कविता एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली साधारण मुलगी. राहणीमान आणि आचार विचार हे सुद्धा साधारणच. दहावी पर्यंत च शिक्षण गावातच झालं. त्यामुळे 11 वाजता शाळेत आणि 5 वाजता घरी. मैत्रिणी बरोबर खेळायला जायचं असेल तरी घरी विचारून जायचं आणि सातच्या आत घरात असा दंडक. घरी संपत्ती अमाप नसली तरी सगळी भौतिक सुखे होती. पण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये संपत्ती पेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची मानली जाते आणि तसंच काहीस वातावरण कविता च्या घरी होत.
अश्याच चौकटीबंध वातावरणात कविता लहानाची मोठी झाली, खरं म्हणजे अगदी डोक्यावर ओढणी घेऊन चालायचं अस जरी नसलं तरी जीन्स घालायचा नाही, बाहेर गेलं तर जास्त हसायचं नाही. चार चौघात सांभाळून चालायचं अशी शिकवणी मात्र तिला वेळोवेळी मिळायची. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी कडे कविता नि कधी लक्ष दिल्ली नाही आणि तशी तिची हिम्मतही झाली नाही. बारावी बोर्ड मध्ये कविता प्रथम श्रेणीमध्ये पास झाली, सगळीकडे तीच कौतुक होऊ लागलं. पुढल्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं होत. घरच्यांच्या संमतीने आणि त्यांच्या सुचना ऐकून कविता शहरात आली. पहिल्यांदा ती घर सोडून एकटी बाहेर आली होती. मनात खूपच धाकधूक होती. कस होईल? हॉस्टेल मधल्या मुली कश्या असतील? कॉलेज कस असेल वैगरे प्रश्न तिला पडले होते.
कविता सामान घेऊन तिला मिळालेल्या हॉस्टेल च्या रूममध्ये आली. रूममध्ये 2 मुली आधीच आल्या होत्या,त्या कविता च्या रूममेंट."हाय, मी पूजा" ," आणि मी प्राजु" त्या दोघीनीही कविता आल्याबरोबर तिला आपली ओळख करून दिला. कविता ला जरा नवल वाटलं कारण एवढ्या लवकर कुणाशी ओळखी करायची तिला सवय नव्हती, पण सोबत राहायचं म्हणजे ओळख तर असावीच न म्हणून तिने सुद्धा आपली ओळख करून दिली. कविता च्या मानाने पूजा आणि प्राजु दोघी बोलक्या होत्या,त्या देखील मध्यमवर्गीय कुटुंबातल्याच होत्या. त्यामुळे तिघी व्यवस्थित रुळल्या.
हॉस्टेल मध्ये सर्वच विभागाच्या ,सिनिअर मुली एकत्र राहायच्या त्यामुळे हळू हळू सगळ्यांशी ओळख होणार होती. कॉलेज सुरु झालं. पहिलं वर्ष असल्याने सगळे अभ्यासावर जास्त भर देऊन होते. हळू हळू मित्र मैत्रिणींचा ग्रुप झाला.कविता या सगळ्या वातावरणात मिसळून गेली. तिला कॉलेज म्हणजे खरं स्वातंत्र वाटू लागलं. इथे वेळेचा हिशेब कुणाला द्यायचा नव्हता. ती बिनधास्त पणे वावरू लागली. मुळातच अभ्यासात हुशार त्यामुळे लवकरच कविता इथे सुद्धा हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाऊ लागली. तिला तिची ओळख मिळाली होती, पाहता पाहता वर्ष निघून गेलं. आता कविताला या वातावरणाची चांगलीच सवय झाली होती. मुलामुलींचे ग्रुप, बाहेर पिकनिक ला जाणं, कधी कधी कॉलेज बंक करणं, पार्टी हे सगळं होऊ लागलं. अर्थातच कॉलेज मध्ये सगळे हे करतातच. आता कविता चा 1 जिवलग ग्रुप तयार झाला होता.5 जणांचा हा ग्रुप अगदी जीवाला जीव लावायचा. अभ्यास असो, कॉलेज च गॅदरिंग, कि कुठली पिकनिक हे पाच जण सतत सोबत. यातला सुधीर कविता ची खूप काळजी घ्यायचा. त्याला कविता खूप मनापासुन आवडत होती. त्याने प्रत्यक्ष ते बोलून दाखवलं नसलं तरी ग्रुप मधल्या सगळ्यांना ते माहित होत. कविताही तो आवडायचा.सुधीर नसला कि तिला करमत नसे, ते सारखे चॅटिंग करायचे. घरी गेलं कि मात्र त्यांची घालमेल होत असे. घरच्यांसमोर त्यांना बोलता यायचं नाही. त्यामुळे दिवाळी आणि उन्हाळाच्या सुट्या त्यांना खूप मोठ्या वाटायच्या. कधी एकदा कॉलेज लागत आणि एकमेकांना भेटतो अस व्हायचं.
फायनल इअर संपत आलं होत, सगळे जॉब विषयी सिरीयस झाले होते. कॉलेज मध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत होत्या, सुधीर आणि कविता दोघेही हुशार असल्यामुळे त्यांना लगेच नोकरी मिळाली. आणि त्याच दिवशी सुधीरनी कविताला लग्नाची मागणी घातली. कविताला आनंद गगनात मावत नव्हता. त्या दिवशी त्यांच्या ग्रुप नि छान आनंद साजरा केला. पण खरा प्रश्न पुढे होता. कविता आणि सुधीर हे दोघांना अगदी साजेसे होते,दोघांचे स्वभाव सारखे होते, समजूतदार होते पण फरक होता तो जातीचा.घरच्यांना कस समजवायचं हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. एकमेकांना धीर देत त्यांनी घरी बोलायचं ठरवलं कारण कविता साठी तिच्या घरचे स्थळ बघायला लागले होते ,त्यामुळे त्यांना थांबवणं गरजेचं होत.
कविता घरी गेली.खूप हिम्मत करून तिने आईजवळ विषय काढला कि तीच एका मुलावर वर प्रेम आहे, तस तिला आईनी विचारलं,'कोणत्या जातीचा आहे तो?' कविता जरा वेळ थबकलीच.कारण मुलाचं नाव काय,करतो काय ह्या प्रश्नच्या आधीच तिला त्याची जात विचारण्यात आली!! मुलगा खालच्या जातीचा म्हटल्यावर आईनी कपाळाला हात लावला. तिने एकच कल्लोळ उठवला, वडिलांना सांगितलं. दोघेही काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते. " असले काम करायला गेली होतीस का ?नावाला काळिमा फासला आमच्या"म्हणून तिचे बाबा ओरडत होते. कविता च बोलणं ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये कुणीच नव्हतं.त्यांना एवढा धक्का बसला होता कि पोरीनी हे काय करून ठेवलं,आता समाजात काय तोंड दाखवायचं?
झालं, कविता च बाहेर पडणं च बंद झालं, कविता ला जिथून नोकरीचा कॉल आला होता घरच्यांनी नोकरी करण्यास नकार दिला. कविता ला काय करावं कळत नव्हतं. पळून जाण्याचा निर्णय दोघेही कधीच घेणार नव्हते कारण काहीही झालं तरी घरच्यांना दुखवायचे नाही अस ठरवूनच ते चालत होते, शेवटी दोघांनी घरच्यांसाठी वेगळं व्हायचा निर्णय घेतला.
कविता घरच्यांनी ठरवून दिलेल्या मुलासोबत लग्न करायला तयार झाली. मुलगा पाहायला छान, घरची परिस्थिती उत्तम, चांगल्या पगाराच्या नोकरीवर, शहरात स्वतःच घर,लग्नानंतर दोघे तिथेच राहणार होते.सासू सासरे गावी शेती बघणार. अस एकंदरीत चांगलं स्थळ कविता ला मिळालं होत. कविता स्वतःला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. 1 महिन्यावर लग्न होत. राहुल कविता चा होणारा नवरा कविता ला रोज फोन करत होता. साधारण बोलणं होत होत, कविताच्या घरी बरीच मंडळी असल्याने ते जास्त वेळ बोलू शकत नव्हते त्यामुळे त्यांना एकमेकांना ओळखून,समजून घ्यायला वेळच मिळाला नाही.
कविता सगळं चांगलं होणार या विश्वासावर जगत होती. बघता बघता लग्नाची तारीख येऊन ठेपली. कविता च्या ग्रुप मधले सुधीर सोडून सगळे आले होते, सुधीर अमेरिकेला निघून गेला होता,त्याने त्याच्या कंपनी ला विनंती करून जॉब लोकेशन अमेरिका मागून घेतलं होत.कविता च दुःख तिचे मित्र मैत्रीण समजू शकत होते. थाटामाटात कविता च लग्न झालं आणि तिच्या आईवडिलांना मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं.
कविता आता एका घरची सून झाली होती.
गृहप्रवेश आणि इतर सगल्या विधी मोठ्या उत्साहात पार पडल्या. आणि आता खरी कविता ची परीक्षा होती ती म्हणजे त्यांच्या मधुचंद्रासाठी सजवलेली खोली. आतापर्यंत चा प्रवास तिने मनावर दगड ठेवून केला होता,पण आता पुढे काय?? त्याच्यासोबत आयुष्यभराची स्वप्न रंगवली होती समोर तो नव्हताच. तिला दुसऱ्याच व्यक्तीला समर्पित व्हायचं होत, तीच हृदय पाणी पाणी झालं. पण तिने राहुल सोबत बोलण्याचा निर्णय घेतला. कविता खोलीत बसली होती. राहुल आत आला आणि कविता जवळ येवून बसला. त्यांनी कविता चा हात हातात घेतला तस कविता त्याला म्हणाली," मला अस वाटतं आधी आपण एकमेकांना समजून घ्यावं ओळखून घ्यावं" यावर राहुल हसला आणि म्हटला "अगं एवढं तर ओळखतो बाकी ओळखी होईल च हळू हळू" आणि त्याने तिला जवळ ओढलं. राहुल तीच काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता, किंबहुना त्याला फरक पडत नव्हता कि ती बोलतंय, त्याला ती फक्त त्याची बायको दिसत होती, हक्काची बायको. कविता च मन आवाज न करता तुटत होत,तिला असंख्य वेदना होत होत्या,ती त्याला दूर ढकलत होती. पण राहुल त्याच काम तिची इच्छा नसताना करतच होता. कविता च्या डोळ्यातुन पाणी ओघळत होत. ती ओरडत होती,पण तिच्या ओरडण्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. त्या बंद खोलीच्या बाहेर आनंद साजरा होत होता,त्यांच्या मते 2 मनाचं आणि तनाच मिलन होत होतं, पण........... कवितावर होत होता बलात्कार "समाजमान्य बलात्कार "
त्या रात्रीनंतर कविता हरवून गेली होती, स्वतःमध्ये??? नाही . तिला स्व:त्व उरलंच नव्हतं. तिच्या मनाविरुद्ध तिच्या देहाचे आणि मनाचे रोज लचके तोडले जात होते. कविता निपचिप पडून राहत होती. राहुल नि तिला कधी समजून घेणाचा प्रयत्नही केला नाही.दिवसभर तो ऑफिस ला जायचा आणि रात्री आपला पतीधर्म पार पडायचा. कविता ला एकटीला करमत नव्हतं.
एक दिवस तिने राहुल जवळ विषय काढला तिच्या नोकरीचा,
"मी विचार करत होते कि मी पण नोकरी करावी."
"का?? तुला पैसे कमी पडतंय का?"
"तसं नाही"
"मग कस?"
"मी एकटी दिवसभर कंटाळून जाते, नोकरी असली तर गुंतले राहील"
"आणि घर कोण सांभाळणार?"
"अहो घराचं काय आह,े आपण दोघेंचं, दोघे मिळून...."
"अच्छा म्हणजे आता ऑफिस च काम सोडून मी तुला बायकी कामात मदत करू?स्वयंपाक करू? नाही त्यापेक्षा तूच नोकरी कर,मी बसतो घर सांभाळत" कविताच बोलणं अर्धवट तोडत राहुल चिडून बोलला.कविता ला पुढे बोलताच आलं नाही, कारण राहूल झोपायला निघून पण गेला होता....
एक दिवस कविता ला बरं वाटत नव्हतं, तिने स्वयंपाक बनवला आणि ती झोपली, राहुल ऑफिस मधून आला कविता झोपलेली बघून त्याच्या कपाळावर आठी पडली,काही न बोलताच तो आवरत होता.
"जेवणाचं काय?" राहुलनी करड्या स्वरात विचारलं,
"मी जेवण बनवून ठेवलंय, तुम्ही प्लीज वाढून घेता का आजच्या दिवस,मला बरं वाटत नाही आहे"
"एवढ्याश्या दुखण्याचा किती बाऊ करतेस,माझी आई कधीच अस करत नव्हती, आता हेच राहील होत,दिवसभर मरमर काम करायचं घरी येऊन पण स्वतःच काम करायचं."
राहुल चिडचिड करत जेवायला गेला. कविता जीव एकवटून उठली,तिने त्याला वाढलं, जेवण झाल्यावर राहुल टीव्ही बघत बसला, कविता किचन आवरत होती. तू सुद्धा जेवून घे एवढं बोलायची तसदी सुद्धा राहुल नि घेतली नाही.
दिवसेंदिवस त्यांच्यातील दुरावा वाढत होता. राहुल च बोलणं वाढत होत,सुरवातीला कविता ला बोलायचं नंतर तिच्या आईवडिलांना बोलायला लागला,कविता ला सहन होत नव्हतं,त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते. कविता माहेरी निघून आली. पण इथली परिस्थिती म्हणजे एकदा मुलगी सासरी गेली कि माहेरी ती पाहुणी. कविता ची आई तिला समजावत होती. "बाईच्या जातींनी थोडं सहन करावं, नवरा देवासमान असतो." कविता काहीच बोलली नाही. तिच्या लग्नाला ७ महिने होऊन गेले होते. कविता या आधी सुद्धा माहेरी आली होती. राहुल च वागणं तिने तिच्या आई वडिलांना सांगितल होत,पण त्यांच्या मते नवरा बायको मध्ये लहान मोठे वाद होणे स्वाभाविक असतात असच होत,शिवाय राहुल दमून येतो तर त्याची चिडचिड पण त्यांना रास्तच वाटत होती,ते कविता ला समजावून परत राहुल कडे पाठवत होते.
एका रात्री राहुलने कविता ला जवळ घेतले. कविता ला कळालं पुढे काय होणारं.पण राहुल आज तिच्याशी गोड वागत होता. त्याने तिला मिठी मारली. अगदी दिवस कसा गेला हे सुद्धा विचारलं. कविता ला खूप बर वाटलं. राहुल पुढे बोलला,"मला वाटतं आता आपण मुलाबद्दल विचार करायला हवा"
तस कविता ला एकदम धक्का बसला"
अहो,पण एवढ्या लवकर?"
"काय लवकर आहे यात? सहा महिने। झालेत आपल्या लग्नाला. हीच योग्य वेळ आहे. आई बाबांची पण इच्छा आहे,"
"अहो पण मी अजून तेवढी सक्षम नाही आहे आई बनण्यास"
"काही नाही गं, आई बनायची कुणाला सवय असते का?आपण प्रयत्न सुरु करू"
कविता ला पुन्हा कळून चुकलं, तिला विचारणं म्हणजे केवळ नाममात्र.तिच्या आयुष्यातला कुठलाच निर्णय ती घेऊ शकत नव्हती तो आधीच घेतल्या जात होता.
या सर्वांचा कविता च्या मनावर विपरीत परिणाम होत होते. इतरांच्या दृष्टीने कविता खूप सुखी होती, कमावता नवरा,घरी दोघेच जण. पण कविता एकटी पडली होती.ती सतत विचारात गुंतली राहू लागली. तिने जे केलं ते योग्य होत का?नकळत ती सुधीर चा विचार करायची. जर तिने तेव्हा सुधीर सोबत लग्न करण्याचं धाडस दाखवलं असत तर आज तीच आयुष्य वेगळ्या वळणावर असत. सुधीर ची आठवण झाली कि ती सुन्न व्हायची. तो कुठे आहे,कसा आहे विचारावं वाटायचं पण तेवढ्यात राहुल चा विचार यायचा. आणि सगळं तिथेच थांबायचं.
कविता ची मनस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. कुणाशी बोलत नव्हती, राहुल नि त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याला लवकरात लवकर गुड न्यूज हवी होती,त्यामुळे तो फक्त त्याकडे च लक्ष देत होता. आणि कविता अजूनही त्याचं गोष्टीना सामोरे जात होती.
काही दिवसातच कविता च वागणं विचित्र होऊ लागलं. राहुल तिला घड्याळ मागायचा ती त्याला पेपर आणून देत होती.भाजी जाळून जायची, दूध ऊतू जायचं तरी कविता च लक्ष जायचं नाही. शेवटी राहुल नि तिला दवाखान्यात नेलं ,तिथल्या डॉक्टरांनी तिला मानसोपचार तज्ञाकडे दाखवण्याचा सल्ला दिला. कविता आता मानसोपचार तज्ञांची पेशंट होती.ठरलेल्या वेळी राहुल तिला दवाखान्यात नेत होता. दोन महिने उलटले होते तरी कविता च्या प्रकृती मध्ये काहीच फरक पडला नव्हता. उलट ती जास्त एकटी होत होती. कारण तिला मानसिक प्रेम मिळतच नव्हतं, ती स्वतःमध्ये त्याचा शोध घेत होती.
मानसोपचार तज्ञांनी जरी उपचार सुरु केली असले तरी औषधी वेळेवर घेतल्या जात नव्हत्या कारण कविता तिच्याच विश्वात असायची.त्यामुळे डॉक्टरांनी तिला काही दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसात कविता थोडं लोकांमध्ये वावरायला लागली,बोलू लागली. तिच्या प्रकृती मध्ये सुधारण्या दिसल्यामुळे राहुल नि तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर नको म्हटले कारण ती अजून पूर्ण बरी झाली नव्हती आणि तिची काळजी घेणारी व्यक्ती सतत तिच्या सोबत असायला हवी होती. यावर तोडगा म्हणून राहुल नि त्याच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. कविता घरी आली.
दिवसभर ती घरात फिरत होती,खिडकीतून एकटक बघत होती. रात्री राहुल ऑफिस मधून घरी आला,त्यांनी कविता साठी सुंदर साडी आणली होती. सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर राहुल नि ती साडी कविता ला दिली. आणि नेसायला सांगितल. कविता ती साडी घालून बाहेर अली ती खूप सुंदर दिसत होती, पण चेहरा मात्र निस्तेज होता. राहुल तिच्या जवळ बसला. तिचा हात हातात घेतला.
आणि त्याने कविता चे चुंबन घेण्यासाठी ओठ तिच्या ओठावर टेकवले तसं कविताला लग्नाची पहिली रात्र आठवली, ती कासावीस झाली.पण राहुल? त्याला त्याच स्वप्न पूर्ण करायचं होत!! कविता तडफड होती आणि पुन्हा त्या खोलीत किंकाळ्या ऐकू येत होत्या....
रात्र संपली.
.पण आजची सकाळ खूप वेगळी होती. राहुल ला जाग आला तेव्हा कविता खोली मध्ये नव्हती. बाहेर असेल म्हणून त्याने आईला विचारलं पण आईने सकाळपासून कविता ला बघितलंच नव्हतं. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली पण कविता चा कुठेच पत्ता नव्हता.नातेवाईक,मित्र मैत्रिणी, शेवटी पोलीस स्टेशन ला तक्रार करण्यात आली ,पण ती कुठे होती कळालं नाही.
दोन महिने झाले,एक दिवस राहुल ला पोलीस स्टेशन मधून फोन आला,कविता सापडली होती, एका दूर खेडेगावात. तिथल्या लोकांनी तिला मनोरुग्ण म्हणून वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं होत.तिथल्या डॉक्टरांच्या मते ह्या मुलीवर खुपदा जबरदस्ती झाली होती,म्हणून तिच्या मनावर परिणाम झाला. पण ती जबरदस्ती नव्हती, तो होता बलात्कार...... समाजमान्य बलात्कार
कविता अश्याच विकृती ची बळी ठरली होती, जी गोष्ट आपल्या समाजात अगदी स्वाभाविक आहे. अश्या कितीतरी कविता आज आहेत. अगदी मनोरुग्ण नाहीत पण स्वतःला हरवून बसल्या आहेत. जे चूक आहे हे माहित असूनही समाजाने घालून दिलेल्या चौकटीचा वापर करून तुमचा बळी घ्यायला देखील हा समाज मागेपुढे बघत नाही हे आजच कटू सत्य आहे.