Shetkari majha bhola - 3 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | शेतकरी माझा भोळा - 3

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

शेतकरी माझा भोळा - 3

३) शेतकरी माझा भोळा!
येकदा का कास्तकारायचे आगुंठे घिवून त्यांचे हात तोडल्यावर पुढील काम व्हायला वेळ त्यो किती लागणार? फाता-फाता क्यानालचं काम बी पुर झालं. येक एक्कर म्हन्ता म्हन्ता गणपतचा तीन येक्करचा तुकडा क्यानालात गेला. त्यो बी वावराच्या बराबर मधून. भावा-भावाची वाटणी होवावं त्या परमानं ! क्यानालच्या दोही बाजूनं समान जिमिन ऱ्हायली. क्यानालचं बांधकाम सुरु आस्ताना गावातल्या शिरिमंतांची मजा झाली. क्यानालात पाणी वाहील तवा वाहील पर बांधकामाच्या वाहत्या गंगेमंदी लोकायनं हात धुवून घेतले. सीतापूरपरमानं क्यानालच्या पट्ट्यात येणाच्या समद्या गावाची चांदी झाली. सम्दया बड्या लोकायनी घरं बांधली. घरावर तारस टाकून माड्या बी बांधल्या. रातच्या वक्ती क्यानालच्या शेडमंदल्या सिमिटाच्या गोण्या शिरिमंताच्या गोदामात रचल्या जावू लागल्या आर्ध्या किंमतीत ! सायेब लोकायची आन् मंत्र्यायची साथ असल्यामुळे हाक ना बोंब! चोरीचा मामला आन् कव्हाच नग बोंबला...
क्यानालच बांधकाम व्हताना बड्या बड्या कास्तकारांच्या जिमीनीचे पैसे बी मिळाले पर गणपतसारख्या ज्येच्या मांघ ना फुडी कोन्ही त्यांचा पैयसा मातर मिळत न्हवता. आठ-पंद्रा दिसाला गणपत आबासाबाच्या घरी जायचा आन् आबासायेबाचे ठरलेले उत्तर घेवून खिन्न मनानं घरी परतायचा.
"अव्हो, आसे किती दीस हातावर हात दिवून गप्प बसणार हायेसा?"
"म्या काय करु म्हन्तेस, यस्वदे?
"आता आणिक मलाच ईच्चारा. समद्या गावचा पैयसा मिळाला पर तुमचाच कसा न्हाई मिळाला?"
"सरपंच म्हन्तो, मिळल...."
"कव्हा मिळलं? त्या सरपंचाचं मड फूड गेल्यावर? जावा आन् त्या आबासाबांना जाब ईच्चारा. जा ऊठा."
"आग, कालच भेटले व्हते..."
"मग काय म्हणाले ? अहो, असं करता का..."
"कस?"
"सखीच लगीन ठरलं हाय आस्स सांगा..."
"खोट बोलू? पर त्येना खरं कसं वाटल? पोरगी आजूक ल्हान हाय. दोन...च्यार..."
"अव्हो, सांगा तर. कोठं खरचं ठरलं हाय वो. उगी- उगीच थाप माराची झालं."
"आन समदा पैका देला तर सकीच्या लगीनाचं काय?"
"तर मग लगीन मोडलं आस्सी थाप माराची झाल. मला सांगा, त्यो सरपंच हरवक्त खोटं बोलतो का न्हाई तर मंग आपून बोल्लो तर बिघडलं कोठ?"
"फातो बोबा " आसं म्हणत गणपत ऊठला आन् पाचकन् थुकला. बिडी ईझवून त्यो सरपंचाच्या बैठकीत पोचला. गणपतला फाताच आबासायेबाचा चेहरा कडू आवसीद पेल्यावानी झाला. त्येच्या कपाळावरच्या आठ्यायच जाळ आणिक घट झालं. मिशीवर हात फिरवीत म्हन्ले,
"ये. गणप्या, ये."
"राम राम मालक."
"राम राम. गणपत अरे, बील पास झाली न्हाईत रं. म्या रोज खेटे घालतोच हाय."
"पर मालक, लै लोकायचा पैका मिळाला पर मला कावून मिळाला न्हाई."
"आरं सर्कारी काम हाय. व्हते कमी जास्त."
"मालक, सकीचं लगीन ठरलं हाय. तव्हा..."
"काय? सखीचं लगीन? गणप्या, येडा की खुळा? राकेस हायेस की बाप? आरं सखी म्हंजी धा-आकराचं वय आसणार. आर, ती शानी बी झाली नसाल."
"मालक, मह्या सासरवाडीकून जुळालं, म्हन्ल घर बसल्या ठिकाण आलं तं..."
"आसं आसल तर मंग तिथ धर. व्हईल काई तरी पैक्याचं."
"पर मालक, पैक्याचं स्वांग कस कर्ता यील व्हो. "
"तू कहापायी पैक्याची धास्ती कर्तो. तव्हर यील क्यानालचा पैका."
"मालक, आज आठ दी टिळ्याचा नेम धरला हाय तव्हाच पैका देयाचा सांगावा हाय सोय-याचा."
"आरबा! इतला कावून घायकुतीला आलास. बर तू जा. काळजी नग. क्यानालचा पैका मिळाला न्हाई तं न्हाई. म्या निस्तरीन सम्द."
"पर, मालक तुमचा पैका..."
"आरं, मंग काय झालं? तुही सकी म्हंजे मही लेकच ना! आणिक पैका दिवून काई म्या उप्कार करत न्हाई. तुहा क्यानालचा पैका यील तव्हा म्या मझा पैका घीनच." सरपंच मिशीवर हात फिरवत म्हन्ले.
आपून बाजी मारली या आनंदात गणपत घरी परतला. यस्वदीला मातर ईस्वास वाटला न्हाई. ती म्हण्ली, "पर त्यो पैका येव्हढा सजासजी दिल आसं वाटत न्हाई."
गणपत काही बोल्ला न्हाई. त्यो त्या दिसापासून रोजीनं काम करु लागला. रोज फाटे कंदी सांच्या पारी आबासाबच्या घरी चक्करा मारु लागला. आबासाब त्याला कोरडा धीर देयाचे. क्यानालचा पैका बी काढत नव्हते अन् बोल्ल्यावानी सोत्ताचा बी पैयसा देत नव्हते.
सरपंचाला सांगलेल्या टिळ्याच्या दिसाला दोन दिस बाकी व्हते. गणपत त्या दोपारी आबासायबाकडे गेला. बैठकीमध्ये दोन चार जीपा उब्या व्हत्या. नक्कीच सायेब लोकं क्यानालचा पैका घिवून आले असतील अश्या इच्यारात गणपत बिगी बिगी बैठकीत गेला. मातर तेथली मान्स येगळीच दिसत व्हती. सरपंचाकडं आलेली माण्सं नेहमी येणारे सायेब नव्हते तर कोन्ही तरी फुडारी व्हते.
"गणपत, पाणी आण. आणिक धा-बारा सिंगल च्याहा सांग."
तसा गणपत आतमंदी गेला. पाणी आन् च्याहा देताना त्याला समजल की आमदारकीच्या निवडणुका हाता. सरपंचाला तिकीट मिळणार व्हतं. त्यापायीच गोतावळा जमला होता. चाहाच्या रिकाम्या कोपबश्या घिऊन गणपत घरामंदी आला. त्याच्यामांघ सरपंच बी घरात आले. त्येंना फाताच गणपत म्हन्ला,
"आबासायब, परवाच्या दिसी सखीचा टिळा न्येयाचा हाय."
"मग मी काय करू?"
"आबासाब, आसं म्हणू नगसा, तुमी म्हण्ले म्हून म्या हो भरला. आन् टिळा बी पक्का केला हाय."
"म्या म्हन्लो म्हंजी काय झालं? तुही ठेव हाय का मह्यापाशी? येडपट साला. हातरुण फावून पाय लांब करायचे का न्हाई? हातात न्हाई खडकू आन म्हण बाजारात मारतुया धडका! वारं वा तुह काम."
"मालक, मह्या जिमिनीचा..."
"तुही जिमिन म्या घेतली का?"
"तुमी न्हाई व्हो. पर तुमीच द्या म्हणाले.."
"म्हणून का म्याच पैका देवू? वा रे तुव्हा न्याव. ज्येच कराया जावं भलं त्ये म्हन्त मझच खर. आता म्या मुंबईला चाल्लो. आठ-धा दिसात आल्यावर फावू."
"मालक, पर्वाच्या टिळ्याच कसं व्हो?"
"जा मग, ईक पोरीला न्हाई तर बायकुला." सरपंच म्हंता म्हंता मधल्या खोलीत गेले. गणपत भारी पायानं बैठखीत आला. जरा येळानं सरपंच बी बैठकीत आले आन सम्दे लीडर उठले. तव्हा आबासायेब समद्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हन्ले,
"गणपत, हातपाय गाळू नगस. सम्द ठीक व्हाल."
"सरपंच, काय भानगड हाय?"
"तस काय बी न्हाई. पर ह्यो आमचा गणपत लै पारमाणिक माणुस हाय, मुलखाचा कस्टाळूबी हाय. पोरगी लगीनाची हाय. परवा टिळा नेयाचा हाय. आता आपलं बंबईच आस अचानक ठरलं. येच्याजवळ पैका न्हाई. म्या म्हन्लं, आपून मुंबईहून आल्यावर पैक्याची व्यवस्था करतो. तू टिळा फूड ढकल..."
"वा सरपंच वा! काय मोठं मन हाय तुमचं?"
"आबासाव, तुमी एवढे दिलदार, वा! मान गए। अव्हो, भनीच्या लगीनाला भाऊ पैका देतन्हाई आन तुमी तर..."
"बार.. बार..! चला टेम व्हतोय. येतो र गणपत म्या. आल्यावर सम्द बरुबर कर्तो. जा..." आस म्हणत सरपंच कारमध्ये बसले तसे सम्दे लीडरबी गाड्यामंदी बसले. धूळ ऊडवीत गाड्या बी निघून गेल्या पर गणपत किती येळ त्या तेथेच ऊबा व्हता... जीबी गेल्या त्या दिसेला फात गणपत पाचकन धुकला आन घराकडं निघाला.....
"काय म्हन्ला त्यो रानडुक्कर?"
"त्यो गेला बंबईला. आठ-धा दिस येणार न्हाई.''
"त्याचा मुडदा कोठे बी जावू द्या. पर पैक्याच काय म्हन्लं?"
"पोरीला ईक म्हण्ला..."
" त्या मेल्याला सोत्ताची पोरगी यीक म्हणावं. बायकूला नीजव म्हणाव का न्हाई कोन्हाच्या खाली. सोत्ताला समजतो कोण? सोत्ताची पोरगी ठिवलीय तिकडे. येथं व्हती तव्हा काय गुण ऊधळत व्हती त्ये आमाला ठाव न्हाई व्हय? आन तिकडे बी कोन्त दुकान ऊघडलय ते कोन्हास ठाव? वंगाळ, उस्ट मेलं. कव्हा याच बर व्हयाचं न्हाई." म्हणत यस्वदीनं कडाकडा बोटं मोडली.
त्या गोष्टीला म्हंजे सरपंचाला बंबईला जावून चार रोज झाले. त्या दिसी गणपती कोठच काम मिळालं न्हाई म्हूनन वसरीवर बिडी फुक्कत बसला व्हता. यस्वदा आन् सकीला काम मिळालं व्हतं. त्यो बिडी ईझवणार येव्हढ्यात पांडा पळत यिवून म्हन्ला,
“आर, गणप्या, कुठे हुडकावे र तुला चल."
"पांडुदा, आर कोठं जायचं?".
"आरं बाप्पा त्ये क्यानालचे सायेब आलेत. समदे शेतकरी जमलेत. चल आपून बी पैक्याचं इच्चारु."
"चल." गणपत म्हण्ला आन दोघे बी पळत- धापा टाकीत शेतात पोचले. क्यानालमंदी उतरुन सायेब लोक मोजमाप घेत व्हते. धा-पंद्रा मिन्टात त्ये सम्दे वर आले.
"राम-राम सायेब." समदे शेतकरी म्हन्ले.
"राम राम! काय म्हणता? ठीक आहे ना? हे बघा आता आमचं काम संपल. दहा पंधरा दिवसात कॅनालमधून पाणी वाहील. पाईप लाईन करुन घ्या. मोटारी आणा. ऊस केळी लावा..."
"पर सायेब..."
"काय झाले? सांगा." एक सायेब म्हण्ला.
"सायेब, क्यानाल बांदून झाला. पाणी बी येणार हाय. पर आमच्या पैक्याचं काय?"
"कशाचा पैसा?" येका सायेबानं इच्चारलं
"आँ? कश्याचा म्हंजी? आमच्या जिमिनीचा पैका आजूक मिळाला न्हाई."
"काय म्हणता? पैशे मिळाले नाहीत?"
"खरच व्हो सायेब, देवाची आन येक रुपया बी मिळाला न्हाई."
"हे बघा, असं काही बोलू नका. ही बघा मी फाईल सोबत आणली. हे बघा पैसे मिळाल्याच्या तुमच्या सह्या आणि हे आंगठे! सरसकट पंधरा हजार रूपये एकर प्रमाणे पैसे दिले आहेत."
"काय पर आमाला तर फुटकी कौडी बी फिळाली न्हाई."
"आम्हाला तरी काय माहिती? ज्याने सही केली, अंगठा केला त्याला पैसा दिला."
"म्हंजी दुसऱ्या कोन्ला पैका देला की काय?"
"ते आम्हाला ठावूक नाही. सरपंचाने जो माणूस दाखविला त्याची सही, अंगठा घेवून आम्ही पैसे दिले. यापेक्षा आम्हाला अधिक माहिती नाही." असे म्हणत ते अधिकारी जीपीत बसून निघून गेले...
"पर सरपंच असं करायचा न्हाई."
"आजूक बी त्याच्यावर ईस्वास हायेच का?" कुणीतरी इच्चारलं
"पुरत नागव केल की रे त्या लांडग्यानं."
"आता त्यो बंबईवून आला म्हंजी ईचारूच त्येला."
सम्दे गावाकडे निघाले. जो-तो गेलेल्या जिमिनीचा आन त्याला मिळालेल्या पैक्याचा ईचार करत व्हता. गणपत मनात म्हण्ला,
"मझी तीन येकर जिमिन गेली म्हंजी पंद्रा हजार रुपै येकर परमाने पंद्रा आणिक पाच ईस आणि धा म्हणे दोन येक्करचे झाले का तीस हजार आणि धा म्हजे चाळीस हजार आन् पुना पाच म्हंजी झाले का पस्तेचाळीस हजार रुपै.... बाप्पोरे...." हिसाबानं गणपतीचे डोळे गरगरु लागले...
०००नागेश शेवाळकर