जिथे भावनांचे दमन तिथेच भावनांचा उद्रेक
जगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....
प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर मनुष्यानं निरंतर चालतं जावं असं सुखद कर्म ....
जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर संदेह निर्माण होतो .
आपण त्याला क्रूर जनावर किंवा नरभक्षक म्हणून मोकळे होतो . तेव्हा , त्याला जबाबदार तो एकटा नसतोच तर संस्कृतीची थोरवी गाणारे , त्यांना बंधनात अडकविणारा हा समाज ही असतो .
प्रेमापासून आपल्या अपत्यांना दूर ठेवणारे आईबाबा . त्यांना वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले म्हणजे तोंड काळे करून येणार की काय ?
आणि तस चुकून माकून झालंच तर समाजात ह्यांचं नाक कटणार ..
मूलं वयात आल्यावर मुलांना मुलीपासून किंवा मुलींना मुलापासून आईबाबा दूर ठेवतातच . शरीर वाढायला लागलं की जबाबदारीने आई मुलीला सांगते आता तू स्कर्ट नको घालू शिवलेस नको घालू बरं ! पाय झाकेल मांड्या गुडघे दिसणार नाही असे पूर्ण कपडे परिधान करायचे .
त्यांना मुलगा आणि मुलगी ह्या दोन नात्यात मैत्रीची मोकळीक नसतेच . याचं वयात मुलांच्या मानसिकतेवर तारुण्याच्या उबंरठाबाहेर न पडण्याचं दडपणही असतेच कुठेतरी ...
आजही अशी परिस्थिती आहे मुलं मुली दहावी पर्यंत एकमेकांनपासून लांबच असतात ; म्हणून बहुतेकांना कॉलेज लाईफच आकर्षण असते . मुली मुलांच्या जीवनात मैत्रिणी म्हणून असल्या की त्याच्या मनात त्यांच्याबद्दल मैत्रीची भावना असते .. मनात आदरभाव वाढतो . एकमेकांच्या संम्पर्कात असल्याने वस्तूची देवाण घेवाण वर्गात न समजल्या जाणाऱ्या विषयावर चर्चा होते इथेच आकर्षण हळूहळू नाहीस होते .
पुरोगामी म्हणविणाऱ्या भारत देशात पुढारलेपणा अजूनही जागच्या जागी थिंगळ घालून आहे . नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची संधी हि गमावलेली आहे ह्याच वाईट वाटतं ... योग्य संस्कार योग्य माहिती जाणून घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे .
मूल वयात आल्यावर त्याची कृती भावना मन समजून घेणे , प्रत्येक वडिलांनी मुलगा वयात आल्यावर मुलाला लैगिक शिक्षणाबद्दल तर मुलींना आईने योग्य ती माहिती देणे गरजेचे आहे . पण आपल्या संस्कृतीत असं काही घरातल्यानी उघड उघड चर्चा म्हणजे डोक्यावर ताण , कपाळावर शंभर आठ्या येतील . आमच्या काळी हे असं काही नव्हतं , असं सांगितल्या जातं . कारण आधीच्या काळात मुलींचे लग्न बारा पंधरा वर्षातच करून देण्यात कुटुंब आनंद मानायचे ; पण सुरवातीच्या काळात हिंदी चित्रपटातील चुंबनदृश्य बघून कुणाचं कॅरेक्टर बिघडलं असेल असं नाही . लैंगिक शिक्षणाचा रोख स्त्रीपुरुष सबंध कसा ठेवतात . याची मनोरंजक माहिती नसून तो कसा सुरक्षित असावा , त्यातून निर्माण होणारी वैक्तिक , भावनिक , सामाजिक बांधिलकी ह्यावर भर देणारा असावा .असं वाटतं ...
त्यासाठी कुठल्याही बालकातला बदल पालक अथवा शिक्षक ह्यांनी नजरे आड करून चालणार नाही . पालकांनी आपल्या बालकासमवेत वेळोवेळी संवाद साधत राहवं . जेणेकरून त्यांच्या मनात आपल्या पालकांबद्दल विश्वास निर्माण होईल ; पण मुलांच्या मनातले संकोच , त्यांच्या दबलेल्या भावना उघडकीस येतील . जर अशी घटना त्यांच्या सोबत कधी घडलीच , तर ते मोकळेपणाने पालकाना सांगतील . त्यातूनच बालकांच्या मनावर होणारे अनिष्ट परिणाम टाळता येतील .
एका नाजूक विषयाला हाताळताना त्याबद्दल टिकास्त्र्ही असणारच ; पण माझ्या लेखणा मागचा उदेश सुसंस्कृत तरुणाच्या सफल आयुष्याशी हितगुज साधणाराच हा संवाद असतो .... तुमचा अभिप्राय ही नक्की कळवा !!
- कोमल प्रकाश मानकर