Quotes by Shabdbhramar in Bitesapp read free

Shabdbhramar

Shabdbhramar

@shabdbhramar.956521
(6.5k)

शब्दभ्रमर लिखित, "कोंदण" नक्की वाचा 🙏😊🍁

epost thumb

एक पाऊल दिसायचं स्वप्नात
अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात
गोरी गुलाबी टाच.. अन
नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं...
पाण्याची लहर यायची पाऊल चढायची,
अन ओसरली कि,
सूर्य उगवल्यासारखी टाच उघडी टाकत
तळव्याखालून वाळू ओढून न्यायची...
कित्येक वर्ष ते स्वप्न मी पाहिलंय..
पण.. कधी? ती सोबत असताना..
तिने टाकलं मला तेव्हा.. तेव्हा
माझ्या आयुष्यातून बाहेर पडलं ते पाऊल..
आता स्वप्नात फक्त रेतीवरचा खोल ठसा येतो..
पण तो ठसा जातानाचा दिसतोय..
परतीचा नाही..
मी वाट पाहतोय आता.. तो परतीचा ठसा उमटण्याची...
आणि..
पराकाष्ठा करतोय तो परतीचा ठसा उमटेल, तोवर तिच्यासाठी जीव जगवत जगण्याची....

Read More
epost thumb

शब्दभ्रमर लिखित कोंदण, नक्की वाचा!🙏🍁🍁

epost thumb

शब्दभ्रमर लिखित "कोंदण" नक्की आस्वाद घ्या

epost thumb

शब्दभ्रमर लिखित कोंदण पर्व एक... सुनी अन जाडूचा मैत्री, प्रेम, द्वेष, त्याग असा संमिश्र गोष्टींनी भरलेला जादूमय प्रवास
नक्की वाचा. 🙏

Read More
epost thumb

शब्दभ्रमर लिखित कोंदण पर्व एक... सुनी अन जाडूचा मैत्री, प्रेम, द्वेष, त्याग असा संमिश्र गोष्टींनी भरलेला जादूमय प्रवास
नक्की वाचा. 🙏

Read More
epost thumb

प्रिय... यापुढं नात्याचं नाव लगेच लिहायची तयारी नाहीये अजून माझी.

मी माझ्या निवडल्या जोडीदारासोबत संसारी पोहोचलेली असेल आणि तू हे पत्र वाचत असशील. जाताना "येते" एवढंच म्हणाले. तुला मी नेहमी सारखीच तुसडी वाटली असेल नं? पण माझ्या तुसडेपणाकडे तुझं लक्ष जातंच कुठं. तुझं आपलं सतत मनू गेली कुठे? मनू जेवली का? मनू बरिये ना? मनुला काही लागत तर नाहीये ना? ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात लक्ष असतं.

मला अजून पण आठवतं. मी पहिल्यांदा तुला पाहिलं आणि एक नकारात्मक रेषा मनात उमटली. मला तू जवळ आसपास नकोसा वाटलास. पण तू मात्र उलटाच वागत होतास. मी झिडकारत होते तू स्वीकारत होतास. मी दूर जाऊ पाहत होते तू जवळ येण्यासाठी प्रयत्नशील होतास. सगळ्यांनी समजावले पण माझ्या मनात आधीच्या नात्याबद्दल असलेली अढी आणि नव्या नात्याबद्दल असलेली नकारात्मकता तशीच होती.

माझं तुझ्याकडून काहीच होऊ नये म्हणून मी सतत स्वतःला सांभाळून होते. माझी आजारपणं, माझे शिक्षण, माझा कल. माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय. यात तुझा काहीही सहभाग नसावा असेच मला सदैव वाटायचे. हा..आता एकत्र राहत होतो म्हणून मी थोडं स्वतःला सैल सोडलं होतं. पण तरीही हातचं राखूनच. तू मात्र कक्षा ओलांडत माझ्या आईच्या अडून माझी काळजी वाहू पाहत होतास. कधी कधी वाटायचं कि तू फार सपोर्टिव्ह आहेस. पण विश्वास टाकावा वाटत नव्हता.

माझं वयं वाढत होतं तसं आपल्यातलं अंतर सुद्धा मी जाणून बुजून वाढवलं. बाहेर शिक्षण घ्यायचा निर्णय घेऊन मी स्वतःला तुझ्यापासून लांब केलं. मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणत मी माझ्यामते आपल्या काहींशा मला लाजिरवाण्या वाटणाऱ्या नात्याला आयुष्यापासून लांब ठेवण्याचा यत्न सुरूच ठेवला.

माझा होणारा लाईफ पार्टनर निवडल्यावर मी आईला सांगितले पण तिला ते पटले नाही. तिने नकार दिला. त्या रात्री मी तुमचं बोलणं ऐकलं. मला तुझा राग आलेला. कारण डोक्यात होतं कि तिला तू भरवलं आहेस. पण...

तू तिची समजूत काढत होतास. माझी बाजू घेऊन? मी चुकले आणि काही नुकसान झालंच तर तू माझ्या मागे उभा राहशील याचं आश्वासन तू तिला देत होतास? माझ्या जोडीदाराच्या बिजिनेस आयडियाला सपोर्ट करण्यासाठी तू स्वतःची जमीन विकून पैसे देऊ करत होतास? तू आमच्या दोघींच्या मध्ये यायचं नाही. इतकं तिने सुनावलं पण तू मागे हटला नाहीस. का? तुला काय पडलं होतं इतकं? मी तर तुला कोणीही मानत नव्हते ना? मग?

माझ्या आईशी भांडून तिला मारझोड करुन तिचा पगार दारू जुगारासाठी ओढणारा बाप मी पाहिला होता.
माझ्या भवितव्याचीच काय पण जगण्याचीही पर्वा नसणारा बाप मी पाहिला होता.
बाप असून पण नसल्यासारखा आयुष्याचा एकेक दिवस मी पाहिला होता.
तो मेल्यावर त्या नात्याबद्दल माझी संवेदना ही मेली.

पण..पण तू आलास.

मला आणि आईला घरी आणलंस. परत तोच दुवा साधण्याचा प्रयत्न केलास. पण ह्यावेळी मी कमी पडले. तरीही तू माझ्यासाठी भांडलास. परक्याच्या मुलीला आपलं मानून रक्ताच्याही नात्याच्या वर जाणारं नातं तू माझ्याशी जोडलयस. माझ्यासाठी सदैव असणारा माझा बाप माझा जन्मदाता नसला तरी तो आहे म्हणून मी अनाथ नाही हे मला आता कळलंय.

बाबा मला माफ कर. परत येईन तेव्हा तुझ्या हक्काची मुलगी तुझी मनू तुझ्या समोर असेल. तुझ्याशी नजर मिळवण्याचीही हिम्मत होतं नव्हती माझी म्हणून येते एवढंच बोलून सटकले. खरंतर कडकडून मिठी मारून तुझी क्षमा मागायची होती. परत येईन त्यावेळी नक्की.

तुझी
मनू.

- शब्दभ्रमर 🍁🍁

Read More

चांदण्यांना बहर येता

हल्ली चांदण्यांना बहर येता
येतो ऊत तुझ्या आठवांना.
शरदातल्या रेशीम रात्री
त्या जानिवा छेडती गात्राना.

लक्षात आहे ते आपले तासंतास गच्चीवर
विभोर होऊन एकमेकां पाहणे.
तुझे लाघव मला जाणवून
मी तुझ्यात दंग होत राहाणे.

तू मोगऱ्याची कळी खुडून
माझ्या दिशेने फेकली होती.
तिच्या गंधाने माझी रात्र
तूझ्या स्वप्नी निजली होती.

शेलाट्या बांध्याची तू अन
मोहक चाल ती तुझी अजून स्मरते.
शतपावली करत, बाबांशी बोलत शोधायची तशी
तुझी नजर मला शोधन्या अजून झुरते?

आशावादी मन माझे.. पण आता कुठली तिथे तू?
त्यावेळी असायचे तसे कुठले ते शारद सुंदर चांदणे?
मी मात्र इथेच असतो अजून.. पण राहतो टक्क जागा.
अताशा जमते मला चांदण्याकडे पाठ फिरवून राहाणे.


-शब्दभ्रमर

Read More

सुख एक मृगजळ

आनंद चव्हाण रेल्वेच्या बोगीत बसून हातातल्या भोवऱ्याकडे पहात होता. त्याच्या पाच वर्षाच्या मुलाने कामावरून परतताना भोवरा आणा म्हणून हट्ट केला होता. भोवरा तर त्याने मिळवला होता. आपल्या मुलाला तो भोवरा देणार याचे समाधान त्याला वाटत होते कि नव्हते याचा निवाडा मात्र त्याचे मन करू शकत नव्हते.

भयानक युद्धामध्ये दुष्मन देशाच्या सैनिकांधले दोन सैनिक एका   दरीत समोरासमोर आले. दुष्मन एक काय किंवा अनेक काय.. तो दुष्मनच.. चालून गेले एकमेकांवर.. हातातली शस्त्रे काडतूसे संपून निष्प्राण झाली होती. उरल्या संगिनींनी आणि सरावात मिळवलेल्या कौशल्याने दोघे एकमेकांशी भांडू लागले. सरतेशेवटी एक वरचढ ठरला. त्याने समोरच्या सैनिकांच्या छातीत सांगिनीचा भाला खुपसला. तो कोसळला. ज्याने त्याला भाला भोसकला तोही दमून पडला. काही वेळ श्वास गोळा करत त्याने शत्रूकडे पाहिले. त्याची छाती हलत होती. प्राण पूर्ण गेला नव्हता.

ह्याने उठत त्याला निष्प्राण करण्यासाठी परत संगीण उचलली. त्याच्यावर उगरलीच होती तेवढ्यात तो अस्फुटसा काही बोलला.
"साब.. साब.. रुको साब."

तो थांबला.

" खूब लढे साब... ल.. लेकिन अब मै नही बचता.. कुछ बोलना है साब.. सून लो.. " तो अर्जव करत होता.

त्याने पडल्या सैनिकासमोर गुढगे टेकवले.

" साब.. बच्चे है आपको?.. बच्चे? कितने है साब.? " त्याने युद्धभूमीवर अजब प्रश्न विचारला होता.

" लडका है एक... " त्याने उत्तर दिले.

" वाह.. उमर लंबी हो आपके बेटे कि साब.. मुझे भी एक बेटा है साब.. जन्ग के बाद उसको मिलके ये देना चाहता था.. " असे म्हणत त्याने वर्दीच्या पाउच मधून एक भोवरा काढला.

तसे जिंकल्या सैनिकाच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली.

"आपके बेटे को मेरी तरफ से देना.." असे म्हणत त्याने प्राण सोडला.

आनंदच्या डोळ्यात परत अश्रू जमा झाले होते. कर्तव्याच्या घाईत मुलासाठी घ्यायचा भोवरा त्याला दुसऱ्या एका कर्तव्यक्षम बापाकडून मिळाला होता. मुलाने मागितलेलं खेळण देण्याचं सुख आनंदला डोळ्यातल्या अश्रूमुळे मृगजळासारखं भासत होतं.. सुख खरतर मृगजळच.. भोगण्याचा क्षण खूप छोटा.. पण त्याला मिळवतानाची दुःखे अतिशय दीर्घ.

- शब्दभ्रमर

Read More

खळगी

सत्तरीतला नाथा आज जुळवून आणलेले 22 रुपये घेऊन रणरणत्या उन्हात उभा होता.. जनता खानावळी बाहेर.. रोज कमीत कमी वीस रुपये जुळवायचा त्याचा शिरस्ता चुकला नव्हता. कारण ते नाही जुळवले तर उपासमार ठरलेली. आज एका गॅरेज वाल्याला त्याची लादी धुवून द्यायचे 22 रुपये त्याला मिळाले होते.

जनता खानावळ वीस रुपयात 2 नरम पुऱ्या आणि भाजी देत. तो त्याचा दिवसभराचा आहार. रात्री काही मिळालं तर ठीक नाहीतर पाणपोई वर क्षुधाशांती ठरलेली. जनता खाणावळीची पुरी भाजी यासाठी कि, ती चावायला बरी पडत. कारण त्याच्या तोंडाचं बोळक झालेलं. दुसरं काही न चावल्यामुळं पचत पण नव्हतं आणि परवडतही नव्हतं. रस्त्याच्या कडेला आसरा मिळवलेला नाथा अनाथ होता. सोडलेला... त्यागलेला.. हाकललेला.. कफल्लक.

आत शिरताच त्याने तिथल्या पोऱ्याला एक पुरी भाजी प्लेट सांगितली. आजचं पोरगं नवं होतं.

त्याने नाथाकडे पहात विचारलं, "पैसे आहेत ना म्हाताऱ्या??"

समोरची परिस्थिती जशी दिसते त्याप्रमाणेच प्रश्न विचारले जातात. पैसे असले तरच नाथा तो उंबरा ओलांडत असला तरी हे सत्य फक्त नाथाच होतं. त्या पोराला त्याची काय पर्वा?

नाथाने मूठ उघडत त्याला पैसे दिले आणि बाकड्यावर जाऊन बसला. पोऱ्याने दोनेक मिनिटात पुरिभाजी आणून दिली. भुकेने तोंडात लाळीचा जमा झालेला घोट पीत नाथाने ते घेतलं आणि तो पहिला घास कपाळी लावून हळू हळू खाऊ लागला. दीड सव्वा पुरी खाऊन झाली असेल. तितक्यात तिथून कोणीतरी मिरचीच पोतं घेऊन गेलं. तिखटाचा वास नाकात घुसताच नाथाला ठसक्याची उबळ आली. लगबगिने त्याने ताट बाजूला ठेवलं आणि पाण्याकडे जायला तो उठला.

नरड्यात घास अडकून त्रास होऊ नये म्हणून त्याने काउन्टर जवळच्या एका टेबलावर ठेवलेला ग्लास उचलला आणि पिऊ लागला. पाणी पिऊन परत जागेवर येऊन पाहतो तर काय...
त्याचं ते अर्ध संपवलेलं ताट खरकटं समजून त्या पोऱ्याने उचलून त्याच्या समोरच खरकट्यात टाकलं.

" आरं..  मला खायाच होतं.. अजून.. " मनातले शब्द मनातच घुमले कोणी ऐकलेच नाहीत. डोळ्यात तरळलेलं पाणी बघायला कोणाला उसंतच नव्हती.

निराशेने घेरलेलं मन घेऊन नाथा रस्त्यावर आला. मान खाली करून रस्त्याने चाललाच होता तेवढ्यात कोणीतरी ओरडले...
"ए बाबा अरे..!! "

नाथाने वर बघितले समोरून सुसाट गतीने एक ट्रक येतं होता. नाथाने हलक्याश्या हास्याने त्याचे स्वागत केले. अलगद डोळे मिटले. त्याचा दंड खेचण्याची आणि ओढल्याची जाणीव होताच त्याने डोळे उघडले.

आयुष्य तसेच होते.. तो अजून जगणार होता.. निराशाही त्याच्यासोबत जगणार होती.

- शब्दभ्रमर 🍁🍁

Read More