तो & ती --कथा : सुखाची झोप
गर्द थंडगार आम्रतरुच्या झाडाखाली तो तीच्या मांडीवर डोके ठेवून शांत पडला होता. तीच्या गालावरची खळी त्याला वेड लावत होती. तीच्या बोलक्या सावळ्या रूपावर तर त्याचा प्राणही अर्पण होता. ती त्याच्या केसातून हात फिरवत होती आणी तो तिला घट्ट बिलगून सुखाच्या झोपेत कणाकणाने विरघळत होता. त्या दोघांचे हृदयबंध घट्ट जुळले होते. एवढ्यात त्याच्या पाठीत कुणाचीतरी जोरदार लाथ बसली तसा तो खाडकन अर्धवट झोपेतून जागा झाला.
" काम करायचं सोडून झोपतात हे हरामखोर " मालक चिडून म्हणाला. तसं त्याने चेहऱ्यावर पाण्याचा सपकारा मारला आणी सिमेंटची पोती उचलायला सुरवात केली.अंग पार वाळून गेलं होत. फक्त हाडाचा सांगाळा उरला होता. गरिबीमुळे जे मिळेल ते काम तो करत होता.
रात्री काहीही न खाता तो तसाच झोपी गेला. काहीही केलं तरी त्याला झोप येतच नव्हती. तिच्या आठवणींचा एक एक मणी पुढे पुढे सरकत होता. त्या सर्व आठवणींच्या सावल्या डोळ्यापुढे नाचत होत्या. रात्रीचे दहा वाजता तो उठला. पोटात भुकेने खड्डा पडला होता. अंगावर जीर्ण टी शर्ट चढवला. तसाच चालत चालत तो बाजूच्या वडापावच्या गाड्यावर गेला. दोन वडापाव कागदात बांधून घेतले. ईतक्यात बाजूच्या पिझ्झा हटच्या रिसॉर्टवर एक कार येऊन थांबली. त्यातून ती उतरली.. भूतकाळातल्या ओळखी आता नाहीश्या झाल्या होत्या. तिच्यासाठी त्याच अस्तित्व नामशेष झालं होतं. तीच्या नजरेत त्याच महत्वही शून्य होतं. तिने त्याला वळूनही पाहिजे नाही. मुळात तिचे त्याच्यावर लक्षच नव्हते. तीच रूप आत पूर्णतः बदललं होत. अंगावर मौल्यवान दागिने लखलखत होते. तीच लग्न श्रीमंतांच्या घरी झाल्यामुळे ती झोपडीतून महालात गेली होती आणी तो बाबांच्या दुखण्यामूळे मिळेल ते काम करत होता. त्यामुळे शिक्षण आणी सरकारी नोकरीच स्वप्नही आधीच भंगल होत. सोबतच प्रेमही दुरावल होत. त्याची सुखाची झोप कायमची संपली होती तर तिला फक्त आणी फक्त श्रीमंतीतच सुखाची झोप येत होती.
समाप्त.
--निखिल देवरे
For audio story on youtube visit: nikhil deore stories