Swaraja Surya Shivray - 19 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वराज्यसूर्य शिवराय - 19

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

स्वराज्यसूर्य शिवराय - 19

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग एकोणीसावा

स्वराज्यसूर्य निसटला

अडकला! स्वराज्यसूर्य अडकला! शहाजी-जिजाऊंचा सुत अडकला! औरंगजेबाच्या पिंजऱ्यात अडकला! स्वराज्याचा,माँसाहेबाचा चेहरा काळवंडला. घात झाला. औरंगजेबाने दगा दिला. शिवरायांना कैदेत टाकले. नजरकैद असली तरीही काय झाले, शेवटी तुरूंग तो तुरूंगच! सततचा खडा पहारा छातीवर! जंगलात एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेला सिंह डरकाळी फोडून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, जाळे कुरतडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो परंतु शिवाजी नामक वाघाला काहीही करता येत नव्हते. त्यांचेवर करडी नजर होती. शिवरायांची किंवा मावळ्याची छोटीशी चूक महागात पडण्याची, जीवावर बेतण्याची शक्यता होती म्हणून तो स्वराज्यसूर्य शांत होता, निमुटपणे सारे सहन करत. औरंगजेबाकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा ती काय? मिर्झाराजेंच्या विश्वासाला तडे दिले, खुद्द त्यांच्या बादशहाने ! कपट, धोका, विश्वासघात, दगाबाजी, लबाडी हे गुण ज्याच्या नसानसात सामावलेले होते, रक्तात मिसळून शरीरातील प्रत्येक अणु-रेणुपर्यंत पोहोचले होते तो तेच करणार, त्याच्या मुळ स्वभावावर जाणार. औरंगजेब त्याच्या गुणांना, कीर्तीला जागला. त्याच्याकडे असलेले दुर्गुण जिंकले. शिवरायांचा विश्वास हरला. ते तळमळत होते, आतल्या आत आक्रंदत होते. परंतु हरले नाहीत, भ्याले नाहीत, हातपाय गाळून बसले नाहीत.त्यांचा विश्वास होता स्वतःवर, त्यांचा विश्वास होता ईश्वराच्या आशीर्वादावर, त्यांचा विश्वास होता माँसाहेबाच्या आशिषावर, त्यांचा विश्वास होता स्वतःच्या चातुर्यावर, त्यांचा विश्वास होता स्वतःच्या सकारात्मक विचारसरणीवर, त्यांचा विश्वास होता स्वतःच्या निर्णयक्षमतेवर, त्यांचा विश्वास होता सोबत असलेल्या सहकाऱ्यांवर, मावळ्यांवर, सैनिकावर! हाच विश्वास शिवरायांची खरी ताकद होती. शिवराय हात पाठीमागे बांधून अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. विचारमग्न होते. काय विचार करत असतील शिवराय? संकटातून बाहेर पडण्याचा, पुन्हा स्वराज्यात, राजगडावर परतण्याचा विचार चालू होता.पण कसे? कसा तोडावा हा पाश?कसा भेदावा हा गळ्याशी पडलेला फास? जयपूर महालात शिवरायांना नजरकैदेत ठेवले होते. महाल कसला तुरुंग होता तो....…

काही दिवस शिवरायांनी जाऊ दिले. नंतर औरंगजेबास एकामागोमाग एक पत्रं लिहून विनंती करत होते, तहानंतर उरलेले सारे किल्ले परत करतो. मी माझ्या माणसात परत जातो. वाटल्यास संभाजीला आग्रा येथे ठेवतो. मी तिकडे परत जात असलो तरी तुम्हाला गरज भासेल तेंव्हा कोणत्याही मोहिमेवर जाईन. मुघलशाही आणि आदिलशाही या युद्धात तुमच्या बाजूने लढतो....मला काशीयात्रा करायची इच्छा आहे तेव्हा काशीविश्वेराच्या दर्शनाला जाऊ द्या अशीही विनंती केली पण औरंगजेब ढिम्म होता, ठाम होता. दिवसेंदिवस जयपूर महालाभोवतीचा सैन्यरूपी फास आवळत होता. रामसिंहाने जे वचन औरंगजेबाला दिले होते त्यातून त्याने रामसिंहाला मोकळे केले. आपल्या षडयंत्रात शिवाजी पक्का अडकलाय, तो आता सुटूच शकत नाही तेव्हा रामसिंहाला कशाला अडचणीत टाकायचे हा विचार त्याच्या डोक्यात शिरला..…

शिवरायांना औरंगजेबाने कैदेत टाकली ही बातमी स्वराज्यात पोहोचली. स्वराज्य सुन्न झाले. स्वराज्याची घडी आता कुठे नीट बसत असताना हे कोणते संकट आले. रयतेला रडू कोसळले. धीरोदात्त म्हणून ख्याती असलेल्या,कोणत्याही संकटाला न घाबरणाऱ्या,प्रसंगी शिवराय, मावळे आणि रयत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या जिजाऊ त्या बातमीने कोलमडल्या. त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांना वाटले, काळीज नसलेल्या दुष्टाने माझ्या बाळांना कोंडलेय, कोण त्यांची सुटका करेल? कुणाला पाठवावे? कोण आहे असा शूरवीर की जो आग्र्याचे चक्रव्यूह भेदून आत अडकलेल्या शिवरायांना सुखरूप स्वराज्यात घेऊन येईल? पण ही गोष्ट अतिशय अवघड होती. ती बातमी मिर्झाराजेंना समजली. ते चिंतेत पडले. औरंगजेबाने धोका दिला, पुढे तो शिवाजीला सहजासहजी सोडणार नाही. कदाचित ....... एका वेगळ्याच शंकेने वेढले. त्यांनी औरंगजेब बादशहाला एक पत्र पाठवून लिहिले,

'शिवाजीला ताबडतोब कैदेतून मुक्त करून ताबडतोब इकडे पाठवावे. शिवाजीला तुरुंगात कोंडून किंवा जीवे मारून काहीही साध्य होणार नाही. तिकडे येतांना शिवाजीने त्याच्या राज्याची अत्यंत चोख आणि मजबूत व्यवस्था केली आहे. त्याचे सैन्य किती चिवट, लढाऊ, पराक्रमी आहे याचा प्रत्यय आम्हाला पुरंदरगडाच्या युद्धात आला. किल्लेदार मारल्या गेला तरी महिनोंमहिने चढाई करूनही मराठे मागे हटलेच नाहीत. ज्यावेळेस तह झाला त्याचवेळी पुरंदर आपल्या ताब्यात आला. त्यामुळे शिवाजी तिकडे अडकला आहे म्हणून त्याचे राज्य आपल्या ताब्यात येईल हा विचार बरोबर नाही. शिवाजीसोबत मित्रत्वाचे नाते जोडून त्याला मुक्त करावे. त्याच्या जीवीत्वाची हमी आम्ही घेतली आहे त्यामुळे बादशहाच्या दरबारात त्यांच्या सरदाराने दिलेला शब्द पाळल्या जातो हा प्रत्यय येईल.....' परंतु धूर्त औरंगजेबाने त्या पत्राकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

शिवराय अत्यंत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. कसला तरी गहन विचार चालू होता कदाचित जगदंबेची प्रार्थना करून तिला साकडे घालणे चालू होते, मार्ग दाखव अशी विनवणी करीत होते. अचानक शिवराय थांबले. ते आपल्या सहकाऱ्यांकडे पाहून जोराने म्हणाले,

"जा. सगळे जण जा. कुणीही मला माझ्या समोर नको. मला मारायचे असेल तर बादशहाला खुशाल मार म्हणावे. तुमचा बळी कशासाठी देऊ?"

ते ऐकून सारे दचकले. परंतु म्हणतात ना, 'समझनेवालों को इशारा काफी है।' याप्रमाणे काही जण बरोबर समजले. पहारा देणारांनीही ते ऐकले. ते आनंदले. शिवा सोबत्यांना जा म्हणतोय, चांगलेच आहे की, खाणारी तोंड कमी होतील. शिवाचे बळ कमी होईल. ती बातमी रामसिंहाला समजली. तो चक्रावून गेला. त्याने माणसं कमी करू नका असे शिवरायांना सुचवले परंतु शिवराय ठाम होते उलट त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज पाठवला की, मी माझ्यासोबत असलेले सैन्य आणि काही माणसं माघारी पाठवू इच्छितो. तशीच परवानगी द्यावी. औरंगजेबाने आनंदाने परवानगी दिली परंतु कागदपत्रांची खानापूर्ती करायला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ घेतला. औरंगजेब कशालाही दाद देत नव्हता. त्याच्या डोक्यात एक सैतानी विचार घोंघावत होता, की ऐनकेनप्रकारे शिवाजी सैन्य माघारी पाठवतच आहे. त्यामुळे त्याचे बळ कमी होत आहे. आग्रा शहरात एका मोठ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण झाले की, शिवाला त्या वाड्यात नेऊन ठेवायचे. संधी साधून त्याला जीवे मारून तिथेच दफन करायचे. संपले सारे. केवढा क्रुर विचार हा.सरळसरळ शिवरायांना जिवंत मारण्याची योजना औरंगजेब आखत होता. त्यावर इलाज काय?....

सापडला. सापडला. औरंगजेबाच्या क्रुर कारवायांना जबरदस्त उत्तर देण्याचा मार्ग सापडला. शिवरायांना रामबाण इलाज सापडला. ठरले. काहीही करून, कसेही करून आग्रा सोडायचा. शिवरायांनी एक बेत आखला. सोबत्यांशी चर्चा केली आणि शिवराय अचानक आजारी पडले. काय झाले ते समजत नव्हते. अचानक आतून कण्हण्याचा आवाज आला. पहारेकरी धावत आले तसे शिवरायांचे कण्हणे वाढले. शिवरायांचे पोट दुखत होते. सोबती धावले. वैद्यबुवा आले. दवापाणी झाले. दुखणे कमी नाही झाले. औरंगजेबाला समजले. एक-दोन दिवसात दुखणे अजून वाढले. कमी होण्याचे नाव नाही. एक वेळ हसणे, रडणे सोपे परंतु काहीही दुखत नसताना आजारी असण्याचे नाटक करणे अवघड परंतु शिवराय तेही बेमालूमपणे वठवत होते. कुणी भेटायला आले की, शिवरायांचा आजार बळावत असे, कण्हणे वाढत असे. शिवरायांच्या आजाराची सोबत्यांना मोठी गंमत वाटत होती. महाराजांची काळजी मदारी मेहतर घेत होता. मन लावून सेवा करीत होता. मदारीचे वय जेमतेम सोळा वर्षे! पण हिंमत फार दांडगी. शरीर मजबूत. 'शिवाजी आजारी पडला.फार मोठा आजार झाला. त्याला आग्र्याचे हवामान मानवत नाही.' अशी चर्चा आग्रा शहरात सुरु झाली. एक लढाई काही अंशी शिवरायांनी जिंकली होती. आता पुढील लढाई. हरहर महादेव!

वैद्यांची औषधी चालू होती. परंतु 'असेल दुवा तर काम करेल दवा!' हा विचार करून शहरातील गरीब, आजारी, ब्राह्मण, फकीर, वैरागी, म्हातारे, गरजू अशा व्यक्तींचा दुवा मिळावा, आशीर्वाद मिळावा यासाठी या लोकांकडे मिठाई पाठवण्याची शिवरायांना मनापासून इच्छा झाली. ही गोष्ट रामसिंहाच्या कानावर गेली. त्याने अनेक पेटारे भरून मिठाई पाठवून दिली. अचानक आलेले पेटारे पाहून पहारेकरी आणि त्यांचा प्रमुख फुलादखानाला आश्चर्य वाटले. त्यांनी पेटारे उघडून तपासणी केली. आत फक्त मिठाई आणि मिठाई! आजारातून लवकर बरे वाटावे म्हणून ती मिठाई वाटायची आहे हे कळल्यावर त्यात त्यांना वावगे काही वाटले नाही. शिवरायांचा आजार आणि त्यावर मिठाई वाटपाचे औषध हा प्रकार दरबारातील सरदार आणि दस्तुरखुद्द औरंगजेबाच्याही कानावर गेला परंतु कुणी काही शंका घेतली नाही कारण असे काही करून शिवराय नाटक करतील आणि धोका देतील ही शंकाच कुणाला येत नव्हती. आली नाही. शिवाजी आता पक्का अडकलाय, तो आता काहीही करणार नाही, करू शकणार नाही या भ्रमात औरंगजेब आणि सारे मुघल होते. तिकडे नित्यनियमाने मिठाई पाठवणे सुरु झाले. पहारेकरी बारकाईने तपासणी करून पेटारे बाहेर जाऊ देत. तपासल्याशिवाय एकही पेटारा बाहेर जात नसे.

शिवरायांचे सैन्य आणि इतर काही जणांना स्वराज्यात पाठविण्याच्या प्रस्तावास दीड महिन्याने औरंगजेबाने परवाने दिली. शिवरायांना आनंद झाला. मनाप्रमाणे, नियोजनाप्रमाणे सारे घडत होते. जड अंतःकरणाने सर्वांनी शिवरायांचा, संभाजी राजेंचा आणि इतरांचा निरोप घेतला. शिवरायांनी पुढील पाऊल टाकले. मिठाई वाटपाचे लाभार्थी वाढवले. शिवरायांची मिठाई आणि त्यासोबत विविध प्रकारच्या भेटवस्तू शहरातील श्रीमंत, नामांकित व्यक्ती यांच्यासह फुलादखान, इतर काही सरदार, पहारेकरी यांच्या घरोघर पोहोचू लागल्या. त्याचा असा परिणाम झाला की, ही मंडळी 'शिवाजी हा चांगला, दिलदार राजा आहे. खानदानी आहे...' असा विचार करून त्यांचे शिवरायांबद्दल चांगले मत होत होते. विरोधातले वातावरण काहीसे निवळू लागले. त्याचा फायदा शिवरायांना पुढे होणार होता. नेहमी जाणाऱ्या पेटाऱ्यात मिठाईशिवाय दुसरे काहीही नसते. फुलादखान आणि कंपनी पेटारा, त्यातील मिठाई याविषयी निश्चिंत झाले होते. ते पाहून शिवरायांनी एक क्रांतिकारी, धाडसी निर्णय घेतला. ऐकणाऱ्या सहकाऱ्यांच्या काळजात चर्रर्र झाले. अंगावर सर्रकन काटा आला परंतु तो धोका पत्करणे आवश्यक होते. एके दिवशी शिवरायांची प्रकृती थोडी जास्त बिघडली. धावपळ वाढली. फुलादखानाला ते समजले. तो आत आला. चौकशी केली. मदारी आणि इतरांनी 'चिंताजनक' असे खुणेने सांगितले. मदारी पाय चेपत होता. इतर मावळे उतरलेल्या चेहऱ्याने अवतीभवती उभे होते.

त्यादिवशी दुपार झाली. नेहमीप्रमाणे पेटारे आले. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. खाणाखुणा झाल्या. निर्णय झाला. आलेल्या पेटाऱ्यातील दोन पेटारे रिकामे होते. सारे कसे नियोजनाप्रमाणे. क्षणाचाही विलंब न करता शिवराय एका पेटाऱ्यात आणि नऊ वर्षाचे बाळ संभाजी दुसऱ्या पेटाऱ्यात बसले. पाहणाऱ्यांच्या पोटात खड्डा पडला. शिवरायांची 'गादी' रिकामी राहणे धोकादायक होते. आधीच ठरल्याप्रमाणे हिरोजी फर्जंदने शिवरायांची जागा घेतली. मदारी मेहतर त्याचे पाय दाबत बसला. हे सारे होताच पेटारे उचलले. बाहेर आणले. सवयीप्रमाणे पहारेकऱ्यांच्या समोर ठेवले. आता खरी परीक्षा. दिव्य परीक्षा. खडतर क्षण. पेटाऱ्याच्या आतील आणि बाहेरील व्यक्ती ईश्वराचा धावा करीत होत्या. सुखरूप सुटका होण्याचे दान मागत होत्या. तो एक क्षण, केवळ एक स्वराज्याच्या दृष्टीने, रयतेच्या दृष्टीने आणि थकलेल्या माँसाहेबाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता हे भवानीमातेला सांगत होते. एक क्षण कृपा कर, ही घडी विस्कटू देऊ नको, मांडलेला डाव मोडू नकोस असे साकडे सांबसदाशिवाच्या चरणी घातल्या जात होते. पहारेकऱ्यांनी पेटारे तपासायला सुरुवात केली. एक-दोन-तीन किती पेटारे पाहावेत बिचाऱ्यांनी? कैक महिन्यांपासून असेच पेटारे जात होते. आत काय तर फक्त मिठाई. एकदिवसही दुसरे काही हाती लागले नाही मग आजच मिठाई शिवाय वेगळे काय असणार? पहारेकऱ्यांनी सुरुवातीचे दोन-तीन पेटारे पाहिले आणि कडक हुकूम दिला, 'जाऊ द्या.'

साडेतीन अक्षरे, दोन शब्द परंतु त्यामुळे पेटाऱ्याच्या आत बाहेर जणू संजीवनी मिळाली. एक स्फूर्ती मिळाली. फार मोठी धनदौलत मिळाली. स्वराज्य मिळाले. पेटारे रोजच्यापेक्षा अधिक वेगाने दौडू लागले. सुटला शेर सुटला. स्वराज्यसूर्य मुक्त झाला. लागलेले ग्रहण सुटले. स्वराज्यावर आलेले काळेकुट्ट ढग हलकेच बाजूला होऊ लागले. त्यातून डोकावू लागली...कोवळी, लुसलुशीत सूर्यप्रकाशाची हवीहवीशी तिरीप! कपटी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन, त्याच्या नाकावर टिच्चून, त्याच्या हेरखात्याच्या डोळ्यात धुळ फेकून मर्दमराठा, शूरवीर, महापराक्रमी, जिजाऊचा सुत, रयतेचा राजा मोठ्या डौलाने, वेगळ्याच आत्मविश्वासाने, एका तेजाने तळपत निघाला होता. कुणालाही शंका येऊ नये, सुगावा लागू नये अशी काळजी घेऊन औरंगजेबासारख्या महादुष्ट, पाताळयंत्री, कारस्थानी, धोकेबाज बादशहाचे दात त्याच्याच घशात घालून, त्याची सारी षडयंत्रे धुळीस मिळवून शिवराय निघाले... रयतेच्या भेटीला! शिवबा निघाला... माँसाहेबाच्या भेटीला!

शिवरायांचे हे धारिष्ट्य बहुमोलाचे होते तर त्यांच्यासोबत असलेल्या मावळ्यांचे धाडस अनमोल होते. हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांच्या धाडसाचे कोणत्या शब्दात वर्णन करावे, काय नाव द्यावे? शिवराय गेल्यानंतर आपण पकडले जाणार, पकडले गेल्यावर काय शिक्षा होईल हे माहिती असूनही ते दोन शूरवीर जणू धगधगत्या अग्नीकुंडात उडी घ्यायला तयार झाले तेही स्वखुशीने! शिवरायांनी स्वराज्यासाठी दिलेली हाक अलगद झेलून. कुणी त्यांच्यावर जबरदस्ती केली नव्हती की कुणाचा तसा आदेश नव्हता तरीही त्यांनी आनंदाने, समाधानाने ती जोखीम स्वीकारली होती, धोका पत्करला होता. अशी माणसे होती म्हणून स्वराज्याचा भगवा डौलाने, दिमाखदारपणे, ताठ मानेने फडकत होता. पेटारे बाहेर पडताना हिरोजी आणि मदारीने आपापल्या जागा घेतल्या. बराच वेळ झाला. शिवराय बरेच दूर गेले असतील या विचाराने हिरोजी, मदारी बाहेर आले. पहारेकऱ्यांनी सवयीप्रमाणे हटकले. तेव्हा 'महाराजांचे डोके दुखत आहे. औषधी आणतो.' असे सांगून ते दोन खंदे वीर बाहेर पडले....…

दुसरा दिवस उजाडला. औरंगजेबाच्या दृष्टीने तो दिवस अत्यंत महत्त्वाचा होता कारण त्याचदिवशी तो शिवरायांना नव्या 'तुरुंगात' नेण्याचा आणि मग तिथेच त्यांना संपवण्याचा कुटील डाव खेळणार होता. परंतु फासे उलटे पडणार आहेत, आपले सारे नियोजन, कुटील कारस्थान धुळीस मिळणार आहे हे त्याला कुठे माहिती होते? तो आनंदाने एक-एक काम पार पाडत असताना अचानक रामसिंह त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. मुजरा करत असताना त्याचा पडलेला, उदास चेहरा पाहून औरंगजेबाने विचारले,

"काय झाले? असा अचानक का आलास?.…

"म..म..माफी असावी. महाराज, भयंकर घटना घडली आहे...."

"क...क...काय झाले?"

"आज सकाळी फुलादखान शिवाजीला भेटायला गेला. परंतु तिथे कुणीच नव्हते...."

"म्हणजे?...गेले असतील त्या बिमार शिवाला दवा आणायला."

"नाही. खाविंद, शिवाजीही नव्हता.... कसे सांगू.....शिवाजी पळाला....."

"काs s य ? शिवा पळाला. सिवा भाग गया? कैसे..."?

झाले. दुसऱ्याच क्षणी 'शिवाजी पळाला...' या बातमीने अख्खं आग्रा शहर कुजबूजू लागलं. आश्चर्याच्या धक्क्याने गारठलं. दुसरा एक धक्का नगरवासियांना बसला की, शिवाजी त्याच्या पोराला घेऊन मिठाईच्या पेटाऱ्यात बसून लंपास झाला. शिवाजी देव आहे, राक्षस आहे की भूत आहे अशा चर्चांना उधाण आले. हिरोजी आणि मदारी निसटले परंतु फुलादखान चिडून, संतापून शिवराय आणि मावळ्यांचा कसून शोध घेत असताना दुर्दैवाने त्याच्या हाती लागले दोन खंदे शूर मावळे....त्र्यंबक डबीर आणि रघुनाथ बल्लाळ ! शिवरायांवरील सारा राग, संताप, चीड, बदला सारे काही त्या दोघांवर बरसू लागले.... त्या भयंकर, क्रुर छळाचा विचारच न केलेला बरा!…

तिकडे पेटाऱ्यात बसून निघालेले शिवराय आग्रा शहरापासून काही अंतरावर जाताच पेटाऱ्यातून बाहेर पडले. नियोजनाप्रमाणे तिथे घोडे घेऊन मावळे तयार होते. शिवराय आणि संभाजी घोड्यावर स्वार झाले. दोघांनीही आपापल्या घोड्यांना टाच मारली. कदाचित त्या मुक्या जनावरांनाही चाहूल लागली होती की, आज आपल्याला एक अद्वितीय कामगिरी बजवायची आहे. एका शूरवीरास सहीसलामत त्याच्या इच्छित स्थळी पोहोचवायचे आहे आणि म्हणून ते घोडे कशाचीही पर्वा न करता दौडत निघाले.... बेफामपणे, बेहोशपणे. दिवस पावसाळ्याचे, रस्ते चिखलाचे, निसरडे पण शिवरायांना कुणी अडविले नाही, अडवू शकले नाही. त्यांना आता एकच ध्यास लागला होता..स्वराज्य! राजगड!! माँ जिजाऊ साहेब!!! त्याच तळमळीने ते अविश्रांत घोडदौड करीत होते. त्याचा परिणाम असा होत असे की, एखादी चौकी, छावणी, गाव ओलांडून शिवराय कितीतरी पुढे निघून गेल्यावर तिथे बादशहाचा निरोप येई की, शिवा पळाला आहे. सावध रहा...... ते बिचारे काय करणार....शिवराय गेले त्या दिशेला बघत राहात..…

राजगड! स्वराज्याची राजधानी! गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत होता. दुःखात होता. जणू आसवासंगे भाकरीचा तुकडा गिळत होता. माँ जिजाऊ राजगडावर होत्या तरीही राजगड उदास होता. चैतन्यहिन, स्फूर्तीहिन होता. खुद्द जिजाऊंची अवस्था तशीच होती आणि का नसावी? त्यांचा शिवबा, आईविना सांभाळलेला नातू संभाजी या दोघांना औरंगजेब नामक अजगराने पक्के आवळून ठेवले होते. सुटका होण्याची कोणतीही शक्यता दिसत नव्हती. सारेजण डोळ्यात तेल घालून शिवरायांची वाट पाहात होते.एक दिवस मोठे आश्चर्य घडले.राजगडावर काही गोसावी आले. त्यांनी प्रत्यक्ष जिजाऊंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा निरोप जिजाऊंकडे गेला. त्यांची परवानगी येताच ते गोसावी लगबगीने निघाले. जिजाऊंसमोर आले. थकलेल्या माँसाहेबांकडे पाहताच एका गोसाव्याने हातातले साहित्य फेकून दिले आणि 'आऊसाहेब...' असा टाहो फोडत तो गोसावी जिजाऊसाहेबांच्या चरणी लीन झाला. दुसऱ्याच क्षणी माँसाहेबाच्या तोंडून आनंदी चित्कार उमटला.....'शिवबा...माझा शिवबा....' त्यांनी शिवबाला उठवले. गच्च धरले. निशब्द! दोघांचेही अश्रू एकमेकांना साद घालत होते. कदाचित ती अनोखी भेट, ह्रदयस्पर्शी सोहळा पाहून काळही थांबला असावा. जेव्हा काळाला वास्तवाची जाण आली तेव्हा जिजाऊ अचानक बाजूला झाल्या. त्या आजूबाजूला काही तरी शोधत होत्या. त्यांनी प्रश्न केला,"शिवबा, संभाजी कुठे आहेत?...." त्या विचारत असताना शिवबांनी मान खाली घातलेली पाहून जिजाऊंच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी शिवरायांचे दोन्ही खांदे जोराने हलवत विचारले,

"शिवबा, आम्ही काय विचारतो, शंभूराजे कुठे आहेत?"

"आऊसाहेब, वाईट बातमी आहे, शंभूराजे आपल्याला सोडून गेले...." ते ऐकताच जिजाऊंचा धीर खचला. त्यांच्या आसवांचा बांध फुटला. दुसऱ्याच क्षणी सर्वत्र बातमी पोहोचली की, शंभूराजे या जगात राहिले नाहीत. माँसाहेबांना दुःख अनावर झालेले पाहून शिवरायांनी त्यांना एकांतात नेले आणि सांगितले,"माँसाहेब, चिंता नसावी. दुःख आवरा. शंभूराजे सुखरूप आहेत. ते मथुरेत सुरक्षित आहेत. औरंगजेबाला हुलकावणी देण्यासाठी आम्हीच तशी बातमी मुद्दाम पेरली आहे...." त्यावर जिजाऊ एवढेच म्हणाल्या,"शिवबा, तुझे राजकारण अनाकलनीय आहे....."

काही दिवस जाताच शंभूराजे, हिराजी, मदारी आणि इतर सुखरूपपणे गडावर पोहोचले. औरंगजेबाच्या तावडीत सापडलेले रघुनाथराव आणि त्र्यंबकपंत यांनाही शिवरायांनी औरंगजेबाकडे विनंती करून, तह करून, आदिलशाही जिंकून देतो असे सांगून राजगडावर मोठ्या सन्मानाने आणले. स्वराज्यसूर्य पुन्हा पूर्वीच्याच ताकदीने, त्याच इर्षेने चमकू लागला...…

नागेश सू. शेवाळकर