###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*आज महाकवी कालिदास दिवस*
`आषाढस्य प्रथम दिवसे`...आज आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस....आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की आपल्याला आठवण येते ती महाकवी कालिदासाची...
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं | वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ||
ही आहे अजरामर अशा कालिदासाच्या मेघदूतम मधील एक काव्यपंक्ती.... त्यामुळं आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो. कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच... पण तो चित्रकारही होता...एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता....
कालिदास म्हणजे होता रससिद्ध कविश्वर... कालिदासानं संस्कृत भाषेत अलौकिक अशी साहित्य रत्न निर्माण केली... मेघदूतम्, ऋतुसंहारम्,अभिज्ञान शांकुतलम्, रघुवंशम्, कुमारसंभवम्, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् अशा सरस कलाकृती त्याच्या प्रतिभेनं आपल्याला दिल्या...जगातलं सौदर्य, निसर्ग, समाज, इतिहास, भूगोल, आध्यात्मिकता या सगळ्यांचा वेध घेणारी प्रतिभा कालिदासाला लाभली होती...असं असलं तरी कालिदास म्हणजे इतिहासातलं एक न उलगडलेलं कोडं आहे.
कालिदास दिना निमित्तानं त्याच्या काव्यावर आधारित कार्यक्रम रंगतात. या प्रयत्नांतून त्याच्या प्रगल्भ साहित्याचा झरा नव्या पिढीपर्यंत पाझरतो. आजपर्यंत प्रियतमेच्या विरहानं व्याकूळ झालेले अनेक प्रेमवीर आपण पाहिले. त्यातील अनेकांच्या हृदय विदीर्ण करणार्या कथा शतकानुशतके संस्कृतीमध्ये सुगंधासम विहरत राहिल्या. अशी अनेक नावं त्या विशिष्ट संस्कृतीचा, काळाचा, जीवनशैलीचा दाखला होऊन राहिली. मात्र, या सर्वांचा शिरोमणी ठरला तो महाकवी कालिदास. एका कर्तव्यभ्रष्ट यक्षाची विकलता, विरह, आर्तता, व्याकूळता वर्णन करणारे त्याचे `मेघदूत’ हे खंडकाव्य आजही प्रत्येक कवीमनाला भुरळ घालणारे आहे. एक कर्तव्यभ्रष्ट यक्ष एक वर्षाची शिक्षा भोगतो आहे. अलकानगरीच्या राजानं त्याला शिक्षा म्हणून एका वर्षासाठी खूप दूरवर असलेल्या रामगिरी पर्वतावर एकांतवास दिला. मात्र, हा काळ प्रियतमेपासून दूर रहावे लागल्याने त्याच्यासाठी युगासमान आहे. प्रियतमेच्या विरहामुळे वेडापिसा झालेला हा शापित यक्ष तिच्यापर्यंत संदेश पोहोचवू इच्छितो. आपल्या मनातील विरहभावना व्यक्त करू इच्छितो. यासाठी त्यानं आधार निवडला एका मेघाचा. आपण जाणतोच, की पूर्वी पक्षी, वायू, मेघ यांच्यामार्फत सांगावा पोहोचवला जाई. `मेघदूत’ हे कालिदासचं खंडकाव्य अशाच एका संदेशाचं प्रतीक आहे. प्रियतमेला पाठवला गेलेला जगातला हा सर्वांगसुंदर संदेश आजही एक मनोज्ञ काव्य म्हणून ओळखला जातो. महाकवी कालीदासाच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे संदेशकाव्य म्हणजे विव्हल मनातले तरंग आणि निसर्गगान यांचा सुंदर मिलाफ आहे. आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघालाच दूत बनवून कवी कालिदासनं प्रियतमाला सांगावा हा धाडला आहे. आषाढातील पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा होतो. या दिवशी या महान सारस्वताचा आठव येणं अगदी स्वाभाविक आहे. यानिमित्तानं त्याच्या महाकाव्याची नव्यानं ओळख होते आणि नवीन पिढीपर्यंत त्याच्या शब्दातील आणि सुभाषितील भावार्थ पाझरत रहातो. आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात कालिदास दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.