणता धब्बा लागू द्यायचा नसेल तर... ही बॅग घ्या. वीस हजार आहेत."
द्विधा अवस्थेत डॉ. गुंडेंनी ती केस हातात घेतली. नंतर एका तासामध्ये सारे सुरळीत पार पडले. काही वेळाने ती मुलगीही शुध्दीवर आली. तिच्या एकूण वागण्यातून आणि डॉक्टर समोर तिने जिवेलावेस दिलेल्या शिव्याशापातून जिवलावेने तिच्यावर बलात्कार केल्याचे, त्या बलात्काराचे फळ डॉ. गुंडेंनी नुकतेच निर्जीव केल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती मंडळी निघून जाताच डॉक्टरांनी आवरासावर केली. सारे साहित्य आणि त्या अर्भकाचे तुकडे एका पिशवीत भरले. डॉ. अजय ती पिशवी घेवून शहराच्या बाहेर असलेल्या नदीच्या पुलावर आले. रात्रीच्या अंधारात त्या पुलावर शुकशुकाट होता. डॉक्टरांनी ती पिशवी नदीमध्ये फेकून दिली. भर हिवाळ्यात नखशिखान्त घामाने डबडबलेले डॉ.अजय गुंडे घरी परतले. नंतरचे अनेक दिवस अजय अतिशय अस्वस्थ होते. आपण जे काही केले ते योग्य की अयोग्य हा प्रश्न त्यांना सातत्याने सतावत होता. त्यांचे मन त्यांना खात होते. माझ्या हातून फार मोठा गुन्हा झालाय हे त्यांना पदोपदी जाणवत होते. तसेच काही दिवस निघून गेले. त्या धक्क्यातून डॉ. गुंडे सावरत असताना पुन्हा जिवलावेंची स्वारी हजर झाली. पुन्हा तोच प्रकार! तशीच बॅग! तशाच पॅकेजला जलसमाधी! जिवलावेंची डॉक्टरांशी मैत्रीची नाळ चांगलीच जमत असताना त्यांचा राजकीय प्रवास जोमात सुरु झाला. ते आमदार झाले. डॉ. गुंडे यांनीही एक मोठा प्लॉट विकत घेतला. जिवेलावेंमुळे नाइलाजाने गैरकृत्य करणारे डॉ. गुंडे त्यातून मिळणाऱ्या पैशाला भुलले. एका चक्रव्यूहात ते सापडले. परंतु सुरवातीला वाटणारी अपराधीपणाची जाणीवही नंतर पुसट होत गेली. सराईतपणे आणि बिनधास्तपणे गुंडे तशा शस्त्रक्रिया करु लागले. काही महिन्यातच त्या शहरात डॉ. गुंडे यांचा एक सुसज्ज दवाखाना उभा राहिला. यथावकाश डॉक्टरांचे लग्न झाले. पत्नीला सारे समजले. ती रागारागाने म्हणाली,
"अजय, हे तुम्ही काय करता? निष्पाप जीवांचे जीव का घेता? एकप्रकारे तुम्ही पाप करीत आहात. नुकत्याच उमलू पाहणाऱ्या कळ्यांचा तुम्ही खून करीत आहात असे तुम्हाला वाटत नाही का? अपराधीपणाची जाणीव तुम्हाला होत नाही का?"
"ते सगळे खरे आहे परंतु दुसरीकडे मिळणारा पैसा बघ. काही वर्षातच ही टोलेजंग इमारत उभी राहिली ती कशाच्या जोरावर? याच पैशाच्या जोरावर ना? तुला नखशिखांत सोन्याने मढवले आहे ते सोने बायकांच्या पोटातील अर्भकांचे मढे नदीत फेकून मिळवले आहेत ना? आणि आजकाल कोण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहे? स्वतः ती बाई पोटचे पोर पाडायला तयार असते. अनेकदा तिचे कुटुंबीयही त्या कृत्याला संमती देतात..."
"अहो, पण त्या निष्पापाच्या नरडीचा घोट तर तुम्हीच घेता ना? प्रत्यक्ष अघोरी कृत्य तुम्हीच करता ना? अजूनही तुम्ही नाही म्हणू शकता. अशा पापकृत्यांपासून दूर राहू शकता. आज लग्न झाले. उद्या संतती होईल. या पापकर्माची शिक्षा आपल्या मुलांना मिळाली तर चालेल तुम्हाला? त्यांचे होणारे हाल तुम्हाला पाहवतील? सोसवतील?"
"असे काही होणार नाही, होत नसते. तू म्हणतेस तसे मी या धंद्यातून अंग काढून घेतले तर काय हे धंदे थांबणार आहेत? मुळीच नाही. मी नाही तर और सही. शिवाय ही राजकारणी मंडळी मला शांत बसू देणार आहे? सध्या त्यांच्या, त्यांच्या सहकाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या काळ्या कृत्यांना मी जलसमाधी देतोय म्हणून सारे शांत आहेत. उद्या मी एखाद्याला नकार देऊ दे मग बघ कसे ते माझ्या मागे हात धुऊन लागतात ते."
पत्नीचा संताप, थयथयाट सारे क्षणभंगुर ठरले. मिळणारा पैसा, ऐषोआरामास तीही काही दिवसातच भुलली. मानवाच्या रक्तास चटावलेल्या वाघाप्रमाणे मिळणाऱ्या संपत्तीचा मोह आवरणे पती-पत्नीस जमले नाही. शिवाय जिवलावेप्रमाणे अनेक नेते गुंडे त्यांच्या पाठीशी होते. गर्भाची नाळ, तोडताना कैक बड्या प्रस्थांशी त्यांची नाळ जुळत होती. नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या नातलगांच्या कुकर्माना डॉ. गुंडेंनी जलसमाधी दिल्यामुळे डॉक्टरांकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. शिवाय सारेच गर्भपात हे अनैतिक संबंधातून राहिलेल्या गर्भाचे होते असे नाही. कारण गर्भलिंग निदानातून मुलीचा गर्भ असल्यास ते पाडण्याचे प्रमाणही बरेच वाढले होते. नको असलेला मुलीचा गर्भ टाकण्याकडे अनेक कुटुंबांचा कल असल्यामुळे अनेक माता आपल्या गर्भातील मुलीच्या अंशाचा गर्भातच गळा घोटत होत्या. काही वर्षांपूर्वी डॉ. गुंडे यांनी आणलेली गर्भलिंगनिदानाची नवीन मशीन त्यांच्यासाठी जणू एटीएम मशीन ठरत होती. दररोज अशा नको असलेल्या गर्भाचा निःपात करणाऱ्या चार पाच शस्त्रक्रिया ठरलेल्या होत्या. पैसा, प्रसिद्धी मिळत गेली त्यामुळे एक नशा गुंडे पती-पत्नींमध्ये वाढत गेली. एकदा का कोणतेही व्यसन लागले की, त्यातून बाहेर पडणे अवघड असते. यशाचे व्यसन हा प्रकारचा चक्रव्यूहच असतो. त्यात शिरता येते किंबहूना नानाप्रकारे प्रयत्न करुन मानव ह्या गोष्टी कशा प्राप्त होतील हेच पाहतो परंतु एकदा का चक्रव्यूहात शिरले की, अनेकदा इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता येत नाही. डॉ. गुंडे यांचेही तसेच झाले जिवलावे यांनी गुंडे यांना ती नशा चाखायला भाग पाडले आणि पाहता पाहता गुंडे त्यात अडकून पडले.
जिवलावे यांच्याप्रमाणे अनैतिक कार्य करणाऱ्या अनेक पुढारी, अधिकारी, पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांनी केलेल्या दुराचारात बळी पडलेल्या अनेक महिलांची त्यातही तरुणींची सुटका केल्यामुळे अनेक मोठमोठी माणसांशी अजय गुंडे यांचे जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. त्यातूनच एकदा तर एक फार मोठा प्रसंग उभा राहिला. नेहमीप्रमाणे डॉ. गुंडे दवाखान्यात आलेल्या रोग्यांना तपासत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर जिवलावे यांचे कट्टर विरोधक आगलावे यांचा फोन येत होता....
००००