समूद्राची पुळण,भरतीच्या लाटांनी थेंबाथेंबांनी सजणारा किनारा, मागे समुद्राच्या अथांगतेला आध्यात्मिक आणि सात्विक अधिष्ठान देणारा गणपती आणि त्याचं पावित्र्याने भरलेलं स्वच्छ सुंदर मंदिर!
सहसा महाराष्टातील देवळांमधे अभावाने आढळणारी स्वच्छता आणि काटेकोरपणा इथे मन प्रसन्न करतो.
मोठ्या प्रमाणावर भक्त येऊनही सर्वांची चोख व्यवस्था करणारा सेवकवर्ग, भक्तांना पुरेसं मन भरेपर्यत देवाचं दर्शन घेऊ देणारे पुरोहित यामुळे मला गणपतीपुळ्याचा गणेश अधिक भावला असावा.
आरतीच्या वेळेलाही शिस्तबद्ध रचना आणि सूचना, त्यानंतर मिळणारा मन आणि जीभ तृप्त करणारा नेटका प्रसाद विशेष वाटला.
देवदर्शन करून आपण डोंगराला प्रदक्षिणा करायला बाहेर पडतो. हिरव्यागार नारळीच्या बाग्, कोकणातली पूर्वीची जुनी पाण्याची दगडी बांधीव पायर्‍यापायर्‍यांची कुंड, समोर अचानक दिसणारा समुद्र हे सगळं आनंद देतं.
गर्दीच्या दिवसात इथे नियोजन कसं असतं हे मी नाही अनुभवलेलं पण मंदिरात बसून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणणे, गुरुजींची नेटकी आणि नेमकी योग्य शब्दांची आरती आणि मंत्रपुष्पांजली मला आवडली. इथली काकडआरती आणि शेजारती पुढच्यावेळी नक्की अनूभवायची असं मनाशी ठरवतच मी मंदिराच्या बाहेर पडले.

Marathi Religious by Aaryaa Joshi : 111063685
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now