उद्या निर्जला एकादशी....
शब्दांकनः मच्छिंद्र माळी पडेगांव , औरंगाबाद
*** निर्जला एकादशी कथा ***
-------------------------------------------
भीमसेनाने विचारले, 'हे पितामह व्यासा, तुम्ही महाबुद्धिवंत आहात. मी काय म्हणतो ते ऐका. युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्वजण एकादशीला कधीही भोजन करीत नाहीत. ते मला म्हणतात की, 'हे वृकोदरा, तूही एकादशीला जेवू नकोस.' आजोबा, मी त्यांना म्हणतो की, मला भूक सहन होत नाही. 'मी दाने देईन, केशवाची विधीपूर्वक पूजा करीन. पण उपवास केल्याशिवाय एकादशी व्रताचे फळ कसे लाभेल ते सांगावे.'
भीमसेनाचे हे बोलणे ऐकून व्यास म्हणाले,'भीमसेना, तुला नरक अनिष्ट वाटत असेल,व स्वर्गाची इच्छा असेल तर शुक्ल आणि वद्य पक्षातील एकादशांच्या दिवशी तू भोजन करू नकोस.'भीमसेन म्हणाला,'आजोबा, तुम्ही तर महाबुद्धिवंत आहात.मी तुम्हाला खरे सांगतो की मला एकभुक्त राहणेही शक्य नाही. मग माझ्याकडून उपवास कसा काय होणार? माझ्या पोटात वृक नावाचा अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. मी खूप अन्न खातो तेव्हा तो थोडा वेळ शमतो.मला वर्षातून एकच उपवास कसातरी करता येईल.तेव्हा मला नक्की करून सांगा की मी हा एकच उपवास कोणता करावा.ज्या एकाच उपवासाने मला सर्व एकादशींच्या उपवासाचे फळ मिळेल असा उपवास सांगा.'व्यास म्हणाले,'भीमा,तू मनुष्यानेव् पाळायचे नियम ऐकले आहेस.वैदिक धर्म काय आहे,हेही तू ऐकले आहेस.पण हे राजश्रेष्ठा,हे धर्म कलियुगात आचरणे शक्य नाही.थोड्या उपायात,थोड्या खर्चात,व अगदी कमी श्रमाने महाफल देणारे सर्व पुराणांचे सार मी तुला सांगतो. ऐक.शुक्ल व कृष्ण या दोन्ही एकादशांना भोजन करू नये.जो एकादशीला उपवास करतो, तो कधीही नरकाला जात नाही.'व्यासांचे हे बोलणे ऐकून भीमसेन खूप घाबरला.आणि पिंपळाच्या पानासारखा थरथर कापू लागला.तो म्हणाला,'आजोबा, मी उपवास करण्यास समर्थ नाही.म्हणून पुष्कळ फळ देणारे एकच एकादशी व्रत मला सांगा.'व्यास म्हणाले,'ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते,तिचा उपवास पाणीही न पिता प्रयत्नपूर्वक करावा.स्नान आणि आचमन या कामापुरताच पाण्याचा उपयोग करावा. तसे न केल्यास व्रतभंग होईल.हे व्रत करणार्याने एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी वर्ज्य करावे. त्याने हा नियम पाळला तर त्याला प्रयत्न केल्याशिवाय बारा एकादशा केल्याचे फळ मिळते.
द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करावे,ब्राह्मणाला विधीपूर्वक जलदान किंवा सुवर्णदान द्यावे. नंतर आवश्यक कृत्ये करून आणि इंद्रिये व मन ताब्यात ठेवून ब्राह्मणांसह भोजन करावे.
भीमसेना,अशा प्रकारे व्रत केल्यामुळे कोणते पुण्य मिळते ते ऐक...
वर्षात ज्या एकादशा येतात त्या सर्व एकादशाचे फल ही एकादशी केल्यामुळे मिळते,यात संशय नाही.कारण तसे मला शंखचक्रगदाधारी केशवानेच सांगितले आहे.या एकादशीचा उपवास पाणीही न घेता केल्यास त्याचे काय फळ मिळतेते ऐक.हे वृकोदरा,सर्व तीर्थाचे जे पुण्य,सर्व दानांचे जे पुण्य ते या एकादशीनेच मिळते.सर्व वर्षातील शुक्ल व वद्य पक्षातील ज्या धनधान्य देणार्या पुण्यकारक,पुत्र व आरोग्य वगैरे फळे देणार्या अशा सर्व एकादशांचे उपोषण केल्याचे एकत्र फळ या एकच एकादशीच्या उपवासाने मिळते.हे नरव्याघ्रा भीमा, मी तुला हे अगदी सत्य सांगत आहे.या एकादशीचे उपोषण करणार्याला त्याचे अंतःकाळी मोठ्या शरीराचे अक्राळ-विक्राळ,काळे, पिंगट दंड व पाश धारण करणारे भयंकर यम दृष्टीस पडत नाहीत.हे नरव्याघ्रा, याच्या उलट त्याच्या अंतःकाळी पीतांबर धारण करणारे,सौम्य, शंखचक्र धारण करणारे व मनोवेगाने जाणारे विष्णुदूत येतात आणि त्याला विष्णुलोकाला घेऊन जातात. म्हणून सर्व प्रयत्न करून या एकादशीचे व्रत पाणी न पिता करावे व गाईचे दान करावे.म्हणजे मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.'
हे जनमेजया,व्यासाचे हे बोलणे ऐकून सर्व पांडवांनी या एकादशीचे उपोषण विधीपूर्वक केले.भीमानेही त्या दिवसापासून या कल्याणकारक एकादशीचे व्रत केले म्हणून तेव्हापासून ही निर्जला एकादशी* *'पांडव एकादशी' किंवा *'भीमसेनी एकादशी'* या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध झाली.