मनःशांती....
डॉ. स्वाती अनिल मोरे
लगाम नसलेल्या घोड्यासारखं ,
मन आताशा चौखूर उधळतयं..
कधी इथं तर कधी तिथं,
सर्वदूर फिरून येतंय....
कधी हसवतयं, कधी रडवतयं,
भावनांच्या हिंदोळ्यावर मला झुलवतयं..
काही केल्या माझं ते ऐकेना,
त्याचं हे स्वैर वागणं,
आता मलाही झेपेना....
मनःशांती साठी ,
सुरू झाले माझे प्रयत्न,
कोणी जे जे सांगेल,
ते आचरण्याचा माझा प्रामाणिक यत्न....
वाचली पोथी , वाचले पुराण,
केले जप-जाप्य नि उपवास,
हातात अंगठ्या, गळ्यात माळा,
नाही घालता आला तरी मनावर आळा....
अंगारे- धुपारे , गंडे -दोरे,
गाठले मी साधू नि बाबा,
माझ्या मनावर मात्र,
मिळेना मला ताबा....
सगळे प्रयत्न माझे फसले,
मग हताश होऊन शांत मी बसले,
माझी निराशा बघून माझे मन मात्र,
मलाच हसले.....
अगं,साधी सोपी गोष्ट
कशी तुला नाही कळली??...
बाहेरून स्वतःच्या आत,
तू कधी, का नाही डोकावली ??.......