Ramacha shela..- 2 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | रामाचा शेला.. - 2

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

रामाचा शेला.. - 2

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

२. बाळ, तू मोठा हो-

आईचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्याकडे पाहून ती दिवस काढीत होती. बाळ मोठा होईल व आपले कष्ट संपतील अशी आशा ती माऊली मनात खेळवीत होती. बाळाकडे पाहून ती सारे अपमान गिळी, सारे दु:ख विसरे. सार्‍या हालअपेष्टा सहन करी. त्याच्यावर तिचे किती प्रेम ! आईच्या प्रेमाला आधीच सीमा नसते. त्यातून एकुलता एक मुलगा असावा, आई विधवा असावी, दरिद्री असावी, आणि मग त्या मुलाविषयी तिला जे वाटत असेल, त्याची कल्पना कोण करू शकेल?

बाळाचे नाव होते उदय. सुंदर नाव. परंतु उदयचा जन्म झाला नि थोडयाच दिवसांत जन्मदात्या पित्याचा अस्त झाला, बाळाच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरवून पिता देवाघरी गेला. शेवटचे मुके घेऊन, बाळाला हृदयाशी धरून त्याने डोळे मिटले. उदयला ते काहीएक आठवत नाही. एखाद्या वेळेस उदय आईला विचारतो, “आई, बाबा कसे ग दिसत? कसे होते?”
“त्यांच्यासारखाच तू आहेस. असेच डोळे. काय सांगू बाळ? तू मोठा हो म्हणजे झाले.” असे माता म्हणे.

उदयची आई गरीब होती. घरदार नव्हते. प्रथम ती नाशिकला राहात होती. एका लहानशा खोलीत राहात होती. कोणाकडे चार कामे करी. काही किडूकमिडूक जवळ होते. बाळाला वाढवीत होती. उदयचा एक मामा होता. तिकडे वर्‍हाडात होता. पोलिसखात्यात होता. मोठा करारी. अधिकाराचा भोक्ता. एकदा हे मामा नाशिकला आले होते. त्र्यंबकेश्वराच्या यात्रेसाठी आले होते. गरीब बहिणीकडे उतरले होते.

“आई, मामाबरोबर मी जाऊ का यात्रेला?”

“नको. आपण पुढे जाऊ हो.”

“मी जाणार. मी मामांना विचारू? मामा मला नेतील. विचारू का? जाऊ का आई?”

“नको म्हणून सांगितले ना !”

तिला तो मिंधेपणा वाटत होता. मामाने आपण होऊन नेले तर निराळी गोष्ट. त्याला विचारायचे कशाला? आणि मामा, मामी, मुले निघाली. उदय रडत होता.

“त्याला न्यायचे का?” मामीने विचारले.

“उगीच गर्दीत हरवायचा. कशाला? आईचा एकुलता लाडका मुलगा.”

“परंतु तो रडत आहे. वन्स, नेऊ का त्याला? राहील का नीट बरोबर? ऐकेल का सांगितलेले?”

उदय का त्या गोष्टी विसरेल? ते शब्द का विसरेल? आणि एके दिवशी ती एक गंमत ! एकदा त्याची एक दूरची आत्या आपल्या मुलासह त्यांच्याकडे आली होती. आणि आई व आत्या दोघी बाहेरच बसल्या. उन्हामुळे उदयची शाळा सकाळी होती. आत्याचा मुलगा भातभाजी करून ठेवी आणि शाळेतून आल्यावर उदय वाढी.

“रोज रोज वाटते मीच वाढायचे?”

“उदय, बाबू पाहुणा आला आहे. तरी तो स्वयंपाक करतो. मी सांगेन त्याप्रमाणे करतो. तो तरी का मोठा आहे? तुझ्याच वयाचा. चूल पेटवतो. सारे करतो. धुराजवळ बसतो, तुला एवढे वाढणेसुध्दा का होत नाही? असे का करावे?

“तो दिवसभर तर घरी असतो. मी शाळेतून येतो. दमून येतो. पुन्हा हे घरी काम.”

“शाळेत दमायला रे काय झाले? तेथे का गोण्या उचलायच्या असतात? ऊठ. वाढ सर्वांना आजचा दिवस. उद्या आम्ही अंगे धुऊ. जा बाळ. घे पाने.”
त्या दिवशी उदयने आदळआपट करीत सर्वांना वाढले आणि मागून एकटा जेवायला बसला. उदयला जेवताना साखर घ्यायची सवय होती. परंतु आज घ्यायला तो विसरला. बाबू जवळच होता. उदय इंग्रजी शाळेत जाऊ लागला होता. काही शब्द पाठ झाले होते. बाबू अजून मराठी शाळेतच होता. तो बाबूला म्हणाला, “बाबू, शुगर.”

“काय म्हणालास?”

“शुगर, शुगर.”

“शिव्या देतोस का रे”

“शुगर, यू शुगर.”

“शिव्या थांबवतोस की नाही?”

उदय शुगर शुगर करीत ओरडत होता. बाबूही संतापला. दोघी आया घरात आल्या.

“अरे, आहे काय? काय हा आरडाओरडा?”

“उदयच्या आई, उदय सारख्या शिव्या देत आहे.”

“काय रे उदय?”

“मी नुसते शुगर शुगर म्हटले.”

“म्हणजे रे काय?”

“म्हणजे साखर. मी त्याच्याजवळ साखर मागत होतो. ही का शिवी?”

“परंतु चांगले मराठीत मागायला काय झाले? घरात रे कशाला इंग्रजी? उद्या मोठा हो व साहेबाजवळ फर्डे बोल. बाबू, ती शिवी नव्हती हो. उदय चावट आहे. आटप जेवण. किती वेळ जेवतो आहे.” उदय हसत होता. बाबू धुसमुसत निघून गेला.

उदयचे ते पोलिसखात्यातील मामा जेव्हा जेव्हा येत, तेव्हा तेव्हा नेहमी म्हणायचे, “उदय, इंग्रजी चांगले बोलायला शीक. अक्षर चांगले कर. मग तुला देईन मोठी नोकरी. पोलिसखात्यात तुला मोठा हुद्दा मिळेल. समजलास ना?”

उदय नाशिक शहरात वाढत होता. गंगेत डुंबायला जायचा. पावसाळयात गंगेला पूर यायचे. पोहायची मजा. आई नेहमी सांगायची, “उदय, गंगेवर जात जाऊ नकोस.” परंतु आईची नजर चुकवून तो जायचाच. एकदा तो असाच गेला होता आणि पाण्यात बुडू लागला. एका माणसाने त्याला वाचवले. परंतु शहरात बातमी गेली. ती माता धावत घाटावर आली. तिच्या डोळयांतून गंगायमुना वाहात होत्या. तिने उदयाला जवळ घेतले. मुलाला वाचवणार्‍याचे तिने आभार मानले. उदयला घेऊन ती घरी आली. त्यालाही आता पाण्याचे भय वाटू लागले. परंतु त्याच्या शाळेतील एक शिक्षक होते. ते मुलांची भीती दवडायचे. ते एके दिवशी उदयच्या आईकडे आले व म्हणाले, “आई, मुलगा येथे रहाणार. पाण्याची भीती नसलेली बरी. गंगेच्या तीरी राहून पोहायला न येणे लाजिरवाणे आहे. पोहण्याची विद्या येत असावी. इंग्रजी विद्येपेक्षा ही महत्त्वाची विद्या आहे स्वत:चे प्राण वाचविण्याची व दुसर्‍याचेही वाचविण्याची ही विद्या आहे. तुमच्या मुलाला मी शिकवीन. मी बरोबर असेन माझ्यावर विश्वास ठेवा. त्याला पोहोयला पाठवीत जा.”

तुम्ही जबाबदारी घेत असाल तर माझी हरकत नाही. तो माझा एकुलता एक मुलगा आहे हे ध्यानात धरा.”

“ते का मी विसरेन?”

आणि उदय पोहायला जाऊ-येऊ लागला त्याचे ते प्रेमळ शिक्षक त्याला धीर देत आणि पावसाळयातील मोठमोठया पुरांतूनही तो जाऊ लागला. मोठमोठया लाटांतून जाऊ लागला त्या लाटांची नावे त्याला प्रत्यक्ष परिचित झाली. झिप्री लाटेतून जाणे त्याला फार आवडे. गोदावरीच्या फेसाळ पाण्यातून तो आता सहज लीलेने आरपार जाई.

उदय असा वाढत होता.

परंतु आई नाशिक सोडून उदयला घेऊन जळगावला गेली. तेथे एक खोली घेऊन राहू लागली. ती एका श्रीमंत घरात स्वयंपाक करण्याचे काम करण्यासाठी आली होती. उदय जळगावच्या इंग्रजी शाळेत जाऊ लागला. खानदेशात उन्हाळा फार. पाय चटचट भाजतात. उदयजवळ ना छत्री ना पायतण. परंतु आईने पुढे छत्री घेऊन दिली. पायतण घेऊन दिले. एके दिवशी उदय छत्री न घेताच शाळेत गेला. आई स्वयंपाक करून घरी आली, तो छत्री कोपर्‍यातच तिला वाईट वाटले.

“उदय छत्री नेत जा. डोळे बिघडतील.” त्या दिवशी रात्री ती त्याला म्हणाली.

“मला नाही छत्री आवडत. हात मोकळे बरे.”

“आवडायचे काय त्यात? ऊन असते. तुझी मला काळजी वाटते तू माझा एकुलता मुलगा. तू माझा आधार. तुझ्याकडे पाहून मी दिवस कंठिते. तू सुखी असावेस, निरोगी असावेस, शिकून मोठे व्हावेस, असे मला वाटते. म्हणून जप हो बाळ छत्री नेत जा. नेशील ना?”

आईच्या डोळ्यांतील अश्रू पाहून उदय म्हणाला, "नेईन."

उदयचे कपडे फाटले होते. आईने फाटलेले शिवून दिले होते. नवीन कपडे घ्यायला कोठे होते पैसे? एके दिवशी यजमानांच्या पत्नीजवळ उदयच्या आईने सहज गोष्ट काढली.

“आमच्या बंडूचे कपडे तुमच्या उदयला होतील का? दोघे सारखेच आहेत अंगाने. देऊ का त्याचा एक शर्ट, एक कोट?”

“द्या. उदयच्या अंगाला नीट येतील.”

माता ते कपडे घेऊन आली. उदयने अंगात घातले. कोट जरा मोठा होत होता. परंतु आईच्या डोळयांना तो चांगला दिसला. दुसर्‍या दिवशी ते कपडे घालून उदय शाळेत गेला. उदयच्याच वर्गांत परंतु दुस-या तुकडीत बंडू होता.

उदय हुशार होता. बंडू जरा ढ होता. परंतु श्रीमंताचा मुलगा म्हणून वरच्या इयत्तेत नेहमी ढकलला जाई. आपल्याकडे स्वयंपाक करणार्‍या बाईचा मुलगा आपल्याहून हुशार असावा याचे बंडूस वैषम्य वाटे. उदयचा पाणउतारा करण्याची संधी तो दवडीत नसे.

“त्या उदयचा कोट बघा. बावळटासारखा दिसतो आहे.” बंडू आपल्या मित्रांना म्हणाला.

“उदय, कोठून आणलास हा कोट? लग्नाचा कोट की काय?”

“अरे, वाढत्या अंगाचा आईने शिवला असेल. म्हणजे पुन:पुन्हा शिवायला नको.”

“त्याची आई आमच्याकडे स्वयंपाक करते.”

“अरे बंडू, मला वाटते हा तुझाच कोट. हा तू नसस का घालीत? याच्या अंगात कसा?”

“माझ्या आईने दिला असेल. याच्या आईने मागितला असेल. आणि या बावळटाने घातला अंगात. हुशार आहे; पण स्वाभिमान कोठे आहे?”

उदयला ती बोलणी सहन झाली नाहीत. तो बंडूच्या अंगावर धावून गेला. उदयने त्याला खाली पाडले. तो नाशिकला असताना कुस्ती शिकला होता.

“कोणाला रे स्वाभिमान नाही? बोल. माझ्या आईचा अपमान करतोस बोलशील पुन्हा?”

असे म्हणून उदय त्याला चापटया मारीत होता. बंडूचे बोलघेवडे मित्र दूर राहिले. इतक्यात घंटा झाली. सारे वर्गात गेले. परंतु प्रकरण मास्तरांपर्यंत गेले नाही.

घरी गेल्यावर बंडूने आपल्या आईला सारी हकीगत सांगितली. ती श्रीमंत आई संतापली. उदयच्या आईला ती बोलली,
“बराच आहे मस्तवाल तुमचा मुलगा. बंडूला मी कधी चापटसुध्दा मारली नाही. तुमच्या मुलाने आज त्याला मारले. त्याला कोट व शर्ट दिला त्याचे हे उपकार वाटते? मेली भिकारी तर भिकारी; परंतु ऐट कोण? ऐट राजाची, अवलाद घिसाडयाची. तुम्ही उद्यापासून येऊ नका कामाला. आश्चर्यच एकेक.”

उदयची आई रडू लागली. तिने मुलाच्या वतीने क्षमा मागितली. म्हणाली, “क्षमा करा, कामावरून दूर नका करू. मी उदयला शिक्षा करीन. आम्ही निराधार आहोत. क्षमा करा.” इतक्यात उदयच तो कोट, तो शर्ट घेऊन तेथे आला.

“आई, मला नको हा कोट, नको हा शर्ट.” असे म्हणून त्याने ते कपडे तेथे फेकले.

मातेने त्याची बकोटी धरली. ती रागावली.

“काटर्या, माजलास होय तू? घे ते कपडे. आणि बंडूला आज तू मारलेस? तुला लाज नाही वाटली? तुझी आई येथे काम करते ते माहीत नाही? उद्या येथून मला काढले तर खाशील काय? जा, त्यांची माफी माग. त्याच्या आईच्या पाया पड. चल येतोस की नाही?” असे म्हणून आई त्याला मारत होती. ती त्याला ओढीत मालकिणीकडे नेत होती. उदयही हट्टास पेटला होता.

“मार, वाटेल तितके मार. मी माफी मागणार नाही. कोणाच्या पाया पडणार नाही.” असे तो रडत म्हणत होता. मालकीणबाई, तिची मुले सारी तेथे जमली.

“पड त्यांच्या पाया. पडतोस की नाही?”

“नाही. जीव गेला तरी नाही पडणार.”

“जाऊ द्या. नका मारू. पुन्हा नाही तो असे करणार.” असे बंडूचे वडील येऊन म्हणाले. उदय रडत घरी गेला. माता रडत स्वयंपाकघरात गेली. ती श्रीमंत मुले हसत हसत खेळायला गेली.

रात्री उदयची आई घरी आली. उदय जेवला नव्हता. त्याची आई त्याच्यासाठी जेवण करून ठेवून जात असे. आज ते जेवण तसेच होते. उदय झोपला होता. परंतु त्याला खरोखर झोप लागली होती का? माता बाळाजवळ जाऊन बसली. ती एक शब्दही बोलली नाही. ती त्याला थोपटीत होती. त्याच्या अंगावरून ती हात फिरवीत होती. मध्येच तिने खाली वाकून पाहिले. तिच्या डोळयांतील अश्रू उदयच्या तोंडावर पडले आणि उदयला जोराचा हुंदका आला. स्फोट झाला. दाबून ठेवलेले दु:ख जोराने उसळून बाहेर आले. आईने मुलाला जवळ घेतले. कोणी बोलू शकत नव्हते. थोडया वेळाने माता मुलाला म्हणाली, “उदय, चल बाळ. दोन घास खा.”

“नको आई, आज पोट भरलेले आहे.”

“कशाने रे भरले?”

“माराने, अपमानाने, दु:खाने.”

“उदय, नको रे असे बोलू ! आपण गरीब आहोत. तुझी आई गरीब आहे. बाळ, मला दुसर्‍याकडे काम करावे लागते. अपमान गिळावे लागतात. आपली चूक नसली तरी त्यांची क्षमा मागावी लागते.”

“तू कोट कशाला आणलास? कशाला भीक मागितलीस? मी फाटका कोट का घालीत नव्हतो?”

“अरे, त्यांच्याकडे मी काम करते म्हणून मागितला कोट. त्यात काय बिघडले? तुझ्या अंगावरचे फाटके कपडे मला बघवत नव्हते ना.

“आई, पुन्हा माझ्यासाठी कोणाकडे काही मागू नकोस.”

“नाही हो मागणार. तू शीक. मोठा हो. लौकर हे दिवस जावोत. नवीन दिवस लौकर येवोत. चल, दोन घास खा. तुझ्या आईसाठी तरी खा.”

उदय उठला. आईच्या अश्रूंसमोर त्याचा हट्ट किती वेळ टिकणार? तो जेवला आणि अंथरूणावर पडला. आई त्याला थोपटीत होती. उदयला झोप लागली. देवाची अश्रुपूर्ण प्रार्थना करून माताही झोपी गेली.

असे दिवस जात होते. अशी वर्षे जात होती आणि उदय मॅट्रिक पास झाला. तो पुण्याला पुढील शिक्षणासाठी आला. त्याला नादारी मिळाली होती. एका बाजूला एका लहानशा खोलीत तो राहात असे. तो बंगला बंद असे. भय्या रखवाली करी. एकच खोली भाडयासाठी होती. उदयने ती घेतली होती. तो हाताने स्वयंपाक करी. अभ्यास करी. त्याचे फारसे मित्र नव्हते. तो मिसळत नसे. एकटाच फिरायला जाई. तो गरीब होता. मित्रमंडळी जोडणे म्हणजे थोडे पैसेही हवेत. कधी मग सिनेमा हवा. हॉटेल हवे. चहा हवा. सिगारेट हवी, पानपट्टी हवी. उदय कोठून आणणार पैसे? यामुळे तो एकटा असे.

सुटीत तो आईला भेटायला जाई. आई त्याची वाट पाहात असे. तो आला म्हणजे ती त्याच्यासाठी काही करी. उदय आता उंच झाला होता. त्याचे डोळे फारच तेजस्वी होते. आईला आपल्या मुलाला कोठे ठेवू, कोठे नको ठेवू असे होई.

असाच एका सुटीत उदय घरी आला होता.

“द्वारकाबाई, तुमचा उदय आला आहे ना घरी?” मालकिणीने विचारले.

“हो.”

“त्याला उद्या जेवायला बोलावले आहे म्हणून सांगा. आंबरस आहे. आणा त्याला. लहानपणीची भांडणे तो आता विसरला असेल. बंडू म्हणत होता की उदयला बोलवावे. नलीही म्हणत होती.”

“सांगेन त्याला. परंतु येईल की नाही काय सांगू?”

उदय दुसर्‍या दिवशी जेवायला गेला. तो त्या सर्व मंडळीत उमटून दिसे. तो आज आनंदी होता. आज त्याला अभिमान वाटत होता. आज त्या श्रीमंत घरचे सन्मानपूर्वक त्याला आमंत्रण आले होते. तो आज हसत होता. विनोद करीत होता. नलीने त्याला विडा दिला.

“सिगारेट हवी का रे?” बंडूने विचारले.

“मी ओढीत नाही” उदय म्हणाला.

“अरे, बी.ए.च्या वर्गात नि अद्याप सिगारेट ओढीत नाहीस? असा कसा तू उदय? अरे, ही नलीसुध्दा सिगारेट ओढते.”

“नाही रे उदय, दादा काही तरी सांगतो.”

“नल्ये, त्या दिवशी नाही ओढलीस?”

“ती आपली गंमत. उदय, तो विडा खा ना. का विडाही खात नाहीस? अगदीच सोवळा दिसतोस !”

“सोवळा कसला? अरसिक आहे. उदय, या गोष्टी नसतील तर विद्येला रंग चढत नाही. जीवनाला रंग येत नाही. असा भुक्कड नको राहू.”

“बंडू, मी एका स्वयंपाकीणबाईचा मुलगा. मी कोठून चैन करू? मी फाटका कोट घालावा, जुनी पुस्तके घ्यावी. तुमची गोष्ट निराळी आहे. तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघतो म्हणून तुम्ही तोंडातून धूर काढू शकता. खरे ना?

“तू लहानपणाच्या गोष्टी अद्याप विसरला नाहीस वाटते?”

“काही काही गोष्टी आपण कधी विसरत नसतो. सारे अपमान विसरण्याइतका मोठया मनाचा मी नाही. परंतु आज माझ्या मनात राग नाही. मी गरीब आहे. गरिबीतच राहिले पाहिजे.”

“अरे, उद्या श्रीमंत होशील. एखाद्या श्रीमंताची मुलगी माळ घालील.”

“मी श्रीमंत असतो तर श्रीमंताची मुलगी माळ घालती. मी गरीब आहे.”

“जाशील आय.सी.एस.ला आणि एखादी मड्डमही घेऊन यायचास.”

“आय.सी.एस.ला जाण्याइतका मी हुशार नाही. थोडेफार शिकून आईला केव्हा एकदा विश्रांती देईन असे झाले आहे. किती दिवस तिने कष्ट करावे, दुसर्‍याकडे काम करावे? आणि सारे माझ्यासाठी.”

“आईला हातांनी स्वयंपाक करून वाढणार काय?”

“लग्न नाही झाले तर हातांनी स्वयंपाक करीन.”

“कोठे ठरले आहे का रे लग्न?”

“कोठे ठरवू?”

“कॉलेजात मुली पुष्कळ असतात.”

“परंतु मी फुलपाखरू नाही. पैशाचे रंग माझ्याजवळ नाहीत. आणि कॉलेजातील प्रेमे म्हणजे ती तात्पुरती प्रतिष्ठा असते. ती तात्पुरती ऐट असते. शेवटी दुसरेच प्रश्न पुढे येतात. प्रेमे उडून जातात. कोणाची कोठे तरी लग्ने होतात. कॉलेजी प्रेमे पुढे मंगलमय विवाहात परिणत झालेली फारशी दिसत नाहीत.”

“तू एखाद्या तत्त्वज्ञान्यासारखे बोलत आहेत.”

“उदय, म्हातारा झालास की काय?”

“दारिद्रयाने लौकर वार्धक्य येते. कशाचेच नीट पोषण होत नाही. ना मनाचे, ना तनाचे. ना बुध्दीचे, ना भावनांचे.”

अशी भाषणे चालली होती.

“तो विडा तर खा.” नली म्हणाली.

उदयने विडा खाल्ला. परंतु विडा खाण्याची त्याला सवय नव्हती. त्याने पटकन खाल्ला.

“तुझा विडा मुळीच रंगला नाही.” बंडू म्हणाला.

“विडासुध्दा तुला खाता येत नाही !” नली म्हणाली.

“शिकेन पुढे दैवात असेल तर.” उदय म्हणाला.

“तू का दैववादी आहेस?”

“बंडू, शेवटी काही तरी दैव म्हणून असतेच. आपण प्रयत्न करतो, धडपडतो. परंतु काही अज्ञात शक्ती असतात. त्या आपल्याला कोठेतरी खेचून नेत असतात. मानवी जीवन म्हणजे मानवी प्रयत्न व अज्ञात शक्ती त्यांचे फलित होय. काही दिवस आपणांस वाटते की, आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या प्रयत्नांप्रमाणे सारे होत आहे. अकस्मात प्रचंड वारे येतात. सारे उभारलेले धुळीत मिळते.”

नलीने आता फोनो लावला. आणि उदय गुणगुणू लागला.

“नल्ये, उदय डोलतो आहे.”

“दादा, गाणे सर्वांना आवडते.”

उदय काही बोलला नाही. थोडया वेळाने तो जायला निघाला.

“उदय, येत जा मधून मधून. आपण खेळू, बोलू.” नली म्हणाली.

“रात्री ये, पत्ते खेळू.” बंडू म्हणाला.

“मला नवे खेळ येत नाहीत.”

“आम्ही शिकवू.”

उदय गेला. परंतु तो सुटी होती तरी लौकरच जळगाव सोडून गेला.

“आई, येथे उन्हाळा फार आहे. मी पुण्यास जातो. अभ्यासही करीन. आता शेवटचे वर्ष. चांगल्या रीतीने पास झाले पाहिजे. जाऊ का?”

“जा. प्रकृतीस जप. जपून अभ्यास कर. तुझे शिकणे केव्हा संपते इकडे माझे डोळे आहेत.”
आणि उदय पुण्यास गेला. त्याची ती खोली होती. त्याने अभ्यास सुरू केला. आणि आता कॉलेजही सुरू झाले. पुणे विद्यार्थ्यांनी गजबजले, परंतु उदय एकाकीच होता. त्याला ना स्नेही ना सोबती. तो रोज संध्याकाळी कोठेतरी फिरायला जात असे. कधी पर्वतीकडे, कधी चतु:शृंगीकडे. स्वत:च्या विचारसृष्टीत तो विचार करीत फिरत असे.

परंतु सरलेची गाठ पडल्यापासून त्याची सृष्टी बदलली. त्याच्या सृष्टीत नवीन प्रकाश आला, नवीन हवा आली. त्या दिवशी रात्री तो खोलीत आला व सचिंत बसला. विचार करीत बसला. सरलेचा रूमाल त्याच्या जवळ राहिला होता. तिने अश्रू पुसण्यासाठी तो त्याला दिला होता. तो द्यायला तो विसरला का त्याने मुद्दाम दिला नाही? त्याचा रूमाल तिच्या कपाळावर बांधलेला होता आणि तिचा रूमाल त्याच्या खिशात होता. तो रूमाल हातात घेऊन तो बसला होता. तिचे नाव त्याला माहीत नव्हते. परंतु रूमालाच्या कोपर्‍यात नाव होते.

“सरला ! खरेच सरला आहे. कशी बोलत बसली, दु:ख सांगत बसली. अभागिनी ! सरळ माणसे का जगात दुर्दैवी असतात? सरळ माणसांच्या नशिबी का दु:खच असते? सरला सुखी नाही का होणार? ती का जीव देईल? ती दु:खी आहे, निराश आहे. मी नाही का तिला आशा देऊ शकणार? मी नाही का तिला सहानुभूती दाखवू शकणार? परंतु ती कोठे राहते? पुन्हा भेटेल का? तिने मला बरोबर येऊ दिले नाही. अभागिनीबरोबर नका येऊ असे म्हणाली. ती त्या कालव्याच्या काठी भेटेल का पुन्हा? तिच्या जीवनात मला आनंद निर्माण करता आला तर?”

अशा विचारात तो होता आणि अंथरुणावर पडला. हळूहळू सरला दूर होऊन त्याला आईची मूर्ती दिसू लागली.
“उदय, आईला सुखव. ती माऊली वाट पाहात आहे. बाळ, लौकर मोठा हो, माझे कष्ट दूर कर, हे तिचे शब्द का विसरलास? सरलेचे अश्रू तू पाहिलेस, परंतु तुझी आई आज किती वर्षे तुझ्यासाठी रडत आहे. तिचे अश्रू विसरू नकोस.” असे त्याचे हृदय सांगत होते. आईचा विचार करता करता त्याला झोप आली आणि त्याला दोन स्वप्ने पडली. सरला जवळ येऊन बोलत आहे.

“तुम्ही द्याल का मला प्रेम? तुम्ही व्हाल का माझे? मला कोणी नाही, कोणी नाही. कशाला पुसता रक्त? माझ्या हृदयाच्या जखमा प्रेमाचे अमृतांजन लावून बर्‍या करणार नसाल, तर हे रक्त तरी कशाला? हे डोके आपटा. शतचूर्ण करा. नाही तर ते तुम्ही आपल्या मांडीवर घ्या. ते थोपटा. मला जीवन तरी द्या नाही तर तुमच्या हाताने मरण तरी द्या. तुमचे प्रेम नसेल मिळायचे तर तुमच्या हातून मोक्ष तरी मिळो.”

असे सरला बोलत होती. तो स्वप्नातून जागा झाला. परंतु पुन्हा झोपला. आणि पहाटे त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. मातेची मंगलमयी मूर्ती त्याला दिसत होती. कृश मूर्ती. जन्मभर कष्ट करून थकली-भागलेली मूर्ती.

“बाळ, कधी रे मोठा होशील? कधी मला विश्रांती देशील? कधी सुखाने तुझ्याजवळ मी बोलत बसेन? लौकर मोठा हो. चांगला हो. आईला सुखव. सुखवशील ना?” असे माता संबोधीत होती. आणि तो जागा झाला. बाहेर उजाडले होते. आईचे शब्द त्याच्या कानांत घुमत होते, “बाळ, लवकर मोठा हो. चांगला हो.

***