उगवतची आज्जी

(2)
  • 233
  • 0
  • 297

लहुतटू लहुतटू फुल कोण तोडतय पिता तोडतोय....... मधुराणी मधुराणी पान कोण तोडतय चाण्डाळीण तोडतेय...... गोष्ट अगदी रंगात आलेली. आम्ही पोरं आजीच्या तोंडाकडे एकटक बघत जीवाचा कान करून ऐकत होतो. राजाच्या दुष्ट लाडक्या राणीने सवतीची आवळी जावळी मुलं लहुतटू नी मधुराणी याना आपल्या दासींकरवी पळवून नेवून राजउद्यानात जिवंतपणी पुरून टाकलं. राजाने देखणेपणाला भुलून दुसरं लग्न केलन. आवडत्या राणीची कुस काय उजवली नाय. पण पहिल्या नावडत्या राणीलाच जुळी मुलं झाली. आता मुलांच्या ओढीने नावडत्या राणीच्या महालात राजाच्या खेपा वाढल्या. आता कदाचित आपल्याला मुलगा झालाच तरी सवतीच्या मुलाला लहूतटूला राज्य मिळणार म्हणून दुष्ट आवडती राणी नुसती पिचत रहायची. तिच्या दासीनी सवतीची मुलं पळवून त्याना मारून टाकायचा बेत दुष्ट राणीला सांगितला.हे काम झालं तर एक हजार सोन्याच्या मोहरा देण्याच वचन तिने दिलं. दासी संधीची वाट पहायला लागला.