आज आरशात तुला पाहिलं…
क्षणभर वाटलं — वेळ मागे फिरलीये,
तू पुन्हा माझ्या समोर उभी आहेस,
तश्शीच… शांत, पण डोळ्यांत वादळ.
तुझं प्रतिबिंब दिसलं, पण
हात लावूनही — तू दूरच राहिलीस.
कधीकाळी जे सत्य होतं,
आज ते फक्त आठवण बनून उरलयं.
तुझं निघून जाणं,
माझ्या अस्तित्वाचा एक तुकडाच घेऊन गेलं,
पण तुझी सावली आजही
माझ्या सावलीला चिकटून आहे.
आता रोज सकाळी मी आरशात पाहतो —
तुझ्या आठवणींनी धुरकट झालेलं माझं रूप
आणि पुन्हा एकटा होऊन
मनातल्या आरशात तुला शोधतो…