Shetkari majha bhola - 11 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | शेतकरी माझा भोळा - 11

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

शेतकरी माझा भोळा - 11

११) शेतकरी माझा भोळा!
कोंडबा मेला, सखीची विटंबना झाली. तिला कलाकेंदराच्या मालकान धंध्याला लावलं तव्हा खरं तर गणपत आन यस्वदावर दुक्काच आबाळ कोसळलं, त्यातच त्येंचा बी अंत व्हवावं पर ज्यांच्या भाळी जित्तेपणी मरण जगायचं सटवीन लिवलेल ऱ्हाते. त्येंची अशी सुकासुखी सुटका व्हत न्हाई. कोंडबानं सोत्ताचं दुक गिळलं पर यस्वदीला संबाळायला लै दिस लागले. सोयरे दोन-चार रोज ऱ्हाऊन निघून गेले. पाच-धा रोज येड्यावानी वागणारी यस्वदा आपुआप ताळ्यावर आली आन् गणपतला त्या दुकात तेव्हढच सुक गावलं. पोटाच्या भुकेनं डोकं वर काढताच दोग बी कामाला जावून पोटापुर्त कमावू लागले, आसवासंग कोर-दिडकोर रोटीबी घशाखाली ढकलू लागले.
आस्ते-आस्ते सम्द ठीक झालं. बैंकवाल्यानं दोन चार चकरा मारल्या. आबासायेबानी जीबीच्या बाबद कानावर हात ठिवले. आमदारकीच्या निवडणूकीत आबासायेब-तात्यासायेबांनी येकमेकाला आबाळ दाकवलं. तात्यासायेबानी आबासायेबाची मत खायासाठी उभं केलेलं बुजगावणं निवडणुक जितलं, लोण्याच्या गोळ्यायसाठी भांडणाऱ्या बोक्यायचा गोळा येका उंद्रानं पळवल्यावानी झालं. दोग बी निकालाच्या बाद दोन-तीन म्हैयने गावात आले न्हाईत. आल्यावर बी आपून भलं आन् आपलं काम भलंपरमाने गावात ऱ्हावू लागले पर सुंब जळाला तरी बी पीळ जात न्हाई म्हन्त्यात तसं त्येनी पुना आस्ते आस्ते पाय पसराय सुरु केली...
गणपतच्या सासुरवाडीला कोन्हाचं तरी लगीन व्हतं. दोगं बी यस्वदाच्या म्हायेरी आले व्हते. सौंसार आन् येव्हार का कोन्हासाठी चूकला हाय? सोत्ताचं सम्द दुक गुंडाळून समाजात वावरावं लागत्ये. कारेकरमात जाया लागते. सोयऱ्याच्या घरचं लगीन लागलं. तसं यस्वदाच्या भावानं गणपतला ईच्चारलं,
"गणपत दाजी, आता फुडं काय कराच ठरवलं हाये?"
"दाजी, आत्ता आणिक काय ठरवाचं हाय. सम्द्या सपनाची राकरांगुळी झाली. त्येचीच राक रोज कपाळी लावतो आन दोगांचे पोट भराचं फातो. झालं."
"दाजी, आसा धीर सोडून कसं चालावं? त्या जिमीनीचं काय केलं?"
"काय करणार? जीबीचे हाफ्ते थकले व्हते. क्यानालच्या वरल्या आंगाची जामीन ईकून बैंकेचे हाफ्ते फेडले. जळक्या ऊसाचा पैका मिळालता त्यातून सम्द रिन फेडलं. दाजी, दुकात सुक येवडच की उचललेला सम्दा पैका फिटला. आज मितीला कोन्हाच येक पैका बी देणं न्हाई. बास, आता म्हेनत मंजुरी करूनशानी दोगांच प्वाट भराचं..."
"आन क्यानालच्या खालच्या अंगाची जामीन?"
"ती हाय की."
"दाजी, येक काम कामून करत नाही?"
"न्हाई...न्हाई.... दाजी, आत्ता वावराचं काय बी..."
"अव्हो, मझं ऐका तर खर!"
"दादा काय झाल?" यस्वदानं तेथं येत इच्चारलं.
"यशोदे, दाजीला म्हण्तो की, क्यानालच्या वावरात औंदा केळी लावा."
"नग दादा, नग. आता वावर, क्यानाल, पाणी, ऊस, केळी कश्याच नाव नग. आता पैका मिळवून कराचं तरी काय? आत्ता कोण्त सपान बी फायाचं न्हाई."
"यस्वदे, संकट कोणाच्या जिंदगानी येत न्हाईत? संकटापासून दूर पळायचा परयत्न केला म्हंजी का सुटका व्हती? न्हाई व्हत. शरीराचं येखांद आंग सडलं तर कोन्ही पुर शरीर तोडते व्हय? तेव्हढं आंग काढून टाकलं की काम भागतं का न्हाई? आजूक का तुमचं वई गेलं हाय व्हय? आणिक पाणी बी वावरात हाय, पाईपलैन भी हाय. मोटार हाय. न्हाई ती केळीची पिल्लं. ती मह्याकडं हाईत. हजार बारासे घिवून जावा. ऱ्हायलेली जिंदगानी डोळ्याफुडं ठेवून काम करा. उद्या हातपाय गळाल्यावर तुमच्यानं कस्ट व्हणार हायेत का? हातापायामंदी जोर हाय तव्हरच कस्ट व्हत्याल पर म्हातारपणी त्या जिमिनीचाच आदार हाय न्हवं?" दाजी बोलत असतांना आजूक दोन-चार सोयरे तेथं जमले. समद्यायचं म्हणणं त्येच पडलं. आखरीला लगीन लावून येताना गणपत आन् यस्वदा केळीचे पिल्ल घिवूनच सीतापूरात आले. लगुलग पिल्ल वावरात लावली. क्यानालला पाणी बी व्हतं. पिल्लायला पाणी देत दोगं नया ऊबारीनं कामाला लागले....
तिकड ऊसाचा कारखाना जोरावर व्हता. सरकारनं बोरड् बरखास्त केल आन् तात्यासायेबाला चेरमनकी बहाल केली. कामगारायचे थकलेले पैयसे देले. तात्यासायेबानं बी कारखान्याला लुटाय सुरु केलं पर त्येंनी कामगारायला आन् कास्तकारायला खुस कराचं धोरण ठेवले. त्यापायी कारखान्याच्या पाईपातून धूर निंघत व्हता. चेअरमन आन् डिरेक्टरायसंग कारखान्याचे अधिकारी बी कारखान्याला लुटत व्हते. धा रुपैयाची वस्तु दोनसे रुपैयाला दावून सोत्ताची भाकरी भाजून घेत
व्हते. परत्येक अधिकाऱ्यानं पोरीचं लगीन, बायकोची बेमारी, पोराचं शिक्षण, घर बांदाय कर्ज आसे एक ना कैक कारण दावून दोन-दोन, तीन-तीन लाख रुपैचं कर्ज उचलल व्हत. त्यामुळ त्यो कारखाना खऱ्या अर्थानं सहकारी कारखाना झाला व्हता. डिरेक्टर, अधिकारी आणि कामगार फुडारी येकमेकांना साहाय्य करुन सुपंथ धरीत व्हते. कारखान्याचा कारबार 'आवो चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा' आसा चालला व्हता.
भरीस भर सीतापूर गरामपंचातीची निवडणूक लागली आन् सीतापुरातलं वारं बदललं. आबासायेबान आन् तात्यासायेबानं पैनाल अुबे केले. तात्यासायेबाला धूळ चारायची म्हंजी त्येची मत खाली गेली फायजेत म्हून आबासायेबानं रावसायेबालं येक पॅनाल ऊबा कराय लावला.
"आरं बाबा खरे पॅनल दोनच..."
"पर तिसरं बी...."
"आरं तिसर पॅनल म्हंजी ठेवलेल्या बाईवानी ! बायकू ह्येंची पर पोरगं मातर शेजाऱ्याचं!"
"आरं बाबा, हे ठेवलेल्या बाईचं पोरगच डोईजड व्हते. खरे वारस बाजुलाच ऱ्हातात आन् रखेलीचच पोरगं समदी ईस्टेट हाडप करते."
"आता तीन पैनल झालेच हायेत तर कोण यील बरं निवडून..."
"कोणी बी आलं तं काय व्हणार? आपणालं काय मिळणार का?"
"आरं बाबा, जे काय मिळवायचं आसल त्ये आत्ताच मिळवा. निवडणुका व्हयाच्या पैले हात धुवून घ्या. दारु, कोंबड्या, बकऱ्या, आन् पैयसा बी..."
"आरं तू सांगलेलं सम्दं आबासाब आन् तात्याकडून ऊकळाचं आन् बाया कलाकेंदरात फोकट..."
"म्हंजी?"
"आरं बाबा, रावसायेबानं ऊब्या केलेल्या पैनलचा परमुख कोण हाय त्ये ठाव हाय?"
"कोण हाय?"
"कलाकेंद्राचा मालक हाय !"
"आर्रार! काय येळ आली हाय. आता गावचा कार्भार कलाकेंद्रातून... तू खरं सांगतूस ना?"
"खर त्येच सांगतो. तिसऱ्या पॅनालमंदी सोत्ता मालक, कलाकेंदरातल्या दोन बाया, दोन गडी, झालच तं ईलास..."
"म्हंजे त्यो दलाल?"
"व्हय त्योच. त्येच्यासंग दोन गुंड बी हायेत!"
"आरं वा रं व! काय पण प्यानल हाय..."
"म्या सांगतू. ह्यो रंडी प्यानलच जिंकनार!"
"न्हाई. ह्ये व्हणार न्हाई. होवू द्यायचं न्हाई."
"ह्येच व्हणार हाय. लावतू का शेरत?"
"तैयार हाय. बोल किती रुप्याची लावतूस?"
"रुपैयाचं सोड. त्यो तर त्या कलाकेंद्रातल्या बाया बी कमावत्यात. जो शेर्त हारलं. त्येन आठ दिसाचा कलाकेंदराचा खर्च केला फायजेत मंजूर?"
"ते जावू द्या. पर त्या बायाचं नाव निवडणुकीच्या यादीमंधी हाय का? नाव आसल तरच ऊबा ऱ्हाता येत्ये."
"खर हाय. आर बाबा, त्येंची समद्यायची नावं हाईत."
"च्या मायला ! त्येंची नाव कोण टाकली?"
"दुसर कोण? त्यो आपला मास्तर..."
"च्या मारी! स्साला हायेच रंडीबाज! दिसातुन येक तरी चक्कर घालतोच त्या केंदरात! रोज जायाचा त्येचा नेम न्हाई चुकणार."
गावात निवडणुकीच्या वाऱ्यानं जोर धरला. धा-धा साल गावाचं त्वांड न फाणाऱ्या, कोन्च्या तरी निमित्त गावाकडे चक्कर टाकणारे मातर मतदार यादीमंदी नाव असलेल्या, शेहरात स्थाईक झालेल्या लोकायला भेटायचा सप्पाटा दोन्ही प्यालाननं लावला. दोन्ही पॅनालचे लोक घरुघर चकरा मारु लागले पर मतदार मातर सोत्ताहून तिसऱ्या पॅनलकडं रांगा लावू लागले.
आबासायेबानं शेहरात ऱ्हाणाऱ्या दोनी पोरायला गावात आणलं. शेहरात गेलं तर कवाच वळखी न देणारे ही पोऱ्हं गावात आल्याबरुबर आपल्या वरगात सिकलेल्या पोरायच्या वळखी काढून त्येच्यासंग भाकरी खावू लागले. अन् आबासायेबाच्या पॅनलला मतदान करा आसा आग्रेव धरु लागले. दारु आन् बकरे येंची तर गिणतीच न्हवती. मतदार मातर 'सिझन' वळखून हात वल्ले करुन घिवू लागले.....
तात्यासायेब का कमी व्हते. त्येंनी बी शेहरात डागदरी करणाऱ्या पोरीला गावात बलावून तिला सितापूरात दवाकाना थाटाय लावला. पोरगी बी लै रुपवान व्हती. गोरी-गोरीपान ! व्हट सदानकदा रंगविलेले. भिवया बी कशा गंद लावल्यावनी. गालावर बी काय तरी लावायची त्यामुळे गाल बी लाल दिसायचे. झांपर बी बिन बाह्याचे ! डागदर गावात आली आन् गावात रोगराई पसरली. डोक्स, प्वाट, पाठ, कंबार, छाती, गळा, खोकला, आंगदुखी आशा कईक बेमाऱ्या येकदम सुरु झाल्या.
काही लोचट आन् पांचट दुखणकऱ्याच्या लघीत बी जळजळ व्होऊ लागली.
मतदार मातर दारू, कोंबड्यावर ताव मारुन दिसभर दवाकान्यात बसाचे आन् राती तिस-या पॅनलची वाट धराचे. परचारानं रंग आन् जोर पकडला व्हता. राजकारण्यावानी मतदार बी रंगेल आन् रग्गेल झालते. तिन्ही पॅनलला तिसऱ्या आसमान लूटत व्हते मातर सोत्ताच्या मताचा झ्याट पत्त्या लागू देत न्हवते.
न्हाई म्हणाय गणपतवानी धा-पाच घरं मातर या दुनियेतून बाहीर व्हते. गणपतीची केळी दिसान दिस वाढत व्हती. सोसायटीचं रिन घिवूनशानी त्येनं केळीला खत बी देलं. पाण्याच्या पाळ्या बी येळवर व्हयाच्या. गणपतच्या केळी डोस्क्याच्या वर गेलत्या. झाडाला लागलेल्या घडावर नदर ठरत न्हवती.
"यस्वदे, दुसऱ्यायच्या केळी चालल्यात बी."
"अव्हो, त्या आबकीन लावल्या हाईत."
"सा म्हैन्यात आपल्या केळी बी यिणारच हाईत म्हणा. औंदा भाव बी चांगला हाय."
"कित्तीच्या व्हतील व्हो..."
“यस्वदे, ह्योच भाव व्हायला ना तं दोन-आडीच लोक कला मरण न्हाई बग."
"आडीच लाक? खरच दादाचं लै उपकार झालं बगा. त्येच्या त्वांडन देवच बोलला बगा. न्हाई तं आपून..."
"जलमभर ह्यो ईच्चार करत नव्हतो. सांग, यस्वदे, तुला काय करायचं?"
"येड हायेसा का खुळा? अव्हो, ह्ये का वई हाय दागिने घालून हिंडायचं आन् सालू नेसून मिरवायला?"
"येथं वईचा सवाल कोठून आला. आज बी तू म्हंजे...."
"चला काय तरीच ! त्ये जावू द्या. बर, ईलक्सनचं काय झालं?"
"काय व्हयाचं? गाव तिघायला बी लुटते. निवडून आल्यावर राजकारणी गावास्नी लुटत्यात मातर निवडणुकीच्या पिरेडमंदी गाव त्यांना लुटत्ये."
"पण मी म्हन्ते आश्या लोकास्नी निवडून देवू न्हाई."
"मंग देणार कोन्ला? आबासाब बी तशेच आन् तात्यासायेब बी तश्येच! येकाला झाकाव आन् दुसऱ्यालं दाखवावं."
"आजूक येक पॅनल हाय म्हण की."
"हाय की त्या रांडायचा।"
"मला तं वाटत्ये या दोगा लांडग्याच्या झगड्यात त्योच पैनल निवडून यील."
"झालं तं मग गावाबाहेरच कलाकेंदर गरामपंचायतीच्या हापीसात यील आन् तेथं सुरू व्हईल नंगानाच!"
"त्ये जाऊ द्या. पण आपून कोन्ला मत देवाव?"
"न्हाई, कोण्ला न्हाई. तिघायन बी लुटलं हाय. आपून आस करू निवडणुकीच्या दोन-च्यार दिस पैले तुझ्या माहेरी जावून बसू."
"न्हाई वो आस्स न्हाई करायच. काल टी.वी.वर सांगत व्हते की, परत्येकान मतदान करायाच फायजेत."
"आग पर..."
"न्हाई वो. त्ये जमायचं न्हाई. आपून आपलं करतेव्य केलच फायजेत." यस्वदा म्हण्ली आन् गणपत खोकल्याची उबळ आली म्हून बाहीर गेला...
केळीला पाणी दिवून येक म्हैना झालता. दुसरं पाणी देयाची येळ झाली व्हती. पर क्यानालला पाणी येत न्हवतं. गणपत आन् दुसरे लोक बी पाण्याची वाट फात व्हते. त्या दिसी गणपत लोकायसंग पाराम्होरं गप्पा छाटत व्हता.
"रामराम..." मोटारसायकलवर आलेल्या बागवानाला समद्यांनी एकदम रामराम केला.
"क्या मामू? आज काय भाव निंघला हाय?" कुणीतरी विचारलं
"साढ़े पाँच सौ !" मामू म्हण्ला.
"मामू, ह्यो भाव किती दी ऱ्हाईल?"
"त्ये काय सांगावं? हजार बी हुईल या तो फिर सौ से भी निचे आयेगा ! गणपत पाटील तुमचं बन तर लै भारी हाय. आत्ताच फावून आलू. पंद्रा-सतरा किलूच झाड व्हईल बगा. पाटील दे दो बन हमे. मालामाल कर दूंगा."
"न्हाई बा."
"गणप्या, दिवून टाक. आज भाव हाय. उद्या काय सांगावं? तुह बन हाती येयाला आजूक तीन-च्यार म्हैने तर...."
"नग गणपत्या दिवू नगस."
"फा. ईच्यार करा. देत आसाल तं तीन लाक देत्यो. मी आबासाबाच्या बैटखीत हाय." म्हंताना बागवान निगून गेला.
"काय माणुस हाय बगा, धा वरसाखाली पायी हिंडायचा. हाता-पाया पडूनशानी झाड घियाचा आन् आज येची शान फा. आपूण पुरते नागवलो. घरावर बराबर पत्तर बी न्हाई ह्यो मातर च्यार मजली तारसात ऱ्हातोय. गणपत, तीन लाक त्वांडान म्हणलय पर चार लाकापस्तोर देत्ये बग."
"आर पर कावून? गणपत्या, तुहं झाड ईस किलुच्या वर जाईल. सा-सात लाकाला मरण न्हाई."
"तव्हर भाव ऱ्हायला तर ना?"
"कावून ऱ्हाणार न्हाई? गणपत काय येकटाच हाय? गणप्याच्या मांघ बी केळी हायेता. आर ही बागवानाची जात अशीच ऱ्हाते. आपूनच येडे ऱ्हातो. पाटील, पाटील करुनशानी हे आपलीच बिन पाण्याने करत्यात. येव्हढी मेहनत करुन आपून केळी लावतो. जीवापाड म्हेनत करुन त्यांना राखतो आन् आपल्या हातामंदी कवड्या ठिवून ह्ये तिकडे दामदुपटीनं ईकतात. याच बेपाऱ्यानं लक्झरी घेतली हाय म्हणं, आपल्याच केळावर !"
"ह्यो बेपारी लै वकटा आन् दूतोंडी हाय बग. आत्ता ग्वाड-ग्वाड बोलून सवदा करत्यो आन् पैका देयाच्या वक्ती मातर रंग बदलतो. पैका मांगू-मांघू आपल्या त्वांडाला फेस येतू. तव्हा धा-पाच हजार कमी घे पर सम्दा पैका येक रकमी आन् आत्ताच घे."
"आर बाबा म्हणवाच हाय...
शेतकरी तितुका हाय येक
मिळून खाया समदे येक।"
"बागवानाला सोड रे, पर शेतकऱ्यापरी ऊस तोडणीचे कामगार आन् हमाल शिरीमंत हायेत की."
"हे मातर खरं हाय बर..."
"गणपत्या, देवू नगस बरं. बनाला येक-दोन पाणी पाज आणि मंग फाय."
"बर." म्हणत गणपत ऊठला आन् घरी आला.
म्होरचे आठ दिस बी क्यानालला पाणी आलं न्हाई. काय तर म्हण पाणी सोडणाऱ्या लोकायचा संप व्हता, पगारवाडीसाठी सम्दे करमच्यारी संपावर व्हते. त्या दिसी संप मिटल्याची बातमी आली आन आवगडलेल्या बाईची सुटका झाल्यावानी समद्यांना आनंद झाला. आता मातर क्यानालला पाणी यिणार व्हत. दुसऱ्या दिशी क्यानालला पाणी सुटल्याची बातमी आली. आन् समदा गाव आनंदानं नाचू लागला. त्या दिसी फाटेच गणपत बन भिजवाया वावरात गेला. त्यानं क्यानालात फायल पर त्येच्यात पाण्याचा थेंब बी न्हवता. आस कास झालं? कोन्त्याबी हालतीत पाणी येयालाच फायजे व्हतं. कोठं माशी सिंकली म्हणावं. त्यो पुना गावात आला. पाराम्होर टोळकं बसलं व्हतं. गणपतला फाताच कोणी तरी इच्चारलं,
"काय गणपत, वावरात गेल्ते?"
"व्हय. पाणी यिणार व्हत."
"मंग आल का?"
"न्हाई आलं. काय झालं कोन्ला ठावं?" गणपत खिन्न आवाजात म्हण्ला.
"गणपत, आज न्हाई पर आजुक पाच-सा म्हेने पाणी येयाचं नाई"
"का र?" गणपतनं रडकुंडीला येत इच्चारलं.
"ह्ये बग. पेपरात आलय. रामवाडीपासी म्हणं क्यानाल फुटला हाय. पाच-सात किलूमीटरचा बंदारा कोसळला म्हणं. "
"बंदारा कोसळला? पर कावून, कसा?"
"आर बाबा, क्यानाल बांधायच्या वक्ती समद्या लोकायनी आरद्या पैक्यात सिमिटाच्या थैयल्या ईकत घितल्या. त्या पायी क्यानालच बांधकाम कमी सिमिटात केल तव्हा बांदकाम टिकलच कसं? तव्हा कोन्हीबी ईच्यारच केला न्हाई. आरद्या किमतीत सिमीट म्हन्ल्यावर माड्या काय बांदल्या, तारस काय टाकले. आता बसा..."
"गणप्या, आता तू तडक मामूला गाठ आन् बनाच काळ पांडर करून टाक."
"आर, बाबा त्यो बेपारी हाय. त्येला बी बंदारा कोसळल्याचं ठाव झालच आसल. त्यो आता आडून मांघल रे."
"गणप्या, आसं कर..."
"कसं?"
"तात्यासायेबाच्या धुऱ्याला तुहा धुरा लागूनच हाय."
"तर मंग?"
"तात्यासाब इलेक्शनला ऊबे हाईत. "
"बरं मंग?"
"त्येंनाच हिरीचं पाणी मांग की रे !"
"पर तात्यासाब देतील?"
"देवावच लागलं."
"पर लाईटबील?"
"कशाचं बील आन काय? मोटार फिरत्ये पर मीटर फिरल तर शप्पथ."
"म्हंजे?"
"आर, मीच त्येंचा गडी हावो. मीटरात आकुडा घातला की झालं..."
"आरं तू कावून त्येंची बदनामी करतुस? तुह्या नावानं दीड येकर वावर केलं की त्येंनी..."
"व्हय बाबा.मह्या नावानं दोन येक्कराची रजिष्ट्री केली. आन् म्या बेमानी करु न्हाई म्हून सवच दुसऱ्या बौंड पेपरावर मझा अंगुठाबी घेतलाय. जिमीन देण्यामांघ बी त्येंचा डाव व्हता..."
"कंचा डाव ?"
"आर बाबा, मी आदीवासी आणिक दोन येकराच्या जोरावर त्येंनी मझं नाव अल्पभुधारकाच्या लीस्टमंदी टाकल. "
"व्वा! काय डोकेबाज माणूस हाय तात्यासाब...."
"आर, मह्या नावावर त्येंनी कोंबड्या, शेळ्या. टैक्टर, हालर, खत, बी-बीयाणं, हिरी, गायी, म्हसी, बैलायची जोडी आसे लई फायदे उचलले हाईत."
"माणसान आस धोरणी ऱ्हावावं..."
"गणप्या, तू येकदा खडा मारून तं फाय. लागला तं लागला न्हाई तर मंग हायेच आपला मामू जिंदाबाद."
हो-न्हाई कर्ता कर्ता आखीर त्या दोपारी गणपत तात्यासायेबाकडं गेला. त्येच नशीब चांगलं कावून तं ईलक्सनच्या धामधुमीत तात्यासायेब येकलेच व्हते. घरीच व्हते.
गणपतला फाताच ऊठून बसत म्हन्ले, “ये-ये गणपत, काय म्हन्ते ईलेक्सन?"
"त्ये तुमास्नी ठाव. आमी आपले येका फार तर दोन फुलीचे मालक."
"गणपत, ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मंदी येक फुली बी लै म्हत्वाची ठरते. त्यासाठी आपली फुली कोण्ला..."
"तात्यासाब आपून धूरेभाऊ....मंग मत तुमास्नी न्हाई तं कोन्ला देणार?"
"गणपत, तुह्या येकट्या घरचं न्हाई तं शेजाऱ्या पाजायचं मत बी त्वा वळवाय फायजेत. हे फाय... म्या काय कोणाचं फुक्कट मत घिणार न्हाई. कोण काय मांघल ते दीन..." तात्यासाब म्हन्ले आन् त्योच धागा पकडत गणपत म्हन्ला,
"मालक, बांद फुटला. नुक्सान झालं बगा."
"तुव्ह बन तं लै नादर हाय. येकेक झाड ईस-ईस किलू भरल की."
"तरी बी दोनेक बाऱ्या पाणी मिळालं आसतं तर लई बर झालं आसतं. मालक, येक काम कर्ता?"
"गणपत, धूरे भाऊ बी म्हन्तोस आन् वर आसा दुजाभाव कावून? खुल्या मनानं बोल की"
"मालक, हिरीच्या पाण्याच्या दोन....."
"येडा रं येडा! आर मझी हीर काय आन तुझी काय? बाबा दोन पाळया काय, धा येळस पाणी पाज की. म्या कोठं तुला पैका मांघणार हाय. चल. आत्ताच मोटार सुरु करु..." आसं म्हण्ता म्हण्ता तात्या खरच ऊठले आन मोटारसायकलीवर गणपतला घिऊन वावराकड निघाले...
तात्यासायेबानं येक रात आन येक दिस दिलेल्या पाण्यात गणपतचं बन चांगलच सुधारलं. ह्ये टप्पू-टप्पू केळ समद्यांच्या नदरा खिळवू लागलं. सीतापूरातच न्हाई तं आजुबाजुच्या गावामंदी बी गणपतीच्या बनाची चरचा व्हवू लागली. बागवान बनाभवती आन् गणपतजवळ रिंज्या घालू लागले पण आता गणपतबी येव्हार सिकला व्हता. त्यो आज-उद्या करत टाळू लागला...
आखिर गराम पंचायतीच्या ईलक्सनचा दिस ऊजाडला. मतदान बी तस सांततेत पार पडलं. दुसऱ्या दिशी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीबी झाली. मोजणीत आक्रीत घडलं. आबासायेबानं तात्याला पाणी पाजाय उब्या केलेल्या पैनलचा विजय झाला. कलाकेंदराचा सम्दा पैनल निवडून आला. खुद्द आबासाब आन् तात्यासाब पडले तेथे त्यांच्या चमच्यांची काय गिणती? त्या राती सीतापुरात जसी काय दिवाळी व्हती. ईजयी पैनलची वरात निघली. जागुजागी केंदरातल्या बायांनी आस्सा डान्स केला म्हन्ता की बास ! नटलेल्या, कमी कापडातल्या बायांचा नाच आन् छात्या फावून सीतापूरच्या लोकायच्या छात्या लव्हाराच्या भात्यापरीस टणाटण ऊडू लागल्या. झालच तं समद्यांच्या नदरचं बी पारण फिटलं. त्या बायामंदी गणपतची सकी व्हती. पैले गणपतनं तिला वळखलच न्हाई. सकीनं नाचताना गणपतकडं फायलं आन् ती नाचायचं थांबली. नदरेला नदर भिडली तव्हा दोघायचे बी डोळे भरुन आले...
सीतापुर सरपंचपद बाईसाठी राखीव झालं व्हतं. कलाकेंदरातल्या पैनलची बाई सीतापूरची सरपंच झाली. अशा रितीनं सीतापूरचं राजकारण चुलीत न्हाई गेलं पर कोठ्यात गेलं आन् सुरु झालं-रांडकारण ! ही परगती म्हणावं की अधुगती ! ज्येला जसं भावलं तसं घेवावं आन् डोळं लावून फावावं...
ईलक्सानचा आन् सोत्ताच्या राजकारणाचा निकाल लागल्यावर तीन वारानं आबा तर सव्वा म्हैन्यानं तात्यासायेब गावात आले. तव्हर तात्याच्या गड्याकडून गणपतने आजूक दोन पाळ्या पाणी केळीला पाजलं. दिट लागावं आस बन झाल. गणपतनं सांगावा धाडून दाजीला बलावून घेत्लं. दाजी खटल्यासंग हाजर झाला. त्या राती कोंबड्याचा फक्कड बेत झाला. दोघ बोलता बोलता दाजी म्हन्ला,
"काय मंग गणपतदाजी, तुमच्या गावची सरपंच तं नाचणारी बाई झाली म्हणं. "
"व्हय. खेकड्याच्या राजकारणाची ती आवलाद हाय. सम्दा कारभार आता कलाकेंदरात व्हतो." बिडी शिलगावत गणपत म्हण्ला.
"आमास्नी नेवा की दरसनाला तुमच्या गरामपंचायतीच्या हाफीसात आन दाकवा की सीतापूरच्या सरपंचीचा नाच."
"दाजी, तुमास्नी जायाचं हाय तं जावा पर म्या..."
"काय झाल दाजी?"
"त्या केंदरावर मझी. मझी सखी हाय वो...." म्हण्ताना गणपतचे डोळे भरून आले.
"कायऽय?"
"व्हय. मला वाटायचं सकीला त्येंनी येथं ठेवलं नसाल. दुसरीकडं वाट लावलं आसल पर निकालाच्या दिशी कलाकेदरवाल्यांनी मोठी मिरवणूक काढली व्हती. त्येंच्या बाया समद्या गावानं नाचल्या. त्यात मही सखी बी व्हती."
"दाजी, जावू द्या. मला ठाव न्हवतं. आपलं जाणं कैंसल! बर दाजी, एक सांगा, आता बनाचे पाच सात लाक येतीला तव्हा त्येच काय करणार हायेसा..."
“आजूक ईचार केला न्हाई. हातात आल्यावर बघुता..."
"हातात आलेच हाईत की. आसं करा. येक माडी बांधा..."
"दाजी, येडे की खुळे ! अव्हो, येव्हढीच जागा दोघायला लै मोठी वाटते. माडी बांधून तिला झाडायला कोण हाय? दिसान् दिस तुमची भन बी गळाल्यावानी करत्ये. तव्हा माडीची निगा कोण फाईल?"
"ते बी खरच म्हणा. दाजी, औंदा आमाला मातर केळानं धोखा देला बगा..."
"कावून वो?"
"धा-बारा सालापासून आम्ही केळी, ऊस लावतुया. तव्हा खत घालू-घालू आमच्या जिमीनीची पोत आम्ही घालवली बगा. औंदा नापिकी झालीया. धा लाकाचं बन पर मुस्कीलीनं धा-पंद्रा हजार आले फा."
"आर-आर दाजी लै घाटा झाला की व्हो.''
"दोन्ही पोरीचं लगीन ठरवलं हाय. धा-पंद्रा लाकाची गाठ हाय. कसं व्हईल त्ये व्हवो. दाजी..."
"बोला की..."
"आस करता का..."
"कसं?"
"तुमास्नी पैक्याचं काई काम नसाल तर दोन तीन लाक रूपै देता का? पुढल्या साली दिवाळीला मांघारी देतो."
"दाजी. पैले पैका हातात तं यिवू ध्या..."
"पैका हातात यीलच व्हो..."
"ठीक हाय, दीन की. तुमी का परके व्हा आणिक तुमी आग्रेव केला नसता तर ती जिमीन सालान् साल पडीकच ऱ्हायली असती."
दुसऱ्या दिशी दाजीला येस्टीत बसवून गणपत घरी आल्याबरुबर यस्वदा कडाडली, "तुमी ह्ये काय करुन बसलावा?"
"काय केलं?"
"दादास्नी पाच लाक रुपै..."
"देतो म्हन्लो पर आजूक काय खरं हाय. तुरी बाजारात हायेता..."
"अव्हो त्यो पक्का येम हाई. तुमचं बन गेल्याबरुवर दारात ठिय्या मारल बगा."
"मंग येवू दे की. त्यो का दुसरा हाय का?"
"अव्हो, शंकर महाराज... भोळे सांब, त्यो पक्का वस्ताद हाय. समद्या सोयऱ्याला त्येनं चुना लावला हाय. आपूनच सुटलो व्हतो. आता तुमालाबी त्येनं जाळ्यात वढलं की."
"आग, दाजी म्हंजी तुझा भाऊ हाय. परका न्हाई. या दिवाळीला म्हन्ला पर म्होरल्या दिवाळीला तं दील."
"आता तुमच्यासमोर काय डोस्क फोडू. येक करा. हो भरुन बसलासा पर पैका मातर देवू नगसा."
"अगं पर..."
"पर पर करु नगसा. काय तरी निमित्ये सांगून द्या त्येला वाट लावून. ईकाची परीक्शा घिवू नगसा."
"बार...बार..." म्हन्ता म्हन्ता गणपत उठून बाहीर गेला...
म्होरचा आठवडा मास्तवानी गेला. बागवान मांघ लागत व्हता वर गणपत कोन्ला बधला न्हाई. मातर त्या फाटे-फाटे गावात ती बातमी पसारली. खर-खोट्याची खातरजमा कराया गणपत पाराम्होरी आला.
"गणपत, आरं, बागवानाला गाठूनशानी घेईल तेव्हड्याला बन ईकून टाक रं बाबा"
"आर पर कावून रे?"
"बाबा रं, रामवाडीची सम्दी बनं जागीच पिकली रे."
"म्हंजी?" गणपतनं येगळ्याचं शंखेने इच्चारलं.
"आर झाडालाच घडच्या घड पिकत हाईत.."
"पर कावून?"
"आर त्यो कोन्ता की रोग झाला म्हण कोन्ता रं..."
"त्यो रे, करपा म्हण करपा..."
"करपा? ह्यो कोन्ता रोग हाय?
"काय ठाव? धा जलमात आसा रोग झाला न्हाई रे..."
"ह्यो रोग रामवाडीला झाला नव, मंग आपून कहापायी घोर लावून घियाचा?"
"आरे बाबा, साथीच्या रोगावानी हाय म्हणं. फाता- फाता बनच्या बन आन मग समद्या गावच्या केळी पिकायल्यात "
"त्ये काय बी आसो. आजूक आपल्या गावात त्यो रोग आला न्हाई तव्हर बनायची जाळभाज करून मोकळं व्हावं. जेवढा पैका यील तेव्हडाच खरा."
"च्यामारी ही काय अवदसा आली म्हणावं?"
लगुलग गणपत च्यार-पाच शेतकऱ्यासंग शेहरात पोचला. शेहरात बागवानायची येक भली मोठी दुकानायची रांगच व्हती. दुकानात शिनेमावाणी हाऊसफुल्ल गरदी व्हती. बागवानाच त्वांड दिसत न्हवत. चार दिस पैयलेचा साडेसातशेचा भाव साडेचारसेवर पोचला व्हता. मामुच्या आडतीवर सीतापुरचे कास्तकार पोचले. जराशी गरदी कमी झाल्यावर मामू म्हन्ला,
"बोलो, सीतापुर वालों..."
"मामू, हमारे झाडा लेके आव"
"आज, कल तो नही. हाँ आठ-दस दिन के बाद देखेंगे. देख रहे हो कितना रश है। पंद्रा दिन तक की बुकींग है।"
"पर भाव का तो पका करो।"
"वो आज क्या बोलू? त्या दिशी बाजारात असलेल्या भावापेक्शा पाच रुपै ज्यादा दुँगा. आन आता बनायचं काय बी खर न्हाई. तव्हर त्यो करपा आपल्याकडबी यील..."
"न्हाई आला तं..."
"तुम्हारे मुँह मे घी-शक्कर ! न्हाई आला तर आमाला बी खुसी हाय न्हव? आमच बी पोट केळावरच हाय की. पर गणपतराव, त्या दिशी पाच लाख रुपै घिवूनशानी मोकळे झाले आसते तर..."
"मामू, जस तुमी सोत्ताच हीत फाता तसं आमी आमचं फाणारच की."
"खरं हाय. खरं हाय..." आसं मामू म्हन्ताना खिन मनानं सीतापुरकर तेथून उठले. त्येंनी सम्दी आडत पायाखाली घातली पर कोंचा बी दलाल त्येंना थारा देत न्हवता. पाच -सा दिसापूरवी सीतापूरात घिरट्या घालणारे बागवान त्येंच्यासी बोलायबी तैयार नव्हते. दिसभर फिरून फिरुन गणपत लै खिन होवून घरामंदी शिरला. त्येला पाहाताच यस्वदान ईचारलं, "काय झालं हो?'"
"यस्वदे, आज चारसेचा भाव हाय. झाड आशीच पिकत हायली तर कोनी शंबराच्या भावानं बी झाड घेणार न्हाईत."
"मंग वो..."
"फावूता काय व्हईल त्ये..."
दोन-तीन दिसात झाडायचा भाव तीनशेच्या बी मंदी आला. गणपत फाटेच वावरात गेला आन् त्येला बनात फरक दिसला. झाडावरची केळं पिवळी व्हत व्हती. त्येन धा-बारा घडायची केळी दाबून फायली आन त्योच हात कपाळावर मारला,
"देवा रं, झाडं पिकायलेत रं..." म्हन्ता म्हन्ता गणपत तेथच बसला. पन्द्रा-ईस मिन्टाने त्यो घराकडं निघंला. पाराम्होरं लोक बसले व्हते. सम्द्यांचे चेहर उतरलेले व्हते. समद्यायच्या केळी पिकत व्हत्या. करपा रोगानं समद्या सीतापूरला घेरले व्हते. दोपारी काही लोक पुना शेहरात जावून बागवानाला भेटले व्हते. रातोरात सोत्ताच्या खरचान टरक भरुन वाट लावले व्हते.... संबराच्या भावाने...
दुसऱ्या शेतकऱ्यावानी गणपतनंबी टरक भरला. टरकात बसून गणपत बी शेहरात पोचला. माप झालं. मिळालेला पैका पिवून गणपत सितापूरला उतरला. स्टेंडवरच मजुरायनं त्येला गाठला. समद्यायचा हिसाब झाला. आलेला सम्दा पैका बी संपला पर दोन मजुरायचे साडेतीनसे रुपै देयाचे ऱ्हायले. दोघायला घिवून त्यो घरी आला. बनाच्या पैक्यानं घर तर फायलच न्हाई पर मंजुरीचा पैका मातर घरातूनच देवावं लागला...
०००नागेश शेवाळकर