Swaraja Surya Shivray - 5 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वराज्यसूर्य शिवराय - 5

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

स्वराज्यसूर्य शिवराय - 5

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग पाच

॥॥ बालपणीचा शिवबा ॥॥

शिवाजी! सुत जिजाऊचा ! पुत्र शहाजींचा ! नातू मालोजींचा ! वारस भोसले घराण्याचा !शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाईदेवीला जिजाऊ नवस बोलल्या, शिवाईमातेने कौल दिला. जिजाऊला पुत्ररत्न प्राप्त झाले. नाव शिवाजी ठेवले. बाळ शिवाजीला सारेजण लाडाने शिवबा म्हणून बोलावू लागले. शिवबा जिजाऊच्या कुशीत, दासींच्या निगराणीत वाढू लागला, बाळसे धरू लागला. लहान बालकावर लहानपणी भोसले घराण्यातील परंपरेप्रमाणे सारे संस्कार, अनेक विधी जिजाऊ करवून घेत होत्या. भोसले घराण्याचे उपाध्याय मल्हार आर्वीकर हे सारे विधी यथासांग करण्यासाठी शिवनेरीवर आले होते. शिवबा अजूनही त्या बाळंतपण झालेल्या खोलीमध्येच होते. त्यांना खोलीबाहेर आणून प्रथम उगवत्या सूर्याचे दर्शन देण्याचा, सूर्याची भेट घेण्याचा एक संस्कार शहाजींच्या घराण्यात होता. त्याप्रमाणे मल्हारराव गुरूंनी मुहूर्त काढून दिला. शिवबा खोलीबाहेर येणार, उगवत्या रवीसोबत या जगाचे दर्शन घेणार म्हणून गडावर घाई गडबड सुरु झाली. दिलेला मुहूर्त टळू नये म्हणून दासींनी शिवबाला योग्य वेळी तयार केले. शिवबा जिजाऊंच्या कुशीत, हातावर ऐटीत बसून खोलीबाहेर आला. बाह्यजगाचे पहिले दर्शन तेही एका गडाचे ....शिवनेरीचे! एका बळकट किल्ल्याचे ! काय असेल नियतीच्या मनात ! त्यानंतर शिवबाने कायम गडावर वास्तव्य करावे, अनेकानेक किल्ले स्वराज्यात बांधावे, शत्रूच्या ताब्यात असलेले गडकोट जिंकून घ्यावेत असे तर नियतीच्या मनात नव्हते? त्यावेळी ह्या प्रश्नाचे उत्तर कुणाला ठाऊक होते? हा प्रश्न कुणाला पडला असेल? सारे काही त्या ईश्वराच्या मर्जीनुसार घडत होते, घडणार होते.

शिवबा बाहेर आला. भटजींनी मंत्र म्हटले. जिजाऊंनी शिवबाचा चेहरा भास्कराकडे हलकेच वळवला. शिवबाने उगवत्या, मनमोहक छटा पसरलेल्या सूर्याचे दर्शन घेतले. सूर्यदेवानेही स्वतःच्या किरणांनी तेजोमय झालेल्या शिवबाकडे पाहिले असेल. दोघांनीही एकमेकांचे दर्शन घेतले. दोघेही आनंदले असतील. शिवबाच्या या पहिल्या छोट्या सीमोल्लंघनाने सूर्यही प्रभावित होऊन मनोमन म्हणाला असेल, 'बाळ, शिवबा, पाहून घे सारे. शिकून घे सारे. दररोज सकाळी ही सृष्टी जशी माझी आतुरतेने वाट पाहते तशीच ही रयत, ही जनता, भोळेभाबडे लोक, या शाही कारभाराला कंटाळलेले आबालवृद्ध अशाच एका सूर्याची, अशाच एका पराक्रमी पुरुषाची वाट पाहात आहेत. जो माणूस या धरतीवर पसरलेला अन्यायाचा अंधकार, वर्षानुवर्षे डोक्यावर वास्तव्य करून असलेले पारतंत्र्याचे काळेकुट्ट ढग पांगवून मोकळा सूर्य, स्वातंत्र्याच्या तेजोमय प्रकाशाची पाखरण करेल आणि शिवबा हे काम तुला करावयाचे आहे. करशील ना? करायलाच पाहिजे. मला विश्वास आहे.'

झाले. परंपरेने, विधीयुक्त सूर्यदेवाचे दर्शन घेतले. खोलीतून पहिल्यांदा बाहेर आलेल्या, बाहेरच्या स्वच्छ परंतु गडद प्रकाशाने, तेजोमय... कोमल रविकिरणांनी शिवबाचे डोळे दिपलेही असतील परंतु त्या शरीरावर खेळणाऱ्या त्या किरणांमुळे शिवबा उत्साही झाले असतील, मातेच्या पोटात असताना जुलमी राजवटींच्या कथा ऐकणारे शिवाजी प्रेरित झाले असतील. एका वेगळ्याच स्फूर्तीने, आत्मविश्वासाने त्यांनी रविराजांकडे पाहून स्मित केले असेल, कदाचित नकळत, कुणालाही समजता त्यांनी हाताच्या मुठी आवळून प्रत्यक्ष सूर्यालाही सांगितले असेल,

'हे सूर्यदेवा, तुझ्या दर्शनाने मला वेगळेच बळ मिळाले आहे, निराळी शक्ती मिळाली आहे. हे भास्करा, काळजी नसावी. तुझ्याच आशीर्वादाने आणि इच्छेने सारे घडणार आहे. कर्ता करविता तू आहेस. मी निमित्तमात्र आहे. तुला जे हवं ते माझ्या हातून घडवून येण्यासाठी आशीर्वाद दे, ताकद दे......'

शिवबा कलेकलेने वाढत होता. तो सर्वांचा लाडका होता. शिवबाचे बालरुपही होतेच तसे... राजबिंडे! नजर खिळवून ठेवणारे. मोहक, आकर्षक असे. त्याचे हसणे म्हणजे जीव ओवाळून टाकावे असे लाघवी, मधाळ. दासींनी घातलेले कपडे, अलंकार असा केलेला साजशृंगार पाहिला की शिवबाला पटकन उचलून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असे. ज्याच्या हाती पडे त्याला सोडावेसे वाटत नसे. कुठे ठेवू, कुठे नको. खायला काय देऊ नि काय नको अशी अवस्था होऊन जाई. पाहता पाहता जिजाऊंचा शिवाजी त्यांचा एकटीचा राहिला नाही तो सर्वांचा लाडका शिवबा झाला. शिवनेरीचे वातावरण, परिसर ही कसा हवाहवासा, मनमुराद आनंद देणारा होता. शिवबाने शिवनेरीस आपलेसे केले की, शिवनेरीने शिवबास वेड लावले हे त्या विधात्याला माहिती परंतु शिवबा शिवनेरीवर रमला, रंगला, खेळू लागला. एक दिवस बाळ शिवबा रांगू लागला. ते पाहून जिजामाता आनंदल्या. सोबतच त्यांच्यावरील, दासींवरील जबाबदारी अधिकच वाढली. शिवबा चपळ होता, चलाख होता कधी कुणाची नजर चुकवून बाहेर जाईल याचा नेम नव्हता. आणि झाले ही तसेच. एके दिवशी जिजाऊंच्या आसपास, नोकराणींच्या निगराणीत खेळत असलेला शिवबा सर्वांचा डोळा चुकवून रांगत रांगत अंगणात आला. शिवनेरीचे अंगण ते. भव्य असे. दुसऱ्याच क्षणी जिजाऊच्या लक्षात आले, शिवबा खोलीत नाही. काळजाचे पाणी झाले. शरीरातील प्राण जणू निघून गेले. खोली तरी लहान होती काय? गडावरील महाल तो. सर्वत्र शोधाशोध झाली परंतु शिवबा खोलीत नव्हता. एक दासी बाहेर पळाली. इकडेतिकडे पाहू लागली आणि तिचा जीव ते दृश्य पाहून भांड्यात पडला. अत्यानंदाने ती ओरडली,

"आऊसाहेब, सापडले. शिवबा सापडले..."

तिने तसे म्हणायला अवकाश आतून सारे धावून आले. पाहतात तर काय शिवबा आवडीने, मिटक्या मारत, रममाण होऊन काहीतरी खात होता. काय खात होता? अहो, तो शिवनेरीवरील मातीचा आस्वाद घेत होता. ते पाहून जिजामातेने काय करावे? हसावे? रागवावे की मार द्यावा. जिजाऊ पुढे झाल्या त्यांनी मोठ्या कौतुकाने शिवबास उचलून कडेवर घेतले. शिवनेरीवरील मातीने माखलेल्या शिवबाच्या गालावर ओठ टेकवले. पाहणाऱ्यांना जिजामातेच्या त्या कृत्याचे नवल वाटले, आश्चर्य वाटले. पण जिजाऊला माहिती होते त्या मातीचे गुण, त्या मातीत असणारी पौष्टिकता. हीच माती शिवबाचे सर्वस्व ठरणार होती. ह्याच मातीवर पदोपदी होणारा अन्याय, याच मातीला होणारा स्वकियांच्या, निरपराध, गोरगरीब लोकांच्या रक्ताच्या अभिषेकाचा वास असणार आहे. हाच रक्तांछित वास शिवबामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे स्फूल्लिंग चेतवणार आहे, पराक्रमाची, धाडसाची बीजे रोवणार आहे आणि म्हणून जिजाऊ शिवरायांच्या त्या पहिल्या वहिल्या उंबरा ओलांडून बाहेर येऊन धरतीमातेला आश्वासित करणाऱ्या त्या कृत्याने आनंदित झाल्या असतील, समाधानी झाल्या असतील.

दिवसेंदिवस शिवबाच्या खोड्या वाढत होत्या. तो तसा खोडकर होता. जसा हसरा, खेळकर होता तसेच त्याला रडूही फार लवकर येत असे. मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही की शिवबा पटकन गळा काढत असे. एकदा शिवबा असाच साध्या कारणाने रडत असताना जिजाऊला काय वाटले कोण जाणे परंतु त्या शिवबाकडे पाहून म्हणाल्या,

"शिवबा, हे असे छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडणे बरे नाही हं. बाळा, रडणे हे भित्रेपणाचे काम आहे. भोसले घराण्यातील शूरवीरांचे नाही. आपल्या जहागीरीत आणि महाराष्ट्रात सत्तापिपासू, क्रूर लोकांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या जुलुमशाहीला कंटाळलेली, त्रासलेली आपली मराठमोळी जनता एक नाही, दोन नाहीतर तीनशेहून अधिक वर्षांपासून अशीच रडते आहे. शिवबा, तुला या लोकांचे रडणे थांबवायचे आहे. या प्रदेशात स्वातंत्र्याचा सूर्य आणणे हे तुला करावे लागणार आहे...." बाळ शिवबाला हे बोल किती समजले किती नाही परंतु त्याने जणू एक गोष्ट कायम ठेवली ती ही की, 'रडायचे नाही. रडणे हे भित्रेपणाचे काम आहे.'

रांगणारा शिवबा हळूहळू उभा राहू लागला ते पाहून जिजाऊ आणि इतरांना खूप आनंद होत असे. संततीची होणारी प्रगती, विकास नैसर्गिकरित्या होत असला तरीही तो आपल्या नजरेसमोर, टप्प्याटप्प्याने होत असलेला पाहून मातेला अवर्णनीय आनंद होत असतो. बाळाचे उठणे, बसणे, रांगणे, धावणे, बोबडे बोल हे सारे आईसाठी एक अलौकिक, अनमोल असा ठेवा असतो. बाळाच्या निरनिराळ्या प्रकारच्या क्रीडा मातेच्या शरीरात पंचप्राण फुंकतात. जिजाऊचेही तसेच झाले. हर्षोल्हासित झालेल्या जिजाऊंचा सारा वेळ शिवबाच्या बालक्रिडा कौतुकाने पाहण्यात जाऊ लागला. लहानशा शिवबाने पुढले पाऊल टाकले. शिवबा आता पावला पावलाने चालू लागला. दुडूदुडू धावत जाऊ लागला. बालकाला एकदा पाऊल फुटले की त्याला एखादे मैदानही पुरत नाही. शिवबाचे ही तसेच झाले. जिजाऊला वाटे,'अरे, शिवबाला तर उद्या कदाचित शिवनेरीचे हे विस्तीर्ण पटांगणही पुरणार नाही. असेच होणे गरजेचे आहे. शिवबाची पावलं एका ठिकाणी थांबणारी नाहीत. ती संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करणारी आहेत. त्या पावलांना हरणाची गती, चित्याची झेप मिळाली पाहिजे. शिवबाच्या पावलांच्या आवाजाने शत्रू थरथर कापला पाहिजे. त्याचवेळी त्या पावलांच्या आवाजाने रयतेला, गोरगरीबांना दिलासा मिळाला पाहिजे. आपला कुणीतरी आपले रक्षण करण्यासाठी समर्थ आहे हा विश्वास निर्माण झाला पाहिजे....'

दुसरीकडे शिवबालाही शिवनेरीवरील मातीवर प्रेम जडले. एखाद्या मल्लाने आखाड्यात उतरल्यावर तिथली माती भाळी लावून, सर्वांगावर फासावी त्याप्रमाणे शिवबा ती माती स्वतःच्या अंगाला फासत असे. शिवनेरीवर शिवबाला छोटे छोटे मित्रही मिळाले. ह्या आपल्या बालमंडळीमध्ये शिवबा तहानभूक विसरून रमून जात असे. या सवंगड्यासोबत शिवबा लपंडाव, आंधळी कोशिंबीर, चेंडू आणि भोवरा असे नानाविध खेळ खेळण्यात इतका रमून जात असे की, दासी शिवबाला जेवायला बोलवायला येत असे परंतु शिवबा त्यांना दाद देत नसे आणि मग ती 'खिंड' लढवायला खुद्द जिजाऊंना यावे लागे. आपल्याला जेवायला नेण्यासाठी आऊसाहेब येत आहेत हे समजले की, मात्र शिवबा दूरवर पळून जात असे. परंतु जिजाऊंच्या मदतीला दासी धावून येत आणि मग त्या 'छोट्याशा' सरदाराला 'धरपकड' करून आणल्या जाई त्यावेळी शिवबाच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव पाहून जिजाऊंचा सारा त्रास, त्रागा, राग सारे काही विरघळून जाई. या मित्रांसोबत खेळताना शिवबा पोपट, कोकिळा, वाघ यांचे आवाज काढण्यात तरबेज झाला. काही दिवसातच शिवबा अनेक प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढू लागला. मधून मधून खेळता खेळता शिवबा त्याच्या मित्रांसोबत त्यांच्या घरी, झोपडीतही जात असे. भूक लागलेली असली की, त्या मित्रांसोबत कांदाभाकर किंवा जे तयार असेल ते मिटक्या मारत खात असे. ते पाहून जिथे त्या गरिबांना शिवबाच्या कृतीचे कौतुक वाटे तिथे त्यांचे डोळेही पाणावलेले असत.

शिवबा सवंगड्यासोबत निरनिराळे खेळ खेळत असे. मातीत खेळणे त्याला जसे आवडत असे तसेच त्याला मातींचे हत्ती, घोडे तयार करून खेळणे फार आवडत असे. शिवबाची आवड पाहून जिजाऊ आणि दासी त्याला मातीचे प्राणी तयार करून देत असत. शिवबा येथेच थांबत नसे. शिवनेरी किल्ल्यावर असलेली माती ही त्याला अत्यंत आवडत असे. त्या मातीचे ढिगारे करून शिवबाला आणि त्याच्या मित्रांना त्या ढिगाऱ्याला गड, किल्ला असे म्हणणे आवडत असे. इतके करुन शिवबा थांबायचा नाही. गड, किल्ला म्हटले की, राजा लागतोच आणि मग शिवबा त्या गडाचे राजे होत असत. त्या छोट्या वसाहतीला 'राज्य' म्हणून ओळखले जाई. राज्य, जहागिरी म्हटले की, शत्रू हा ठरलेलाच ना. हे लक्षात घेऊन ही छोटी मंडळी त्यांच्यापैकीच कुणाला तरी 'शत्रू' ठरवायचे. मग हलके हलके सैन्य जमविणे, हत्ती-घोडे तयार केले जात. मग ती स्वराज्याची अर्थात शिवबाची शत्रूमंडळी शिवबाच्या गडकिल्ल्यांवर हल्ला करायची पण त्यावेळी एक गमतीदार प्रश्न पुढे येत असे की, त्यांच्या फौजेत असलेले हत्ती, घोडे हे पळतच नसत. ते पळणार तरी कसे? ते तर मातीचे. पण शेवटी ही फौज त्यांना स्वतःच्या हाताने धरून पळवत. काही क्षणात शिवबाचे सैन्य आणि 'शत्रू'चे सैन्य समोरासमोर आले की, मग त्यांच्यामध्ये लढाई होई. लढाई, स्वराज्य म्हटले की, झेंडे असायलाच पाहिजेत. तेही मिळवले जात. डौलाने तेही फडकत. विशेषकरून जेंव्हा शिवबाच्या सैन्याचा विजय होत असे त्यावेळी ते ध्वज अत्यंत अभिमानाने उंचच उंच जात असत. सोबतच बालकांनी केलेल्या 'हर हर महादेव' या घोषणांनी शिवनेरीचा सारा परिसर दुमदुमून जात असे. दुरून जिजामाता मुलांची ही लुटुपुटूची लढाई मोठ्या आनंदाने, कौतुकाने पाहात असत. त्यांना त्या छोट्या लढाईत लपलेली लढाऊ, पराक्रमी, धाडसी स्वराज्याची सेना दिसत होती. त्यांच्या तलवारीच्या घावाने जखमी होऊन तडफणारी, जीवाची भीक मागणारी शत्रूसेना दिसत होती. लहानशा शिवबाच्या ऐवजी मोठा झालेला, तरणाबांड, प्रचंड पराक्रमी असा शिवबा..... शिवाजी महाराज दिसत होते. जनतेला हवा असलेले, स्वतः जिजाऊंना हवा असलेले हिंदवी स्वराज्याचा कलश घेतलेले शिवाजी महाराज दिसत होते. आज ही बाळं जी लढाई खेळत आहेत, लुटुपुटूच्या लढाईचा आनंद लुटत आहेत, गडकिल्ले जिंकून पराक्रमी होत आहेत हेच आहेत उद्याचे महापराक्रमी शूरवीर, स्वातंत्र्य निर्माते! स्वराज्याचे पूजक, रक्षक आहेत. आज यांच्या फौजेत असणारे हे निष्प्राण प्राणी उद्या मात्र जिवंत होऊन, आक्राळविक्राळ रूप घेऊन खरेखुरे हत्ती, उंट, घोडे बनून शत्रूंची दाणादाण उडवताना शिवबाला स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मदत करतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिजाऊ सायंकाळी देवघरातील देवापुढे दिवा लागला की, शिवबाला जवळ बसवून घ्यायच्या. त्याला राम, कृष्ण, भीमार्जून, अभिमन्यू या सर्वांनी गाजवलेल्या पराक्रमांच्या गोष्टी सांगायच्या. ह्या पराक्रमी वीरांच्या शौर्यगाथा शिवबाला मनापासून आवडत तो लक्षपूर्वक त्या साऱ्या गोष्टी ऐकत असे. ह्या पराक्रमाच्या कथा ऐकताना शिवबानांही मनापासून असे वाटायचे की, आपणही मोठे झालो की, असेच पराक्रम गाजवायला हवेत.शत्रूला हरवायला हवे. यासोबतच ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथांचे अभंग, गोष्टी ऐकणे शिवबांना खूप आवडत असे. त्यांनी बजावलेली कामगिरी ऐकून साधुसंत यांच्याबद्दल शिवबाच्या मनात पराकोटीचा आनंद निर्माण होई, त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. शिवनेरीवर जिजाऊ बाल शिवाजीच्या बाललीलेत जरी गुंग झालेल्या असल्या, आनंदी, समाधानी वाटत असल्यातरी त्यांचे लक्ष शहाजीराजे यांच्याकडे लागलेले असायचे कारण राजांना म्हणावे तसे स्थैर्य, समाधान लाभलेच नव्हते. त्यांची सारखी धावपळ, लढाया चालू असायच्या. कधी कुणासाठी लढायचे तर कधी कुणाला विजय मिळवून द्यायचा. स्वतःच्या पदरात काय तर कधी शाबासकी, कधी बढती, मधूनच बदली. सारखे फिरतीवर राहावे लागायचे. आपल्या बाळाला... शिवबाला पहिल्यांदा भेटायला शहाजीराजे शिवनेरीवर आले. गडावर पुन्हा आनंदाचे भरते आले. हर्षोल्हासित झालेल्या जिजाऊंनी शिवबाला राजांच्या हातात दिले. शहाजींनी मोठ्या प्रेमाने, हलकेच शिवबाला घेतले आणि क्षणभर भान विसरून ते शिवबाचे राजबिंडे, सुकोमल, हसरे मुख पाहातच राहिले. पुत्रभेटीने राजे एवढे आनंदी झाले की, त्यांनी दासदासी, नोकरचाकर प्रत्येकाला मौल्यवान भेटीची, बक्षिसांची खैरात वाटली. राजांना झालेला आनंद पाहून जिजाऊंनाही खूप आनंद होत होता. काही दिवस शिवनेरीवर राहून शहाजीराजे पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू झाले. ते पराक्रमाची पराकाष्ठा करीत होते. शहाजींचा दरारा सर्वत्र वाढत होता. मात्र स्थैर्य प्राप्त होत नव्हते. निजामशाही उतरणीला लागली होती परंतु शहाजीराजे यांनी काही सरदार मंडळीला हाताशी धरून निजामशाही जिवंत ठेवण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी निजामाच्या वंशातील एका मुलाला निजामाच्या गादीवर बसवून त्याला निजाम म्हणून घोषित केले. एका अर्थाने शहाजी भोसले त्या निजामशाहीचे राजे झाले. ह्या राज्याच्या सीमा वाढाव्यात म्हणून शहाजीराजे पराक्रमाची पराकाष्ठा करीत होते. या कामासाठी शहाजींनी आदिलशाहीची मदत घेतली. सुरुवातीला काही काळ आदिलशाहा राजेंच्या सोबत राहिला परंतु मुघल बादशहा शाहजहान हा स्वतः शहाजीराजेंचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेकडे चालून आला. त्याने आदिलशाहाला या युद्धापासून दूर राहण्यासाठी पर्यायाने शहाजींना मदत करण्याचे फर्मावले. आदिलशाहने शहाजींराजेंसोबत असलेले संबंध तोडले. परिणामी शहाजीराजे एकटे पडले. मुघलासारख्या प्रबळ शत्रूशी दोन हात करणे एकट्याने शक्य नाही हे लक्षात घेऊन शहाजीराजे मुघलांना शरण गेले. अशाप्रकारे शहाजीराजांचा स्वराज्य स्थापन करण्याचा अजून एक प्रयत्न अयशस्वी ठरला. अशाप्रकारे निजामशाही बुडाली. निजामशाहाच्या ताब्यात असलेला सारा प्रदेश मुघल बादशहा आणि आदिलशाहा यांनी वाटून घेतला. पुणे-सुपे ही भोसले घराण्याची परंपरागत जहागिरी आदिलशाहीत समाविष्ट झाली. शहाजीराजे यांनी आदिलशाहीची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राजेंना असे वाटले असावे की, आदिलशाहीत आल्यानंतर आपल्याला पुणे-सुपे जहागीरीचा कारभार पाहता येईल. कुटुंबात रमता येईल. आदिलशाहाने मोठ्या आनंदाने शहाजीराजेंना आदिलशाहीत सामावून घेतले. परंतु त्याने शहाजींना दूर कर्नाटकात पाठवले. शहाजीराजे यांनी हा बदलही स्वीकारला. मात्र त्यांनी एक निर्णय घेतला. कर्नाटकात जातांना जिजाऊ आणि शिवबा यांना सोबत नेण्याचा. त्याप्रमाणे पुणे जहागीरीचा कारभार दादोजी कोंडदेव या विश्वासू माणसावर सोपवून जिजाऊ-शिवबाला घेऊन शहाजीराजे कर्नाटकात विजापूर येथे निघून गेले

नागेश सू. शेवाळकर,