"फादर्स डे"
नुकताच "फादर्स डे" साजरा केलाय आपण सगळ्यांनी पण खरंच फादर्स डे फक्त एका विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट तारखेलाच साजरा करता येतो का? अचानक मनाला प्रश्न पडला..
फक्त एक दिवस एका विशिष्ट तारखेलाच आपण त्यांच्यावर भरभरून लिहितो, कविता करतो आणि स्तुती करतो.
खरंच का बापाची महती आपण शब्दांमध्ये
किंवा कवितेत आपल्याला पूर्ण पणे मांडता येणं शक्य आहे का? याचं उत्तर ही आपण देणं हा मूर्ख पणा ठरेल आपला.
खरंतर बाप म्हणजे बापच असतो त्याच्याविषयी काही लिहायला,कविता करायला आपले शब्द अपुरे पडतात. लिहिण्यासाठी कागद अपुरी पडतील आणि कागदावर लिहायला पेनातील शाई संपेल पण बाप नावाची महती पूर्ण होणार नाही. काय काय लिहायचं त्यांच्या विषयी तो बाप जो आपल्या कुटुंबाचा आधारवड होऊन सतत सावली देतो. कितीतरी यातना सोसून, दुःखरूपी उन्हाच्या झळा सोसत स्वतः काहीही न घेता आपल्याला निःस्वार्थ आणि निर्व्याज सुखच देतो. आपल्या जीवनातील अंधाराचा प्रकाश बनून
निराशेतही आस वृद्धिंगत करत दुःखातला आनंद बनतो, रडण्या नंतरचे हास्य, जगण्याची पायवाट
साऱ्या आयुष्याचा शिल्पकार बनतो व आपल्या कुटंबाचे,मुलांचे अस्तित्व राखत कधीही न वाकणारा कणा बनतो. काबाडकष्ट करणारं शरीर अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी कुटुंबासाठी झटणारं अंतःकरण घेऊन आपल्याला वाढवतो. तो बापच असतो त्याची माया मोजायला कोणतीही पट्टी अजून तरी जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही आभाळाची भव्यता आणि सागराची खोलीसारखे शब्दसुद्धा तोकडे पडतात. बाप म्हणजे काळाच्या उधाणलेल्या सागरातून सुखरूप किनाऱ्यावर पोहोचवणारं जहाज आहे. यापेक्षा ही त्याची महती खूप मोठी आहे. पण आपण त्याला कागदावर उतरवण्याचा छोटा प्रयत्न करतो.. का? हा इतका खटाटोप कशासाठी?आपण किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी.. एरव्ही आपण त्यांना बाबा तुम्ही कसे आहात.. तुम्हाला काही हवंय का.. तुम्हाला काही होतंय का इतकी साधी चौकशी सुद्धा करत नाही. त्यांना एखाद्या अडगळीतल्या वस्तूसारखी वागणूक देतो. नाही तर सरळ वृद्धाश्रमात पाठवतो. त्यांच्या उतारवयात त्यांच्या मनाचा कधीतरी विचार करतो आपण नाही ना..त्यांचे आपल्या साठी घेतलेले कष्ट, वेदना,दुःख आपण सगळं विसरतो. फक्त तारखेवर आपल्याला त्यांच्या वर किती प्रेम आहे किंवा किती प्रेम करतो ह्याची आठवण येत असते.
खरंच जर आपण आपल्या बापावर प्रेम करत असू तर रोजच्या दैनंदिन जगण्यात त्यांच्या एक तरी तत्वाचा अंगिकार करून जगलं. त्यांचा एकतरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं आयुष्य जगत असलो आणि तोच आदर्श समोरच्या पिढीसमोर ठेवू शकलो तर आपला रोजच "फादर्स डे" होईल ना..आणि त्याच्यावर आपले किती प्रेम,सन्मान, किंवा श्रद्धा आहे हे सांगण्यासाठी विशिष्ट तारखेची गरज सुद्धा भासणार नाही आणि आपला बापही अगदी तृप्त होऊन जाईल की आपली मुलं आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला प्रेम देतात.
भावना व्यक्त करायला तारखेची नाही तर आपली त्यांच्याबद्दल असलेली धारणा आणि मानसिकतेची गरज असते. हिच खरी आपली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता होईल.
माझ्या लिखाणामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी...,
शोभा मानवटकर....