mayajaal - 13 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल - १३

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

मायाजाल - १३

मायाजाल-- १३
हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरताना इंद्रजीत विचार करत होता, “जर हर्षदने खरोखरच जीव दिला तर? त्याच्या आत्महत्येचं ओझं आयुष्यभर माझ्या मनावर राहील. अशावेळी प्रज्ञा बरोबर सहजीवनाचा आनंद मी खरोखर घेऊ शकेल का? त्या अतृप्त आत्म्याची छाया सतत आमच्या आजूबाजूला घोटाळत राहील. जरी त्याने आत्महत्येचं खूळ डोक्यातून काढून टाकलं; तरीही त्याची नजर सतत आमचा पडलाय करेल. त्याचं वैफल्यग्रस्त जीवन बघून आमच्या वैवाहिक जीवनातलं समाधान हरवून जाईल. काय करू म्हणजे या त्रांगड्यातून सुटका होईल? हे सगळं कळल्यापासून प्रज्ञाही माझ्यापासून लांब रहाण्याचा प्रयत्न करतेय! आम्ही दोघं एकत्र फिरायला बाहेर पडलो तरी आमच्यावर कोणाची तरी नजर आहे; असं वाटत रहातं. एकमेकांशी हसून बोलायचं; म्हणजे काही तरी अपराध करतोय असं वाटतं. उगाचंच असं वाटत रहातं, की हर्षदला दु:खाच्या दरीत लोटून आपण सुखाचा स्वर्ग गाठायचा प्रयत्न करतोय! सगळ्या आयुष्याची चव निघून गेली आहे. प्रज्ञा हल्ली एवढी तुटक वागते; की तिलाही भेटायचा कंटाळा येतो ! अतिविचारानं आमच्या प्रेमातली कोमलता नष्ट झालीय! दोघंही लग्नाआधीच पोक्त झालो आहोत. असं वाटतंय या सगळ्यातून कुठेतरी दूर निघून जावं." आजपर्यंत सुखसीन आयुष्य जगायची सवय असलेल्या इंद्रजीतला हा सगळा तणाव म्हणजे मानसिक छळ वाटायला लागला होता.
अत्यंत विमनस्क मनस्थितीत इंद्रजीत घरी आला. तो मनाने इतका खचून गेला होता; की या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी प्रज्ञालाही सोडून कुठेतरी दूर निघून जावं असं त्याला वाटत होतं. आणि बोला-फुलाची गाठ पडावी; तसं एक पत्र घरी त्याची वाट पाहत होतं. इंद्रजीतने काही दिवसांपूर्वी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये सर्जरीच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. युनिव्हर्सिटीने त्याचा अर्ज मान्य करून त्याला पुढच्या महिन्यात तिकडे रुजू व्हायला सांगितलं होतं. त्याच्या पुढच्या करियरसाठी हा महत्त्वाचा टप्पा होता; हे खरंच होतं----- पण हर्षदने निर्माण केलेल्या कोंडीला कंटाळलेल्या इंद्रजीतने, जरी कोर्स सुरू व्हायला अजून एक महिना होता; तरीही लगेच तिकडे निघून जायचं; असं ठरवून टाकलं. अर्ज करताना त्याने ठरवलं होतं की तिकडे गेल्यावर योग्यवेळी प्रज्ञालाही तिकडे बोलून घ्यायचं. पण आता सगळं चित्र बदलून गेलं होतं. हर्षदचं प्रज्ञावर प्रेम आहे; आणि म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ; हे कळल्यावर सगळ्या परिभाषाच बदलून गेल्या होत्या.
ती दोघं जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी हर्षदची पापी दृष्टी त्यांच्यावर रहाणारच होती. हर्षदने उभ्या केलेल्या विचित्र परिस्थितीतून बाहेर पडण्याचा हा चांगला मार्ग दैवाने दाखवला आहे; असं आता इंद्रजीतला वाटू लागलं. इथले सगळे पाश तोडून, लगेच तिकडे निघून जाण्याचा, आणि नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला. प्रज्ञाला कायमचं सोडून जाणं तितकंसं सोपं नव्हतं; ती इंद्रजीतवर मनापासून प्रेम करत होती. तिच्यासारख्या मनस्वी स्वभावाच्या मुलीसाठी हो फार मोठा धक्का असेल; हे नक्की होतं, पण आयुष्यभर मानसिक ताणाखाली रहाण्यापेक्षा दोघांनी आताच वेगळं होणं योग्य आहे अशी इंद्रजीतची पक्की धारणा झाली होती.
'प्रज्ञाला कसं समजावायचं? ' हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. पण हर्षद आणि त्याच्या कुटुंबियांविषयी तिच्या मनात माया आहे; त्यामुळे अशी शक्यता आहे, की कदाचित् ती सुद्धा माझ्यासारखाच विचार करत असेल--- पण बोलून दाखवत नसेल. --- कदाचित् हर्षदला वाईट वाटू नये; म्हणून माझ्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करत असेल! काहीही असो! ती खंबीर आहे! हर्षदला समजावून घेते--- तसंच मलाही समजावून घेईल!
इंद्रजीत आता त्याच्या सोईनुसार प्रज्ञाच्या वागण्याचा उलटा-सुलटा अर्थ काढत होता! आणि स्वतःला सोईस्कर निर्णय घेत होता.
*********
दुसऱ्या दिवशी इंद्रजीत प्रज्ञाला शेवटचं भेटायला गेला. प्रज्ञाला अभ्यासासाठी सुट्टी मिळाली आहे; ती घरीच असेल याची त्याला कल्पना होती. पण ती घरी एकटीच आहे; दुसरं कोणी नाही; हे बघून दैव आपल्या बरोबर आहे; याची त्याला खात्री पटली. नीनाताई घरी असत्या, तर तो मोकळेपणाने बोलू शकला नसता. त्याने घेतलेला निर्णय ऐकून नीनाताईंनी त्याला चांगलाच फैलावर घेतला असता! 'लग्न म्हणजे खेळ नाही; की पाहिजे तेव्हा जमवलं, आणि पाहिजे तेव्हा मोडलं!' या आणि अशा अनेक गोष्टी त्याला ऐकून घ्याव्या लागल्या असत्या. खूप आरडा-ओरडा झाला असता; पण त्याच्या नशीबाने प्रज्ञा एकटीच घरी होती. अभ्यास करत बसली होती.
त्याला बघून प्रज्ञाने हसत हातातलं पुस्तक खाली ठेवलं, आणि विचारलं,
"अरे जीत! तू अचानक् कसा आलास? तुझी तब्येत ठीक आहे नं? ताप उतरला तुझा? एवढा अशक्तपणा असताना तू यायला नको होतंस? मला फोन केला असतास; तर मी तुला भेटायला आले असते! बस! पाणी आणते! " ती लगबगीने उठत म्हणाली.
" मी आलोय हे तुला आवडलेलं दिसत नाही! मी तुझ्या अभ्यासात व्यत्यय नाही न आणला?" जीतच्या बोलण्यात प्रज्ञाला कडवटपणा जाणवला. ' हा कधी नव्हे तो तिरकस बोलतोय! कदाचित् गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या, त्यामुळे चिडखोर झालाय' असा विचार तिच्या मनात येऊन गेला.
"परीक्षा जवळ आलीय; म्हणून अभ्यास करत होते! तुझी तब्येत बरी नव्हती; आणि उन्हातून आलास; म्हणून काळजी वाटली; इतकंच! तुला बघून मला आनंद झाला नाही; असं कसं होईल? " त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत प्रज्ञा म्हणाली. सरळ मनाच्या प्रज्ञाला आपल्या मागे काय घडलंय; याची जराही कल्पना नव्हती.
"तुझ्यासाठी ज्यूस आणते! जरा बस!" किचनकडे जात ती त्याला म्हणाली.
"ज्यूस वगैरे राहू दे! तू इथेच थांब! तुला काही महत्वाचं सांगायला मी आलोय!" इंद्रजीतचा गंभीर चेहरा बघून प्रज्ञा बुचकळ्यात पडली होती. त्याला इतका सिरियस होउन बोलताना तिने कधी पाहिला नव्हता. आज त्याचा मूड काही वेगळाच आहे हे तिला परत जाणवलं.
इंद्रजीत पुढे बोलू लागला,
" मला लंडन युनिव्हर्सिटीने लवकरात लवकर रिपोर्ट करायला सांगितलं आहे. अर्ज करताना मी तुला सांगितलं होतं ना? त्या सर्जरीच्या कोर्ससाठी माझी निवड झालीय!--- बहुधा उद्याच निघतोय मी! तुझा निरोप घ्यायला आलोय!" तो प्रज्ञाची नजर चुकवत म्हणाला. प्रज्ञा भांबावून गेली,
" परत कधी येणार आहेस? " तिने विचारलं
"एकदा सेशनला सुरुवात झाली की परत कधी यायला मिळेल; हे सांगता येत नाही. आणि मी यापुढे कायम तिकडेच सेटल व्हायचं ठरवलंय!" तो जणू शेवटचा निरोप घेत होता.
"ते तर आपलं पूर्वीपासूनच ठरलंय. पण आपण दोघांनीही जायचं; असं ठरवलं होतं आपण! परत यायला जमणार नाही; असं का म्हणतोयस तू? तुझ्या आईने तर माझ्या परिक्षेनंतर लवकरात लवकर लग्नाची तारीख काढायला सांगितली आहे. आई बाबांनी तर लग्नाच्या तयारीला सुरुवातही केलीय; आणि तू म्हणतोयस की तू येऊ शकणार नाहीस? " प्रज्ञाला काय बोलावं; सुचत नव्हतं. हा नेहमीचा जीत नव्हता ; वेगळाच वागत होता--- वेगळाच बोलत होता.
"मला इथे थांबता येणार नाही! आणि मी तर लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला आहे. मी माझ्या करिअरला अग्रक्रम देणार आहे. लग्नाचं वगैरे महत्व मला फार वाटत नाही." प्रज्ञाकडे पाहायचे धाडस इंद्रजीतला होत नव्हतं. तो तिच्या नजरेला नजर देत नव्हता.
" पण आपलं ठरलं होतं; तू तिकडे गेल्यावर मलाही नेणार होतास! तू एवढा कोरडेपणाने का बोलतोयस? काय झालंय? हर्षदच्या गुंडांनी तुला परत धमकी दिली का? पण हा त्रास नको म्हणूनच परदेशात स्थाईक व्हायच; असं आपण ठरवला होतं! आणि आता तू म्हणतोयस, की तू तिकडे एकटाच रहाणार? कालपर्यंतचं तुझं बोलणं आणि आताचा निर्णय, यांत जमीन अस्मानाचा फरक आहे! मला नीट काही सांगशील का? " प्रज्ञाला काहीच कळेनासं झालं होतं. तिचं डोकं बधीर झालं होतं! डोळे पाण्याने भरले होते. जीत नीट काही सांगतही नव्हता. आज ती घरी एकटी होती. तिच्या तर्फे त्याला खडसावून विचारणारं घरी कोणी नव्हतं. एका क्षणात जीतने तिला वैफल्याच्या घोर अंधकारात ढकलून दिलं होतं.
" आता मी तुला फक्त उद्या मी निघालोय हे सांगण्यासाठी आलो आहे. भविष्याचा काहीही विचार मी केलेला नाही. नशीबाने सर्जरीच्या अॅडव्हान्स कोर्स साठी माझी निवड झाली आहे! आणि मी संधीचा फायदा घेणार आहे! खूप मोठा आॅर्थोपेडिक सर्जन होणं, हे माझं स्वप्न आहे! लग्न --- संसार--- अशा फालतू गोष्टींसाठी मी आलेली संधी जाऊ देणार नाही! तुलाही मी आज बंधनातून मोकळं करतोय! " इंद्रजीत अलिप्तपणे बोलत होता. पण त्याचा थरथरणारा आवाज मनातली घालमेल उघड करत होता. त्याला आता फार वेळ प्रज्ञासमोर थांबता येणं शक्य नव्हतं; तिला शेवटचा निरोप देताना त्याला तिच्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवत होते. नकळत डोळ्यात पाणी येत होतं. तिच्याकडे न पहाता खिडकीतून बाहेर बघत तो म्हणाला,
" मला खूप काम आहेत. निघायची तयारी करायची आहे! जास्त वेळ थांबायला मला वेळ नाही; मी आता निघतो. परत एकदा सांगतो; माझी वाट बघू नकोस!" आणि त्याच्याकडे आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी पहाणा-या प्रज्ञाकडे न पाहताच तो तिथून बाहेर पडला.
********* Contd--- part 14