Swaraja Surya Shivray - 17 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वराज्यसूर्य शिवराय - 17

Featured Books
Categories
Share

स्वराज्यसूर्य शिवराय - 17

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग सतरावा

पुरंदरचा तह

पुरंदरच्या धुमश्चक्रीत किल्लेदार पडला. परमवीर कोसळला. मरण समोर दिसत असताना नाही खचला. मुरारबाजी शरण नाही गेला. प्रलोभनास नाही भुलला. शिवरायांचा जीवलग अमर झाला. स्वराज्याचा शिलेदार कामी आला. जाताना ताठ मानेने गेला. स्वराज्याचे शिर उंचावून गेला. भगव्याची शान राखत गेला. पुरंदरची शान गेली. अभिमान गेला. पुरंदरवरील मावळ्यांना अतीव दुःख झाले. प्रचंड धक्का बसला.पण त्या बहाद्दरांनी जिद्द सोडली नाही. धीर सोडला नाही. सरदार- किल्लेदार पडला म्हणून वाट मिळेल तिकडे पळत सुटले नाहीत. उलट ते त्वेषाने चवताळून उठले. पुरंदर सोडायचा नाही. मुरारबाजीचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही तर त्या बलिदानाचा बदला घ्यायचा. किल्लेदार पडला म्हणून काय झाले. त्याच्या पठडीत तयार झालेले मावळे मला...या गडाला सहजासहजी शत्रूच्या हवाली करणार नाहीत, हरणार नाहीत ही खात्री तो पुरंदरचा गड बाळगून होता. शिवरायांची शिकवणच तशी होती. किल्लेदार, प्रमुख सरदार जखमी झाला, पडला तरी पळायचे नाही, रणांगण सोडायचे नाही. एक नेता जायबंदी झाला तर दुसरा पुढे करा पण शत्रूला तलवारीचे पाणी पाजल्याशिवाय राहू नका.

तिकडे दिलेरखान आनंदी होता. मुरारबाजी कोसळला याचा अर्थ पुरंदर कोसळला. मावळे भयभीत होऊन शरण येतील, मैदान सोडून पळतील परंतु कसचे काय त्याचा भ्रमनिरास होत गेला. मावळ्यांचा पराक्रम, जिद्द पाहून चक्रावलेला दिलेरखान चवताळला. त्याने पुन्हा एकामागोमाग एक जोरदार हल्ले चढवले. परंतु गडावरील मावळे तेवढ्याच त्वेषाने हल्ले परतवून लावत होते, शत्रूला पाणी पाजत होते. पाहता पाहता दोन महिने झाले. दिलेरखानाला पुरंदर मिळत नव्हता. मावळे प्राणपणाने लढत होते, जखमी होत होते परंतु मागे हटत नव्हते. पुरंदरवरील भगवा डौलाने फडकत होता. ते पाहून दिलेरखानाच्या तळपायाची आग मस्तकात शिरत होती. शिवाजीचा एक एक गड जिंकण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर सारे किल्ले जिंकावेत केंव्हा आणि त्या शिवाजीचा बिमोड करावा कसा हे प्रश्न दिलेरखानाला झोपू देत नव्हते. चिवट, चपळ, शूर, धाडसी, चतुर अशा मावळ्यांना शरण आणावे कसे हा सवाल दिलेरखान सातत्याने स्वतःलाच विचारत होता. दुसरीकडे मिर्झाराजे जयसिंहांनी स्वराज्यावर आक्रमण सुरुच ठेवले होते. शेती, गावांवर आक्रमण करून ते सारे काही लुटत होते. दिवसरात्र त्यांच्या फौजा दहशत पसरवत होत्या. शिवराय का स्वस्थ बसले होते? तेही आपल्या मावळ्यांना हाताशी धरून जमेल तसा शत्रूवर हल्ला चढवून त्याला सळो की पळो करून सोडत होते. ज्या ज्या गडांना मिर्झाराजेंच्या सैन्याने वेढलेय त्या प्रत्येक गडावर रसद पुरवत होते. अचानक त्या वेढ्यावर हल्ला चढवून वेढा खिळखिळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना एका गोष्टीचे वाईट वाटत होते की, मिर्झाराजे जयसिंह यांच्यासारखा अत्यंत पराक्रमी राजपूत औरंगजेबाची चाकरी कशी काय करु शकतो? प्रभूरामचंद्राचे वंशज असणारे मिर्झाराजे स्वराज्याची हानी करतात ही गोष्ट शिवरायांना पटत नव्हती. शिवरायांनी मोठ्या हिमतीने, कष्टाने, एक-एक पान जोडून तोरण तयार केल्याप्रमाणे एक-एक किल्ला मिळवत स्वराज्याचे तोरण बांधले होते. मिर्झाराजेंसारखा स्वकीय वीर त्या तोरणातील एक - एक पान तोडत होता.

तिकडे पुरंदरजवळ असलेल्या छावणीत दिलेरखान संतापला होता. चिडला होता. काय करु आणि काय नको अशी त्याची अवस्था झाली होती. समोर येईल त्याच्यावर तो ओरडत होता.'पुरंदर कोण घेणार? कसा घेणार? सांगा काय उपाय करावा? आहे आणि कुणाजवळ उत्तर?' परंतु सर्व सरदार मान खाली घालून उभे होते. आपल्या सरदारांमध्ये स्फूर्ती यावी, ते चिडून पेटून उठावेतम्हणून दिलेरखानाने मस्तकावरील पागोटे काढले. ते समोर असलेल्या चौरंगावर आपटून म्हणाला,"पुरंदर ताब्यात आल्याशिवाय हे पागोटे डोक्यावर ठेवणार नाही." दिलेरखानाच्या प्रतिज्ञेचा अपेक्षित परिणाम झाला. खानाची सेना चिडली. चवताळली. काहीही करून पुरंदर जिंकलाच पाहिजे या त्वेषाने सारे पेटून उठले. पुरंदरवर जोरदार, निकराचा हल्ला करायचा असा प्रण करून तयारीला लागले.

ती बातमी शिवरायांच्या कानावर गेली. पुरंदरच्या किल्ल्यावर झुंजणाऱ्या मावळ्यांचा त्यांना अभिमान वाटत होता. परंतु हे असे किती दिवस चालणार? मुरारबाजीसारखे किती लोक गमवायचे?शेवटी शिवरायांनी एक निर्णय घेतला. त्यांनी एक पत्र मिर्झाराजे जयसिंह यांना पाठवले. त्यात शिवरायांनी लिहिले, 'राजे, मी आपल्यासारखाच बादशहाचा चाकर आहे. आपली आणि बादशहाची इच्छा असेल तर मी मुघलशाहीचा बराचसा फायदा करू शकतो. तुमच्या मनात असेल तर या डोंगराळ भागात आपण एकत्र मिळून आदिलशाही मुलुख जिंकू शकतो....' शिवरायांचे ते पत्र घेऊन करमाजी जासूद मिर्झाराजेंकडे निघाला. मजल दरमजल करीत करमाजी मिर्झाराजेंच्या छावणीत पोहोचला. शिवाजीकडून माणूस आला ह्या गोष्टीचे जयसिंहांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी करमाजीला बोलावून घेतले. करमाजीने अत्यंत आदराने ते पत्र मिर्झाराजेंना दिले. मिर्झाराजेंनी ते पत्र अतिशय शांतपणे, लक्षपूर्वक ऐकले. त्यांच्या चेहऱ्यावर पुसटशीही प्रतिक्रिया उमटली नाही. अत्यंत विचारपूर्वक त्यांनी शिवरायांना उत्तर लिहिले. त्यात ते म्हणाले,

"औरंगजेब बादशहाची फौज फार मोठी आहे. त्याची गणती करणे अवघड आहे. तुम्हाला हरवून तुमची जहागीर मुघलशाहीत समाविष्ट करायला आम्ही समर्थ आहोत. तुमच्या रयतेचे जीव तुम्हाला वाचवायचे असतील आणि जहागीर बेचिराख होऊ द्यायची नसेल तर शरण या. बादशहाची चाकरी करणे हाही एक सन्मानच असतो....."

मिर्झाराजेंकडून शिवरायांना अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. तरीही त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी अजून एक पत्र जयसिंहांना लिहून कळविले की, मी तुमच्याशी तह करू इच्छित आहे. दोन किल्ले आणि घसघशीत खंडणी द्यायला तयार आहे. शिवरायांच्या अशा पत्राचाही मिर्झाराजेंवर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी उलट लिहिले, 'आता एकच गोष्ट होऊ शकते ती म्हणजे तुमची शरणागती! बादशहाची गुलामगिरी स्वीकार करा.'

ते पत्र वाचून शिवरायांनी सरळसरळ दिलेरखानाला पत्र पाठवले. त्यात त्यांनी तह करायला तयार असल्याचे कळवले परंतु दिलेरखानाने त्या पत्राला फारशी किंमत देता घमेंडीने उत्तर पाठवले. दरम्यान शिवरायांनी आदिलशाहाकडे मदतीसाठी आवाहन केले परंतु शिवरायांनी वेळोवेळी केलेला पराभव, मानहानी लक्षात घेऊन आदिलशाहाने तो प्रस्ताव नाकारला. आदिलशाहीसोबत शिवराय हातमिळवणीची तयारी करत असल्याची बातमी मिर्झाराजेंना समजली आणि ते थोडे अस्वस्थ झाले. त्यांना एका गोष्टीचे भय वाटत होते की, जर खरोखरीच शिवराय आणि आदिलशाहा एक झाले तर आपल्याला भारी पडू शकतात. तितक्यात त्यांना ही बातमीही समजली की, शिवरायांचा दूत रघुनाथपंत हा तहाची बोलणी करण्यासाठी येत आहे. आता जास्त ताणण्यात अर्थ नाही. आपला तह करण्याचा विचार त्यांनी औरंगजेबास कळविला.

दुसरीकडे शिवरायांनीही रयतेचा, मावळ्यांचा विचार करून आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून मिर्झाराजेंशी तह करायचे ठरविले. त्यांनी रघुनाथपंत यांना बोलणी करण्यासाठी पाठवायचे ठरवले. खंडणी म्हणून काही किल्ले आणि स्वराज्याचा काही भाग देण्याचे ठरवले. रघुनाथराव हे अत्यंत हुशार होते. शिवरायांशी सल्लामसलत करुन ते मिर्झाराजे जयसिंह यांच्याशी बोलणी करण्यासाठी निघाले. यथावकाश ते मुघलांच्या छावणीत पोहोचले. शिवरायांचे वकील आले म्हणताच मिर्झाराजेंनी त्यांना सन्मानाने बोलावून घेतले. आदर सत्कार होताच रघुनाथराव यांनी शिवरायांचा निरोप दिला. तो ऐकून मिर्झाराजे म्हणाले,

"फक्त चार किल्ले ? शक्य नाही. आमची तयारी, आमची ताकद शिवाजीची पूर्ण जहागीर ताब्यात घ्यावी अशी आहे. वास्तविक पाहता तह करणे, तशी बोलणी करण्याचा अधिकार मला नाही. परंतु शिवाजी स्वतः होऊन, निशस्त्रपणे अपराध्याप्रमाणे येऊन क्षमा मागत असेल तर काहीतरी घडू शकते."मिर्झाराजे जयसिंह यांचा निर्वाणीचा निरोप घेऊन रघुनाथराव राजगडावर पोहोचले. त्यांनी तो निरोप जशास तसा शिवरायांच्या कानावर घातला. ऐकून शिवराय संतापले. चिडले. 'अपराधी म्हणून जायचे? माफी मागायची ? का म्हणून? स्वराज्य स्थापन करणे हा गुन्हा आहे? रयतेवर होणारे अन्याय दूर करून त्यांना सुखी करणे हा अपराध?' परंतु शिवरायांनी पुन्हा नरमाईचे धोरण स्वीकारले. त्यांनी रघुनाथपंतांना पुन्हा जयसिंहांकडे पाठवले. निरोप दिला की, माझा मुलगा संभाजी ह्यास मी आपल्याकडे पाठवतो. परंतु मिर्झाराजेंनी तो प्रस्तावही फेटाळला आणि निर्वाणीचा निरोप दिला की, 'चालणार नाही. संभाजी नाहीतर तुम्ही स्वतः यायलाच हवे.' पंतांनी तो निरोप शिवरायांकडे पोहोचविला. यावेळी मात्र शिवरायांचा नाइलाज झाला. त्यांना जयसिंहांची अट मान्य करावी लागली तरीही त्यांनी रघुनाथराव यांच्यामार्फत पुन्हा एकदा निरोप पाठवून मागणी केली की, आम्ही आपल्या भेटीला येण्यासाठी तयार आहोत परंतु त्यापूर्वी आपण एक हमी द्यावी की, आम्हाला काही दगाफटका, धोका होणार नाही. शिवरायांचा तो निरोप ऐकून मिर्झाराजे मनोमन खुश झाले परंतु त्यांनी चेहरा निर्विकार ठेवला. रघुनाथराव पंताजवळ त्यांनी शिवरायांना निरोप दिला की, "तुम्ही निर्धास्तपणे भेटायला या. आपण भ्यायची मुळीच गरज नाही. जर आपण बादशहाची नोकरी करायला तयार असाल तर तुमचे सर्व गुन्हे बादशहा पोटात घालतील. प्रत्यक्ष बोलणी करताना ती फिसकटली तर आपण इथून सहीसलामत जाऊ शकाल.कोणताही किंतु बाळगण्याची गरज नाही.औरंगजेब बादशहाची शक्ती फार मोठी आहे. त्याच्याशी शत्रूत्व पत्करून काहीही फायदा होणार नाही. तुम्ही आम्हाला आमच्या पुत्रासारखे आहात. " असे म्हणून जयसिंहांनी रघुनाथराव यांचा मानाची वस्त्रं देऊन सत्कार केला. शिवाय शिवरायांना विश्वास वाटावा, त्यांनी कोणताही संकोच बाळगू नये म्हणून जयसिंहांनी देवाला वाहिलेले तुळशीपत्र आणि बेल पंतांजवळ दिला.

शिवराय तह करण्यासाठी मिर्झाराजेंना भेटायला येणार ही बातमी दिलेरखानाला समजली. तो अजूनही पुरंदर जिंकण्यासाठी धडपडत होता परंतु गडावरील मावळ्यांपुढे त्याचे काही चालत नव्हते. त्याचा प्रत्येक हल्ला मराठा शिलेदार तितक्याच जोरदारपणे परतवून लावत होते. पुरंदर जिंकल्यानंतर शिवराय तहाची बोलणी करायला आले तर ते आपल्या भीतीने आले.अशी बातमी सर्वत्र जाईल आणि आपले वजन औरंगजेबाजवळ वाढेल. म्हणून पुरंदरचा विजय आणि तह या दोन्ही गोष्टींचे श्रेय मिळवण्यासाठी दिलेरखान मरमर करीत होता परंतु शूरवीर शिलेदार त्याचे सारे मनसुबे उधळून लावत होते. प्रसंगी जीवाची बाजी लावत होते. एक-एक करीत गडावरील सैनिक कमी होत होते परंतु उर्वरित मावळे त्याची चिंता करीत नव्हते. त्यामुळे दिलेरखान अधिकच चिडत होता.

रघुनाथराव राजगडावर पोहोचले. त्यांनी मिर्झाराजेंचा निरोप शिवरायांना दिला. दगाफटका होणार नाही ही ग्वाही देण्यासाठी दिलेले तुळशीपत्र आणि बिल्वपत्रही शिवरायांच्या स्वाधीन केले. शिवराय विचारात पडले. त्यांच्या मनात विचार आला, 'स्वराज्याच्या हितासाठी दोन पावले मागे यावे अशीच ईश्वरी इच्छा दिसत आहे. ठिक आहे. कदाचित या संकट समयातूनही बाहेर पडण्याचा आणि पुन्हा नव्या जोमाने स्वराज्याची धुरा सांभाळण्याचा मार्ग निघणार असेल. ' असा विचार करून शिवरायांनी मिर्झाराजेंना भेटायला जायचा निर्णय घेतला. फार उशीर करून उपयोग नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी निघण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे सर्वांना विश्वासात घेऊन, चर्चा करून, व्यवस्थित नियोजन करून शिवराय निघाले. राजगडावर असलेल्या भवानीमातेचे, शिवशंकराचे दर्शन घेतले. माँ जिजाऊ गडावर नव्हत्या. शिवरायांची पालखी दौडत निघाली. अगोदर शिवराय शिवापुरच्या दिशेने निघाले. तिथे सरफराजखान हा जयसिंहांचा सरदार तळ ठोकून होता. त्याला सोबत घेऊन पुढे जावे याविचाराने शिवराय शिवापूर येथे पोहोचले. अगोदर निरोप गेल्यामुळे खान तयार होता. खानाला सोबत घेऊन शिवराय मिर्झाराजेंना भेटायला निघाले. शिवापूर ते पुरंदरचे अंतर जेमतेम पाच कोस. शिवराय शिवापुरहून निघाले आणि ते लवकरच दाखल होत आहेत ही बातमी मिर्झाराजेंच्या छावणीत वणव्याप्रमाणे पसरली. 'शिवाजी येणार? कधी?कुठून? काय करेल शिवाजी? नेहमीप्रमाणे दगाफटका तर करणार नाही ना? मोठमोठ्या सरदारांना पाणी पाजणारा शिवाजी इथे नवीन काही करामत करणार तर नाही? वेगळाच काही गोंधळ घालणार नाही?' असे प्रश्न मिर्झाराजे यांच्या सैनिकांना पडू लागले. शिवरायांबद्दल कौतुक, आश्चर्य, सन्मान, कुतूहल, भीती, उत्सुकता अशा अनेक भावनांचे मिश्रण फौजेत पसरले होते. …

आले. आले. ठरल्याप्रमाणे शिवराय आले. मिर्झाराजेंच्या छावणीपासून काही अंतरावर शिवराय थांबले असल्याची बातमी खुद्द रघुनाथराव पंत घेऊन आले. पंत राजेंना भेटले. ती बातमी ऐकून नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर कोणताही भाव दिसू देता मिर्झाराजे सरदार उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुनशी यांना म्हणाले, "तुम्ही दोघांनी जाऊन शिवाजीचे स्वागत करा. त्यांना एक निरोप द्या. म्हणावे, तुमच्याकडे असलेले सारे किल्ले आमच्या स्वाधीन करणार असाल तर भेटीला या आणि ही अट मान्य नसेल तर परस्पर, भेटता निघून गेले तरी आमची हरकत नाही." दोघे शिवरायांजवळ आले. त्यांनी शिवरायांचे यथोचित स्वागत केले. मिर्झाराजेंचा निरोप शिवरायांना दिला. त्यावर शिवराय म्हणाले,"मला सर्व मान्य आहे. मी किल्ले द्यायला तयार आहे. चला." असे म्हणत शिवराय त्या दोघांसोबत निघाले. छावणीजवळ येताच आतून जयसिंहांचा दूत जानी बेग याने पुन्हा शिवरायांचे स्वागत केले. स्वतः मिर्झाराजे मात्र आतच बसून राहिले. शिवरायांनी आत प्रवेश केला. त्यावेळी मिर्झाराजे फक्त उठून उभे राहिले. त्यांना पाहताच शिवराय दोन्ही हात पसरून त्यांच्या दिशेने निघाल्याचे पाहून मिर्झाराजेंच्या काळजात चर्रर्र झाले. त्यांच्या डोळ्यासमोर खाडकन शिवराय आणि अफजलखानाच्या भेटीचे चित्र आले. त्यांच्या मनात एक विचार चमकला की, 'शिवाजीने अशीच मिठी मारून खानाची आतडी बाहेर काढली होती. आपल्यासोबत तर शिवाजी तोच खेळ खेळण्याचा विचार करीत नसावा?' असा विचार करताना मिर्झाराजे एक गोष्ट मात्र विसरत होते की, अफजलखानाने पुढाकार घेऊन शिवरायांवर पहिला वार केला होता. शिवरायांनी स्वतः अगोदर वार केला नव्हता. अफजलखानाची मंशा लक्षात आल्यानंतर शिवरायांनी स्वसंरक्षणार्थ खानावर हल्ला केला होता. तितक्यात त्यांच्याजवळ आलेल्या शिवरायांनी स्वतः होऊन मिर्झाराजेंना मिठीत घेतले. मिर्झाराजे स्थितप्रज्ञ राहिले. त्यांची तशी थंड प्रतिक्रिया पाहून शिवराय मनोमन काय ते समजले आणि ते दूर झाले. मिर्झाराजेंचे सुरुवातीपासूनचे वागणे शिवरायांना खटकत होते परंतु सारे काही सहन करत, आतल्या आत दाबत शिवराय पुढे पाऊल टाकत होते. मिर्झाराजेंनी शिवरायांना जवळ बसवून घेतले. समोर शिवरायांचा पुरंदर झुंजत होता, दिलेरखानाला झुलवत होता. शिवरायांच्या साक्षीने पुरंदरवर तोफांचा मारा सुरु होता. किल्ल्याची ती अवस्था पाहून शिवराय गहिवरले. परंतु तसे दाखवता ते म्हणाले, "मिर्झाराजे, पुरंदरचा गड मी आपणास, मुघलशाहीला भेट देत आहे." ते ऐकून हसत हसत राजे म्हणाले," पुरंदर तर आता आमचा आहे. काही क्षणात माझे सैन्य गडावर आमच निशाण फडकवेल आणि मग गडावर तुमचा एकही माणूस शिल्लक राहणार नाही."

"राजे, गडावरील लोकांना इजा करू नये अशी विनंती आहे. मी या क्षणापासून औरंगजेब बादशहाची चाकरी स्वीकारतो. मावळे स्वतःच किल्ला आपल्या स्वाधीन करतील."

"ठिक आहे..." असे म्हणत मिर्झाराजेंनी एक सरदार दिलेरखानाकडे पाठवून सांगितले की, 'पुरंदर गडावरील हल्ले थांबवा. शिवाजी स्वतःच गडाचा ताबा द्यायला तयार आहेत. गडावरील माणसांना कोणतीही इजा करू नये.'

राजांच्या सरदारासोबत शिवरायांचा एक सरदार होता. त्याने गडावर जाऊन शूर शिलेदारांना शिवरायांचा निरोप सांगितला की, आता लढायचे नाही. गड दिलेरखानाच्या ताब्यात द्यावा आणि सर्वांनी गडाखाली यावे. रात्री उशिरापर्यंत तहाची बोलणी सुरू होती. शिवरायांचे सर्व किल्ले हवेत यावर मिर्झाराजे ठाम होते ते मागे हटायला तयार नव्हते. शेवटी हो- ना करता तह झाला. अटी ठरल्या. ते सर्व ठरवताना शिवरायांना अतीव दुःख झाले. शिवराय तह करायला आले आहेत याचा अर्थ ते घाबरले आहेत असा करून मिर्झाराजेंनी बरेच ओरबाडून काढले, पिळून काढले. थोडेथोडके नाहीतर अत्यंत पराक्रमाने कमावलेले तेवीस किल्ले शिवरायांनी द्यावेत ही अट शेवटी शिवरायांना मान्यच करावी लागली. दुसरा पर्याय नव्हता, इलाज नव्हता. सोबतच चार लक्ष होनांचा (म्हणजे अंदाजे सोळा लाख रुपये) मुलुखही मुघलांना देण्याचे शिवरायांना कबूल करावे लागले. अशाप्रकारे स्वराज्याचा फार मोठा लचका जयसिंहांनी तोडून घेतला. त्या करारानंतर स्वराज्यात बारा किल्ले आणि एक लाख होन (म्हणजे जवळपास चार लाख रुपये ) वसुलीसाठी मुलुख शिल्लक राहिला. त्यानंतर जयसिंहांनी पुढचा डाव खेळला.त्यांनी शिवरायांनाऔरंगजेबाच्या चाकरीत येण्याची अट घातली. चाकरी, नोकरी आणि तीही मुघलशाहीत.. ते ऐकून शिवराय प्रचंड चिडले. परंतु त्यांनी स्वतःचा राग आतच दाबला. रागराग करण्याची वेळ नाही हे जाणून शिवराय शांतपणे म्हणाले,

"आतापर्यंत मी जे वागलो त्यामुळे मी बादशहाला तोंड दाखवावे असे मला वाटत नाही. माझा मुलगा संभाजी यास मी औरंगजेबाच्या सेवेत रुजू करतो. मी इकडेच राहून बादशहा सांगतील ती कामगिरी इमानेइतबारे पार पाडतो. माझ्या ताब्यातील कोकणाच्या शेजारच्या भागात आदिलशाही मुलुख आहे. बादशहाची परवानगी असेल तर तो मुलुख जिंकून मी दरबारी पेश करतो." जयसिंहांनी त्यास मान्यता दिली. रीतसर तहाचा कागद तयार झाला त्यावर शिक्के उमटले. मिर्झाराजेंच्या इच्छेनुसार शिवरायांनी पुरंदर गडावर जाऊन दिलेरखानाची भेट घेतली. सारे काही मिर्झाराजे जयसिंह यांच्या मनानुसार घडले आणि शिवरायांनी त्यांचा निरोप घेतला. दुःखी कष्टी अवस्थेत शिवराय राजगडाकडे निघाले.…

नागेश सू. शेवाळकर