Mayajaal --1 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल -- १

Featured Books
Categories
Share

मायाजाल -- १


मायाजाल -- १
आकाश काळ्या ढगांनी आच्छादून गेलं होतं. दिवस असूनही रात्र असल्याप्रमाणे अंधार झाला होता. अधूनमधून विजा चमकत होत्या. प्रज्ञा गेला अर्धा तास बस ची वाट पाहत परेलच्या बस - स्टॉपवर उभी होती: पण बसचा पत्ता नव्हता. नेहमी इथे बससाठी खूप गर्दी असायची; पण आज मात्र तिच्याशिवाय कोणीही दिसत नव्हतं. तिला आता भीती वाटू लागली होती. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे रस्ता पाण्याने भरून गेला होता: आणि आता हळूहळू पाणी फुटपाथवर येऊ लागलं होतं. वाहनेही रस्त्यात तुरळक दिसत होती; आणि ती सुद्धा खाजगी वाहने होती. बस प्रमाणेच टॅक्सीसुद्धा रस्त्यावरून अदृष्य झाल्या होत्या. प्रज्ञाची चिंता वाढत होती.. आजूबाजूला ओळखीचे किंवा नात्यातील कोणी रहात नव्हते आणि घरी कसं जायचं; हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. स्टेशन तिथून खूप दूर होतं; त्यामुळे चालत जाण्याचा प्रश्नच नव्हता. प्रज्ञा इथल्या मेडिकल काॅलेजमध्ये शिकत होती. आज सकाळपासूनच वादळी वारा सुटला होता, मुसळधार पावसाची चिन्हं दिसत होती; काॅलेज मॅनेजमेंटने लेक्चर कॅन्सल करून विद्यार्थ्यांना लवकर सोडलं होतं. पण प्रज्ञा बस - स्टाॅपवर पोहोचण्यापूर्वीच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.
काय करावं? प्रज्ञाला काहीच सुचत नव्हतं.---- एक टॅक्सी येताना दिसली आणि तिच्या मनात आशा पल्लवित झाली. तिने हात करून टॅक्सी थांबवली," अंधेरीला जायचे आहे. येणार का?" तिने अर्जवी स्वरात विचारलं.
"नाही जाऊ शकत! तिकडे जायचे रस्ते पाण्याने भरलेयत!" तो कोरडेपणाने म्हणाला आणि पुढे निघून गेला. प्रज्ञाचे डोळे पाण्याने भरून आले. " परत कॉलेजला जाऊ का? पण आता रस्ते पाण्याने तुडुंब भरलेयत! काॅलेजपर्यंत जायचं कसं?" तिच्या मनात उलटसुलट विचारांचं काहूर माजलं होतं..
एक गाडी संथपणे येऊन प्रज्ञा समोर थांबली. प्रज्ञा चमकली. बस स्टॉप वर कोणी नव्हतं; अनेक वेळा वाचलेले आणि ऐकलेले अपहरणाचे किस्से तिच्या डोळ्यासमोरून सरकू लागले. छाती धडधडू लागली. कारची काच हळू खाली आली आत इंद्रजीतला पाहून ती थोडी सावरली.
इंद्रजीत तिच्या कॉलेजचा स्टुडंट होता. तिला सीनियर होता; त्यामुळे त्याच्याशी विशेष ओळख नव्हती. पण त्याला अनेक वेळा पाहिलं होतं. त्याच्याविषयी मैत्रिणींकडून बरंच काही ऐकलं होतं. काॅलेजमधल्या मुली त्याला स्काॅलर म्हणूनच ओळखत असत. त्याच्याशी ओळख करून घ्यायला उत्सुक असत. हुशार, स्मार्ट आणि स्टायलिश इंद्रजीतच्या भोवती नेहमीच मित्र - मैत्रिणींचं कोंडाळं असे. पण मध्यमवर्गीय घरातल्या--आणि अभ्यास हेच मुख्य ध्येय घेऊन मेडिकलला प्रवेश घेतलेल्या प्रज्ञाला या इतर गोष्टींमध्ये विशेष रस नव्हता. वर्गातल्या एक- दोन मैत्रिणी सोडल्या; तर ती फारशी कोणात मिसळत नसे; त्यामुळे तो तिला ओळखतो; ही तिच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती.
"पाऊस खूप आहे! गाडीत बस! तुला घरी सोडतो." तो तिला म्हणाला.
प्रज्ञाला थोडा रागच आला;--- " ओळख - देख नाही; आणि हा हुकूम काय सोडतोय? " पण वेळ अशी होती; की त्याच्या गाडीत निमूटपणे बसण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती गाडीत बसली; पण तिच्या मनात संकोच होता. ती इंद्रजीतला म्हणाली,
"तुला काही अडचण होणार नाही ना? मी अंधेरीला रहाते! परेलपासून बरंच दूर आहे. त्यापेक्षा असं कर, मला रेल्वे स्टेशनला सोड तिथून मी घरी जाईन. ट्रेन नक्कीच चालू असतील."
तो हसला आणि म्हणाला,
" काळजी करू नकोस मी सुद्धा अंधेरीला-- तुझ्यापासून अगदी जवळ राहतो. अगदी पाच मिनिटांवर! आणि मी आता घरीच चाललोय. तुला तुझ्या घरी सोडायला मला काहीही प्राॅब्लेम नाही" त्याने प्रज्ञाला आणखी एक धक्का दिला होता.
" म्हणजे मी कुठे राहते हे तुला माहित आहे?" तिने आश्चर्याने विचारलं.
” हो! तुमच्या 'शारदा' बिल्डिंगपासून जवळच आमचा बंगला आहे. ' वेदांत'--- आमच्या बंगल्याचं नाव! माझा एक मित्र हर्षद तुझ्या कॉलनीत राहतो. शाळेपासूनचा मित्र आहे . मला तो अगदी मोठ्या भावासारखा आहे ---मला भावंड नाही; त्यामुळे ब-याच गोष्टी मी त्याच्याशी शेअर करतो. त्याचे आई -बाबा--- तुम्ही सगळे त्यांना माई आणि तात्या म्हणता---दोघंही माझ्यावर खूप माया करतात! तो घरी नसला तरी माईंना भेटायलाही त्याच्याकडे मी कधी ना कधी येतो! बरेच दिवस मी गेलो नाही; की त्या हर्षदबरोबर निरोप पाठवतात! हर्षदकडे येता - जातांना आणि बाहेरसुद्धा तुला मी ब-याच वेळा पाहिलं आहे.“ इंद्रजीत वरकरणी अगदी सहजपणे म्हणाला.
इंद्रजीत अनेक दिवस प्रज्ञाशी ओळख करून घ्यायची संधी शोधत होता; हे तिला कसं सांगणार होता? अनेक वेळा तो हर्षदकडे केवळ ती दिसावी; म्हणून तिची काॅलेजसाठी निघायची वेळ साधून येत असे. ती पहिल्या दिवशी मेडिकल काॅलेजला दिसली तेव्हा तो खुश झाला होता, की आता सहज ओळख होईल; पण प्रज्ञाच्या अलिप्त स्वभावामुळे त्याला ते अजून जमलं नव्हतं. आज अचानक ती बस-स्टाॅपवर दिसली; आणि त्याला हवी असलेली संधी मिळाली!
“ओह! हर्षद माझाही चांगला मित्र आहे! तुमचा ' वेदांत' बंगलासुद्धा मी दुरून पाहिला आहे. पण तुला मात्र मी कधी पाहिलं नाही." प्रज्ञा हसत म्हणाली. तो हर्षदचा मित्र आहे, हे कळल्यावर तिचा संकोच थोडा दूर झाला होता.
" तुला मी कसा दिसणार? तू नजर आजूबाजूला वळवलीस; तर तुला कोणी दिसेल नं! " तो हसत म्हणाला. प्रज्ञाला वाटलं, की इंद्रजीत तिच्या मनावरचा अनोळखीपणाचा ताण कमी करण्यासाठी मस्करी करतोय!
हर्षदचा विषय निघल्यावर इंद्रजीत बोलतच राहिला,
"आम्ही शाळेपासून चे मित्र आहोत. आम्ही एका वर्गात नव्हतो. तो माझ्या पुढच्या वर्षाला होता. पण एकदा मी शाळेत स्पोर्टस् च्या तासाला मी पडलो; खूप लागलं होतं. तो मला सांभाळून माझ्या घरी घेऊन गेला. त्या दिवसापासून आमची मैत्री झाली. तो बरेच दिवस आला नाही, की माझ्या आईलाही चुकल्यासारखं होतं; पण हल्ली भेटी कमी होतात! ग्रॅज्युएशननंतर सध्या तो एम. बी. ए. करतोय! त्याचं काॅलेज लांब नवी मुंबईला आहे; त्यामुळे हल्ली आमचं एकमेकांच्या घरी जाणं खूप कमी झालंय.
तो हर्षदचे आणि त्याचे शाळेतले किस्से सांगू लागला. त्याच्या गप्पांमध्ये प्रज्ञा एवढी रंगून गेली; की घर कधी आलं ते तिला कळलं सुद्धा नाही.
गाडी थांबली म्हणून प्रज्ञाने इंद्रजीतकडे कडे पाहिलं.
"तुझं घर आलं!” तो हसत म्हणाला.
प्रज्ञा गाडीतून खाली उतरली.
" उद्या भेटू कॉलेजमध्ये." तो तिला निरोप देत म्हणाला. पण त्याच्या स्वरातली नाराजी लपत नव्हती. अनेक दिवसांनी तिच्याशी ओळख करून घ्यायची- तिच्याशी बोलायचं - हे त्याचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. पण रस्ता लवकर संपला;अजून थोडा वेळ तिचा सहवास मिळायला हवा होता असं त्याला वाटत होतं.
“आपली प्रथमच ओळख झाली आहे, घरी चल! तुला छान कॉफी बनवून देते!” प्रज्ञा म्हणाली. ऐन वेळेला त्याने केलेल्या मदतीची अंशतः परतफेड करावी; तसेच, इतक्या जवळ रहाणारा इंद्रजीत आपल्या काॅलेजमध्ये आहे; त्याची आईबरोबर ओळख करून द्यायला हवी; असं तिला मनापासून वाटत होतं.
“हा पाऊस--हा गारवा-- आणि छान गरमा- गरम कॉफी- - मला मोह पडतोय! पण आता नको! नंतर कधीतरी येईन!” इंद्रजीत संकोचाने--- मनाविरूध्द म्हणाला.
"फार वेळ नाही लागणार! अगदी थोड्या वेळसाठी चल! प्लीज ---
इंद्रजीत शेवटी प्रज्ञाचा आग्रह तो मोडू शकला नाही.आणि तिच्या घरी गेला. प्रज्ञाने सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. आज बाबाही लवकर घरी आले होते. काॅलेजच्या पहिल्या वर्षाला शिकणारा तिचा धाकटा भाऊ निमेशसुद्धा होता- प्रज्ञाच्या आई-बाबांनी. अनिरूद्ध आणि नीनाताईनी- त्याचे मनापासून आभार मानले. तो निघाला तेव्हा आई मनापासून म्हणाली,
" तुझ्यामुळे आज माझी प्रज्ञा सुखरूप घरी पोहोचली. बाहेरचं तुफान बघून आम्हाला खूप काळजी लागून राहिली होती. तुझे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. जवळच राहतोस ना! येत जा अधून मधून! "
" प्रज्ञाला अभ्यासात गाईड करणारे घरी कोणी नाही! तू सीनियर आहेस, तिला मार्गदर्शन करत जा. तिला काही अडलं तर सांग!" अनिरुद्ध म्हणाले. इंद्रजीतच्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रभावित झाले होते. ते दुरून त्याच्या वडिलांना ओळखत होते त्या विभागात इंद्रजीतचं कुटुंब घरंदाज आणि श्रीमंत असूनही आणि माणुसकी जपणारं; म्हणून ओळखलं जात होतं. . इंद्रजीतशी बोलताना; तो सुस्वभावी आणि हुशार आहे हे त्यांनी पारखलं होतं. अभ्यासात प्रज्ञाला मार्गदर्शन करायला कोणी नाही; ही गोष्ट अनेक दिवसांंपासून त्यांना खटकत होती. इंद्रजीतशी बोलल्यावर ही अडचण आता दूर होणार; ही खात्री त्यांना पटली होती.
" हो नक्कीच करेन! " इंद्रजीतने आश्वासन दिले. तिथून निघताना तो मनातून खुश होता ; आता तो प्रज्ञाकडे उघडपणे येऊ शकत होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या बाबांनी परवानगी दिली होती. त्याची अनेक दिवसांची इच्छा आज अचानक् पूर्ण झाली होती.
********** cotd.---- part-- 2