Like whose karma - 2 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | जैसे ज्याचे कर्म - 2

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

जैसे ज्याचे कर्म - 2

जैसे ज्याचे कर्म! (भाग २)
"साहेब... साहेब..." गणपतने पुन्हा आवाज दिला. तसे डॉ. गुंडे वास्तवात परतले. समोरच्या रुमालाने त्यांनी कपाळावरचा घाम पुन्हा एकदा टिपला. ते पाहून गणपतने विचारले,
"काय झाले साहेब? तब्येत बरी नाही का? नाही म्हटलं सारखा घाम येत आहे... ए. सी. चालू असताना घाम येणे बरे नाही."
"तसे काही नाही रे. तब्येत चांगली आहे पण का कोण जाणे आजची केस हातात घेतल्यापासून कशी वेगळीच मनःस्थिती झाली आहे. गणपत, तुला इथे काम करुन किती वर्षे होत आहेत रे?"
"कुणी मोजली साहेब? आन् मोजून करायचे तरी काय?" हातातील पिशवी नीट धरत गणपत म्हणाला. नेहमीप्रमाणे गर्भपाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 'त्याची' विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बबन गेली अनेक वर्षे इमानेइतबारे सांभाळत होता. त्याच्या हातात असलेल्या 'विशेष' पार्सलकडे बघत डॉ. गुंडेंनी विचारले,
"बबन, सारे व्यवस्थित आहे ना?"
"डॉक्टरसाहेब, मी हे काम पहिल्यांदा करतो का? आणि आज कधी नव्हे ते असे का विचारता? आजवर असे शेकडो... तोबा तोबा नाही बोलणार. भिंतीलाही कान... जावू द्या, तुम्ही निश्चिंत रहा. गावाबाहेरच्या नदीमध्ये या बालकाचे नेहमीप्रमाणे विसर्जन करून येतो..."
"ते होईल.. पण आज कसे वेगळेच वाटतेय."
"साहेब, खरं सांगू का हे असे वाटणे म्हणजे तुमच्यातली माणुसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे ते. हे जे तुम्ही जे करता ना ते करताना होणारी अशी अवस्था तुमच्या भावना ओल्या आहेत हे सांगते. साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, तुम्ही आम्हाला अन्नाला लावले आहे म्हणून सांगतो, साहेब, आवघड वाटत असेल तर कशासाठी करता हे सारे? करा ना अशा केसेस घेणे बंद. पैशाला का कमी आहे तुम्हाला? ते म्हणतात ना 'एक बेटी, तुप रोटी!' तसे आहे..."
"गणपत, तुला काय मी हे गर्भपात पैशासाठी करतोय असे वाटते? गणपत, मी सध्या जिथे आहे ना, तो एक चक्रव्यूह आहे. माझ्याही नकळत मी या चक्रव्यूहात शिरलो. आता इच्छा असूनही बाहेर पडता येत नाही, कुणी पडू देणार नाही..."
"साहेब, मी काय बोलणार? बरे,येतो मी. काळजी करू नका..." असे म्हणत बबन निघून गेला. तो जाताच डॉ. गुंडेंनी ते रजिस्टर त्या खास कप्प्यामध्ये ठेवून कुलूपबंद केले. पुन्हा एक अस्वस्थतेची जाणीव शरीरभर पसरली. त्यांना पुन्हा गणपत दवाखान्यात प्रथम आला होता तो प्रसंग आठवला....
गणपत बाहेर जाताच एका नर्सला आत बोलावून डॉ. गुंडे रखमाजवळच्या खुर्चीवर बसले. रखमाचा हात हातात घेऊन त्यांनी विचारले, "रखमा, एक सांग, तुझ्या मनात नसताना गणपत किंवा घरी कुणी हे काम करायला म्हणजे गर्भाची पिशवी काढून टाकायला तुला भाग पाडतय का? जबरदस्ती करतेय का?"
"न्हाई. न्हाई. तसं काही न्हाई. आम्ही दोघांनी मिळून लय इच्चार करुन ठरवलं हाय."
"बर. तसे नसेल तर चांगलेच आहे. एक सांग, तुमच्या कुटुंबात अजून कुणी कुणी गर्भाशयाची पिशवी काढून टाकली आहे?"
"अं.. अं.. माझी भावजयी आन् माझी दूरची बहीण..."
"तुझ्याच वयाच्या असतील ना? तू त्यांच्याशी बोललीस का? पिशवी काढून टाकल्यावर काय त्रास होतो हे तू विचारलेस का?"
"न्हाई बा. म्हणजे तशी भेटच व्हत न्हाई. म्हणजे आम्ही कोणत्या ना कोणत्या फडावर आसतो. त्या बी कामासाठी मुंबईला आसत्यात. पर येकदा भेटल्या व्हत्या, जास्ती काय बोलणं झालं न्हाई पर भावजय म्हणली की, जास्ती काय बी तरास व्हत न्हाई म्हणून."
"असे. बर, तू कधी मारोतीच्या मंदिरात गेली होतीस का?" डॉक्टरांनी रखमाला बोलतं करण्यासाठी विचारले.
"जायची की. माझ्या माहेरी मंदिराच्यासमोर झोपडीत मी ऱ्हायाचे. तव्हा दुपारी मंदिरात कुणीबी नसायचं मंग आम्ही दुपारी मंदिरात खेळायचो. एके दिशी भारीच गंमत घडली..."
"काय झालं ग?" रखमाला बोलतं करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय हे पाहून डॉक्टरांनी उत्साहाने विचारले.
"काय न्हाई जी मझा ल्हाना भाऊ एके दिशी मंदिरात मारोतीपुढे जाऊन उभा राहिला. मारोतीची मूरत लय मोठी हाय. त्याने मारोतीमहाराजांच्या बेंबीत बोट घातलं आणि जोरात ओरडला पण लगुलग हसतच बाहीर येऊन म्हन्ला की, काय गारेगार वाटतय..." रखमा सांगत असताना डॉक्टर स्मित हास्य करत नर्सकडे बघत मनाशीच म्हणाले, 'प्रयोग यशस्वी होत आहे तर..'
"पुढे काय झाले?" नर्सने विचारले.
"ते ऐकून दुसरा पोरगा बी आत गेला आन पैल्यांदा त्यानं बी बोंब मारली आन् मंग हसत पाठीमागे फिरला.."
"असे का झाले? तिथे असे काय व्हते की, बोट घातल्याबरोबर ओरडायचे आणि पाठीमागे फिरले की हसायचे?" डॉक्टरांनी विचारले.
"अव्हो, डागदर, तिथं बसला व्हता इच्चू! बोट घातलं की, त्यो डख मारायचा म्हणून ते ओरडायचे पर बाहीर सांगावं तर अपमान व्हईल म्हणून मंग हसायचे."
"रखमा, हेच तुझ्यासोबत होते आहे. तुझी भावजय, बहीण किंवा अजून कुणी तुला पिशवी काढून टाकली की काय त्रास होतो ते सांगतच न्हाई. मला सांग, तुला माहिती आहे का, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली की, आयुष्यभर तुला पाळी येत नाही ते."
"मग ती पाळीच तर येऊ देयाची न्हाई ना. पाळी येणार म्हणजे लेकरु व्हणारच की. मुळावर घाव घातला म्हंजी कोणतीबी कटकट ऱ्हात न्हाई. दुसरं कसं हाय बगा, पाळी आली की, पोट, कंबर, हातपाय, डोस्क समद लय लय दुखते आन मंग आसं दुखरं आंग घिऊनशानी काय बी काम व्हत न्हाई. कव्हा कव्हा म्हैन्यातून दोन दोन बाऱ्या पाळी येते. म्हंजी मंग आठ दिस कामावर पाणी पडते. आठ दिवस काम व्हत न्हाई. ऊस तोड कमी झाली की, मंग मुकारदम लै डाफरतो. कव्हा कव्हा रोजी बी काटतो. म्हणूनशानी ते कोन्त बी दुखणं ठिवायचच न्हाई."
"तुमच्या संघटना नाहीत का?" डॉक्टरांनी विचारले
"हाईत की पर आमचं ऐकते कोण? सम्दे लीड्र त्या मुकारदमाचे कानकोंडे. आमच्यासमुर मुकारदमाला थोड बोलत्यात निघून जात्यात. त्येंचं काय मुकारदमाकडून राईट हप्ता गेला की झालं सम्द! संघटनेकडं काय बोललं की मंग काय खर न्हाई. बाई न्हाई की माणूस न्हाई मुकारदम फोडून काढत्यो. बायकांच्या पदराला हात घालतो, इज्जतीशी खेळतो..."
"माय गॉड! हे सगळं खरं आहे?" नर्सने विचारले.
"मी कहाला खोटं बोलू? अव्हो, ऊसाच्या फडावर काम करणाऱ्या बायावर मुकारदम, कारखान्याचे लोक, गावातले लोक यांची लै बुरी नजर ऱ्हाते. येक बी बाय सुटत न्हाई. दोन साल झाले ह्येंच्यासंग ऊस तोडाय जाते. लै बाऱ्या अंगझटीला आलता पर म्या काय त्येची डाळ शिजू देली न्हाई."
"फडात तुझ्यासोबत काम करणाऱ्या बाया उठाव करत नाहीत का?"नर्सने विचारले.
"म्याडम, काय सांगाव तुमास्नी पैक्याफुडं काय बी नसते व्हो. मझ्यासारख्या धा-पाच बाया सोडल्या तर सम्द्या... जाऊ देत. म्हणूनशानी मला या सिझनची भीती वाटाय लागलीय की या वक्ती मी सोत्ताला न्हाई त्या लांडग्याच्या तावडीतून वाचवू शकणार. तुमास्नी हातपाय जोडून ईनंती करत्ये की, काय बी करा पण मला मोकळी करा. तुमची वाट्टलं ती फी म्या देईन."
"मुकरदम बदलून बघ ना..."नर्स बोलत असताना तिला मध्येच थांबवून रखमा म्हणाली,
"बायजी, कोठयबी, पळसाला पानं तिनच की. येक म्हंजे येका मुकरदमाची संगत सोडली तर दुसरा मुकारदम घेत न्हाई. घेतल तर मजुरी लयच कमी देत्यो. पण बायसाब, सम्दे मुकारदम आसे न्हाईत. लय चांगले बी मुकारदम हाईत पण त्ये अशा दुसऱ्या मुकारदमाकडून आलेल्या कामगारांना ठेवून घेत न्हाईत. हे मुकारदम बाळंतपणासाठी सुटी तर देतातच पण पैक्याची मदत बी करतात. जव्हा आपण पैल्यांदा कामावर जातो का न्हाई तव्हा आपल्याला कोठ ठाव असत्ये कोण चांगला, कोण वाईट त्ये. जो कुणी नोकरी देईल आपून ती पकडून ठेवतो. तव्हा आम्हास्नी हे ठाव नसते की, आम्ही येका ऊसाच्या फडात जात न्हाईत तर एका चक्रव्यूहात चाल्लो हाय. तिथनं बाहीर पडणं लै आवघड आसते."
"तुला मुलच होऊ द्यायचे नाही ना? मग पिशवी कशाला काढायची. हे बघ, हे असे करणे तुझ्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बाईची पाळी गेल्यावर काय त्रास होतो हे तुला माहिती आहे का? पिशवी पोटात जरी असली तरीही ती आपल्या शरीराचा एक भाग आहे. समजा काही कारणास्तव किंवा एखाद्या अपघातात तुझा पाय तुटला तर?"
"मंग तर झालं. सम्दं मुसळ केरात. सायब, मझे कामच बंद व्हईल की व्हो."
"आता कसं बोललीस? तुला जे वाटतय ना की, पिशवी काढून टाकली की, मग कोणताही आजार होत नाही. हा तुमचा खोटा समज आहे. आता जसे तू म्हणालीस की, पाय तुटला की सगळं मुसळ केरात जाईल तसेच या गर्भाशयाच्या पिशवीचे असते. कुणाचे वजन वाढते, कुणाचे वजन कमी होते. लठ्ठपणा येतो मग काम करायला अडचण येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कँसरसारखा आजार होण्याची शक्यता असते... "असे सांगत असताना डॉ. अजय गुंडे यांचा भ्रमणध्वनी वाजला आणि तो घेण्यासाठी ते जवळच्या खिडकीजवळ गेले...
००००