"धर्म जेव्हा माणसाला सावरतो, तेव्हा तो औषध ठरतो. पण जेव्हा तो दुसऱ्या धर्माला शत्रू मानतो, तेव्हा तो अफू होतो. एका माणसाने पाप केलं, म्हणून संपूर्ण समाजाला दोषी ठरवणं ही बुद्धीची नाही, अभिमानाची ओढ आहे.
तुमच्या घरात चुकणारे नाहीत का? मग दुसऱ्याच्या घरात एखाद्याने गुन्हा केला, तर तुमचं संतापाचं गाठोडं का त्याच्या संपूर्ण धर्मावर फोडायचं? हे तर निव्वळ सोयीस्कर अंधत्व आहे.
खरा धर्म तोच, जो स्वतःची चूक पाहायला शिकवतो. अन्याय कुणाचाही असो, त्याचा निषेध करायला शिकवतो. पण आपण काय करतो?—आपल्याकडच्यांनी चुकी केलं, तर ‘ते अपवाद’, आणि दुसऱ्यांकडच्यांनी केलं, तर ‘संपूर्ण धर्म दोषी’?
धर्माने माणूस मोठा व्हावा. जर धर्म माणसाला उंच नेण्याऐवजी गर्व, द्वेष आणि फाटाफुटीत ढकलत असेल, तर तो धर्म नव्हे, तो अफू आहे — आणि माणूस त्या नशेत माणूसपण विसरत आहे."